Friday, August 30, 2019

Kahani Gopadmanchi कहाणी गोपद्मांची


Kahani Gopadmanchi कहाणी गोपद्मांची 
It ia a Vrata many ladies perform in the month of Shrava.
कहाणी गोपद्मांची

ऐका गोपद्मांनो तुमची कहाणी. स्वर्गलोकी इंद्रसभा, चंद्रसभा, कौरवसभा, पांडवसभा इत्यादिक पांची सभा बसलेल्या आहेत. ताशे, मर्फे वाजत आहेत, उर्वशी, रंभा नाचत आहेत. तोच तंबोर्‍याच्या तारा तुटल्या, मृदुंगाच्या भेर्‍या फुटल्या. असं झाल्यावर सभेत हुकुम सुटला, करा रे हांकारा, पिटा रे डांगोरा, गांवात कोणी वाणवशावाचून असेल , त्याच्या पाठीचा तीन बोटं कंकर काढा, तंबोर्‍याला तार लावा, कीर्तन चालू करा. रंभा, उर्वशी नाचत्या करा. असा हुकूम झाल्यावर कृष्णदेव आपल्या मनात भ्याले. माझी बहीण सुभद्रा हिनं काही वाणवसा केला नसेल. तेव्हा ते उठले, तिच्याकडे जाऊन चौकशी केली. तिनं काही वाणवसा केला नाही. नंतर कृष्णांनी तिला वसा सांगितला. सुभद्रे सुभद्रे आखाड्या दशमीपासून तीसपिंपळाचे पारी, तळ्याचे पाळी व गाईच्या गोठ्यांत काढून पूजा करावी. हा वसा कार्तिक दशमीस पूर्ण करावा. याप्रमाणे पांच वर्षे करावे. उद्यापनाचेवेळी कुवारणीस जेवायला बोलवावे. पहिल्या वर्षी विडा द्यावा. दुसर्‍या वर्षी चुडा भरावा. तिसर्‍या वर्षी केळ्याचा फणा द्यावा. चौथ्या वर्षी उसाची मोळी द्यावी. पांचव्या वर्षी चोळी-परकर नेसवून आपल्या वशाच उद्यापन करावं. असं सांगून कृष्ण सभेत पूर्वीच्या ठिकाणी येऊन बसले. नंतर लगेचच सुभद्रेने कृष्णाने सांगितल्याप्रमाणे केलं. सभेंत बात उठली की, सुभद्रा वाणवशाशिवाय आहे, असे समजल्यावरुन दूत तिकडे जाऊन पाहतात तो सुभद्रेने वाणवसा वसलेला आहे. दूतांना परत येता येतां गावाबाहेर एक हत्तीण वाणवशाशिवाय त्यांना दिसली. ती दक्षिणेस पाय, उत्तरेस डोकं करुन निजलेली होती. तेव्हा तिच्या पाठीचा कंकर काढून नेला. नंतर तंबोर्‍याच्या तारा जोडल्या, मृदंगाच्या भेर्‍या वाजत्या केल्या, तशाच रंभा नाचत्या केल्या. जसें या योगाच्या व्रताने सुभद्रेवरचे संकट टळले तसं तुमचं आमचं टळो. ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण.          

Custom Search

Saturday, August 24, 2019

Kahani Jivatichi Shukrawarchi कहाणी जिवतीची शुक्रवारची


Kahani Jivatichi Shukrawarchi कहाणी जिवतीची शुक्रवारची 
This is the story of Jivatichi or Fridaychi.
कहाणी शुक्रवारची जिवतीची
ऐका शुक्रवारा, तुमची कहाणी. आटपात नगर होत. तिथ एक राजा राज्य करीत होता. त्याला मुलगा नव्हता. तेव्हां राणीने काय कराव? एका सुइणीला बोलावण धाडल. अगं अगं सुइणी, मला लाळवारीसुद्धा एक मुलगा गुपचुप आणुन दे. मी तुला पुष्कळ द्रव्य देईन. सुइणीने गोष्ट कबूल केली. ती तपास करु लागली. गावांत एक गरीब ब्राह्मण बाई रहात होती. ती ब्राह्मण बाई गर्भार होती. सुईेण तिच्या घरी गेली. बाई बाई तू गरीब आहेस. तुझं बाळंतपणाच पोट दुखु लागेल तेव्हा मला कळव. मी तुझं बाळंतपण फुकट करीन. तिनं होय म्हणून सांगितलं.
 नंतर ती सुईण राणीकडे आली  राणीसाहेब आपल्या नगरांत एका ब्राह्मणाची बायको गरोदर आहे. तिला नुकताच दुसरा महिना लागला आहे. लक्षणे सर्व मुलाचीच दिसत आहेत. तेव्हा आपल्या वाड्यापासून तो त्या ब्राह्मणाच्या घरापर्यंत कोणाला कळणार नाही असे भुयार कतावं. आपल्याला दिवस गेल्याची अफवा पसरावी. मी तुम्हाला नाळवारीचा मुलगा आणून देईन. असं ऐकल्यावर राणीला मोठा आनंद झाला. जसे  जसे दिवस होत गेले त्याप्रमाणे डोहाळे लागल्याच राणीने डंभ केले. पोट मोठे दिसण्याकरिता त्याच्यावर लुगड्याच्या घड्या बांधल्या. भुयार तयार केलं. नऊ मास भरतांच बाळंपणाची तयारी केली. 
इकडे ब्राह्मण बाईचही पोट दुखू लागलं. सुइणीला बोलावून आणलं. त्याबरोबर तुम्ही पुढे व्हा. मी येते म्हणून सुइणीने सांगितले. ती धावत धावत राणीकडे आली. राणीला पोट दुखण्याच सोंग करायला सांगितले. नंतर ब्राह्मणाच्या घरी आली. बाई बाई तुझी पहिली खेप आहे. डोळे बांधलेस तर भिणार नाहीस. नाही बांधलेस तर भय वाटेल. असे सांगून तिचे डोळे बांधले. ती बाळंत झाली.मुलगा झाला. सुइणीनं एका दासीकडून भुयाराच्या वाटेने राणीकडे पाठविला आणि एक वरवंटा घेऊन त्यास कुंचा बांधिला. आणि त्या ब्राह्मण बाईपुढे ठेवला. मग बाईचे डोळे सोडले. तुला वरवंटा झाला असं सांगू लागली. त्या बाईने नशिबाला बोल लावला. मनामध्ये दुःखी झाली.सुईण निघुन राजवाड्यावर गेली. राणीसाहेब बाळंतीण झाल्याची बातमी पसरली. मुलाचं कोडकौतुक होऊ लागलं.
इकडे ब्राह्मण बाईने नेम धरला. श्रावणमासी दर शुक्रवारी जिवतीची पूजा करावी आणि नमस्कार करुन म्हणावं, जय जिवती आई माते, जिथं माझ बाळ असेल, तिथं खुशाल असो. असं म्हणून तिनं तांदूळ उडवावे, ते त्या मुलाच्या डोक्यावर पडावे. हिरवं लुगडं नेसणं, हिरव्या बांगड्या लेणं वर्ज्य. कारलीच्या मांडवा खालून जाणें वर्ज्य केले. तांदळाचं धूण वलांडणं बंद केलं. याप्रमाणं ती नेहमी वागूं लागली. 
इकडे राजपुत्र मोठा झाला. एके दिवशी बाहेर फिरायला निघाला. त्या दिवशी ती ब्राह्मण स्री न्हाऊन आपल्या अंगणांत राळे राखीत बसली होती. तेव्हा राजपुत्राची नजर तिच्यावर पडली. हा मोहीत झाला व रात्री तिची भेट घ्ययची म्हणून निश्र्चय केला. रात्री तिच्या घरी आला. दारात गाय-वासरु बांधली होती. चालता चालता राजाचा पाय वासराच्या शेपटावर पडला. वासराला वाचा फुटली. ते आपल्या आईला म्हणाले, कोण्या पाप्याने माझ्या शेपटावर पाय दिला. तेव्हा ती गाय म्हणाली. जो आपल्या आईकडे जायला भीत नाही, तो तुझ्या शेपटावर पाय द्यावयास भिईल काय? हे ऐकून राजा मागे फिरला. घरी जाऊन आपल्या आईपासून काशीला जाण्याची परवानगी घेतली. काशीस जाऊ लागला. जाता जाता एका ब्राह्मणाच्या इथे उतरला. त्या ब्राह्मणाला पुष्कळ मुलें झाली. पण ती पाचवी सहावीच्या दिवशी जात असतं. 
राजा आला, त्या दिवशी चमत्कार झाला. पाचवीचा दिवस होता. राजा दारात निजला होता. सटवी रात्री आली आणि म्हणू लागली, कोण गं मेलं वाटेंत पसरलं आहे? जिवतीने उत्तर दिले, अगं अगं माझे ते नवसाचे बाळ निजले आहे. मी काही त्याला वलांडू देणार नाही. मुलगा आज जाणार म्हणून त्या मुलाचे आई-बाप चिंता करीत बसले होते. त्यांनी हा संवाद ऐकला. इतक्यात उत्तररात्र झाल्यावर सटवी व जिवती आपपल्या रस्त्याने निघून गेल्या. उजाडल्यावर ब्राह्मणाने येऊन राजाचे पाय धरले. तुमच्यामुळे आमचा मुलगा जगला, आजचा दिवस मुक्काम करा. अशी विनंती केली. राजाने ती मान्य केली. त्याही रात्री याप्रमाणे प्रकार झाला. दुसरे दिवशी राजा चालता झाला. इकडे यांचा मुलगा जगला व वाढू लागला. 
पुढे राजाने काशीला गेल्यावर यात्रा केली. गयावर्जनाची वेळ आली, पिंड देतेवेळी ते घ्यायला दोन हात वर आले. असे होण्याचे कारण त्याने ब्राह्मणांना विचारले. ते म्हणाले घरी जा, सार्‍या गावातल्या बायकापुरुषांना जेवायला बोलाव, म्हणजे याचे कारण काय ते समजेल. 
राजाच्या मनाला मोठी चुटपुट लागली. तो घरी आला. मोठ्या थाटांने मावंदे केले. त्या दिवशी शुक्रवार होता. गावात ताकीद दिली, घरी कोणी चूल पेटवू नये. सगळ्यांनी जेवायला यावं. ब्राह्मण बाईला मोठ संकट पडल. राजाला निरोप धाडला. मला जिवतीच व्रत आहे. माझे नेम पुष्कळ आहेत. ते पाळले तर जेवायला येईन. राजाने कबूल केले. 
जिथं तांदूळाचं धूण होतं ते सारवून त्यावरुन ती आली. हिरव्या बांगड्या भरल्या नाहीत, कारल्याच्या मांडवाखालून गेली नाही. दर वेळेस जिथं माझं बाळ असेल तिथं खुशाल असो असे म्हणे. 
पुढे पानं वाढली. मोठा थाट झाला. राजानं तूप वाढायला घेतले. वाढता वाढता ही ज्या पंक्तीत बसली होती तिथे आला. तूप वाढू लागला. ईश्र्वरी चमत्कार झाला. बाईला प्रेमाचे भरते येऊन पान्हा फुटला. तिच्या स्तनांतून दूधाच्या  धारा फुटल्या. त्या ह्या राजाच्या तोंडात उडाल्या. तो हातची तूपाची तपेली ठेवून रुसून निजला. काही केल्या उठेना. 
तेव्हा त्याची आई गेली, त्याची समजूत करु लागली. तो म्हणाला, असें होण्याचे कारण काय? तिने सांगितले की, ती तुझी खरी आई आहे. मी तुझी मानलेली आई आहे. असे सांगून तिने सर्व खरी खरी हकिगत त्याला सांगितली. पुढे भोजन समारंभ संपन्न झाला.

नंतर त्याने आपल्या खर्‍या आई-बापास आपल्या वाड्याशेजारी वाडा बांधून दिला व त्यांच्यासह राज्य करुं लागला. जशी जिवती त्या ब्राह्मण स्रीस प्रसन्न झाली, तशी तुम्हा आम्हा होवो. ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण. 


Custom Search

Friday, August 23, 2019

Kahani Budha-Bruhaspatichi कहाणी बुधबृहस्पतीची


Kahani Budha-Bruhaspatichi 
This is the kahani of Budhawar and Gurwar.
कहाणी बुधबृहस्पतीची
ऐका बुधबृहस्पतीनो, तुमची कहाणी. आटपाट नगर होत. तिथ एक राजा होता. त्याला सात मुलगे होते. सात सुना होत्या. त्यांच्या घरी रोज एक मामाभाचे भिक्षेला येत. राजाच्या सुना आमचे हात रिकामे नाहीत, म्हणून सांगत. असे पुष्कळ दिवस गेल्यावर त्यांना दारिद्र्य आले. सर्वांचे हात रिकामे झाले. मामाभाचे पूर्वीप्रमाणे भिक्षेला आले. सर्व सुनांनी सांगितले असते तर दिलं असतं. आमचे हात रिकामे झाले. सर्वांत धाकटी सून शहाणी होती.तिनं विचार केला, होतं तेव्हा दिलं नाही, आता नाही म्हणून नाही,ब्राह्मण विन्मुख जातात. ती त्यांच्या पाया पडली. त्यांना सांगू लागली, आम्ही संपन्न असता धर्म केला नाही. ही आमची चुकी आहे. आता आम्ही पूर्वीसारखे होऊ असा काही उपाय सांगा. 
ते म्हणाले, श्रावणमासी दर बुधवारी आणि बृहस्पती वारी जेवावयास ब्राह्मण सांगावा. आपला पती प्रवासी जाऊन घरी येत नसल्यास दाराच्या पाठीमागे दोन बाहुली काढावी. संपत्ती पाहिजे असल्यास पेटीवर, धान्य पाहिजे असल्यास कोठीवर काढावी. त्यांची मनोभावे पूजा करावी, अतिथीचा सत्कार करावा. म्हणजे ईच्छित हेतू पूर्ण होतात. त्याप्रमाणे ती करुं लागली. 
एके दिवशी तिला स्वप्न पडल. ब्राह्मण जेवीत आहेत. मी चांदीच्या भांड्यांतून तूप वाढीत आहे. ही गोष्ट तिने आपल्या जावांना सांगितली. त्यांनी तिची थत्टा केली. इकडे काय चमत्कार झाला. तिचा नवरा प्रवासाला गेला होता. त्या नगराचा राजा मेला. गादीवर दुसरा राजा बसविल्याशिवाय प्रेत दहन करावयाचे नाही. म्हणून तेथिल लोकांनी काय केलें? हत्तिणीच्या सोंडेंत माळ दिली व तिला नगरांत फिरविली. ज्याच्या गळ्यांत ती हत्तीण माळ घालील, त्याला राज्याभिषेक होईल, अशी दवंडी पिटवली. हत्तिणीन त्या बाईच्या नवर्‍याच्या गळ्यांत माळ घातली. मंडळीनीं त्याला हाकलून दिलें. परत हत्तीण फिरवली, पुन्हा त्याच्याच गळ्यात माळ घातली. याप्रमाणे दोनदा झालं. पुढे त्यालाच राज्याभिषेक केला. नंतर त्यानेआपल्या माणसांची चौकशी केली. तेव्हा ते अन्न अन्न करुन देशोधडीला लागल्याची बातमी कळली.

मग राजाने काय केले? मोठ्या तलावाचं काम सुरु केलं. हजारो मजूर खपू लागले. तिथं त्याची माणसं आली. राजाने आपली बायको ओळखली. मनामध्ये संतोष झाला. तिनं बुधबृहस्पतींच्या व्रताची व स्वप्नाची हकीगत त्याला सांगितली. देवानं देणगी दिली, पण जावांनी थट्ता केली. राजानं ही गोष्ट मनांत ठेवली. ब्राह्मण भोजनाचा थाट केला. हिच्या हातात चांदीच भांड देऊन तूप वाढावयास सांगितले. ब्राह्मण जेवून संतुष्ट झाले. जावांनी ते पाहिले. त्यांचा सन्मान केला. मुलंबाळ झाली. दुःखाचे दिवस गेले, सुखाचे दिवस आले. जशी त्यांच्यावर बुधबृहस्पतींनी कृपा केली, तशी तुम्हाआम्हावर करोत, ही साठ उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण.  
     

Custom Search

Wednesday, August 21, 2019

Kahani MangalaGouraichi कहाणी मंगळागौरीची

Kahani MangalaGouraichi कहाणी मंगळागौरीची
This is the story of Goddess MangalaGouri.
कहाणी मंगळागौरीची
 आटपाट नगर होतं तिथं एक वाणी होता. त्याला काही मुलगा नव्हता त्याच्या घरी एक गोसावी येई. अल्लख म्हणून पुकारा करी. वाण्याची बायको भिक्षा आणी.निपुत्रिका च्या हातची भिक्षा घेत नाही म्हणून चालता होई, ही गोष्ट तिनं नवर्‍याला सांगितली. त्यानं तिला एक युक्ति सांगितली. दाराच्या आड लपून बस अल्लख म्हणताच सुवर्णाची भिक्षा घाल. अशी भिक्षा झोळीत घातली.बोवांचा नेम मोडला. बाईवर फार रागावला. मूलबाळ होणार नाही, असा शाप दिला.तिनं त्याचे पाय धरले. बुवांनी उःशाप दिला.बुवा म्हणाले, आपल्या नवर्‍याला सांग, निळ्या घोड्यावर बस.निळी वस्त्र परिधान कर, रानात जा. जिथं घोडा अडेल, तिथं खण. देवीचं देऊळ लागेल. तिची प्रार्थना कर. ती तुला पुत्र देईल.असं बोलून बोवा चालता झाला.तिनं आपल्या पतीस सांगितलं वाणी रानात गेला घोडा अडला तिथं खणलं. देवीचं देऊळ लागलं सुवर्णाचं देऊळ आहे हिरेजडित आचे खांब आहेत माणकांचे कळस आहेत आत देवीची मूर्त आहे.मनोभावे पूजा केली त्याला देवी प्रसन्न झाली. वर माग म्हणाली. घरदारं आहे गुरढोरं आहेत, धन द्रव्य आहे. पोटी पुत्र नाही.म्हणून दुःखी आहे.देवी म्हणाली तुला संततीचे सुख नाही.मी प्रसन्न झाले आहे. तर तुला देते.अल्पायुषी पुत्र घेतलास तर गुणी मिळेल. दीर्घायुषी घेतलास तर जन्मांध होईल. कन्या घेतलीस तर बालविधवा होईल. इच्छा असेल ते मागून घे.त्यानं अल्पायुषी पुत्र मागितला देविन सांगितलं माझ्या मागल्या बाजूला जा,तिथं एक गणपति आहे, त्याच्यामागं आंब्याचं झाड आहे.गणपतीच्या दोंदावर पाय दे. एक फळ घे.घरी जाऊन बायकोला खाऊ घाल.म्हणजे तुझा कार्यभाग होईल. नंतर देवी अदृश्य झाली. 
वाणी देवळामागं गेला, गणपतीच्या दोंदावर पाय दिला,झाडावर चढला. पोटभर आंबे खाल्ले मोटभर घरी नेण्याकरिता घेतले. खाली उतरून पाहू लागला.तो आपला मोटेत आंबा एकच आहे. असं चार-पाच वेळा झालं.गणपतीला त्रास झाला. त्यानं सांगितलं तुझ्या नशिबी एकच फळ आहे.फळ घेऊन घरी आला. बायकोला खाऊ घातलं. ती गरोदर राहिली.दिवसा मासानं गर्भ वाढू लागला. नवमास पूर्ण झाले. वाण्याची बायको बाळंतीण झाली. मुलगा झाला. उभयतांना मोठा आनंद झाला. दिवसामासी मुलगा वाढू लागला. आठव्या वर्षी मुंज केली.दहाव्या वर्षी लग्न करा म्हणाली.काशीयात्रेशिवाय लग्न करणं नाही असा माझा नवस आहे असा जबाब दिला काही दिवसांनी मामाबरोबर यात्रेस पाठविलं.मामाभाचे काशीस जाऊ लागले जाता जाता काय झालं? वाटेत एक नगर लागलं,तिथं काही मुली खेळत होत्या त्यात एकमेकिंचं भांडण लागलं.एक गोरी भुरकी मुलगी होती तिला दुसरी मुलगी म्हणू लागली काय रांड आहे ! काय रांड आहे ! तेव्हा ती मुलगी म्हणाली. माझी आई मंगळागौरीचे व्रत करिते आमच्या कुळावंशामध्ये कोणीही रांड होणार नाही. मग मी तर तिची मुलगी आहे. 
.हे भाषण मामानी ऐकलं.त्यांच्या मनात आलं हिच्याशी आपल्या भाच्याचा लगीन करावं. म्हणजे हा दीर्घायुषी होईल..  
परंतु हे घडतं कसं? त्या दिवशी तिथं त्यांनी मुक्काम केला. इकडे काय झालं? त्याच दिवशी त्या मुलीचं लग्न होत. लग्नाचे वेळेस नवरा मुलगा परागंदा झाला. मुलीचे आई-बापांना काळजी पडली. पुढे कोणीतरी प्रवासी मिळेल तर बरं होईल. त्याला पुढं करुन वेळ साजरी करु. म्हणून धर्मशाळा पाहू लागले. तर मामाभाचे दृष्टीस पडले.मामापासून भाच्याला नेलं. गोरज मुहूर्तावर लग्न लावल. उभयतांना गौरीहरापाशी निजवलं. दोघ झोपी गेली. मुलीला देवीनं दृष्टांत दिला. अगं अगं मुली तुझ्या नवर्‍याला दंश करायला सर्प येिल, त्याला पिण्याकरता दूध ठेव.एक कोरा करा जवळ ठेव. दूध पिऊन सर्प कर्‍यात शिरेल. आंगच्या चोळीनं कर्याचा तोंड बांधून टाक. सकाळी उठून आईला ते वाण दे. 
तिने सर्व तयारी केली. दृष्टांताप्रमाणे घडून आलं. काही वेळान तिचा नवरा उठला. भूक लागली म्हणू लागला.लाडू खायला दिले. फराळ झाल्यावर त्यानं तिला आपली अंगठी दिली.पहाटेस उठून ताट घेऊन बिर्‍हाडी गेला. मामाभाचे मार्गस्थ झाले. 
दुसरे दिवशी काय झालं? हिनं सकाळी उठून स्नान केलें. आपल्या आईला वाण दिलं. आई उघडून पाहू लागली, तो आत हार निघाला. आईने कन्येच्या गळ्यांत हार घातला. पुढं पहिला वर मांडवांत आला. मुलीला खेळायला आणली. ती म्हणाली, हा माझा नवरा नाही, मी याजबरोबर खेळत नाही. रात्रीची लाडवांची व अंगठीची खूण काही पटेना. आईबापांना पंचाईत पडली. हिचा नवरा कसा सापडेल? नंतर त्यांनी अन्नछत्र चालू केलं. जो ब्राह्मण येईल त्याचे पाय अंगठी घालून मुलीनं धुवावे, आईनं पाणी घालावं, भावांनी गंध लावावं आणि बापानं विडा द्यावा. असा क्रम चालू केला. शेकडो लोक येऊन जेवूं लागले. 
इकडे मामाभाचे काशीस गेले. पुष्कळ दानधर्म केले, तीर्थयात्रा केल्या, ब्राह्मणांचे आशीर्वाद घेतले. एके दिवशी भाच्यास मूर्च्छा आली. यमदूत प्राण न्यायला आले. मंगळागौर आडवी आली. त्यांच युद्ध झालं. यमदूत पळून गेले. ममगळागौर तिथेच अदृश्य झाली. तसा भाचा जागा झाला. आपल्या मामास सांगू लागला. मला असं असं स्वप्न पडले. मामा म्हणाला, ठिक झालं. तुझ्यावरच संकट टळलं. उद्या आपण घरी जाऊ.

परत येऊ लागले. लग्नाच्या गावी आले. तळ्यावर स्वयंपाक करुं लागले. दासींनी येऊन सांगितलें, इथं अन्नछत्र आहे. तिथं जेवायला जा. ते म्हणाले आम्ही परान्न घेत नाही. दासींनी यजमानणीस सांगितले. यांना पालखी पाठविली. आदरातिथ्यांन घरी नेलं. पाय धुतांना मुलीनं नवर्‍यास ओळखलं. नवर्‍यानं अंगठी ओळखली. आईबापांनी विचारलं तुझ्याजवळ खूण काय आहे? त्यानं लाडवांच ताट दाखवलं. सर्वांना आनंद झाला. भोजन समारंभ झाला. मामाभाचे सून घेऊन घरी आले. सासूनं सुनेचे पाय धरले. तुझ्यामुळे माझा मुलगा वाचला, असं म्हणाली. तिनं सांगितलं मला मंगळागौरीच व्रत असतं. ही सगळी तिची कृपा. सासरमाहेरची घरचीदारची सर्व माणसे एकत्र आली. आणि त्या व्रताचे उद्यापन केले. मंगळागौर त्यांना प्रसन्न झाली, तशी तुम्हां आम्हां होवो, आणि आपलं सौभाग्य अखंड राहो इतकीच देवीची प्रार्थना करा, ही धर्मराजाला श्रीकृष्णाने सांगितलेली साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण.                       

Custom Search

Kahani Somawarchi कहाणी सोमवारची साधी


Kahani Somawarchi कहाणी सोमवारची साधी 
 This is story of Monday
कहाणी सोमवारची साधी 
आटपाट नगर होतं तिथे एक ब्राह्मण राहात होता. त्याचा एक शिष्य होता रोज तळ्यावर जाई, स्नान करी शंकराची पूजा करी, वाटेत वेळूचं एक बेट होतं तो परत येऊ लागला म्हणजे मी येऊ ? मी येऊ ? असा ध्वनी उठे. हा मागं पाही तो तिथे कोणी नाही या भीतीने वाढू लागला तेव्हा गुरुजींनी विचारलं खायला प्यायला वाण नाही बाबा असा रोड का? खायला प्यायला वाण नाही, हाल नाही अपेष्टा नाही, स्नान करून येतेवेळेस मला कोणी मी येऊ ? मी येऊ ? असं म्हणतं. मागं पाहतो, तो कोणी नाही. याची मला भीती वाटते. गुरुजी म्हणाले, भिऊ नको, मागं काही पाहू नको, खुशाल त्याला ये म्हण. तुझ्या मागून येऊ दे 

मग शिष्यांन काय केलं? रोजच्याप्रमाणे स्नानास गेला. पूजा करून येऊ लागला, मी येऊ असा ध्वनी झाला ये असा जबाब दिला. मागे काही पाहिलं नाही, चालत्या पावली घरी आला. गुरुजींनी पाहिलं बरोबर एक मुलगी आहे.त्या दोघांचं लगीन लावलं. त्यांना एक घर दिलं. त्यानंतर काय झालं श्रावणी सोमवार आला. बायकोला म्हणू लागला, माझी वाट पाहू नको, उपाशी राहू नको. आपण उठला शंकराचे पूजेला गेला. हिनं थोडी वाट पाहिली. स्वयंपाक करून जेवायला बसली. एक घास तोंडात घातला इतक्यामध्ये पती आला. अगं अगं दार उघड. पुढचं ताट पलंगाखाली ढकलून दिलं. हात धुतला, दार उघडलं, पती घरात आले. नित्यनेम करू लागले. पुढं दुसरा सोमवार आला त्या दिवशीही असच झालं. असं चारी सोमवारी झालं. सरता सोमवार आला. रात्री नवल झालं दोघेजण पलंगावर गेली पलंगाखाली उजेड दिसला. हा उजेड कशाचा? ताटी भरल्या रत्नांचा. ही रत्न कुठून आणली? मनात भिऊन गेली. माझ्या माहेरच्यांनी दिली. तुझं माहेर कुठे आहे वेळूच्या बेटी आहे. मला तिथे घेऊन चल. पतीसह चालली मनी शंकराची प्रार्थना केली. मला अर्ध घटकेचे माहेर दे. तो वेळूचं बेट आलं मोठा एक वाडा आला. कोणी म्हणे माझा मेहुणा आला. कोणी म्हणे माझा जावई आला. कोणी म्हणे माझी नणंद आली. कुणी म्हणे माझी बहीण आली. दासी बटकी राबताहेत. शिपाई पहारा करत आहेत. बसायला पाट दिला. भोजनाचा थाट केला. जेवणं झाली. सासू-सासर्‍यांची आज्ञा घेतली. घरी परतली, अर्ध्या वाटेत आठवण झाली खुंटीवर हार राहिला. तेव्हा उभयतां परत गेली. घर नाही, दार नाही, शिपाई नाहीत.प्यादे नाहीत, दासी नाहीत, बटकी नाहीत. एक वेळूचं बेट आहे तिथं हार पडला आहे. हार उचलून गळ्यात घातला. नवर्‍यांना विचारलं इथलं घर काय झालं? जसं आलं तसं गेलं. अभय असेल तर सांगते. चारी सोमवारी हाक ऐकली जेवली ताटं ढकलून दिली.रत्नाने भरली सोन्याची झाली. ती मला देवाने दिली आपण विचारू लागला, तेव्हा भिऊन गेले. माहेरची म्हणून सांगितलं. शंकराची प्रार्थना केली. अर्ध घटकेचे माहेर मागितलं. त्याने तुमची खात्री केली. माझी इच्छा परिपूर्ण झाली जसा त्यांना शंकर पावला तसा तुम्हा आम्हाला पावो. ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण... 


Custom Search

Kahani Sundaychi कहाणी आदित्यराणूबाईची


Kahani Sundaychi कहाणी आदित्यराणूबाईची
This is the story of Sunday. 
कहाणी आदित्यराणूबाईची 
 ऐका आदित्यराणूबाई तुमची कहाणी. आटपाट नगरात एक ब्राह्मण राहत होता. तो नित्य समिधा, फुले, दूर्वा आणावयास रानात जात असे रानात जात असे. तिथे नागकन्या, देवकन्या वसा वसत होत्या. काय ग बायांनो, कसला वसा वसता? तो मला सांगा. तुला रे वसा कशाला हवा? उलशील मातशील घेतला वसा टाकून देशील ! ब्राह्मण म्हणाला, उतत नाही मातत नाही, घेतला वसा टाकत नाही. तेव्हा त्या म्हणाल्या, श्रावण मास येईल. पहिल्या आदित्य वारी मौनाने उठावे. वस्तरासहित स्नान करावे.अग्रोदक पाणी आणावे. विड्याच्या पानावर रक्तचंदनाची आदित्यराणूबाई काढावी. सहा रेघांचं मंडळ कराव.सहा सुतांचा तांतू करावा. त्यास सहा गाठी द्याव्या. पान फूल वाहावं. पूजा करावी. पानांचा विडा, फुलांचा झेला, दशांगांचा धूप, गूळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवावा. सहा मास चाळावी, सहा मास पाळावी. माघी रथसप्तमी संपूर्ण कराव. संपूर्णास काय करावे? गुळाच्या पोळ्या, बोटव्यांची खीर, लोणकढं तूप, मेहूण जेवूं सांगावं. असेल तर चिरचोळी द्यावी, नसेल तर जोडगळसरी द्यावी, नसेल तर दोन रुपये दक्षिणा द्यावी आणि आपल्या वशाचं उद्यापन करावं. असा वसा ब्राह्मणानं केला. त्याला सूर्यनारायण प्रसन्न झाला. भाग्यलक्ष्मी आली. तेव्हा राजाच्या राणीनं ब्राम्हणास बोलावू धाडलं. ब्राम्हण जातेवेळी भिवु लागला. कापू लागला. तेव्हा राजाच्या राणीनं सांगितलं की भिऊ नका, कापू नका. तुमच्या मुली आमच्या येथे द्या आमच्या मुली गरिबाच्या, तुमच्या घरी कशा द्याव्या? दासी कराल, बटकी कराल. राणी म्हणाली, दासी करीत नाही, बटकी करीत नाही, राजाची राणी करू, प्रधानाची राणी करू. मार्गशीर्षाचा महिना आला. ब्राह्मणानं लगीन करून मुली दिल्या. एक राजाचे घरी दिली, एक प्रधानाचे घरी दिली. गेल्या पावली मुलींचा समाचार घेतला नाही. बारा वर्षानी समाचारास ब्राह्मण निघाला. राजाच्या घरी गेला. लेकिन बसायला पाट दिला. पाय धुवायला पाणी दिले. बाबा बाबा गुळ खा, पाणी प्या. गूळ खात नाही, पाणी पीत नाही. माझी कहाणी करायची आहे, ती तू ऐक ! तुझी कहाणी ऐकायला मला काही वेळ नाही राजा पारधीला जाणार आहे. त्याला जेवायला उशीर होईल. तोच त्याचे मनात राग आला. तेथून निघाला व प्रधानाच्या घरी आला. मुलीं पाहिलं आपला बाप आला म्हणून बसायला पाट दिला. पाय धुवायला पाणी दिलं. बाबा बाबा गूळ खा पाणी प्या. गूळ खात नाही पाणी पीत नाही. माझी कहाणी करायची आहे. ती तू अगोदर ऐक ! तुझी कहाणी नको ऐकू, तर कोणाची ऐकू? घरात गेली, उतरंडीची सहा मोत्ये आणली. तीन आपण घेतली, तीन बापाच्या हातात दिली. त्याने मनोभावे कहाणी सांगितली. लेकीने चित्तभावाने ती ऐकली.. नंतर जेवून खाऊन बाप आपल्या घरी आला. बायकोने विचारलं आपल्या मुलींचा समाचार कसा आहे? जिन कहाणी ऐकली नाही, ती दारिद्र्याने पिडली,दुःखानं व्यापली.. राजा मुलखावर निघून गेला जिना कहाणी ऐकली होती, ती, भाग्यानं नांदत आहे. इकडे दरिद्री जी झाली होती, तिनं आपल्या लेकास सांगितलं मावशी घनघोर नांदत आहे. ते तिकडे जाऊन काही दिलं तर घेऊन ये ! पहिल्या आदित्य वारी पहिला मुलगा उठला, तळ्याच्या पाळी जाऊन उभा राहिला. अगं अगं दासीनो तुम्ही दासी कोणाच्या? आम्ही दासी प्रधानाच्या. प्रधानाच्या राणीला जाऊन सांगा; तुमच्या बहिणीचा मुलगा आला आहे. कसा आला आहे? काय आला आहे? फाटकं नेसला आहे, तुटक पांघरला आहे.तळ्याच्या पाळी उभा राहिला आहे. परसदाराने घेऊन या. परसदारान घेऊन आल्या.न्हावू माखूं घातला. पीतांबर नेसायला दिला. जेवू खाऊ घातलं. कोहळा पोखरला. होन मोहरा भरल्या. बाबा कोठे ठेवू नको, विसरू नको, घरी जतन करून घेऊन जा ! वाटेने आपला जाऊ लागला, तो सूर्यनारायण माळ्याच्या रूपाने आला. हातीचा कोहळा काढून नेला. घरी गेला, आईनं विचारलं काय रे बाबा मावशीने काय दिलंं ? दैवे दिल कर्माने नेले, कर्माचे फळ पुढे उभे राहीलं.मावशीने दिलं होतं ते पण सर्व गेलं. पुढे दुसर्‍या आदित्यवारी दुसरा मुलगा गेला. तळ्याच्या पाळी जाऊन उभा राहिला. अगंअग दासीनो, तुम्ही दासी कोणाच्या ? आम्ही दासी प्रधानाच्या. प्रधानाच्या राणीला माझा निरोप सांगा. त्यांनी सांगितला. मग प्रधानाच्या राणीनं त्याला घरीं नेऊन न्हाऊं माखूं घातलं. पीतांबर नेसायला दिला. जेवू खाऊ घातलं. काठी पोखरून होनमोहरांनी भरून दिली.बाबा कोठे ठेवू नको, विसरू नको, घरी जतन करून घेऊन जा ! म्हणून सांगितलं. वाटेत सूर्यनारायण गुराख्याच्या रूपानं आला, हातची काठी काढून घेतली. घरी गेला. झालेली गोष्ट राणीला सांगितली. दैवे दिले ते सर्व कर्माने काढून घेतले.पुढे तिसरे आदित्यवारी तिसरा मुलगा गेला. तळ्याच्या पाळी उभा राहिला. पहिल्यासारखा प्रधानाच्या राणीनं घरीं नेऊन न्हावू माखूं घातला.पीतांबर नेसायला दिला. जेवू खाऊ घातला. नारळ पोखरून होना-मोहरानी भरून दिला. कोठे ठेवू नको विसरू नको म्हणून सांगितलं.घरी जाताना विहिरीच्या काठी नारळ ठेवून पाणी प्यायला विहिरीत उतरला. तोच नारळ गडगडून विहिरीत पडला.घरी गेला आईनं विचारलं, काय रे बाबा मावशीने काय दिलं? आई ग मावशीने दिलं पण दैवान ते सर्व बुडालं.चौथ्या आदित्यवारी चौथा मुलगा गेला.तळ्याच्या पाळी उभा राहिला. त्यालाही प्रधानाच्या राणीनं घरीं नेऊन न्हावू माखू घातलं. पितांबर नेसायला दिला. जेवू खाऊ घातलं.त्याला दह्याची शिदोरी होन मोहरा घालून बरोबर दिली.सूर्यनारायण घारीच्या रूपानं आला. हातची शिदोरी घेऊन गेला. घरी गेला. आईनं विचारलं,काय रे बाबा मावशीनं काय दिलं?आई ग मावशी न दिलं पण दैवान ते सर्व नेलं. पाचवे आदित्यवारी ती तळ्याच्या पाळी उभी राहिली.दासीने तिचा निरोप तिच्या बहिणीला सांगितला. बहिणीनं तिलाही परसदारानं घरी नेलं. न्हाऊ घातली. पाटाव नेसायला दिलं.प्रधानाची राणी आदित्य वाराची कहाणी करू लागली.काय वसा करतेस तो मला सांग. बहिण म्हणाली अगं अगं चांडाळणी, पापिणी बापाची कहाणी ऐकली नाहीस म्हणून तुला दरिद्र आलं. राजाच्या राणीने विचारलं याला उपाय काय करू? तेव्हा तिनं वसा सांगितला. ती बहिणीच्या घरी राहिली. श्रावण मास आला. सांगितल्याप्रमाणं सूर्यनारायणाची पूजा केली. इकडे राजाला भाग्य आलं. राजा बोलावूं धाडलं. मावशी मावशी तुला छत्र का आली, चामर आली, पायीक आले. मला रे पापिणीला छत्र कोठली? चामर कोठली? पाईक कोठले? बाहेर जाऊन दाराशी बघतात तो राजा बोलावूं आला आहे.राजा आला तशी घरी जायला निघाली आहे. एकमेकांना बहिणी बहिणी आहेर केले. वाटेनं जाऊं लागली. तो पहिल्या मजलेस सैंपाक केला, राजाला वाढलं, मुलांना वाढलं, आपलं पान वाढून घेतलं, तेव्हा कहाणीची आठवण झाली. करा रे हाकारा पिटा रे डांगोरा नगरांत कोणी उपाशी आहे का याचा शोध करा. उपाशी नाही काही नाही. वाटेनं एक मोळी विक्या जात आहे.त्याला म्हणाले आमच्या बाईंची कहाणी ऐकाला ये.तुझ्या बाईची कहाणी ऐकून मला काय फळ? माझं पोट भरलं पाहिजे. असं म्हणून तो राणीकडे आला. तशी सहा मोत्ये राणीनं घेऊन तीन त्याला दिली.व तीन आपल्या हातात ठेवली. मनोभावे कहाणी सांगितली. चित्त भावाने त्याने ऐकली. त्याची लाकडांची मोळी होती ती सोन्याची मोळी झाली.तो म्हणाला बाई बाई कहाणी ऐकल्याचं एवढं फळ मग वसा घेतल्याचं काय फळ? काय वसा आहे तो मला सांगा. तुला रे वसा कशाला हवा?उत्तर उतशील मातशिल घेतला वसा टाकून देशील.उतत नाही मातत नाही घेतला वसा टाकत नाही.तेव्हा वसा राणीनं सांगितला. पुढं दुसर्‍या मजलेस गेली, स्वयंपाक केला.राजाला वाढलं, मुलांना वाढलं आपलं पान वाढून घेतलं.तेव्हा कहाणीची आठवण झाली. करा रे हाकारा पिटा रे डांगोरा नगरातून कोणी उपाशी आहे का याचा शोध करा. उपाशी नाही काही नाही माळ्याचा मळा पिकत नाही विहिरीला पाणी लागत नाही असा एक माळी चिंतेनं बसला आहे त्याला हाक माराली.आमच्या बाई ची कहाणी ऐक. तो आला.राणीनं सहा मोत्ये घेऊन तीन आपण घेतली तीन माळ्याला दिली.राणीनं कहाणी मनोभावें सांगितली माळ्याने कहाणी चित्त भावाने ऐकली. माळ्याचा मळा पिकू लागला विहिरीला पाणी आलं. तो म्हणाला बाई बाई कहाणी ऐकल्याचं एवढं फळ मग वसा घेतल्याचं काय फळ? काय वसा असेल तो मला सांगा. मग राणीनं त्याला वसा सांगितला. पुढं तिसर्‍या मजलेस गेली. स्वयंपाक केला. राजाला वाढलं, मुलांना वाढलं, आपलं पान वाढून घेतलं.तेव्हा कहाणीची आठवण झाली. करा रे हाकारा पिटा रे डांगोरा नगरात कोणी उपाशी आहे का याचा शोध करा.उपाशी नाही. काही नाही. एक म्हातारी आहे. तिचा मुलगा रानात गेलेला आहे. डोहात बुडाला होता एका सर्पानं खाल्ला होता. यामुळं चिंताक्रांत बसली होती.तो आला. ती म्हणाली, बाई बाई कहाणी ऐकल्याचं हे फळ. मग वसा घेतल्याचं काय फळ? काय वसा असेल तो मला सांगा. मग राणीनं तिलाहि वसा सांगितला. पुढं चौथ्या मजलेस गेली. स्वयंपाक केला. राजाला वाढलं, मुलांना वाढलं, आपलं पान वाढून घेतलं.तेव्हा कहाणीची आठवण झाली करा रे हाकारा पिटा रे डांगोरा नगरात कोणी उपाशी आहे का याचा शोध करा.उपाशी नाही काही नाही. काणा डोळा मासाचा गोळा हात पाय नाही असा एक मनुष्य रस्त्यामध्ये होतात्याच्या अंगावर तांब्याभर पाणी ओतलं पालथा होता तो उलटा केला सहा मोत्ये होती तीन मोती त्याच्या बेंबीवर ठेविली.तीन मोत्ये आपण घेतली. राणीनं मनोभावे कथा सांगितली ती त्यानं ऐकली त्याला हात पाय आले. देह दिव्य झाला तो म्हणाला कहाणी ऐकल्याचं एवढं फळ, मग वसा घेतल्याचं काय फळ? काय वसा तो मला सांगा मग राणीनं त्याला वसा सांगितला… पाचव्या मुक्कामास घरी आले स्वयंपाक केला सूर्यनारायण जेवायला आले साती दरवाजे उघडले लोह घंघाळ पाणी तापलं. षडरस पक्ववान जेवायला केली. सूर्यनारायण जेवायला बसले. त्यांना पहिल्या घासात केस लागला.ते म्हणाले अगं अगं कोणा पापणीचा केस आहे? राजाच्या राणीला बारा वर्ष दरिद्र आलं होतं. तीन वळचणीखाली बसून आदित्य वारी केस विंचरले होते.डोईचा केस वळचणीची कडी डाव्या खांद्यावरून वेशीबाहेर टाकून दे. राजाच्या राणीला सूर्यनारायणाचा कोप झाला तसा कोणाला होऊ नये. ब्राह्मणाला, मोळी विक्याला, राजाच्या राणीला, माळ्याला, म्हातारीला, काणाडोळा मासांचा गोळा इतक्याना जसा सूर्यनारायण प्रसन्न झाला.तसा तुम्हांआम्हां होवो ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण.


