Friday, January 2, 2015

DeviMahatmya Adhyay 8 श्रीदेवीमहात्म्य अध्याय (८) आठवा


DeviMahatmya Adhyay 8 
DeviMahatmya Adhyay 8 is in Marathi. It is a translation of Durga SaptaShati Adhyay 8 which is in Sanskrit. Translation is very nicely done by Shri Rambaba Vernekar. In this adhyay the description of the army of demons is done. Demon army was uncountable and many demons were very cruel and furious. Even God of death, Kala was also afraid of these demons. Demons like Rakta bij and Shumbhasoor were also with them. As such Powers of Gods-Hari, Har, Brahma, Skanda, Nrusinha, Indra and varah appeared on the battle field to fight with the demons. Goddess also was with Chandika, Kali and lion. Goddess Katyayini and all Matrugana were also fighting with demons. Many demons were killed, many fled from the battle. Finally Demon Rakta bij was killed by Goddess. In the next adhyay war between Nishumbha and Goddess is described.
श्रीदेवीमहात्म्य अध्याय (८) आठवा
श्रीगणेशाय नमः । श्रीदेव्यै नमः ।
सुरथराजा कृपापात्रा । मेधा ऐकवी देवीचरित्रा ।
मार्कंडेय शिष्या पवित्रा । कथा विचित्र सांगतसे ॥ १ ॥
सूत शौनका करी कथन । सर्व ऋषि करिती श्रवण ।
तीचि कथा तुम्हां सांगेन । एकाग्र चित्तें श्रवण करा ॥ २ ॥
रणीं पडलियावरी चंड । मृत्यु पावला असतां मुंड ।
उरलें सैन्य जें कां प्रचंड । रणीं पडलें असतांही ॥ ३ ॥
तो दैत्येश्र्वर शुंभ जाण । तत्काळ झाला क्रोधायमान ।
तैसा निशुंभहि आपण । क्रोधायमान जाहला ॥ ४ ॥
ते दोघे प्रतापी केवळ । ज्यांपुढें काळही कांपे चळचळ ।
शुंभे बोलावूनि दैत्यदळ । त्यांतें सांगता जाहला ॥ ५ ॥
दैत्यांमध्ये थोर थोर । शायशीं मुख्य सरदार ।
उदायुध नामें असुर । किंवा उदायुध असती जे ॥ ६ ॥
ते आपापलीं दळें घेऊन । आजि निघोत युद्धालागून ।
चंडिकेशीं युद्ध निर्वाण । करणें आहे रणांगणीं ॥ ७ ॥
आजि माझे आज्ञेकरुनी । निघावें शस्त्रास्त्रें घेऊनी ।
पाठीमागें न रहावें कोणीं । हीचि आज्ञा समस्तां ॥ ८ ॥
कंबुसंख्येचे असुर । चौर्‍यायशीं महा सरदार । 
अथवा जे कंबुनामें दैत्येश्र्वर । राजे म्हणविती आपणां ॥ ९ ॥
जे युद्धीं महादुर्धर । प्रलयरुद्रासारिखे क्रूर । 
असंख्य सेनेचा अधिकार । एकएकाजवळिकें ॥ १० ॥
ते सर्व आपुली सैन्यें घेऊनी । आजि निघोत युद्धालागूनी ।
शस्त्रास्त्रीं युद्ध सर्वांनीं । चंडिकेशीं करावें ॥ ११ ॥
दैत्यकुळें पन्नास प्रबळ । कोटिवीर्य नामें केवळ ।
अथवा पन्नास कोटि सकळ । असुरकुळें जाणावीं ॥ १२ ॥
पोटभेदेंकरुनि अर्थ । तो येथ काढिला यथार्थ ।
ज्यासी ये संशय त्यानें भाष्यार्थ । अवलोकन करावा ॥ १३ ॥
असो पन्नास कोटि असुरकुळ । तितुकेही राजे सकळ ।
