Friday, January 22, 2016

Shree Navanath Bhaktisar Adhyay 13 Part 1/2 श्रीनवनाथभक्तिसार अध्याय तेरावा ( १३ ) भाग १/२


Shree Navanath Bhaktisar Adhyay 13
Shree Navanath Bhaktisar Adhyay 13 is in Marathi. Jalindar obtained blessings from all gods for Kanifa for his Mantravidya. He along with Kanifa had written forty corers twenty lakhs stanzas of Shabari kavitva as per instructions from God Shiva. He asked Kanifa to complete 12 years Tapas at Badrinath under guidance of God Shiva. Then he proceeded for thirth yatra. He came to Goud-Bangal where Gopichand was a king. His mother Mainavati thought that Jalindar could be her Guru. Jalindar also found her to be his disciple, imparted her with the Brahma-Dnyan.
श्रीनवनाथभक्तिसार अध्याय तेरावा ( १३ ) भाग १/२
श्रीगणेशाय नमः । श्री सरस्वत्यै नमः । श्रीगुरुभ्यो नमः ।
जयजयाजी त्रिभुवनेशा । मच्छकच्छवराहनरसिंहवामनवेषा ।
भार्गव राघव द्वारकाधीशा । पूर्णब्रह्मा सर्वज्ञा ॥ १ ॥
हे गुणातीता सकलगुणज्ञा । अव्यक्तव्यक्ता सर्वज्ञा ।
पूर्णब्रह्म अचल सर्वज्ञा । बौद्ध कलंकी आदिमूर्ते ॥ २ ॥
मागिले अध्यायीं केले कथन । श्रीजालिंदरा होऊनि जन्म ।
तप आचरोनि अत्रिनंदन । संपादिला गुरुत्वीं ॥ ३ ॥
तो समर्थ अत्रिसुत । प्रसन्न झाला सद्विद्येंत ।
तयावरुतें सकळ दैवत । गौरविलें पावकें ॥ ४ ॥
स्कंधी वाहूनि द्विमूर्धनी । पृथक दैवतें स्थानीं स्थानीं ।
सत्य लोकांदि अमरा पाहूनि । वैकुंठादि पाहिलें ॥ ५ ॥
पाहिलें इंद्र चंद्रस्थान । मित्र वरुण गंधर्वा भेटून ।
सुवर्लोक भुवर्लोक तपोलोकादि पाहून । वरालागीं आणिलें ॥ ६ ॥
यक्ष राक्षस किन्नरांसहित । गणगंधर्वादि गौरवूनि समस्त ।
वश केला जालिंदरनाथ । अस्त्रविद्येकारणें ॥ ७ ॥
याउपरी कानिफा कर्णोदय । होऊनि झाला विद्यामय ।
तयाच्या वराकरितां सर्व देव । सकल दैवतें विटंबिली ॥ ८ ॥
विटंबोनि आपुले शक्ती । प्रसन्न केलें वराप्रती ।
उपरी गेले स्वस्थाना निगुती । आश्रम बद्रिका सांडूनि ॥ ९ ॥
परी उमावर आणि रमावर । कानिफा आणि जालिंदर ।
बद्रिकाश्रमीं राहूनि स्थिर । करिती विचार तो कैसा ॥ १० ॥
एकमेकां बोलती हांसून । आठवूनि देवतांचे विमुंडमुंडन ।
प्रसन्न झाले विटंबून । बुद्धिहीन हें कैसे ॥ ११ ॥ 
परी धन्य जालिंदर मिळाला यांसी । अवस्था दारुण महीसी ।
