Saturday, July 3, 2021

Shri Dnyaneshwari Adhyay 9 Part 6 श्रीज्ञानेश्र्वरी अध्याय ९ भाग ६

 

Shri Dnyaneshwari 
Adhyay 9 Part 6,
Ovya 124 to 150
श्रीज्ञानेश्र्वरी 
अध्याय ९ भाग ६ 
ओव्या १२४ ते १५०

मूळ श्लोक

न च मां तानि कर्माणि निबध्नन्ति धनञ्जय ।

उदासीनवदासीनमसक्तं तेषु कर्मसु ॥ ९ ॥

९) आणि हे धनंजया, या ( जगदुत्पत्ति-संहारात्मक ) कर्माच्या ठिकाणीं अनासक्त व उदासीनाप्रमाणें असलेल्या मला, हीं कर्में बंधन करुं शकत नाहींत. 

आणि सुटलिया सिंधुजळाचा लोटु । न शके धरुं सैंधवाचा घाटु ।

तेवीं सकळ कर्मा मीच शेवटु । तें काइ बांधती मातें ॥ १२४ ॥

१२४) आणि समुद्राच्या पाण्याचा लोट सुटला असतां त्यास मीठाचा घाट थोपवून धरुं शकत नाहीं, ( कारण मिठाचा अंत समुद्राच्या पाण्यांत होतो. ) त्याप्रमाणें सर्व कर्मांची समाप्ति जर माझ्या स्वरुपीं होते, तर तीं कर्में मला काय बांधणार ?   

धूम्रजांची पिंजरी । वाजतिया वायूतें जरी होकारी ।

कां सूर्यबिंबामाघारीं । आंधारें रिगे ॥ १२५ ॥

१२५) धुराच्या कणांचे छत जर जोरानें वाहणार्‍या वार्‍यास थांबवील अथवा सूर्यबिंबांत जर अंधार प्रवेश करील.

हें असो पर्वताचिये हृदयींचें । जेविं पर्जन्य धारास्तव न खोंचे ।

तेविं कर्मजात प्रकृतीचें । न लगे मज ॥ १२६ ॥

१२६) हें राहूं दे, पावसाच्या धारा पर्वताच्या पोटांतील पदार्थांना खुपत नाहींत, त्याचप्रमाणें प्रकृतीचें कर्ममात्र मला बांधूं शकत नाहीं.  

एर्‍हवीं इये प्राकृतीं विकारीं । एकु मीचि आहें अवधारीं ।

परि उदासीनाचिया परी । करीं ना करवीं ॥ १२७ ॥

१२७) एर्‍हवीं, या प्रकृतीच्या विचारांमध्ये ( जगामध्यें ) मीच एक आहें, हें लक्षांत ठेव. परंतु एखाद्या उदास पुरुषाप्रमाणें मी स्वतः कांहीं करीत नाहीं अथवा दुसर्‍याकडून कांहीं करवीत ( हि ) नाहीं.

दीपु ठेविला परिवरीं । कवणातें नियमी ना निवारी ।

आणि कवण कवणिये व्यापारीं । राहाटे तेंहि नेणे ॥ १२८ ॥

१२८) घरांत ठेवलेला दिवा, कोणाला, तू अमुक एक काम कर, असा नियम घालून देत नाही; अथवा कोणीं कांहीं काम करत असलें, तर त्याचें निवारण करीत नाहीं; आणि घरामध्यें कोण काय काम करीत आहे, तेंहि जाणत नाहीं.

तो जैसा कां साक्षिभूतु । गृहव्यापारप्रवृत्तिहेतु ।

तैसा भूतकर्मीं अनासक्तु । मी भूतीं असें ॥ १२९ ॥

१२९) ज्याप्रमाणें तो दिवा घरांत साक्षीभूत असून घरांतील सर्व व्यापारांच्या प्रवृत्तीला कारण असतो, त्याप्रमाणें सर्व भूतांमध्ये मी असून, त्यांच्याकडून होणार्‍या कर्मांमध्ये मी उदासीन आहे.   

हा एकचि अभिप्रावो पुढतपुढती । काय सांगों बहुतां उपपत्तीं ।

तेथ एकवेळां सुभद्रापती । येतुलें जाण पां ॥ १३० ॥

१३०) हा एकच विचार पुनः पुनः अनेक युक्तिप्रयुक्त्यांनीं काय सांगूं ? अर्जुना, येथें ( आणखी ) एवढें समज म्हणजे झालें.

मूळ श्लोक

मय्याध्यक्षेण प्रकृतिः सूयते सचराचरम् ।

हेतुनानेन कौन्तेय जगद्विपरिवर्तते ॥ १० ॥

१०) हे कुंतीपुत्रा, माझ्या आश्रयानें माया चराचर जगत् निर्माण करते. या कारणामुळें जगाची घडामोड होते. 

जे लोकचेष्टां समस्तां । जैसा निमित्तमात्र कां सविता ।

तैसा जगत्प्रभवीं पंडुसुता । हेतु मी जाणें ॥ १३१ ॥

१३१) तें हें कीं, लोकांच्या सर्व व्यापाराला सूर्य जसा निमित्तमात्र आहे, त्याप्रमाणें अर्जुना, जगाच्या उत्पत्तीला मी हेतु आहें, असें समज. 

कां जे मियां अधिष्ठिलिया प्रकृती । होती चराचराचिया संभूती ।

म्हणोनि मी हेतु हे उपपत्ती । घडे यया ॥ १३२ ॥

१३२) कारण कीं मी प्रकृतीचा अंगीकार केला म्हणजे तिच्यापासून चराचरांची उत्पत्ति होतें; म्हणून मी चरावरांच्या उत्पत्तीला हेतु आहे, असे यक्तीला जुळतें.

आतां येणें उजिवडें निरुतें । न्याहाळीं पां ऐश्र्वर्ययोगातें ।

जे माझां ठायीं भूतें । परी भूतीं मी नसें ॥ १३३ ॥

१३३) आतां या विचाराच्या प्रकाशानें तूं माझ्या ( स्वरुपाला ) ऐश्र्वर्ययोगाला चांगले न्याहाळून पाहा. ( तें असें कीं, ) माझ्या ठिकाणी सर्व प्राणी आहेत , पण मी प्राण्यांमध्यें नाहीं.   

अथवा भूतें ना माझां ठायीं । आणि भूतांमाजि मी नाहीं ।

या खुणा तूं कहीं । चुको नको ॥ १३४ ॥ 

१३४) अथवा, भूतें माझ्या ठिकाणीं नाहींत आणि भूतांमध्यें मी नाहीं, हे वर्म तू कधीहि विसरुं नकोस.   

हें सर्वस्व आमचें गूढ । परि दाविलें तुज उघड ।

आतां इंद्रियां देऊनि कवाड । हृदयीं भोगीं ॥ १३५ ॥

१३५) ही आमची सर्वस्वी लपवून ठेवलेली गोष्ट आहे; परंतु तुला उघड करुन सांगितली आहे. आतां इंद्रियांचीं द्वारें बंद करुन ( सर्व इंद्रियवृत्ती अंतर्मुख करुन ) तूं ह्या गुह्य ह्या गुह्य विचाराच्या अंतःकरणांत अनुभव घे.   

हा दंशु जंव नये हातां । तंव माझें साचोकारेपण पार्था ।

न संपडे गा सर्वथा । जेविं भुसीं कणु ॥ १३६ ॥

१३६) अर्जुना, हें वर्म जोपर्यंत स्वाधीन होणार नाहीं, तोपर्यंत ज्याप्रमाणें कोंड्यांत दाणा शोधला असतां सांपडणार नाहीं, त्याप्रमाणें माझी खरी स्वरुपस्थिती मुळीच अनुभवास येणार नाहीं. 

