Shri Dnyaneshwari
तयाचि क्षणासवें । एवंविध
मी जाणवें ।
जाणितला तरी स्वभावें ।
दृष्ट होय ॥ ६९१ ॥
६९१) ( असें ज्या वेळीं
होईल ), त्याच क्षणाबरोबर मी ( भगवंत ) विश्वरुप आहें असें कळेल; आणि असा मी
समजल्यावर, साहजिक रीतीनें मी तसा ( विश्वरुप ) दिसेन.
मग इंधनीं अग्नि उद्दिपे ।
आणि इंधन हे भाष हारपे ।
तें अग्निचि होऊनि आरोपे ।
मूर्त जेवीं ॥ ६९२ ॥
६९२) मग काष्ठांत (
घर्षणानें ) अग्नि उत्पन्न झाल्यावर, काष्ठ हा शब्द नाहींसा होऊन, तें काष्ठच जसें
मूर्तिमंत अग्नि बनतें;
कां उदय न कीजे तेजाकारें ।
तंव गगनचि होऊनि असे आंधारें ।
मग उदेलियां एकसरें ।
प्रकाशु होय ॥ ६९३ ॥
६९३) अथवा जोपर्यंत
सूर्यानें उदय केला नाहीं, तोपर्यंत आकाशच अंधार होऊन असतें, मग सूर्योदय झाल्यावर
तें आकाशच एकसारखें प्रकाश होतें;
तैसें माझां साक्षात्कारीं
। सरे अहंकाराची वारी ।
अहंकारलोपीं अवधारीं ।
द्वैत जाय ॥ ६९४ ॥
६९४) त्याप्रमाणें
माझें प्रत्यक्ष दर्शन झाल्यावर अहंकाराची येरझार संपते आणि अहंकाराचा नाश
झाल्यावर द्वैत जातें, हें लक्षांत ठेव.
मग मी तो हें आघवें । एक
मीचि आथी स्वभावें ।
किंबहुना सामावे । समरसें
तो ॥ ६९५ ॥
६९५) मग मी, तो आणि
सर्व ( विश्व ) हें एक मीच स्वभावतः आहे फार काय सांगावें ? तो ऐक्यभावानें
माझ्यामध्यें सामावला जातो.
मूळ श्लोक
मत्कर्मकृन्मत्परमो
मद्भक्तः संगवर्जितः ।
निर्वैरः सर्वभूतेषु यः स
मामेति पाण्डव ॥ ५५ ॥
५५) हे पांडवा, जो
मत्प्रीत्यर्थ कर्म करणारा, मीच ज्यांचें प्राप्तव्य आहे, असा माझा भक्त,
संसारसंगरहित, कोणाहि भूतांशीं वैर नसलेला असा तो ( पुरुष ) मजप्रत येतो.
जो मजचि एकालागीं । कर्में
वाहातसे आंगी ।
जया मीवांचोनि जगीं ।
गोमटें नाहीं ॥ ६९६ ॥
६९६) जो ( भक्त )
माझ्या एकट्याकरितांच शरीरानें कर्में आचरतो आणि ज्याला जगामध्यें माझ्यावांचून
दुसरें कांहीं चांगलें नाहीं;
दृष्टादृष्ट सकळ । जयाचें
मीचि केवळ ।
जेणें जिणयाचें फळ । मजचि
नाम ठेविलें ॥ ६९७ ॥
६९७) ज्याचा इहपरलोक,
हें सर्व केवळ मीच होऊन राहिलों आहें व ज्यानें आपलें जगण्याचें प्रयोजन माझीच
प्राप्ति होणे, हेंच ठरविलें आहे,
भूतें हे भाष विसरला । जे
दिठी मीचि आहे बांधला ।
म्हणोनि निर्वैर जाहला ।
सर्वत्र भजे ॥ ६९८ ॥
६९८) तो, भूतें ही भाषा
विसरला; कारण त्याच्या दृष्टीला माझ्याशिवाय दुसरा विषय नाहीं; म्हणून तो निर्वैर
झाला असतां तो सर्व ठिकाणी मला ओळखून माझी भक्ति करतो.
ऐसा जो भक्तु होये । तयाचें
त्रिधातुक हें जैं जाये ।
तैं मीचि होऊनि ठाये ।
पांडवा गा ॥ ६९९ ॥
६९९) अरे अर्जुना, असा
जो भक्त आहे, त्याचें हें शरीर ज्या वेळी पडतें, त्या वेळी तो मीच होऊन
राहतो.
ऐसें जगदुदरदोंदिलें ।
तेणें करुणारसरसाळें ।
संजयो म्हणे बोलिलें ।
श्रीकृष्णदेवें ॥ ७०० ॥
७००) उदरामध्यें जगत्
असल्यामुळें दोदिल झालेले व करुणेच्या रसाने रसाळ, असें जे श्रीकृष्णदेव, ते
याप्रमाणे बोलले, असें संजय ( धृतराष्ट्राला ) म्हणाला.
ययावरी तो पांडुकुमरु ।
जाहला आनंदसंपदा थोरु ।
आणि कृष्णचरणचतुरु । एक तो
जगीं ॥ ७०१ ॥
७०१) याप्रमाणें
श्रीकृष्ण बोलल्यानंतर तो अर्जुन आनंदरुपी धनाने थोर झाला; कारण श्रीकृष्णाच्या
चरणांचे सेवन करण्यांत जगामध्ये तोच एक चतुर होता.
तेणें देवाचिया दोनही मूर्ती
। निकिया न्याहाळिलिया चित्तीं ।
तंव विश्र्वरुपाहूनि
कृष्णाकृती । देखिला लाभु ॥ ७०२ ॥
७०२) त्यानें देवाच्या
दोन्ही मूर्तिचित्तामध्ये चांगल्या न्हाहाळून पाहिल्या, तेव्हां विश्वरुपापेक्षां
कृष्णाच्या सगुण रुपामध्यें फायदा आहे, असे त्यास आधळून आले.
परि तयाचिये जाणिवे । मानु
न कीजेचि देवें ।
जें व्यापकाहूनि नव्हे ।
एकादेशी ॥ ७०३ ॥
७०३) परंतु त्याच्या या
समजुतीला देवानें मान दिला नाहीच, कारण व्यापक रुपापेक्षां ( विश्वरुपापेक्षा )
एकदेशी रुप ( चतुर्भुज रुप ) बरें नव्हे, असें श्रीकृष्ण म्हणाले.
हेंचि समर्थावयालागीं । एक
दोन चांगी ।
उपपत्ती शङ्गी । दाविता
जाहला ॥ ७०४ ॥
७०४) आणि हेंच (
चतुर्भुज ) रुपापेक्षां विश्वरुप बरें ही गोष्ट स्थापित करण्याकरितां एक दोन
चांगल्या युक्ति श्रीकृष्णांनी दाखविल्या.
तिया ऐकोनी सुभद्राकांतु ।
चित्तीं आहे म्हणतु ।
तरी होय बरवें दोन्हींआंतु
। तें पुढती पुसों ॥ ७०५ ॥
७०५) त्या युक्ति ऐकून
अर्जुन मनांत म्हणतो, या दोन्ही रुपांमध्यें कोणतें बरें आहे, ते देवाला आतां
यापुढें विचारुं.
ऐसा आलोचु करुनि जीवीं ।
आतां पुसती वोज बरवी ।
आदरील ते परिसावी । पुढां
कथा ॥ ७०६ ॥
७०६) याप्रमाणें मनांत
विचार करुन आतां तो प्रश्न विचारण्याचा चांगला प्रकार स्वीकारील; ती कथा पुढें
आहे, ती ऐकावी.
प्रांजळ ओंवीप्रबंधें ।
गोष्टी सांगिजेल विनोदें ।
निवृत्तिपादप्रसादें ।
ज्ञानदेवो म्हणे ॥ ७०७ ॥
७०७) निवृत्तीनाथांच्या
पायांच्या कृपेनें ती कथा सोप्या अशा ओंवी छंदांत मजेनें सांगता येईल असे
ज्ञानेश्रवरमहाराज म्हणतात.
भरोनि सद्भावाची अंजुळी ।
मियां वोंवियाफूलें मोकळीं ।
अर्पिली अंघ्रियुगुलीं ।
विश्र्वरुपाचां ॥ ७०८ ॥
७०८) मी शुद्ध भावनारुप ओंजळींत हीं ओव्यारुपी
मोकळी फुलें भरुन विश्वरुपाच्या दोन्ही पायांवर अर्पण
केली. ( असें ज्ञानेश्र्वरमहाराज म्हणतात. )
इति
श्रीनद्भगवद्गीतासूपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे
विश्वरुपदर्शनयोगो नाम एकादशोऽध्यायः ॥
( श्लोक ५५; ओव्या ७०८ )
॥
श्रीसच्चिदानन्दार्पणमस्तु ॥