Wednesday, December 29, 2021

Shri Dnyaneshwari Adhyay 10 Part 3 श्रीज्ञानेश्र्वरी अध्याय १० भाग ३

 

Shri Dnyaneshwari 
Adhyay 10 Part 3 
Ovya 64 to 91 
श्रीज्ञानेश्र्वरी 
अध्याय १० भाग ३ 
ओव्या ६४ ते ९१

मूळ श्र्लोक 

न मे विदुः सुरगणाः प्रभवं न महर्षयः ।

अहमादिर्हि देवानां महर्षीणां च सर्वश: ॥ २ ॥

२) देवांना किंवा महर्षींना माझी उत्पत्ति माहीत नाहीं. कारण देव आणि महर्षि या सर्वांचें आदिकारण मी आहें.

एथ वेद मुके जाहाले । मन पवन पांगुळले ।

रातीविण मावळले । रविशशी ॥ ६४ ॥

६४) या माझ्या स्वरुपीं वेदांना बोलतां येईना, मन आणि प्राण यांची गति माझ्या स्वरुपीं चालेना, सूर्य व चंद्र हे माझ्या स्वरुपीं रात्रींशिवाय मावळले. ( ते माझ्या स्वरुपाचें प्रकाशन करुं शकत नाहीत. )

उदरींचा गर्भु जैसा । नेणे मायेची वयसा ।

देवांसि मी तैसा । चोजवेना ॥ ६५ ॥

६५) पोटांत असलेला गर्भ ज्याप्रमाणें ( आपल्या ) आईचें वय जाणत नाहीं, त्याप्रमाणें देवांना माझें ज्ञान होत नाहीं,

आणि जळचरां उदधीचें मान । मशकां नोलांडवे गगन ।

तैसें महर्षींचे ज्ञान । नेणे मातें ॥ ६६ ॥

६६) आणि ज्याप्रमाणें पाण्यांत राहणार्‍या प्राण्यांना समुद्राचें माप कळत नाहीं. ( किंवा ) चिलटास आकाश ओलांडता येत नाहीं, त्याप्रमाणें मोठाल्या ऋषींचे ज्ञान मला जाणू शकत नाहीं.

मी कवण केतुका । कवणाचा कैं जाहला ।

निरुती या करितां बोला । युगें गेलीं ॥ ६७ ॥

६७) मी कोण आहे, केवढा आहे कोणापासून व केव्हां उत्पन्न झालों, या गोष्टींचा निर्णय करण्यांत किती एक युगें निघून गेली. 

महर्षी आणि या देवां । येरां भूतजातां सर्वां ।

मी आदि म्हणोनि पांडवा । जाणता अवघड ॥ ६८ ॥

६८) मोठाले ऋषि आणि देव यांना आणि दुसरे जेवढे म्हणून प्राणी आहेत त्या सर्वांना मीच कारण आहे. म्हणून अर्जुना मला जाणणें, त्यांना कठीण आहे.,

उतरलें उदक पर्वत वळघे । कां वाढते झाड मुळीं लागे ।

 तरी मियां जालेनि जगें । जाणिजे मी ॥ ६९ ॥

६९) पर्वतावरुन खालीं आलेलें पाणी जर पुन्हा पर्वतावर चढेल, अथवा वाढणारें झाड शेंड्याकडून मुळाकडे येईल, तर माझ्यापासून झालेल्या जगाकडून मी जाणला जाईन.

का गाभेवनें बटु गिंवसवे । तरंगीं सागरु सांठवे ।

कां परमाणूमाजीं सामावे । भूगोलु हा ॥ ७० ॥

७०) अथवा वडाच्या सूक्ष्म अंकुरांत जर वडाचें विस्तीर्ण झाड सापडलें जाईल, अथवा, जर लाटेमध्ये जर समुद्र सांठवला जाईल, अथवा ही पृथ्वी जर परमाणूंत सांपडली जाईल;  

तरी मियां जालियां जीवां । महर्षी अथवा देवां ।

मातें जाणावया होआवा । अवकाशु गा ॥ ७१ ॥

७१) असेण होईल तर, अर्जुना, माझ्यापासून उत्पन्न झालेल्या प्राण्यांना, महर्षींना अथवा देवांना माझी ओळख होणयास लाग आहे.

ऐसाही जरी विपायें । सांडुनि पुढील पाये ।

सर्वेंद्रियांसि होये । पाठिमोरा जो ॥ ७२ ॥

७२) असा जरी मी जाणण्याला कठीण आहे, तरी कदाचित् जो कोणी बाह्य वृत्ति टाकून ( देहादि अनात्म तत्त्वांकडे जाणारी वृत्ति काढून ) सर्व इंद्रियांकडे पाठमोरा होतो ( वृत्ति अंतर्मुख करतो; )

प्रवर्तलाही वेगीं बहुडे । देह सांडुनि मागलीकडे ।

महाभूतांचिया चढे । माथयावरी ॥ ७३ ॥

७३) देहादि अनात्म तत्त्वांकडे जरी त्याची प्रवृत्ति झाली, तरी तेथून वेगानें माघारी फिरतो; स्थूल, सूक्ष्म व कारण हे देह मागें टाकून ( विचाराने यांचा निरास करुन ) पंचमहाभूतांच्याहि माथ्यावर ( जो ) चढतो, ( पंचमहाभूतांचा निरास करतो. )

मूळ श्लोक

यो मामजमनादिं च वेत्ति लोकमहेश्वरम् ।

असंमूढः स मर्तेषु सर्वपापैः प्रमुच्यते ॥ ३ ॥

३) जो मला जन्मरहित, अनादि आणि लोकमहेश्वर असें जाणतो, तो मानवांमध्यें ज्ञानी आहे व तो सर्व पापांपासून मुक्त होतो. 

