Tuesday, May 23, 2017

Samas Pachava Archan Bhakti समास पांचवा अर्चनभक्ति


Dashak Choutha Samas Pachava Archan Bhakti 
Samas Pachava Archan Bhakti is in Marathi. In this Samas Samarth Ramdas is telling us about Bhakti. Archan Bhakti is fifth from Navavidha Bhakti.
समास पांचवा अर्चनभक्ति
श्रीराम ॥ 
मागां जालें निरुपण । चौथे भक्तीचें लक्षण ।
आतां ऐका सावधान । पांचवी भक्ती ॥ १ ॥
१) मागील समासांत चवथ्या भक्तीचे लक्षण सांगितले. आतां सावधान होऊन पांचव्या भक्तीचे लक्षण ऐका. 
पांचवी भक्ति तें आर्चन । आर्चन म्हणिजे देवतार्चन ।
शास्त्रोक्त पूजांवेधान । केलें पाहिजे ॥ २ ॥
२) पांचवी भक्ती म्हणजे अर्चन म्हणजेच देवतांची शास्त्रोक्त पूजा करणे हे होय. आणी तशी पूजा केली पाहिजे.
नाना आसनें उपकर्णें । वस्त्रें आळंकार भूषणें ।  
मानसपूजा मूर्तिध्यानें । या नाव पांचवी भक्ती ॥ ३ ॥
३) नाना आसनें, पूजेची उपकरणे, वस्त्रे, अलंकार, भूषणें आदि वापरु देवांची पूजा करावी. तसेच देवाच्या मूर्तीचे ध्यान करुन मानसपूजा करावी. या पूजेला पांचवी भक्ती म्हणतात. 
देवब्राह्मणअग्निपूजन । साधुसंतअतीतपूजन ।
यतिमाहानुभावगाइत्रीपूजन । या नाव पांचवी भक्ती ॥ ४ ॥
४) देव, ब्राह्मण, अग्नि, साधुसंत, अतिथि संन्यासी, महात्मा, गाय यांची पूजा
करावी. त्याला पांचवी भक्ती म्हटले आहे.
धातुपाषाणमृत्तिकापूजन । चित्रलेपसत्पात्रपूजन ।
आपलें गृहीचें देवतार्चन । या नाव पांचवी भक्ती ॥ ५ ॥
५) सोनें, चांदी, तांबें  आदी धातुंच्या देवतांच्या मूर्ति, दगडी व मातीच्या मूर्ति, चित्रें, तसबिरी आणी उत्तम भांडी यांची पूजा करावी. तसेच घरांतील देवांची पूजा करावी.याला पांचवी भक्ती हे नांव आहे. 
सीळा सप्तांकित नवांकित । शालिग्राम शकलें चक्रांकित।
लिंगें सूर्यकांत सोमकांत । बाण तांदळे नर्बदे ॥ ६ ॥
६) सात व नऊ शुभचिन्हें असलेले दगड, शाळिग्राम, चक्राचे चिन्ह असलेले दगडाचे तुकडे,  
पिंडी, उन्हांत धरल्यावर ज्यांतून अग्नि बाहेर पडतो असे सूर्यकांत मणी, चांदण्यांत ज्यांतून पाझर बाहेर
पडतो असे चंद्रकांत मणी, बाण, शेंदूर लावलेले दगड, नर्मदेंतील गोटे,
भैरव भगवती मल्लारी । मुंज्या नृसिंह बनशंकरी ।
नाग नाणी नानापरी । पंचायेत्नपूजा ॥ ७ ॥
७) भैरव, भगवती, मल्लारी, मुंज्या, नृसिंह, बनशंकरी, नाग, अनेक प्रकारची नाणीं, पंचायतनें, 
गणेशशारदाविठ्ठलमूर्ती । रंगनाथजगंनाथतांडवमूर्ती ।
श्रीरंगगनुमंतगरुडमूर्ती । देवतार्चनीं पूजाव्या ॥ ८ ॥
८) गणेश, शारदा, विठ्ठल, रंगनाथ, जगन्नाथ, नटराज, श्रीरंग, हनुमंत, गरुड,
मत्छकूर्मवर्‍हावमूर्ती । नृसिंहवामनभार्गवमूर्ती ।
रामकृष्णहयग्रीवमूर्ती । देवतार्चनीं पूजाव्या ॥ ९ ॥
९) मत्स्य, कूर्म, वराह, नृसिंह, वामन, परशुराम, राम, कृष्ण, हयग्रीव, अशा सर्वांच्या मूर्तिची
पूजा करावी.
केशवनारायणमाधवमूर्ती । गोविंदविष्णुमदसुदनमूर्ती ।
त्रिविक्रमवामनश्रीधरमूर्ती । रुषीकेश पद्मनाभि ॥ १० ॥ 
१०) केशव, नारायण, माधव, गोविंद, विष्णु, मधुसूदन, त्रिविक्रम, वामन, श्रीधर, हृषिकेश, पद्मनाभ,    
दामोदरसंकर्षणवासुदेवमूर्ती । प्रद्युम्न अनुरधपुरुषोत्तममूर्ती ।
अधोक्षजनारसिंहअच्युतमूर्ती । जनार्दन आणि उपेंद्र ॥ ११ ॥
११) दामोदर, संकर्षण, वासुदेव, प्रद्युम्न, अनिरुद्ध, पुरुषोत्तम, अधोक्षज, नरसिंह, अच्युत, जनार्दन, उपेंद्र,  
हरिहरांच्या अनंत मूर्ती । भगवंत जगदात्माजगदीशमूर्ती ।
शिवशक्तीच्या बहुधा मूर्ती । देवतार्चनीं पूजाव्या ॥ १२ ॥
१२) याप्रमाणें हरिहरांच्या अनंत मूर्ति, भगवंत, जगदात्मा, जगदीश, यांच्या मूर्ति, आणि शिवशक्तीच्या अनेक मूर्ति घेऊन त्यांची पूजा करावी.
अश्र्वत्थनारायेण सूर्यनारायेण । लक्ष्मीनारायेण त्रिमल्लनारायेण ।
श्रीहरीनारायण आदिनारायण । शेषशाई परमात्मा ॥ १३ ॥
१३) त्याचप्रमाणें अश्वत्थनारायण, सूर्यनारायण, लक्ष्मीनारायण, त्रिमल्लनारायण, श्रीहरिनारायण, आदिनारायण, शेषशायी परमात्मा,
ऐश्या परमेश्र्वराच्या मूर्ती । पाहों जातां उदंड असती ।
त्यांचे आर्चन करावें भक्ती । पांचवी ऐसी ॥ १४ ॥
१४) अशा परमेश्र्वराच्या अगणित मूर्ति आहेत. त्यांचे पूजन करावे. ही पाचवी भक्ती होय.
याहि वेगळे कुळधर्म । सोडूं नये अनुक्रम ।
उत्तम अथवा मध्यम । करीत जावें ॥ १५ ॥
१५) याशिवाय आपल्या घराण्यांतील कुलधर्म असतील ते जसे चालत असतील तसेच करावेत. ते उत्तम वा 
मध्यम जसे असतील तसे करावे.
जाखमाता मायराणी । बाळा बगुळा मानविणी ।
पूजा मांगिणी जोगिणी । कुळधर्में करावीं ॥ १६ ॥
१६)  जाखमाता, मायराणी, बाळा, बगुळा, मानविणी, मांगिणी, जोगिणी, या क्षुद्र देवतांची व स्त्रियांची पूजा
जर कुळधर्मांत असेल तर ती सुद्धा करावी. 
नाना तीर्थां क्षेत्रांस जावें । तेथें त्या देवाचें पूजन करावें ।
नाना उपचारीं आर्चावें । परमेश्र्वरासी ॥ १७ ॥
१७) निरनिराळ्या तीर्थक्षेत्रांत जावें, तेथील देवांची पूजा करावी. अनेकप्रकारच्या साधन सामग्रीने परमेश्र्वराची पूजा करावी.
पंचामृतें गंधाक्षतें । पुष्पें परिमळद्रव्यें बहुतें ।
धूपदीप असंख्यातें । नीरांजनें कर्पुरार्ती ॥ १८ ॥
१८) पंचामृत, गंधाक्षता, फुलें, अत्तरादि, पुष्कळ सुगंधी द्रव्यें, धूपदीप, नाना प्रकारच्या आरत्या व निरांजने, 
नाना खाद्य नैवेद्य सुंदर । नाना फळें तांबोलप्रकार ।
दक्षणा नाना आळंकार । दिव्यांबरें वनमाळा ॥ १९ ॥    
१९) वेगवेगळ्या प्रकारचे खाण्याचे नैवेद्य, निरनिराळी फळे, तांदूळ, दक्षणा, अलंकार, भारी वस्त्रें, वनमाला,   
सिबिका छत्रें सुखसनें । माहि मेघडंब्रे सूर्यापानें ।
दिंड्या पताका निशाणें । टाळ घोळ मृदांग ॥ २० ॥
२०) पालख्या, छत्रें, आरामशीर आसने, छत्र्या, पालखीच्या छत्र्या, अबदागिर्‍या, दिंड्या, पताका, 
निशाणें, टाळ, मृदंग, घोळ,
नाना वाद्यें नाना उत्साव । नाना भक्तसमुदाव ।
गाती हरिदास सद्भाव । लागला भगवंतीं ॥ २१ ॥
२१) अनेक वाद्यें, अनेक प्रकारचे उत्सव, त्यांत जमा होणारे भक्तजन, आणि तेथें हरिदास 
भगवंताचे गुणगान करुं लागले म्हणजे भगवंताबद्दल श्रद्धा निर्माण होते.  
वापी कूप सतोवरें । नाना देवळायें सिखरें ।
राजांगणें मनोहरें । वृंदावनें भुयारीं ॥ २२ ॥
२२) पाण्याचे आड, विहिरी, तळीं, नाना प्रकारची देवळें व त्यांची शिखरें, मोठी आंगणें, सुंदर वृंदावने,
तळघरें, 
मठ मंड्या धर्मशाळा । देवद्वारीं पडशाळा ।
नाना उपकर्णें नक्षत्रमाळा । नाना वस्त्र सामग्री ॥ २३ ॥
२३) मठ, दुकानांच्या जागा, धर्मशाळा, देवाच्या दाराशी ओसर्‍या, इतर अनेक साधने, रंगीत कागदी 
फुलांच्या माला, अनेक प्रकारची वस्त्रें, 
नाना पडदे मंडप चांदोवे । नानारत्नघोष लोंबती बरवे ।
नाना देवळाईं समर्पावे । हस्थि घोडे शक्कटें ॥ २४ ॥
२४) वेगवेगळे पडदे, मंड्या, छतें, मोत्यांचे लोंबणारेघोस, हत्ती, घोडे, रथ व गाड्या निरनिराळ्या देवळांना अर्पण करावे.
आळंकार आणी आळंकारपात्रें । द्रव्य आणी द्रव्यपात्रें ।
अन्नोदक आणी अन्नोदकपात्रें । नाना प्रकारीची ॥ २५ ॥
२५) अलंकार व ते ठेवण्याच्या पेट्या, द्रव्य व ते ठेवण्याच्या पेट्या, अन्नोदक व ताटें, वाट्या, पातली, 
हंडे, व इतर भांडी,
वनें उपवनें पुष्पवाटिका । तापस्यांच्या पर्णकुटिका ।
ऐसी पूजा जगन्नायका । येथासांग समर्पावी ॥ २६ ॥
२६) जंगलें, बागा, फुलवाड्या, तापसी साधकांसाठी झोपड्या, अशा प्रकारचे उपचार अर्पण करुन 
जगन्नाथ ईश्र्वराची पूजा होते. आपण ते उपचार त्याला मनापासून अर्पण करावेत. 
शुकशारिका मयोरें । बदकें चक्रवाकें चकोरें ।
कोकिळा चितळें सामरें । देवाळईं समर्पावी ॥ २७ ॥
२७) पोपट, साळुंख्या, मोर, बदकें, चक्रवाक, चकोर, कोकिळा, हे पक्षी आणी चितळ, सांबर या
प्रकारची हरणें, देवालयांत अर्पण करावी.
सुगंधमृगें आणी मार्जरें । गाई म्हैसी वृषभ वानरें ।
नाना पदार्थ आणी लेंकुरें । देवाळईं समर्पावी ॥ २८ ॥
२८) त्याचप्रमाणें कस्तुरी मृग, मांजरें, गाई, म्हशी, बैल, वानरें, हीं जनावरें, अणखी नाना प्रकारचे 
पदार्थ व लहान मुलें देवालयांना अर्पण करावीं. 
काया वाचा आणी मनें । चित्तें वित्तें जीवें प्राणें ।
सद्भावें भगवंत आर्चनें । या नांव आर्चनभक्ती ॥ २९ ॥
२९) काया, वाचा, मन, चित्त, वित्त, जीव व प्राण हीं सगळीं भगवंताच्या पायीं अर्पण करुन अगदी मनापासून त्याची पूजा करणें यास अर्चनभक्ति म्हणतात.
ऐसेचि सद्गुरुचें भजन । करुन असावें अनन्य ।
या नाव भगवद्भजन । पांचवी भक्ती ॥ ३० ॥  
३०) अशाच रीतीनें श्रीसद्गुरुची पूजा करुन त्याच्याशी अनन्य शरणागत होणें, ही भगवंताची पूजा समजावी.
यालाच पांचवी भक्ती म्हणतात.  
ऐसी पूजा न घडे बरवी । तरी मानसपूजा करावी । 
मानसपूजा अगत्य व्हावी । परमेश्र्वरासी ॥ ३१ ॥
३१) बाहेरील उपचार वापरुन अशी पूजा घडूं शकत नाही. ती मनाने अंतर्यामी करावी. मानसपूजा करणे अगत्याचे आहे.
मनें भगवंतास पूजावें । कल्पून सर्व हि समर्पावें ।
मानसपूजेचें जाणावें । लक्षण ऐसें ॥ ३२ ॥
३२) मनाने अंतर्यामी भगवंताची पूजा करुन त्याला सर्व अर्पावे. हा मानसपूजा विधी आहे. 
जें जें आपणास पाहिजे । तें तें कल्पून वाहिजे ।
येणें प्रकारें कीजे । मानसपूजा ॥ ३३ ॥
३३) जे जे आपणास हवे ते ते कल्पना करुन देवास द्यावे. हे मानसपूजेंत करावे. 
इति श्रीदासबोधे गुरुचरित्रसंवादे आर्चनभक्तिनाम समास पांचवा ॥ 
Samas Pachava Archan Bhakti
समास पांचवा अर्चनभक्ति
Custom Search
Post a Comment