Tuesday, December 28, 2021

ShriRamCharitManas AyodhyaKanda Part 46 श्रीरामचरितमानस अयोध्याकाण्ड भाग ४६

 

ShriRamCharitManas 
AyodhyaKanda Part 46 
Doha 269 to 274 
श्रीरामचरितमानस 
अयोध्याकाण्ड भाग ४६ 
दोहा २६९ आणि २७४

दोहा—प्रभु प्रसन्न मन सकुच तजि जो जेहि आयसु देब ।

सो सिर धरि धरि करिहि सबु मिटिहि अनट अवरेब ॥ २६९ ॥

संकोच सोडून प्रसन्न मनाने जी आज्ञा प्रभू देतील, ती सर्व लोक शिरोधार्य मानतील आणि सर्व उपद्रव व चिंता मिटतील.’ ॥ २६९ ॥

भरत बचन सुचि सुनि सुर हरषे । साधु सराहि सुमन सुर बरषे ॥

असमंजस बस अवध नेवासी । प्रमुदित मन तापस बनबासी ॥

भरताचे पवित्र बोलणे ऐकून देव आनंदित झाले आणि ‘ छान, छान ‘ अशी प्रशंसा करीत त्यांनी फुले उधळली. अयोध्यानिवासी बुचकळ्यात पडले की आता श्रीराम काय सांगतात ते पाहू या. तपस्वी आणि वनवासी लोक श्रीराम वनातच राहतील, या आशेने मनातून आनंदले. ॥ १ ॥

चुपहिं रहे रघुनाथ सँकोची । प्रभु गति देखि सभा सब सोची ॥

जनक दूत तेहि अवसर आए । मुनि बसिष्ठँ सुनि बेगि बोलाए ॥

परंतु भिडेमुळे श्रीराम गप्प राहिले. प्रभूंची ही मौन स्थिती पाहून सर्व सभा काळजीत पडली. त्या वेळी जनक राजांचे दूत आले, हे ऐकून वसिष्ठांनी त्यांना त्वरित बोलावून घेतले. ॥ २ ॥

करि प्रनाम तिन्ह रामु निहारे । बेषु देखि भए निपट दुखारे ॥

दूतन्ह मुनिबर बूझी बाता । कहहु बिदेह भूप कुसलाता ॥

त्या दूतांनी येउन, प्रणाम करुन श्रीरामचंद्रांना पाहिले. त्यांचा मुनींसारखा वेष पाहून त्यांना फार दुःख झाले. मुनिश्रेष्ठ वसिष्ठांनी दूतांना म्हटले की, ‘ राजा जनकांच्या खुशालीविषयी सांगा.॥  ३ ॥  

सुनि सकुचाइ नाइ महि माथा । बोले चरबर जोरें हाथा ॥

बूझब राउर सादर साईं । कुसल हेतु सो भयउ गोसाईं ॥

मुनींचे हे बोलणे ऐकून संकोचाने पृथ्वीवर मस्तक टेकवून ते श्रेष्ठ दूत हात जोडून म्हणाले, ‘ हे स्वामी, हे गोस्वामी, तुम्ही आदराने विचारले, याचमुळे खुशाली सिद्ध झाली. ॥ ४ ॥     

दोहा—नाहिं त कोसलनाथ कें साथ कुसल गइ नाथ ।

मिथिला अवध बिसेष तें जगु सब भयउ अनाथ ॥ २७० ॥

अन्यथा हे नाथ ! क्षेम-कुशल हे सर्व कोसलनाथ दशरथांच्याबरोबर निघून गेले. तसे पाहिले तर सर्व जग हेच अनाथ झाले आहे. परंतु मिथिला आणि अयोध्या या विशेष करुन अनाथ झालेल्या आहेत. ॥ २७० ॥

कोसलपति गति सुनि जनकौरा । भे सब लोक सोकबस बौरा ॥

जेहिं देखे तेहि समय बिदेहू । नामु सत्य अस लाग न केहू ॥

अयोध्यानाथांचा मृत्यु झाल्याचे ऐकल्यावर जनकपुरीवासी सर्व लोक शोकाकुल झाल्याने बावरुन गेले. त्यावेळी विदेहींनाही शोकमग्न झालेले ज्यांनी पाहिले, त्यांच्यापैकी कुणालाही असे वाटले नाही की, त्यांचे विदेह हे नाव खरे आहे. ॥ १ ॥

रानि कुचालि सुनत नरपालहि । सूझ न कछु जस मनि बिनु ब्यालहि ॥

भरत राज रघुबर बनबासू । भा मिथिलेसहि हृदयँ हरॉंसू ॥

राणीचे दुष्टाचरण ऐकून जनक राजांना काही सुचेना, ज्या

प्रमाणे मण्याविना सापाला काही सुचत नाही त्याप्रमाणे. नंतर

भरताला राज्या व रामचंद्रांना दिल्याचे ऐकून मिथिलेश्वर जनकांच्या मनाला फार दुःख झाले. ॥ २ ॥

नृप बूझे बुध सचिव समाजू । कहहु बिचारि उचित का आजू ॥

समुझि अवध असमंजस दोऊ । चलिअ कि रहिअ न कह कछुकोऊ ॥

राजांनी विद्वानांना आणि मंत्रिमंडळाला विचारले की, आज या प्रसंगी काय करणे योग्य आहे ? अयोध्येची दशा समजल्यावर आणि दोन्ही प्रकारे मनात गोंधळ झाल्याचे पाहून ‘ जायचे की राहायचे ? ‘ याविषयी कुणी काही सांगितले नाही. ॥ ३ ॥

नृपहिं धीर धरि हृदयँ बिचारी । पठए अवध चतुर चर चारी ॥

बूझि भरत सति भाउ कुभाऊ । आएहु बेगि न होइ लखाऊ ॥

जेव्हा कुणीच स्वतःचे मत सांगितले नाही, तेव्हा धैर्याने विचार करुन राजाने चार चतुर गुप्तचरांना अयोध्येस पाठविले. त्यांना सांगितले की, तुम्ही श्रीरामांविषयी भरताला सद् भाव आहे की दुर्भाव आहे, याची माहिती घेऊन त्वरित परत या. पण सावध राहून कुणालाही तुमचा पत्ता लागू देऊ नका.’ ॥ ४ ॥

दोहा—गए अवध चर भरत गति बूझि देखि करतूति ।

चले चित्रकूटहि भरतु चार चले तेरहूति ॥ २७१ ॥

गुप्तचर अयोध्येला गेले आणि त्यांनी भरताची वागणूक व करणी पाहिली. भरत चित्रकूटाला जायला निघताच, ते मिथिला नगरीस निघाले. ॥ २७१ ॥

दूतन्ह आइ भरत कइ करनी । जनक समाज जथामति बरनी ॥

सुनि गुर परिजन सचिव महीपति । भे सब सोच सनेहुँ बिकल अति ॥

गुप्तचरांनी परत येऊन राजा जनकांच्या सभेत भरताच्या करणीचे आपल्या बुद्धीप्रमाणे वर्णन करुन सांगितले. ते ऐकून गुरु, कुटुंबीय, मंत्री आणि राजा हे सर्व जण काळजीमुळे व प्रेमामुळे अत्यंत व्याकूळ झाले. ॥ १ ॥

धरि धीरजु करि भरत बड़ाई । लिए सुभट साहनी बोलाई ॥

घर पुर देस राखि रखवारे । हय गय रथ बहु जान सँवारे ॥

नंतर जनकांनी धैर्याने भरताची वाखाणणी करुन चांगल्या योद्ध्यांना व पागेवरील अधिकार्‍यांना बोलावले. घर, नगर व देशात रक्षकांना ठेवून घोडे, हत्ती, रथ इत्यादी बरीच वाहने सज्ज केली. ॥ २ ॥

दुघरी साधि चले ततकाला । किए बिश्रामु न मग महिपाला ॥

भोरहिं आजु नहाइ प्रयागा । चले जमुन उतरन सबु लागा ॥

दोन घडींचा मुहूर्त साधून ते तत्काळ निघाले. जनकांनी वाटेत कुठेही विश्रांती घेतली नाही. आजच सकाळी प्रयागराजामध्ये स्नान करुन ते निघाले आहेत. जेव्हा सर्व लोक यमुना पार करु लागले, ॥ ३ ॥

खबरि लेन हम पठए नाथा । तिन्ह कहि अस महि नायउ माथा ॥

साथ किरात छ सातक दीन्हे । मुनिबर तुरत बिदा चर कीन्हे ॥

हे नाथ, तेव्हा आम्हांला बातमी आणण्यासाठी पाठविले आहे. ‘ दूतांनी असे सांगून भूमीवर मस्तक टेकविले. मुनिश्रेष्ठ वसिष्ठांनी सहा-सात भिल्लांना सोबत देऊन दूतांना त्वरित पाठविले. ॥ ४ ॥

दोहा—सुनत जनक आगवनु सबु हरषेउ अवध समाजु ।

रघुनंदनहि सकोचु बड़ सोच बिबस सुरराजु ॥ २७२ ॥

जनकांचे आगमन झाल्याचे ऐकून अयोध्येतून आलेल्या लोकांना आनंद झाला. श्रीरामांना मोठा संकोच वाटू लागला आणि देवराज इंद्र तर मोठ्या काळजीत पडला. ॥ २७२ ॥

गरइ गलानि कुटिल कैकेई । काहि कहै केहि दूषनु देई ॥

अस मन आनि मुदित नर नारी । भयउ बहोरि रहब दिन चारी ॥

कुटिल कैकेयी मनातून पश्चातापामुळे पार थिजून गेली. कुणाला सांगायचे व कुणाला दोष द्यायचा ? दुसरीकडे सर्व नर-नारी या कल्पनेने प्रसन्न झाले की, बरे झाले. जनक आल्यामुळे आणखी चार दिवस येथे राहाणे होईल. ॥ १ ॥

एहि प्रकार गत बासर सोऊ । प्रात नहान लाग सबु कोऊ ॥

करि मज्जनु पूजहिं नर नारी । गनप गौरि तिपुरारि तमारी ॥

अशा प्रकारे तो दिवस निघून गेला. दुसर्‍या दिवशी सकाळी सर्वजण स्नान करु लागले. स्नान करुन गणेश, गौरी महादेव व भगवान सूर्य यांची सर्वांनी पूजा केली. ॥ २ ॥

रमा रमन पद बंदि बहोरी । बिनवहिं अंजुलि अंचल जोरी ॥

राजा रामु जानकी रानी । आनँद अवधि अवध रजधानी ॥

नंतर लक्ष्मीपती भगवान विष्णूंच्या चरणांना वंदन करुन , हात जोडून व पदर पसरुन विनंती केली की, श्रीराम हे राजा व जानकी राणी होवोत. राजधानी अयोध्या ही आनंदाची परिसीमा होऊन ॥ ३ ॥

सुबस बसउ फिरि सहित समाजा । भरतहि रामु करहुँ जुबराजा ॥

एहि सुख सुधॉं सींचि सब काहू । देव देहु जग जीवन लाहू ॥

सर्व समाज सुखाने नांदो आणि श्रीराम भरताला युवराजपद देवोत. हे देवा, या सुखरुपी अमृताचे सिंचन करुन सर्वांना

जगात जगण्याचा लाभ द्या. ॥ ४ ॥

दोहा—गुर समाज भाइन्ह सहित राम राजु पुर होउ ।

अछत राम राजा अवध मरिअ माग सबु कोउ ॥ २७३ ॥

गुरु, समाज आणि भावांसह श्रीरामांचे राज्य अयोध्येत असो आणि श्रीराम राजा असतानाच आम्हांला अयोध्येत मृत्यु येवो.’ सर्वजण अशीच याचना करीत होते. ॥ २७३ ॥

सुनि सनेहमय पुरजन बानी । निंदहिं जोग बिरति मुनि ग्यानी ॥

एहि बिधि नित्यकरम करि पुरजन । रामहि करहिं प्रनाम पुलकि तन ॥

अयोध्यावासीयांची तो प्रेमळ वाणी ऐकून ज्ञानी मुनीसुद्धा आपल्या योग-साधनेची व वैराग्याची निंदा करु लागले. अयोध्यावासी अशा प्रकारे नित्यकर्म आटोपून पुलकित होऊन श्रीरामांना प्रणाम करु लागले. ॥ १ ॥

ऊँच नीच मध्यम नर नारी । लहहिं दरसु निज निज अनुहारी ॥

सावधान सबही सनमानहिं । सकल सराहत कृपानिधानहिं ॥

उच्च, नीच आणि मध्यम या सर्व थरांतील स्त्री-पुरुष आपापल्या भावनेप्रमाणे श्रीरामांचे दर्शन घेऊ लागले. श्रीरामांनी तत्परतेने सर्वांना सन्मान दिला आणि ते सर्व कृपानिधान श्रीरामांची प्रशंसा करु लागले. ॥ २ ॥

लरिकाइहि तें रघुबर बानी । पालत नीति प्रीति पहिचानी ॥

सील सकोच सिंधु रघुराऊ । सुमुख सुलोचन सरल सुभाऊ ॥

प्रेम ओळखून नीतीचे पालन करणे हा श्रीरामांचा लहानपणापासूनचा स्वभाव होता. श्रीरघुनाथ हे शील व संकोचाचा समुद्र होते. ते सर्वांना अनुकूल असणारे, सर्वांनाकृपेने व प्रेमाने पाहाणारे व सरळ स्वभावाचे होते. ॥ ३ ॥

कहत राम गुन गन अनुरागे । सब निज भाग सराहन लागे ॥

हम सम पुन्य पुंज जग थोरे । जिन्हहि रामु जानत करि मोरे ॥

श्रीरामांचे गुण सांगताना सर्व लोक प्रेममग्न झाले, आणि जगात आमच्यासारखे पुण्याची मोठी कमाई असणारे फारच थोडे आहेत. ज्यांना श्रीराम आपले मानतात असे म्हणून ते आपल्या भाग्याची प्रशंसा करु लागले, ॥ ४ ॥

दोहा—प्रेम मगन तेहि समय सब सुनि आवत मिथिलेसु ।

सहित सभा संभ्रम उठेउ रबिकुल कमल दिनेसु ॥ २७४ ॥

त्यावेळी सर्व लोक प्रेम-मग्न झाले होते. एवढ्यात मिथिलापती जनक येत आहेत, असे ऐकताच सूर्यकुलरुपी कमलासाठी सूर्य असलेले श्रीरामचंद्र सभेसह आदराने त्वरित उठून उभे राहिले, ॥ २७४ ॥

भाइ सचिव गुर पुरजन साथा । आगें गवनु कीन्ह रघुनाथा ॥

गिरिबरु दीख जबहीं । करि प्रनामु रथ त्यागेउ तबहीं ॥

श्रीरघुनाथ बंधु, मंत्री, गुरु व पुरवासी यांना घेऊन जनकांच्या स्वागतासाठी निघाले. जनकांनी पर्वतश्रेष्ठ कामदनाथाला पाहिले, तेव्हांच ते प्रणाम करुन रथातून उतरले व पायी चालू लागले. ॥ १ ॥

राम दरस लालसा उछाहू । पथ श्रम लेसु कलेसु न काहू ॥

मन तहँ जहँ रघुबर बैदेही । बिनु मन तन दुख सुख सुधि केही ॥

त्यांना श्रीरामांच्या दर्शनाची लालसा व उत्साह असल्यामुळे प्रवासाचा शीण व कष्ट वाटत नव्हते. जेथे श्रीराम व जानकी आहेत, तेथे त्यांचे मन लागले होते. मनाविना शरीराच्या सुख-दुः’खाची जाणीव कुणाला असते ? ॥ २ ॥

आवत जनकु चले एहि भॉंती । सहित समाज प्रेम मति माती ॥

आए निकट देखि अनुरागे । सादर मिलन परसपर लागे ॥

अशा अवस्थेमध्ये जनक राजा येत होते. सर्व मंडळींच्या बरोबर त्यांची बुद्धीही प्रेमात गुंग होऊन गेली होती. ते जवळ आल्याचे पाहून सर्वांच्या प्रेमाला भरते आले आणि ते आदराने परस्परांना भेटू लागले. ॥ ३ ॥

लगे जनक मुनिजन पद बंदन । रिषिन्ह प्रनामु कीन्ह रघुनंदन ॥

भाइन्ह सहित रामु मिलि राजहि । चले लवाइ समेत समाजहि ॥

जनक वसिष्ठादी मुनींच्या चरणांना वंदन करु लागले

 आणि श्रीरामचंद्रांनी जनकपुरीच्या शतानंदादी ऋषींना

 प्रणाम केला. नंतर श्रीराम भावांसह जनकांना भेटले

 आणि सर्वांना आपल्या आश्रमाकडे घेऊन येऊ लागले

. ॥ ४ ॥



Custom Search

No comments: