Sunday, September 10, 2017

Samas Aathatva Shravan Nirupan समास आठवा श्रवणनिरुपण


Dashak Satava Samas Aathatva Shravan Nirupan
Samas Aathatva Shravan Nirupan, It is in Marathi. In this Samas Samarth Ramdas is telling us the importance of Shravan (listening of spiritual advice).
समास आठवा श्रवणनिरुपण 
श्रीराम ॥
ऐका परमार्थाचें साधन । जेणें होये समाधान । 
तें तूं जाण गा श्रवण । निश्र्चयेंसी ॥ १ ॥
१) ज्या साधनाच्या योगानें समाधान होते, असे परमार्थाचे साधन म्हणजे श्रवण होय. श्रवण हे असे साधन आहे, हें नक्कीच. 
श्रवणें आतुडे भक्ती । श्रवणें उद्भवें विरक्ती ।
श्रवणें तुटे आसक्ती । विषयांची ॥ २ ॥
२) श्रवणाने भक्ति स्वाधीन होते. विरक्ति उत्पन्न होऊन दृश्याची आसक्ति सुटते.
श्रवणें घडे चित्तशुद्धी । श्रवणें होये दृढबुद्धी । 
श्रवणें तुटे उपाधी । अभिमानाची ॥ ३ ॥
३) श्रवणाानें चित्त शुद्ध होते. बुद्धी स्थिर होते. आणि अभिमानाची उपाधी नाहींशी होते.
श्रवणें निश्र्चयो घडे । श्रवणें ममता मोडे ।
श्रवणें अंतरी जडे । समाधान ॥ ४ ॥
४) श्रवणानें मन निश्र्चयी होते. देहाची व इतर दृश्याची ममता नाहीशी होते. मनाला समाधान मिळूं लागते. 
श्रवणें आशंका फिटे । श्रवणें संशय तुटे ।
श्रवण होतां पालटे । पूर्वगुण आपुला ॥ ५ ॥
५) श्रवणानें संशय, शंका फिटतात. आपल्या अंतरंगांतील दोष जाऊन स्वभावामध्यें बदल घडून येतो.
श्रवणें आवरे मन । श्रवणें घडें समाधान ।
श्रवणें तुटें बंधन । देहबुद्धीचें ॥ ६ ॥
६) श्रवणानें मनावर ताबा मिळूं लागून त्याला समाधान मिळते. देहबुद्धीचें बंधन नाहींसे होते. 
श्रवणें मीपण जाये । श्रवणें धोका न ये ।
श्रवणें नाना अपायें । भस्म होती ॥ ७ ॥
७) श्रवणानें मीपणा जातो. अनेक धोके टळतात. अनेक प्रकारची संकटें नाहींशी होतात. 
श्रवणें होये कार्यसिद्धी । श्रवणें लागे समाधी ।
श्रवणें घडे सर्व सिद्धी । समाधानाची ॥ ८ ॥
८) श्रवणानें कार्य पूर्ण होते. समाधि साध्य होते. संपूर्ण समाधान मिळण्यासाठीं पूर्व तयारी सिद्ध होते. 
सत्संगावरी श्रवण । तेणें कळे निरुपण ।
श्रवणें होईजे आपण । तदाकार ॥ ९ ॥
९) सत्संगामध्यें राहून श्रवण केलें असतां आत्मानात्मविवेक कळूं लागतो. श्रवणानें आपलें मन तफाकार होऊन जाते. 
श्रवणें प्रबोध वाढे । श्रवणें प्रज्ञा चढे ।
श्रवणें विषयांचे वोढे । तुटोन जाती ॥ १० ॥
१०) श्रवणानें आपलें ज्ञान वाढतें. प्रज्ञेचा उत्कर्ष होतो. इंद्रियसुखाची ओढ कमी होते.
श्रवणें विचार कळे । श्रवणें ज्ञान हें प्रबळें ।
श्रवणें वस्तु निवळे । साधकासी ॥ ११ ॥
११) श्रवणानें ब्रह्मविचार कळूं लागतो. ज्ञान वाढते. आणि साधकाला आत्मवस्तू अनुभवाला येऊं लागते. 
श्रवणें सद्बुद्धि लागे । श्रवणें विवेक जागें ।
श्रवणें मन हें मागे । भगवंतासी ॥ १२ ॥
१२) श्रवणानें भगवंताच्या अस्तित्वाबद्दल निश्र्चित बुद्धि प्राप्त होते. सारासार विचार जागतो. आणि मला भगवंत हवा अशी मनाला तळमळ लागते.
श्रवणें कुसंग तुटे । श्रवणें काम वोहटे ।
श्रवणें धोका आटे । येकसरां ॥ १३ ॥
१३) श्रवणानें वाईट संगत सुटते. वासना कमी होते. आणि आयुष्यांतील धोके कमी होतात. 
श्रवणें मोह नासे । श्रवणें स्फूर्ति प्रकाशे ।
श्रवणें सद्वस्तु भासे । निश्र्चयात्मक ॥ १४ ॥
१४) श्रवणानें मोहाचा नाश होतो. प्रतिभा जागी होते. आणि आत्मवस्तोोचा निश्र्चयात्मक अनुभव येतो.  
श्रवणें होये उत्तम गती । श्रवणें आतुडें शांती ।
श्रवणें पाविजे निवृत्ती । अचळ पद ॥ १५ ॥
१५) श्रवणानें उत्तम गती मिळते. मनाला शांती मिळते. आणि कधीहीं न ढळणारे असे वृत्तिरहित पद हस्तगत होते. 
श्रवणा ऐसें सार नाहीं । श्रवणें घडे सर्व कांहीं ।
भवनदीचा प्रवाहीं । तरणोपाव श्रवणें ॥१६ ॥
१६) श्रवणासारखी सारभूत दुसरी गोष्ट नाही. श्रवणानें सगळें कांहीं घडते. नदीरुपी संसारांतून पार पाडण्यास श्रवणच कामीं येते. 
श्रवण भजनाचा आरंभ । श्रवण सर्वीं सर्वारंभ ।
श्रवणें होये स्वयंभ । सर्व कांहीं ॥ १७ ॥
१७) भगवंताच्या भक्तीचा आरंभ श्रवणांतच होतो. जगांमधील सर्वच गोष्टींचा आरंभ श्रवणांतच होत असतो. श्रवणानें सर्व कांहीं स्वाभाविक घडत जाते.  
प्रवृत्ती अथवा निवृत्ती । श्रवणेंविण न घडे प्राप्ती ।
हें तों सकळांस प्रचिती । प्रत्यक्ष आहे ॥ १८ ॥
१८) प्रवृत्ती किंवा प्रपंच असो, कीं निवृत्ती किंवा परमार्थ असो, दोन्हींकडे श्रवणाशिवाय सफलता नाही. असाच सगळ्यांचा प्रत्यक्ष अनुभव आहे.   
ऐकिल्याविण कळेना । हें ठाउकें आहे जना ।
याकारणें मूळ प्रेत्ना । श्रवण आधीं ॥ १९ ॥
१९) कोणाकडून तरी ऐकल्याविना आपल्याला कळत नाही, हें सर्वांनाच माहित आहे. या कारणानें कोणत्याही प्रयत्नाचें मूळ श्रवणांतच असते. 
जें जन्मीं ऐकिलें चि नाहीं । तेथें पडिजे संदेहीं ।
म्हणोनियां दुजे कांहीं । साम्यता न घडे ॥ २० ॥
२०) जी गोष्ट आपण जन्मांत कधींच ऐकली नाही, तिच्याबद्दल संशय निर्माण होत असतो. म्हणून श्रवणाबरोबर दुसर्‍या कोणत्याही ज्ञानसाधनाची तुलना करता येत नाही.    
बहुत साधनें पाहातां । श्रवणास न घडे साम्यता ।
श्रवणेंविण तत्वता । कार्य न चले ॥ २१ ॥
२१) पुष्कळ साधनें पाहिली पण श्रवणाची बरोबरी करणारें साधन आढळत नाही. खरोखरच श्रवणावाचून कोणतेंही कार्य होऊं शकत नाही.  
न देखतां दिनकर । पडे अवघा अंधकार ।
श्रवणेंविण प्रकार । तैसा होये ॥ २२ ॥   
२२) सूर्य उगवला नाहीं तर सगळीकडें अंधरच अंधार पसरतो. त्याचप्रमाणें श्रवणावाचून जीवनांत अज्ञानाचा अंधारच पसरतो.      
कैसी नवविधा भक्ती । कैसी चतुर्विधा मुक्ती ।
कैसी आहे सहजस्थिती । हें श्रवणेंविण न कळे ॥ २३ ॥
२३) नऊ प्रकारची भक्ति कशी आहे? चार प्रकारच्या मुक्ति कशा, सहजस्थिती कशी असते. हे सर्व श्रवणांवाचून कळणार नाही.
न कळे शडकर्माचरण । न कळे कैसें पुरश्र्चरण ।
न कळे कैसे उपासन । विधियुक्त ॥ २४ ॥
२४) अध्ययन, अध्यापन, यजन, याजन, दान व प्रतिग्रह या सहा प्रकारच्या कर्मामचे आचरण कसें करावें, पुरश्र्चरण कसें करायचे, सर्व विधीनेंयुक्त अशी सगुण उपासना कशी करावी हें श्रवणानें समजते.  
नाना व्रतें नाना दानें । नाना तपें नाना साधनें ।
नाना योग तीर्थाटणें । श्रवणेंविण न कळती ॥ २५ ॥
२५) नाना प्रकारची व्रतें, तपें, दानें, तपें, साधनें, योग, व तीर्थाटणें या गोष्टीं श्रवणावाचून कळत नाहीत. 
नाना विद्या पिंडज्ञान । नाना तत्वांचें शोधन ।
नाना कळा ब्रह्मज्ञान । श्रवणेंविण न कळे ॥ २६ ॥
२६) नाना प्रकारच्या विद्या, मानवी शरीराचें ज्ञान, अनेक तत्वांचे ज्ञान, अनेक प्रकारच्या कला आणि ब्रह्मज्ञानही श्रवणावाचून कळत नाही.  
आठराभार वनस्पती । येका जळें प्रबळती ।
येका रसें उत्पत्ती । सकळ जीवांची ॥ २७ ॥
२७) सर्व प्रकारच्या वनस्पती एका पाण्यानें वाढतात. सर्व जिवंत प्राणी एका रसापासून उत्पन्न होतात.
सकळ जीवा एक पृथ्वी । सकळ जीवां एक रवी ।
सकळ जीवां वर्तवी । येक वायो ॥ २८ ॥
२८) सर्व जीव एकाच पृथ्वीवर जगतात. सर्वांना एकच सूर्य प्रकाश देतो. सर्व जीवांना एकच वायु जिवंत ठेवून त्यांच्याकडून हालचाली करुन घेतो. 
सकळ जीवां येक पैस । जयास बोलिजे आकाश ।
सकळ जीवांचा वास । येका परब्रह्मीं ॥ २९ ॥
२९) ज्याला आकाश म्हणतात अशी विशाळ पोकळी ती सगळ्या जीवांना एकच आहे. सगळ्या जीवांचे परब्रह्म हें एकच वसतिस्थान आहे.  
तैसे सकळ जीवांस मिळोन । सार येकचि साधन । 
तें हें जाण श्रवण । प्राणीमात्रांसी ॥ ३० ॥
३०) त्याचप्रमाणें सगळ्या जीवांना मुख्य सारभूत असें एकच साधन म्हणजें श्रवणच आहे. 
नाना देश भाषा मतें । भूमंडळीं असंख्यातें ।
सर्वांस श्रवणापरतें । साधन चि नाहीं ॥ ३१ ॥
३१) या पृथ्वीवर पुष्कळ देश, पुष्कळ भाषा आहेत. पण यासर्वांना श्रवणाशिवाय दुसरें साधन नाही. 
श्रवणें घडे उपरती । बद्धाचे मुमुक्ष होती ।
मुमुक्षाचे साधक अती । नेमेंसि चालती ॥ ३२ ॥   
३२) श्रवणानें वैराग्याची चिन्हें उत्पन्न होतात, त्यामुळें जे बद्ध असतात तें मुमुक्षु बनतात. ते साधक बनून नियमीत साधना करतात.    
साधकाचे होती सिद्ध । आंगीं बाणतां प्रबोध ।
हें तों आहे प्रसिद्ध । सकळांस ठाउकें ॥ ३३ ॥
३३) श्रवणानें वरील प्रकारचे साधक सिद्ध बनतात. त्यांच्या अंगीं आत्मज्ञान बाणतें. श्रवणाचा एवढा परिणाम होतो हें प्रसिद्ध आहे. व ते सर्वांना माहित आहे.  
ठाईंच खळ चांडाळ । तेचि होती पुण्यसिळ ।
ऐसा गुण तत्काळ । श्रवणाचा ॥ ३४ ॥
३४) स्वभावतःच जें दुष्ट असतात ते श्रवणाने पुण्यशील बनतात.श्रवणाचा तत्काल अनुभवास येणारा हा गुण आहे.    
जो दुर्बुद्धि दुरात्मा । तोचि होये पुण्यात्मा ।
अगाध श्रवणाचा महिमा । बोलिला न वचे ॥ ३५ ॥
३५) जो दुष्टबुद्धीचा दुष्टात्मा असतो तो श्रवणानें पुण्यात्मा बनतो. श्रवणाचा हा अगाध महिमा शब्दांनी सांगण्या पलीकडचा आहे.
तीर्था व्रतांची फळश्रुती । पुढें होणार सांगती ।
तैसे नव्हे हातीचा हातीं । सप्रचित श्रवण ॥ ३६ ॥
३६) तीर्थें, व्रतें यांचे फळ पुढें केव्हांतरी मिळतें असें सांगतात. श्रवणाचे असेम नाही. त्याचे फळ हातोहात अनुभवास येते. 
नाना रोग नाना व्याधी । तत्काळ तोडिजे औषधी ।
तैसी आहे श्रवणसिद्धी । अनुभवी जाणती ॥ ३७ ॥
३७) नाना प्रकारचे रोग, नाना प्रकारच्या व्याधी उत्तम औषधानें ताबडतोब बर्‍या होतात. त्याचप्रमाणें श्रवणानेम देहबुद्धी तत्काळ मरते. असे अनुभवी लोक सांगतात. 
श्रवणाचा विचार कळे । तरीच भाग्यश्री प्रगटे बळें ।
मुख्य परमात्माच आकळे । स्वानुभवासी ॥ ३८ ॥
३८) श्रवणाचें महत्व जर कळलें तर जबरदस्तीनें भाग्य उदयास येते. आणि परमात्मस्वरुपाचा आत्मसाक्षात्कार होतो.
या नाव जाणावें मनन । अर्थालागीं सावधान ।
निजध्यानें समाधान । होत असे ॥ ३९ ॥
३९) आपण जें श्रवण करतों त्याच्या अर्थाकडे लक्ष देणें म्हणजे मनन होय. या अर्थावर मन एकाग्र झालें कीं निदिध्यासन साधतें. निदिध्यासनानें साक्षात्कार होऊन समाधान मिळते. 
बोलिल्याचा अर्थ कळे । तरीच समाधान निवळे ।
अकस्मात अंतरीं वोळे । निःसंदेहता  ॥ ४० ॥
४०) संत जें बोलतात तें ऐकून त्याचा अर्थ जर बरोबर समजला तर मनाला समाधान मिळते. आपल्या अंतर्यामी असणारे संदेह ताबडतोप नाहींसे होतात व मन निःसंदेह होऊन जाते.  
संदेह जन्माचें मूळ । तें श्रवणें होये निर्मूळ ।
पुढें सहजचि प्रांजळ । समाधान ॥ ४१ ॥
४१) स्वस्वरुपाविषयीं संदेह हेंच जन्माचे मूळ असते. श्रवणानें तें निर्मूळ होते. मन निःसंदेह बनलें की स्वच्छ समाधान अनुभवास येते. 
जेथें नाहीं श्रवण मनन । तेथें कैंचे समाधान ।
मुक्तपणाचें बंधन । जडलें पाईं ॥ ४२ ॥
४२) जेथें श्रवण व मनन नाहीं तेथें समादहान कसें मिळेल ? मुक्तपणाच्या भावनेचे बंधनच तेथें जडलेले आढळेल. 
मुमुक्ष साधक अथवा सिद्ध । श्रवणेंविण तो अबद्ध ।
श्रवणमननें शुद्ध । चित्तवृत्ति होये ॥ ४३ ॥
४३)  मुमुक्षु, साधक किंवा सिद्ध कोणीही असो त्यानें नित्य श्रवण केलें नाही तर तो मूढ समजावा. श्रवणमननानें चित्तवृत्ती शुद्ध होते.   
जेथें नाहीं नित्य श्रवण । तें जाणावें विलक्षण ।
तेथें साधकें येक क्षण । क्रमूं नये सर्वथा ॥ ४४ ॥
४४) ज्या परमार्थस्थानामध्यें नित्य नियमाचे श्रवण नाहीं तें स्थान विलक्षण होय. अशा ठिकाणीं साधकानें क्षणभर देखील थांबू नये. 
जेथें नाहीं श्रवणस्वार्थ । तेथें कैंचा हो परमार्थ ।
मागें केलें तितुकें वेर्थ । श्रवणेंविण होये ॥ ४५ ॥
४५) ज्या ठिकाणीं श्रवणाचा स्वार्थ नाहीं. तेथें परमार्थाचे अस्तित्व सापडणार नाही. नित्य श्रवण ठेवले नाहीं तर आतांपर्यंत केलेलें साधन वाया जातें. 
तस्मात् श्रवण करावें । साधन मनीं धरावें ।
नित्यनेमें तरावें । संसारसागरीं ॥ ४६ ॥
४६) नित्यनेमानें श्रवण करावें. मनापासून साधना करावी. अशा रीतीनें नित्यनेमाच्या बळावर संसारसागर तरुन जावा. 
सेविलेंच सेवावे अन्न । घेतलेंचि घ्यावें जीवन ।
तैसें श्रवणमनन । केलेंचि करावें ॥ ४७ ॥
४७) एकदाच जेवून भागत नाहीं, पुन्हा पुन्हा अन्न सेवन करावें लागते. तसेंच पाणी पिण्याचेही आहे. अगदी तसेंच पुन्हा पुन्हा श्रवण व मनन करणें आवश्यक असते.   
श्रवणाचा अनादर । आळसें करी जो नर ।
त्याचा होये अपहार । स्वहितविषईं ॥ ४८ ॥
४८) केवळ आळसानें जो कोणी श्रवणाची हेळसांड करील तो स्वहिताला, ात्मकल्याणाला म्हणजेच आत्मसाक्षात्काराला नक्कीच मुकतो.  
आळसाचें संरक्षण । परमार्थाची बुडवण ।
याकारणें श्रवण । केलेंचि पाहिजे ॥ ४९ ॥
४९) आळसानें श्रवण न करणें म्हणजे परमार्थ बुडवणें होय. यासाठीं प्रत्येकानें श्रवण केलेंच पाहिजे.  
आतां श्रवण कैसें करावें । कोण्या पंथास पाहावें ।
पुढिलें समासीं आघवें । सांगिकेल ॥ ५० ॥
५०) आतां श्रवण तरी कसें करावें, कोणतें ग्रंथ अभ्यासावेत, हें सगळें पुढल्या समासांत सांगेन.  
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे श्रवणनिरुपणनाम समास आठवा ॥
Samas Aathatva Shravan Nirupan
समास आठवा श्रवणनिरुपण 


Custom Search
Post a Comment