Monday, October 26, 2020

Shri Dnyaneshwari Adhyay 4 Part 2 श्रीज्ञानेश्र्वरी अध्याय ४ भाग २


 

Shri Dnyaneshwari Adhyay 4 Part 2 
Ovya 26 to 50 
श्रीज्ञानेश्र्वरी अध्याय ४ भाग २ 
ओव्या २६ ते ५०

कैसा नेणों मोहो वाढीनला । तेणें बहुतेक काळु व्यर्थ गेला ।

म्हणोनि योगु हा लोपला । लोकीं इये ॥ २६ ॥

२६) हा मोह इतका कसा वाढला कोण जाणें ! त्यामुळें बहुतेक काळ व्यर्थ गेला आणि म्हणून या लोकांतला हा निष्काम कर्मयोग बुडाला.

तोचि हा आजि आतां । तुजप्रती कुंतीसुता ।

सांगितला आम्ही तत्त्वता । भ्रांति न करीं ॥ २७ ॥

२७) तोच हा योग अर्जुना, आम्हीं तुला आज खरोखर सांगितला, याविषयीं संशय ठेवूं नकोस.

हें जीवींचें निज गुज । परी केवीं राखों तुज ।

जे पढियेसी तूं मज । म्हणऊनियां ॥ २८ ॥

२८) हा योग ( म्हणजे ) माझ्या जिवाची अगदीं गुप्त गोष्ट आहे; पण तुझ्यापासून ती कशी चोरुन ठेवूं ? कारण तूं माझा अगदी लाडका पडलास.

तूं प्रेमाचा पुतळा । भक्तीचा जिव्हाळा ।

मैत्रियेची चित्कळा । धनुर्धरा ॥ २९ ॥

२९) अर्जुना, तूं प्रेमाचा पुतळा, भक्तीचा जिव्हाळा व सख्याची जीवनकला आहेस.

तूं अनुसंगाचा ठावो । आतां तुज काय वंचूं जावों ।

जरी संग्रामारुढ आहों । जाहलों आम्ही ॥ ३० ॥

३०) अर्जुना, तुझा व माझा संबंध अगदीं निकटचा आहे. या वेळीं तुझी फसवणूक कशी करावी ? जरी आम्ही युद्धाला सज्ज झालों आहों;

तरी नावेक हें सहावें । गाजाबज्यही न धरावें ।

परी तुझें अज्ञानत्व हरावें । लागे आधीं ॥ ३१ ॥

३१ तरी क्षणभर तें बाजूला ठेवून, या गडबडीचाहिं विचार मनांत न आणतां पहिल्यानें तुझें अज्ञान घालवून टाकलें पाहिजे. 

तंव अर्जुन म्हणे हरी । माय आपुलेयाचा स्नेहो करी ।

एथ विस्मयो काय अवधारीं । कृपानिधी ॥ ३२ ॥

३२) तेव्हां अर्जुन म्हणाला, कृपानिधि श्रीहरि, पाहा बरें, आई आपल्या ( मुलांवर ) ममता करते, त्यांत नवल तें काय ?

तूं संसारश्रांतांची साउली । अनाथा जीवांची माउली ।

आमुतें कीर प्रसवली । तुझी कृपा ॥ ३३ ॥

३३) संसारतापानें थकलेल्यांची तूं सावली आहेस; अनाथ जीवाची आई आहेस, आम्हांला तर केवळ तुझ्या कृपेनेंच जन्मास घातलें आहे.   

देवा पांगुळ एकादें विइजे । तरी जन्मौनि जोजारु साहिजे ।

हें बोलों काय तुझें । तुजचि पुढां ॥ ३४ ॥

३४) देवा, ( आईनें ) एखाद्या पांगळ्या मुलाला जन्म दिला, तर जन्मापासून त्याचा त्रास तिला काढावाच लागतो; या तुझ्या ( गोष्टीं ) तुझ्यासमोर काय बोलाव्या.

आतां पुसेन जें मी कांहीं । तेथ निकें चित्त देईं ।

तेवींचि देवें कोपावें ना कांहीं । बोला एका ॥ ३५ ॥  

३५) आतां मी जें काहीं विचारीन, त्याकडे चांगलें चित्त दे. त्याचप्रमाणें देवा, माझ्या या बोलाचा ( प्रश्र्णाचा ) मुळीं राग धरुं नकोस.

तरी मागील जे वार्ता । तुवां सांगितली होती अनंता ।

ते नावेक मज चित्ता । मानेचिना ॥ ३६ ॥

३६) अनंता, पूर्वींची गोष्ट म्हणून जी तूं मला सांगितलीस, ती क्षणभर माझ्या मनाला पटतच नाहीं.  

जे तो विवस्वतु म्हणजे कायी । ऐसें हें वडिलां ठाउकें नाहीं ।

तरी तुवांचि केवीं पाहीं । उपदेशिला ॥ ३७ ॥

३७) पाहा, तो विवस्वत म्हणजे कोण हें वाडवडिलांनासुद्धां ठाऊक नाहीं; तर तूं त्याला उपदेश केलास, हे कसें शक्य आहे ?  

तो तरी आइकिजे बहुतां काळांचा । आणि तूं तंव कृष्ण सांपेचा ।

म्हणोनि गा इये मातुचा । विसंवादु ॥ ३८ ॥

३८) तो तर फार पूर्वींच्या काळाचा, म्हणजे देवा, हें तुझें बोलणें विसंगत आहे.

तेवींचि देवा चरित्र तुझें । आपण कांहीं काय जाणिजे ।

हें लटिकें केवीं म्हणिजे । एकिहेळां ॥ ३९ ॥

३९) तसेंच; देवा, तुझें चरित्र मला कसें काय समजणार ? तेव्हा हें एकदम खोटें तरी कसें म्हणावें ?

परी हेचि मातु आघवी । मी परियेसें तैशी सांगावी ।

जे तुवांचि तया रवीं केवीं । उपदेशु केला ॥ ४० ॥   

४०) तेव्हां तूंच त्या सूर्याला उपदेश कसा केलास, हीच सगळी हकीकत मला पटेल तशी सांग.

तंव कृष्ण म्हणे पंडुसुता । तो विवस्वतु जैं होता ।

तैं आम्ही नसों ऐसीचित्ता । भ्रांति जरी तुज ॥ ४१ ॥

४१) त्यावर श्रीकृष्ण म्हणाला, अर्जुना, जेव्हा तो विवस्वान् होता, तेव्हां आम्ही नव्हतों, अशी जर तुझ्या चित्ताला भ्रांति झाली आहे,

तरी तूं गा हें नेणसी । पैं जन्में आम्हां तुम्हांसी ।

बहुतें गेलीं परी तियें न समरसी । आपलीं तूं ॥ ४२ ॥

४२) तरी अरे, तुला हें माहीत नाहीं कीं, तुमचे व आमचे ( आजपर्यंत ) कितीतरी जन्म होऊन गेलेले आहेत; पण तुला आपल्या जन्मांची आठवण नाही.

मी जेणें जेणें अवसरें । जें जें होऊनि अवतरें ।

तें समस्तही स्मरें । धनुर्धरा ॥ ४३ ॥

४३) ज्या ज्या वेळीं जें जें रुप घेऊन मी अवतरलों, तें तें सगळे अर्जुना मला आठवतें.

म्हणोनि आघवें । मागील मज आठवें ।

मी अजुही परि संभवें । प्रकृतियोगें ॥ ४४ ॥

४४) म्हणून मागचें सगळें मला आठवतें. मी जन्मरहित आहें. पण मायेच्या योगानें जन्म घेतों.

माझें अव्ययत्व तरी न नसे । परी होणें जाणें एक दिसे ।

तें प्रतिबिंबे मायावशें । माझांचि ठायीं ॥ ४५ ॥  

४५) माझा अविनाशीपणा तर नाहींसा होत नाहीं. पण अवतार घेणें व संपविणें ही जी एक क्रिया ( माझ्या संबंधानें ) दिसते, ती माझ्या ठिकाणीं मायेच्या योगानें भासते.

माझी स्वतंत्रता तरी न मोडे । परी कर्माधीनु ऐसा आवडे ।

तेंही भ्रांतिबुद्धि तरी घडे । एर्‍हवीं नाहीं ॥ ४६ ॥   

४६) माझी स्वतंत्रता तर बिघडतच नाहीं; परंतु मी कर्माधीन आहे, असें जें दिसतें, ते भ्रांत ( अज्ञान ) बुद्धि असली तरच दिसतें, एरव्हीं नाहीं.     

कीं एकचि दिसे दुसरें । तें दर्पणाचेनि आधारें ।

एर्‍हवीं काय वस्तुविचारें । दुजें आहे ॥ ४७ ॥

४७) किंवा एकाच वस्तूचीं दोन रुपें दिसतात; पण तीं केवळ आरशाच्या योगानें दिसतात; एर्‍हवीं ( त्या मूळ ) वस्तूचा विचार केला तर, तिला दुसरें ( रुप ) आहे काय ?

तैसा अमूर्तचि मी किरीटी । परी प्रकृति जैं अधिष्ठीं ।

तैं साकारपणें नटें नटीं । कार्यालागीं ॥ ४८ ॥

४८) तसा अर्जुना, मी निराकारच आहें;  पण जेव्हां मायेचा आश्रय करतों तेव्हां कांहीं विशेष कार्यासाठी मी सगुण रुपाच्या वेषानें नटतों.

जे धर्मजात आघवें । युगायुगीं म्या रक्षावें ।

ऐसा ओघु हा स्वभावें । आद्य असे ॥ ४९ ॥

४९) कारण कीं, जेवढे धर्म म्हणून आहेत, तेवढ्या सर्वांचे प्रत्येक युगांत मी रक्षण करावें, असा क्रम स्वभावतः अगदीं मुळापासून चालत आलेला आहे. 

म्हणोनि अजत्व परतें ठेवीं । मी अव्यक्तपणही नाठवीं ॥

जे वेळीं धर्मातें अभिभवी । अधर्मु हा ॥ ५० ॥

५०) म्हणून ज्या वेळेला अधर्म हा धर्माचा पराभव करतों, त्या वेळेला मी आपला जन्मरहितपणा बाजूला ठेवतों व आपलें अव्यक्तपणहि मनांत आणीत नाहीं. 




Custom Search


No comments: