Saturday, July 11, 2020

ShriRamcharitmans Part 25 श्रीरामचरितमानस भाग २५


ShriRamcharitmans Part 25 श्रीरामचरितमानस भाग २५ 
दोहा १५८ ते १६१ 
श्रीरामचरितमानस---प्रथम सोपान---बालकाण्ड
दोहा—भूपति तृषित बिलोकि तेहिं सरबरु दीन्ह देखाइ ।
मज्जन पान समेत हय कीन्ह नृपति हरषाइ ॥ १५८ ॥
राजा तहानलेला पाहून मुनीने त्याला सरोवर दाखविले. प्रतापभानूने आनंदाने घोड्यासह त्यात स्नान करुन पाणी पिऊन घेतले. ॥ १५८ ॥
गै श्रम सकल सुखी नृप भयऊ । निज आश्रम तापस लै गयऊ ॥
आसन दीन्ह अस्त रबि जानी । पुनि तापस बोलेउ मृदु बानी ॥
त्याचा थकवा दूर झाला, त्याला बरे वाटले. मग तो तपस्वी त्याला आपल्या आश्रमात घेऊन गेला. सूर्यास्ताची वेळ झाल्याचे पाहून राजाला बसण्यास आसन देऊन तपस्व्याने कोमल शब्दांत त्याला विचारले, ॥ १ ॥
को तुम्ह कस बन फिरहु अकेलें । सुंदर जुबा जीव परहेलें ॥
चक्रबर्ति के लच्छन तोरें । देखत दया लागि अति मोरें ॥
‘ तुम्ही कोण आहात ? सुंदर तरुण असतांना जिवाची पर्वा न करता वनात एकटे का फिरत आहत ? तुमच्या ठिकाणी चक्रवर्ती राजाची लक्षणे पाहून मला तुमची कीव येते.’ ॥ २ ॥
नाम प्रतापभानु अवनीसा । तासु सचिव मैं सुनहु मुनीसा ॥
फिरत अहेरें परेउँ भुलाई । बड़ें भाग देखेउँ पद आई ॥
राजा म्हणाला, ‘ हे मुनीश्र्वरा. ऐका. प्रतापभानू नावाचा एक राजा आहे, त्याचा मी मंत्री आहे. शिकारीसाठी फिरताना वाट चुकलो आहे. सुदैवाने येथे आल्यामुळे तुमच्या चरणांचे दर्शन घडले. ॥ ३ ॥
हम कहँ दुर्लभ दरस तुम्हारा । जानत हौं कछु भल होनिहारा ॥
कह मुनि तात भयउ अँधिआरा । जोजन सत्तरि नगरु तुम्हारा ॥
मला तुमचे दुर्लभ दर्शन झाल्याने असे वाटते की, आता काही चांगले घडणार आहे. ‘ मुनी म्हणाला, ‘ अरे बाबा, अंधार झालेला आहे. तुझे नगर येथून सत्तर योजने दूर आहे. ॥ ४ ॥
दोहा—निसा घोर गंभीर बन पंथ न सुनहु सुजान ।
बसहु आजु अस जानि तुम्ह जाएहु होत बिहान ॥ १५९ ( क) ॥
हे शहाण्या गृहस्था ! माझे ऐक. घोर अंधारी रात्र आहे. जंगल घनदाट आहे, वाट नाही, म्हणून तू आज येथेच थांब. सकाळ झाल्यावर जा.’ ॥ १५९ ( क ) ॥
तुलसी जसि भवतब्यता तैसी मिलइ सहाइ ।
आपुनु आवइ ताहि पहिं ताहि तहाँ लै जाइ ॥ १५९ ( ख ) ॥
तुलसीदास म्हणतात की, नशिबात जसे घडणार असते, तशीच घटना घडते. एक तर तुम्ही आपणहून तिच्याजवळ जाता, किंवा ती तुम्हांला तेथे घेऊन जाते. ॥ १५९ ( ख ) ॥
भलेहिं नाथ आयसु धरि सीसा । बाँधि तुरग तरु बैठ महीसा ॥
नृप बहु भाँति प्रसंसेउ ताही । चरन बंदि निज भाग्य सराही ॥