तैसा राहोनि ठायठिके । स्वप्रकाशें चोखें ।

अजत्व माझें देखे । आपुलिये डोळां ॥ ७४ ॥

७४) याप्रमाणें चांगल्या रीतीनें त्या ठिकाणीं स्थिर राहून शुद्ध आत्मप्रकाशाच्या योगानें, आपल्या डोळ्यांनी ( प्रत्यक्ष ) माझें जन्मरहित्य ( जो ) जाणतो 

मी आदिसि परु । सकळलोकमहेश्र्वरु ।

ऐसिया मातें जो नरु । यापरी जाणे ॥ ७५ ॥

७५) मी आरंभाच्या पलीकडील ( अनादि ) आहे व सर्व लोकांचा मुख्य ईश्र्वर आहे, अशा मला जो पुरुष याप्रमाणें जाणतो;

तो पाषाणांमाजि परिसु । रसांमाजी सिद्धरसु । 

तैसा मनुष्याकृति अंशु । तो माझाचि जाण ॥ ७६ ॥

७६) तो पुरुष पाषाणामध्ये परीस जसा श्रेष्ठ किंवा सर्व रसांत अमृत जसें श्रेष्ठ, त्याप्रमाणें तो मनुष्याच्या आकारानें असलेला माझा ( श्रेष्ठ ) अंश आहे असें समज.

तो चालतें ज्ञानाचें बिंब । तयाचे अवयव ते सुखाचे कोंभ ।

परी माणुसपणाची भांब । लोकाचि भागु ॥ ७७ ॥

७७) तो ज्ञानाची चालती मूर्ति आहे, त्याचे अवयव ते सुखाला फुटलेले अंकुर आहेत; परंतु ( त्याच्या ठिकाणीं दिसणारा ) माणूसपणा हा लोकांच्या दृष्टीला होणारा भ्रम आहे.

अगा अवचिता कापुरा--। माजीं सांपडला हिरा ।

वरी पडलिया नीरा । न निगे केवीं ॥ ७८ ॥

७८) अर्जुना, हिरा जर अकस्मात् कापरांत सांपडला व त्यावर जर पाणी पडलें, तर त्या पाण्याकडून तो विघळल्याशिवाय भिन्न असा बाहेर निराळा कसा पडणार नाहीं ? ( तर पडेल तो कापरासारखा पाण्यांत विरघळणार नाहीं. )

तैसा मनुषयलोकाआंतु । तो जरी जाहला प्राकृतु ।

तर्‍ही प्रकृतिदोषाची मातु । नेणिजे तेथ ॥ ७९ ॥

७९) त्याप्रमाणें मनुष्यप्राण्यांत जरी तो शरीरधारी दिसला, तरी पण त्याच्या ठिकाणीं जन्ममृत्यु आदिकरुन प्रकृतिदोषांची गोष्टहि माहीत नसते. 

तो आपसयेंचि सांडिजे पापीं । जैसा जळत चंदनु सर्पीं ।

तैसा मातें जाणे तो संकल्पीं । वर्जूनि घालिजे ॥ ८० ॥

८०) त्या पुरुषाला आपोआपच पापें टाकून जातात. ज्याप्रमाणें आग लागलेल्या चंदनाच्या झाडाला वेढा घालून असलेले साप सोडून जातात, त्याप्रमाणें मला जो ओळखतो; तो संकल्पांकडून टाकला जातो.

तेंचि मातें कैसें जाणिजे । ऐसें कल्पी जरी चित्त तुझें ।

तरी मी ऐसा हे माझे । भाव ऐकें ॥ ८१ ॥

८१) तेंच मला कसें जाणावें, असें जर कांहीं तुझें मन इच्छा करील, तर मी असा आहें व हें माझ्यापासून झालेले निराळे पदार्थ असे आहेत, तें ऐक, 

जे वेगळालां भूतीं । सारिखे होऊनि प्रकृती ।

विखुरले आहेति त्रिजगतीं । आघविये ॥ ८२ ॥

८२) ते माझे विकार भिन्न भिन्न प्राण्यांमध्यें त्यांच्या त्यांच्या प्रकृतीसारखे बनून संपूर्ण त्रैलोक्यांत पसरले आहेत.   

मूळ श्र्लोक

बुद्धिर्ज्ञानमसंमोहः क्षमा सत्यं दमः शमः ।

सुखं दुःखं भवोऽभावो भयं चाभयमेवच ॥ ४ ॥

४) बुद्धि, ज्ञान, असंमोह, क्षमा, सत्य, दम, शम, सुख, दुःख, होणें, न होणें, भय व अभय; 

अहिंसा समता तुष्टिस्तपो दानं यशोऽयशः ।

भवन्ति भावा भूतानां मत्त एव पृथग्विधाः ॥ ५ ॥

५) अहिंसा, समता, तुष्टि, तप, दान, यश, अपकीर्ति, इत्यादि भूतांचे निरनिराळ्या प्रकारचे भाव, माझ्यापासूनच उत्पन्न होतात. 

ते प्रथम जाण बुद्धि । मग ज्ञान जें निरवधि ।

असंमोह सहनसिद्धि । क्षमा सत्य ॥ ८३ ॥

८३) त्यापैकी पहिली बुद्धि आहे असें समज. नंतर अगाध ज्ञान, असंमोह ( सहज उपस्थित झालेल्या ज्ञेय गोष्टींकडे विवेकपूर्वक प्रवृत्ति ), सहन करण्याचा स्वभाव म्हणजे भ्रम आणि सत्य ( हीं समज ). 

मग शम दम दोन्ही । सुख दुःख वर्तत जनीं ।

अर्जुना भावाभाव मानीं । भावाचिमाजीं ॥ ८४ ॥

८४) मग शम ( मनोनिग्रह ) आणि दम ( इंद्रियनिग्रह ) हे दोन आणि लोकांत असलेलें सुख व दुःख, आणि अर्जुना, होणें आणि नसणें या सर्वांची माझ्याच विकारात गणना कर.

आतां भय आणि निर्भयता । अहिंसा आणि समता ।

हे मम रुपाचि पांडुसुता । ओळख तूं ॥ ८५ ॥

८५) आतां अर्जुना, भय आणि निर्भयपणा, अहिंसा आणि समबुद्धि हीं माझींच रुपें आहेत, हें तूं जाण.

दान यश अपकीर्ति । हे जे भाव सर्वत्र वसती ।

ते मजचि पासून होती । भूतांचां ठायीं ॥ ८६ ॥    

८६) दान, यश व दुष्कीर्ति, हे जे विकार सर्व ठिकाणीं राहतात, ते माझ्यापासून प्राण्यांच्या ठिकाणीं उत्पन्न होतात; 

जैसीं भूते आहति सिनानीं । तैसे चिहे वेगळाले मानीं ।

एक उपजती माझां ज्ञानी । एक नेणती मातें ॥ ८७ ॥

८७) जशीं भूतें वेगवेगळाली आहेत, तसेच हे भाव वेगवेगळाले आहेत, असें समज. त्यापैकीं कित्येक भाव माझ्या ज्ञानांत उत्पन्न होतात आणि कित्येक मला जाणत नाहींत, ( माझ्या अज्ञानांत उत्पन्न होतात ).

अगा प्रकाश आणि कडवसें । सूर्याचिस्तव जैसें ।

प्रकाश उदयीं दिसे । तम अस्तूसीं ॥ ८८ ॥

८८) अरे अर्जुना, प्रकाश आणि अंधार हे परस्पर विरुद्ध स्वभावाचे असूनहि ते ज्याप्रमाणें एका सूर्यापासून होतात; सूर्याच्या उदयांत प्रकाश दिसतो आणि सूर्याच्या अस्ताबरोबर अंधार होतो.  

आणि माझें जें जाणणें नेणणें । तें तंव भूतांचिया दैवांचें करणें ।

म्हणोनि भूतीं भावाचें होणें । विषम पडे ॥ ८९ ॥

८९) आणि माझें जें ज्ञान होणें अथवा माझें जें अज्ञान असणें, हें प्राण्यांच्या दैवाचें कर्तव्य आहे, म्हणून त्याप्रमाणें प्राणिमात्राच्या ठिकाणीं कमीजास्त प्रमाणांत ह्या विकारांस व्हावें लागतें.     

यापरी माझां भावीं । हें जीवसृष्टि आहे आघवी ।

गुंतली असे जाणावीं । पंडुकुमरा ॥ ९० ॥

९०)  ह्याप्रमाणें माझ्या विकारांत ही संपूर्ण जीवनसृष्टि सांपडली आहे, असें अर्जुना, समज,   

आतां इये सृष्टीचे पालक । तयां आधीन वर्तती लोक ।

ते अकरा भाव आणिक । सांगेन तुज ॥ ९१ ॥

९१) आतां ह्या सृष्टिचें पालन करणारे आणि ज्यांच्या

 ताब्यांत सर्व लोक वागतात, ते आणखी अकरा भाव तुला

 सांगेन. 



Custom Search

Shri Dnyaneshwari Adhyay 10 Part 2 श्रीज्ञानेश्र्वरी अध्याय १० भाग २

 

Shri Dnyaneshwari 
Adhyay 10 Part 2 
Ovya 31 to 63 
श्रीज्ञानेश्र्वरी 
अध्याय १० भाग २ 
ओव्या ३१ ते ६३

आतां अठरा पर्वी भारतीं । तें लाभे कृष्णार्जुनवाचोक्तीं ।

आणि जो अभिप्रावो सातेंशतीं । तो एकलाचि नवमीं ॥ ३१ ॥

३१) आता भारताच्या अठरा पर्वांमध्यें जो कांहीं अभिप्राय आहे, तो कृष्णार्जुनांच्या संवादामध्यें ( गीतेंत ) प्राप्त होतो, आणि गीतेच्या सातशें श्लोकामध्ये जो अभिप्राय आहे, तो एकट्या नवव्या अध्यांयांत आहे.

म्हणोनि नवमीचिया अभिप्राया । सहसा मुद्रा लावावया ।

बिहाला मी वायां । गर्व कां करुं ॥ ३२ ॥

३२) म्हणून नवव्या अध्यायांतील मतलब पूर्ण झाला, असे दाखविणारा लेखनसीमेचा शिक्का, त्यावर एकदम द्यावयास भ्यालेला जो मी, तो, नवव्या अध्यायांतील अभिप्राय पूर्णपणे सांगितला, असा व्यर्थ अभिमान कशाकरिता धरुं ?  

अहो गूळा साखरे मालेयाचे । हे बांधे तरी एकाचि रसाचे ।

परि स्वाद गोडियेचे । आनआन जैसे ॥ ३३ ॥

३३) अहो, गूळ, साखर व राव यांचे आकार जरी एकाच रसाचें झालें आहेत, तरी त्यामध्यें गोडीचे स्वाद जसे निरनिराळे आहेत;

एक जाणोनियां बोलती । एक ठायेंठावो जाणविती ।

एक जाणों जातां हारपती । जाणते गुणेंशी ॥ ३४ ॥

३४) ( त्याप्रमाणे अठरा अध्याय हे एकाच गीतेचे आहेत व त्यामध्यें एकाच ब्रह्मरसाचें वर्णन आहे, पण त्याच्या परिणामांकडे पाहिलें तर ते निरनिराळे आहेत, ते असे कीं, ) कांही अध्याय, अधिष्ठानब्रह्मस्वरुपाला जाणून त्याचें वर्णन करतात; कांहीं अध्याय त्या त्या ठिकाणींच तूं ब्रह्म आहेस अशी जाणीव करुन देतात व काही अध्याय जाणावयास गेले असतां, जाणण्याच्या धर्मासह जाणणारा हरपून जातो ( ब्रह्मरुप होतो. )    

हे ऐसे अध्याय गीतेचे । परि अनिर्वाच्य नवमाचें ।

तो अनुवादलों हें तुमचें । सामर्थ्य प्रभू ॥ ३५ ॥

३५) असे हे गीतेचे अध्याय आहेत. परंतु नववा अध्याय शब्दानें सांगण्याच्या पलीकडचा आहे. तो देखील मी स्पष्ट करुन सांगितला. महाराज ही सर्व शक्ति आपली आहे.

कां एकाचि काठि तपिन्नली । एकीं सृष्टीवरी सृष्टी केली ।

एकीं पाषाण वाऊनि उतरलीं । समुद्रीं कटकें ॥ ३६ ॥

३६) एकाच्या ( वसिष्ठ ऋषींच्या ) काठीनें सूर्याप्रमाणें प्रकाश केला एकानें ( विश्र्वामित्रानें ) या जगाहून वेगळें जगच निर्माण केले. एकानें ( नल वानरानें ) दगड पाण्यावर टाकून समुद्रावरुन सैन्य पार उतरवून नेलें.   

एकीं आकाशीं सूर्यातें धरिलें । एकीं समुद्रा चुळीं भरिलें ।

तैसें मज नेणतयाकरवीं बोलविलें । अनिर्वाच्य तुम्हीं ॥ ३७ ॥

३७) एकानें ( मारुतीने ) आकाशांत असलेल्या सूर्यास पकडलें; एकानें ( अगस्तीनें ) एका घोटांतच समुद्र प्राशन केला. त्याप्रमाणें मी जो अजाण, त्या माझ्याकडून बोलण्याच्या पलीकडे असलेल्या नवव्या अध्यायाचा अभिप्राय तुम्हीं बोलविला.  

परि हें असो एथ ऐसें । रामरावण झुंजिन्नले कैसे ।

रामरावण जैसे । मीनले समरीं ॥ ३८ ॥

३८) परंतु हे असो, येथें असें आहे कीं, राम व रावण हे एकमेकांशी कसें लढले हे सांगावयाचें असेल, तर जसें राम-रावण हें एकमेकांत युद्धांत भिडले तसें, ( असे सांगावें लागेल; )  

तैसें नवमीं कृष्णाचें बोलणें । तें नवमीचियाचि ऐसें मी म्हणें ।

या निवाडा तत्तवज्ञु जाणे । जया गीतार्थु हातीं ॥ ३९ ॥

३९) त्याप्रमाणें नवव्या अध्यायांतील श्रीकृष्णाने केलेला जो उपदेश तो नवव्या अध्यायासारखाच आहे, असें माझे म्हणणें आहे. हा मी केलेला निर्णय ज्याला गीतेच्या अर्थाचें आकलन झालें आहे, त्या तत्त्ववेत्त्याला पटेल.

एवं नवही अध्याय पहिले । मियां मतीसारिखे वाखाणिले ।

आतां  उत्तरखंड उपाइलें । ग्रंथाचें ऐका ॥ ४० ॥             

४०) त्याप्रमाणें पहिल्या नऊहि अध्यायांचे मी आपल्या बुद्धीप्रमाणें व्याख्यान केलें, आता गीताग्रंथाचा राहिलेला दुसरा भाग प्राप्त झालेला आहे, तो ऐका. 

येथ विभूती प्रतिविभूती । प्रस्तुत अर्जुना सांगिजेती ।

ते विदग्धा रसवृत्ती । म्हणिपैल कथा ॥ ४१ ॥

४१) या अध्यायांतआतां अर्जुनाला विशेष व सामान्य विभूति सांगितल्या जातील. ती कथा चातुर्यानें व रसयुक्त वर्णनानें सांगितली जाईल. 

देशियेचेनि नागरपणें । शांतु शृंगारातें जिणे ।

तरि ओंविया होती लेणें । साहित्यासी ॥ ४२ ॥

४२) मराठी भाषेंतील सौंदर्यानें शांतरस शृंगाररसाला जिंकील व ओंव्या तर अलंकारशास्त्राला भूषण होतील.

मूळग्रंथींचिया संस्कृता । वरि मर्‍हाटी नीट पढतां ।

अभिप्राय मानलिया उचिता । कवण भूमी हें न चोजवे ॥ ४३ ॥

४३) मूळ संस्कृत गीताग्रंथावर माझी असणारी मराठी टीका जर चांगली वाचली आणि योग्य रीतीनें दोन्हींचा अभिप्राय जर चांगला पटला, तर कोणता ग्रंथ मूळ आहे. हें कळणार  नाही.  

जैसें अंगाचेनि सुंदरपणें । लेणियासी आंगचि होय लेणें ।

अळंकारिलें कवण कवणें । हें निर्वचेना ॥ ४४ ॥

४४) ज्याप्रमाणे शरीराच्या सौंदर्याने शरीर हेंच अलंकारास भूषण होतें, अशा स्थितीत कोणी कोणाला शोभा आणली, याची निवड होत नाही.

तैसी देशी आणि संस्कृत वाणी । एका भावार्थाचां सोकासनीं ।

शोभती आयणी । चोखट आइका ॥ ४५ ॥

४५) त्याचप्रमाणें माझी मराठी भाषा व संस्कृत भाषा या दोन्हीहि एकाच अभिप्रायाच्या पालखीत शोभतात; त्या तुम्ही चांगल्या बुद्धीनें ऐका.

उठावलिया भावा रुप । करितां रसवृत्तीचें लागे वडप ।

चातुर्य म्हणे पडप । जोडलें आम्हां ॥ ४६ ॥

४६) गीतेचा पुढेआलेला अभिप्राय सांगत असतां शृंगारादि नवरसांचा वर्षाव होतो व चातुर्य म्हणतें, आम्हांला प्रतिष्ठा प्राप्त झाली. 

तैसें देशियेचें लावण्य । हिरोनि आणिलें तारुण्य ।

मग रचिलें अगण्य । गीतातत्त्व ॥ ४७ ॥

४७) ( वरच्या ओवींत सांगितलेला परिणाम ज्याच्या योगानें होईल ) तसें मराठी भाषेचें सौंदर्य घेऊन, ( नवरसांना ) तारुण्य आणलें व मग अमर्याद गीतातत्त्व रचलें ( म्हणजे गीतेवर टीका केली ).

तैसा चराचरपरमगुरु । चतुरचित्तचमत्कारु ।

तो ऐका यादवेश्र्वरु । बोलता झाला ॥ ४८ ॥

४८) याप्रमाणे संपूर्ण जगाचे श्रेष्ठ गुरु असलेले व शहाण्यांच्या चित्ताला आश्चर्यभूत असणारे, असे जे यादवांतील श्रेष्ठ श्रीकृष्ण ते बोलले, तें ऐका.   

ज्ञानदेव निवृत्तीचा म्हणे । काई बोलिलें श्रीहरी तेणें ।

अर्जुना आघवियाचि मातू अंतःकरणें । घडौता आहासि ॥ ४९ ॥  

 ४९) निवृत्तिनाथांचे शिष्य ज्ञानदेव म्हणतात, त्या श्रीकृष्णांनी काय भाषण केले. ( तें ऐका. ) श्रीकृष्ण म्हणाले, अर्जुना, तू सर्व गोष्टीनी अंतःकरणाचा धड आहेस.

श्र्लोक

श्रीभगवानुवाच

भूय एव महाबाहो शृणु मे परमं वचः ।

यत्तेऽहं प्रीयमाणाय वक्ष्यामि हितकाम्यया ॥ १ ॥

१) श्रीकृष्ण म्हणाले, हे महाबाहो, ( माझ्या भाषणानें ) संतोष पावणार्‍या तुला, तुझ्या हिताच्या इच्छेनें जें मी आणखीदेखील सांगत आहें, तें माझें श्रेष्ठ भाषण ऐक. 

आम्हीं मागील जे निरुपण केलें । तें तुझें अवधानचि पाहिलें ।

तंव टांचें नव्हे भलें । पुरतें आहे ॥ ५० ॥

५०) आम्हीं पूर्वी जे व्याख्यान केले त्यामुळें तुझें लक्ष किती आहे हेंच अजमावून पाहिलें; त्यांत तें अपुरें नाहीं तर चांगलें पूर्ण आहे ( असें आढळून आलें. )  

घटी थोडेसें उदक घालिजे । तेणें न गळे तरी वरिता भरिजे ।

तैसा परिसौनि पाहिलासि तंव परिसाविजे । ऐसेंचि होतसे ॥ ५१ ॥

५१) ज्याप्रमाणें घागरीत थोडेंसे पाणी घालावें व तें गळालें नाही, तर  जास्त भरावें; त्याप्रमाणे तूं ऐकावें म्हणून सांगितलें, तेव्हां तुला आणखी ऐकावें असेंच वाटू लागलें.

अवचितयावरी सर्वस्व सांडिजे । चोख तरी तोचि भांडारी कीजे ।

तैसा तूं आतां माझें । निजधाम की ॥ ५२ ॥

५२) एखाद्या अकस्मात् आलेल्या मनुष्यावर आपलें सर्वस्व सोंपवावें व तो प्रामाणिक आहे असें आढळून आलें, तर त्यालाच खजिनदार करावा, त्याप्रमाणें ( आम्ही तुला सांगितलेलें तूं लक्षपूर्वक ऐंकतोस अशी आमची खात्री झाल्यामुळें ) तूं आतां आमचें राहण्याचें ठिकाण झाला आहेस. 

तैसें अर्जुना येउतें सर्वेश्र्वरें । पाहोनि बोलिलें आदरें ।

गिरी देखोनि सुमरे । मेघु जैसा ॥ ५३ ॥

५३) याप्रमाणें सर्वांचे प्रभू जे श्रीकृष्ण, ते अर्जुनाला एवढ्या योग्यतेचा पाहून ( त्याजबरोबर ) प्रेमानें बोलावयास लागले. ज्याप्रमाणें डोंगर पाहून मेघांची दाट फळी येते.

तैसा कृपाळुवांचा रावो । म्हणे आइके गा महाबाहो ।

सांगितलाचि अभिप्रावो । सांगेन पुढती ॥ ५४ ॥

५४) त्याप्रमाणें  ( मोठ्या प्रेमभरानें ) कृपाळूंचे राजे श्रीकृष्ण म्हणाले, अरे, आजानुबाहु अर्जुना, ऐक, सांगितलेलाच मतलब आम्ही पुन्हां सांगतो.

प्रतिवर्षी क्षेत्र पेरिजे । पिके तरी वाहो नुवगिजे ।

पिकासी निवाडु देखिजे । अधिकाधिक ॥ ५५ ॥

५५) प्रत्येक वर्षाला शेताची पेरणी करावी आणि जर तें पिकेल, तर त्याची मशागत करण्याचा कंटाळा करुं नये; कारण त्यामुळें पिकाची निप्पति अधिकाधिक दिसते.    

पुढतपुढती पुटें देतां । जोडे वानियेची अधिकता ।

तें सोनें पांडुसुता । शोधूंचि आवडे ॥ ५६ ॥

५६) ज्या सोन्याला वारंवार क्षाराची पुढें दिली असतां त्याचा कस अधिकाधिक वाढत जातो, अर्जुना. तें सोनें शुद्ध करावेसेंच वाटतें.   

तैसें एथ पार्था । तुज आभार नाहीं सर्वथा ।

आम्ही आपुलियाचि स्वार्था । बोलौनि आम्ही ॥ ५७ ॥

५७) अर्जुना, त्याप्रमाणें येथेंहि आहे या सांगण्यात तुझ्यावर मुळींच उपकाराचें ओझे नाहीं कारण आम्ही आपल्या स्वार्थासाठी बोलत आहोंत. 