महापराक्रमी केवळ । दैत्य दुर्धर काळासी ॥ १४ ॥
असंख्य सैन्याचा अधिकार । एकाएकासी असे साचार ।
ते आजि निघोत सत्वर । युद्धालागीं सज्जोनी ॥ १५ ॥
धौम्रनामाचे दैत्य अद्भुत । त्यांची कुळें असती शत ।
तीं युद्धालागीं सत्वर निघोत । माझे आज्ञेकरुनियां ॥ १६ ॥
एका कुळाची संख्या केवळ । एकोत्तर शत राजे सकळ ।
तो सर्व आप्तांचा मेळ । कुळ ऐसें म्हणती तया ॥ १७ ॥
कुळपुरुष दुसरा अर्थ । समुदाय म्हणती यथार्थ ।
असुर शुंभ बोलिला समर्थ । तेंचि ऐका सर्वही ॥ १८ ॥
कलकाचे वंशीं जाहले । कालक नामातें पावले ।
जे काळातें कथूं लागले । कोठे पळसी म्हणोनी ॥ १९ ॥
ते कालक महाअसुर । युद्धा निघोत सत्वर ।
स्वसैन्य घेऊनि अपार । चंडिकेशीं झुंजावया ॥ २० ॥
दुर्हृदाचे वंशी जन्मले । दौर्हृद ऐसें नाम पावले ।
आजि युद्धा निघोत भले । सैन्यासहित आपुल्या ॥ २१ ॥
जे मरुवंशीं जन्मती । मौर्य नामातें पावती । 
ते युद्धा निघोत निश्र्चितीं । आजि आपुल्या सैन्येशीं ॥ २२ ॥
जे कालिकावंशी उत्पन्न । कालिकेय नामाभिधान । 
ते सर्वही असुरगण । युद्धालागीं निघोत कीं ॥ २३ ॥
हीचि आज्ञा समस्तांसी । युद्धासी निघावें वेगेसीं ।
घेऊनि अपार स्वसैन्यासी । देवीसह युद्ध करा ॥ २४ ॥
यापरी सर्वां आज्ञापूर्त । असुरपति शुंभ जाण ।
जयाचें भय कृतशासन । तोही निघता जाहला ॥ २५ ॥
असंख्यांत महावीर । घेऊनि निघाला सत्वर ।
चतुरंग सेना अपार । अंत नाहीं मोजिता ॥ २६ ॥
तें सैन्य अतिभयंकर । अनेक मायावी असुर ।
दाही दिशा पृथ्वी अंबर । भरुनि अपार चालिले ॥ २७ ॥
असंख्य असुर घेऊनि । शुंभासुर आला युद्धालागूनी ।
ऐसें चंडिकेनें पाहूनी । टणत्कार करिती जाहली ॥ २८ ॥
देवीधनुष्याचा टणत्कार । तेणें भरले सर्व अंबर । 
भूमीसी कंप सुटला थोर । शेष धरुं शकेना ॥ २९ ॥
त्यांत सिंहाची आरोळी । नाद भरला ब्रह्मांडगोळीं ।
त्यांत घंटानाद ते काळीं । करिती जाहली जगदंबा ॥ ३० ॥
धनुष्य-सिंह-घंटांचा ध्वनी । नाद भरला दिग्गजकर्णीं ।
जो नाद ब्रह्मांडीं ऐकोनी । देव भयभीत जाहले ॥ ३१ ॥ 
तेव्हां पसरोनियां मुख । चामुडां देती जाहली हांक ।
भयभीत चौदा लोक । होते जाहले तेधवा ॥ ३२ ॥
त्यांत वाद्यांचें घनचक्र । दैत्यांच्या हांका अनिवार ।
दिग्गज शेष काळ समुद्र । टांकू पाहती मर्यादा ॥ ३३ ॥
देवी सिंह काली चंडिका । अवघीं मिळोनियां देखा ।
महाक्रोधें दैत्यां सकळिका । नाश इच्छितीं जाहलीं ॥ ३४ ॥
त्यानंतर नरेंद्रा जाण । जें होतें जाहले वर्तमान ।
सांगतो मी तुजलागून । एकाग्र चित्तें अवधारीं ॥ ३५ ॥
सर्व दैत्यांचा व्हावा नाश । व्हावा सर्व देवांचा उत्कर्ष ।
म्हणोनि शक्ति सावकाश । सर्व देवांच्या पातल्या तैं ॥ ३६ ॥
ज्या देवाचें जैसें रुप बळ । तैशाचि त्यांच्या शक्ति केवळ ।
हरि-हर ब्रह्मादि सकळ । शक्तिरुपें पातले ॥ ३७ ॥
