Sunday, September 1, 2013

GuruCharitra Adhyay 12 गुरुचरित्र अध्याय १२


GuruCharitra Adhyay 12 
Gurucharitra Adhyay 12 is in Marathi. It continues story of 11th Adhyay from birth of 2nd incarnation of Gurudevdatta which is NrusinhaSaraswati. Datta’s first incarnation is ShripadShriVallabh and second is NrusinhaSaraswati. We have seen in Adhyay 11 that ShripadShriVallabh had told Ambika to perform the ShaniPradosha Vrata if Ambika wants to become a mother of a son like Guru Shripad Yati then after performing the ShaniPradosha Vrata by the blessings of God Shiva her wish will be fulfilled. This was as per Adhyay 8. Ambika performed ShaniPradosha Vrata so that she could have a son like Guru ShripdShriVallabha in her next birth. In Adhyay 11 after Mounji-Bandhan son Narhari told his mother and father that he could not stay with them and lead a normal life they expected him to live. He was an incarnation of God Datta. His birth was for certain specific purpose and to live a life as Sanyasi. He blessed them and told them that they will have four more sons. These sons will take care of them in their old age. Now in this Adhyay 12 his mother told him that she does not believe that they would be having four sons. Hence she asked him to stay with them and prove whatever he had said. Then the son Narahari agreed with her and told her that he will live with them for one year and after the birth of one more son he will leave them and became a Sanyasi. In this adhyay the couple had a one more son to prove the blessings of Narahari (Guru) and then with the permission from his parents he went to Varanasi and there he had become a Sanyasi. His name was changed as NrusinhaSaraswati and his Guru was KrishnaSaraswati. In the Adhyay Guruparampara also is told. Who was Guru of KrishnaSaraswati? And who was his Guru’s Guru? and so before. Thus here completes Gurucharitra Adhyay 12.  

गुरुचरित्र अध्याय बारा (१२)
 श्रीगणेशाय नमः ॥ श्रीसरस्वत्यै नमः ॥ 
श्रीगुरु म्हणती जननीसी । आम्हां ऐसा निरोप देसी । 
अनित्य शरीर तूं जाणसी । काय भरंवसा जीवित्वाचा ॥ १ ॥ (
श्र्लोक) अनित्यानि शरीराणि विभवो नैव शाश्र्वतः । 
नित्यं सन्निहितो मृत्युः कर्तव्यो धर्मसंग्रहः ॥ २ ॥ 
एखादा असेल स्थिरजीवी । त्यासी तुझी बुद्धि बरवी । 
अनित्य देह-विभवोभावीं । पुढें कवणा भरंवसा ॥ ३ ॥ 
देह म्हणिजे क्षणभंगुर । नाही राहिले कवण स्थिर । 
जंववरी दृढ असेल शरीर । पुण्यमार्गें रहाटावे ॥ ४ ॥ 
जो असेल मृत्युसी जिंकीत । त्याणें निश्र्चयावें शरीर नित्य । 
त्यासि तुझा उपदेश सत्य । म्हणे करीन धर्म पुढें ॥ ५ ॥ 
अहोरात्रीं आयुष्य उणें । होत असतें क्षणक्षणें । 
करावा धर्म याचिकारणें । पूर्ववयेसीं परियेसा ॥ ६ ॥ 
अल्पोदकीं जैसा मत्स्य । तैसें मनुष्य अल्पायुष्य । 
जंववरी असे प्राणी सुरसें । धर्म करावा परियेसा ॥ ७ ॥ 
जैसा सूर्याचा रथ चाले । निमिष होतां शीघ्रकाळें । 
बावीस सहस्र गांवे पळे । तैसें आयुष्य क्षीण होय ॥ ८ ॥ 
पर्जन्य पडतां वृक्षावरी । उदक राहे पर्णाग्रीं । 
स्थिर नव्हे अवधारीं । पडे भूमीवरी सवेंचि ॥ ९ ॥ 
तैसें शरीर नव्हे स्थिर । जीवित्वा मरण निर्धार । 
यौवन अथवा होतांचि जर । कलेवर हे नश्य जाणा ॥ १० ॥ 
याचिकारणें देहासी । विश्र्वासूं नये परियेसीं । 
मृत्यु असे हा सहवासी । धर्म करावा तात्काळीं ॥ ११ ॥ 
पिकलें वृक्षीं जैसें । लागलें असे सूक्ष्मवेशें । 
तैसेंचि शरीर हें भरंवसें । केधवां पडेल न कळे जाणा ॥ १२ ॥ 
एखादा नर कळंतरासी । द्रव्य देतो परियेसी । 
दिवसगणना करी कैसी । तैसा यम काळ लक्षीतसे ॥ १३ ॥ 
जैशा समस्त नदी देखा । समुद्रासी घेऊनि जाती उदका । 
परतोनि न येती जन्मभूमिका । तैसें आयुष्य न परते ॥ १४ ॥ 
अहोरात्री जाती पळोन । ऐसें निश्र्चयें जाणोन । 
पुण्य न करिती जे जन । ते पशुसमान परियेसा ॥ १५ ॥ 
जया दिवशीं पुण्य घडलें नाहीं । वृथा गेला दिवस पाहीं । 
तया यमासी करुणा नाही । करावें पुण्य तात्काळ ॥ १६ ॥ 
पुत्र दारा धन गोधन । आयुष्य देह येणें-गुण । 
 जे जन निश्र्चित म्हणती जाण । ते पशूसम परियेसीं ॥ १७ ॥ 
जैसी सुसरी मनुष्यासी । भक्षिती होय परियेसीं । 
 तैसें या शरीरासी । वृद्धाप्य भक्षीं अवधारा ॥ १८ ॥ 
याकारणें तारुण्यपणी । करावें पुण्य विद्वज्जनीं । 
आम्हां कां हो वर्जिसी जननी । काय बुद्धि बरवी असे ॥ १९ ॥ 
जो यमाचा असेल इष्ट । त्याणें करावा आळस हट्ट । 
अमरत्वें असेल जो सुभट । त्याणें पुढें धर्म करवा ॥ २० ॥ 
संसार म्हणजे स्वप्नापरी । जैसें पुष्प असे मोगरी । 
सवेंचि होय शुष्कापरी । तयासम देह जाणा ॥ २१ ॥ 
जैसी विजू असे लवत । सवेंचि होय अव्यक्त । 
तैसें-प्राय देह होत । स्थिर नोहे परियेसा ॥ २२ ॥ 
ऐसें नानापरी देखा । बोधिता झाला जननीजनकां । 
विस्मय करिती सभालोक । बाळक केवीं तत्व सांगतो ॥ २३ ॥ 
ऐकोनि पुत्राचे वचन । माता करीतसे नमन । 