अगा बाळका लेवविजे लेणें । तयाप्रमाणें तें काय जाणो ।

तो सोहळा भोगणें । जननीयेसी दृष्टी ॥ ५८ ॥

५८) अरे, मुलाला दागिने चालतात; पण तें मूल त्याप्रमाणें ( दागिन्यांना ) जाणतें काय ? दागिन्यांनी मूलाला आलेल्या शोभेचा आनंद आईनें आपल्या दृष्टीनें भोगावयाचा असतो.

तैसें तुझें हित आघवें । जंव जंव कां तुज फावे ।               

तंव तंव आमुचें सुख दुणावे । ऐसें असे ॥ ५९ ॥

५९) त्याप्रमाणें तुझें सर्व हित जसजसें तुला समजेल, तसतसा आनंद दुपट्ट होतो; अशी वस्तुस्थिति आहे.

आतां असो हे विकडी । मज उघड तुझी आवडी ।

म्हणोनि तृप्तीची सवडी । बोलतां न पडे ॥ ६० ॥

६०) आतां हें अलंकारिक बोलणें राहू दे तुझ्यावर माझें उघड प्रेम आहे, म्हणून तुझ्याशी बोलतांना तृप्तीचा शेवट होत नाही. ( म्हणजे तुझ्याशी बोलणें पुरेसें वाटत नाही ) 

आम्हां येतुलियाचि कारणें । तेंचि तें तुजशीं बोलणें ।

परि असो हें अंतःकरणें । अवधान दे ॥ ६१ ॥

६१) आम्हाला एवढ्याचकरितां तेंच तें फिरुन तुझ्याशी बोलावे लागतें परंतु हें असूं दे. तू मनापासून लक्ष दे  

ऐकें ऐकें सुवर्म । वाक्य माझें परम ।

जें अक्षरें लेऊनि परब्रह्म । तुज खेंवासि आलें ॥ ६२ ॥

६२) तर ऐकमर्मज्ञ अर्जुना, आमचें श्रेष्ठ बोलणें ऐक हें आमचे बोलणे म्हणजे ब्रह्नच अक्षरांचा अंगरखा घालून तुला आलिंगन देण्यांत आले आहे.

तरी किरीटी तूं मातें । नेणसी ना निरुतें ।

तरि गा जो मी येथें । तें विश्र्वचि हें ॥ ६३ ॥

६३) तरी अर्जुना, तू मला खरोखर जाणत नाहीस ना ? (

 जर जाणत नसलास तर सांगतों ) येथें जो मी तुझ्यापुढें

 उघड आहे, तो दिसतो एवढ्या मर्यादित नसून मी म्हणजे

 हें विश्वच आहे.



Custom Search

Shri Dnyaneshwari Adhyay 10 Part 1 श्रीज्ञानेश्र्वरी अध्याय १० भाग १

 

Shri Dnyaneshwari 
Adhyay 10 Part 1 
Ovya 1 to 30 
श्रीज्ञानेश्र्वरी 
अध्याय १० भाग १ 
ओव्या १ ते ३०

नमो विशदबोधविदग्धा । विद्यारविंदप्रबोधा ।

पराप्रमेयप्रमदा-। विलासिया ॥ १ ॥

१) स्पष्ट बोध करण्यात चतुर असलेल्या व विद्यारुपी कमलाचा विकास करणार्‍या व परावाणीचा विषय ( स्वरुपस्थिति ) हीच कोणी तरुण स्त्री, विलास करणार्‍या, ( श्रीगुरो, ) तुम्हांला माझा नमस्कार असो.

नमो संसारतमसूर्या । अप्रतिमपरमवीर्या ।

तरुणतरतूर्या-। लालनलीला ॥ २ ॥

२) अहो, संसाररुपी अंधाराचा नाश करणार्‍या सूर्या, निरुपम अशा श्रेष्ठ सामर्थ्यानें युक्त ज्वानीच्या भरांत असलेल्या ज्ञानरुप चौथ्या अवस्थेचें स्नेहानें पालन करणें, ही ज्यांची क्रीडा आहे, अशा श्रीगुरो, तुम्हांस माझा नमस्कार असो.

नमो जगदखिलापालना । मंगळमणिनिधाना ।

स्वजनवनचंदना । आराध्यलिंगा ॥ ३ ॥

३) अहो, सर्व जगाचें पालन करणारे, कल्याणरुपी रत्नांची खाण असलेलें भक्तरुपी वनांतील चंदन असलेले आणि पूजा करण्यास योग्य असलेले देव, तुम्हांला माझा नमस्कार असो.    

नमोचतुरचित्तचकोरचंद्रा । आत्मनुभवनरेंद्रा ।

श्रुतिगुणसमुद्रा । मन्मथमन्मथा ॥ ४ ॥

४) शहाण्या चित्तरुपी चकोरास आनंद देणार्‍या चंद्रा, ब्रह्मानुभवाच्या राजा, वेदगुणांच्या समुद्रा व कामाला मोहित करणार्‍या, तुम्हालां माझा  नमस्कार असो.

नमो सुभावभजनभाजना । भवेभकुंभभजंना ।

विश्र्वोद्भवभुवना । श्रीगुरुराया ॥ ५ ॥

५) शुद्ध भावानें भजन करण्यास योग्य असणारे, संसाररुपी हत्तीच्या गंडस्थळाचा नाश करणारे व विश्वाच्या उत्पत्तीचें स्थान असणारे, अहो श्रीगुरुराया, तुम्हांला माझा नमस्कार असो. 

तुमचा अनुग्रहो गणेशु । जैं दे आपुला सौरसु ।

तैं प्रवेशु । बाळकाही आथी ॥ ६ ॥

६) तुमची कृपा हाच कुणी गणेश, तो जेव्हां आपलें सामर्थ्य देतो, तेव्हां सर्व विद्यांमध्यें बालकाचा देखील प्रवेश होतो.

दैविकी उदार वाचा । जैं उद्देशु दे नाभिकाराचा ।

तैं नवरसदीपांचा । थावो लाभो ॥ ७ ॥

७) आपण जें श्रीगुरुदेव त्या आपली उदार वाणी जेव्हां ‘ भिऊं नकोस ‘ असें आश्वासन देते, तेव्हां शांतादि नवरसरुपी दिव्यांचा ठाव लगतो. ( म्हणजे नवरसरुपी दिवे प्रज्वलित केले जातात) .

जी आपुलिया स्नेहाची वागेश्र्वरी । जरी मुकेयातें अंगीकारी ।

तो वाचस्पतीशीं करी । प्रबंधुहोडा ॥ ८ ॥

८) महाराज, आपलें प्रेम हीच कोणी सरस्वती, तिनें जर मुक्याचा अंगीकर केला, तर तो पैजेने बृहस्पतीबरोबर वादविवाद करतो.

हें असो दिठी जयावरी झळके । कीं हा पद्मकरु माथां पारुखे ।

तो जीवचि परि तुके । महेशेंशीं ॥ ९ ॥

९) हें राहूं द्या, ज्याच्यावर आपली कृपादृष्टि पडते अथवा आपला वरदहस्त ज्याच्या मस्तकावर ठेवला जातो, तो जीवच खरा, परंतु तो शिवाच्या बरोबरीला येतो.  

एवढें जिये महिमेचें करणें । ते वाचाळपणें वानूं मी कवणें ।

का सूर्याचिया आंगा उटणें । लागत असे ॥ १० ॥

१०) एवढ्या सर्व गोष्टी ज्या सामर्थ्यानें होतात, त्यांचे मी कोणत्या विशेष बोलण्यानें वर्णन करुं ? सूर्याचें शरीर चकाकित दिसावें म्हणून त्यास ( लोखंडाच्या आरशाप्रमाणें ) घासण्याची जरुरी आहे काय ?

केउता कल्पतरुवरी फुलौरा । कायसेनि पाहुणेरु क्षीरसागरा ।

ऐसा कवणें वासी कापुरा । सुवासु देवों ॥ ११ ॥

११) कल्पतरुला फलद्रूप होण्यास मोहोर कशाला फुटावयास पाहिजे ? क्षीरसमुद्राला कशानें पाहुणचार करावा ? त्याचप्रमाणें कोणत्या वासाच्या योगाने कापराला सुगंधित करावें ?  

चंदनातें कायसेनि चर्चावें । अमृतातें केउतें रांधावें ।

 गगनावरी उभवावें । घडे केवीं ॥ १२ ॥

१२) चंदनाला कशाची उटी लावावी ? अमृताचें पक्वान्न कसें तयार करावें ? आकाशावर मांडव घालणें शक्य आहे काय ?   

तैसें श्रीगुरुचें महिमान । आकळितें कें असे साधन ।

हें जाणोनि मियां नमन । निवांत केलें ॥ १३ ॥

१३) त्याप्रमाणें श्रीगुरुंच्या मोठेपणाचें आकलन करणारें साधन कोठें आहे ? ( कोठेहिं नाहीं. ) हें लक्षांत घेऊन मी निमूटपणानें त्यांना नमस्कार केला. 

तरी प्रज्ञेचेनि आथिलेपणें । श्रीगुरुसमर्था रुप करुं म्हणें ।

तरि मोतियासी भिंग देणें । तैसें होईल ॥ १४ ॥

१४) जर बुद्धीच्या संपन्नतेवर समर्थ श्रीगुरुचें यथार्थ वर्णन करुं म्हणेन, तर तें माझें करणें मोत्यांना ( चकाकी येण्याकरितां ) अभ्रकाचें पूट देण्यासारखें होईल.   

कां साडेपंधरया रजतवणी । तैशीं स्तुतीचीं बोलणीं ।

उगियाचि माथां ठेविजे चरणीं । हेंचि भलें ॥ १५ ॥

१५) साडेपंधरा दराच्या बावन्नकशी सोन्याला ज्याप्रमाणें चांदीचा मुलामा द्यावा, त्याप्रमाणे मी केलेल्या स्तुतीच्या भाषणाचा प्रकार होणार आहे. म्हणून यापुढें कांहीं न बोलताआपल्या पायावर मस्तक ठेवावें, हेच बरें.

मग म्हणितलें जी स्वामी । भलेनि ममत्वें देखिलें तुम्हीं ।

म्हणोनि कृष्णार्जुनसंगमीं । प्रयागवटु जाहलों ॥ १६ ॥

१६) नंतर ज्ञानेश्र्वरमहाराज म्हणाले, अहो स्वामी, चांगल्या प्रेमाने, ज्ञानेश्र्वर आमचा आहे, या भावनेनें तुम्हीं माझ्याकडे पाहिलें. त्यामुळें कृष्णार्जुनसंवादरुपी गंगायमुनांच्या संगमाच्या प्रयागावर मी वड झालों.  

मागां दूध दे म्हणतलियासाठीं । आघवियाचि क्षीराब्धीची करुनि वाटी ।

उपमन्यूपुढें धुर्जटी । ठेविली जैसी ॥ १७ ॥

१७) मागे ‘ दूध दे ‘ अशी विनंती केल्यावरुन सर्वच क्षीरसमुद्राची वाटी करुन, शंकरानें उपमन्यूच्या पुढें जशी ठेवली,

ना तरी वैकुंठपीठनायकें । रुसला ध्रुव कवतिकें ।

बुझविला देऊनि भातुके । ध्रुवपदाचें ॥ १८ ॥

१८) किंवा, वैकुंठाधीश प्रभूनें रुसलेला जो ध्रुव त्याची अढळ पदाचा खाऊं देऊन कौतुकानें समजूत घातली.

तैसी ब्रह्मविद्यारावो। सकल शास्त्रांचा विसंवता ठावो ।

ते भगवद्गी योगिया गावों । ऐसें केले ॥ १९ ॥

१९) त्याप्रमाणें गीता, जी ब्रह्मविद्येचा राजा आहे व सर्व शास्त्रांचें विश्रांतिस्थान आहे, ती भगवद्गीता मी प्राकृत ओंवीछंदांत गावी, असें श्रीगुरुनें केलें,   

जे बोलणियांचा रानीं हिंडतां । नायकिजे फळलिया अक्षरांची वार्ता ।

परि ते वाचाचि केली कल्पलता । विवेकाची ॥ २० ॥

२०) ( हें पाहा ) शब्दरुपी अरण्यामध्यें वाटेल तितकें भटकले असतां, त्या वाचारुप वृक्षास विचाररुप फळे आल्याची गोष्ट कानांवर येत नाहीं; परंतु वाचाच विचारांचा कल्पवृक्ष केली.

होती देहबुद्धि एकसरी । आनंदभांडरा केली वोवरी ।

मन गीतार्थसागरीं । जळशयन आलें ॥ २१ ॥

२१) माझ्या बुद्धीनें जे देहाशीं एकसारखें तादात्म्य केलें होतें, त्या माझ्या बुद्धीला ( देहतादात्म्यापासून सोडून ) आनंदरुपी खजिन्याची खोली केली आणि माझें मन गीतेच्या अर्थरुपी क्षीरसमुद्रात महाविष्णु झालें.    

तैसें एकैक देवांचे करणें । अपार बोलों केवीं मी जाणें ।

तर्‍ही अनुवादलों धीटपणें । तें उपसाहिजो जी ॥ २२ ॥

२२) त्याप्रमाणे श्रीगुरुंच्या एक एक लीला आहेत. त्या अनंत असल्यामुळे त्यांचे वर्णन करण्याचे मला कसें कळेल ? असें असूनहि, बेडरपणानें जो काही मी अनुवाद केला, तो, महाराज, सहन करा.

आतां आपुलेनि कृपाप्रसादें । मिया भगवद् गीता वोवीप्रबंधे ।

पूर्वखंड विनोदें । वाखाणिलें ॥ २३ ॥

२३) एवढा वेळ आपल्या कृपेच्या प्रसादाने मी भगवद् गीतेचा पहिला भाग विनोदाने ओवीच्या छंदांत वर्णन केला.

प्रथमीं अर्जुनाचा विषादु । दुजीं बोलिला योगु विशदु ।

परि सां ख्यबुद्धीसि भेदु । दाऊनियां ॥ २४ ॥

२४) पहिल्या अध्यायामध्यें अर्जुनाचा खेद सांगितला, दुसर्‍यामध्ये स्पष्ट निष्काम कर्मयोग सांगितला, परंतु ज्ञानयोग आणि बुद्धियोग यांच्यांत काय फरक आहे तो दाखवून सांगितला.

तिजीं केवळ कर्म प्रतिष्ठिलें । तेंचि चतुर्थी ज्ञानेंशीं प्रगटिलें ।

पंचमीं गव्हरिलें । योगतत्त्व ॥ २५ ॥

२५) तिसर्‍यांत केवळ कर्मयोग सांगितला. तोच कर्मयोग चौथ्यांत ज्ञानासह सांगितला आणि पाचव्यांत गूढ रीतीनें अष्टांगयोग सांगितला. 

तेंचि षष्ठामाजीं प्रगट । आसनालागोनि स्पष्ट ।

जीवत्मभाव एकवाट । होती जेणें ॥ २६ ॥

२६) ज्याच्या योगानें जीवात्म्याचें ऐक्य होतें, तेच योगाचें तत्त्व आसनापासून प्रारंभ करुन ( तों समाधीपर्यंत ) स्पष्ट तर्‍हेनें ( सहाव्यांत ) उघड केलें,

तैसीचि जे योगस्थिति । आणि योगभ्रष्टां जे गति ।

ते आघवीचि उपपत्ती । सांगितली ॥ २७ ॥

२७) त्याचप्रमाणें योग सिद्ध झालेल्याची स्थिति आणि योगानें आचरण करीत असतां मध्येंच मरण आलेल्यास जी गति प्राप्त होते, तो सर्व विचार ( सहाव्या ) अध्यायांत सांगितला.

तयावरी सप्तमीं । प्रकृतिपरिहार उपक्रमीं ।

भजति जे पुरुषोत्तमीं । ते बोलिले चार्‍ही ॥ २८ ॥

२८) त्यानंतर सातव्यांत आरंभी ( कार्य-कारण अशा दोन प्रकारांनी ) प्रकृतीचें रुप सांगून, भगवंताला भजणारे जे चार प्रकारचे भक्त, त्यांचे वर्णन केलें,      

पाठीं सप्तमींची प्रश्र्नसिद्धी । बोलोनि प्रयाणसिद्धी ।

एवं ते सकळवाक्यअवघि । अष्टमाध्यायीं ॥ २९ ॥

२९) नंतर सातव्या अध्यायांत शेवटीं सांगितलेल्या सात वाक्यांसंबंधीं ( आठव्याच्या आरंभीं ) अर्जुनानें विचारलेल्या सात प्रश्नांची उत्तरे देऊन प्रयाणसिद्धीचा प्रकार सांगितला; अशा रीतीनें सर्व सात प्रश्नांची उत्तरे देऊन आठव्या अध्यायांत ते प्रश्र्न संपविले. 

आतां शब्दब्रह्मीं असंख्याके । जेतुला कांहीं अभिप्राय पिके ।

तेतुला महाभारतें एकें । लक्षें जोडे ॥ ३० ॥        

३०) आतां असंख्यात असलेल्या वेदांमध्ये जेवढा म्हणून

 मतलब प्राप्त होतो, तेवढा सर्व एक लक्ष ग्रंथ असलेल्या

 महाभारतामध्यें सांपडतो.



Custom Search