पूर्वी भिडले अपार राक्षसांसी । परी ऐसा मिळाला नाहीं त्यां ॥ १२ ॥
उफराटे नग्नदेही । अधो पाहत होते मही ।
ऐसे उचित कदा देही । मिळाले नाहीं तयांसीं ॥ १३ ॥
ऐसे बोलोनि उत्तरोत्तर । हास्य करिती वारंवार ।
मेळवूनि करास कर । टाळी पिटिती विनोदें ॥ १४ ॥
असो ऐसी विनोदशक्ती । यावरी बोले उमापती ।
हे महाराज जालिंदरा जती । चित्त दे या वचनातें ॥ १५ ॥
नागपत्रअश्र्वत्थस्थानीं । पूर्ण यज्ञआहुती करोनी ।
प्रथम कवित्वा रचोनि । वरालागीं साधावें ॥ १६ ॥
वेदविद्या मंत्र बहुत । अस्त्रविद्या प्रतापवंत ।
परी ते महीवरी पुढें कलींत । चालणार नाहीं महाराजा ॥ १७ ॥
मग मंत्रशक्ती उपायतरणी । कांहींच न मिळे लोकांलागुनी ।
मग ते दुःखप्रवाहशमनीं । सकळ लोक पडतील ॥ १८ ॥
तरी सिद्ध करुनि आतां कविता । आर्वतिजे नागाश्र्वत्था ।
सकल विद्या करुनि हाता । कानिफातें ओपिजे ॥ १९ ॥
या कानिफाची उदार शक्तिस्थिती । मिरवत आहे दांभिकवृत्ती ।
तरी बरवी आहे कार्याप्रती । पुढें पडेल महाराजा ॥ २० ॥
हा अपार शिष्य करील पुढती । विद्या वरितील याच्या हातीं ।
मग ती प्रतिष्ठा लोकांपरती । सर्व जगीं मिरवेल ॥ २१ ॥  
पूर्वी सांबरी ऋषीनें मार्ग । काढिला आहे शुभयोग ।
परी थोडकी विद्या चांग । महीलागीं पुरेना ॥ २२ ॥
तरी शतकोटी सांबरीगणा । महीतें मिरवावें शुभवचना ।
सकळास्त्रांची आणूनि भावना । महीलागी मिरवावी ॥ २३ ॥
तरी या कवितेची वांटणी । मिरवावी नवनाथालागुनी ।
कोणती कैसी गतीलागुनी । सांगतों मात ते ऐका ॥ २४ ॥
पूर्वी मच्छिंद्रानें धरुनि लक्ष । काव्य केलें आहे प्रत्यक्ष ।
तेहतीस कोटी पंचाण्णव लक्ष । मंत्रविद्युल्लता मिरविल्या ॥ २५ ॥ 
यापरी गोरक्षगोष्टी होटीं । मिरवेल नव लक्ष बारा कोटी ।
पंच कोटी एक लक्ष शेवटीं । मीननाथ मिरवेल ॥ २६ ॥
नव कोटी सात लक्ष । चर्पटनाथ करील कीं प्रत्यक्ष ।
सात कोटी चार लक्ष । भरतरीनाथ करील कीं ॥ २७ ॥
तीन लक्ष दोन कोटी । रेवणनाथ करील शेवटीं ।
एक लक्ष एक कोटी । वटसिद्धनाथ करील कीं ॥ २८ ॥
चौतीस कोटी बारा लक्ष । श्रीजालिंदरानें करावें प्रत्यक्ष ।
सहा कोटी आठ लक्ष । कानिफानें मिरवावे ॥ २९ ॥
अशुभप्रयोग गोरक्षरहाटी । स्थापूनि योजावे शतकोटी ।
पुढें लोकां साधनजेठी । होणार नाहीं महाराजा ॥ ३० ॥
म्हणूनि ऐसें योजूनि साधन । मंत्रप्रयोगीं करावें प्रवीण ।
तें न करितां सकळ जन । सुख होईल रोगांतें ॥ ३१ ॥          
तरी हे जनउपकारासाठीं । जीवा करावी आटाआटी ।