इंद्र स्कंद वराह नृसिंह । याही देवांच्या शक्ति सर्व ।
घेऊनि आपापलें वैभव । रुप-भूषण-वाहनादि ॥ ३८ ॥
चंडिकेसी सहाय होऊन । करावें दैत्यांचे निर्मूलन ।
यास्तव शरीरांपासूनि निघून । युद्धालागीं पातल्या ॥ ३९ ॥
हंसयुक्त विमानीं बैसली । स्फटिकमाला हस्तीं धरिली ।
कमंडलूनें शोभा दाविली । एकहस्तीं जियेच्या ॥ ४० ॥
ऐसी ब्रह्मशक्ति ब्रह्माणी । ब्राह्मी म्हणती तियेलागूनी ।
चतुर्मुख रुप धरोनी । युद्धालागीं आली असे ॥ ४१ ॥
माहेश्र्वरी शक्ति जाण । वृषभारुढ आली होऊन ।
एकहस्तीं त्रिशूळ घेऊन । पंचमुखी शोभली ॥ ४२ ॥
सर्पांचीं वलयभूषणें बहुत । चंद्ररेखा भाळीं शोभत ।
युद्ध करावें दैत्यांप्रत । म्हणोनि येती जाहली ॥ ४३ ॥
कुमाराची शक्ति जाण । षण्मुखें शोभे आपण । 
हस्तीं दिव्यशक्ति धरुन । मयूरावरी बैसली ॥ ४४ ॥
ती स्कंदाचें रुप धरोनी । देवीसी सहाय जाहली येऊनि ।
असुरांच्या वधालागूनी । येती जाहली कौतुकें ॥ ४५ ॥
तैसीच वैष्णवी शक्ति । गरुडावरी जाहली बैसती ।
शंख चक्र गदा शार्ङग हातीं । खड्गधारी पातली ॥ ४६ ॥
यज्ञवराहाचें रुप जाण । घेता जाहला नारायण । 
ती वाराही शक्ति आपण । येती जाहली युद्धासी ॥ ४७ ॥
नारसिंही नृसिंहाची । शक्ति येती जाहली साची ।
जिचे जटेनें ताडितांची । रिचवलीं नक्षत्रें ॥ ४८ ॥
निघाल्या तेजाच्या त्या हया । तेणें विजा जाती करपोनियां ।
दैत्य जळती ठायींचे ठावा । पळों लागले सर्वही ॥ ४९ ॥
वज्रहस्ता इंद्रशक्ती । ऐरावतारुढ शोभती । 
सहस्त्रनेत्रें विराजती । शक्र जैसा तैसी असे ॥ ५० ॥
या प्रकारें इतुक्या शक्ती । मिळाल्या असतां निश्र्चितीं ।
तेथें प्रकटला उमापती । प्रलयरुद्र त्या कालीं ॥ ५१ ॥
सर्व शक्तींसहित जाण । मिळोनि बोले पंचवदन ।
आतां करावें दैत्यहनन । चंडिके त्वां निर्धारें ॥ ५२ ॥
इतुक्यांत देवीदेहापासून । निघाली शक्ति अतिभीषण ।
तिचेंही नाम चंडिका जाण । अनंत शिवा वेष्टित जी ॥ ५३ ॥
ती अत्युग्र शक्ति भारी । असंख्यात गर्जना करी ।
म्हणे सदाशिवा अवधारीं । दूतत्व तुम्हीं करावें ॥ ५४ ॥
मी असे अपराजिता । तूं धूम्र जटिल तत्वतां ।
ईशान शंकर तूं अनंता । तरी एक आतां करावें ॥ ५५ ॥
दूत होऊनि जाई वेगीं । शुंभ-निशुंभांचे पार्श्र्वभागीं ।
अतिं गर्विष्ठ दानवांलागीं । बोध तुवा करावा ॥ ५६ ॥
अन्यही जे जे दानव । तयांसंगे असती सर्व ।
त्या सर्वांसी अतम्यभाव । होय ऐसें करावें ॥ ५७ ॥
त्रैलोक्य इंद्रानें भोगावें । तुम्हीं पाताळागी जावें ।
देवांनी यज्ञभाग सेवावे । हेंचि उचित या काळीं ॥ ५८ ॥
जीविताची आस्था असेल । तरी हेंचि तुम्ही कराल ।
नाहींतरी मृत्यु पावाल । संशय नाहीं सर्वथा ॥ ५९ ॥
तुम्ही युद्धाची इच्छा धरुन । युद्ध कराल अतिदारुण ।
तरी माझ्या शिवा संतोषून । मांस तुमचें भक्षोत कां ॥ ६० ॥
देवीनें या प्रकारें सांगून । शिवासी पाठविलें जाण । 
म्हणोनि तिचें नामाभिधान । ' शिवदूती ' जाहले ॥ ६१ ॥
ती शिवदूती शिवरुपिणी । विख्यात होती जाहली जनीं ।
असो तेव्हां शिव जाऊनी । दैत्यांसी सांगता जाहला ॥ ६२ ॥
तुम्हीं जावें पाताळासी । इंद्रें भोगावें स्वर्गासी । 
ऐसें ऐकोनि दैत्यांसी । क्रोध येता जाहला ॥ ६३ ॥
युद्ध करावयालागूनी । असंख्यात शस्त्रें सज्जोनी ।
जेथें होती कात्यायनी । तेथें पातले सर्वही ॥ ६४ ॥
कतराजऋषीचें गोत्र । त्यासी कात्य म्हणती सर्वत्र ।
त्यांत उत्पन्न जाहली पवित्र । म्हणोनि कात्यायनी ती ॥ ६५ ॥
त्या देवीवरी असुरपती । नाना शरवर्षाव करिती ।
शूल परशु चक्र शक्ती । हाणिती तेव्हां निःशंक ॥ ६६ ॥
गुप्त प्रकट युद्ध करिती । दैत्य अनेक स्वरुपें धरिती ।
विचित्र आसुरी माया दाविती । नाना वाहनीं बैसोनियां ॥ ६७ ॥
देवी अपुल्या शरेंकरुन । सर्वही टाकी निर्दाळून ।
तेव्हां देवीची लीला पाहून । आश्र्चर्य करिती सुरवर ॥ ६८ ॥
तैसीच अग्रभागीं काली । शूलधायें करी विकळी ।
खट्वांगताडनें दैत्यमेळीं । प्राण टाकिले क्षणार्धें ॥ ६९ ॥
ब्रह्मशक्तीनें जल शिंपोन । कितीएकांचे घेतले प्राण ।
तथापि कमंडलु पूर्ण । जल कांहीं अटिना ॥ ७० ॥
रुद्रशक्तिनें मारुनि त्रिशूळ । विध्वंसिलें असुरदल ।
वैष्णवी चक्रें दैत्य तत्काल । असंख्यात निवटीतसे ॥ ७१ ॥
कुमाराची शक्ति कौमारी । शक्ति टाकोनि दैत्य संहारी ।
इंद्रशक्ति वज्रें सत्वरीं । दैत्य आटीत तेधवां ॥ ७२ ॥
रक्ताचे पूर वाहती । दैत्य पडलें नेणों किती ।
मार्ग तेव्हां न चले निश्र्चितीं । कबंधे नाचती अपार ॥ ७३ ॥
गज रथ अश्र्व पदाति वीर । रक्तपूरीं वाहती अपार ।
वाराहीनें मारोनि तुंडप्रहार । दैत्य अपार मारिले ॥ ७४ ॥
दाढेंकरुनि चक्रेंकरुनीं । वाराही टाकी संहारोनी ।
नृसिंहशक्ति विदारुनी । नखें दैत्या मारीतसे ॥ ७५ ॥
तैसेंचि तियेनें ते कालीं । असंख्य भक्षिल्या दैत्यावली ।
जिच्या तेजाचिये अनलीं । दग्ध होती क्षणमात्रें ॥ ७६ ॥
नृसिंहशक्तीची गर्जना । ऐकोनि दैत्य टाकिती प्राणां ।
चंडाट्टहास करितां नाना । दैत्य पडती रणभूमीं ॥ ७७ ॥
शिवदूती नादेंकरुन । दैत्य टाकी संहारुन ।
भूमीसी पडले ते भक्षोन । निर्मूल केलें सर्वही ॥ ७८ ॥
असो या प्रकारें मातृगण । क्षोभ पावला अतिदारुण ।
ऐसें पाहतां दैत्य जाण । पळते जाहले दशदिशा ॥ ७९ ॥
पळाले पाहूनि असुरराज । मग धांवला रक्तबीज ।
क्रोधें युद्ध करावया सहज । देवीसवें तेधवां ॥ ८० ॥
त्याच्या शरीरापासूनी । जेव्हां रक्तबिंदु पडे मेदिनी ।
त्यासारिखा दैत्य तत्क्षणीं । उत्पन्न होय ऐसा तो ॥ ८१ ॥
तो हस्तकीं गदा घेऊन । युद्धासी धांवला न लगतां क्षण ।
इंद्रशक्तीनें वज्र मारोन । ताडन केलें तयासी ॥ ८२ ॥
तेव्हां सहजचि रक्त पडतां भूमीं । दैत्य उद्भवले तद्रुप पराक्रमी ।
ते शस्त्रें घेऊनि युद्धधर्मी । प्रवर्तले सर्वही ॥ ८३ ॥
त्यांच्याही देहांपासूनि निश्र्चित । जितुके रक्तबिंदु पडत ।
