Saturday, September 11, 2021

ShriRamCharitManas AyodhyaKanda Part 41 श्रीरामचरितमानस अयोध्याकाण्ड भाग ४१

 

ShriRamCharitManas 
AyodhyaKanda Part 41 
Doha 239 to 244 
श्रीरामचरितमानस 
अयोध्याकाण्ड भाग ४१ 
दोहा २३९ ते २४४

दोहा—लसत मंजु मुनि मंडली मध्य सीय रघुचंदु ।

ग्यान सभॉं जनु तनु धरें भगति सच्चिदानंदु ॥ २३९ ॥

सुंदर मुनिमंडळींच्यामध्ये सीता व रघुकुलचंद्र श्रीरामचंद्र असे शोभून दिसत होते की, जणू ज्ञानाच्या सभेमध्ये प्रत्यक्ष भक्ती व सच्चिदानंद हेच शरीर धारण करुन बसले आहेत. ॥ २३९ ॥

सानुज सखा समेत मगन मन । बिसरे हरष सोक सुख दुख गन ॥

पाहि नाथ कहि पाही गोसाईं । भूतल परे लकुट की नाईं ॥

अनुज शत्रुघ्न मित्र निषादराज यांच्यासमावेत भरताचे मन प्रेममग्न झाले होते. हर्ष, शोक, सुख-दुःख इत्यादी विसरुन गेले होते. हे नाथ, रक्षण करा. हे स्वामी, रक्षण करा ‘ असे म्हणत भरताने भूमीवर लोटांगण घातले. ॥ १ ॥

बचन सपेम लखन पहिचाने । करत प्ननामु भरत जियँ जाने ॥

बंधु सनेह सरस एहि ओरा । उत साहिब सेवा बस जोरा ॥

ते प्रेमपूर्ण बोलण लक्ष्मणाने ओळखले आणि त्याने जाणले की, भर त प्रणाम करीत आहे. लक्ष्मण श्रीरामांच्याकडे तोंड करुन उभा होता. त्यामुळे तो भरताला पाहू शकला नव्हता. आता एकीकड़े बंधु भरताचे सरस भ्रातृप्रेम आणि दुसरीकड़े श्रीरामचंद्रांच्या सेवेची अत्यंत परवशता होती. ॥ २ ॥

मिलि न जाइ नहिं गुदरत बनई । सुकबि लखन मन की गति भनई ॥

रहे राखि सेवा पर भारु । चढ़ी चंग जनु खैंच खेलारु ॥

तो क्षणभरसुद्धा सेवा सोडून भरताला भेटू शकत नव्हता आणि त्याच्यावरील प्रेमामुळे त्याला सोडूही शकत नव्हता. लक्ष्मणाच्या मनातील या द्विधा स्थितीचे वर्णन एखादा श्रेष्ठ कवीच करु शकेल. तो सेवा हीच महत्त्वपूर्ण मानून तसाच न वळता उभा राहिला, परंतु त्याच्या मनाची दशा उंच तरंगणार्‍या पतंगाला खेळाडू ओढतो, अशी झाली होती. ॥ ३ ॥

कहत सप्रेम नाइ महि माथा । भरत प्रनाम करत रघुनाथा ॥

उठे रामु सुनि पेम अधीरा । कहुँ पट कहुँ निषंग धनु तीरा ॥

लक्ष्मणाने प्रेमाने भूमीवर मस्तक टेकवून रामांना म्हटले, ‘ हे रघुनाथ, भरत प्रणाम करीत आहे. ‘ हे ऐकताच श्रीरघुनाथ प्रेमाने इतके अधीर झाले की कुठे वस्त्र ओघळले, कुठे भाता पडला, कुठे धनुष्य तर कुठे बाण हेही त्यांना कळले नाही. ॥ ४ ॥

दोहा—बरबस लिए उठाइ उर लाए कृपानिधान ।

भरत राम की मिलनि लखि बिसरे सबहि अपान ॥ २४० ॥

कृपानिधान श्रीरामचंद्रानी भरताला बळेच उठवून हृदयाशी धरले. भरत व श्रीराम यांच्या भेटीची ही रीत पाहून सर्वजण देहभान विसरले. ॥ २४० ॥

मिलनि प्रीति किमि जाइ बखानी । कबिकुल अगम करम मन बानी ॥

परम पेम पूरन दोउ भाई । मन बुधि चित अहमिति बिसराई ॥

या भेटीतील प्रेम कसे वर्णन करावे ? ते कविकुलाच्या कायावाचा मनालाही अगम्य आहे. श्रीराम व भरत हे दोघे बंधू मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार विसरुन परम प्रेमाने भरुन गेले होते. ॥ १ ॥

कहहु सुपेम प्रगट को करई । केहि छाया कबि मति अनुसरई ॥

कबिहि अरथ आखर बलु सॉंचा । अनुहरि ताल गतिहि नटु नाचा ॥

सांगा, बरे, त्या श्रेष्ठ प्रेमाचे वर्णन कोण करु शकेल ? कवीची बुद्धी कुणाच्या सावलीचे अनुसरण करु शकेल ? कवीला तर अक्षर व अर्थ यांचेच खरे बळ असते. डोंबारी हा तालाच्या गतीवरच नाचत असतो. ॥ २ ॥

अगम सनेह भरत रघुबर को । जहँ न जाइ मनु बिधि हरि हर को ॥

सो मैं कुमति कहौं केहि भॉंती । बाज सुराग कि गॉंडर तॉंती ॥

भरत व श्रीराम यांचे प्रेम अगम्य आहे. जिथे ब्रह्मदेव, विष्णू व महादेव हे मनानेही जाऊ शकत नाहीत, त्या प्रेमाचे वर्णन मी अल्प बुद्धीचा मनुष्य कसा करु शकेल ? हरळीच्या दोरीने कुठे सुंदर राग वाजवता येईल काय ? ॥ ३ ॥

मिलनि बिलोकि भरत रघुबर की । सुरगन सभय धकधकी धरकी ॥ समुझाए सुरगुरु जड़ जागे । बरषि प्रसून प्रसंसन लागे ॥

भरत आणि राम यांच्या भेटण्याची रीत पाहून देव घाबरले, त्यांच्या मनातील धाकधूक वाढली. देवगुरु बृहस्पतींनी त्यांना समजावले, तेव्हा कुठे ते मूर्ख सावध झाले आणि फुले उधळून प्रशंसा करु लागले. ॥ ४ ॥

दोहा—मिलि सपेम रिपुसूदनहि केवटु भेंटेउ राम ।

भूरि भायँ भेंटे भरत लछिमन करत प्रनाम ॥ २४१ ॥

त्यानंतर श्रीराम प्रेमाने शत्रुघ्नाला व निषादराजाला भेटले. प्रणाम करणार्‍या लक्ष्मणाला भरत मोठ्या प्रेमाने भेटला. ॥ २४१ ॥

भेंटेउ लखन ललकि लघु भाई । बहुरि निषादु लीन्ह उर लाई ॥

पुनि मुनिगन दुहुँ भाइन्ह बंदे । अभिमत आसिष पाइ अनंदे ॥

मग लक्ष्मण उचंबळून येऊन शत्रुघ्नाला भेटला. त्यानंतर त्याने निषादराजाला आलिंगन दिले. मग भरत-शत्रुघ्न या दोन्ही भावांनी तेथे उपस्थित असलेल्या मुनींना प्रणाम केला आणि इच्छित आशीर्वाद मिळाल्याने ते आनंदित झाले. ॥ १ ॥

सानुज भरत उमगि अनुरागा । धरि सिर सिय पद पदुम परागा ॥

पुनि पुनि करत प्रनाम उठाए । सिर कर कमल परसि बैठाए ॥

भरत व शत्रुघ्न प्रेमाचे भरते येऊन सीतेच्या चरण-कमलांची धूळ मस्तकावर धारण करुन तिला वारंवार प्रणाम करु लागले. सीतेने त्यांना उठवून त्यांच्या मस्तकास आपल्या करकमलांचा स्पर्श करुन त्या दोघांना बसवून घेतले. ॥ २ ॥

सीयँ असीस दीन्हि मन माहीं । मगन सनेहँ देह सुधि नाहीं ॥

सब बिधि सानुकूल लखि सीता । भे निसोच उर अपडर बीता ॥

सीतेने मनातल्या मनात आशीर्वाद दिला. कारण ते दोघे स्नेहात मग्न होते. त्यांना देहभान राहिले नव्हते. सीता ही सर्व प्रकारे आपापल्या अनुकूल असल्याचे पाहून भरताची चिंता दूर झाली आणि त्याच्या मनातील कल्पित भय नाहीसे झाले. ॥ ३ ॥

कोउ किछु कहइ न कोउ किछु पूँछा । प्रेम भरा मन निज गति छूँछा ॥

तेहि अवसर केवटु धीरजु धरि । जोरि पानि बिनवत प्रनामु करि ॥

त्याप्रसंगी कोणी बोलत नव्हते की काही विचारत नव्हते. मन प्रेमाने भरुन आल्यामुळे त्याची संकल्प-विकल्प व चांचल्याची गती थांबली. त्यावेळी निषादराज धीर धरुन व हात जोडून प्रणाम करीत विनंती करु लागला. ॥ ४ ॥

दोहा—नाथ साथ मुनिनाथ के मातु सकल पुर लोग ।

सेवक सेनप सचिव सब आए बिकल बियोग ॥ २४२ ॥

‘ हे नाथ ! मुनिवर्य वसिष्ठांच्याबरोबर सर्व माता, नगरवासी, सेवक, सेनापती, मंत्री हे सर्व तुमच्या वियोगाने व्याकूळ होऊन आले आहेत. ॥ २४२ ॥

सीलसिंधु सुनि गुर आगवनू । सिय समीप राखे रिपुदवनू ॥

चले सबेग रामु तेहि काला । धीर धरम धुर दीनदयाला ॥

गुरुंचे आगमन झाल्याचे ऐकून सद्गुणसमुद्र श्रीरामांनी सीतेजवळ शत्रुघ्नाला ठेवले व ते परमवीर,धर्मधुरंधर, दीलदयाळु श्रीराम तत्क्षणी लगबगीने निघाले. ॥ १ ॥

गुरहि देखि सानुज अनुरागे । दंड प्रनाम करन प्रभु लागे ॥

मुनिबर धाइ लिए उर लाई । प्रेम उमगि भेंटे दोउ भाई ॥

गुरुंचे दर्शन झाल्याने राम-लक्ष्मणांना प्रेमाची भरती आली आणि ते साष्टांग नमस्कार करु लागले. तेवढ्यात मुनिश्रेष्ठ वसिष्ठांनी त्यांना हृदयाशी कवटाळले आणि प्रेमाच्या भरात ते त्या दोघांना भेटले. ॥ २ ॥

प्रेम पुलकि केवट कहि नामू । कीन्ह दूरि तें दंड प्रनामू ॥

रामसखा रिषि बरबस भेंटा । जनु महि लुठत सनेह समेटा ॥

मग प्रेमाने पुलकित होऊन निषादराजाने आपले नाव सांगत दुरुनच वसिष्ठांना प्रणाम केला. वसिष्ठांनी तो रामाचा मित्र असल्याचे पाहून त्याला बळेच हृदयाशी धरले. जणू जमिनीवर लोळणार्‍या प्रेमाला उचलून घेतले. ॥ ३ ॥

रघुपति भगति सुमंगल मूला । नभ सराहि सुर बरिसहिं फूला ॥

एहि सम निपट नीच कोउ नाहीं । बड़ बसिष्ठ सम को जग माहीं ॥

‘ श्रीरघुनाथांची भक्ती ही सुंदर मांगल्याचे मूळ आहे ‘ असे म्हणत स्तुती करीत देव आकाशातून फुले उधळू लागले. ते म्हणाले, ‘ या जगात या गुहासारखा कनिष्ठ ( जातीचा ) कोणी नाही आणि वसिष्ठांच्यासारखा श्रेष्ठ कोण आहे ? ॥ ४ ॥                       

दोहा—जेहि लखि लखनहु तें अधिक मिले मुदित मुनिराउ ।

सो सीतापति भजन को प्रगट प्रताप प्रभाउ ॥ २४३ ॥

तरीही निषादाला पाहून मुनिराज वसिष्ठ लक्ष्मणापेक्षा अधिक समजून त्याला आनंदाने भेटले. हा सर्व सीतापति श्रीरामचंद्रांच्या भजनाचा प्रताप व प्रभाव होय. ॥ २४३ ॥

आरत लोग राम सबु जाना । करुनाकर सुजान भगवाना ॥

जो जेहि भायँ रहा अभिलाषी । तेहि तेहि कै तसि तसि रुख राखी ॥

 दयेची खाण व सर्वज्ञ असलेल्या भगवान श्रीरामांनी सर्व लोक भेटण्यासाठी व्याकूळ झाल्याचे पाहिले, तेव्हा त्यांनी ज्याला ज्या भावानेने भेटायची अभिलाषा होती, त्या सर्वांना त्यांच्या आवडीप्रमाणे ॥ १ ॥

सानुज मिलि पल महुँ सब काहू । कीन्ह दूरि दुखु दारुन दाहू ॥

यह बड़ि बात राम कै नाहीं । जिमि घट कोटि एक रबि छाहीं ॥

लक्ष्मणासह एका क्षणात भेटून त्यांचे दुःख व मनातील दाह दूर केला. श्रीरामांसाठी ही गोष्ट काही कठीण नव्हती. ज्याप्रमाणे कोट्यावधी घड्याळांमध्ये एकाच सूर्याचे वेगवेगळे प्रतिबिंब एकाच वेळी दिसते, त्याप्रमाणे श्रीराम सर्वांना एकदम भेटले. ॥ २ ॥‘

मिलि केवटहि उमगि अनुरागा । पुरजन सकल सराहहिं भागा ॥

देखीं राम दुखित महतारीं । जनु सुबेलि अवलीं हिम मारीं ॥

सर्व पुरवासी प्रेमाच्या उत्साहाने निषादराजाला भेटले व त्याच्या भाग्याची प्रशंसा करु लागले. श्रीरामांनी सर्व माता दुःखी असल्याचे पाहिले. त्या जणू सुंदर लतांच्या ओळींवर हिमपात झाल्यासारख्या सुकून गेल्या होत्या. ॥ ३ ॥

प्रथम राम भेंटी कैकेई । सरल सुभायँ भगति मति भेई ॥

पग परि कीन्ह प्रबोधु बहोरी । काल करम बिधि सिर धरि खोरी ॥

श्रीराम सर्वप्रथम कैकेयीला भेटले आणि सरळ स्वभावाने आणि भक्तीने त्यांनी तिच्या बुद्धीला शांत केले. मग तिच्या पाया पडून काल, कर्म व विधात्याच्या माथी सर्व दोष मारुन श्रीरामांनी तिचे सांत्वन केले. ॥ ४ ॥  

दोहा—भेंटी रघुबर मातु सब करि प्रबोधु परितोषु ।

अंब ईस आधीन जगु काहु न देइअ दोषु ॥ २४४ ॥

नंतर श्रीरघुनाथ सर्व मातांना भेटले. त्यांनी सर्वांना समजावून सांगितले की, ‘ हे मातांनो, जग हे ईश्र्वराच्या अधीन आहे. म्हणून कुणालाही दोष देऊ नये. ’ ॥ २४४ ॥

गुरतिय पद बंदे दुहु भाईं । सहित बिप्रतिय जे सँग आईं ॥

गंग गौरि सम सब सनमानीं । देहिं असीस मुदित मृदु बानीं ॥

नंतर श्रीराम व लक्ष्मण यांनी भरताबरोबर आलेल्या ब्राह्मण स्त्रियांच्या व गुरुपत्नी अरुंधतीच्या चरणांना वंदन केले आणि गंगा व गौरी सारखा त्यांचा सन्मान केला. सर्वजणी आनंदाने व कोमल वाणीने आशीर्वाद देऊ लागल्या. ॥ १ ॥

गहि पद लगे सुमित्रा अंका । जनु भेंटी संपति अति रंका ॥

पुनि जननी चरननि दोउ भ्राता । परे पेम ब्याकुल सब गाता ॥

मग दोघे बंधू हे सुमित्रेचे पाय धरुन तिला बिलगले. जणू एखाद्या दरिद्री माणसाची संपत्तीशी भेट व्हावी. नंतर दोघा बंधूंनी कौसल्येच्या चरणी लोटांगण घातले. प्रेमामुळे त्यांचे शरीर विव्हल झाले होते. ॥ २ ॥

अति अनुराग अंब उर लाए । नयन सनेह सलिल अन्हवाए ॥

तेहि अवसर कर हरष बिषादू । किमि कबि कहै मूक जिमि स्वादू ॥

मातेने मोठ्या प्रेमाने त्यांना उराशी धरले आणि नेत्रांतील प्रेमाश्रूंनी त्यांना स्नान घातले. त्या प्रसंगीचा हर्ष व विषाद यांचे वर्णन कवी कसे करणार ? मुक्या माणसाला पदार्थाची चव सांगता येईल काय ? ॥ ३ ॥

मिलि जननिहि सानुज रघुराऊ । गुर सन कहेउ कि धारिअ पाऊ ॥

पुरजन पाइ मुनीस नियोगू । जल थल तकि तकि उतरेउ लोगू ॥

श्रीराम व लक्ष्मण यांनी कौसल्येला भेटल्यावर गुरुंना

 सांगितले की, ‘ आश्रमात चला. ‘ तेव्हा वसिष्ठांची आज्ञा

 झाल्यावर अयोध्यावासी सर्व लोक पाणी-निवार्‍याची

 सोय पाहून उतरले. ॥ ४ ॥



Custom Search

No comments: