Monday, May 8, 2017

Samas Navava Mrutyu Nirupan समास नववा मृत्यु निरुपण


Dashak Tisara Samas Navava Mrutyu Nirupan 
Samas Navava Mrutyu Nirupan is in Marathi. In this Samas Samarth Ramdas is telling us about Mrutyu, death. Nobody can avoid death. However everybody is acting as if there is no Mrutyu or death for him. He is under the influence of Maya. In this Samas Samarth Ramdas is telling us that all mighty, wealthy, Pandits, Kings, Sanyasi, healthy people all have gone. Nobody is immortal in this world. Only Aatmadnyani people who become one with the God have out of maya and Mrutyu.
समास नववा मृत्यु निरुपण 
॥ श्रीराम ॥
संसार म्हणिजे सवेंच स्वार । नाहीं मरणास उधार ।
मापीं लागलें शरीर । घडीनें घडी ॥ १ ॥
अर्थ
१) संसार म्हणजे धांवणारा स्वार आहे. मरण हे उधारीवर नाही. माणसाच्या देहाला सारखे माप लावले आहे. क्षणाक्षणानें त्याचे आयुष्य संपत आहे.
नित्या काळाची संगती । न कळे होणाराची गती ।
कर्मासारिखे प्राणी पडती । नाना देसीं विदेसीं ॥ २ ॥
२) नेहमी काळ हा माणसासोबत असतो. कधी काय होणार ते कळत नाही. जसे कर्म तसे मृत्यने माणसे स्वदेशी अथवा परदेशी मरत असतात. 
सरता संचिताचें शेष । नाहीं क्षणाचा अवकाश ।
भरतां न भरतां निमिष्य । जाणें लागे॥ ३ ॥
३) संचित संपले की क्षणाचाही विलंब नाही, वेळ आली की लगेच जावे लागते.
अवचिते काळाचे म्हणियारे । मारित सुटती येकसरें ।
नेऊन घालिती पुढारे । मृत्युपंथे ॥ ४ ॥
४) काळाचे दूत एकदम येतात, जीवाला सारखे मारीत सुटतात.आणि पुढे घालून मृत्युच्या मार्गाने घेऊन जातात. 
होतां मृत्याची आटाटी । कोणी घालूं न सकती पाठीं ।
सर्वत्रांस कुटाकुटी । मागें पुढें होतसे ॥ ५ ॥
५) एकदां वेळ आली व मृत्युचा वेढा पडला की, कोणीही त्या माणसास पाठीशी घालू शकत नाही. सर्वांना मृत्यु चूर्ण करुन टाकतो. कोणाची वेळ आधी येते तर कोणाची नंतर एवढाच फरक.
मृत्यकाळ काठी निकी । बैसे बळियाचे मस्तकीं ।
माहाराजे बळिये लोकीं । राहों न सकती ॥ ६ ॥
६) अंतकाळ ही एक काठी आहे. ती बलवान माणसाचे डोक्यांतसुद्धा बसते. मोठमोठे बलवान राजेसुद्धा यातून वाचू शकत नाहीत. 
मृत्य न म्हणे किं हा क्रूर । मृत्य न म्हणे हा जुंझार । 
मृत्य न म्हणे संग्रामशूर । समरंगणीं ॥ ७ ॥  
७) मृत्यु असा विचार करत नाही की, हा क्रूर आहे, हा झुंझार आहे का हा रणांगणावर शूर आहे.
मृत्य न म्हणे किं हा कोपी । मृत्य न म्हणे हा प्रतापी । 
मृत्य न म्हणे उग्ररुपी । माहांखळ ॥ ८ ॥
८) मृत्यु असा विचार करत नाही की, हा रागीट आहे, हा प्रतापी  आहे का हा उग्र व दुष्ट आहे.
मृत्य न म्हणे बलाढ्य । मृत्य न म्हणे धनाढ्य ।
मृत्य न म्हणे आढ्य । सर्वगुणे ॥ ९ ॥
९) मृत्यु म्हणत नाही की हा बलाढ्य, धनाढ्य किंवा सर्वगुणसंपन्न आहे.
मृत्य न म्हणे हा विख्यात । मृत्य न म्हणे हा श्रीमंत ।
मृत्य न म्हणे हा अद्भुत । परक्रमी ॥ १० ॥
१०) मृत्यु म्हणत नाही की हा विख्यात, श्रीमंत किंवा अद्भुत पराक्रमी आहे.
मृत्य न म्हणे हा भूपती । मृत्य न म्हणे हा चक्रवती ।
मृत्य न म्हणे हा करामती । कैवाड जाणे ॥ ११ ॥
११) मृत्यु म्हणत नाही की हा भूपती, चक्रपती किंवा करामती मंत्र जाणणारा आहे.
मृत्य न म्हणे हा हयपती । मृत्य न म्हणे गजपती ।
मृत्य न म्हणे नरपती । विख्यात राजा ॥ १२ ॥
१२) मृत्यु म्हणत नाही की हा थोडे बाळगणारा आहे, गजपती किंवा नरपती म्हणजे मोठा प्रसिद्ध राजा आहे.
मृत्य न म्हणे वरिष्ठ जनीं । मृत्य न म्हणे राजकारणी ।
मृत्य न म्हणे वेतनी । वेतनधर्ता ॥ १३ ॥ 
१३) मृत्यु म्हणत नाही की हा लोकांमध्ये श्रेष्ठ आहे, राजकारणी किंवा वतनदार आहे. का लोकांना वतनें देणारा आहे.
मृत्य न म्हणे देसाई । मृत्य न म्हणे वेवसाई ।
मृत्य न म्हणे ठांई ठांई । पुंडराजे ॥ १४ ॥
१४) हा देसाई, हा व्यापारधंदा करणारा, किंवा निरनिराळ्या गावांचे पुंडराज आहेत.  
मृत्य न म्हणे मुद्राधारी । मृत्य न म्हणे व्यापारी ।
मृत्य न म्हणे परनारी । राजकन्या ॥ १५ ॥
१५) हा सरकारी अधिकारी, व्यापारी, ही परदारा किंवा ही राजकन्या आहे.
मृत्य न म्हणे कार्याकारण । मृत्य न म्हणे वर्णावर्ण ।
मृत्य न म्हणे हा ब्राह्मण । कर्मनिष्ठ ॥ १६ ॥
१६) हे कार्य, हे कारण, हा उच्चवर्णिय, हा निचवर्णाचा हा कर्ननिष्ठ ब्राह्मण आहे. 
मृत्य न म्हणे वित्पन्न । मृत्य न म्हणे संपन्न ।
मृत्य न म्हणे विद्वजज्जन । समुदाई  ॥ १७ ॥
१७) हा विद्यासंपन्न, हा द्रव्यसंपन्न किंवा हा सभेंतील मोठा पंडित आहे. 
मृत्य न म्हणे हा धूर्त । मृत्य न म्हणे हा बहुश्रुत ।
मृत्य न म्हणे हा पंडित । माहाभला ॥ १८ ॥
१८) हा धूर्त, हा बहुश्रुत, किंवा हा मोठा सज्जन पंडित आहे. 
मृत्य न म्हणे पुराणिक । मृत्य न म्हणे हा वैदिक ।
मृत्य न म्हणे हा याज्ञिक । अथवा जोसी ॥ १९ ॥
१९) हा पुराणिक आहे, हा याज्ञिक, हा वैदिक किंवा हा ज्योतिषी आहे.
मृत्य न म्हणे अग्नहोत्री । मृत्य न म्हणे हा श्रोत्री ।
मृत्य न म्हणे मंत्रयंत्री । पूर्णागमी ॥ २० ॥
२०) हा अग्निहोत्री, हा वेदांचा ज्ञाता, हा मंत्रयंत्र जाणणारा किंवा ह्याने सारे वेद अभ्यासले आहेत. 
मृत्य न म्हणे शास्त्रज्ञ । मृत्य न म्हणे वेदज्ञ ।
मृत्य न म्हणे सर्वज्ञ । सर्व जाणे ॥ २१ ॥
२१) मृत्यु म्हणत नाही की, हा शास्त्रज्ञ आहे, हा वेदज्ञ आहे, हा सर्वज्ञ आहे. कि हा सर्व जाणणारा आहे.   
मृत्य न म्हणे ब्रह्मत्या । मृत्य न म्हणे गोहत्या ।
मृत्य न म्हणे नाना हत्या । स्त्रीबाळकादिक ॥ २२ ॥
२२) ही ब्रह्म हत्या, ही गो हत्या कि ही स्त्री-बालके इत्यादिं अनेकांची हत्या आहे.
मृत्य न म्हणे रागज्ञानी । मृत्य न म्हणे ताळज्ञानी । 
मृत्य न म्हणे तत्वज्ञानी । तत्ववेत्ता ॥ २३ ॥
२३) हा रागज्ञानी, तालज्ञानी, तत्वज्ञानी किंवा हा तत्ववेत्ता आहे.
मृत्य न म्हणे योगाभ्यासी । मृत्य न म्हणे संन्यासी ।
मृत्य न म्हणे काळासी । वंचूं जाणे ॥ २४ ॥
२४) हा योगाभ्यासी आहे, हा संन्यासी आहे. किंवा हा काळाला फसविणारा आहे.
मृत्य न म्हणे हा सावध । मृत्य न म्हणे हा सिद्ध ।
मृत्य न म्हणे वैद्य प्रसिद्ध । पंचाक्षरी ॥ २५ ॥
२५) हा सावध, हा सिद्ध, किंवा हा प्रसिद्ध वैद्य, पंचाक्षरी आहे.
मृत्य न म्हणे हा गोसावी । मृत्य न म्हणे हा तपस्वी ।
मृत्य न म्हणे हा मनस्वी । उदासीन ॥ २६ ॥
२६) हा गोसावी, हा तपस्वी, किंवा हा मोठा अनासक्त आहे.
मृत्य न म्हणे ऋषेश्र्वर । मृत्य न म्हणे कवेश्र्वर ।
मृत्य न म्हणे दिगंबर । समाधिस्थ ॥ २७ ॥
२७) हा ऋषीश्र्वर, हा कवीश्र्वर, हा दिगंबर किंवा हा समाधिस्थ आहे.  
मृत्य न म्हणे हटयोगी । मृत्य न म्हणे राजयोगी ।
मृत्य न म्हणे वीतरागी । निरंतर ॥ २८ ॥
२८) हा हटयोगी, हा राजयोगी, किंवा हा नेहमी  विरक्त राहतो.
मृत्य न म्हणे ब्रह्मच्यारी । मृत्य न म्हणे जटाधारी ।
मृत्य न म्हणे निराहारी । योगेश्र्वर ॥ २९ ॥
२९) हा ब्रह्मचारी आहे, हा जटाधारी आहे. हा निराहारी किंवा हा मोठा योगी आहे. 
मृत्य न म्हणे हा संत । मृत्य न म्हणे हा महंत ।
मृत्य न म्हणे हा गुप्त । होत असे ॥ ३० ॥
३०) हा संत, हा महंत, किंवा हा कधिही गुप्त होणारा आहे.
मृत्य न म्हणे स्वाधेन । मृत्य न म्हणे पराधेन ।
सकळ जीवांस प्राशन । मृत्यचि करी ॥ ३१ ॥
३१) हा स्वाधीन आहे. हा पराधीन आहे. अशा रीतीने सर्व जीवांना मृत्यु हा अटळ आहे. मृत्यु सर्वांना खाऊन टाकतो. 
येक मृत्युमार्गी लागले । येकी आर्ध पंथ क्रमिले ।
येक ते सेवटास गेले । वृद्धपणीं ॥ ३२ ॥
३२) कांही जीव जन्मास आल्याआल्या मृत्युमुखी पडतात. कांही अर्धेच जगतात. कांही वृद्धपणी मरतात.
मृत्य न म्हणे बाळ तारुण्य । मृत्य न म्हणे सुलक्षण ।
मृत्य न म्हणे विचक्षण । बहु बोलिका ॥ ३३ ॥
३३) मृत्यु हें बघत नाही  कीं हा बालक, हा तरुण, सुलक्षणी, शहाणा किंवा पुष्कळ बोलणारा आहे.
मृत्य न म्हणे हा आधारु । मृत्य न म्हणे उदार ।
मृत्य न म्हणे हा सुंदर । चतुरांग जाणे ॥ ३४ ॥
३४) मृत्यु म्हणत नाही कीं, हा पुष्कळांचा आधार आहे. का हा उदार आहे. हा सुंदर आहे का हा चौफेर ज्ञानसंपन्न आहे.  
मृत्य न म्हणे पुण्यपुरुष । मृत्य न म्हणे हरिदास । 
मृत्य न म्हणे विशेष । सुकृती नर ॥ ३५ ॥
३५) मृत्यु हा पुण्यवान आहे. हा हरिदास आहे. किंवा हा विशेष सत्कर्म करणारा आहे. 
आतां असो हें बोलणें । मृत्यापासून सुटिजे ।
मागें पुढें विश्र्वास जाणें । मृत्यपंथे ॥ ३६ ॥
३६) आतां हे बोलणे पुरे झाले. मृत्युच्या ताब्यांतून कोणीही सुटु शकत नाही. या संपूर्ण विश्र्वातींल प्रत्येक जीवाला मृत्युच्या मार्गाने जावे लागते.   
च्यारी खाणी च्यारी वाणी । चौर्‍यासी लक्ष जीवयोनी ।
जन्मा आले तितुके प्राणी । मृत्य पावती ॥ ३७ ॥
३७) जारज, स्वेदज, उद्भिज आणि अंडज असे प्राण्यांचे चार  प्रकार. परा, पश्यंती, मध्यमा आणि वैखरी या चार वाणी. चौर्‍यांशी लक्ष जीवांचे प्रकार हे सर्व मृत्युमुखी पडतात.   
मृत्याभेणें पळों जातां । तरी मृत्य सोडिना सर्वथा ।
मृत्यास न ये चुकवितां । कांही केल्या ॥ ३८ ॥
३८) मृत्युच्या भयाने, त्याला घाबरुन पळून गेले तरी मृत्यु कोणालाच सोडत नाही.  
मृत्य न म्हणे हा स्वदेसी । मृत्य न म्हणे हा विदेसी ।
मृत्य न म्हणे हा उपवासी । निरंतर ॥ ३९ ॥
३९) हा स्वदेशी आहे. हा विदेशी आहे. हा नेहमी उपवास करणारा आहे. असे मृत्यु म्हणत नाही.
मृत्य न म्हणे थोर थोर । मृत्य न म्हणे हरिहर ।
मृत्य न म्हणे अवतार । भगवंताचे ॥ ४० ॥
४०) मृत्यु म्हणत नाही कीं, हा थोर आहे. हा हरिहर आहे. का हा भगवंताचा अवतार आहे. 
श्रोतीं कोप न करावा । हा मृत्युलोक सकळां ठावा ।
उपजला प्राणी जाईल बरवा । मृत्युपंथें ॥ ४१ ॥
४१) श्रोत्यांनी रागावू नये. हा मृत्युलोक आहे हे सर्वांना माहित आहे. जन्मलेला प्राणी हा मृत्युच्या मार्गाने जाणार हे ठरलेलेच आहे. 
येथें न मनावा किंत । हा मृत्युलोक विख्यात । 
प्रगट जाणती समस्त । लाहान थोर ॥ ४२ ॥
४२) याबद्दल संशय असू नये. हा लोक मृत्युलोक या नावानेच विख्यात आहे, हे सर्व लहान व मोठे जाणतात.
तथापी किंत मानिजेल । तरी हा मृत्यलोक नव्हेल । 
याकारणें नासेल । उपजला प्राणी ॥ ४३ ॥
४३) परंतु कोणी संशय बाळगला तरी हा मृत्युलोक बदलणार नाही. त्या संशयामुळे जन्मलेला माणुस आपल्या जीवनाची नासाडी मात्र करुन घेईल.
ऐसें जाणोनियां जीवें । याचें सार्थकचि करावें ।
जनी मरोन उरवावें । कीर्तिरुपें ॥ ४४ ॥
४४) हा मृत्युलोक आहे ही जाणीव ठेवून माणसाने आपल्या जीवनाचे सार्थक करुन घ्यावे. मृत्युने देह पडला तरी जनांत कीर्तिरुपाने उरावे.
येरवी प्राणी लाहान थोर । मृत्य पावती हा निर्धार । 
बोलिलें हें अन्यथा उत्तर । मानूंचि नये ॥ ४५ ॥
४५) एरवी माणुस लहान असो वा मोठा असो त्याला मृत्यु आहेच. याच्याशिवाय वेगळे बोललेले खोटेच मानावे. 
गेले बहुत वैभवाचे । गेले बहुत आयुष्याचे ।
गेले अगाध महिमेचे । मृत्यपंथे ॥ ४६ ॥
४६) मोठ्या वैभवाचे, मोठ्या आयुष्याचे, प्रभावी पुरुष शेवटी मृत्युपंथानेच गेले.
गेले बहुत पराक्रमी । गेले बहुत कपटकर्मी ।
गेले बहुत संग्रामी । संग्रामसौरे ॥ ४७ ॥
४७) मोठ्या पराक्रमाचे, मोठीं कपटकर्मे करणारे पुरुष मृत्युनेच नेले. मोठे शूर योद्धे युद्धामध्येच मरण पावले.
गेले बहुतां बळांचे । गेले बहुतां काळांचे ।
गेले बहुतां कुळांचे । कुळवंत राजे ॥ ४८ ॥
४८) मोठ्या बळाचे, फार जगलेले, मोठ्या कुळांतील पुरुष, राजे मृत्युपंथानेच गेले.
गेले बहुतांचे पाळक । गेले बुद्धीचे चाळक ।
गेले युक्तीचे तार्किक । तर्कवादी ॥ ४९ ॥
४९) पुष्कळांचे पोषक, मोठे बुद्धिवंत, मोठ्या युक्तीने तर्क करणारे, तर्कवादी याच मृत्युपंथाने गेले.
गेले विद्येचे सागर । गेले बळाचे डोंगर ।
गेले धनाचे कुबेर । मृत्यपंथे ॥ ५० ॥ 
५०) विद्येचा सागर असलेले, मोठे बलवान डोंगरासारखे, कुबेरासारखी संपत्ती असणारे या मृत्युपंथानेच गेले.
गेले बहुत पुरुषार्थाचे । गेले बहुत विक्रमाचे ।
गेले बहुत आटोपाचे । कार्यकर्ते ॥ ५१ ॥
५१) मोठ्या पुरुषार्थाचे, मोठ्या पराक्रमाचे, मोठा व्याप सांभाळणारे सर्व याच मार्गे गेले.
गेले बहुत शस्त्रधारी । गेले बहुत परोपकारी ।
गेले बहुत नानापरी । धर्मरक्षक ॥ ५२ ॥
५२) मोठे शस्त्रधारी, मोठे परोपकारी, नाना प्रकारे धर्माचे रक्षण करणारे, सर्व याच मार्गे गेले.
गेले बहुत प्रतापाचे । गेले बहुत सत्कीर्तीचे ।
गेले बहुत नीतीचे । नीतिवंत राजे ॥ ५३ ॥
५३) मोठ्या प्रतापाचे, मोठ्या सत्कीर्तिचे, मोठ्या नीतीचे नीतिवंत राजे या मृत्युपंथानेच गेले.
गेले बहुत मतवादी । गेले बहुत कार्यवादी ।
गेले बहुत वेवादी । बहुतां परीचे ॥ ५४ ॥
५४) मोठे मतवादी, मोठे कार्यवादी, अनेक प्रकारचे वाद घालणारे सर्व गेले.
गेलीं पंडितांचीं थाटें । गेली शब्दांचीं कचाटें ।
गेलीं वादकें अचाटें । नाना मतें ॥ ५५ ॥
५५) पंडितांचे समुदाय गेले. शब्दांच्या खटपटी करणारे गेले. निरनिराळ्या मतांनुसार वाद घालणारे गेले. 
गेले तापषांचे भार । गेले संन्यासी अपार ।
गेले विचारकर्ते सार । मृत्यपंथे ॥ ५६ ॥
५६) तापसी लोकांचे समूह गेले. असंख्य संन्यासी गेले. सारासार विचार करणारे विचारवंत मृत्युपंथानेच गेले. 
गेले बहुत संसारी । गेले बहुत वेषधारी ।
गेले बहुत नानापरी । नाना छंद करुनी ॥ ५७ ॥
५७) पुष्कळ संसारी गेले. पुष्कळ वेषधारी गेले. नाना छंद असलेले लोक आपले छंद करुन मृत्युपंथाने गेले.
गेले ब्राह्मणसमुदाये । गेले बहुत आच्यार्य ।
गेले बहुत सांगो काये । किती म्हणौनि ॥ ५८ ॥
५८) ब्राह्मणांचे समुदाय गेले. पुष्कळ आचार्य गेले. असे बरेच गेले. किती म्हणून सांगावे. 
असो ऐसे सकळहि गेले । परंतु येकचि राहिले ।
जे स्वरुपाकार जाले । आत्मज्ञानी ॥ ५९ ॥
५९) असे सारे गेले परंतु संत मात्र टिकले. याप्रमाणे सगळे गेले परंतु आत्मज्ञानी होऊन जे स्वरुपाशी एकरुप झाले. ते मात्र टिकले.      
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे मृत्यनिरुपणनाम समास नववा ॥  
Samas Navava Mrutyu Nirupan 
समास नववा मृत्यु निरुपण 


Custom Search