Saturday, May 13, 2017

Samas Pahila Shravan Bhakti समास पहिला श्रवणभक्ति


Dashak Choutha Samas Pahila Shravan Bhakti 
Samas Pahila Shravan Bhakti is in Marathi. In this Samas Samarth Ramdas is telling us about Bhakti. Shravan Bhakti is first from Navavidha Bhakti.
समास पहिला श्रवणभक्ति
श्रीराम ॥
जयजय जी गणनाथा । तूं विद्यावैभवें समर्था ।
अध्यात्मविद्येच्या परमार्था । मज बोलवावें ॥ १ ॥
१) श्रीजगाननाचा जयजयकार असो. सकळ विद्यानीं गजानन संपन्न आहे. अध्यात्मविद्येचा प्राण असलेला परमार्थ सांगण्याची शक्ती, स्फूर्ती त्याने मला द्यावी.   
नमूं शारदा वेदजननी । सकळ सिद्धि जयेचेनी ।
मानस प्रवर्तलें मननीं । स्फूर्तिंरुपें ॥ २ ॥
२) शारदा वेदांची माता आहे. तिच्या कृपेने सर्व सिद्धी मिळतात. तिच्यामुळे अंतःकरणांत स्फूर्ति येऊन माझे मन चिंतनांत मग्न झाले. तिला मी नमस्कार करतो. 
आतां आठऊं सद्गुरु । जो पराचाहि परु ।
जयाचेनि ज्ञानविचारु । कळों लागे ॥ ३ ॥
३) आतां मी सद्गुरुचे स्मरण करतो. तो परमात्म्याहूनही श्रेष्ठ आहे. ज्याच्यामुळे मला आत्मज्ञान प्राप्ती होईल.
श्रोतेन पुसिलें बरवें भगवद्भजन कैसें करावें ।
म्हणौनि बोलिलें स्वभावें । ग्रन्थांन्तरीं ॥ ४ ॥
४) श्रोत्यांनी चांगला प्रश्र्ण केला की भगवद्भजन कसे करावें ? त्याचे उत्तर म्हणून निरनिराळ्या ग्रंथांतील भक्तीचे विचार मी येथे सांगतो. 
सावध होऊन श्रोतेजन । ऐका नवविधा भजन ।
सत्शास्त्रीं बोलिलें पावन । होईजे येणें ॥ ५ ॥
५) भक्तीचे नऊ प्रकार जे शास्त्रांत सांगितले आहेत ते श्रोत्यांनी लक्षपूर्वक ऐकावेत. त्यांच्याच आचरणाने माणुस पवित्र होतो.
श्र्लोक
श्रवणं कीर्तनं विष्णोः स्मरणं पादसेवनम् ।
अर्चनं वंदनं दास्यं सख्यमात्मनिवेदनम् ॥
श्रवण, कीर्तन, नामस्मरण, पादसेवन, अर्चन, वंदन, दास्य, सख्य आणि आत्मनोवेदन असे भगवद्भक्तीचे नऊ प्रकार आहेत.
नवविधा भजन बोलिलें । तेंचि पुढें प्रांजळ केलें ।
श्रोतीं अवधान दिधलें । पाहिजे आतां ॥ ६ ॥
६) हे जे नऊ प्रकार शास्त्रांत सांगितले आहेत त्यांचेच सविस्तर वर्णन मी पुढे करीत आहे. ते श्रोत्यांनी आतां सावधपणे ऐकले पाहिजे.  
प्रथम भजन ऐसें जाण । हरिकथापुराणश्रवण ।
नाना अध्यात्मनिरुपण । ऐकत जावे ॥ ७ ॥
७) पहिले भगवंताचे भजन किंवा भक्ती म्हणजे श्रवण होय. म्हणजे भगवंताची कथा ऐकावी. पुराण ऐकावे. प्रवचने व अध्यात्म निरुपन ऐकावे. 
कर्ममार्ग उपासनामार्ग । ज्ञानमार्ग सिद्धांतमार्ग ।
योगमार्ग वैराग्यमार्ग । ऐकत जावे ॥ ८ ॥
८) कर्ममार्ग, उपासनामार्ग, ज्ञानमार्ग, सिद्धांतमार्ग, योगमार्ग, वैराग्यमार्ग ऐकत जावेत. 
नाना व्रतांचे महिमे । नाना तीर्थांचे महिमे ।
नाना दानांचे महिमे । ऐकत जावे ॥ ९ ॥
९) निरनिराळ्या व्रतांचे महिमे, वेगवेगळ्या तीर्थांचे महिमे, निरनिराळी दाने त्यांचे महिमे ऐकत जावे.  
नाना माहात्म्यें नाना स्थानें । नाना मंत्र नाना साधनें ।
नाना तपें पुरश्र्चरणें । ऐकत जावीं ॥ १० ॥
१०) वेगवेगळ्या आश्र्चर्यकारक गोष्टी, वेगवेगळी ठिकाणे, अनेक मंत्र, साधने, तपे, पुरःचरणे ऐकावीत.
दुग्धाहारी निराहारी । फळाहारी पर्णाहारी ।
तृणाहारी नानाहारी । कैसे ते ऐकवे ॥ ११ ॥
११) कोणी नुसत्या दुधावर राहणारे, कोणी काहींच न खाणारे, कोणी नुसत्या फलाहारावर राहणारे, कोणी नुसते गवत खाऊन राहणारे,कोणी जे मिळेल ते खाणारे कसे ते ऐकत जावे.
उष्णवास जळवास । सीतवास आरण्यवास ।
भूगर्भ  आणी आकाशवाास । कैसे ते ऐकावे ॥ १२ ॥
१२) कोणी उन्हांत राहणारे, कोणी पाण्यांत राहणारे, कोणी थंडींत राहणारे, कोणी अरण्यांत राहणारे, कोणी गुहेंत राहणारे,तर कोणी आकाशांत राहणारे कसे असतात ते ऐकावे.
जपी तपी तामस योगी । नाना निग्रह हटयोगी ।
शाक्तआगम आघोरयोगी । कैसे ते ऐकावे ॥ १३ ॥
१३) कोणी जप करणारे, कोणी तप करणारे, तापट अघोरी योगी, कोणी देहावर निश्र्चयाने आवर घालणार हटयोगी,कोणी शाक्त, अघोरमार्गाचे शक्तीचे उपासक कसे ते ऐकावे. 
नाना मुद्रा नाना आसनें । नाना देखणीं लक्षस्थानें ।
पिंडज्ञानें तत्वज्ञानें । कैसीं तें ऐकावीं ॥ १४ ॥
१४) कोणी नाना मुद्रा, नानाआसने करुन त्यांत प्राविण्य मिळवणारे, कोणी नाना लक्ष्यांवर चित्त स्थिर करणारे, कोणी शरीरशास्त्र व विश्र्वरचना जाणणारे कसे ते ऐकावे.   
नाना पिंडांची रचना । नानाभूगोळ रचना ।
नाना सृष्टीची रचना । कैसीं तें ऐकावीं ॥ १५ ॥ 
१५) अनेक प्राण्यांची शरीररचना, पृथ्वीवरील अनेक प्रदेशांची रचना, सृष्टींतील अनेक पशु, पक्षी, जलचर वगैरे प्राण्यांची रचना जाणणारे,कसे ते ऐकावे.
चंद्र सूर्य तारामंडळें । ग्रहमंडळें मेघमंडळें ।
येकवीस स्वर्गें सप्त पाताळें । कैसीं तें ऐकावीं ॥ १६ ॥ १६) चंद्र, सूर्य, तारामंडलें, ग्रहमंडलें, मेघमंडलें, एकवीस स्वर्ग, सप्त पाताळ कसे ते ऐकावे.