( राजा म्हणाला, ) ‘ हे स्वामी ! फार छान. ‘ असे म्हणून त्याची आज्ञा मानून राजाने घोड्याला एका झाडाला बांधले आणि तो बसला. राजाने त्या मुनीची खूप प्रशंसा केली आणि त्याच्या चरणी वंदन करुन तो आपल्या भाग्याची वाखाणणी करु लागला. ॥ १ ॥
पुनि बोलेउ गिरा सुहाई । जानि पिता प्रभु करउँ ढिठाई ॥
मोहि मुनीस सुत सेवक जानी । नाथ नाम निज कहहु बखानी ॥
नंतर तो गोड वाणीने म्हणाला की, ‘ हे प्रभो, मी तुम्हांला पित्याप्रमाणे समजून हे साहस करतो. हे मुनीश्र्वर, मला आपला पुत्र आणि सेवक समजून आपले नाव, गाव सविस्तर सांगा. ‘ ॥ २ ॥
तेहि न जान नृप नृपहि सो जाना । भूप सुहृद सो कपट सयाना ॥
बैरी पुनि छत्री पुनि राजा । छल बल कीन्ह चहइ निज काजा ॥
राजाने त्या कपटी मुनीला ओळखले नाही, परंतु त्याने ( मुनीने ) राजाला ओळखले होते. राजाचे मन सरळ होते आणि तो मुनी कपट करण्यात चतुर होता. एकतर तो वैरी होता, त्यात क्षत्रिय जातीचा, शिवाय राजा. तो कपटाने आपले काम करु पाहात होता. ॥ ३ ॥
समुझि राजसुख दुखित अराती । अवाँ अनल इव सुलगइ छाती ॥
सरल बचन नृप के सुनि काना । बयर सँभारि हृदयँ हरषाना ॥
तो ( मुनिवेषधारी ) शत्रू आपल्या राज्यसुखाची आठवण करीत दुःखी होता. त्याचे मन कुंभाराच्या आव्याप्रमाणे आतून भाजून निघत होते. राजाचे साधे-भोळे शब्द ऐकून आणि आपले वैर मनात धरुन तो आनंदात होता. ॥ ४ ॥
दोहा—कपट बोरि बानी मृदुल बोलेउ जुगुति समेत ।
नाम हमार भिखारि अब निर्धन रहित निकेत ॥ १६० ॥
तो कपटाने मोठ्या युक्तीने कोमल वाणीने म्हणाला, ‘ आता आमचे नाव ‘ भिकारी ‘ आहे, कारण आम्ही निर्धन व घर-दार नसलेले आहोत.’ ॥ १६० ॥
कह नृप जे बिग्यान निधाना । तुम्ह सारिखे गलित अभिमाना ॥
सदा रहहिं अपनपौ दुराएँ । सब बिधि कुसल कुबेष बनाएँ ॥
राजा म्हणाला, ‘ तुमच्यासारखे जे विज्ञानी व निरभिमानी असतात, ते आपले खरे स्वरुप नेहमी लपवून ठेवतात. कारण दीन वेष धारण करुन राहण्यातच सर्व प्रकारचे कल्याण आहे. ( प्रकटपणे संतवेष असल्यास मान-सन्मान होण्याची शक्यता असते आणि मानामुळे पतन घडण्याची ) ॥ १ ॥
तेहि तें कहहिं संत श्रुति टेरें । परम अकिंचन प्रिय हरि केरें ॥
तुम्ह सम अधन भिखारि अगेहा । होत बिरंचि सिवहि संदेहा ॥
यामुळेच संत व वेद उच्च स्वराने म्हणतात की, परम अकिंचन ( पूर्णपणे अहंकार, ममता व मानरहित ) लोकच भगवंतांना आवडतात. तुमच्यासारखे निर्धन, भिकारी आणि गृहहीन लोक पाहून ब्रह्मदेव व शिव यांनाही संदेह होतो ( की हे खरे संत आहेत की भिकारी. ॥ २ ॥
जोसि सोसि तव चरन नमामी । मो पर कृपा करिअ अब स्वामी ॥
सहज प्रीति भूपति कै देखी । आपु बिषय बिस्वास बिसेषी ॥
तुम्ही जे असाल ते असा. मी तुमच्या चरणी नमस्कार करतो. हे स्वामी, आता मजवर कृपा करा. ‘ आपल्यावरचे राजाचे सरळ प्रेम आणि आपल्याविषयीचा त्याचा विश्र्वास पाहून, ॥ ३ ॥
सब प्रकार राजहि अपनाई । बोलेउ अधिक सनेह जनाई ॥
सुनु सतिभाउ कहउँ महिपाला । इहाँ बसत बीते बहु काला ॥
सर्व प्रकारे राजाला आपल्या वश करुन घेऊन मोठे प्रेम दाखवीत तो ( कपटी तपस्वी ) म्हणाला, ‘ हे राजा, ऐक. मी तुला खरे सांगतो. की, मला येथे राहून बराच काळ लोटला. ॥ ४ ॥
दोहा—अब लगि मोहि न मिलेउ कोउ मैं न जनावउँ काहु ।
लोकमान्यता अनल सम कर तप कानन दाहु ॥ १६१ ( क ) ॥
आजपर्यंत मला कोणी भेटले नाही आणि मीही कुणाला भेटत नाही. कारण जगात प्रतिष्ठा ही अग्नीप्रमाणे आहे. ती तपरुपी वन भस्म करुन टाकले,’ ॥ १६१ ( क ) ॥
सो०—तुलसी देखि सुबेषु भूलहिं मूढ़ न चतुर नर ।
सुंदर केकिहि पेखु बचन सुधा सम असन अहि ॥ १६१ ( ख ) ॥
तुलसीदास म्हणतात की, ‘ सुंदर वेष पाहून मूर्खच नव्हे, तर चतुर मनुष्यसुद्धा फसतात. सुंदर मोर बघा ना ! त्याचे बोल अमृतासारखे असतात आणि आहार मात्र सापाचा असतो.’ ॥ १६१ ( ख ) ॥
तातें गुपुत रहउँ जग माहीं । हरि तजि किमपि प्रयोजन नाहीं ॥
प्रभु जानत सब बिनहिं जनाएँ । कहहु कवनि सिधि लोक रिझाएँ ॥
कपट-स्वामी म्हणाला की,’ यासाठी मी जगापासून लपून राहातो. श्रीहरींना सोडून कुणाशी काहीही संबंध ठेवीत नाही. प्रभू हे तर न सांगताच सर्व जाणतात. मग सांग. जगाला प्रसन्न केल्याने कसली सिद्धी मिळणार ? ॥ १ ॥
तुम्ह सुचि सुमति परम प्रिय मोरें । प्रीति प्रतीति मोहि पर तोरें ॥
अब जौं तात दुरावउँ तोही । दारुन दोष घटइ अति मोही ॥
तू पवित्र व सद्बुद्धिचा आहेस. त्यामुळे तू मला फार आवडतोस आणि तुझे प्रेम व विश्वास माझ्यावर आहे. म्हणून बाबा रे ! आता जर  मी तुझ्यापासून काही लपवून ठेवीन, तर मला भयंकर पाप लागेल. ‘ ॥ २ ॥
जिमि जिमि तापसु कथइ उदासा । तिमि तिमि नृपहि उपज बिस्वासा ॥
देखा स्वबस कर्म मन बानी । तब बोला तापस बगध्यानी ॥
तो तपस्वी जसजशा उदासीनतेच्या गोष्टी बोलत होता, तसातसा राजाला जास्त विश्वास वाटू लागला. जेव्हा त्या बगळ्याप्रमाणे ध्यान लावणार्‍या ( कपटी ) मुनीने राजाला कायावाचामनाने सर्व प्रकारे आपल्याला वश झाल्याचे पाहिले, तेव्हा तो म्हणाला, ॥ ३ ॥
नाम हमार एकतनु भाई । सुनि नृप बोलेउ पुनि सिरु नाई ॥
कहहु नाम कर अरथ बखानी । मोहि सेवक अति आपन जानी ॥
‘ हे बंधो, आमचे नांव एकतनू आहे. ‘ हे ऐकून राजाने 

मस्तक नम्र करुन म्हटले, ‘ मला आपला अत्यंत प्रेमी 

सेवक समजून आपल्या नावाचा अर्थ समजावून सांगा.

॥ ४ ॥


Custom Search

No comments: