Showing posts with label मोक्षसंन्यासयोग अध्याय १८ वा. Show all posts
Showing posts with label मोक्षसंन्यासयोग अध्याय १८ वा. Show all posts

Saturday, May 21, 2016

Shri Mat Bhagwat Geeta Adhyay 18 मोक्षसंन्यासयोग अध्याय १८ वा


Shri Mat Bhagwat Geeta Adhyay 18 
Shri Mat Bhagwat Geeta Adhyay 18 is in Sanskrit. Name of this Adhyay is MokshaSannyas yoga. God Shrikrishna is telling to Arjuna how Moksha is obtained through Sannsya Yoga.
मोक्षसंन्यासयोग अध्याय १८ वा 
मराठी अर्थ
अर्जुन म्हणाला
१) हे महाबाहो, हे अंतर्यामी, हे वासुदेवा, मी संन्यास आणिसन् त्याग यांचे तत्त्व वेगवेगळे जाणू इच्छितो . 
श्रीभगवान म्हणाले
२) कित्येक पंडित काम्य कर्माच्या त्यागाला ' संन्यास ' मानतात.; तर दुसरे काही विचारकुशल लोक सर्व कर्माच्या फळाच्या त्यागाला  ' त्याग ' 
म्हणतात.
३) कित्येक विद्वान असे म्हणतात की, सर्व कर्मे दोषयुक्त आहेत म्हणून ( ती ) 
टाकणे योग्य होय आणि दुसरे विद्वान असे म्हणतात की, यज्ञ, दान आणि तपरुप कर्मे टाकणे योग्य नाही.
४) हे पुरुषश्रेष्ठ अर्जुना, संन्यास आणि त्याग या दोहोंपैकी प्रथम त्यागाच्या बाबतीत माझा निर्णय ऐक. कारण त्याग सात्विक, राजस आणि तामस या भेदांमुळे तीन प्रकारचा सांगितला आहे.
५) यज्ञ , दान आणि तपरुप कर्म टाकणे योग्य नाही. उलट ते अवश्य केले पाहिजे. कारण यज्ञ, दान व तप ही तीनही कर्मे बुद्धिमान माणसांना पवित्र करणारी आहेत. 
६) म्हणून हे पार्थ, ही यज्ञ, दान व तपरुप कर्मे तसेच इतरही सर्व कर्तव्य कर्मे आसक्ती आणि फलांचा त्याग करुन अवश्य केली पाहिजेत. हे माझे निश्र्चित असे उत्तम मत आहे.
७)( निषिद्ध आणि काम्य कर्मांचा तर स्वरुपतः त्याग करणे योग्यच आहे. ) परंतु नियत कर्माचा स्वरुपतः त्याग योग्य नाही. म्हणून मोहाने त्याचा त्याग करणे याला ' तामस त्याग ' म्हटले आहे. 
८) जे काही कर्म आहे, ते दुःखरुपच आहे, असे समजून जर कोणी शारीरिक त्रासाच्या भीतीने कर्तव्य कर्मे सोडून देईल, तर त्याला असा राजस त्याग करुन त्यागाचे फळ कोणत्याही प्रकारे मिळत नाही. 
९) हे अर्जुना, जे शास्त्रविहित कर्म ' करणे कर्तव्य आहे ' या भावनेने आसक्ती आणि फळाचा त्याग करुन केले जाते, तोच ' सात्त्विक ' त्याग मानला गेला आहे.
१०) जो मनुष्य कुशल नसलेल्या कर्मांचा द्वेष करीत नाही आणि कुशल कर्मांत आसक्त होत नाही, तो शुद्ध सत्त्वगुणी पुरुष संशयरहित ज्ञानी व खरा त्यागी होय. 
११) कारण शरीरधारी कोणत्याही माणसाकडून पूर्णपणे सर्व कर्मांचा त्याग केला जाणे शक्य नाही. म्हणून जो कर्मफळाचा त्यागी आहे, तोच त्यागी आहे, असे म्हटले जाते.
१२) कर्मफळाचा त्याग न करणार्‍या मनुष्यांना कर्माचे बरे, वाईट व मिश्र असे तीन प्रकारचे फळ मेल्यानंतर जरुर मिळते; परंतु कर्मफळाचा त्याग करणार्‍या मनुष्यांना कर्माचे फळ कधीही मिळत नाही.      
१३) हे महाबाहो, सर्व कर्मांच्या सिद्धींची ही पांच कारणे, कर्माचा शेवट करण्याचा उपाय सांगणार्‍या सांख्यशास्त्रांत सांगितली गेली आहेत, ती तू माझ्याकडून नीट समजून घे.
१४) कर्म पूर्ण होण्यासाठी अधिष्ठान, कर्ता, निरनिराळ्या प्रकारची करणे, अनेक प्रकारच्या वेगवेगळ्या क्रिया आणि तसेच पाचवे कारण दैव आहे.
१५) मनुष्य मन, वाणी आणि शरीराने शास्त्राला अनुसरुन किंवा त्याविरुद्ध कोणतेही कर्म करतो, त्याची ही पाचही कारणे असतात. 
१६) परंतु असे असूनही जो मनुष्य अशुद्ध बुद्धीमुळे कर्मे पूर्ण होण्यामध्ये केवळ आणि शुद्धस्वरुप आत्म्याला कर्ता समजतो, तो मलिन बुद्धीचा अज्ञानी खरे काय ते जाणत नाही.
१७) ज्या माणसाच्या अंतःकरणांत ' मी कर्ता आहे,' असा भाव नसतो, तसेच ज्याची बुद्धी सांसारिक पदार्थांत आणि कर्मांत लिप्त होत नाही, तो माणूस या सर्व लोकांना मारुनही वास्तविक तो मारत नाही आणि त्याला पापही लागत नाही.
१८) ज्ञाता, ज्ञान, आणि ज्ञेय या तीन प्रकारच्या कर्माच्या प्रेरणा आहेत आणि कर्ता, करण तसेच क्रिया हे तीन प्रकारचे कर्मसंग्रह आहेत.
१९) गुणांची संख्या करणार्‍या शास्त्रात ज्ञान, कर्म आणि कर्ता हे गुणांच्या भेदाने तीन-तीन प्रकारचे सांगितले आहेत, तेही तू माझ्याकडून नीट ऐक.
२०) ज्या ज्ञानामुळे माणूस ' निरनिराळ्या सर्व भूतांमध्ये एक अविनाशी परमात्मभाव विभागरहित समभावाने भरुन राहिला आहे, ' असे पाहतो, ते ज्ञान तू सात्त्विक आहे, असे जाण.
२१) परंतु ज्या ज्ञानाने मनुष्य सर्व भूतांमध्ये भिन्न भिन्न प्रकारांचे अनेक भाव वेगवेगळे जाणतो, ते ज्ञान तू राजस समज. 
२२) परंतु जे ज्ञान एका कार्यरुपी शरीरातच पूर्णासारखे आसक्त असते, तसेच जे युक्तिशून्य, तात्त्विक अर्थाने रहित आणि तुच्छ असते, ते तामस म्हटले गेले आहे.         
२३) जे कर्म शास्त्रविधीने नेमून दिलेले असून कर्तेपणाचा अभिमान न बाळगता फळाची इच्छा न करणार्‍या माणसाने राग व द्वेष सोडून केलेले असते, ते सात्त्विक म्हटले जाते.  
२४) परंतु जे कर्म अतिशय परिश्रमपूर्वक तसेच भोगांची इच्छा करणार्‍या किंवा अहंकार बाळगणार्‍या माणसाकडून केले जाते, ते राजस म्हटले गेले आहे.
२५) जे कर्म परिणाम, हानी, हिंसा आणि सामर्थ्य यांचा विचार न करता केवळ अज्ञानाने केले जाते, ते तामस होते. 
२६) जो कर्ता आसक्ती न बाळगणारा, ' मी माझे ' न म्हणणारा, धैर्य व उत्साहाने युक्त, ' कार्य सिद्ध होवो न होवो, ' याविषयी हर्षशोकादी विकारांनी रहित असलेला-- तो सात्त्विक म्हटला जातो. 
२७) जो कर्ता आसक्ती असलेला, कर्मांच्या फळांची इच्छा बाळगणारा. लोभी, इतरांना पीडा करण्याचा स्वभाव असलेला, अशुद्ध आचरणाचा आणि हर्ष-शोकांनी युक्त असतो, तो राजस म्हटला जातो. 
२८) जो कर्ता अयुक्त, अशिक्षित, घमेंडखोर, धूर्त, दुसर्‍यांची जीवन-वृत्ती नाहीशी करणारा, शोक करणारा, आळशी आणि दीर्घसूत्री असतो, तो तामस म्हटला जातो.
२९) हे धनंजया, आता बुद्धीचे व धृतीचेही गुणांनुसार तीन प्रकारचे भेद माझ्याकडून पूर्णपणे विभागपूर्वक सांगितले जात आहेत, ते तू ऐक. 
३०) हे पार्था, जी बुद्धी प्रवृत्तिमार्ग व निवृत्तिमार्ग, कर्तव्य आणि अकर्तव्य , भय आणि अभय तसेच बंधन आणि मोक्ष यथार्थपणे जाणते, ती सात्त्विक बुद्धी होय.   
३१) हे पार्था, मनुष्य ज्या बुद्धीमुळे धर्म आणि अधर्म तसेच कर्तव्य आणि अकर्तव्य यथायोग्य रीतीने जाणत नाही, ती बुद्धी राजसी होय.
३२) हे अर्जुना, तमोगुणाने व्यापलेली जी बुद्धी अधर्मालाही ' हा धर्म आहे, ' असे मानते, तसेच याच रीतीने इतर सर्व पदार्थांनाही विपरीत मानते, ती बुद्धी तामसी होय.
३३) हे पार्था, ज्या अव्यभिचारिणी धारणाशक्तीने मनुष्य ध्यानयोगाने मन, प्राण व इंद्रिये यांच्या क्रिया धारण करीत असतो, ती धारणा सात्विक होय.
३४) परंतु हे कुंतीपुत्र अर्जुना, फळाची इच्छा असलेला मनुष्य अती आसक्तीमुळे ज्या धारणाशक्तीने धर्म, अर्थ व काम यांना धारण करतो, ती धारणा राजसी होय.
३५) हे पार्था, दुष्ट बुद्धीचा मनुष्य ज्या धारणाशक्तीमुळे झोप, भीती, काळजी, दुःख आणि उन्मत्तपणाही सोडत नाही, अर्थात धारण करुन राहतो, ती धारणा तामसी होय.
३६) हे भरतश्रेष्ठा, आता तीन प्रकारचे सुखही तू माझ्याकडून ऐक. ज्या सुखांत साधक भजन, ध्यान आणि सेवा इत्यादींच्या अभ्यासाने रमतो आणि ज्यामुळे त्याचे दुःख नाहीसे होते,
३७) जे आरंभी जरी विषासारखे वाटले, तरी परिणामी अमृत असते, ते परात्मकविषयक बुद्धीच्या प्रसादाने उत्पन्न होणारे सुख सात्विक म्हटले गेले आहे. 
३८) जे सुख विषय आणि इंद्रियांच्या संयोगाने उत्पन्न होते, ते प्रथम भोगताना अमृतासारखे वाटत असले तरी परिणामी विषासारखे असते. म्हणून ते सुख राजस म्हटले गेले आहे. 
३९) जे सुख भोगकाली आणि परिणामीही आत्म्याला मोह पाडणारे असते,ते झोप, आळस व प्रमादापासून उत्पन्न झालेले सुख तामस म्हटले आहे. 
४०) पृथ्वीवर, आकाशात किंवा देवांत तसेच यांच्याशिवाय इतरत्र कोठेही असा कोणताच प्राणी किंवा पदार्थ नाही की, जो प्रकृतीपासून उत्पन्न झालेल्या या तीन गुणांनी रहित असेल. 
४१) हे परन्तपा, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र यांची कर्मे स्वभावतः उत्पन्न झालेल्या गुणांमुळे निरनिराळी केली गेली आहेत.
४२) अंतःकरणाचा निग्रह, इंद्रियांवर ताबा ठेवणे, धर्मासाठी कष्ट सहन करणे, अंतर्बाह्य शुद्धी राहणे, दुसर्‍यांच्या अपराधांना क्षमा करणे, मन, इंद्रिये व शरीर सरळ राखणे, वेद, शास्त्र, ईश्र्वर व परलोक इत्यादींवर विश्र्वास ठेवणे, वेद-शास्त्रांचे अध्ययन-अध्यापन करणे आणि परमात्वतत्त्वाचा अनुभव घेणे ही सर्वच्या सर्व ब्राह्मणाची स्वाभाविक कर्मे आहेत.
४३) शौर्य, तेज, धैर्य, चातुर्य, युद्धातून पलायन न करणे, दान देणे आणि स्वामिभाव ही सर्वच्या सर्व क्षत्रियांची स्वाभाविक कर्मे आहेत.
४४) शेती, गोपालन आणि क्रयविक्रयरुप सत्य व्यवहार ही वैश्याची स्वाभाविक कर्मे होत. तसेच सर्व वर्णांची सेवा करणे हे शूद्रांचेही स्वाभाविक कर्म आहे. 
४५) आपापल्या स्वाभाविक कर्मांत तत्पर असलेल्या मनुष्यास भगवत् प्राप्तिरुप परम सिद्धीचा लाभ होतो. आपल्या स्वाभाविक कर्मांत रत असलेला मनुष्य ज्या रीतीने कर्म करुन परमसिद्धीला प्राप्त होतो, ती रीत तू ऐक.
४६) ज्या परमेश्र्वरापासून सर्व प्राण्यांची उत्पत्ती झाली आहे आणि ज्याने हे सर्व जग व्यापले आहे, त्या परमेश्र्वराची आपल्या स्वाभाविक कर्मांनी पूजा करुन मनुष्य परमसिद्धी मिळवितो.
४७) उत्तम प्रकारेआचरिलेल्या दुसर्‍याच्या धर्मापेक्षा वैगुण्य असलेलाही आपला धर्म श्रेष्ठ आहे. कारण स्वभावाने नेमून दिलेले स्वधर्मरुप कर्म करणार्‍या माणसाला पाप लागत नाही.
४८) म्हणूनच हे कुंतीपुत्रा, सदोष असले तरीही स्वाभाविक कर्म सोडून देऊ नये. कारण धुराने जसा अग्नि, तशी सर्व कामे कोणत्या ना कोणत्या दोषाने युक्त असतात.
४९) सर्वत्र आसक्तिरहित बुद्धी असलेला, निःस्पृह आणि अंतःकरण जिंकलेला मनुष्य सांख्ययोगाने त्या श्रेष्ठ ' नैष्कर्म्यसिद्धीला ' प्राप्त होतो. 
५०) हे कुंतीपुत्रा, जी ज्ञानयोगाची अंतिम स्थिती आहे, त्या नैष्कर्म्यसिद्धीला ज्या रीतीने प्राप्त होऊन मनुष्य ब्रह्माला प्राप्त होतो, ती रीत थोडक्यांत तू माझ्याकडून समजून घे.             
५१-५३) विशुद्ध बुद्धीने युक्त; हलके, सात्त्विक आणि नियमित भोजन घेणारा;  शब्दादी विषयांचा त्याग करुन, एकान्तात शुद्ध ठिकाणी राहणारा; सात्त्विक धारणाशक्तीने अंतःकरण व इंद्रियांवर संयम ठेवून मन, वाणी आणि शरीर ताब्यात ठेवणारा; राग -द्वेष पूर्णपणे नाहीसे करुन, चांगल्या प्रकारे दृढ वैराग्याचा आश्रय घेणारा; अहंकार, बळ, घमेंड, कामना, राग, संग्रहवृत्ती यांचा त्याग करुन नेहमी ध्यानयोगात तत्पर असणारा; ममतारहित व शांतियुक्त असा पुरुष सच्चिदानंदघन ब्रह्मामध्ये एकरुप होऊन राहण्यास पात्र होतो. 
५४) मग तो सच्चिदानंदघन ब्रह्मात तद्रूप झालेला प्रसन्न चित्ताचा योगी कशाबद्दलही शोक करीत नाही, आणि कशाचीही इच्छा करीत नाही. असा सर्व प्राण्यांच्या ठिकाणी सम भाव बाळगणारा योगी माझ्या पराभक्तीला प्राप्त होतो. 
५५) त्या पराभक्तीच्या योगाने तो मज परमात्म्याला ' मी जो आणि जसा आहे '  अगदी बरोबर तसाच तत्त्वतः जाणतो, तसेच त्या भक्तीने मला तत्त्वतः जाणून त्याचवेळी माझ्यात प्रविष्ट होतो. 
५६) माझ्या आश्रयाने राहणारा कर्मयोगी सर्व कर्मे नेहमी करीत असला तरी माझ्या कृपेने सनातन अविनाशी परमपदाला प्राप्त होतो.
५७) सर्व कर्मे मनाने माझ्या ठिकाणी अर्पण करुन तसेच समबुद्धिरुप योगाचा अवलंब करुन मत्परायण आणि निरंतर माझ्या ठिकाणी चित्त असलेला होतो.
५८) वर सांगितल्याप्रमाणे माझ्या ठिकाणी चित्त ठेवल्याने तू माझ्या कृपेने सर्व संकटातून सहजच पार होशील आणि जर अहंकारामुळे माझे सांगणे न ऐकशील, तर नष्ट होशील अर्थात परमार्थाला मुकशील.
५९) तू अहंकार धरुन ' मी युद्ध करणार नाही ', असे मानतोस, तो तुझा निश्र्चय व्यर्थ आहे, कारण तुझा स्वभाव तुला जबरदस्तीने युद्ध करावयास लावील.
६०) हे कुंतीपुत्रा, जे कर्म तू मोहामुळे करु इच्छित नाहीस, तेही आपल्या पूर्वकृत स्वाभाविक कर्माने बद्ध असल्यामुळे पराधीन होऊन करशील. 
६१) हे अर्जुना, अंतर्यामी परमेश्र्वर आपल्या मायेने शरीररुप यंत्रावर आरुढ झालेल्या सर्व प्राण्यांना त्यांच्या कर्मानुसार फिरवीत सर्व प्राण्यांच्या हृदयांत राहिला आहे.
६२) हे भारता, तू सर्व प्रकारे त्या परमेश्र्वरालाच शरण जा. त्या परमात्म्याच्या कृपेनेच तुला परमशांती आणि सनातन परमधाम मिळेल. 
६३) अशाप्रकारे हे गोपनीयाहूनही अतिगोपनीय ज्ञान मी तुला सांगितले. आता तू या रहस्यमय ज्ञानाचा संपूर्णपणे चांगला विचार करुन मग जसे तुला आवडेल तसे कर.
६४) सर्व गोपनीयांहून अतिगोपनीय माझे परम रहस्ययुक्त वचन तू पुन्हा ऐक. तू माझा अत्यंत आवडता आहेस, म्हणून हे परम हितकारक वचन मी तुला सांगणार आहे.
६५) हे अर्जुना, तू माझ्या ठिकाणी मन ठेव. माझा भक्त हो. माझे पूजन कर. आणि मला नमस्कार कर. असे केले असता तू मलाच येऊन मिळशील. हे मी तुला सत्य प्रतिज्ञापूर्वक सांगतो. कारण तू माझा अत्यंत आवडता आहेस. 
६६) सर्व धर्म म्हणजे सर्व कर्तव्यकर्मे मला अर्पण करुन तू केवळ सर्व शक्तिमान, सर्वाधार, अशा मला परमेश्र्वरालाच शरण ये. मी तुला सर्व पापांपासून सोडवीन. तू शोक करु नकोस.
६७) हा गीतारुप रहस्यमय उपदेश कधीही न तप करणार्‍या माणसाला सांगू नये. तसेच भक्तिहीन माणसाला आणि ऐकण्याची इच्छा नसणार्‍यालाही सांगू नये. त्याचप्रमाणे माझ्यामध्ये दोष पाहणार्‍याला तर कधीही सांगू नये.
६८) जो पुरुष माझ्या ठिकाणी परम प्रेम ठेवून हे परम रहस्ययुक्त गीताशास्त्र माझ्या भक्तांना सांगेल, तो मलाच प्राप्त होईल, यात मुळीच शंका नाही. 
६९) माझे अत्यंत प्रिय कार्य करणारा त्याच्याहून अधिक मनुष्यांत कोणीही नाही. तसेच पृथ्वीवर त्याच्याहून अधिक मला प्रिय दुसरा कोणी भविष्यकाली होणारही नाही.
७०) जो पुरुष आम्हां दोघांच्या धर्ममय संवादरुप या गीताशास्त्राचे अध्ययन करील, त्याच्याकडूनही मी ज्ञानयज्ञाने पूजित होईन, असे माझे मत आहे.
७१) जो मनुष्य श्रद्धयुक्त होऊन दोषदृष्टी न ठेवता या गीताशास्त्राचे श्रवण करील, तोही पापांपासून मुक्त होऊन पुण्यकर्मे करणार्‍याच्या श्रेष्ठ लोकांना प्राप्त होईल. 
७२) हे पार्था, हे गीताशास्त्र तू एकाग्र चित्ताने ऐकलेस का? आणि हे धनंजया, तुझा अज्ञानातून उत्पन्न झालेला मोह नाहीसा झाला का? 
७३) अर्जुन म्हणाला, हे अच्युता, आपल्या कृपेने माझा मोह नाहीसा झाला. आणि मला स्मृती प्राप्त झाली. आता मी संशयरहित होऊन राहिलो आहे. म्हणून मी आपल्या आज्ञेचे पालन करीन. 
७४) संजय म्हणाला, अशाप्रकारे मी श्रीवासुदेव आणि महात्मा अर्जुन यांचा हा अद्भुत रहस्यमय रोमांचककारक संवाद ऐकला. 
७५) श्रीव्यासांच्या कृपेने दिव्य दृष्टी मिळवून मी हा परम गोपनीय योग अर्जुनाला सांगत असताना स्वतः योगेश्र्वर भगवान श्रीकृष्णांकडून प्रत्यक्ष ऐकला आहे. 
७६) महाराज, भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुनाचा हा रहस्यमय, कल्याणकारक आणि अद्भुत संवाद पुन्हा पुन्हा आठवून मी वारंवार आनंदित होत आहे. 
७७) हे राजन, श्रीहरीचे ते अत्यंत अलौकिक रुपही वरचेवर आठवून माझ्या मनाला खूप आश्र्चर्य वाटत आहे. आणि मी वारंवार हर्षपुलकित होत आहे. 

७८) जेथे योगेश्र्वर भगवान श्रीकृष्ण आहेत आणि जेथे गांडीव धनुष्य धारण करणारा अर्जुन आहे, तेथेच श्री, विजय, विभूति आणि अचल नीती आहे, असे माझे मत आहे. 
Shri Mat Bhagwat Geeta Adhyay 18 मोक्षसंन्यासयोग अध्याय १८ वा 



Custom Search