देवा निरोपिलें ज्ञान । विनंति माझी परिसावी ॥ २४ ॥ 
तुवां निरोपिलें आम्हांसी । पुत्र चवघे होतील ऐसी । 
विश्र्वास नव्हे गा मानसी । कुळदेवता पुत्रराया ॥ २५ ॥ 
जंववरी होय एक सुत । तंववरी रहावें समीपत । 
निरोप नेदीं तंववरी सत्य । म्हणोन विनवी तयेवेळीं ॥ २६ ॥ 
माझें वचन अव्हेरुनि । जरी जाशील निघोनि । 
प्राण देईन तत्क्षणीं । हा निश्र्चय अवधारीं ॥ २७ ॥ 
पुत्र नव्हसी तूं आम्हांसी । आमुचें कुळदैवत होसी । 
सत्य करीं गा वचनासी । बोल आपुले दातारा ॥ २८ ॥ 
ऐकोनि मातेचें वचन । श्रीगुरु बोलती हांसोन । 
 आमचे बोल सत्य जाण । तुझें वाक्य निर्धारीन ॥ २९ ॥ 
तूंतें होतांचि पुत्र दोनी । निरोप द्यावा संतोषोनि । 
मग न राहें ऐक जननी । बोल आपुले सत्य करीं ॥ ३० ॥ 
संवत्सर एक तुझ्या घरीं । राहूं माते निर्धारीम । 
वासना पुरतील तुझ्या जरी । मग निरोप दे मज ॥ ३१ ॥ 
ऐसी करुनियां निगुती । राहिले श्रीगुरु अतिप्रीती । 
वेदाभ्यास शिकविती । शिष्यवर्गा बहुतांसी ॥ ३२ ॥ 
नगरलोक विस्मय करिती । अभिनव झालें ऐसें म्हणती । 
बाळ पहा हो वर्षें साती । वेद चारी सांगतसे ॥ ३३ ॥ 
विद्वानांहूनि विद्वान् विद्यार्थी । तीनी वेद पढती । 
षट्शास्त्री जे म्हणविती । तेही येती शिकावया ॥ ३४ ॥ 
येणेंपरी तया घरीं । राहिले गुरु प्रीतिकरीं । 
माता झाली गरोदरी । महानंद करीतसे ॥ ३५ ॥ 
नित्य पूजिती पुत्रासी । ठेवूनि भाव कुळदैवत ऐसी । 
निधान लाधे एखाद्यासी । काय सांगो संतोष त्यांचा ॥ ३६ ॥ 
तंव नवमास जाहली अंतर्वत्नी । माता झाली प्रसूती । 
 पुत्र झाले युग्म ख्याती । अतिसुंदर परियेसा ॥ ३७ ॥ 
पुत्र झाले उल्हास थोर । मातापित्या संतोष फार । 
आशीर्वचन असे गुरु । असत्य केवीं होईल ॥ ३८ ॥ 
याकारणें गुरुवचन । सत्य मानावें विद्वजनें । 
जैसे असेल अंतःकरण । तैसे होईल परियेसा ॥ ३९ ॥ 
ऐशापरी वर्ष एक । त्रिमासी झाले ते बाळक । 
खेळवीतसे माता ऐक । आले श्रीगुरु तयांजवळी ॥ ४० ॥ 
जननी ऐक माझे वचना । झाली तुझी मनकामना । 
दोघे पुत्रनिधाना । पुर्णायुषी आहेति जाण ॥ ४१ ॥ 
आणखी होतील दोघे कुमारक । त्यानंतर कन्या एक । 
असाल नांदत अत्यंत सुख । वासना पुरतील तुझी जाणा ॥ ४२ ॥ 
आतां आमुतें निरोपावें । जाऊं आम्ही स्वभावें । 
संतोषरुपी तुम्ही व्हावे । म्हणोनि निरोप घेती तयेवेळी ॥ ४३ ॥ 
संतोषोनि मातापिता । चरणांवरी ठेविती माथा । 
स्वामी आमुच्या कुळदेवता । अशक्य आम्ही बोलावया ॥ ४४ ॥ 
न कळे आम्हां स्वरुपज्ञान । तुझें स्वरुप नकळे कवणा । 
मायामोहें वेष्टोन कामना । नेणोंचि महिमान तुझें ॥ ४५ ॥ 
मायाप्रपंचे वेष्टोनि । तूंतें जरी सुत म्हणोनि । 
एके समयीं निष्ठुर बोलों वचनीं । क्षमा करणें स्वामिया ॥ ४६ ॥ 
सहभोजन-शयनासनीं । तूंतें गांजो भुकेजोनि । 
कडे न घेंचि उबगोनि । क्षमा करी गा देवराया ॥ ४७ ॥ 
तारक आमुचे वंशासी । बापा तूं अवतरलासी । 
 प्रदोषपूजा फळासी । आली मातें स्वामिया ॥ ४८ ॥ 
आतां आम्हां काय गति । सांगा स्वामी कृपामूर्ती । 
जननमरण यातनयाती । कडे करावें दातारा ॥ ४९ ॥ 
सगरांवरी जैसी गंगा । तैसा तुवां आलासि चांगा । 
पावन केलेंसि माझे अंगा । उभयकुळें बेचाळीस ॥ ५० ॥ 
आम्हां ठेविसी कवणेपरी । या धुरंधर संसारी । 
तुझे दर्शन नोहे तरी । केवी वांचो प्राणात्मजा ॥ ५१ ॥ 
ऐकोनि मातापितयांचे वचन । बोलती श्रीगुरु आपण । 
जे जे समयी तुमचे मन । स्मरण करील आम्हांसी ॥ ५२ ॥ 
स्मरण करितां तुम्हांजवळी । असेन जननी मी तात्काळी । 
न करावी चिंता वेळोवेळी । म्हणोन भाक देतसे ॥ ५३ ॥ 
आणिक कन्या पुत्र तीनी । होतील ऐक तूं भवानी । 
दैन्य नाहीं तुमच्या भुवनी । सदा श्रीमंत नांदाल ॥ ५४ ॥ 
जन्मांतरीं परमेश्र्वरासी । पूजा केली तुवां प्रदोषीं । 
याची महिमा आहे ऐसी । जन्मोजन्मीं श्रियायुक्त ॥ ५५ ॥ 
इह सौख्य होय ऐक । देहांती जाणा परम लोक । 
पूजा करितां पिनाक । पुनर्जन्म तुम्हां नाही ॥ ५६ ॥ 
तुवां आराधिला शंकर । आम्हां करविला अवतार । 
वासना पुरेल तुझा भार । आम्हां निरोप दे आतां ॥ ५७ ॥ 
पुनर्दर्शन तुम्हांसी । होईल ऐका वर्षे-तीसी । 
जावोनि बदरीवनासी । म्हणोनि निघती यते वेळीं ॥ ५८ ॥ 
निरोप घेवोनि तये वेळां । श्रीगुरु निघाले अवलीळा । 
नगरलोक येती सकळा । मातापिता बोळविती ॥ ५९ ॥ 
म्हणती समस्त नगरनारी । तपासी निघाला ब्रह्मचारी । 
होईल पुरुष अवतारी । मनुष्यदेही दिसतसे ॥ ६० ॥ 
एक म्हणती पहा हो नवल । तपासी निघाला असे बाळ । 
मातापिता सुखें केवळ । निरोप देती कौतुकें ॥ ६१ ॥ 
कैसें यांचे अंतःकरण । जैसा हो कां पाषाण । 
मन करुनि निर्वाण । बोळविताति पुत्रासी ॥ ६२ ॥ 
एक म्हणती नव्हे बाळ । होईल त्रिमूर्तींचा अवतार केवळ । 
अनुमान नव्हे हा निश्र्चळ । वेद केवी म्हणतसे ॥ ६३ ॥ 
सात वर्षांचें बाळक देखा । वेद म्हणतो अखिल शाखा । 
मनुष्यमात्र नव्हे ऐका । ऐसें म्हणती साधुजन ॥ ६४ ॥ 
ऐसें म्हणोनि साधुजन । करिताति साष्टांगीं नमन । 
नानापरी स्तोत्रवचन । करिते झाले अवधारा ॥ ६५ ॥ 
नमन करोनि सकळिक । आले आपुले गृहांतिक । 
पुढें जाती जननीजनक । पुत्रासवें बोळवीत ॥ ६६ ॥ 
निजस्वरुप जननियेसी । दाविता झाला परियेसीं । 
श्रीपादश्रीवल्लभ-दत्तात्रेयासी । देखते झाले जनकजननी ॥ ६७ ॥ 
त्रयमूर्तीचा अवतार । झाला नरहरी नर । 
निजरुपें दिसे कर्पूरगौर । पाहतां नमिलें चरणासी ॥ ६८ ॥ 
जय जया जगद्गुरु । त्रयमूर्तीचा अवतारु । 
 आमुचे पुण्य होतें थोरु । म्हणोनि देखिले तुमचे चरण ॥ ६९ ॥ 
तूं तारक विश्र्वासी । आम्हां उद्धरिलें विशेषीं । 
 पुनर्दर्शन आम्हांसी । द्यावें म्हणोनि विनविती ॥ ७० ॥ 
ऐसें म्हणोनि मातापिता । चरणांवरी ठेविती माथा । 
आलिंगिती श्रीगुरुनाथा । स्नेहभावेंकरुनियां ॥ ७१ ॥ 
संतोषोनि श्रीगुरुमूर्ति । आश्र्वास केला अतिप्रीती । 
 पुनर्दर्शन हो निश्र्चितीं । देईन म्हणती तये वेळीं ॥ ७२ ॥ 
ऐसें तया संभाषोनि । निरोप घेतला तत्क्षणीं । 
परतोनि आली जनकजननी । येती संतोषोनि मंदिरांत ॥ ७३ ॥ 
वरदमूर्ति श्रीगुरुराणा । निघाला जावया बदरीवना । 
पातला आनंदकानना । वाराणसी क्षेत्रासी ॥ ७४ ॥ 
अविमुक्त वाराणसी पुरी । क्षेत्र थोर सचरासरीं । 
विश्र्वेश्र्वर अवधारीं । अनुपम्य असे त्रिभुवनी ॥ ७५ ॥ 
राहूनियां तयां स्थानीं । अनुष्ठिती गुरुशिरोमणी । 
विश्वेश्वराचे दर्शनीं । पूजा करिती आत्मारामासी ॥ ७६ ॥ 
येणेंपरी तया स्थानीं । क्वचित्काळ श्रीगुरुमुनि । 
अष्टांगयोगेंकरुनि । तप करिती परियेसा ॥ ७७ ॥ 
तया काशीनगरांत । तापसी असती आणिक बहुत । 
संन्यासी यती अवधूत । तप करिती दारुण ॥ ७८ ॥ 
तयांत श्रीगुरु ब्रह्मचारी । योगाभ्यासधुरंधरी । 
करिताति तपस्वी येरी । अभिनव करिती मनांत ॥ ७९ ॥ 
म्हणती पहा हूो ब्रह्मचारी । तप करितो नानापरी । 
कैसे वैराग्य याचे उदरी । निर्लिप्त असे परियेसा ॥ ८० ॥ 
शरीरस्वार्थ नाहीं यासी । योग्य होय हा संन्यासीं । 
स्नान करितो त्रिकाळेसी । मणिकर्णिका तीर्थांत ॥ ८१ ॥ 
ऐसें स्तोत्र नित्य करिती । समस्त संन्यासी येती । 
वृद्ध होता एक यति । ' कृष्णसरस्वती ' नामें ॥ ८२ ॥ 
 तो केवळ ब्रह्मज्ञानी । तपस्वी असे महामुनि । 
सदा देखोनियां नयनीं । स्नेहभावें भावीतसे ॥ ८३ ॥ 
म्हणे समस्त यतीश्वरांसी । न म्हणा नर ब्रह्मचारीसी । 
अवतारपुरुष अतितापसी । विश्र्ववंद्य दिसतसे ॥ ८४ ॥ 
वयसा धाकुटा म्हणोनि । नमन न कराल तुम्ही मुनी । 
प्रख्यात मूर्ति हा त्रिभुवनीं । आम्हां वंद्य असे देखा ॥ ८५ ॥ 
वार्धक्यपणें आम्ही यासी । वंदितां दुःख सकळांसी । 
विशेष आम्ही संन्यासी । मूर्ख लोक निंदिती ॥ ८६ ॥ 
याकारणें आम्ही यासी । विनवूं, परोपकारासी । 
संन्यास देता, समस्तांसी । भक्ति होईल स्थिर मनीं ॥ ८७ ॥ 
लोकानुग्रहानिमित्त । हा होय गुरु समर्थ । 
याचे दर्शनमात्रें पुनीत । आम्ही परियेसा ॥ ८८ ॥ 
याकारणें बाळकासी । विनवूं आम्ही विनयेसीं । 
आश्रम घ्यावा संन्यासी । पूजा करुं एकभावें ॥ ८९ ॥ 
म्हणोनि आले तया जवळी । विनविताति मुनि सकळी । 
ऐक तापसी स्तोममौळी । विनंति असे परियेसा ॥ ९० ॥ 
लोकानुग्रहाकारणे । तुम्ही आतां संन्यास घेणे । 
आम्हां समस्तां उद्धरणें । पूजा घेणे आम्हां करवीं ॥ ९१ ॥ 
या कलियुगीं संन्यास म्हणोन । निंदा करिती सकळै जन । 
स्थापना करणार कवण । न दिसती भूमीवरी ॥ ९२ ॥ 
श्र्लोक) यज्ञदानं गवालंभं संन्यासं पलपैतृक । 
देवराच्च सुतोत्पत्तिं कलौ पंच विवर्जयेत ॥ ९३ ॥ 
टीका) यज्ञ दान गवालंभन । संन्यास घेता अतिदूषण । 
पलपैतृक भ्रातांगना । करुं नये म्हणताति ॥ ९४ ॥ 
करितां कलियुगांत । निषिद्ध बोलती जन समस्त । 
संन्यासमार्ग सिद्धांत । वेदसंमत विख्यात ॥ ९५ ॥ 
पूर्वी ऐसे वर्तमानी । निषेध केला सकळही जनी । 
श्रीशंकराचार्य अवतरोनि । स्थापना केली परियेसा ॥ ९६ ॥ 
तयावरी इतुके दिवस । चालत आला मार्ग संन्यास । 
कलि प्रबळ होतां नाश । पुनरपि निंदा करिताति ॥ ९७ ॥ 
आश्रमाचा उद्धार । सकळ जनां उपकार । 
करावा कृपासागर । म्हणती सकळ मुनिजन ॥ ९८ ॥ 
ऐकोनि त्यांची विनंति । श्रीगुरुमुनि आश्रम घेती । 
वृद्ध कृष्णसरस्वती । तयापासूनि परियेसा ॥ ९९ ॥ 
ऐसें म्हणतां सिद्धमुनि । विनवीतसे नामकरणी । 
संदेह होतो माझे मनीं । कृपानिधि मुनिराया ॥ १०० ॥ 
म्हणती श्रीगुरु तोचि जगद्गुरु । त्यातें झाला आणिक गुरु । 
त्रयमूर्तीचा अवतारु । कवणेपरी दिसतसे ॥ १०१ ॥ 
सिद्ध म्हणे शिष्यासी । सांगेन याची स्थिति कैसी । 
पूर्वी श्रीरघुनाथासी । झाला वसिष्ठ केवीं गुरु ॥ १०२ ॥ 
आठवा अवतार श्रीकृष्णदेवासी । सांदीपनी जाहला गुरु कैसी । 
अवतार होतांचि मानुषीं । तयापरी रहाटावें ॥ १०३ ॥ 
याकारणें श्रीगुरुमूर्ती । गुरु केला तो कृष्णसरस्वती । 
 बहुकाळींचा होता यति । म्हणोनि त्यातें मानिलें ॥ १०४ ॥ 
शिष्य म्हणे सिद्धासी । स्वामी कथा निरोपिलीसी । 
वृद्ध कृष्णसरस्वतीसी । गुरु केलें म्हणोनियां ॥ १०५ ॥ 
समस्त यतीश्वराहून । तयासी दिधला बहुमान । 
कृष्णसरस्वती तो पूर्वी कोण । कोण गुरुचें मूळपीठ ॥ १०६ ॥ 
विस्तारुनि आम्हांसी । निरोपावें कृपेसीं । 
त्याणें माझे मानसी । संतोष होईल स्वामिया ॥ १०७ ॥ 
ऐसें शिष्य विनवितां । तंव सांगे विस्तारता । 
मूळपीठ आद्यंता । गुरुसंतति परियेसा ॥ १०८ ॥ 
आदिपीठ ' शंकर ' गुरु । तदनंतर ' विष्णु ' गुरु । 
त्यानंतर ' चतुर्वक्त्र ' गुरु । हें मूळपीठ अवधारीं ॥ १०९ ॥ 
तदनंतर ' वसिष्ठ ' गुरु । तेथोनि ' शक्ति, ' 'पराशरु ' । 
त्याचा शिष्य ' व्यास ' थोरु । जो कां अवतार विष्णुचा ॥ ११० ॥ 
तयापासूनि ' शुक ' गुरु जाण । ' गौडपादाचार्य ' सगुण । 
आचार्य ' गोविंद ' तयाहून । पुढें आचार्य तो ' शंकर ' जाहला ॥ १११ ॥ 
तदनंतर ' विश्वरुपाचार्य ' । पुढें ' ज्ञानबोधीगिरीय ' । 
त्याचा शिष्य ' सिंहगिरिय ' । ' ईश्र्वरतीर्थ ' पुढें झाले ॥ ११२ ॥ 
तदनंतर ' नृसिंहतीर्थ ' । पुढें शिष्य ' विद्यातीर्थ ' । 
 ' शिवतीर्थ ' , ' भारतीतीर्थ ' । गुरुसंतति अवधारीं ॥ ११३ ॥ 
मग तयापासोनि । ' विद्यारण्य ' श्रीपादमुनि । 
' विद्यातीर्थ ' म्हणोनि । पुढें झाला परियेसा ॥ ११४ ॥ 
त्याचा शिष्य ' मळियानंद ' । देवतीर्थसरस्वती ' वृंद । 
तेथोनि ' सरस्वतीयादवेंद्र ' । गुरुपीठ येणेंपरी ॥ ११५ ॥ 
यादवेंद्र मुनीचा शिष्य । तोचि ' कृष्णसरस्वती ' विशेष । 
बहुकाळींचा संन्यासी । म्हणोनि विशेष मानिती ॥ ११६ ॥ 
येणेंपरी श्रीगुरुनाथ । आश्रम घेती चतुर्थ । 
संन्यासमार्गस्थापनार्थ । श्रीनृसिंहसरस्वती ॥ ११७ ॥ 
समस्त वेदांचा अर्थ । सांगता झाला श्रीगुरुनाथ । 
 म्हणोनि वंदिती समस्त । तया काशी नगरांत ॥ ११८ ॥ 
ख्याति केली अतिगहनी । तया वाराणसीभुवनीं । 
यति समस्त येऊनि । सेवा करिती श्रीगुरुची ॥ ११९ ॥ 
मग निघाले तेथोनि । बहुत शिष्य-समवेत मुनि । 
उत्तरतीर्थ बदरीवनीं । अनंत तीर्थें पहावया ॥ १२० ॥ 
सव्य घालूनि मेरुसी । तीर्थे नवखंड क्षितीसी । 
 सांगता विस्तार बहुवसी । ऐक शिष्या नामकरणी ॥ १२१ ॥ 
समस्त तीर्थें अवलोकीत । सवें शिष्य-यतींसहित । 
भूमिप्रदक्षिणा करीत । आले गंगासागरासी ॥ १२२ ॥ 
सिद्ध म्हणे नामांकिता । समस्त चरित्र सांगतां । 
विस्तार होईल बहु कथा । म्हणोनि तावत्मात्र सांगतो परियेसीं ॥ १२३ ॥ 
समस्त महिमा सांगावयासी । शक्ति कैंचि आम्हांसी । 
अनंत महिमा त्रैमूर्तीसी । गुरुचरित्र परियेसी ॥ १२४ ॥ 
गंगासागरापासाव । तटाकयात्रा करीत देव । 
प्रयागस्थानीं गुरुराव । येते झाले परियेसा ॥ १२५ ॥ 
 तया स्थानीं असतां गुरु । आला एक द्विजवरु । 
' माधव ' नामें असे विप्रु । श्रीगुरुसी भेटला ॥ १२६ ॥ 
ब्रह्मज्ञान तयासी । उपदेश केला प्रीतीसीं । 
चतुर्थाश्रम तयासी । देते झाले परियेसा ॥ १२७ ॥ 
नाम ' माधवसरस्वती ' । तया शिष्यातें ठेविती । 
तयावरी अतिप्रीती । शिष्यांमध्यें परियेसा ॥ १२८ ॥ 
सिद्ध म्हणे नामकरणी । शिष्य झाले येणेगुणी । 
 अखिलयतीनामकरणी । सांगेन ऐका एकचित्तें ॥ १२९ ॥ 
गंगाधराचा नंदनु । सांगे गुरुचरित्र कामधेनु । 
 ऐकतां होय महाज्ञानु । लाधे चारी पुरुषार्थ ॥ १३० ॥ ॥ 
इति श्रीगुरुचरित्रामृते परमकथाकल्पतरौ श्रीनृसिंहसरस्वत्युपाख्याने सिद्ध-नामधारकसंवादे श्रीगुरुचातुर्थाश्रमग्रहणं-गुरुपरंपराकथनं नाम द्वादशोऽध्यायः ॥ श्रीगुरुदत्तात्रेयार्पणमस्तु ॥ श्रीगुरुदेवदत्त ॥

GuruCharitra Adhyay 12
गुरुचरित्र अध्याय १२


Custom Search

No comments: