ShriShivaLilamrut Adhyay 9
ShriShivLilaMrut Adhyay 9 is in Marathi. It is from Skandha Purana, Brahmottar Khanda which is in Sanskrit. This Adhayay is very pious and tells us about yogi Vamdev and his God Shiva bhakti. Bhasma which is very important in shiv bhakti is told here. How it is to be applied on to the body and from where it is to be brought. Here a demon who toches Vamdev is converted from demon to a normal man.
ShriShivLilamrut Adhyay 9
श्रीशिवलीलामृत अध्याय नववा
श्रीशिवलीलामृत अध्याय नववा
श्रीशिवलीलामृत अध्याय नववा
Custom Search
श्रीशिवलीलामृत अध्याय नववा
श्रीगणेशायनमः ॥
जेथें शिवनामघोष निरंतर । तेथें कैंचे जन्ममरणसंसार ।
तिहीं कळिकाळ जिंकिला समग्र । शिवशिवछंदें करुनियां ॥ १ ॥
पाप जळावया निश्र्चिती । शिवनामीं आहे ज्याची आसक्ती ।
त्यासी नाहीं पुनरावृत्ती । तो केवळ शिवरुप ॥ २ ॥
जैसें प्राणियांचें चित्त । विषयीं गुंतलें अत्यंत ।
तैसें शिवनामीं होतां रत । तरी बंधन कैंचे तया ॥ ३ ॥
धनइच्छा धरुनि चित्तीं । धनाढ्याची करिती स्तुती ।
तैसें शिवनामीं प्रवर्तती । तरी जन्ममरण कैंचे तयां ॥ ४ ॥
राजभांडारींचे धन । साधावया करिती यत्न ।
तैसें शिवचरणीं जडलें मन । तरी संकट विघ्न कैंचे तयां ॥ ५ ॥
धन्य ते शिवध्यानीं रत । येचिविषयीं कथा अद्भुत ।
नैमिषारण्यीं सांगत । सूत शौनकादिकांप्रती ॥ ६ ॥
वामदेव नामें महाज्ञानी । शिवध्यानीं रत विचरे काननीं ।
एकाकी निर्माय शांत दांत जनीं । त्रिविधभेदरहित जो ॥ ७ ॥
दिशा जयाचें अंबर । भसमचर्चित दिगंबर ।
निराहार निरंतर । एकलाचि हिंडतसे ॥ ८ ॥
काय करावें कोठें जावें । काय घेवोनि काय त्यजावें ।
विश्र्व शिवमय आघवें । खेद मोह भेद नाहीं ॥ ९ ॥
अक्रोध वैराग्य इंद्रियदमन । क्षमा दया कृपा समान ।
निर्लोभ दाता भय शोक मान । काळत्रयीं न धरीच ॥ १० ॥
गृहापत्यदारावर्जित । कोणी एक परिग्रह नाहीं सत्य ।
कायावाचामनोदंडयुक्त । मौनी न बोले इतरांसी ॥ ११ ॥
ज्ञानचर्चा शिवस्मरण । त्याविण नेणेचि भाषण ।
या नांव बोलिजे मौन । भेदाभेदरहित जो ॥ १२ ॥
सर्वांच्या अनुग्रहास्तव । ते रुप धरोनि विचरे शिव ।
जडजीव तारावया सर्व । विचरें सृष्टीं स्चइच्छें ॥ १३ ॥
कार्याकार्य सारुनि कारण । आत्मस्वरुपीं पावला समाधान ।
देहत्रयरहित विधिनिषेधहीन । प्रवृत्तिनिवृत्तिवेगळा ॥ १४ ॥
निरंकुश जो निःसंग । जैसा ब्रह्मारण्यीं विचरे मातंग ।
तयाची रीती अभंग । वेदशास्त्रें वर्णिती ॥ १५ ॥
तो स्वरुपीं सदा समादहिस्थ । गगन तेही अंगासी रुतत ।
म्हणूनि तेंही परतें सारीत । हेतुदृष्टांतवर्जित जो ॥ १६ ॥
तेणें तेजाचें दाहकत्व जाळिलें । उर्वीचे कठिणत्व मोडिलें ।
चंचलत्व हिरोनि घेतलें । प्रभंजनाचें तेणें पैं ॥ १७ ॥
आर्द्रत्व निरसोन । धुवोनि शुद्ध केलें जीवन ।
एवं पिंड ब्रह्मांड जाळून । भस्म अंगीं चर्चिलें ॥ १८ ॥
ऐसा तो अमृतामूर्त । केवळ शुक्र कीं जडभरत ।
कौंचारण्यीं विचरत । सर्वही देखत शिवरुप ॥ १९ ॥
तों एक ब्रह्मराक्षस धांवत । महाभयानक शरीर अद्भुत ।
कपाळीं शेंदूर जिव्हा लळलळीत । भयानक मुखाबाहेरी ॥ २० ॥
खदिरांगार तैसे नेत्र । बहुत जीव भक्षिले अपरिमित ।
क्षुधित तृषित पापी कुपात्र । अकस्मात पातला ॥ २१ ॥
महाहिंसक सर्वभक्षक । तेणें वामदेव देखिला पुण्यश्र्लोक ।
धांवोनियां एकएक । कंठीं घालीत मिठी त्याच्या ॥ २२ ॥
लोह परिसासीं झगटतां पूर्ण । तत्काळ होय दिव्य सुवर्ण ।
तेवीं त्याच्या अंगस्पर्शेंकरुन । मति पालटली तयाची ॥ २३ ॥
वामदेवांगींचें भस्म । त्याच्या अंगीं लागलें उत्तम ।
सत्ववृत्ति झाली परम । असुरभाव पालटला ॥ २४ ॥
आपुल्या अंगीं झगटोन । उद्धरिला पिशिताशन ।
हें त्यासी नाहींच भान । समाधिस्थ सर्वदा ॥ २५ ॥
नेणें सुखदुःख शीतोष्ण । लोक निंदिती कीं वंदिती पूर्ण ।
शरीरीं भोग कीं रोग दारुण । हेंही नेणे कदा तो ॥ २६ ॥
मी हिंडतों देशीं कीं विदेशीं । हेंही स्मरण नाहीं त्यासी ।
तो ब्रह्मानंद सौख्यराशी । विधिनिषेधीं स्पर्शेना ॥ २७ ॥
ऐसा तो योगींद्र निःसीम । त्याच्या अंगस्पर्शें पापें झाली भस्म ।
दिव्यरुप होवोनि सप्रेम । चरणीं लागला तयाच्या ॥ २८ ॥
सहस्र जन्मींचें झालें ज्ञान । त्यासी आठव झाला संपूर्ण ।
मानससरोवरी उदकपान । करितां काक हंस होय ॥ २९ ॥
कीं हाटकनदीतीरीं देख । पडतां पाषाण काष्ठादिक ।
दिव्य कार्तस्वर होय सुरेख । तेवीं राक्षस पैं झाला ॥ ३० ॥
कीं करिताण सुधारसपान । तेथें सहजचि आलें देवपण ।
कीं शशिकिरणस्पर्शेकरुन । द्रवे जैसा चंद्रकांत ॥ ३१ ॥
कीं रवि उगवतां निःशेष । निशा सरे प्रगटे प्रकाश ।
तैसा उद्धरला राक्षस । स्तवन करी तयाचें ॥ ३२ ॥
म्हणे गुरुवर्या ऐक पूर्ण । मी तव दर्शनें झालों पावन ।
तिजसीं करितां संभाषण । वाटतें पावेन शिवपदा ॥ ३३ ॥