ब्रह्माविष्णुमहेशस्थानें । इन्द्रदेवऋषीस्थानें ।
वायोवरुणकुबेरस्थानें । कैसीं तें ऐकावीं ॥ १७ ॥
१७) ब्रह्मा, विष्णु, महेश, इन्द्र, देव, ऋषी, वायु, वरुण, कुबेर यांची स्थाने कशी, कोठे आहेत ते ऐकावे. 
नव खंडे चौदा भुवनें । अष्ट दिग्पाळांची स्थानें ।
नाना वनें उपवनें गहनें । कैसीं तें ऐकावीं ॥ १८ ॥ 
१८) नऊ खंडे, चौदा भुवने, आठ दिक्पालांची स्थानें,  निरनिराळी दाट अरण्यें, उपवनें कशी आहेत. ते ऐकावे.
गण गंधर्व विद्याधर । येक्ष किन्नर नारद तुंबर ।
अष्ट नायका संगीतविचार । कैसा तो ऐकावा ॥ १९ ॥
१९) शंकराचे गण, गंधर्व, विद्याधर, यक्ष, किन्नर, नारद, तुंबरु, अष्टनायक, संगीतशास्त्र याबद्दल माहीती ऐकावी.
रागज्ञान ताळज्ञान । नृत्यज्ञान वाद्यज्ञान ।
अमृतवेळ प्रसंगज्ञान । कैसें तें ऐकावें ॥ २० ॥
२०) संगीतामधिल राग, ताल, वाद्यें, व नृत्य यांचे ज्ञान, चांगले मुहूर्त व चांगली वेळ आणि निरनिराळे प्रसंग यांचे ज्ञान ऐकावे. 
चौदा विद्या चौसष्टी कळा । सामुद्रिक लक्षणें सकळ कळा ।
बत्तिस लक्षणें नाना कळा । कैशा त्या ऐकाव्या ॥ २१ ॥
२१) चौदा विद्या, चौसष्ट कला, हातावरील रेषांची लक्षणें, उत्तम माणसाच्या अंगी विलसणारी बत्तीस लक्षणें, सर्व कला यांची माहिती ऐकावी 
मंत्र मोहरे तोटके सिद्धी । नाना वल्ली नाना औषधी ।
धातु रसायण बुद्धी । नाडिज्ञानें ऐकावीं ॥ २२ ॥
२२) मंत्र, औषधी, तोडगे, सिद्धी, नाना वल्ली, नाना औषधी, धातु, रसायने तयार करण्याची क्रिया, नाडी परीक्षा या गोष्टी ऐकाव्या.
कोण्या दोषें कोण रोग । कोणा रोगास कोण प्रयोग ।
कोण्या प्रयोगास कोण योग । साधे तो ऐकावा ॥ २३ ॥
२३) कफ, वात, पित्त या दोषांपैकी कोणत्या दोषाने कोणता रोग होतो. तो रोग बरा होण्यास कोणता प्रयोग करावा. व तो करण्यास योग्य काल कोणता हे ऐकावे. 
रवरवादि कुंभपाक । नाना यातना येमलोक ।
सुखदुःखादि स्वर्गनर्क । कैसा तो ऐकावा ॥ २४ ॥
२४) नरकांतील रवरवादि, कुंभीपाक, तेथील नाना यातना यमलोक, स्वर्गांतील सुख, नरकांतील दुःख कसे ते ऐकावे.
कैशा नवविधा भक्ती । कैशा चतुर्विधा मुक्ती ।
कैसी पाविजे उत्तम गती । ऐसें हें ऐकावें ॥ २५ ॥
२५) भक्तीचे नऊ प्रकार, सलोकता, समीपता, सरुपता व सायुज्यता या चार मुक्ति, उत्तम गति मिळण्याचा मार्ग हें सर्व ऐकावे.  
पिंडब्रह्मांडाची रचना । नाना तत्वविवंचना ।
सारासारविचारणा । कैसी ते ऐकावी ॥ २६ ॥
२६) पिंडविचार, ब्रह्मांडविचार, अनेक तत्वांचे विवेचन, सारासार विचार कसा तें ऐकावे.  
सायोज्यता मुक्ती कैसी होते । कैसें पाविजे मोक्षातें ।
या कारणें नाना मतें । शोधित जावीं ॥ २७ ॥
२७) सायोज्यता मुक्ति कशी होते, मोक्ष कसा मिळतो याविषयीं विवेचन करणारी नाना मते शोधावीत. 
वेद शास्त्रें आणि पुराणें । माहावाक्याचीं विवरणें ।
तनुचतुष्टयनिर्शनें । कैसीं ते ऐकावीं ॥ २८ ॥
२८) वेद, शास्त्रे, पुराणें, महावाक्यांवरील भाष्यें, चार देहांच्या निरसनाचें वर्णन ऐकावे.
ऐसें हें अवघेंचि ऐकावें । परंतु सार शोधून घ्यावें ।
असार तें जाणोनि त्यागावें । या नांव श्रवणभक्ती ॥ २९ ॥
२९) अशा रीतीनें सर्व गोष्टी ऐकाव्या. त्यावरील तत्वांश शोधून त्याचे ग्रहण करावे. जें असार व निरुपयोगी असेल त्याचा त्याग करावा. याला श्रवणभक्ती असे म्हणतात. 
सगुणाचीं चरित्रें ऐकावीं । कां तें निर्गुण अध्यात्में शोधावीं ।
श्रवणभक्तीचीं जाणावीं । लक्षणें ऐसीं ॥ ३० ॥
३०) भगवंताची सगुण अवतारांची वर्णन म्हणजे त्याचे चरित्रे व  त्याच्या निर्गुण स्वरुपाचें वर्णन म्हणजे तत्वमीमांसा होय. ही श्रवणभक्ती लक्षणें होत.  
सगुण देवाचीं चरित्रें । निर्गुणाचीं तत्वें यंत्रें ।
हे दोनी परम पवित्रें । ऐकत जावीं ॥ ३१ ॥
३१) देवाची सगुण चरित्रे व निर्गुणाची तत्वे दोन्ही परम पवित्र आहेत. ती ऐकत जावीत. 
जयंत्या उपोषणें नाना साधनें । मंत्र यंत्र जप ध्यानें ।
कीर्ति स्तुती स्तवनें भजनें । नानाविधें ऐकावीं ॥ ३२ ॥
३२) सगुणाच्या बाबतींत जयंत्या, उपोषणे, अनेक साधने, यंत्र, मंत्र जप, ध्यान,कीर्तिवर्णन, स्तुतिगायन, स्तोत्रें, भजनें अशी आहेत. ती ऐकावीत. 
ऐसें श्रवण सगुणाचें । अध्यात्मनिरुपण निर्गुणाचें ।
विभक्ती सांडून भक्तीचें । मूळ शोधावें ॥ ३३ ॥
३३) तात्पर्य सगुणाच्या चरित्राचे श्रवण करावें. निर्गुणरुपाचे ज्ञान करुन घ्यावे. आपले वेगळेपण सोडून एक रुपता साधेल असे बघावे.  
श्रवणभक्तीचें निरुपण । निरोपिलें असे जाण ।
पुढें कीर्तन भजनाचें लक्षण । बोलिलें असे ॥ ३४ ॥
३४) श्रवणभक्तीचे निरुपण केले. पुढील समासी किर्तन व भजन यांचे लक्षण सांगितले आहे.
॥ इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे श्रवणभक्तिनिरुपणनाम समास पहिला ॥     
 Samas Pahila Shravan Bhakti 
समास पहिला श्रवणभक्ति

      

Custom Search
Post a Comment