Saturday, May 20, 2017

Samas Choutha Padsevan Bhakti समास चवथा पादसेवन भक्ती


Dashak Choutha Samas Choutha Padsevan Bhakti 
Samas Choutha Padsevan Bhakti is in Marathi. In this Samas Samarth Ramdas is telling us about Bhakti. Padsevan Bhakti is forth from Navavidha Bhakti.
समास चवथा पादसेवन भक्ती
॥ श्रीराम ॥
मागां जालें निरुपण । नामस्मरणाचें लक्षण ।
आतां ऐका पादसेवन ।  चौथी भक्ती ॥ १ ॥
१) या आधीच्या समासामध्ये नामस्मरणालक्षणांचे विवेचन सांगितले. आता पादसेचन भक्ती या
चौथ्या प्रकाराचे श्रवण करावे. 
पादसेवन तेंचि जाणावें । कायावाचामनोभावें ।
सद्गुरुचे पाय सेवावे । सद्गतिकारणें ॥ २ ॥
२) सद्गती मिळण्यासाठी म्हणजे भगवत्प्राप्तीसाठी कायेनें. वाचेनें, आणी मनानें सद्गुरुची चरणसेवा
करणे याला पादसेवनभक्ति म्हणतात.
या नांव पादसेवन । सद्गुरुपदीं अनन्यपण ।
निरसावया जन्ममरण । यातायाती ॥ ३ ॥
३) जन्मरणाची यातायात कायमची जावी म्हणून सद्गुरुचरणी अनन्य होणे याला पादसेवन भक्ती म्हणतात.
सद्गुरुकृपेविण कांहीं । भक्ततरणोपाव तों नाहीं । ।
याकारणें लवलाहीं । सद्गुरुपाय सेवावे ॥ ४ ॥
४) हा संसारसागर तरुन जाण्यास सद्गुरुकृपेशिवाय कांहीं उपाय नाही. यासाठी वेळ न दवडता सद्गुरुचे पाय सेवावे.
सद्वस्तु दाखवी सद्गुरु । सकळ सारासारविचारु ।
परब्रह्माचा निर्धारु । अंतरीं बाणे ॥ ५ ॥
५) सद्गुरु हाच सद्वस्तु म्हणजेच परमेश्र्वराचे दर्शन घडवून देतो. सद्गुरु चांगले-वाईट, काय घ्यावे काय सोडावे हे समजावून सांगतो. त्याच्याकडून श्रवण केल्याने परमेश्र्वराचे निश्र्चित ज्ञान मनांत ठसते.
जे वस्तु दृष्टीस दिसेना । आणी मनास तेहि भासेना ।
संगत्यागेंविण ये ना । अनुभवासी ॥ ६ ॥
६) परमात्मवस्तु डोळ्यांनी देसत नाही. कारण मनाला ती भासत नाही. संगत्यागावाचून तिचा अनुभव येत नाही.
अनुभव घेतां संगत्याग नसे । संगत्यागें अनुभव न दिसे ।
हें अनुभवियासीच भासे । येरां गयागोवी ॥ ७ ॥ 
७) " मी अनुभव घेतो " ही वृत्ती किंवा जाणीव जोपर्यंत असते तोपर्यंत ज्ञाता व ज्ञेय यांच्या वेगळेपणामुळे संगत्याग नसतो. दृश नाहीसे झाले म्हणजेच ' मी ' ही जाणीव नष्ट झाली की परमात्मवस्तुचा अनुभव येतो. हे बोलणे स्वानुभवी पुरुषाला बरोबर कळेल. इतरांना नाही. 
संगत्याग आणी निवेदन । विदेहस्थि ती अलिप्तपण ।
सहजस्थिती उ्मनी विज्ञान । हे सप्तहि येकरुप ॥ ८ ॥
८) संगत्याग, निवेदन म्हणजे मीपणा तो परमेश्र्वराला अर्पण करणे. विदेहस्थिती, अलिप्तपणा, सहजस्थिती, उन्मनी आणि विज्ञान या सातही अवस्था एकच आहेत.
याहिवेगळीं नामाभिधानें । समाधानाचीं संकेतवचनें । 
सकळ कांहीं पादसेवनें । उमजों लागें ॥ ९ ॥
९) ब्रह्मसाक्षात्काराला आणखी कांहीं नांवे आहेत. पण साक्षात्काराने मिळणारे समाधान वर्णन करणारे ते भिन्न भिन्न शब्द समजावेत. पण हे सगळे सद्गुरुची चरणसेवा केल्यावर आपोआप कळूं लागते. 
वेद वेदगर्भ वेदांत । सिद्ध सिद्धभावगर्भ सिद्धांत ।
अनुभव अनिर्वाच्य धादांत । सत्य वस्तु ॥ १० ॥
१०) वेदांचा अर्थ, वेदांचे रहस्य, वेदान्त तत्वज्ञान, शैव, सिद्धांचा मार्ग, सिद्धांच्या स्वानुभवाचे रहस्य, नाद बिंदु शुन्यता, 
अलक्षीं लक्ष, इत्यादि त्यांचे सिद्धांत, भगवंताच्या मार्गांतील विविध अनुभव, शब्दांच्या पलिकडे असणार्‍या गोष्टी, प्रत्यक्ष असले तरी भ्रम वाटणारे अनुभव, परमात्म वस्तु,  
बहुधा अनुभवाचीं आंगें । सकळ कळती संतसंगें ।
चौथे भक्तीचे प्रसंगें । गोप्य तें प्रगटे ॥ ११ ॥
११) अशी पारमार्थिक अनुभवाची अनेक अंगे आहेत. संतांची संगत लाभली तर ती सर्व कळतात. पादसेवन भक्तीच्यामुळे
अशा गुप्त व गूढ गोष्टी उघडपणे स्पष्ट होतात.   
प्रगट वसोनि नसे । गोप्य असोनि भासे ।
भासाअभासाहून अनारिसे । गुरुगम्य मार्ग ॥ १२ ॥
१२) परमात्म वस्तु प्रगट असून नसल्यासारखी आहे. ती गुप्त असून मनाला भासते. परंतु ती वस्तु भास व अभास याहून निराळी आहे. तिला गुरुकडूनच शिकता येते. म्हणजे तीचे ज्ञान गुरुकडूनच होते.   
मार्ग होये परी अंतरिक्ष । जेथें सर्वहि पूर्वपक्ष ।
पाहों जातां अलक्ष । लक्षवेना ॥ १३ ॥
१३) पूर्वपक्षामध्ये स्वस्वरुपाबद्दल शंका किंवा आक्षेप घेतला जातो. सिद्धांतामध्ये त्याचे निरसन करुन 
स्वरुपसिद्धि केलेली असते. म्हणुन समर्थ सांगतात की आंत पाहतांना जें जें ज्ञेयपणानें ज्ञात होईल तें तें 
अनात्म्याच्या राज्यांत जाते. आत्मवस्तु तशी पाहाता येत नाही. 
लक्षें जयासी लक्षावें । ध्यानें जयासी ध्यावें ।
तें गे तेंचि आपण व्हावें । त्रिविध प्रचिती ॥ १४ ॥
१४) जी वस्तु लक्ष देऊन आंतमध्ये पहावी, ध्यानांमध्ये पहावी ती वस्तुच आपण होऊन जावे आणि शास्त्रप्रचिती,गुरुप्रचिती यंचा आत्मप्रचितीशी मेळ घालावा.आत्मवस्तु पाहातांना वेगळेपणाने उरतां कामा नये. तद्रूप होऊनच ती पाहावी लागते.  
असो हीं अनुभवाचीं द्वारें । कळतीं सारासारविचारें ।
सत्संगेंकरुन सत्योत्तरें । प्रत्ययासि येती ॥ १५ ॥
१५) असो. स्वस्वरुपाचा अनुभव घेण्याचे हे असे मार्ग आहेत. सारासार विचर केला म्हणजे ते कळतात. वर ज्या गोष्टी सांगितल्या आहेत त्या खरोखर सत्पुरुषाच्या संगतीस राहिल्यास अनुभवास येतील.
सत्य पाहातां नाहीं असत्य । असत्य पाहातां नाहीं सत्य ।
सत्याअसत्याचें कृत्य । पाहाणारापासीं ॥ १६ ॥
१६) सत्य असलेली परमात्म्य वस्तु तिच्याशी तद्रुप होऊन पाहिली, अनुभविली कीं असत्य असलेले दृश्य विश्र्व खरेपणाने उरत नाही आणि दृश्यच जोपर्यंत खरे वाटते तोपर्यंत परमात्म्याचा अनुभव येत नाही. म्हणुन अनुभव घेणार्‍याच्या आंतरिक अवस्थेवर सत्य व असत्य याची प्रचिती अवलंबून असते.  
पाहाणार पाहाणें जया लागलें । तें तद्रूपत्वें प्राप्त जालें ।
तरी मग जाणावें बाणलें । समाधान ॥ १७ ॥
१७) पाहणारा कोणी परमात्मा पाहायला लागतो. परंतु तो त्याच्याशी तद्रूप झाला तरच परमात्मा पाहाता येतो. या तद्रूपेने अंगी समाधान बाणते.
नाना समाधानें पाहातां । बाणतीं सद्गुरु करितां ।
सद्गुरुविण सर्वथा । सन्मार्ग नसे ॥ १८ ॥
१८) निरनिराळी समाधानाने सद्गुरुची सेवा केल्याने आपल्या अंगी बाणतात. म्हणून सद्गुरु व त्याच्या सेवेशिवाय भगवंताकडे नेणारा दुसरा मार्ग नाही.
प्रयोग साधनें सायास । नाना साक्षेपें विद्याअभ्यास ।
अभ्यासें कांहीं गुरुगम्यास । पाविजेत नाहीं ॥ १९ ॥
१९) नाना प्रयोग करणे, नाना साधनांचा अभ्यास करणे, नाना सायास करणे, विद्या अभ्यास करणे यांनी परमात्म्याचे ज्ञान होत नाही.गुरुसेवेने जे मिळते ते या गोष्टींनी मिळत नाही.  
जें अभ्यासें अभ्यासितां न ये । जें साधनें असाध्य होये ।
तें हें सद्गुरुविण काये । उमजों जाणें ॥ २० ॥
२०) तो परमात्मा अभ्यास केल्याने अगर साधनांनी साध्य होत नाही. तो सद्गुरुसेवेनेच उमजु लागतो.
याकारणें ज्ञानमार्ग । कळाया धरावा सत्संग । 
सत्संगेविण प्रसंग । बोलोंचि नये ॥ २१ ॥  
२१) म्हणून परमात्म्याच्या ज्ञानासाठी सत्संग धरावा त्याशिवाय परमात्म्याच्या अनुभवाचा विषय बोलू नये.
सेवावे सद्गुरुचे चरण । या नांव पादसेवन ।
चौथे भक्तीचें लक्षण । ते हे निरोपिलें ॥ २२ ॥
२२) सद्गुरुच्या चरणांची सेवा करणे याचे नांव पादसेवन, असे हे चौथ्या भक्तीचें लक्षण सांगितले.  
देव ब्राह्मण माहानुभाव । सत्पात्र भजनाचें ठाव ।
ऐसिये ठांई सद्भाव । दृढ धरावा ॥ २३ ॥
२३) देव, ब्राह्मण, ब्रह्मज्ञानी संत, सात्विक सज्जन हे सेवा करण्यास योग्य आहेत. अशांबद्दल सद्भाव मनांत ठेवावा व त्यांच्या संगतींत राहावे.  
हें प्रवृत्तीचें बोलणें । बोलिलें रक्षाया कारणें ।
परंतु सद्गुरुपाय सेवणें । या नाव पादसेवन ॥ २४ ॥
२४) हें आहे व्यावहारिक बोलणे. परंतु खरे तर सद्गुरु चरणांची सेवा करणे हेच पादसेवन होय. 
पादसेवन चौथी भक्ती । पावन करितसे त्रिजगती ।
जयेकरितां सायोज्यमुक्ती । साधकास होये ॥ २५ ॥
२५) ही चौथी भक्ती त्रैलोक्याला पावन करणारी आहे. ती आचरणांत आणली असतां साधकास सायुज्यमुक्ती मिळते.
म्हणौनि थोराहूनि थोर । चौथे भक्तीचा निर्धार ।
जयेकरितां पैलपार । बहुत प्राणी पावती ॥ २६ ॥
२६) म्हणून ही चौथी भक्ती श्रेष्ठांत श्रेष्ठ भक्ति आहे. असा निश्र्चित निर्णय मी करितो. या भक्तीनें पुष्कळ लोक संसारसागराच्या पैलतीरास पोहोचतात.
इति श्रीदाबोधे गुरुशिष्यसंवादे पादसेवनभक्तिनिरुपणनाम समास चवथा ॥
Samas Choutha Padsevan Bhakti
समास चवथा पादसेवन भक्ती


Custom Search
Post a Comment