Custom Search

Friday, August 16, 2019

Kahani Shaniwarchi Marutichi कहाणी शनिवारची मारुतीची


Kahani Shaniwarchi Marutichi 
This story is in Marathi. This is a story of God Maruti.
कहाणी शनिवारची मारुतीची
कहाणी शनिवारची मारुतीची आटपाट नगर होते तिथे एक गरीब ब्राह्मण राहात होता. 
त्याला एक सून होती. त्याला एक मुलगा होता. मुलगा प्रवासाला गेला होता.  
सासूसासरे देवाला जात असत. भिक्षा मागून धान्य आणीत असत.  सून घरात बसून स्वयंपाक 
करून ठेवीत असे. सासू-सासर्‍यांना वाढीत असे. उरलासुरला आपण खात असे. 
असं होता होता श्रावण मास आला.  संपत शनिवार आला. तसा संपत शनिवारी आपला
एक मुलगा आला.बाई बाई मला न्हावू घाल. माखू घाल.  बाबा घरामध्ये तेल नाही. 
तुला न्हावू कशाने घालू ?  माझ्यापुरतं घागरीत तेल असेल.  थोडं शेंडीला लावून न्हावू घाल.जेवू घाल. 
घागरीत हात घालून तेल काढलं. त्याला न्हावू घालून जेऊ घातलं.  उरलंसुरलं आपण खाल्लं.  
असे चार शनिवार झाले.  चौथ्या शनिवारी या मुलान  तांदूळ मागून घेतले, जातेवेळी घरभर 
तांदूळ फेकून अदृश्य झाला. इकडे घराचा वाडा झाला.  गोठाभर गुरे झाली. धान्याच्या कोठ्या भरल्या.  
दासी बटकीनी घर भरले. 
सासू-सासरे देवाहून आले.  तो घर काही ओळखेना. हा वाडा कोणाचा?  सून  दारात आरती घेऊन आली. 
मामंजी सासुबाई इकडे या. अगं तू कोणाच्या घरात राहिली आहेस ? तिन सर्व हकीगत सांगितली. 
शनिवारी एक मुलगा आला.  बाई बाई मला न्हावू घाल, माखु घाल. बाबा घरामध्ये तेल नाही तुला न्हावू 
कशाने घालू ? माझ्यापुरतं घागरीत असेल थोडे शेंडीला लावून न्हावू घाल, जेवू घाल. घागरीत हात घालून 
तेलं काढलं. त्याला न्हावू घालून जेवू घातलं उरलंसुरलं आपण खाल्लं. असे चार शनिवार झाले.  
शनिवारी त्या मुलाने तांदूळ मागून घेतले जातेवेळी तांदूळ घरभर फेकून अदृश्य झाला. 
इकडे मोठा वाडा झाला तुम्ही चुकाल म्हणून मी मी दारात उभी राहिले.असं म्हणून त्यांना आरती केली.  
सर्वजण घरात गेली.  त्याना जसा मारुती प्रसन्न झाला,  तसा तुम्हा आम्हा होवो.  
ही  साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सुफळ  संपूर्ण.  . 


Kahani Ganapatichi कहाणी गणपतीची


Kahani Ganapatichi 
Kahani Ganapati is in Marathi.
These are the stories of Gods. Normally read in the month of Sharavan. Such first story is of God Ganesh.
कहाणी गणपतीची 
ऐका गणेशा तुमची कहाणी.
निर्मळ मळे, उदकाचे तळे, बेलाचा वृक्ष, सुवर्णाची कमळे, 
विनायकाची देवळे-रावळे. मनाचा गणेश मनीं वसावा.
हा वसा कधी घ्यावा? श्रावण्या चौथी घ्यावा. माही चौथी संपूर्ण करावा. 
संपूर्णाला काय करावं? पशा-पायलीचे पीठ कांडावं, अठरा लाडू करावे, 
सहा देवाला द्यावे, सहा ब्राह्मणाला द्यावे, सहांचं सहकुटुंब भोजन करावं. 
अल्पदान महापुण्य असा गणराज मनी ध्याइजे, पाविजे, चिंतिले लाभिजे, 
मनकामना निर्विघ्न कार्यसिद्धि करिजे. 

ही पाचा उत्तरांची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण. 


Saturday, August 10, 2019

ShriShivLilamrut Adhyay 11 श्रीशिवलिलामृत अध्याय अकरावा

 ShriShivLilamrut Adhyay 11 श्रीशिवलिलामृत अध्याय अकरावा




Custom Search

श्रीशिवलिलामृत अध्याय अकरावा
श्रीगणेशाय नमः ॥
धन्य धन्य तेचि जन । जे शिवभजनीं परायण ।
सदा शिवलीलामृत श्रवण । अर्चन सदा शिवाचे ॥ १ ॥
सूत म्हणे शौनकादिकांप्रति । जे रुद्राक्षधारण भस्म चर्चिती ।
त्यांच्या पुण्यास नाहीं मिती । त्रिजगतीं तेचि धन्य ॥ २ ॥
जोसहस्र रुद्राक्ष करी धारण । त्यासी वंदिती शक्रादि सुरगण ।
तो शंकरचि त्याचें दर्शन । घेतां तरती जीव बहु ॥ ३ ॥
अथवा षोडश षोडश दंडी जाण । बांधावे रुद्राक्ष सुलक्षण ।
शिखेमाजी एक बांधावा पूर्ण । शिवस्वरुप म्हणवुनी ॥ ४ ॥
त्यावरोनि करितां स्नान । तरी त्रिवेणी स्नान केल्यासमान ।
असो द्वादश द्वादश मनगटीं पूर्ण । रुद्राक्ष बांधिजे आदरे ॥ ५ ॥
कंठी बांधावे बत्तीस । मस्तकाभोंवते चोवीस । 
सहा सहा कर्णीं पुण्य विशेष । बांधितां निर्दोष सर्वदा ॥ ६ ॥
अष्टोत्तरशत माळ । सर्वदा असावी गळां ।
एकमुखी रुद्राक्ष आगळा । पूजितां भाग्य विशेष ॥ ७ ॥
पंचमुख षण्मुख अष्टमुख । चतुर्दशमुख लक्ष्मीकारक ।
सकळ मंत्र सुफळ देख । रुद्राक्षजप नित्य करितां ॥ ८ ॥
नित्य रुद्राक्षपूजन । तरी केलें जाणिजे शिवार्चन ।
रुद्राक्षमहिमा परम पावन । इतिहास ऐका येविषयीं ॥ ९ ॥
काश्मीर देशींचा नृप पावन । नामाभिधान भद्रसेन । 
विवेकसंपन्न प्रधान । परम चतुर पंडित ॥ १० ॥
प्रजा दायाद भूसुर । धन्य म्हणती तोचि राजेश्र्वर ।
लांच न घे न्याय करी साचार । अमात्य थोर तोचि पैं ॥ ११ ॥
सुंदर पतिव्रता मृदुभाषिणी । पूर्वदत्तें ऐसी लाघिजे कामिनी ।
सुत सभाग्य विद्वान गुणी । विशेष सुकृतें पाविजे ॥ १२ ॥
गुरु कृपावंत सर्वज्ञ थोर । शिष्य प्रज्ञावंत गुरुभक्त उदार ।
वक्ता क्षमाशील शास्त्रज्ञ सुरस फार । विशेष सुकृतें लाहिजे ॥ १३ ॥
श्रोता सप्रेम चतुर सावधान । यजमान साक्षेपी उदार पूर्ण ।
काय आरोग्य सुंदर कुलीन । पूर्वसुकृतें प्राप्त होय ॥ १४ ॥
असो तो भद्रसेन आणि प्रधान । बहुत करितां अनुष्ठान ।
दोघांसी झाले नंदन । शिव भक्त उपजतांचि ॥ १५ ॥
राजपुत्र नाम सुधर्म । प्रधानात्मज तारक नाम ।
दोघे शिवभक्त निःसीम । सावधान शिवध्यानीं ॥ १६ ॥
बाळें होऊनि सदा प्रेमळ । अनुराग चित्तीं वैराग्यशीळ ।
लौकिकसंगे ध्रुव अमंगळ । त्यांची संगती नावडे त्यां ॥ १७ ॥
पंचवर्षी दोघे कुमर । लेवविती वस्त्रें अलंकार ।
गजमुक्तमाळा मनोहर । नाना प्रकारें लेवविती ॥ १८ ॥
तंव ते बाळ दोघेजण । सर्वालंकार उपाधी टाकून ।
करिती रुद्राक्ष धारण ।भस्म चर्चिती सर्वांगीं ॥ १९ ॥
आवडे सर्वदा एकांत । श्रवण करिती शिवलीलामृत ।
बोलती शिवनामावळी सत्य । पाहाणें शिवपूजा सर्वदा ॥ २० ॥
आश्र्चर्य करिती राव प्रधान । यांसी कां नावडे वस्त्रभूषण ।
करिती रुद्राक्षभस्म धारण । सदा स्मरण शिवाचें ॥ २१ ॥
विभूति पुसोनि रुद्राक्ष काढिती । मागुती वस्त्रें भूषणें लेवविती ।
ते सवेंचि ब्राह्मणांसी अर्पिती । घेती मागुती शिवदीक्षा ॥ २२ ॥
शिक्षा करितां बहुत । परी ते न सांडिती आपुलें व्रत ।
राव प्रधान चिंताग्रस्त । म्हणती करावें काय आतां ॥ २३ ॥
तों उगवला सुकृतमित्र । घरासी आला पराशर ।
सवें वेष्टित ऋषींचे भार । अपर सूर्य तेजस्वी ॥ २४ ॥
जो कृष्णद्वैपायनाचा जनिता । त्रिकाळज्ञानी प्रतिसृष्टिकर्ता ।
जो वसिष्ठाचा नातू तत्त्वतां । राक्षससत्र जेणें केलें ॥ २५ ॥
जेवीं मनुष्यें वागती अपार । तैसेचि पूर्वीं होते रजनीचर ।
ते पितृकैवारें समग्र । जाळिले सत्र करुनियां ॥ २६ ॥
जनमेजयें सर्पसत्र केलें । तें आस्तिकें मध्येंचि राहविलें ।
पराशरासी पुलस्तीनें प्रार्थिलें । मग वांचले रावणादिक ॥ २७ ॥
विरंचीस दटावूनि क्षणमात्रें । प्रतिसृष्टि केली विश्र्वामित्रें ।
तेवीं पितृकैवारें पराशरें । वादी जर्जर पैं केले ॥ २८ ॥
ते सांगावी समूळ कथा । तरी विस्तार होईल ग्रंथा । 
यालागीं ध्वनितार्थ बोलिलों आतां । कळलें पाहिजे निर्धारें ॥ २९ ॥
ऐसा महाराज पराशर । ज्याचा नातू होय शुक योगींद्र । 
तो भद्रासेनाचा कुळगुरु निर्धार । घरा आला जाणोनी ॥ ३० ॥
राव प्रधान सामोरे धांवती । साष्टांग नमूनि घरासी आणिती ।
षोडशोपचारीं पूजिती । भाव चित्तीं विशेष ॥ ३१ ॥
समस्तां वस्त्रें भूषणें देऊन । राव विनवी कर जोडून ।
म्हणे दोघे कुमर रात्रंदिन । ध्यान करिती शिवाचें ॥ ३२ ॥
नाचडती वस्त्रें अलंकार । रुद्राक्षभस्मावरी सदा भर ।
वैराग्याशील अणुमात्र । भाषण न करिती कोणासीं ॥ ३३ ॥
इंद्रियभोगावरी नाहीं भर । नावडे राजविलास अणुमात्र ।
गजवाजियानीं समग्र । आरुढावें आवडेना ॥ ३४ ॥
पुढें हे कैसें राज्य करिती । हें आम्हांसी गूढ पडलें चित्तीं ।
मग ते दोघे कुमर आणोनि गुरुप्रती । दाखविले भद्रसेनें ॥ ३५ ॥
गुरुनें पाहिलें दृष्टीसीं । जैसे मित्र आणि शशी ।
तैसे तेजस्वी उपमा तयांसी । नाहीं कोठें शोदहितां ॥ ३६ ॥
यावरी बोले शक्तिसुत । म्हणे हे कां झाले शिवभक्त ।
यांची पूर्वकथा समस्त । ऐक तुज सांगतो ॥ ३७ ॥
पूर्वी काश्मीर देशांत उत्तम । महापट्टण नंदिग्राम ।
तेथील वारांगना मनोरम । महानंदा नाम तियेचें ॥ ३८ ॥
त्या ग्रामींचा तोचि भूप । पृथ्वीमाजी निःसीम स्वरुप ।
ललिताकृति पाहोनि कंदर्प । तन्मय होवोनि नृत्य करी ॥ ३९ ॥
जैसा उगवला पूर्णचंद्र । तैसें तिजवरी विराजे छत्र ।
रत्नखचित यानें अपार । भाग्या पार नाहीं तिच्या ॥ ४० ॥
रत्नमय दंडयुक्त । चामरें जीवरी सदा ढळत ।
मणिमय पादुका रत्नखचित । चरणीं जिच्या सर्वदा ॥ ४१ ॥
विचित्र वसनें दिव्य सुवास । हिरण्मय रत्नपर्यंतक राजस ।
चंद्ररश्मिसम प्रकाश । शय्या जिची अभिनव ॥ ४२ ॥
दिव्याभरणीं संयुक्त । अंगीं सुगंध विराजित ।
गोमहिषीखिल्लारें बहुत । वाजी गज घरीं बहुवस ॥ ४३ ॥
दास दासी अपार । घरीं माता सभाग्य सहोदर ।
जिचें गायन ऐकतां किन्नर । तटस्थ होती कोकिळा ॥ ४४ ॥
जिच्या नृत्याचें कौशल्य देखोन । सकळ नृप डोलविती मान ।
तिचा भोगकाम इच्छून । भूप सभाग्य येती घरा ॥ ४५ ॥
वेश्या असोनि पतिव्रता । नेमिला जो पुरुष तत्त्वतां ।
त्याचा दिवस न सरतां । इंद्रासही वश्य नव्हे ॥ ४६ ॥
परम शिवभक्त विख्यात । दानशील उदार बहुत ।
सोमवार प्रदोषव्रत । शिवरात्र करी नेमेंसीं ॥ ४७ ॥
अन्नछत्र सदा चालवीत । नित्य लक्षत्रिदळें शिव पूजित ।
ब्राह्मणहस्तें अद्भत । अभिषेक करवी शिवासी ॥ ४८ ॥
याचक मनीं जें जें इच्छीत । तें तें महानंदा पुरवीत ।
कोटि लिंगें करवीत । श्रावणमासीं अत्यादरें ॥ ४९ ॥
ऐकभद्रसेना सावधान । कुक्कुट मर्कट पाळिले प्रीतीकरुन ।
त्यांच्या गळां रुद्राक्ष बांधोन । नाचूं शिकविलें कौतुकें ॥ ५० ॥
आपुलें जें कां नृत्यागार । तेथें शिवलिंग स्थापिलें सुंदर ।
कुक्कुट मर्कट त्यासमोर । तेथेंचि बांधी प्रीतीनें ॥ ५१ ॥
करी शिवलीलामृतपुराणश्रवण । तेंही ऐकती दोघेजण । 
सवेंचि महानंदा करी गायन । नृत्य करी शिवापुढें ॥ ५२ ॥
महानंदा त्यांसी सोडून । नृत्य करवी कौतुकेंकरुन ।
त्यांच्या गळां कपाळीं जाण । विभूति चर्ची स्वहस्तें ॥ ५३ ॥
एवं तिच्या संगतीवरुन । त्यांसही घडतसे शिवभजन ।
असो तिचें सत्त्व पाहावया लागोन । सदाशिव पातला ॥ ५४ ॥
सौदागराचा वेष धरिला । महानंदेच्या सदना आला ।
त्याचें स्वरुप देखोनि ते अबला । तन्मय झाली तेधवां ॥ ५५ ॥
पूजा करोनि स्वहस्तकीं । त्यासी बैसविलें रत्नमंचकीं ।
तों पृथ्वीमोलाचें हस्तकीं । कंकण त्याच्या देखिलें ॥ ५६ ॥
देखतां गेली तन्मय होऊन । म्हणे स्वर्गींची वस्तु वाटे पूर्ण ।
विश्र्वकर्म्यानें निर्मिली जाण । मानंवी कर्तृत्व हें नव्हे॥ ५७ ॥
सौदागरें तें काढून । तिच्या हस्तकीं घातलें कंकण । 
येरी होवोनि आनंदघन । नेम करी तयासी ॥ ५८ ॥
पृथ्वीचें मोल हें कंकण । मीहि बत्तीस लक्षणी पद्मिण ।
तीन दिवस संपूर्ण । दासी तुमची झालें मी ॥ ५९ ॥
तयासी तें मानलें । सवेंचि त्यानें दिव्यलिंग काढलें ।
सूर्यप्रभेहूनि आगळें । तेज वर्णिलें नवजाय ॥ ६० ॥
लिंग देखोनि ते वेळीं । महानंदा तन्मय झाली ।
म्हणे जय जय चंद्रमौळी । म्हणोनि वंदी लिंगातें ॥ ६१ ॥
म्हणे या लिंगाच्या प्रभेवरुनी । कोटी कंकणें टाकावी ओवाळूनी ।
सौदागर म्हणे महानंदेलागूनी । लिंग ठेवी जतन हें ॥ ६२ ॥
म्हणे या लिंगापाशीं माझा प्राण । भंगलें कीं गेलें दग्ध होऊन ।
तरी मी अग्निप्रवेश करीन । महाकठीण व्रत माझें ॥ ६३ ॥
येरीनें अवश्य म्हणोन । ठेविलें नृत्यगारीं नेऊन ।
मग दोघे करिती शयन । रत्नखचित मंचकीं ॥ ६४ ॥
तिचें कैसें आहे सत्त्त्व । धैर्य पाहे सदाशिव ।
भक्त तारावया अभिनव । कौतुकचरित्र दाखवी ॥ ६५ ॥
त्याच्या आज्ञेंकरुन । नृत्यशाळेसी लागला अग्न ।
जन धांवों लागले चहूंकडोन । एकचि हांक जाहली ॥ ६६ ॥
तीस सावध करी मदनारी । म्हणे अग्नि लागला ऊठ लवकरी ।
येरी उठली घाबरी । तंव वातात्मज चेतला ॥ ६७ ॥
तैशामाजी उडी घालून । कंठपाश त्यांचे काढून ।
कुक्कुट मर्कट दिधले सोडून । गेले पळोन वनाप्रती ॥ ६८ ॥
नृत्यशाळा भस्म झाली समग्र । मग शांत झाला सप्तकर ।
यावरी पुसे सौदागर । महानंदेप्रति तेधवां ॥ ६९ ॥
माझें दिव्यलिंग आहे कीं जतन । महानंदा घाबरी ऐकोन ।
वक्षःस्थळ घेत बडवून । म्हणे दिव्यलिंग दग्ध झालें ॥ ७० ॥
सौदागर बोले वचन । नेमाचा आजि दुसरा दिन ।
मी आपुला देतों प्राण । लिंगाकारणें तुजवरी ॥ ७१ ॥
मग त्रिचरण चेतविला । आकाशपंथें जाती ज्वाळा ।
सौदागर सिद्ध झाला । समीप आला कुंडाच्या ॥ ७२ ॥
अतिलाघवी उमारंग । जो भक्तजनभवभंग ।
उडी घातली सुवेग । ॐ नमः शिवाय म्हणवुनी ॥ ७३ ॥
ऐसें देखतां महानंदा । बोलाविलें सर्व ब्रह्मवृंदा ।
लुटविली सर्व संपदा । कोशसमवेत सर्वही ॥ ७४ ॥
अश्र्वशाळा गजशाळा संपूर्ण । सर्व संपत्तिसहित करी गृहदान ।
महानंदेनें स्नान करुन । भस्म अंगीं चर्चिलें ॥ ७५ ॥
रुद्राक्ष सर्वांगी लेऊन । हृदयीं चिंतिलें शिवध्यान ।
हर हर शिव म्हणवुन । उडी निःशंक घातली ॥ ७६ ॥
सूर्यबिंब निघे उदयाचळीं । तैसा प्रगटला कपाळमौळी ।
दशभुज पंचवदन चंद्रमौळी । संकटीं पाळी भक्तांतें ॥ ७७ ॥         
माथां जटांचा भार । तृतीयनेत्रीं वैश्र्वानर । 
शिरी झुळझुळ वाहे नीर । भयंकर महाजोगी ॥ ७८ ॥
चंद्रकळा तयाचे शिरीं । नीळकंठ खट्वांगधारी ।
भस्म चर्चिलें शरीरीं । जगचर्म पांघुरला ॥ ७९ ॥
नेसलासे व्याघ्रांबर । गळां मनुष्यमुंडांचें हार ।
सर्वांग वेष्टित फणिवर । दशभुजा मिरवती ॥ ८० ॥
वरचेवरी कंदुक झेलीत । तेवीं दहाभुजा पसरोनी अकस्मात ।
महानंदेसी झेलूनि  धरीत । हृदयकमळीं परमात्मा ॥ ८१ ॥
म्हणें जाहलों मी सुप्रसन्न । महानंदे माग वरदान ।
ती म्हणे हे नगर उद्धरुन । विमानीं बैसवीं दयाळा ॥ ८२ ॥
माताबंधूंसमवेत । महानंदा विमानीं बैसत ।
दिव्यरुप पावोनि त्वरित । नगरासमवेत चालली ॥ ८३ ॥
पावलीं सकळ शिवपदीं । जेथें नाहीं आधिव्याधी ।
क्षुधातृषाविरहित त्रिशुद्धी । भेदबुद्धि कैंची तेथें ॥ ८४ ॥
नाहीं काम क्रोध द्वंद्व दुःख । मद मत्सर नाहीं निःशंक । 
जेथींचें गोड उदक । अमृताहूनि कोटिगुणें ॥ ८५ ॥
जेथें सुरतरुंचीं वनें अपारें । सुरभींचीं बहुत खिल्लारें ।
चिंतामणींचीं धवलागारें । भक्तांकारणें निर्मिलीं ॥ ८६ ॥
जेथें वोसणतां बोलती शिवदास । तें तें मास होय तयांस ।
शिवपद सर्वदा अविनाश । महानंदा तेथें पावली ॥ ८७ ॥
हे कथापरम सुरस । पराशर सांगे भद्रसेनास ।
म्हणे हे कुमर दोघे निःशेष । कुक्कुट मर्कट पूर्वींचे ॥ ८८ ॥
कंठीं रुद्राक्षधारण । भाळीं विभूति चर्चून ।
त्याचि पूर्वपुण्येंकरुन । सुधर्म तारक उपजले ॥ ८९ ॥
हे पुढें राज्य करतील निर्दोष । बत्तीसलक्षणीं डोळस ।
शिवभजनीं लाविती बहुतांस । उद्धरितील तुम्हांतें ॥ ९० ॥
अमात्यसहित भद्रसेन । गुरुसी घाली लोटांगण ।
म्हणे इतुकेन मी धन्य । सुपुत्र उदरीं जन्मले ॥ ९१ ॥
भद्रसेन बोलत पुढती । हे राज्य किती वर्षें करिती ।
आयुष्याप्रमाण किती । सांगा यथार्थ गुरुवर्या ॥ ९२ ॥
बहुत करितां नवस । एवढाचि पुत्र आम्हांस ।
परम प्रियकर राजस । प्राणांहूनि आवडे बहु ॥ ९३ ॥
तुमच्या आगमनेंकरुन । स्वामी मज समाधान ।
तरी या पुत्रांचें आयुष्यप्रमाण । सांगा स्वामी मज तत्त्वतां ॥ ९४ ॥
ऋषि मी सत्य बोलेन देख । परी तुम्हांसी ऐकता वाटेल दुःख ।
हे सभा सकळीक । दुःखार्णवीं पडेल पैं ॥ ९५ ॥
प्रत्ययसदृश बोलावें वचन । ना तरी आंगास येतें मूर्खपण ।
तुम्हां वाटेल विषाहून । विशेष ऐसी ते गोष्टी ॥ ९६ ॥
भद्रसेन म्हणे सत्य वचन । बोलावया न करावा अनमान ।
तरी तुझ्या पुत्रासी बारा वर्षे पूर्ण । झालीं असतां जाणपां ॥ ९७ ॥
आजपासोनि सातवे दिवशीं । मृत्यु पावेल या समयासी ।
राव ऐकतां धरणीसी । मूर्छा येऊनि पडियेला ॥ ९८ ॥
अमात्यासहित त्या स्थानीं । दुःखाग्नींत गेले आहाळोनी ।
अंतःपुरीं सकळ कामिनी । आकांत करिती आक्रोशें ॥ ९९ ॥
करुनियां हाहाकार । वक्षःस्थळ पिटी नृपवर ।
मग रायासी पराशर । सावध करोनि गोष्ट सांगे ॥ १०० ॥
नृपश्रेष्ठा न सोडीं धीर । ऐक एक सांगतों विचार ।
जें पंचभूतें नव्हतीं समग्र । शशिमित्र नव्हते तैं ॥ १०१ ॥
नव्हता मायामय विकाार । केवळ ब्रह्ममय साचार ।
तेथें झालें स्फुरणजागर । अहं ब्रह्म म्हणोनियां ॥ १०२ ॥
तें ध्वनि माया सत्य । तेथोनि जाहलें महत्तत्त्व ।
मगत्रिविध अहंकार होत । शिवइच्छेंकरुनियां ॥ १०३ ॥
सत्त्वांशें निर्मिला पीतवसन । रजांशें सृष्टिकर्ता द्रुहिण ।
तमांशें रुद्र परिपूर्ण । सर्गस्थित्यंत करविता ॥ १०४ ॥
विधीसी म्हणे सृष्टि रचीं पूर्ण । येरु म्हणे मज नाहीं ज्ञान ।
मग शिवें तयालागून । चारी वेद उपदेशिले ॥ १०५ ॥
चहूं वेदांचें सार पूर्ण । तो हा रुद्राध्याय परम पावन ।
त्याहूनि विशेष गुह्य ज्ञान । भुवनत्रयीं असेना ॥ १०६ ॥
बहुत करीं हा जतन । त्याहूनि आणिक थोर नाहीं साधन ।
हा रुद्राध्याय शिवरुप म्हणून । श्रीशंकर स्वयें बोले ॥ १०७ ॥
जे रुद्राध्याय ऐकती पढती । त्यांच्या दर्शनें जीव उद्धरती ।
मग कमलोद्भव एकांतीं । सप्तपुत्रां सांगे रुद्र हा ॥ १०८ ॥
मग सांप्रदायें ऋषीपासोन । भूतलीं आला अध्याय जाण ।
थोर जप तप ज्ञान । त्याहूनि अन्य नसेचि ॥ १०९ ॥
जो हा अध्याय जपे संपूर्ण । त्याचेनि दर्शनें तीर्थें पावन ।
स्वर्गींचे देव दर्शन । त्याचे घेऊं इच्छिती ॥ ११० ॥
जप तप शिवार्चन । याहूनि थोर नाहीं जाण ।
रुद्रमहिमा अगाध पूर्ण । किती म्हणोनि वर्णावा ॥ १११ ॥
रुद्रमहिमा वाढला फार । ओस पडिलें भानुपुत्रनगर ।
पाश सोडोनि यमकिंकर । रिते हिंडो लागले ॥ ११२ ॥
मग यमें विधिलागी पुसोन । अभक्तिकृत्या निर्मिली दारुण ।
तिणें कुतर्कवादी भेदी लक्षून । त्यांच्या हृदयीं संचरली ॥ ११३ ॥
त्यांसी मत्सर वाढविला विशेष । वाटे करावा शिवद्वेष ।
तेणें ते जावोनि यमपुरीस । महानरकीं पडलें सदा ॥ ११४ ॥
यम सांगे दूतांप्रती । शिवद्वेषी जेपापमती । 
ते अल्पायुषी होती । नाना रीतीं जाचणी करा ॥ ११५ ॥
शिव थोत विष्णु लहान । हरि विशेष हर गौण ।
ऐसें म्हणतीजे त्यालागून । आणोनि नरकीं घालावे ॥ ११६ ॥        
रुद्राध्याय नावडे ज्यांसी । कुंभीपाकीं घालावें त्यांसी ।
रुद्रानुष्ठानें आयुष्यासी । वृद्धि होय निर्धारें ॥ ११७ ॥
याकरितां भद्रसेना अवधारीं । अयुत रुद्रावर्तनें करीं ।
शिवावरी अभिषेकधार धरीं । मृत्यु दूरी होय साच ॥ ११८ ॥
अथवा शतघट स्थापून । दिव्यवृक्षांचे पल्लव आणून ।
रुद्रें उदक अभिमंत्रून । अभिषिंचन पुत्रा करीं ॥ ११९ ॥
नित्य दहा सहस्र आवर्तनें पूर्ण । क्षोणीपाळा करीं सप्तदिन ।
रायें धरिलें दृढ चरण । सद्गद होवोनि बोलत ॥ १२० ॥
सकळऋषिरत्नमंडितपदक । स्वामी तूं त्यांत मुख्य नायक ।
काळ मृत्यु भय शोक । गुरु रक्षी त्यांपासूनि ॥ १२१ ॥
तरी त्वां आचार्यत्व करावें पूर्ण । तुजसवें जे आहेत ब्राह्मण ।
आणीक सांगती ते बोलावून । आतांचि आणितों आरंभी ॥ १२२ ॥
मग सहस्र विप्र बोलावून । ज्यांची रु्रानुष्ठानीं भक्ति पूर्ण ।
न्यासध्यानयुक्त पढून । गुरुपासून जे आले ॥ १२३ ॥
परदारा आणि परधन । ज्यांसी वमनाहूनि नीच पूर्ण ।
विरक्त सुशील गेलिया प्राण । दुष्ट प्रतिग्रह न घेती ॥ १२४ ॥
जे शापानुग्रहसमर्थ । सामर्थ्यें चालों न देती मित्ररथ ।
किंवा साक्षात उमानाथ । पुढें आणोनि उभा करिती ॥ १२५ ॥
ऐसे लक्षणयुक्त ब्राह्मण । बैसला व्यासपिता घेऊन ।
सहस्र घट मांडून । अभिमंत्रोनि स्थापिले ॥ १२६ ॥
स्वर्धुनीचें सलिल भरलें पूर्ण । त्यांत आम्रपल्लव घालून ।
रुद्रघोषें गर्जिन्नले ब्राह्मण । अनुष्ठान दिव्य मांडिलें ॥ १२७ ॥
शास्त्रसंख्या झाले दिवस । सातवे दिवशीं मध्यान्हीं आला चंडांश ।
मृत्युसमय येतां धरणीस । बाळ मूर्छित पडियेला ॥ १२८ ॥
एक मूहूर्त निचेष्टित । चलनवलन राहिलें समस्त ।
परम घाबरला नृपनाथ । गुरु देत नाभीकारा ॥ १२९ ॥
रुद्रोदक शिंपून । सावध केला राजनंदन ।
त्यासी पुसती वर्तमान । वर्तलें तेंचि सांगत ॥ १३० ॥
एक काळपुरुष भयानक थोर । ऊर्ध्व जटा कपाळीं शेंदूर ।
विक्राळ दाढा भयंकर । नेत्र खदिरांगारासारखें ॥ १३१ ॥
तो मज घेऊनि जात असतां । चौघे पुरुष धांवोनि आले तत्त्वतां ।
पंचवदन दशभुज त्यांची साम्यता । कमळ भवांडीं दुजी नसे ॥ १३२ ॥
ते तेजें जैसे गभस्ती । दिगंततम संहारिती ।
भस्म अंगीं व्याघ्रांबर दिसती । दश हस्तीं आयुधें ॥ १३३ ॥
ते महाराज येऊन । मज सोडविलें तोडोनि बंधन ।
त्या काळपुरुषासी धरुन । करीत ताडन गेले ते ॥ १३४ ॥
ऐसें पुत्रमुखींचें ऐकतां उत्तर । भद्रसेन करी जयजयकार ।
ब्राह्मणांसी घाली नमस्कार । आनंदाश्रु नेत्रीं आले ॥ १३५ ॥
अंगीं रोमांच दाटले । मग विप्र चरणीं गडबडां लोळे ।
शिवनाम गर्जत तये वेळे । देव सुमनें वर्षती ॥ १३६ ॥
अनेक वाद्यांचे गजर । डंका गर्जे अवघ्यांत थोर ।
मुखद्वयांची महासुस्वर । मृदंगवाद्यें गर्जती ॥ १३७ ॥
अनेक वाद्यांचे गजर । शिवलीला गाती अपार । 
श्रृंगेंभृंगे काहाळ थोर । सनया अपार वाजती ॥ १३८ ॥
चंद्रानना धडकत भेरी । नाद न माये नभोदरीं । 
असो भद्सेन यावरी । विधियुक्त होम करीतसे ॥ १३९ ॥
षड्रस अन्नें शोभिवंत । अलंकार दिव्य वस्त्रें देत ।
अमोलिक वस्तु अद्भुत । आणोनि अर्पीं ब्राह्मणांसी ॥ १४० ॥
दक्षिणेलागी भांडारें । मुक्त केली राजेंद्रें ।
म्हणे आवडे तितुके भरा एकसरें । मागें पुढें पाहूं नका ॥ १४१ ॥
सर्व याचक केले तृप्त । पुरे पुरे हेचि ऐकिली मात । 
धनभार झाला बहुत । म्हणोनि सांडिती ठायीं ठायीं ॥ १४२ ॥
ब्राह्मण देती मंत्राक्षता । विजय कल्याण हो तुझिया सुता ।
ऐसा अति आनंद होत असतां । तों अद्भुत वर्तलें ॥ १४३ ॥
वसंत येत सुगंधवनीं । कीं काशीक्षेत्रावरी स्वर्धुनी ।
कीं श्र्वेतोत्पलें मृडानी । रमण लिंग अर्चिलें ॥ १४४ ॥
कीं निर्दैवासी सांपडे चिंतामणी । कीं क्षुधितापुढें क्षीराब्धि ये धांवूनी ।
तैसा कमलोद्भवनंदन ते क्षणीं । नारदमुनी पातला ॥ १४५ ॥
वाल्मीक सत्यवतीनंदन । औत्तान पादीकयाधुहृददयरत्न ।
हे शिष्य ज्याचे त्रिभुवनीं जाण । वंद्य जे कां सर्वांतें ॥ १४६ ॥
जो चतुःष्ठिकळाप्रवीण  निर्मळ । चतुर्दशविद्या करतळामळ ।
ज्याचें स्वरुप पाहतां केवळ । नारायण दुसरा कीं ॥ १४७ ॥
हें कमळभवांड मोडोनी । पुनः सृष्टि करणार मागुतेनी ।
अन्याय विलोकितां नगनीं । दंडें ताडील शक्रादिकां ॥ १४८ ॥
तों नारद देखोनि तेचि क्षणीं । कुंडांतूनि मूर्तिमंत निघे अग्नी ।
दक्षिणाग्नि गार्हपत्य आहवनी । उभे ठाकले देखतां ॥ १४९ ॥
पराशरादि सकळ ब्राह्मण ।  प्रधानासहित भद्रसेन । 
धांवोनि धरिती चरण । ब्रह्मानंदें उचंबळले ॥ १५० ॥
दिव्य गंध दिव्य सुमनीं । षोडशोपचारें पूजिला नारदमुनी ।
राव उभा ठाकें कर जोडोनी । म्हणे स्वामी अंर्तीदिव्यद्रष्टा तूं ॥ १५१ ॥
त्रिभुवनीं गमन तुझें सर्व । कांहीं देखिलें सां अपूर्व ।
नारद म्हणे मार्गीं येतां शिव- । दूत चौघे देखिले ॥ १५२ ॥
दशभुज पंचवदन । तिहीं मृत्यु नेला बांधोन ।
तुझ्या पुत्राचें चुकविलें मरण । रुद्रानुष्ठानें धन्य केलें ॥ १५३ ॥
तव पुत्ररक्षणार्थ ते वेळां । शिवें वीरभद्र मुख्य पाठविला ।
मज देखतां मृत्युसी पुसूं लागला । शिवसुत ऐका तें ॥ १५४ ॥
तूं कोणाच्या आज्ञेवरुन । आणीत होतासी भद्रसेननंदन ।
त्यासी दहा सहस्र वर्षें पूर्ण । आयुष्य असे निश्र्चयें ॥ १५५ ॥
तो सार्वभौम होईल तत्त्वतां । रुद्रमहिमा तुज ठाऊक असतां ।
शिवमर्यादा उल्लंघूनि तत्त्वतां । कैसा आणीत होतासी ॥ १५६ ॥
मग चित्रगुप्ता पुसे सूर्यनंदन । पत्रिका पाहिली वाचून ।
तव द्वादशवर्षीं मृत्युचिन्ह । गंडांतर थोर होतें ॥ १५७ ॥
तें महत्पुण्यें निरसूनि सहज । दहा सहस्र वर्षें करावें राज्य ।
मग तो सूर्यनंदन महाराज । स्वापराधें कष्टीं बहू ॥ १५८ ॥
मग उभा ठाकूनि कृतांत । कर जोडोनि स्तवन करीत ।
हे अपर्णाधव हिमनगजामात । अपराध न कळतां घडला हा ॥ १५९ ॥
ऐसें नारदें सांगतां ते क्षणीं । रायें पायांवरी घातली लोळणी ।
आणीक सहस्र रुद्र करुनी । महोत्साह करीतसे ॥ १६० ॥
शतरुद्र करितां निःशेष । शतायुषी होय तो पुरुष । 
हा अध्याय पढतां निर्दोष । तो शिवरुप याचि देहीं ॥ १६१ ॥
तो येथेंचि झाला मुक्त । त्याच्या तीर्थें तरती बहुत ।
असो यावरी ब्रह्मसुत । अंतर्धान पावला ॥ १६२ ॥
आनंदमय शक्तिनंदन । रायें शतपद्म धन देऊन ।
तोषविला गुरु संपूर्ण । ऋषिंसहित जाता झाला ॥ १६३ ॥
हें भद्रसेन आख्यान जें पढती । त्यांसी होय आयुष्य संतती ।
त्यांसी काळ न बाधे अंतीं । वंदोनि नेती शिवपदा ॥ १६४ ॥
दशशत कपिलादन । ऐकतां पडतां घडे पुण्य ।
केलें असेल अभक्ष्यभक्षण । सुरापान ब्रह्महत्या ॥ १६५ ॥
एवं महापापपर्वत तत्त्वतां । भस्म होती श्रवण करितां ।
हा अध्याय त्रिकाळ वाचितां । गंडांतरें दूर होती ॥ १६६ ॥
यावरी कलियुगीं निःशेष । शिवकीर्तनाचा महिमा विशेष ।
आयुष्यहीन लोकांस । अनुष्ठान हेंचि निर्धारें ॥ १६७ ॥
मग तो राव भद्रसेन । सुधर्म पुत्रासी राज्य देऊन ।
युवराज्य तारकालागून । देता झाला ते काळीं ॥ १६८ ॥
मग प्रधानासमवेत राव जाणा । जाता झाला तपोवना ।
शिवअनुष्ठान रुद्राध्याना । करितां महारुद्र तोषला ॥ १६९ ॥
विमानीं बैसवूनि त्वरित । राव प्रधान नेलें मिरवित ।
विधिलोकीं वैकुंठीं वास बहुत । स्वेच्छेंकरुनि राहिले ॥ १७० ॥
शेवटीं शिवपदासी पावून । राहिले शिवरुप होऊन ।
हा अकरावा अध्यय जाण । स्वरुप एकादश रुद्रांचें ॥ १७१ ॥
हा अध्याय करितां श्रवण । एकादश रुद्रां समाधान ।
कीं हा कल्पद्रुम संपूर्ण । इच्छिलें फळ देणार ॥ १७२ ॥
मृत्युंजयजप रुद्रानुष्ठान । त्यासी न बाधी ग्रहपीडा विघ्न ।
पिशाचबाधा रोग दारुण । न बाधीच सर्वथाही ॥ १७३ ॥
येथें जो मानील अविश्र्वास । तो होईल अल्पायुषी तामस ।
हें निंदी तो चांडाळ निःशेष । त्याचा विटाळ न व्हावा ॥ १७४ ॥
त्यासी प्रसवोनि वांझ झाली माता । त्याची संगती न धरावी तत्त्वतां ।
त्यासी संभाषण करितां । महापातक जाणिजे ॥ १७५ ॥
ते आपुल्या गृहासी न आणावे । आपण त्यांच्या सदनासी न जावें । 
ते त्यजावे जीवेंभावें । जेवीं सुशील हिंसकगृह ॥ १७६ ॥
जो प्रत्यक्ष भक्षितो विष । जे मूर्ख बैसती त्याचे पंक्तीस ।
त्यांसी मृत्यु आला या गोष्टीस । संदेह कांहीं असेना ॥ १७७ ॥
असों सर्वभावें निश्र्चित । अखंड पहावें शिवलीलामृत ।
हें न तरी त्वरित । हा अध्याय तरी वाचावा ॥ १७८ ॥
या अध्यायाचें करितां अनुष्ठान । तयासी नित्य रुद्र केल्याचें पुण्य ।
त्याचे घरीं अनुदिन । ब्रह्मानंद प्रगटेल ॥ १७९ ॥
अपर्णाहृदयाब्जमिलिंद । श्रीधरस्वामी तो ब्रह्मानंद । 
जो जगदानंदमूळकंद । अभंग न विटे कालत्रयीं ॥ १८० ॥   
शिवलीलामृत ग्रंथ प्रचंड । स्कंदपुराण ब्रह्मोत्तरखंड । 
परिसोत सज्जन अखंड । एकादशाध्याय गोड हा ॥ १८१ ॥
॥ इति एकादशोऽध्यायः संपूर्णः ॥ 
॥ श्रीसांबसदाशिवार्पणमस्तु ॥
ShriShivLilamrut Adhyay 11
श्रीशिवलिलामृत अध्याय अकरावा



Custom Search