Thursday, May 25, 2017

Samas Sahava Vandan Bhakti समास सहावा वंदनभक्ति


Dashak Choutha Samas Sahava Vandan Bhakti
Samas Sahava Vandan Bhakti is in Marathi. In this Samas Samarth Ramdas is telling us about Bhakti. Vandan Bhakti is sixth from Navavidha Bhakti.
 समास सहावा वंदनभक्ति
श्रीराम ॥
मागां जालें निरुपण । पांचवे भक्तीचे लक्षण ।
आतां ऐका सावधान । साहावी भक्ती ॥ १ ॥
१) मागील समासांत पांचवी भक्तीचे निरुपण झाले. आतां सहावी भक्ती मन लावून ऐका. 
साहावी भक्ती तें वंदन । करावें देवासी नमन ।
संत साधु आणी सज्जन । नमस्कारीत जावे ॥ २ ॥
२) नमस्कार करणें ही सहावी भक्ती. देवाला नमस्कार करावा. संत, साधु व सज्जन यांना
नमस्कार करीत जावे.
सूर्यासि करावे नमस्कार । देवासि करावे नमस्कार ।
सद्गुरुस करावे नमस्कार । साष्टांग भावें ॥ ३ ॥
३) सूर्याला नमस्कार घालावा. देवाला नमस्कार घालावा. सद्गुरुला मनापासून 
साष्टांग नमस्कार घालावा.  
साष्टांग नमस्कारास अधिकारु । नाना प्रतिमा देव गुरु ।
अन्यत्र नमनाचा विचारु । अधिकारें करावा ॥ ४ ॥
४) साष्टांग नमस्कार करण्यास अनेक प्रकारच्या देवाच्या प्रतिमा, भगवंत आणी
सद्गुरु हे योग्य अधिकारी आहेत. इतरांना त्यांच्या योग्यतेप्रमाणे नमस्कार करावा. 
छपन्न कोटी वसुमती । मधें विष्णुमूर्ती असती ।
तयांस नमस्कार प्रीती । साष्टांग घालावे ॥ ५ ॥
५) आपल्या पृथ्वीचा व्यास छपन्न कोटी आहे. त्यामध्यें अनेक विष्णुमूर्ति आहेत.त्या सर्वांना साष्टांग नमस्कार करावा. 
पशुपति श्रीपति आणी गभस्ती । यांच्या दर्शनें दोष जाती ।
तैसाचि नमावा मारुती । नित्य नेमें विशेष ॥ ६ ॥
६) शंकर, विष्णु व सूर्य यांच्या दर्शनाने पापें नाहीशी होतात. त्यांना व मारुतीला विशेष करुन नित्यनेमाने नमस्कार घालावा.
श्र्लोकः
शंकरः शेषशायी च मार्तंडो मारुतिस्तथा ।
एतेषां दर्शनं पुण्यं नित्यनेमे विशेषतः ॥
भक्त ज्ञानी आणी वीतरागी । माहानुभाव तापसी योगी ।
सत्पात्रें देखोनि वेगीं । नमस्कार घालावे ॥ ७ ॥
७) भक्त, ज्ञानी, वैरागी, स्वानुभवी, तापसी, योगी आणि श्रेष्ठ व्यक्ति यांना बघितल्यावर लगेच नमस्कार घालावा.
वेदज्ञ शास्त्रज्ञ आणी सर्वज्ञ । पंडित पुराणिक आणी विद्वजन ।
याज्ञिक वैदिक पवित्रजन । नमस्कारीत जावे ॥ ८ ॥
८) वेद जाणणारे, शास्त्रज्ञ, सर्व विद्या जाणणारे, पंडित, पुराणिक, विद्वान, आणी पवित्र व्यक्ति या सर्वांना नमस्कार घालावा. 
जेथें दिसती विशेष गुण । तें सद्गुरुचें अधिष्ठान ।
या कारणें तयासी नमन । अत्यादरें करावें ॥ ९ ॥
९) ज्या व्यक्तिमध्ये विशेष गुण दिसतील ती व्यक्ति सद्गुरु योग्यतेची मानून आदराने त्यांस नमस्कार करावा.
गणेश शारदा नाना शक्ती । हरिहरांच्या अवतारमूर्ती ।
नाना देव सांगों किती । पृथकाकारें ॥ १० ॥
१०) गणेश, शारदा, निरनिराळ्या शक्ति देवता, हरिहरांच्या अवतारमूर्ति, निरनिराळे देव किती सांगावे सर्वांना नमस्कार करीत जावे. 
सर्व देवांस नमस्कारिलें । तें एका भगवंतास पावलें ।
येदर्थीं येक वचन बोलिलें । आहे तें ऐका ॥ ११ ॥
११) सर्व देवांस नमस्कार करावा. तो एक भगवान विष्णुनाच पोहोचतो.याबद्दल एक वचन सांगितले आहे ते ऐका. 
श्र्लोकः 
आकाशात्पतितं तोयं यथा गच्छति सागरं ।
सर्वदेवनमस्कारः केशवं प्रतिगच्छति ॥
आकाशांतून पडलेले पाणी ज्याप्रमाणे समुद्रास जाऊन मिळते त्याचप्रमाणें सरर्व देवांना केलेले नमस्कार श्रीविष्णुला जाऊन पोहोचतात.   
या कारणें सर्व देवांसी । नमस्करवें अत्यादरेंसीं ।
अधिष्ठान मानितां देवांसी । परम सौख्य वाटे  ॥ १२ ॥
१२) या कारणाने सर्व देवांना अति आदराने नमस्कार करावेत. सर्व देवांमध्ये भगवंताचे वास्तव्य आहे अशी भावना ठेवली तर भगवंताला मोाठा आनंद होतो.
देव देवांचीं अधिष्ठाने सत्पात्रें सद्गुरुचीं स्थानें ।
या कारणें नमस्कार करणें । उभय मार्गीं ॥ १३ ॥ 
१३) सगळ्या देवांमध्ये भगवंताचे चास्तव्य आहे. सर्व साधु-संत-सज्जन यांचे ठिकाणी श्रीसद्गुरुचे वास्तव्य आहे ही भावना ठेवून दोघांना नमस्कार करावेत.              
नमस्कारें लीनता घडे । नमस्कारें विकल्प मोडे ।
नमस्कारें सख्य घडे । नाना सत्पात्रासीं ॥ १४ ॥
१४) नमस्कारानें नम्रता येते. तसेच अहंकार कमी होत असल्याने विकल्प कमी होतो. अनेक सज्जनांशी स्नेह निर्माण होतो.
नमस्कारें दोष जाती । नमस्कारें अन्याय क्ष्मतीं । 
नमस्कारें मोडलीं जडतीं । समाधानें ॥ १५ ॥
१५) नमस्कारानें अंगांतील दोष जातात.  नमस्काराने माणुस चुकलेला असेल तर त्याला क्षमा मिळते. परत स्नेह जडतो. 
सिसापरता नाहीं दंड । ऐसें बोलती उदंड ।
याकारणें अखंड । देव भक्त वंदावें ॥ १६ ॥
१६) माणसाचें डोके उडविणे ही मोठी शिक्षा आहे. असे पुष्कळ लोक म्हणतात.म्हणुन देवांना व भक्तांना डोके झुकवून नमस्कार घालावे. 
नमस्कारें कृपा उचंबळे । नमस्कारें प्रसन्नता प्रबळे ।
नमस्कारें गुरुदेव वोळे । साधकांवरी ॥ १७ ॥ 
१७) नमस्काराने ज्याला नमस्कार केला त्याची कृपा लाभते. तो प्रसन्न होतो.सद्गुरु साधकाकडे लवकर येतात.
निशेष करितां नमस्कार । नासती दोषांचे गिरिवर ।
आणी मुख्य परमेश्र्वर । कृपा करी ॥ १८ ॥
१८) अगदीं मनापासून कोणताही विकल्प मनांत न ठेवता भगवंताला नमस्कार केला तर पापाचे डोंगर नष्ट होतात. आणि परमेश्र्वराची कृपा संपादन होते.
नमस्कारें पतित पावन । नमस्कारें संतांसी शरण ।
नमस्कारें जन्ममरण । दुरी दुर्‍हावे ॥ १९ ॥
१९) नमस्काराने भ्रष्ट माणसें पवित्र होतत. नमस्कार करुन संताना शरण जाता येते. नमस्काराने जन्म-मरणापासून मुक्ती मिळू शकते.
परम अन्याय करुनि आला । आणी साष्टांग नमस्कार घातला ।
तरी तो अन्याये क्ष्मा केला । पाहिजे श्रेष्ठीं ॥ २० ॥
२०) एखादा माणूस फार गुन्हेगार असला व त्याने साष्टांग नमस्कार घातला तर श्रेष्ठींनी अधिकारी व्यक्तींनी क्षमा केली पाहीजे.
या कारणें नमस्कारापरतें । आणीक नाहीं अनुसरतें ।
नमस्कारें प्राणीयातें ॥ सद्बुद्धि लागे ॥ २१ ॥
२१) या कारणानें आचरणांत आणण्यास नमस्कारासारखे दुसरे सोपे साधन नाही. नमस्कार केल्याने अंगात सद्बुद्धि निर्माण होते. 
नमस्कारास वेचावें नलगे । नमस्कारास कष्टावें नलगे ।
नमस्कारास कांहींच नलगे । उपकरण सामग्री ॥ २२ ॥
२२) नमस्कार करण्यासाठी कांही खर्च येत नाही. कांही कष्ट करावे लागतनाहीत. किंवा कांही इतर साधन सामुग्री लागत नाही.  
नमस्कारा ऐसें नाहीं सोपे । नमस्कार करावा अनन्यरुपें ।
नाना साधनीं साक्षपें । कासया सिणावें ॥ २३ ॥
२३) नमस्काराइतकें सोपे साधन नाहीपण नमस्कार अत्यंत मनापासून करावा. अधिक साधने वापरुन उगाच कष्ट का करावेत.
साधक भावें नमस्कार घाली । त्याची चिंता साधूस लागली ।
सुगम पंथे नेऊन घाली । जेथील तेथें ॥ २४ ॥
२४) जो साधक अत्यंत श्रद्धेने व भावाने नमस्कार साधुस करतो, त्याची काळजी साधु घेतो. तो साधु त्या माणसाला सोप्या मार्गाने भगवंताकडे पोहोचवितो.  
या कारणें नमस्कार श्रेष्ठ । नमस्कारें वोळती वरिष्ठ ।
येथें सांगितली पष्ट । साहावी भक्ती ॥ २५ ॥
२५) यामुळे नमस्कार करणे हे मोठे साधन आहे. नमस्कार केल्याने भगवंत व सद्गुरु नमस्कार करणार्‍याकडे खेचले जातात. अशारीतीने सहावी भक्ति स्पष्टपणे सांगितली.
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे वंदनभक्तिनाम समास सहावा ॥
Samas Sahava Vandan Bhakti 
समास सहावा वंदनभक्ति


Custom Search
Post a Comment