Thursday, May 18, 2017

Samas Tisara Namsmaran Bhakti समास तिसरा नामस्मरणभक्ति


Dashak Choutha Samas Tisara Namsmaran Bhakti
Samas Tisara Namsmaran Bhakti is in Marathi. In this Samas Samarth Ramdas is telling us about Bhakti. Namsmaran Bhakti is third from Navavidha Bhakti. We know NamSamran. Many saints have described it and advised us NamSamran. What is NamSamran it is to recite a name of God we have faith, we believe in him. It is advised as on going process that is reciting is to be done at any time, anywhere and continuous. It gives us lot of strength, peace and happiness. I have a recent good experience of it.    
समास तिसरा नामस्मरणभक्ति

॥ श्रीराम ॥
मागां निरोपिलें कीर्तन । जें सकळांस करी पावन ।
आतां ऐका विष्णोःस्मरण । तिसरी भक्ती ॥ १ ॥
१)  मागीाल समासांत सर्वांना पवित्र करणारे व उत्तम गति देणाारे कीर्तन सांगितले. आता भगवंताची तिसरी भक्ति नामस्मरण ऐका.
स्मरण देवाचें करावें । अखंड नाम जपत जावें ।
नामस्मरणें पावावें । समाधान ॥ २ ॥
२) देवाचे स्मरण करावे. त्याचे नाव अखंड जपावे. नामस्मरण करुन समाधानी व्हावे. 
नित्य नेम प्रातःकाळीं । माध्यानकाळीं सायंकाळीं ।
नामस्मरण सर्वकाळीं । करीत जावें ॥ ३ ॥
३) नित्य नेमाने प्रातःकाळी, दुपारी व सायंकाळी नामस्मरण करावे.
सुख दुःख उद्वेग चिंता । अथवा आनंदरुप असतां ।
नामस्मरणेंविण सर्वथा । राहोंच नये ॥ ४ ॥
४) सुख असो, दुःखी प्रसंग असो, मन उद्विग्न झालेले असो वा चिंतेंत असो, नामस्मरण सर्वकाळ, सर्व प्रसंगी करीत जावे. 
हरुषकाळीं विषमकाळीं । पर्वकाळीं प्रस्तावकाळीं ।
विश्रांतिकाळीं निद्राकाळीं । नामस्मरण करावें ॥ ५ ॥
५) आनंदकाळी, कठीण काळी, पर्व काळ असो किंवा योग्य काळ असो, विश्रांती अथवा झोपेची वेळ असो नामस्मरण करीत जावे.
कोडें सांकडें संकट । नाना संसारखटपट ।
आवता लागतां चटपट । नामस्मरण करावें ॥ ६ ॥
६) एखादा कठीण प्रसंग असो, कांहीं अडचण आलेली असो, एखद्या संकटांत सापडलेले असो, संसारांतील अनेक खटपटी असोत किंवा मनाला कसली तरी चुटपुट लागलेली असो, आपण नामस्मरण करीत जावे.
चालतां बोलतां धंदा करितां । खातां जेवितां सुखी होतां ।
नाना उपभोग भोगितां । नाम विसरों नये ॥ ७ 
७) चालतांना, बोलतांना, धंदा करतांना, खातांना, जेवतांना, सुखी असतां किंवा नाना उपभोग भोगतांना
नाम घ्यावयास विसरु नये. 
संपत्ती अथवा विपत्ती । जैसी पडेल काळगती ।
नामस्मरणाची स्थिती । सांडूंच नये ॥ ८ ॥
८) कधी श्रीमंती असेल तर कधी विपत्तीचा काळ असेल नामस्मरण मात्र चालूच ठेवावे. विसरु नये.
वैभव सामर्थ्य आणी सत्ता । नाना पदार्थ चालतां ।
उत्कट भाग्यश्री भोगितां । नामस्मरण सांडूं नये ॥ ९ ॥
९) मोठे वैभव मिळाले, वा सामर्थ्याने सत्ता लाभली अनेक वस्तु वाट्यास आल्या आणि भाग्याने निरनिराळे
भोग प्राप्त झाले तरी नामस्मरण विसरु नये.
आधीं आवदसा मग दसा । अथवा दसेउपरी आवदसा ।
प्रसंग असो भलतैसा । परंतु नाम सोडूं नये ॥ १० ॥
१०) जीवनांत आधी वाईट परिस्थिती व नंतर सुस्थिती आली किंवा आधी सुस्थिती व नंतर वाईट स्थिती आली, प्रसंग चांगले वाईट कसेही आले तरी नाम विसरु नये.
नामे संकटे नासती । नामें विघ्नें निवारती ।
नामस्मरणें पाविजेती । उत्तम पदें ॥ ११ ॥
११) नाम घेत राहील्याने संकटे नाहीशी होतात. सर्व विघ्नांचे निवारण होते. नामस्मरणाने उत्तम गति किंवा पदे लाभतात.
भूत पिशाच्य नाना छंद । ब्रह्मगिर्‍हो ब्राह्मणसमंध ।
मंत्रचळ नाना खेद । नामानिष्ठें नासती ॥ १२ ॥
१२) नाम निष्ठेने, श्रद्धेने घेतले तर भूतपिशाच्चांची पीडा नष्ट होते. कपटांपासून रक्षण होते. ब्रह्मराक्षससाचा त्रास असेल तर नाहीसा होतो. मुंजाची बाधा होत नाही. मंत्र जपण्यांत चूक झाल्याने लागलेले वेड नाहीसे होते.  
नामें विषबाधा हरती । नामें चेडे चेटकें नासती ।
नामें होये उत्तम गती । अंतःकाळीं ॥ १३ ॥
१३) नामामुळे विषबाधा नाहीशी होते. नामामुळे चेटुक, जादुटोणा यांचा त्रास नाहीसा होतो. नामस्मरण करत राहील्याने अंतःकाळी उत्तम गति मिळते. 
बाळपणीं तारुण्यकाळीं । कठिण काळीं वृधाप्यकाळीं ।
सर्वकाळीं अंतःकाळीं । नामस्मरण असावें ॥ १४ ॥
१४) लहानपणी, तरुणपणी, कठीण प्रसंगी, वृधपणी, सर्वकाळी व अंतःकाळी नामस्मरण करीत असावे.
नामाचा महिमा जाणे शंकर । जना उपदेसी विश्र्वेश्र्वर ।
वाराणसी मुक्तिक्षेत्र । रामनामेंकरुनी ॥ १५ ॥
१५) नामाचे महत्व व मोठेपण स्वतः भगवान श्रीशंकर जाणतात. तो विश्र्वेश्र्वर लोकांना नामस्मरण करा असा
उपदेश करतो. काशींत देह ठेवणारास श्रीशंकर रामनाम सांगतात व त्याला रामनामाने मुक्ति मिळते.  
उफराट्या नामासाठीं । वाल्मिक तरला उठाउठी ।
भविष्य वदला शतकोटी । चरित्र रघुनाथाचें ॥ १६ ॥   
१६) रामनाम उलटे घेऊनही वाल्याचा वाल्मीकी ऋषी झाला व त्याने भविष्यांत होणारे श्रीरामाचे शतकोटी श्लोकांचे चरित्र श्रीरामाच्या जन्मा आधीच लिहून ठेवले.  
हरिनामें प्रल्हाद तरला । नाना आघातापासून सुटला ।
नारायेणनामें पावन जाला । अजामेळ ॥ १७ ॥
१७) हरिनाम घेऊन नाना संकटांतुन प्रल्हाद वाचला व त्याचा उद्धार झाला.नारायण नावाचा जप करुन अजामेळ पवित्र झाला. 
नामें पाषाण तरले । असंख्यात भक्त उद्धरले ।
महा पापी तेचि जाले । परम पवित्र ॥ १८ ॥
१८) नामा मुळे दगड तरंगले व प्रसिद्ध सेतु निर्माण झाला. अनेक भक्तांचा उद्धार झाला. अतिशय पापी लोकांनीसुद्धा नामाचा जप करुन स्वतःल पावन,पवित्र करुन घेतले.  
परमेश्र्वराचीं अनंत नामें । स्मरतां तरिजे नित्यनेमें ।
नामस्मरण करितां येमें । बाधिजेना ॥ १९ ॥
१९) परमेश्र्वराची पुष्कळ नामे आहेत. नित्य नियमाने त्यांचे स्मरण केले तर मनुष्य तरुन जातो.नामस्मरण करणाराला यम यातना होत नाहीत. परमेश्र्वराच्या अनंत नामांपैकी कोठचेही नाम घेतले
तरी भगवंत त्याचा उद्धार करतो.
सहस्रा नामामधें कोणी येक । म्हणतां होतसे सार्थक ।
नाम स्मरतां पुण्यश्र्लोक । होईजे स्वयें ॥ २० ॥
२०) भगवंताच्या असंख्य नामांपैकी कोणतेही एक नाम मनापासून जपत जावे. त्यामुळे मनुष्य जन्माचे
सार्थक होणारच.  नामाचे स्मरण करीत राहील्याने मनुष्य मोठा पुण्यात्मा होतो.   
कांहींच न करुनि प्राणी । रामनाम जपे वाणी ।
तेणें संतुष्ट चक्रपाणी । भक्तांलागीं सांभाळी ॥ २१ ॥
२१) माणसाने कांहींच केले नाही व वाणीने फक्त रामनाम जपले, तरी त्याने भगवंत संतुष्ट होतो. आणि
भक्ताचा सांभाळ करतो.
नाम स्मरे निरंतर । तें जाणावें पुण्यशरीर ।
माहां दोषांचे गिरिवर । रामनामें नासती ॥ २२ ॥
२२) जो रामनामाचा जप करतो त्याचे शरीर पुण्यवान माणसाचे म्हणुन जाणावे. मोठमोठ्या पापांचे डोंगर 
त्याने नष्ट होतात.
अगाध महिमा न वचे वदला । नामें बहुत जन उद्धरला ।
हळहळापासून सुटला । प्रत्यक्ष चंद्रमौळी ॥ २३ ॥
२३) नामाचा महिमा एवढा अपरंपार आहे, कीं तो सगळा सांगणे शक्य नाही. नामस्मरणाने पुष्कळ लोकांचा उद्धार झाला आहे. प्रत्यक्ष शंकर हळाहळ विषापासून वाचला. 
बहुं वर्णां नामाधिकार । नामीं नाहीं लाहानथोर ।
जड मूढ पैलपार । पावती नामें ॥ २४ ॥    
२४) कोठच्याही वर्णाचा माणुस नाम घेऊ शकतो. लहान मोठा कोणीही नाम घेऊ शकतो. अडाणी व मूर्ख माणसेसुद्धा नामस्मरणाने संसारांतुन उद्धरुन जातात.  
म्हणौन नाम अखंड स्मरावें । रुप मनीं आठवावें ।
तिसरी भक्ती स्वभावें । निरोपिली ॥ २५ ॥
२५) म्हणुन नाम नेहमी घ्यावे व ते घेतांना मनांत भगवंताचे रुप स्मरत असावे. अशारीतीने तिसरी भक्ती सांगितली.
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे नामस्मरणभक्तिनाम समास तिसरा ॥
Samas Tisara Namsmaran Bhakti
समास तिसरा नामस्मरणभक्ति


Custom Search
Post a Comment