तुम्हांतें सांगावी ऐसी गोष्टी । नोहे सर्वज्ञ आम्हांते ॥ ३२ ॥
ही कलीची विद्या कलिसंधान । मिरवित आहे पूर्वीपासून ।
तुम्ही नवनाथ अवतार घेऊन । विद्या वर्तवीत असतां कीं ॥ ३३ ॥
तुम्ही जाणणार भविष्योत्तर । तरी या कलींत करावा प्रसार ।
आम्हीं सांगावें ऐसे थोर । तुम्हां योग्य साजेना ॥ ३४ ॥
भविष्योत्तर जाणोनि नाथा । तूं देवांसीं केली वार्ता ।
कानिफातें वर देतां । बोलिलासी हिता महाराजा ॥ ३५ ॥
तरी आतां आळस सांडूनि । जेवी मिरवावें कवित्वरत्न ।
जारण मारण उच्चाटन । कवित्वरचनीं मिरवावें ॥ ३६ ॥
ऐसें सांगूनि उमानाथ । कानिफाविषयीं आणिक सांगत ।
यासी बैसवूनि पूर्ण तपास । समर्थपणें मिरवीं कां ॥ ३७ ॥
ऐसें सांगता उमावर । अवश्य म्हणे जालिंदर ।
मग वर देऊनि रमावर । जाता झाला वैकुंठी ॥ ३८ ॥
मग जालिंदर आणि कानिफनाथ । द्वादश वर्षें राहूनि तेथ ।
चाळीस कोटी वीस लक्षांत । उभें चरित्र रचियेलें ॥ ३९ ॥
तें आदिनाथें कवित्व पाहोन । पूर्ण झालें समाधान ।
मग म्हणे नागाश्वत्थी जाऊन । सिद्धीमार्गी पावावें ॥ ४० ॥
मग जालिंदर आणि कानिफनाथ । जाऊनि पाहिला नागाश्वत्व ।
पूर्ण आहुती हवन तेथ । करुनि तोषवी वीरांते ॥ ४१ ॥
सूर्यकुंडाचें आणुनि जीवन । बावन्न वीरा करी सिंचन ।
प्रसन्न करुनि त्यांचे मन । वरालागी घेतलें ॥ ४२ ॥
यापरी पुनः परतून । पाहते झाले बद्रिकाश्रम ।
मग कानिफातें तपा बैसवून । लोहकंटकी मिरवला ॥ ४३ ॥
श्रीआदिनाथाच्या साक्षीसी । कानिफा बैसवून पूर्ण तपासी ।
श्रीजालिंदर तीर्थस्नानासी । जाता झाला पुसून ॥ ४४ ॥
त्याचि ठायीं बद्रिकाश्रमांत । कानिफा आणि श्रीकृष्णनाथ ।
तप करिती भागीरथीतीरांत । तीव्र काननी बैसूनियां ॥ ४५ ॥
उभय ठाव असे विभक्त । एकमेका नसे माहीत ।
असो येरीकडे जालिंदरनाथ । नानाक्षेत्रीं हिंडतसे ॥ ४६ ॥
परी क्षेत्रीं जातांचि आधीं काननीं । भारा बांधिला तृण कापूनि ।
निजमोळी त्वरें वाहुनी । क्षेत्रामाजी संचरे ॥ ४७ ॥
       
परी तो मौळी भारा घेतां । सुख न वाटे अनिळचित्ता ।
मग संचरोनि भयहर्ता । वरच्यावरी धरीतसे ॥ ४८ ॥
म्हणाल पवनासी काय कारण । वरचेवरी धरावया तृण ।
तरी जालिंदर अग्निनंदन । अग्निपिता तो असे ॥ ४९ ॥
परी पौत्राची करुनी ममता । म्हणूनि भारा धरी वरुता ।
असो जालिंदर क्षेत्रीं येतां । तृण गोधना सोडीतसे ॥ ५० ॥
ऐसें भ्रमण करितां महीं । नानातीर्थक्षेत्रयात्रा प्रवाहीं ।
तो गौडबंगाल देशाठायीं । हेलपट्टणीं पै आला  ॥ ५१ ॥
तृणभार मिरवोनि माथीं । परी तो मिरवे सर्वांहातीं ।
अधर चाले मस्तकावरती । लोक पाहती निजदृष्टी ॥ ५२ ॥
हेलापट्टण अति विस्तीर्ण । बुद्धिप्रयुक्त तेथील जन ।
जालिंदराचें चिन्ह पाहून । आश्र्चर्य करिती मानसीं ॥ ५३ ॥
म्हणती अधर भारा कैसा । चालती हा न कळे तमाशा । 
तरी हा सिद्धा अवतारलेशा । महीलागीं मितवीतसे ॥ ५४ ॥
मग ते चव्हाट्याचे जन । करुं धांवती तैं दर्शन ।
परी ते नाथा समाधान । चित्ती प्रशस्त लागेना ॥ ५५ ॥
जे पूर्णपणे झाले निवाले । ते प्रतिष्ठेपासूनि दुरावले ।
कदा न जातां जगीं मानवले । चित्तीं निःस्पृहता धरुनियां ॥ ५६ ॥
बृहस्पतीचे पडिपाडीं । तया होतसे सर्वार्थजोडी ।
परी तो वेडियांत मारी दडी । लोकमहिमाभयास्तव ॥ ५७ ॥
जैसें कृपण आपुले धन । रक्षी महीचे पाठीलागून ।
तन्न्याय झालिया मन । कदाकाळीं आवरेना ॥ ५८ ॥
असो मग जालिंदरनाथ । अति तोषें तृणभार जमवूनि आणीत ।
पाहुनि गोधनाची अमात । तृण सोडी तयांसी ॥ ५९ ॥
मग गल्लीकुची गंधमोरी । तेथें जाऊनि वस्ती करी ।
भिक्षा मागूनि क्षेत्राभीतरी । उदरनिर्वाह करीतसे ॥ ६० ॥
यापरी वर्ततां त्या गांवींचा नृप । त्रिलोचनसुत जैसा कंदर्प ।
तयाचे वर्णिता स्वरुप । सरस्वतीसी न सुचे हो ॥ ६१ ॥
नाम जयाचें गोपीचंद । वरी मिरवला सर्व संपत्तिवृंद ।
दिव्य अमूप अमरभद्र । पाहूनि लाजे कुबेर तो ॥ ६२ ॥
द्वादश लक्ष अपूर्वशक्ती । अश्व मिरवले वाताकृति ।
तेजःपुंज पाहूनि लाजती । चपळपणीं चपळा त्या ॥ ६३ ॥
चीरतगटीं रत्नकोंदणीं । पाखरा शोभल्या बालार्ककिरणीं ।
झगमगती झालरी किरणीं । हेमगुणीं मिरवल्या ॥ ६४ ॥
रश्मी अति शोभायमान । झालरी अग्निहेमगुण ।
मुक्त गुंफिले समत्वीं समान । नक्षत्रमालिका जेवीं त्या ॥ ६५ ॥
हेमतगटीं रत्नकोंदणीं । ग्रीवें मिरवल्या माळा भूषणीं ।
संगीत पेट्या नवरंगरत्नी । दीप जैसे लाविले ॥ ६६ ॥
मुख शोभलें त्वाचिपरी । दिव्य मिरवल्या सरोवरीं ।
चातकपिच्छ कर्णद्वयाभीतरीं । तुरे खोविले मौळीतें ॥ ६७ ॥
आणि पुष्पपृष्ठीं रत्नजडित । गेंदा जोडिया तेजभरित  ।
चारजामे लखलखीत । चपळेहूनि अधिक ते ॥ ६८ ॥
द्वादश लक्ष ऐसियेपरी । बाजी मिरवती चमूभीतरी ।
प्रत्येक पाहतां संमतसरी । उदधिसुत मिरविले ॥ ६९ ॥
कीं अर्कहृदयीं स्पृहा होती । मातें लाभली श्यामकर्ण मूर्ती ।
त्या स्पृहेची करावया शांती । द्वादश लक्ष प्रगटले ॥ ७० ॥
त्याचिपरी गजसमूह मत । पाहूनि लाजे ऐरावत ।
चित्तीं म्हणे क्षोभूनि सर्वत्र । रत्नें उपजलीं महीवरी ॥ ७१ ॥
विशाळ शुंडा हिरेजाती । अधरें द्वैतदंत शोभती ।
तयां वेष्टूनि चुडे पाहती । रत्नकोंदणीं मिरविले ॥ ७२ ॥
ग्रीवे घंटिका हेमगुणीं । तयामाजीं रत्नपाणीं । 
हिरे माणिक पाचतरणी । नवरंगी शोभले ॥ ७३ ॥
यापरी पृष्ठीं झुली व्यक्त । तयांवरी झालरी लखलखीत ।
हेमगुणीं गोवूनि मुक्त । ढाळ देती सुरवाड ॥ ७४ ॥
यापरी हौदे मेघडंबरी । सुवर्ण अंबार्‍या शोभल्या वरी ।
त्याहीं कोंदणीं नक्षत्रापरी । रत्न मिरवूं लाहिले ॥ ७५ ॥
कोणी रिक्त कोणी ऐसे । परी ते भासती पर्वत जैसे ।
पृष्ठीं पताका पहा भासे । पर्वतमौळी तरु जेवीं ॥ ७६ ॥
जैसे गजपृथूतें मिश्र । विराजलेती दशसहस्त्र ।
पाईक स्वार दासचक्र । रायापुढें धांवती ॥ ७७ ॥
छडीदार चोपदार । पूर्ण बोथाटे पुकारदार ।
यंत्रधारी अश्वगतास्वार । रायासमोर धांवती ॥ ७८ ॥
अति उग्र खडतरपती । मिरवल्या जैशा कृतांतमूर्ति ।
की युद्धकुंडींचें पावक होती । घेती आरती परचक्र ॥ ७९ ॥
यावरी राव तो कृपाळ । शोभे जैसा तमालनीळ ।
बरवेपणीं अतिझळाळ । कंदर्पपंथी मिरवतसे ॥ ८० ॥
स्वरुपलक्षणी गोपीचंद । समता न पावे आणिक गौडवृंद ।
चंद्रचूडमण्यालागीं अबाध । कलंक देहीं म्हणोनी ॥ ८१ ॥
अर्क दृष्टांता संमत देखा । तरी तोही तीव्र दाहकपंथा ।
चपला तेजापरी भ्याडा चित्ता । मेघामाजी दडताती ॥ ८२ ॥
तैसा नव्हे हा नृपनाथ । दिव्यरुपी सद्गुणभरित ।
धर्म औदार्य सभाग्यवंत । विजयलक्ष्मी मिरवीतसे ॥ ८३ ॥ 
म्हणाल प्रताप नसेल व्यक्त । तरी कृतांताचे आसन पाळीत ।
धाकें परचक्र आणूनि देत । कारभारातें न सांगतां ॥ ८४ ॥
यापरी वर्णितां शरीरपुष्टी । तरी म्हणवीतसे महींतें जेठी सा
यापरी आणिक कल्पाल चित्तीं । कीं इतुकी स्थावर झाली शक्ती ।
तरी भोगीत नसेल कामरती । विषयीं आसक्त नसेल तो ॥ ८६ ॥
तरी धर्मपत्नी शुभाननी । असती नक्षत्रतेजप्रकरणीं ।
खंजरीटमृगपंकजनयनी । चंद्राकृती मिरवल्या ॥ ८७ ॥
चित्तज्ञ परम चातुर्यखाणी । यापरी षोडशशत शुभाननी ।
भोगांनना जयालागुनी । राजांकीं मिरवल्या ॥ ८८ ॥
परी ते पाहतां स्वरुपखाणी । कीं कामचि सांडावा ओवाळुनि ।
कीं उर्वशीच्या पंक्ती आणुनी । दासी मिरवती तिला त्या ॥ ८९ ॥

गजगामिनी चपला अवळा । तेजें लाजविती पाहूनि चपळा । शृंगारभरित असती सकळा । चंद्र रात्री नक्षत्री ॥ ९० ॥
Shree Navanath Bhaktisar Adhyay 13 
श्रीनवनाथभक्तिसार अध्याय तेरावा ( १३ )


Custom Search
Post a Comment