मज सहस्रजन्मींचें झालें ज्ञान । परी पंचवीस जन्मांपासून ।
पापें घडलीं जी दारुण । तीं अनुक्रमें सांगतों ॥ ३४ ॥
पूर्वीं मी राजा दुर्जय । यौवनमदें अति निर्दय ।
परम दुराचारी होय । ब्राह्मण प्रजा पीडीत ॥ ३५ ॥
प्रजेसी नित्य करी मार । आवडे तैसा विचारें स्वेच्छार ।
वेद पुराण शास्त्र । कैसें आहे मी नेणें ॥ ३६ ॥
स्वप्नींही नेणें कदा धर्म । ब्रह्महत्यादि पापें केलीं परम ।
नारी अपूर्व आणूनि उत्तम । नित्य नूतन भोगीं मी ॥ ३७ ॥
ऐशा स्रिया असंख्य भोगून । बंदीं घालूनि केलें रक्षण ।
सर्व देश धुंडोन । स्रिया नूतन आणवीं ॥ ३८ ॥
एकदां भोग देऊन । दुसर्यानें तिचें न पाहावें वदन ।
त्या बंदीं रडती आक्रंदून । शाप देती मजलागीं ॥ ३९ ॥
विप्र पळाले राज्यांतून । पट्टणें ग्रामें खेटकें जाण ।
इतुकींही धुंडोन । स्रिया धरुन आणिल्या ॥ ४० ॥
भोगिल्या तीन शतें द्विजनारी । चार शतें क्षत्रियकुमारी ।
वैश्यस्रिया सुंदरी । दहा शतें भोगिल्या ॥ ४१ ॥
शूद्रांच्या सहस्र ललना । चांडालनारी चार शतें जाणा ।
त्यावरी अपवित्र मांगकन्या । सहस्र एक भोगिल्या ॥ ४२ ॥
चर्मककन्या पांच शत । रजकांच्या चार शतें गणित ।
वारांगना असंख्यात । मिती नाहीं तयांतें ॥ ४३ ॥
पांच शतें महारिणी । तितुक्याच वृषाली नितंबिनी ।
यावेगळ्या कोण गणी । इतर वर्ण अष्टादश ॥ ४४ ॥
इतुक्या कामिनी भोगून । तृप्त नव्हे कदा मन ।
नित्य करीं मद्यपान । अभक्ष्य तितुकें भक्षिलें ॥ ४५ ॥
ऐसें भोगितां पापभोग । मज लागला क्षयरोग ।
मृत्यु पावलों सवेग । कृतांतदूत धरोनि नेती ॥ ४६ ॥
यमपुरीचें दुःख अपार । भोगिलें म्यां अति दुस्तर ।
तप्तताम्रभूमी तीवर । मजलागीं चालविलें ॥ ४७ ॥
लोहस्तंभ तप्त करुन । त्यासी नेऊनि देवविती आलिंगन ।
माझें घोर कर्म जाणून । असिपात्रवनीं हिंडविती ॥ ४८ ॥
कढईंत तेल झालें तप्त । त्यांत नेऊनि बुडवीत ।
तोंडीं घालितीं नरक मूत । पाप बहुत जाणोनी ॥ ४९ ॥
महाक्षार कटुरस आणोनी । मुखीं घालिती पासलें पाडोनी ।
तीक्ष्ण चंचूचे गृध येवोनी । नेत्र फोडिती एकसरें ॥ ५० ॥
कुंभीपात्रीं घालोनि शिजविती । कर्णीं तप्त लोहदंड दडपिती ।
अहा तेथींची जाचणी किती । सांगों आतां गुरुवर्या ॥ ५१ ॥
तेथें रक्तकुंड रेतकुंड दारुण । त्यांत पचविती कित्येक दिन ।
मांस तोडिती सांडसेंकरुन । वरी शिंपिती क्षारोदक ॥ ५२ ॥
जिव्हा नासिक आणि कर्ण । तीक्ष्ण शस्त्रें टाकिती छेदून ।
हस्त पाद खंडून । पोट फोडिती क्रूर शस्त्रें ॥ ५३ ॥
अंगाचा काढिती भाता । तप्त शस्त्रें रोविती माथां ।
शिश्र्न छेदून गुदद्वारीं अवचित । तप्त अर्गळा घालिती ॥ ५४ ॥
सर्वांगासी टिपर्या लावून । सवेंचि करिती पाशबंधन ।
पृष्ठीकडे वांकवून । चरणीं ग्रीवा बांधिती ॥ ५५ ॥
बोटीं बोटीं सुया रोंवून । पाषाणें वृषण करिती चूर्ण ।
हस्तपायीं आणून । पाषाणबेडी घालिती ॥ ५६ ॥
सहस्र वर्षें न लगे अंत । ऐशिया नरकीं बुडवीत ।
एक येवोनि पाडिती दांत । पाश घालिती ग्रीवेसी ॥ ५७ ॥
आपली विष्ठामूत्र । बळेंच भक्षविती यमदूत ।
सवेंचि अंगाचे तुकडे पाडीत । दोष अमित जाणोनी ॥ ५८ ॥
श्यामशबलश्र्वान लावून । चरचरां टाकिती फाडून ।
एक शिरास्थि काढिती ओढून । एक मांस उकरिती ॥ ५९ ॥
लोहार्गळा उष्ण तीव्र । पृष्ठीं हृदयीं करिती मार ।
उखळी घालोनि सत्वर । लोहतप्तमुसळें चेंचिती ॥ ६० ॥
तीक्ष्ण औषधींचे रस आणिती । नासिकद्वारें आंत ओतिती ।
सवेंचि वृश्र्चिककूपीं टाकिती । बहुत विपत्ती भोगिल्या ॥ ६१ ॥
ज्यांचें विष परम दुर्धर । ऐसें अंगासी डसविती विखार ।
अग्निशिखा लावोनि सत्वर । हें शरीर भाजिलें ॥ ६२ ॥
अंतरिक्ष असिधारे बैसवून । पायीं बांधिती जड पाषाण ।
सवेंचि पर्वतावरी नेऊन । ढकलूनि देती निर्दयपणें ॥ ६३ ॥
आंतडी काढून निश्र्चितीं । ज्याचीं त्याजकडोन भक्षविती ।
ऊर्ध्व नेवोनि टांगती । आपटिती क्रोधभरें ॥ ६४ ॥
लोहकंटकी उभें करुन । करिती इंगळांचें आंथरुण ।
मस्तकीं घालूनियां पाषाण । फोडोनि टाकिती मस्तक ॥ ६५ ॥
लौहचणक करुनि तप्त । खा खा म्हणोनि दूत मारीत ।
ओष्ठ धरोनि फाडीत । तप्त सळ्या नाकीं खोंविती ॥ ६६ ॥
उफराटें टांगून । ग्रीवेसी बांधोनि थोर पाषाण ।
रीसव्याघ्रादिक आणोन । विदारिती त्यांहातीं ॥ ६७ ॥
गजपदाखालीं चूर्ण । करविती तप्तनीरप्राशन ।
अष्टांगें कर्वतून । वेगळालीं टाकिती ॥ ६८ ॥
भयानक भूतें भेडसाविती । लिंग छेदूनि खा म्हणती ।
सांधे ठायीं ठायीं मोडिती । तीक्ष्ण शस्त्रेंकरुनियां ॥ ६९ ॥
भूमींत रोवोनियां शरीर । करिती बहुत शरमार ।
सवेंचि शूळ परम तीव्र । त्यावरी पालथें घालिती ॥ ७० ॥
वरी मारिती मूसळघायें । मग पाषाण बांधोनि लवलाहें ।
नरकवापींत टाकिती पाहें । अंत न लागे उतरतां ॥ ७१ ॥
काच शिसें यांचा रस करुन । बळेंचि करविती प्राशन ।
तेथें जात नाहीं कदा प्राण । यातना दारुण भोगितां ॥ ७२ ॥
ऐशा तीन सहस्र वर्षेंपर्यंत । नरकयातना भोगिल्या बहुत ।
त्यावरी मज ढकलोनि देत । व्याघ्रजन्म पावलों ॥ ७३ ॥
दुसरें जन्मीं झालों अजगर । तिसरें जन्मीं वृक भयंकर ।
चौथे जन्मीं सूकर । सरडा झालों पांचवा ॥ ७४ ॥
सहावे जन्मी सारमेय सबळ । सातवे जन्मीं श्रृगाल ।
आठव्यानें गवय विशाळ । गुरुवर्या मी झालों ॥ ७५ ॥
नववे जन्मी मर्कट प्रसिद्ध । दहावे जन्मीं झालों गर्दभ निषिद्ध ।
त्यावरी नकुळ मग वायस विविध । तेरावें जन्मीं बक झालों ॥ ७६ ॥
चौदावे जन्मीं वनकुक्कुट । त्यावरी गीध झालों पापिष्ट ।
मग मार्जारयोनी दुष्ट । मंडूक त्यावरी जाण पां ॥ ७७ ॥
अठरावे जन्मीं झालो कूर्म । त्यावरी मत्स्य झालों दुर्गम ।
सवेंचि पावलों मूषकजन्म । उलूक त्यावरी झालों मी ॥ ७८ ॥
बाविसावे जन्मीं वनद्विरद । त्यावरी उष्ट्रजन्म प्रसिद्ध ।
मग दुरात्मा निषाद । आतां राक्षस जन्मलों ॥ ७९ ॥
सहस्रजन्मींचें ज्ञान । झालें स्वामी पूर्ण ।
तव दर्शनाच्या प्रतापेंकरुन । पावन झालों स्वामिया ॥ ८० ॥
गंगास्नानें जळे पाप । अत्रिनंदन हरी ताप ।
सुरतरु दैन्य अमूप । हरीत दर्शनेंकरुनियां ॥ ८१ ॥
पाप ताप आणि दैन्य । संतसमागमें जाय जळून ।
यावरी वामदेव योगींद्र वचन । बोलता झाला तेधवां ॥ ८२ ॥
एक विप्र होता महा अमंगळ । शुद्र स्रियेसीं रतला बहुत काळ ।
तिच्या भ्रतारें साधूनि वेळ । जीवें मारिलें द्विजातें ॥ ८३ ॥
ग्रामाबाहेर टाकिलें प्रेत । कोणी संस्कार न करीत ।
तों यमदूतीं नेला मारीत । जाच बहुत भोगीतसे ॥ ८४ ॥
इकडे शिवसदन उत्तम । त्यापुढें पडिलें असे भस्म ।
महाशिवरात्रिदिवशीं सप्रेम । भक्त पूजना बैसले ॥ ८५ ॥
त्या भस्मांत श्र्वान सवेग । येऊनि बैसलें पाहे शिवलिंग ।
भस्मचर्चित त्याचे अंग । जात मग त्वरेनें ॥ ८६ ॥
पडिलें होतें विप्रप्रेत । त्यावरी गेलें अकस्मात ।
कुणपास भस्म लागत । पापरहित झाला तो ॥ ८७ ॥
तो यमदूतीं नरकांतून काढिला । शिवदूतीं विमानीं वाहिला ।
कैलासासी जावोनि राहिला । संहारिला पापसमूह ॥ ८८ ॥
ऐसें हें पवित्र शिवभूषण । त्याचें न वर्णवे महिमान ।
राक्षस पुसे कर जोडून । भस्ममहिमा सांगा कैसा ॥ ८९ ॥
भस्म कोणतें उत्तम । शिवभक्तीं लावावें कैसा नेम ।
यावरी वामदेव उत्तम । चरित्र सांगे शिवाचें ॥ ९० ॥
मंदरगिरी परमपवित्र । उंच योजनें अकरा सहस्र ।
त्यावरी एकदां त्रिनेत्र । देवासहित पातला ॥ ९१ ॥
यक्षगण गंधर्व किन्नर । चारण पिशाच गुह्यक समग्र ।
देव उपदेव पवित्र । महेशा वेष्टुनि बैसले ॥ ९२ ॥
मरुद्गण पितृगण समस्त । एकादश रुद्र द्वादशादित्य ।
अष्ट वसु अष्ट भैरव सत्य । अष्ट दिक्पाळ पातले ॥ ९३ ॥
अठ्यायशीं सहस्र ऋषीश्र्वर । साठ सहस्र वालखिल्य ब्रह्मपुत्र ।
पाताळनाग पृथ्वीचे नृपवर । शंकरा वेष्टित बैसले ॥ ९४ ॥
विष्णु विधि पुरंदर । शिवध्यान पाहती समग्र ।
भूतांचे मेळे अपार । मंदराचळीं मिळाले ॥ ९५ ॥
सिंधुरवदन वीरभद्रकुमार । साठ कोटी गण समग्र ।
पुढें विराजे नंदिकेश्र्वर । दुसरा मांदार शुभ्र दिसे ॥ ९६ ॥
तेथें आले सनत्कुमार । साष्टांग करुनि नमस्कार ।
स्तवन करुनि अपार । विभूति धारणविधी पुसती ॥ ९७ ॥
यावरी बोले जाश्र्वनीळ । विभुति जाण तेचि निर्मळ ।
शुद्ध करुनि गोमयगोळ । मृत्तिकाकणविरहित ॥ ९८ ॥
ते वाळवूनि उत्तम । मग करावें त्यांचें भस्म ।
शुद्ध विभूति मग परम । शिवगायत्रीनें मंत्रिजे ॥ ९९ ॥
आधीं अंगुष्ठें लाविजे ऊर्ध्व । माग मस्तकाभोंवतें वेष्टिजे शुद्ध । तर्जनी न लाविजे निषिद्ध । कनिष्ठिका वेगळी करी ॥ १०० ॥
दो बोटांनीं लाविजे भाळीं । अंगुष्ठें मध्यरेखा तेजागळी ।
तैसें त्रिपुंड्रधारण चंद्रमौळी । सनत्कुमारा सांगत ॥ १०१ ॥
तर्जनी न लावितां सर्वांगीं विभूती । त्रिबोटी लाविजे निश्र्चितीं ।
येणें महत्पापें भस्म होतीं । शिवभूषणप्रसादें ॥ १०२ ॥
अगम्यागमन सुरापान । ब्रह्महत्या गोहत्या अभक्ष्यभक्षण ।
महत्पापांचे पर्वत जाण । भस्मचर्चनें भस्म होती ॥ १०३ ॥
ऐसा भस्माचा महिमा वामदेव । ब्रह्मराक्षसास सांगे सर्व ।
विमान आलें अपूर्व । दिव्यरुप असुर झाला ॥ १०४ ॥
कैलासाप्रति जाऊन । राहिला शिवरुप होऊन ।
वामदेव पृथ्वीपर्यटन । स्वेच्छें करीत चालिला ॥ १०५ ॥
सत्संगाचा महिमा थोर । वामदेवासंगें तरला असुर ।
भस्मलेपनें भाळनेत्र । सदा सुप्रसन्न भक्तांसी ॥ १०६ ॥
मंत्र तीर्थ द्विज देव । गुरु यज्ञ ज्योतिषी औषधी सर्व ।
येथें जैसा धरिला भाव । सिद्धि तैसी तयांसी ॥ १०७ ॥
पांचाळ देशीं नृपनाथ । नाम जयाचें सिंहकेत ।
जैसा शक्रनंदन कीं तृतीय सुत । पृथादेवीचा पुरुषार्थी ॥ १०८ ॥
मृगयेस गेला तो भूपाळ । मागें चालत धुरंधर दळ ।
शबरांचेही मेळ । बहुसाल निघती तयासवें ॥ १०९ ॥
वनोवनीं हिंडतां भूपाळक । शबर एक परम भाविक ।
भग्न शिवालय एक । गेला त्यांत निषाद तो ॥ ११० ॥
उन्मळोनि पडलें दिव्य लिंग । पंचसूत्री रमणीय अभंग ।
सिंहकेतरायातें सवेग । दाविता झाला तेधवां ॥ १११ ॥
राजा म्हणे लिंग चांगलें । परी पाहिजे भावें पूजिलें ।
उगेंचि देवार्चन मांडिलें । दंभेकरुनि लौकिकीं ॥ ११२ ॥
लौकिकीं मिरवावया थोरपण । प्रतिमा ठेविल्या सोज्जळ करुन ।
जेवीं कांसारें मांडिलें दुकान । प्रतिमाविक्रय करावया ॥ ११३ ॥
ब्राह्मणवेष घेवोनि शुद्ध । यात्रेंत हिंडती जैसे मैंद ।
कें मार्गघ्न वाटेंत साधुसिद्ध । वेष धरुनि बैसले ॥ ११४ ॥
कानेमी साधुवेष धरुन । वाटेंत बैसला करावया विघ्न ।
एवं भावेंविण देवतार्चन । व्यर्थ काय दांभिक ॥ ११५ ॥
शबरासी म्हणे नृपसत्तम । तुज हें लिंग सांपडलें उत्तम ।
निषाद म्हणे पूजनक्रम । कैसा आहे सांग पां ॥ ११६ ॥
विनोदें बोले नृपवर । पूजेचे आहेत बहुत प्रकार ।
परी चिताभस्म पवित्र । नित्य नूतन आणावें ॥ ११७ ॥
चिताभस्मविण । नैवेद्य करुं नये समर्पण ।
हेंचि मुख्य वर्म जाण । शैवलक्षण निष्ठेचें ॥ ११८ ॥
नृपवचन मानूनि यथार्थ । शबर लिंग घरा आणीत ।
शबरीस सांगे वृत्तांत । हर्षभरित ते झाली ॥ ११९ ॥
सुमुहूर्तें शिवलिंग स्थापून । दोघें पूजिती एकनिष्ठेंकरुन ।
चिताभस्म नित्य नूतन । आणिती मेळवून साक्षेपें ॥ १२० ॥
एकार्ती होतांचि सुंदरी । नैवेद्य आणीत झडकरी ।
उभयतां जोडल्या करीं । शिवस्तवनीं सादर ॥ १२१ ॥
ऐसें नित्य करितां पूजन । लोटले कित्येक दिन ।
त्यांची निष्ठा पहावया पूर्ण । केलें नवल पंचवदनें ॥ १२२ ॥
ऐसें एकदां घडोनि आलें । चिताभस्म कोठें न मिळें ।
शबरें बहुत शोधिलें । अपार क्रमिलें भूमंडळ ॥ १२३ ॥
परतोनि सदनासी येत । शबरीस सांगे वृत्तांत ।
तेही झाली चिंताक्रांत । म्हणे पूजन केवीं होय ॥ १२४ ॥
केलें शिवपूजन उत्तम । परी न मिळतां चिताभस्म ।
तो शबर भक्तराज परम । नैवेद्य शिवासी अर्पीना ॥ १२५ ॥
शिवदीक्षा परम कठिण । निष्ठा पाहे उमारमण ।
शबरी म्हणे प्रियालागून । मी आपुलें भस्म करितें आतां ॥ १२६ ॥
पाकसदनीं बैसोन । लावोनि घेतें आतां अग्न ।
तें चिताभस्म चर्चून । सांबपूजन करावें ॥ १२७ ॥
मग शुचिर्भूत होवोनी शबरी । शिवध्यान स्मरण करी ।
अग्नि लावोनी झडकरी । भस्म करी कलेवर ॥ १२८ ॥
शबर घेवोनि तें भस्म । चर्ची सदाशिवासी सप्रेम ।
परी नैवेद्य आणावया उत्तम । दुसरें कोणी नसेचि ॥ १२९ ॥
भोळा चक्रवर्ती उदार । तारावया धैर्य पाहे शंकर ।
आसन घालोनि शबर । परम सादर शिवार्चनी ॥ १३० ॥
शबरी उत्तम पाक करुन । नित्य येत नैवेद्य घेवोन ।
शबर एकार्ती करुन । पूर्वाभ्यासें बोलावीत ॥ १३१ ॥
एकार्ती होतांचि सदाशिवा । त्रुटी न वाजतां नैवेद्य दावावा ।
विलंब होतां महादेवा । क्षोभ अत्यंत पैं होय ॥ १३२ ॥
सर्व अन्याय क्षमा करी शंकर । परी नैवेद्यासी होतां उशीर ।
क्षोभोनि जातो श्रीशंकर । उशीर अणुमात्र सोसेना ॥ १३३ ॥
शबर आनंदमय शिवार्चनीं । स्रियेनें शरीर जाळले हे नाठवे मनीं ।
म्हणे ललने नैवेद्य आणीं । तव पाठीसीं उभी घेवोनियां ॥ १३४ ॥
रंभा उर्वशी मेनका सुंदरी । त्यांहूनि दिव्यरुप झाली शबरी ।
चतुर्विध नैवेद्य करी । देत पतीच्या तेधवां ॥ १३५ ॥
नैवेद्य अर्पूनि शबर । पूजा झाली षोडशोपचार ।
दोघें जोडोनियां कर । स्तवन करिती शिवाचें ॥ १३६ ॥
जय जय अनंतब्रह्मांडनायका । जय जय शिव मायाचक्रचालका ।
दुर्जनदमना मदनांतका । भवहारका भवानीपते ॥ १३७ ॥
पूजन झालें संपूर्ण । शबर पाहे स्री विलोकून ।
अलंकारमंडित सद्गुण । आपणही शिवरुप जाहला ॥ १३८ ॥
एक नीलकंठ वेगळा करुन । शिवभक्त शिवसमान ।
तंव आलें दिव्य विमान । वाद्यें अपार वाजती ॥ १३९ ॥
येत दिव्यसुमनांचें परिमळ । आश्र्चर्य करी सिंहकेतनृपाळ ।
विमानीं बैसवूनि तत्काळ । शिवपद पावलीं दोघेंही ॥ १४० ॥
राव म्हणे विनोदेंकरुन । म्यां सांगितलें चिताभस्मपूजन ।
परी धन्य शबराचें निर्वाण । उद्धारोनि गेला कैलासा ॥ १४१ ॥
धन्य ते शबरी कामिनी । देह समर्पिला शिवार्चनीं ।
एवं एकनिष्ठ देखिल्यावांचोनी । पिनाकपाणी प्रसन्न नव्हे ॥ १४२ ॥
सिंहकेतासी लागला तोचि छंद । सर्वदा शिवभजनाचा वेध ।
शिवलीलामृतग्रंथ प्रसिद्ध । श्रवण करी सर्वदा ॥ १४३ ॥
शिवरात्री प्रदोष सोमवार । व्रतें आचरे प्रीतीं नृपवर ।
शिवप्रीत्यर्थ उदार । धनें वाटी सत्पात्रीं ॥ १४४ ॥
ऐसें करितां शिवभजन । सिंहकेत शिवरुप होवोन ।
शिवपदीं राहिला जावोन । धन्य भजन निष्ठेचें ॥ १४५ ॥
शिवलीलामृतमंडपीं सुरवाडली । चढत जात श्रीधरवाग्वल्ली ।
अहळबहळ पसरली । ब्रह्मानंदेंकरुनियां ॥ १४६ ॥
ते छाया सघन अत्यंत । तेथें बैसोत शिवभक्त ।
प्रेमद्राक्षफळें पक्व बहुत । सदा सेवोत आदरें ॥ १४७ ॥
श्रीधरवरदा ब्रह्मानंदा । मृडानीहृदयाब्जमिलिंदा ।
कैवल्यपददायका अभेदा । लीला अगाध बोलवीं पुढें ॥ १४८ ॥
शिवलीलामृत ग्रंथ प्रचंड । स्कंदपुराण ब्रह्मोत्तरखंड ।
परिसोत सज्जन अखंड । नवमाध्याय गोड हा ॥ १४९ ॥
इति नवमोऽध्यायः ॥
॥ श्रीसांबसदाशिवार्पणमस्तु ॥
ShriShivLilamrut Adhyay 9
श्रीशिवलीलामृत अध्याय नववा
श्रीशिवलीलामृत अध्याय नववा
Custom Search