एर्‍हवीं अनुमानाचेनि पैसे । आवडे कीर कळलें ऐसें ।

परि मृगजळाचेनि वोलांशें । काय भूमि तिमे ॥ १३७ ॥

१३७) एर्‍हवीं तर्काच्या बळानें ( माझी स्वरुपस्थिती ) खरोखर कळल्यासारखी वाटतें. ( पण तें खरें नाहीं, तें कसें तर पुढील उदाहरणानें सांगतात.) परंतु मृगजळाच्या ओलाव्यानें जमीन भिजते काय ? 

जे जाळ जळीं पांगिलें । तेथ चंद्रबिंब दिसे आंतुडलें ।

परि थडिये काढूनि झाडिले । तेव्हां बिंब कें सांगें ॥ १३८ ॥

१३८) जेव्हां जाळें पाण्यांत पसरलें, तेव्हां त्यांत चंद्रबिंब सापडल्यासारखें दिसतें; परंतु तें जाळें पाण्यांतून काढून कांठावर झाडलें तेव्हां चंद्रबिंब कोठे असतें, सांग बरें ?

तैसें बोलवरि वाचाबळें । वायांचि झकाविजती प्रतीतीचे डोळे ।

मग साचोकारें बोधावेळे । आधि ना होईजे ॥ १३९ ॥

१३९) त्याप्रमाणें वक्तृत्वाच्या जोरावर कित्येक आपल्या प्रतिपादनानें ( स्वतःच्या ) अनुभवाचे डोळे उगीच झांकण्यास लावतात ( आपण आपल्याला फसवितात ); मग खर्‍या बोधाची वेळ ( बोधाच्या परीक्षेची वेळ ) आली म्हणजे बोध असतहि नाहीं व होतहिं नाहीं.      

मूळ श्लोक

अवजानन्ति मां मूढा मानुषीं तनुमाश्रितम् ।

परं भावमजानन्तो मम भूतमहेश्र्वरम् ॥ ११ ॥

११) माझें उत्कृष्ट स्वरुप न जाणणारे मूर्ख ( सर्व ) भूतांचा ईश्र्वर असलेल्या, ( पण सांप्रत ) मानवदेह धारणकरणार्‍या ( मला मनुष्यच समजून मनुष्यधर्म माझ्यावर आरोपित करुन ) माझी अवहेलना करतात.

किंबहुना भवा विहा या । आणि साचें चाड आथि जरी मियां ।

तरी तुम्हीं गा उपपत्ती इया । जतन कीजे ॥ १४० ॥

१४०) फार काय सांगावें ? जर तुम्ही या संसाराला भीत असाल आणि माझ्या स्वरुपप्राप्तीविषयीं जर तुम्हांला खरी खरी इच्छा असेल, तर आम्ही हे सांगितलेले विचार तुम्ही ध्यानांत ठेवा.

एर्‍हवीं वेधली दिठी कवळें । ते चांदणियातें म्हणे पिवळें ।

तेविं माझां स्वरुपीं निर्मळे । देखाल दोष ॥ १४१ ॥

१४१) नाहींतर ( ज्याप्रमाणें ) काविळीनें व्यापलेली दृष्टि चांदण्याला पिवळें समजतें, त्याप्रमाणें माझ्या सुद्धा स्वरुपांत दोष पाहाल.

नातरी ज्वरें विटाळलें मुख । तें दुधातें म्हणे कडू विख ।

तेविं अमानुषा मानुष । मानाल मातें ॥ १४२ ॥

१४२) अथवा तापानें दूषित झालेलें तोंड दूधाला कडू विष म्हणतें, त्याप्रमाणें मनुष्य नसलेल्या मला मनुष्य असें मानाल. 

म्हणऊनि पुढती तूं धनंजया । झणें विसंबसी या अभिप्राया ।

जे इया स्थूलदृष्टी वायां । जाइजेल गा ॥ १४३ ॥

१४३) म्हणून अर्जुना, पुनः तुला एकवार बजावतों कीं, तूं कदाचित् या सांगितलेल्या ( स्वरुपज्ञानाच्या ) अभिप्रायाला विसरशील, तर विसरुं नकोस. कारण या स्थूल दृष्टीनें मला पाहूं म्हटलें तर, तें पाहणें व्यर्थ होईल. 

पैं स्थूलदृष्टी देखती मातें । तेचि न देखणें जाण निरुतें ।

जैसें स्वप्नींचेनि अमृतें । अमरा नोहिजे ॥ १४४ ॥

१४४) ज्याप्रमाणें स्वप्नांतील ( सेवन केलेल्या अमृतानें अमर होता येत नाहीं, ( कारण तें पिऊनहि न प्यायल्याप्रमाणें आहें ) त्याप्रमाणें मी देहधारी आहें अशी बुद्धि ठेवून जें माझ्याकडे पाहतात, त्यांचें तें पाहणें खरोखर न पाहण्यांत जमा आहे, असें समज. 

एर्‍हवीं स्थूलदृष्टी मूढ । मातें जाणती कीर दृढ ।

परि तें जाणणेंचि जाणणेया आड । रिगोनि ठाके ॥ १४५ ॥

१४५) एर्‍हवीं मी स्थूल आहे, अशा दृष्टीनें माझ्याकडे पाहणारे जे मूर्ख लोक, ते आपल्या समजुतीप्रमाणें खरोखरी पूर्णपणें जाणतात; परंतु त्यांचें तें जाणणेंच, माझ्या स्वरुपाच्या खर्‍या ज्ञानाच्या आड येते.  

जैसा नक्षत्राचिया आभासा--। साठीं घातु झाला तया हंसा ।

माजीं रत्नबुद्धीचिया आशा । रिगोनियां ॥ १४६ ॥    

१४६) ज्याप्रमाणें पाण्यातील नक्षत्रांच्या प्रतिबिंबाला पाहून तीं रत्नें आहेत, असा समजुतीनें त्याविषयीं लोभ धरुन व पाण्यांत शिरुन ( ती खाण्याच्या  आशेनें पाण्यांतील खडकावर चोंच आपटून ) जसा एखाद्या हंसानें आपला घात करावा.

सांगे गंगा या बुद्धी मृगजळ । ठाकोनि आलियाचें कवण फळ ।

काय सुरतरु म्हणोनि बाबुळ । सेविली करी ॥ १४७ ॥

१४७) अर्जुना, सांग, ही गंगा आहे, अशा समजुतीनें मृगजळाजवळ येऊन पोहोचलों तर त्याचें फळ काय ? अथवा कल्पवृक्ष म्हणून बाभळीचा आक्षय केला, तर ती बाभळ इच्छिलेले फळ देईल काय ? 

हा निळ्याचा दुसरा । या बुद्धी हातु घातला विखारा ।

कां रत्नें म्हणोनि गारा । वेंची जेवीं ॥ १४८ ॥

१४८) हा नील मण्यांचा दोन पदरी हार आहे, या बुद्धीनें तो घेण्याकरितां सापाला उचलून घेण्यास तयार व्हावें अथवा हीं रत्नें आहेत अशा समजुतीनें जशा गारगोट्या वेचाव्यात;  

अथवा निधान हें प्रगटलें । म्हणोनि खदिरांगार खोळे भरिलें ।

कां साउलीं नेणतां घातलें । कुहां सिंहें ॥ १४९ ॥

१४९) किंवा द्रव्याचा ठेवाच प्रकट झाला आहे, असें समजून खैराचे निखारे आपल्या पदरांत धरावेत अथवा ही आपली पडछाया आहे, असें न समजतां सिंहानें विहिरींत उडी घालावी;

तेविं मी म्हणोनि प्रपंचीं । जिहीं बुडी दिधली कृतनिश्र्चयाची ।

तिहीं चंद्रासाठीं जेविं जळींची । प्रतिमा धरिली ॥ १५० ॥

१५०) त्याप्रमाणें ज्यांनी मी परमात्मा देहधारी आहे, असा

 आपल्या बुद्धिमध्यें कृतनिश्र्चय केला, त्यांनी खरा चंद्र

 म्हणून पाण्यांतील चंद्राचे प्रतिबिंब घेतल्यासारखें आहे.


Custom Search

No comments: