Friday, August 19, 2022

KikshindhaKanda Part 5 ShriRamCharitManas Doha 12 to Doha 14 किष्किन्धाकाण्ड भाग ५ श्रीरामचरितमानस दोहा १२ ते दोहा १४

 

KikshindhaKanda Part 5
ShriRamCharitManas 
Doha 12 to 14 
किष्किन्धाकाण्ड भाग ५ 
श्रीरामचरितमानस 
दोहा १२ ते १४

दोहा---प्रथमहिं देवन्ह गिरि गुहा राखेउ रुचिर बनाइ ।

राम कृपानिधि कछु दिन बास करहिंगे आइ ॥ १२ ॥

देवांनी पूर्वीच त्या पर्वतावरची एक गुहा सज्ज करुन ठेवली होती. त्यांना वाटले की, कृपेची खाण श्रीराम काही दिवस येथे येऊन राहातील. ॥ १ ॥

सुंदर बन कुसुमित अति सोभा । गुंजत मधुप निकर मधु लोभा ॥

कंद मूल फल पत्र सुहाए । भए बहुत जब ते प्रभु आए ॥

सुंदर फुललेले वन अत्यंत सुशोभित होते. मधाच्या लोभाने भ्रमरांचा समुह गुंजारव करीत होता. जेव्हापासून प्रभू आले, तेव्हापासून वनात सुंदर कंद, मुळे, फळे व पाने विपुल झाली. ॥ १ ॥

देखि मनोहर सैल अनूपा । रहे तहँ अनुज सहित सुरभूपा ॥

मधुकर खग मृग तनु धरि देवा । करहिं सिद्ध मुनि प्रभु कै सेवा ॥

मनोहर आणि अनुपम पर्वत पाहून देवांचे सम्राट श्रीराम लक्ष्मणासह तेथे राहिले. देव, सिद्ध व मुनी के भ्रमर, पक्षी आणि पशूंचे शरीर धारण करुन प्रभूंची सेवा करु लागले. ॥ २ ॥

मंगलरुप भयउ बन तब ते । कीन्ह निवास रमापति जब ते ॥

फटिक सिला अति सुभ्र सुहाई । सुख आसीन तहॉं द्वौ भाई ॥

जेव्हापासून रमापती श्रीरामांनी तेथे निवास केला, तेव्हापासूनच वन मंगलमय झाले. सुंदर स्फटिकमण्यांची एक अत्यंत सुंदर शिळा होती. तिच्यावर दोघे बंधू सुखात विराजमान होते. ॥ ३ ॥

कहत अनुज सन कथा अनेका । भगति बिरति नृपनीति बिबेका ॥

बरषा काल मेघ नभ छाए । गरजत लागत परम सुहाए ॥

श्रीराम हे लक्ष्मणाला भक्ती, वैराग्य, राजनीती आणि ज्ञानाच्या अनेक कथा सांगत. पावसाळा आला. आकाशात आलेले ढग गर्जना करताना फार सुंदर दिसत होते. ॥ ४ ॥

दोहा—लछिमन देखू मोर गन नाचत बारिद पेखि ।

गृही बिरति रत हरष जस बिष्नुभगत कहुँ देखि ॥ १३ ॥

श्रीराम म्हणू लागले, ‘ हे लक्ष्मणा, बघ मोरांच्या झुंडी गर्जना करणार्‍या मेघांना पाहून नाचत आहेत. ज्याप्रमाणे वैराग्यामध्ये डुंबलेले गृहस्थही एखाद्या विष्णुभक्ताला पाहून आनंदित होतात. ‘ ॥ १३ ॥

घन घमंड नभ गरजत घोरा । प्रिया हीन डरपत मन मोरा ॥

दामिनि दमक रह न घन माहीं । खल कै प्रीति जथा थिर नाहीं ॥

आकाशात मेघ इकडे तिकडे फिरत घोर गर्जना करीत आहेत. प्रिय सीतेविना माझे मन बावरले आहे. ज्याप्रमाणे दुष्टाचे प्रेम स्थिर राहात नाही, त्याप्रमाणे विजेची चमक मेघांमध्ये थांबत नाही. ॥ १ ॥

बरषहिं जलद भूमि निअराएँ । जथा नवहिं बुध बिद्या पाएँ ॥

बूँद अघात सहहिं गिरि कैसें । खल के बचन संत सह जैसें ॥

मेघ पृथ्वीजवळ येऊन वर्षत आहेत, ज्याप्रमाणे विद्या मिळाल्यावर विद्वान नम्र होतात. दुष्टांचे वचन संत सहन करतात, ज्याप्रमाणे थेंबांचे आघात पर्वत सहन करतात. ॥ २ ॥

छुद्र नदीं भरि चलीं तोराई । जस थोरेहुँ धन खल इतराई ॥

भूमि परत भा ढाबर पानी । जनु जीवहि माया लपटानी ॥

ज्याप्रमाणे थोड्याशा पैशामुळेही दुष्ट लोक घमेंडीने वागतात, त्याप्रमाणे लहान नद्या भरुन किनार्‍यांना तुडवीत चालल्या आहेत. ज्याप्रमाणे शुद्ध जीवाला माया लिप्त करते, त्याप्रमाणे पृथ्वीवर पाणी पडताच गढूळ होते. ॥ ३ ॥

समिटि समिटि जल भरहिं तलावा । जिमि सदगुन सज्जन पहिं आवा ॥

सरिता जल जलनिधि महुँ जाई । होइ अचल जिमि जिव हरि पाई ॥

ज्याप्रमाणे एक-एक सद्गुण सज्जनाजवळ येतात, त्याप्रमाणे पाणी एकत्र होत होत तलावांमध्ये भरत आहे. ज्याप्रमाणे जीव हा श्रीहरीला प्राप्त केल्यावर येरझारीतून मुक्त होतो, त्याप्रमाणे नदीचे पाणी समुद्रात जाऊन स्थिर होते. ॥ ४ ॥

दोहा---हरित भूमि तृन संकुल समुझि परहिं नहिं पंथ ।

जिमि पाखंड बाद ते गुप्त होहिं सदग्रंथ ॥ १४ ॥

ज्याप्रमाणे पाखंडी मताच्या प्रचारामुळे सद् ग्रंथ लुप्त होतात, त्याप्रमाणे पृथ्वी गवताने भरुन गेल्यावर वाटा दिसून येत नाहीत. ॥ १४ ॥

दादुर धुनि चहु दिसा सुहाई । बेद पढ़हिं जनु बटु समुदाई ॥

नव पल्लव भए बिटप अनेका । साधक मन जस मिलें बिबेका ॥

चारी दिशांना बेडकांचा स्वर असा गमतीचा वाटतो की, जणू विद्यार्थ्यांचे समुदाय वेद पठन करीत आहेत. अनेक वृक्षांना नवीन पाने आली आहेत. त्यामुळे ते असे हिरवेगार आणि शोभिवंत झाले आहेत की, साधकाचे मन विवेकज्ञान प्राप्त झाल्यावर जसे होते. ॥ १ ॥

अर्क जवास पात बिनु भयऊ । जस सुराज खल उद्यम गयऊ ॥

खोजत कतहुँ मिलइ नहिं धूरी । करइ क्रोध जिमि धरमहि दूरी ॥

रुईचे झाड व धमासा यांची पाने पावसामुळे झडून गेली, ज्याप्रमाणे उत्तम राज्यात दुष्टांचे धंदे बंद होतात. कुठे शोधूनही धूळ सापडत नाही, ज्याप्रमाणे क्रोध आल्यावर धर्माचे ज्ञान उरत नाही. ॥ २ ॥

ससि संपन्न सोह महि कैसी । उपकारी कै संपति जैसी ॥

निसि तम घन खद्योत बिराजा । जनु दंभिन्ह कर मिला समाजा ॥

बहरलेल्या हिरव्यागार शेतीमुळे पृथ्वी अशी शोभून दिसत आहे की, जशी उपकारी पुरुषांची संपत्ती शोभते. रात्रीच्या दाट अंधारामध्ये काजवे असे दिसत आहेत की, जणू ढोंगी लोकांचा समाज जमलेला आहे. ॥ ३ ॥

महाबृष्टि चली फूटि किआरीं । जिमि सुतंत्र भएँ बिगरहिं नारीं ॥

कृषी निरावहिं चतुर किसाना । जिमि बुध तजहिं मोह मद माना ॥

भरपूर पावसामुळे शेतातील बांध फुटून निघाले आहेत, ज्याप्रमाणे स्वातंत्र्यामुळे स्त्रिया बिघडतात. शहाणे शेतकरी भांगलून गवत टाकून देत आहेत, ज्याप्रमाणे विद्वान लोक मोह, मद आणि मान यांचा त्याग करतात. ॥ ४ ॥

देखिअत चक्रबाक खग नाहीं । कलिहि पाइ जिमि धर्म पराहीं ॥

ऊषर बरषइ तृन नहिं जामा । जिमि हरिजन हियँ उपज न कामा ॥

चक्रवाक पक्षी दिसत नाहीत, ज्याप्रमाणे कलियुग आल्यावर धर्म पलायन करतात, जसे पडीक जमिनीवर पाऊस पडतो, परंतु तेथे गवतसुद्धा उगवत नाही, ज्याप्रमाणे हरिभक्ताच्या हृदयात कामवासना उत्पन्न होत नाही. ॥ ५ ॥

बिबिध जंतु संकुल महि भ्राजा । प्रजा बाढ़ जिमि पाइ सुराजा ॥

जहँ तहँ रहे पथिक थकि नाना । जिमि इंद्रिय गन उपजें ग्याना ॥

ज्याप्रमाणे सुराज्य आल्यावर प्रजेची वृद्धी होते त्याप्रमाणे

 पृथ्वी अनेक तर्‍हेच्या जीवांनी शोभत आहे. ज्याप्रमाणे

 ज्ञान उत्पन्न झाल्यावर इंद्रिये शांत होऊन विषयांकडे

 वळत नाहीत, त्याप्रमाणे जिकडे-तिकडे अनेक वाटसरु

 प्रवास सोडून देऊन आपापल्या घरी राहिलेले आहेत. ॥

 ६ ॥



Custom Search

No comments: