Anusuya and God Dattatreya
Guruchatria Adhyay 4
Guruchatria Adhyay 4 is in Marathi. This Adhyay describes the avatar or birth of God Dattatreya. God Dattatreya is incarnation of God Vishnu, God Shiva and God Brahma. Atri Rushi and his wife Anusuya are father and mother of God Dattatreya. Anusuya was pativrata (very pious Lady). God Indra was afraid of her, thinking that she may displace him capture kingdom of Gods. She was just like a God. Hence Indra approached God Vishnu,God Shiva and God Brahma informing them that he is afraid of pativrata Anusuya. She may challenge king of the God's kingdom. Hence three Gods Brahma, Vishnu and Shiva thought that they have to visit Arti Rushy's house and see how far Anusuya is pious and what her powers are. These three Gods came to Atri rushy's house as athiti midafternoon when Anusuya was alone and rushy was out for meditation. Athiti is treated like a god when he comes to the house in the afternoon. Hence Anusuya welcome them and serve them food but athiti asked her to serve them food without wearing clothes. Anusuya took name of the husband and proceed to serve them food as they desired. However when she came with the food and she found that the athities were became children. Being hungry three children were crying, she feed them and then these three gods became her children and their names were Durvas, Chandra and Dattatreya. In short this is story of a very pious lady Anusuya and God Dattatreya.
श्री गुरुचरित्र अध्याय ४ चौथा
श्रीदत्त-जन्म
श्रीगणेशाय नमः II श्रीसरस्वत्यै नमः II श्री गुरुभ्यो नमः II
ऐशी शिष्याची विनंती I ऐकोन सिद्ध काय बोलती I
साधु-साधु तुझी भक्ति I प्रीति पावो गुरुचरणीं II १ II
ऐक शिष्यचूडामणी I धन्य धन्य तुझी वाणी I
आठवतसे तुझिया प्रश्नीं I आदि-मध्य-अवसानक II २ II
प्रश्न केला बरवा निका I सांगेन तुज विवेका I
अत्रिऋषीच्या पूर्वका I सृष्टीउत्पत्तीपासोनि II ३ II
पूर्वी सृष्टि नव्हती कांही I जलमय होतें सर्वांठायीं I
'आपोनारायण ' म्हणोनि पाहीं I वेद बोलती याचिकारणें II ४ II
आपोनारायण आपण I सर्वां ठायीं वास पूर्ण I
बुद्धि संभवे प्रपंचगुण I अंड निर्मिलें हिरण्यवर्ण II ५ II
तेंचि ब्रह्मांड नाम जाहलें I रजोगुणें ब्रह्मयासि निर्मिलें I
'हिरण्यगर्भ' नाम पावलें I देवतावर्ष एक होतें II ६ II
तेंचि ब्रह्मांड देखा I फुटोनि शकलें झालीं द्वैका I
एक आकाश एक भूमिका I होऊनि ठेलीं शकलें दोनी II ७ II
ब्रह्मा तेथें उपजोन I रचिलीं चवदाही भुवनें I
दाही दिशा मनस वचन I काळकामक्रोधादि सकळ II ८ II
पुढें सृष्टि रचावयासी I सप्त पुत्र उपजवी मानसीं I
नामें सांगेन परियेसीं I सातै जण ब्रह्मपुत्र II ९ II
मरीचि अत्रि आंगिरस I पुलस्त्य पुलह क्रतु वसिष्ठ I
सप्त पुत्र जाहले श्रेष्ठ I सृष्टिकर्ता ब्रह्मा जाण II १० II
सप्त पुत्रांमधील 'अत्रि' I तेथूनि पीठ गुरुसंतति I
सांगेन ऐक एकचित्तीं I सौभाग्यवंता नामधारका II ११ II
अत्रिऋषीची भार्या I नाम तिचें 'अनसूया ' I
पतिव्रताशिरोमणिया I जगदंबा तेचि जाण II १२ II
तिचें सौंदर्यलक्षण I वर्णूं शके ऐसा कोण I
जिचा पुत्र चंद्र आपण I तिचें रूप केवीं सांगों II १३ II
पतिसेवा करी बहुत I समस्त सुरवर भयाभीत I
स्वर्गैश्वर्य घेईल त्वरित I म्हणोनि चिंतिती मानसीं II १४ II
इंद्रादि सुरवर मिळूनि I त्रिमूर्तीपाशीं जाऊनि I
विनविताति प्रकाशोनि I आचार अत्रिऋषीचा II १५ II
इंद्र म्हणतसे स्वामियां I पतिव्रता स्त्री अनसूया I
आचार तिचा अगम्य I काय सांगों विस्तारोनि II १६ II
पतिसेवा करी भक्तीसीं I मनोवाक्कायकर्मेसीं I
अतिथीपूजा महाहर्षी I विमुख नव्हे कवणे काळीं II १७ II
तिचा आचार देखोनि I सूर्य भीतसे गगनीं I
उष्ण तिसी लागे म्हणोनि I मंद मंद तपतसे II १८ II
अग्नि झाला अति भीत I शीतळ असे वर्तत I
वायु झाला भयचकित I मंद मंद वर्ततसे II १९ II
भूमि आपण भिऊनि देखा I नम्र जाहली तिचिया पादुका I
शाप देईल म्हणोनि ऐका I समस्त आम्ही भीतसों II २० II
नेणों घेईल कवण स्थान I कवण देवाचें हिरोन I
एखादिया वर देतांचि क्षण I तोही आमुतें मारुं शके II २१ II
त्यासि करावा उपावो I तूं जगदात्मा देवरावो I
जाईल आमुचा स्वर्गठावो I म्हणोनि तुम्हां सांगो आलों II २२ II
न कराल जरी उपाव यासी I सेवा करूं आम्ही तिसी I
तिच्या द्वारी अहर्निशीं I राहूं चित्त धरुनि II २३ II
ऐसें ऐकोनि त्रयमूर्ति I महाक्रोधें कापती I
चला जाऊं कैसी सती I पतिव्रता म्हणताति II २४ II
व्रतभंग करूनि तिसी I ठेवूनि येऊं भूमीसी I
अथवा वैवस्वतालयासी I पाठवूं म्हणोनि निघाले II २५ II
वास पाहावया सतीचें I त्रयमूर्ति वेष धरिती भिक्षुकाचे I
आश्रमा आले अत्रीचे I अभ्यागत होऊनि II २६ II
ऋषि करावया गेला अनुष्ठान I मागें आले त्रयमूर्ति आपण I
अनसूयेसी आश्र्वासून I अतिथि आपण आलों म्हणती II २७ II
क्षुधेंकरुनि बहुत पीडोन I आलों आम्ही ब्राम्हण I
त्वरित द्दावें सती अन्न I अथवा जाऊं आणिका ठायां II २८ II
सदा तुमच्या आश्रमांत I संतर्पण अभ्यागत I
ऐकिली आम्ही कीर्ति विख्यात I म्हणोनि आलों अनसूये II २९ II
इच्छाभोजनदान तुम्ही I देतां म्हणोनि ऐकों आम्ही I
ठाकोनि आलों याचि कामीं I इच्छाभोजन मागावया II ३० II
इतुकें ऐकोनि अनसूया I नमन केलें अतिविनया I
बैसकार करूनियां I क्षालन केलें चरण त्यांचे II ३१ II
अर्घ्य पाद्य देऊनि त्यांसी I गंधाक्षतापुष्पेसीं I
सवेंचि म्हणतसे हर्षी I आरोगण सारिजे II ३२ II
अतिथि म्हणती तये वेळी I करोनि आलों आपण आंघोळी I
ऋषि येतील बहुतां वेळीं I त्वरित आम्हांसी भोजन द्यावें II ३३ II
वास पाहोनि अतिथींतें I काय केलें पतिव्रतें I
ठाय घातले त्वरितें I केला तेथें बैसकार II ३४ II
बैसवोनियां पाटावरी I घृतेसीं पात्राभिधार करी I
घेवोनि आली अनसूया नारी I शाक पाक तये वेळीं II ३५ II
तिसी म्हणती अवो नारी I आम्ही अतिथि आलों दूरी I
देखोनि तुझें रूप सुंदरी I अभीष्ट मानसीं आणिक वसे II ३६ II
नग्न होऊनि आम्हांसी I अन्न वाढावें परियेसीं I
अथवा काय निरोप देसी I आम्ही जाऊं नाहीं तरी II ३७ II
ऐकोनि अतिथींचे वचन I अनसूया करी चिंतन I
आले विप्र पहावया मन I पुरुष कारणिक होतील II ३८ II
पतिव्रताशिरोमणी I विचार करी अंतःकरणीं I
अतिथि विमुख, तपोहानि I पतिनिरोप केवी उल्लंघूं II ३९ II
माझें मन असे निर्मळ I काय करील मन्मथ खळ I
पतीचें असे जरी तपफळ I तारील मज म्हणतसे II ४० II
ऐसें विचारूनि मानसीं I तथास्तु म्हणे तयासी I
भोजन करा स्वचित्तेंसी I वाढीन नग्न म्हणतसे II ४१ II
पाकस्थाना जाऊनि आपण I चिंतन करी पतीचे चरण I
वस्त्रें फेडूनि झाली नग्न I म्हणे अतिथि बाळें माझीं II ४२ II
नग्न होऊनि सती देखा I घेऊनि आली अन्नोदका I
तंव तेचि जाहलीं बाळकां I ठायांपुढें लोळतीं II ४३ II
बाळकें देखोनि अनसूया I भयचकित होऊनियां I
पुनरपि वस्त्रें नेसूनियां I आली तयां बाळकांपाशीं II ४४ II
रोदन करिताति तिन्ही बाळें I अनसूया राहवी वेळोवेळें I
क्षुधार्त झालीं केवळें I म्हणोनि कडे घेतलें II ४५ II
कडे घेवोनि बाळकांसी I स्तनपान देतसे हर्षी I
एका सोडोनी एकासी I निवारण करीं क्षुधेचें II ४६ II
पाहें पां नवल काय घडलें I त्रयमूर्तीचे बाळक झाले I
स्तनपानमात्रें क्षुधा गेली I तपफळ ऐसें पतिव्रतेचें II ४७ II
ज्याचे उदरी चवदा भुवने I सप्त समुद्र वडवान्न I
त्याची क्षुधा निवारण I पतिव्रतास्तनपानमात्रें II ४८ II
चतुर्मुख ब्रह्मयासी I सृष्टि रचणें अहर्निशी I
त्याची क्षुधा स्तनपानेसीं I केवीं झाली निवारण II ४९ II
भाळाक्ष कर्पूरगौर I पंचवक्त्र काळाग्निरुद्र I
स्तनपान करवी अनसूयासुंदर I तपस्वी हो अत्रि ऐसा II ५० II
अनसूया ऐशी अत्रीची रमणी I न होती मागें ऐकिली कवणीं I
त्रयमूर्तीची झाली जननी I ख्याति झाली त्रिवभूनी II ५१ II
कडे घेवोनि बाळकांसी I खेळवीतसे तिघांसी I
घालूनि बाळकां पाळणेसीं I पर्यंदे गाई तये वेळीं II ५२ II
पर्यंदे गाय नानापरी I उपनिषदार्थ अतिकुसरीं I
अतिउल्हासें सप्त स्वरीं I संबोखीतसे त्रिमूर्तीसी II ५३ II
इतुकें होतां तये वेळीं I माध्यान्हकाळीं अतिथिवेळीं I
अत्रिऋषि मन निर्मळीं I आले आपुले आश्रमा II ५४ II
घरांत आला अवलोकित I तंव देखिली अनसूया गात I
कैंची बाळें ऐसें म्हणत I पुसतसे तयेवेळीं II ५५ II
तिणें सांगितला वृत्तांत I ऋषि ज्ञानें असे पहात I
त्रिमूर्ति हेचि म्हणत I नमस्कार करीतसे II ५६ II
नमस्कारितां अत्रि देखा I संतोष विष्णु-पिनायका I
आनंद झाला चतुर्मुखा I प्रसन्न झाले तये वेळीं II ५७ II
बाळें राहिली पाळणेंसी I निजमूर्ति ठेले सन्मुखेंसी I
साधु-साधु अत्रिऋषि I अनसूया पतिव्रता II ५८ II
तुष्टलों तुझिये भक्तीसी I वर माग जे इच्छिसी I
अत्रि म्हणतसे सतीसी I जें वांछिसी तें माग आतां II ५९ II
अनसूया म्हणे अत्रीसी I प्राणेश्वरु तूंचि होसी I
देव पातले तुमचे भक्तीसी I पुत्र मागा तुम्ही आतां II ६० II
तिघे बाळक आमच्या घरीं I राहावे आमुच्या पुत्रांपरी I
हेंचि मागणें निर्धारीं I त्रिमूर्ति असावे एकरूप II ६१ II
ऐसें वचन ऐकोनि I वर दिधला मूर्ती तिन्हीं I
राहतीं बाळकें म्हणोनि I आपण गेले निजालयासी II ६२ II
त्रिमूर्ति राहिले तिचे घरी I अनसूया पोशी बाळकांपरी I
नामें ठेविलीं प्रीतिकरीं I त्रिवर्गाचीं परियेसा II ६३ II
ब्रह्मामूर्ति 'चंद्र' झाला I विष्णुमूर्ति 'दत्त' केवळा I
ईश्वरातें 'दुर्वास' नाम ठेविलें I तिघे पुत्र अनसूयेचे II ६४ II
दुर्वास आणि चंद्र देखा I उभे राहूनि माताभिमुखा I
निरोप मागती कवतुका I जाऊं तपा निजस्थाना II ६५ II
दुर्वास म्हणे अहो जननी I आम्ही ऋषि अनुष्ठानी I
जाऊं तीर्थे-आचरणीं I म्हणोनि निरोप घेतला II ६६ II
चंद्र म्हणे अवो माते I निरोप द्यावा आम्हां त्वरितें I
चंद्रमंडळीं वास आमुतें I नित्य दर्शन तुम्हांचरणीं II ६७ II
तिसरा दत्त विष्णुमूर्ति I असेल तुम्हांतें धरोनि चित्तीं I
त्रिमूर्ति निश्र्चित म्हणोनि सांगती I हें मनीं धरावें तुम्हीं II ६८ II
त्रयमूर्ति तोचि जाण दत्त I ' सर्वं विष्णुमयं जगत् ' I
राहील धरोनि तुमचें चित्त I श्रीविष्णुमूर्ति दत्तात्रेय II ६९ II
त्रयमूर्ति ऐक्य होऊन I दत्तात्रेय राहिला आपण I
दुर्वास चंद्र निरोप घेऊन I गेले स्थाना आपुलाले II ७० II
अनसूयेच्या घरीं देखा I त्रयमूर्ति राहिली मूर्ति एका I
नाम दत्तात्रेय ऐका I मूळपीठ श्रीगुरूचें II ७१ II
ऐसेपरी सिद्ध देखा I सांगे कथा नामधारका I
संतोषेंकरूनि प्रश्र्न ऐका I पुसतसे सिद्धासी II ७२ II
जय जया सिद्ध योगीश्वरा I भक्तजनाच्या मनोहरा I
तारक संसारसागरा I ज्ञानमूर्ति कृपासिंधु II ७३ II
तुझेनि प्रसादें मज I ज्ञान उपजलें, सतीकाज I
तारक आमुचा योगिराज I विनंति माझी परियेसा II ७४ II
दत्तात्रेयाचा अवतारू I सांगितला पूर्वापारू I
पुढें मागुती अवतार जाहले गुरु I कवणेपरी निरोपावे II ७५ II
विस्तारुनि बाळकासी I सांगावें स्वामी प्रीतीसीं I
श्रीगुरूमूर्ति अवतार जाहले कैसी I अनुक्रमें निरोपावें II ७६ II
म्हणे सरस्वती गंगाधरू I पुढील कथेचा विस्तारू I
ऐकतां होय मनोहरु I सकळाभीष्टे साधती II ७७ II
II इति श्रीगुरुचरित्रामृते परमकथाकल्पतरौ श्रीनृसिंहसरस्वत्युपाख्याने
सिद्धनामधारकसंवादे त्रैमूर्ति-अवतारकथनंनाम चतुर्थोSध्यायः II
II श्रीगुरुदत्तात्रेयार्पणमस्तु II श्रीगुरुदेवदत्त II
Guruchatria Adhyay 4
Custom Search
No comments:
Post a Comment