Monday, May 29, 2017

Samas Satava Dasya Bhakti समास सातवा दास्यभक्ति


Dashak Choutha Samas Satava Dasya Bhakti 
Samas Satava Dasya Bhakti is in Marathi. In this Samas Samarth Ramdas is telling us about Bhakti. Dasya Bhakti is sixth from Navavidha Bhakti. Dasya means to be in service of God.
समास सातवा दास्यभक्ति
श्रीराम ॥
मागा जालें निरुपण । साहावे भक्तीचे लक्षण ।
आतां ऐका सावधान । सातवी भक्ती ॥ १ ॥
१) मागील समासांत सहाव्या भक्तीचें वर्णन झाले. आतां सातवी भक्ती लक्ष देऊन ऐकावी. 
सातवें भजन तें दास्य जाणावें । पडिले कार्य तितुकें करावें ।
सदा सन्निधचि असावें । देवद्वारीं ॥ २ ॥
२) देवाचें दास्य करणें म्हणजे सातवी भक्ति होय. देवाच्या दाराशी त्याची सेवा करण्यासाठी 
असणे, देवाचे जे काम असेल ते आपण करणे.   
देवाचें वैभव सांभाळावें । न्यूनपूर्ण पडोंचि नेदावें ।
चढतें वाढतें वाढवावें । भजन देवाचें ॥ ३ ॥
३) देवाच्या वैभवाचे रक्षण करणे, ते कमी होऊं न देणे,  ते वाढेल तसे वाढवणे व वाढवण्याचा प्रयत्न करणे. 
भंगलीं देवालयें करावीं । मोडली सरोवरें बांधावीं ।
सोफे धर्मशाळा चालवावीं । नूतन चि कार्यें ॥ ४ ॥  
४) भंगलेली देवालयें दुरुस्त करावी. मोडलेले तलाव, पाण्याचे साठे दुरुस्त करावे. 
सोपे, धर्मशाळा बांधाव्या. मोडल्या असतील तर त्यांचे नूतनीकरण करावे.    
नाना रचना जीर्ण जर्जर । त्यांचे करावें जीर्णोद्धार ।
पडिलें कार्य तें सत्वर । चालवित जावें ॥ ५ ॥
५) जुन्या मोडकळीसआलेल्या धर्मशाळा वगैरे बांधकामांचा जीर्णोद्धार करावा. देवाचे जे जे कार्य असेल ते ते लगोलग करीत जावे.
गज रथ तुरंग सिंहासनें । चौकिया सिबिका सुखासनें ।
मंचक डोल्हारे विमानें । नूतन चि करावीं ॥ ६ ॥
६) हत्ती, रथ, घोडे, सिंहासनें, चौरंग, पालख्या, सुखासने, पलंग, डोलारे, विमानें वगैरे
सर्व नविन करावें.  
मेघडंब्रें छत्रें चामरें । सूर्यापानें निशाणें अपारें ।
नित्य नूतन अत्यादरें । सांभाळित जावीं ॥ ७ ॥
७) मेघडंबर्‍या, छत्रें, चारें, अबदागिर्‍या, पुष्कळ निशाणें, या वस्तु साफ करुन निट जतन कराव्या.
नाना प्रकारीचीं यानें । बैसावयाचीं उत्तम स्थानें ।
बहुविध सुवर्णासनें । येत्ने करीत जावीं ॥ ८ ॥
८) देवाचीं नाना प्रकारची वाहनें,  बसावयासाठी उत्तमोत्तम जागा, निरनिराळी सोन्याची आसनें, वगैरे प्रयत्नपूर्वक करावीत. 
भुवनें कोठड्या पेट्या मांदुसा । रांझण कोहळीं घागरी बहुवसा ।
संपूर्ण द्रव्यांश ऐसा । अति येत्नें करावा ॥ ९ ॥
९) घरें, खोल्या, पेट्या, पेटारे, रांजण, पाण्यासाठी मोठी भांडी, पुष्कळ घागरी,  
अशा किमती वस्तु देवासाठी द्याव्या.
भुयेरीं तळघरें आणी विवरें । नाना स्थळें गुप्त द्वारें ।
अनर्घ्ये वस्तूंची भांडारें । येत्नें करीत जावीं ॥ १० ॥
१०) अनेक ठिकाणी भुयारे, तळघरे, बोगदे करावेत. त्यांना गुप्त दारे ठेवावीत.मौल्यवान वस्तु ठेवण्यासाठी कोठारे प्रयत्नपूर्वक करावीत.
आळंकार भूषणें दिव्यांबरें । नाना रत्नें मनोहरें ।
नाना धातु सुवर्णपात्रें । येत्नें करीत जावीं ॥ ११ ॥
११) देवासाठी, त्याच्या उत्सवासाठी दागिने, भूषणें, उंची वस्त्रे, सुंदर रत्नें, अनेक धातुंची व सोन्याची भांडी मोठ्या प्रयत्नाने मिळवावीत. 
पुष्पवाटिका नाना वनें । नाना तरुवरांचीं बनें ।
पावतीं करावीं जीवनें ।  तया वृक्षांसी ॥ १२ ॥
१२) फुलबागा, रानें, झाडांच्या राया, तयार कराव्या, त्यांना पाणीवगैरे देऊन त्यांची निगा राखावी.  
नाना पशूंचिया शाळा । नाना पक्षी चित्रशाळा ।
नाना वाद्यें नाट्यशाळा । गुणी गायक बहुसाल ॥ १३ ॥
१३) निरनिराळ्या जनावरांसाठी, तबेले, निरनिराळे पक्षी, अनेक चित्रांचा संग्रह, अनेक वाद्ये, नाटकशाळा व रंगभूमी, पुष्कळ चांगले गायक, 
स्वयंपाकगृहें भोजनशाळा । सामग्रीगृहें धर्मशाळा ।
निद्रिस्तांकारणें पडशाळा । विशाळ स्थळें ॥ १४ ॥
१४) स्वयंपाकघरे, जेवण्यासाठी पाकशाळा, स्वयंपाकाचे सामान ठेवण्यासाठी कोठ्या, झोपण्यासाठी कोठ्या, सर्व कोठ्या मोठ्या ठेवाव्यात.
नाना परिमळद्रव्यांचीं स्थळें । नाना खाद्यफळांचीं स्थळें  ।
नाना रसांची नाना स्थळें । येत्नें करीत जावीं ॥ १५ ॥
१५) अनेक प्रकारच्या सुवासिक वस्तु ठेवण्यासाठी जागा, निरनिराळ्या प्रकारचे खाण्याचे पदार्थ व फळे ठेवण्यासाठी जागा, पातळ पदार्थ ठेवण्यासाठी जागा, प्रयत्नपूर्वक बनवाव्यात. 
नाना वस्तांचीं नाना स्थानें । भंगलीं करावीं नूतनें ।
देवाचें वैभव वचनें । किती म्हणौनि बोलावें ॥ १६ ॥
१६) निरनिराळ्या वस्तु ठेवण्याच्या जागा जर जुन्या झाल्या असतील अगर मोडकळीस आल्या
असतील तर नविन कराव्या, देवाचे वैभव वर्णन करुन सांगावे तेवढे थोडेच.    
सर्वां ठाईं अति सादर । आणी दास्यत्वास हि तत्पर ।
कार्यभागाचा विसर । पडणार नाहीं ॥ १७ ॥
१७) देवाकडे येणार्‍या सर्व भक्तांविषयी आदर बाळगावा. त्यांची व भगवंताची सेवा करण्यास 
तत्पर असावे. आपल्या वाट्याचे काम लगेच करावे.
जयंत्या पर्वें मोहोत्साव । असंभ्याव्य चालवी वैभव ।
जें देखतां स्वर्गींचे देव । तटस्थ होती ॥ १८ ॥
१८) देवाच्या जयंत्या, पर्वे मोठ्या वैभवाने करावेत की जे पाहून स्वर्गांतील देवसुद्धा थक्क होतील.
ऐसे वैभव चालवावें । आणी नीच दास्यत्वहि करावें ।
पडिले प्रसंगी सावध असावें । सर्वकाळ ॥ १९ ॥
१९) देवाचे वैभव वाढवत ठेवावे. तसेच हलक्यांतील हलकी देवाची सेवा करण्यासही तत्पर नेहमी तयार असावे. 
जें जें कांहीं पाहिजे । तें तें तत्काळचि देजे ।
अत्यंत आवडीं कीजे । सकळ सेवा ॥ २० ॥
२०) देवासाठी जें  जें आवश्यक असेल तें तें त्वरित द्यावे. अत्यंत आवडीने देवाची सर्व सेवा करावी.
चरणक्षाळणें स्नानें आच्मनें । गंधाक्षतें वसनें भूषणें ।
आसनें जीवनें नाना सुमनें । धूप दीप नैवेद्य ॥ २१ ॥
२१) देवाचे पाय धुण्यासाठी, स्नानासाठी, आचमनासाठी पाणी ठेवावे. गंधक्षता, वस्त्रे, अलंकार, आसनें, निरनिराळी फुलें, धूप, दीप, नैवेद्य तयार ठेवावा.
शयेनाकारणें उत्तम स्थळें । जळें ठेवावीं सुसीतळें ।
तांबोल गायनें रसाळें । रागरंगें करावीं ॥ २२ ॥
२२) देवाला निद्रा घेण्यासाठी चांगल्या खोल्या, पिण्यासाठी गार पाणी, विडा, रागदारीने रसाळ
गायन गावे. 
परिमळद्रव्यें आणी फुलेलें । नाना सुगंधेल तेलें ।
खाद्य फळें बहुसालें । सन्निधचि असावीं ॥ २३ ॥
२३) सुगंधी पदार्थ, फुलांची तेले, निरनिराळी सुगंधी तेलें, पुष्कळ खाण्याचे पदार्थ, फळे,देवाच्या जवळच ठेवावीत व प्रसाद म्हणून लोकांना पण द्यावीत.   
सडे संमार्जनें करावीं । उदकपात्रें उदकें भरावीं ।
वसनें प्रक्षालून आणावीं । उत्तमोत्तमें ॥ २४ ॥
२४) झाडलोट करावी, सडा घालावा, रांगोळ्या काढाव्या, पाण्याच्या भंड्यांत स्वच्छ पाणी भरुन 
ठेवावे, देवाचे कपडे, वस्त्रे स्वच्छ धुवून ठेववीात.
सकळां करावें पारपत्य । आलयाचें करावें आतित्य ।
ऐसी हे जाणावी सत्य । सातवी भक्ती ॥ २५ ॥
२५) देवाच्या दर्शनास येणार्‍या सर्वांचे आदरातिथ्य करावे. अशी ही सातवी भक्ती आहे.
वचनें बोलावीं करुणेचीं । नाना प्रकारें स्तुतीचीं ।
अतंरे निवती सकळांची । ऐसें वदावें ॥ २६ ॥
२६) देवाच्या दासाचे बोलणे करुणेने भरलेले दयाद्र असावे, दुसर्‍याबद्दल व देवाबद्दल चांगले बोलावे की त्यामुळे सर्वांना समाधान वाटेल. 
ऐसी हे सातवी भक्ती । निरोपिली येथामती ।
प्रत्यक्ष न घडे तरी चित्तीं । मानसपूजा करावी ॥ २७ ॥
२७) अशी ही सातवी भक्ती माझ्या अल्पबुद्धिने वर्णन केली. प्रत्यक्षांत सर्व करता आली नाही तरी मानसपूजेंत करावी.
ऐसें दास्य करावें देवाचें । येणेंचि प्रकारें सद्गुरुचें ।
प्रत्यक्ष न घडे तरी मानसपूजेचें । करित जावें ॥ २८ ॥
२८) असे देवाचे व तसेच सद्गुरुचे दास्यत्व करावे. जरी प्रत्यक्ष करता आले नाही तरी मानसपूजेंत करावे.  इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे दास्यभक्रिनिरुपणनाम समास सातवा ॥
Samas Satava Dasya Bhakti
समास सातवा दास्यभक्ति


Custom Search
Post a Comment