तितुके दैत्य होती समस्त । रक्तबीजासारिखे ॥ ८४ ॥
त्याजसारिखा पराक्रम । क्रोधानें करिती संभ्रम । 
नाना शस्त्रें लक्षोनि वर्म । देवीलागीं ताडिती ॥ ८५ ॥
ऐद्रीनें वज्रेंकरुन । रक्तबीजाचें मस्तक केलें चूर्ण ।
रक्त पडतांचि दैत्य उत्पन्न । सहस्त्रावधि जाहले ॥ ८६ ॥
वैष्णवी मारी चक्र धरुन । इंद्रशक्ति गदेने करी ताडन ।
रक्त पडतां भूमीसी जाण । असंख्यात होती ते ॥ ८७ ॥
कुमारशक्ति वराहशक्ती । रुद्रशक्ति नृसिंहव्यक्ती ।
चामुंडा आणि शिवदूती । युद्ध करित्या जाहल्या ॥ ८८ ॥
आपआपुलीं शस्त्रे घेऊन । संग्राम करी मातृगण ।
परी दैत्य असंख्यात होऊन । जग सर्व व्यापिलें ॥ ८९ ॥
तेव्हां ऐसें कौतुके जाहले । स्वर्ग मृत्यु पाताल व्यापिलें ।
स्थान रितें नाहीं राहिलें । या त्रैलोक्यामाझारी ॥ ९० ॥
रक्तबीज जिकडेतिकडे । पाहोनि देवांसी पडलें सांकडे ।
ब्रह्मादि भयचकित वेडे । होते जाहले सर्वही ॥ ९१ ॥
ऐसें पाहोनि तेव्हां चंडिका । कालीते बोलती जाहली देखा । 
म्हणे मुख पसरोनि सकळिकां । रक्तबिंदूंतें प्राशन करी ॥ ९२ ॥ 
रक्तापासूनि उत्पन्न असुर । त्यातें भक्षण करीं सत्वर ।
तुज सांगितला हा प्रकार । करितां मरण पावेल तो ॥ ९३ ॥
ऐसें सांगोनि देवी त्वरित । शूल घेऊनि असे मारत ।
काली मुख पसरोनि गिळीत । रक्तबिंदु ते कालीं ॥ ९४ ॥
रक्तबिंदु न पडे महीं । तेव्हां दैत्य आटले सर्वही ।
असंख्यांत भक्षिले पाहीं । मुख पसरोनि कालीनें ॥ ९५ ॥
एक उरला तो गदापातें । ताडिता जाहला देवीतें ।
देवी न गणोनियां त्यातें । ताडिती जाहली पुनरपि ॥ ९६ ॥
त्याच्या शरीरापासून । निघाले जे रक्तकण ।
कालीचे मुखीं पडतां उत्पन्न । मुखांत दैत्य जाहले ॥ ९७ ॥
त्यांतें चावूनि काली भक्षीत । जे जे रक्तानें उत्पन्न होत ।
एवं चामुंडेंनें समस्त । रक्त त्याचें भक्षिले ॥ ९८ ॥
देवीनें शूलादि बाण त्यासी । मारोनि पाडिला भूमीसी ।
तेव्हां जयजयकार आकाशीं । पुष्पवर्षावही जाहला ॥ ९९ ॥
सर्व देवांतें हर्ष जाहला । मातृगणही नाचूं लागला ।
रक्तप्राशने मद तयाला । होता जाहला बहुसाल ॥ १०० ॥
असो या प्रकारेंकरुन । केलें रक्तबीजाचे हनन ।
आतां पुढील अध्यायीं मरण । निशुंभाचे होईल पैं ॥ १०१ ॥
व्यासें जैसें वर्णन केलें । आणि देवीनें जैसें बोलविलें ।
तैसेंचि येथें निरुपिलें । संशय नाहीं सर्वथा ॥ १०२ ॥
याचें करितां श्रवण पठण । सर्व संकटें जाती निरसून ।
श्रवण करी देवी आपण । भक्तांजवळी बैसोनियां ॥ १०३ ॥
चंडिके तुज नमस्कार । माझे असोत वारंवार । 
राम तव चरणांचा किंकर । शरणागत सद्भावें ॥ १०४ ॥
॥ इति श्रीमार्कंडेयपुराणे सावर्णिके मन्वंतरे देवीभगवतीमाहात्म्ये महासरस्वत्याख्याने अष्टमोऽध्यायः ॥
॥ श्रीजगदंबार्पणमस्तु ॥
   DeviMahatmya Adhyay 8 
श्रीदेवीमहात्म्य अध्याय (८) आठवा


Custom Search
Post a Comment