Dashak Choutha Samas Dusara Kirtan Bhakti
Samas Dusara Kirtan Bhakti is in Marathi. In this Samas Samarth Ramdas is telling us about Bhakti. Kirtan Bhakti is second from Navavidha Bhakti.
समास दुसरा कीर्तनभक्ति
श्रीराम ॥
श्रोतीं भगवद्भजन पुसिलें । तें नवविधा प्रकारें बोलिलें ।
त्यांत प्रथम श्रवण निरोपिलें । दुसरें कीर्तन ऐका ॥ १ ॥
१) श्रोत्यांनी भगवद्भजन म्हणजे काय असे विचारले. त्या भगवद्बजनाचे नऊ प्रकार आहेत. असे सांगितले
त्यापैकी श्रवण सांगितले. आतां कीर्तन ऐका.
सगुण हरिकथा करावी । भगवत्कीर्ति वाढवावी ।
अखंड वैखरी वदवावी । येथायोग्य ॥ २ ॥
२) भगवंताच्या सगुण चरित्राच्या कथा सांगून भगवंताची कीर्ति वृद्धीगंत करावी. त्यासाठी आपली वाणी योग्यरीतीने बोलती ठेवावी.
बहुत करावें पाठांतर । कंठीं धरावें ग्रन्थांतर ।
भगवत्कथा निरंतर । करीत जावी ॥ ३ ॥
३) पुष्कळ पाठांतर करावे. पुष्कळ ग्रंथांचे तात्पर्य लक्षांत ठेवावे. आणि नेहमी भगवंताची कथा सांगावी.
आपुलिया सुखस्वार्था । केलीच करावी हरिकथा ।
हरिकथेविण सर्वथा । राहोंचि नये ॥ ४ ॥
४) आपल्या सुखासाठी, आनंदासाठी परत परत हरिकथा करावी. ती केल्याशिवाय राहूं नये.
नित्य नवा हव्यास धरावा । साक्षेप अत्यंतचि करावा ।
हरिकीर्तनें भरावा । ब्रह्मगोळा अवघा ॥ ५ ॥
५) आपल्या कथेमध्ये दरवेळी नविनपणा आणण्याचा प्रयत्न करावा. तोच तोचपणा टाळावा.
हरिकीर्तनाने सर्व विश्र्व भरुन टाकावे.
मनापासून आवडी । जीवापासून अत्यंत गोडी ।
सदा सर्वदा तांतडी । हरिकीर्तनाची ॥ ६ ॥
६) कीर्तनाची मनापासून आवड असावी. जीवापासून भगवंताची गोडी असावी. नेहमी कीर्तनाची ओढ असावी.
भगवंतास कीर्तन प्रिये । कीर्तनें समाधान होये ।
बहुत जनासी उपाये । हरिकीर्तनें कलयुगीं ॥ ७ ॥
७) भगवंताला कीर्तन अत्यंत प्रिय आहे. कीर्तनाने भक्ताला व श्रोत्यांना कलीयुगामध्ये समाधान मिळते.
विविध विचित्रें ध्यानें । वर्णावीं आळंकार भूषणें ।
ध्यान मूर्ति अंतःकरणें । लक्षून कथा करावी ॥ ८ ॥
८) भगवंताची जीं निरनिराळी सगुण रुपें, त्यांचे ध्यान,रुप, अलंकार, भूषणें यांचे वर्णन कथा-कीर्तनांत आवर्जुन करावे.
येश कीर्ति प्रताप महिमा। आवडीं वर्णावा परमात्मा ।
जेणें भगवद्भक्तांचा आत्मा । संतुष्ट होये ॥ ९ ॥
९) भगवंताचे यश, त्याची कीर्ति, त्याचा प्रताप महिमा अत्यंत प्रेमाने वर्णन करावा. त्यामुळे भगवद्भक्तांना आत्मिकसुख मिळेल.
कथा अन्वय लापणिक । नामघोष करताळिका ।
प्रसंगे बोलाव्या अनेका । धात माता नेमस्त ॥ १० ॥
१०) कथानकें कथेमध्ये सुसंगत गुंफावीत. शब्दांवर कोट्या कराव्या. भगवंताच्या नावाचा जयजयकार करावा.
ताळ मृदांग हरिकीर्तन । संगीत नृत्य तान मान ।
नाना कथानुसंधान । तुटोंचि नेदावें ॥ ११ ॥
११) टाळ, मृदंग, गायन, नृत्य, ताना वगैरे, यांचा सर्वांचा उपयोग कीर्तन करताना करावा. परंतु हे करतांना कथेचा धागा तुटून देऊ नये.
करुणाकीर्तनाच्या लोटें । कथा करावी घडघडाटें ।
श्रोतयांची श्रवणपुटें । आनंदे भरावी ॥ १२ ॥
१२) कथेमध्ये करुणरसाचा उपयोग करुन श्रोत्यांचे कान आनंदाने भरुन धडकून कथा-कीर्तन करावे.
कंप रोमांच स्फुराणें । प्रेमाश्रुसहित गाणें ।
देवद्वारीं लोटांगणें । नमस्कार घालावे ॥ १३ ॥
१३) कथा सांगतांना सात्विक भावानें मन भरुन जावें, शरीर कंप पावणें, अंगावर शहारे, प्रेमाश्रु वाहाणे, इत्यांदी अनावर होऊन देवाला साष्टांग नमस्कार घालावा.
पदें दोहडे श्र्लोक प्रबंद । धाटी मुद्रा अनेक छंद ।
वीरभाटिंव विनोद । प्रसंगें करावे ॥ १४ ॥
१४) कथेमधील प्रसंगवर्णन करतांना पदें, दोहे, श्लोक, प्रबंध, धाटी, मुद्रा वगैरे कवितेचे अनेक प्रकार वापरावेत. त्याचप्रमाणे भाटांनी रचलेले वीररसाचे पोवाडे म्हणावे, हास्यरसाचा वापर करावा.
नाना नवरासिक श्रृंगारिक। गद्यपद्याचें कौतुक ।
नाना वचनें प्रस्ताविक। शास्त्राधारें बोलावीं ॥ १५ ॥
१५) कथेमध्ये शृंगारासह नवरस असावेत. उत्तम गद्य व पद्य असावे, प्रसंगाला योग्य असणारी व शास्त्राचा आधार असणारी वचनें सांगावीत.
भक्तिज्ञानवैराग्यलक्षण । नीतिन्यायस्वधर्मरक्षण ।
साधनमार्ग अध्यात्मनिरुपण । प्रांजळ बोलावें ॥ १६ ॥
१६) भक्ति, ज्ञान, व वैराग्य यांचे लक्षण काय, नीति, न्याय व स्वधर्म यांचे रक्षण कसे करावें, साधनामार्ग कसा असतो, आणि परमात्मस्वरुप कसे आहे. हे कीर्तनांत सांगावे.
प्रसंगे हरिकथा करावी । सगुणीं सगुणकीर्ति धरावी ।
निर्गुणप्रसंगे वाढवावी । अध्यात्मविद्या ॥ १७ ॥
१७) प्रसंग जसा तशी हरिकथा सगुणरुपाची करावी. निर्गुणी प्रसंगी शुद्ध परमार्थस्वरुप सांगावे.
पूर्वपक्ष त्यागून सिद्धांत । निरुपण करावें नेमस्त ।
बहुधा बोलणें अव्यावेस्त । बोलोंचि नये ॥ १८ ॥
१८) विषय मांडतांना पूर्वपक्ष सोडावा. सिद्धांत सांगावा. तो निश्र्चितपणे विवेचनकरुन सांगावा. बोलणे
अव्यवस्थित नसावे.
करावें वेदपारायेण । सांगावें जनासी पुराण ।
मायाब्रह्मीचें विवरण । साकल्य वदावें ॥ १९ ॥
१९) वेदांताचा अभ्यास करावा. लोकांना पुराण सांगावे. माया व ब्रह्म यांचें स्वरुप सर्व अंगांनी स्पष्ट सांगावे.
ब्राह्मण्य रक्षावें आदरें । उपासनेचीं भजनद्वारें ।
गुरुपरंपरा निर्धारें । चळोंच नेदावी ॥ २० ॥
२०) ब्राह्मण धर्माचे पालन व रक्षण करावे. भगवंताची उपासनेची साधने आदराने रक्षावी. आपण गुरुपरंपरा
निश्र्चयाने टिकवून ठेवावी.
करावें वैराग्यरक्षण । रक्षावें ज्ञानाचें लक्षण ।
परम दक्ष विचक्षण । सर्वहि सांभाळी ॥ २१ ॥
२१) वैराग्याचे रक्षण करावे. आत्मज्ञानाच्या लक्षणांचा अभ्यास करावा व त्यांचे रक्षण करावे. अधिक सावध
राहावे व विवेकाने सर्व सांभाळावे.
कीर्तन ऐकतां संदेह पडे । सत्य ाच्यातें उडे ।
नीतिन्यायसाधन मोडे । ऐसें न बोलावें ॥ २२ ॥
२२) कीर्तन ऐकतांना श्रोत्यांच्या मनांत संशय निर्माण होईल व सत्य न समजून त्यांचे समाधान होणार नाही.
नीतिन्यास मोडेल व साधन सुटेल असे काहीं बोलू नये.
सगुणकथा या नाव कीर्तन । अद्वैत म्हणिजे निरुपण ।
सगुण रक्षून निर्गुण । बोलत जावें ॥ २३ ॥
२३) भगवंताच्या सगुण चरित्रकथेला कीर्तन हें नांव आहे. अद्वैताचे विवेचन आणि प्रतिपादन करणें यास निरुपण
म्हणतात. हरिदासानें सगुणाचे महत्व सांभाळून निर्गुणाचे प्रतिपादन करावे.
असो वगत्रूत्वाचा अधिकार । अल्पास न घडे सत्योत्तर ।
वक्ता पाहिजे साचार । अनुभवाचा ॥ २४ ॥
२४) जो माणुस अनुभवाने, विद्येने, विचाराने आणि व्यासंगाने कमी आहे,त्याला वक्तृत्वाचा अधिकार नसतो.
वक्ता स्वानुभव संपन्न असला पाहिजे.
सकळ रक्षून ज्ञान सांगे । जेणें वेदज्ञान न भंगे ।
उत्तम सन्मार्ग लागे । प्राणीमात्रांसी ॥ २५ ॥
२५) जो अनुभवी वक्ता असतो, कोणाचाही बुद्धिभेद न करता ज्ञान सांगतो. वेदांची आज्ञा भंगणार नाही याची काळजी घेतो.आणि माणसांना उत्तम सन्मार्ग लागेल असे ज्ञान देतो.
असो हे सकळ सांडून । करावें गुणानुवादकीर्तन ।
या नाव भगवद्भजन । दूसरी भक्ती ॥ २६ ॥
२६) असो. हे सर्व राहूं द्यावें, ज्यामध्ये भगवंताच्या गुणांचे वर्णन करावे. त्याला भगवद्भजन म्हणतात. भक्तीचा हा दुसरा प्रकार आहे.
कीर्तनें माहा दोष जाती । कीर्तनें होये उत्तम गती ।
कीर्तनें भगवत्प्राप्ती । येदर्थीं संदेह नाही ॥ २७ ॥
२७) कीर्तनानें मोठ मोठी पापें नाहीशी होतात. उत्तम गति प्राप्त होते. भगवंताची प्राप्ती होते. यांत काहीं संशय नाही.
कीर्तनें वाचा पवित्र । कीर्तनें होये सत्पात्र ।
हरिकीर्तनें प्राणीमात्र । सुमिळ होती ॥ २८ ॥
२८) कीर्तनाने वाणी पवित्र होते. कीर्तनाने माणूस भगवंताला सत्पात्र होतो. तो शीलवान, चारित्र्यवान बनतो.
कीर्तनें अवेग्रता घडे । कीर्तनें निश्र्चये सांपडे ।
कीर्तनें संदेह बुडे । श्रोतयांवक्तयांचा ॥ २९ ॥
२९) कीर्तनाने एकाग्रता साधते. भगवंताबद्दल निष्ठा वाढते. कीर्तनाने श्रोते व वक्ता या दोघांचा संशय नाहीसा होतो.
सदा सर्वदा हरिकीर्तन । ब्रह्मसुत करी आपण ।
तेणें नारद तोचि नारायेण । बोलिजेत आहे ॥ ३० ॥
३०) ब्रह्मदेवांचा मुलगा नारद नेहमी भगवंताचे कीर्तन करतो. म्हणुन त्याला सर्व लोक नारायण म्हणतात.
म्हणोनि कीर्तनाचा अगाध महिमा ।
कीर्तनें संतोषे परमात्मा ।
सकळ तीर्थें आणी जगदात्मा । हरिकीर्तनीं वसें ॥ ३१ ॥
३१) म्हणुन कीर्तनाचा महिमा अगाध आहे. त्यामुळे परमात्म्याला आनंद होतो. कीर्तनामध्ये सर्व तीर्थे व जगदात्मा राहतात.
॥ इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे कीर्तनभक्तिनिरुपण नाम समास दुसरा ॥
Samas Dusara Kirtan Bhakt
समास दुसरा कीर्तनभक्ति
Custom Search
No comments:
Post a Comment