Friday, October 4, 2013

Gurucharitra Adhyay 17 गुरुचरित्र अध्याय १७

 

Gurucharitra Adhyay 17

Gurucharitra Adhyay 17 is in Marathi. In this Adhyay Guru NrusinhaSaraswati is secretly living at Bhillavadi because he doesn’t want to approach by the people asking to give what they want. The importance of the place is also such that it is a place where Jganmata Amba Bhavani (Bhuvaneshwari) lives. Here is also a story of a Brahmin who was very slow, dull in learning but he knew his drawbacks and still was eager to acquire useful knowledge. Hence he went to Bhuvaneshwari Mata temple and worshiped her for three days without eating anything and at the end he cut his tongue and offered it to the Goddess Bhuvaneshwari. After such hardships Goddess blessed him in his dream and asked him to go to Guru NrusinhaSaraswati who would help him. Guru really helped him impart the required knowledge.
गुरुचरित्र अध्याय १७ 
श्रीगणेशाय नमः ॥ श्रीसरस्वत्यै नमः ॥ श्रीगुरुभ्यो नमः ॥ 
सिद्ध म्हणे नामकरणी । गुरुभक्तशिखामणि । 
 तुझी भक्ति गुरुचरणी । लीन जाहली निर्धारी ॥ १ ॥ 
पर्जन्य येतां पुढारां । जैसा येतो सूचना वारा । 
तैसे तुझे दैन्य-हरा । ऐकसी गुरुचरित्र कथनभेद ॥ २ ॥ 
ऐसें चरित्र कामधेनु । सांगेन तुज विस्तारोन । 
एकचित्त करुनि मन । ऐक शिष्या नामधारका ॥ ३ ॥ 
कृष्णावेणीतटाकेसी । भुवनेश्र्वरी-पश्र्चिमेसी । 
औदुंबर वृक्षेसी । राहिले श्रीगुरु परियेसा ॥ ४ ॥ 
गौप्यरुप असती गुरु । ठाव असे अगोचरु । 
अनिष्ठान धुरंधरु । चातुर्मास येणेंपरी ॥ ५ ॥ 
सिद्धस्थान असे गहन । भुवनेश्र्वरीसंनिधान । 
विशेष श्रीगुरु राहिले म्हणोन । उत्कृष्ट जाहलें महिमान ॥ ६ ॥ 
ऐकोनि सिद्धाचें वचन । नामधारक करी नमन । 
परमात्मा श्रीगुरुराणा । कां रहावें गौप्यरुपें ॥ ७ ॥ 
त्यासी काय असे तपस । भिक्षा मागणें काय हर्ष । 
संदेह माझ्या मानसास । निवारावा दातारा ॥ ८ ॥ 
ऐक वत्सा नामधारका । भिक्षा मागतो पिनाका । 
आणिक सांगेन ऐका । दत्तात्रेय तैसाचि ॥ ९ ॥ 
दत्तात्रेय त्रयमूर्ति । भिक्षुकरुप असे दिसती । 
भक्तजनानुग्रहार्थी । तीर्थयात्रे हिंडतसे ॥ १० ॥ 
अनुपम तीर्थे भूमीवरी । असतीं गौप्य अपरांपरी । 
श्रीगुरुमूर्ति प्रीतिकरीं । प्रगटले भक्तांलागीं ॥ ११ ॥ 
भक्तजनोपकारार्थ । तीर्थे हिंडे श्रीगुरुनाथ । 
गौप्य व्हावया कारणार्थ । समस्त येऊनि मागती वर ॥ १२ ॥ 

लपवितां दिनकरासी । केवीं लपे तेजोराशी । 
कस्तूरी ठेवितां जतनेसी । वास केवीं गौप्य होय ॥ १३ ॥ 
आणिक सांगेन तुज साक्षी । गुण कैसा कल्पवृक्षीं । 
जेथे राहे तया क्षितीसी । कल्पिले फळ तेथें होय ॥ १४ ॥ 
याकारणें तया स्थानीं । प्रगटले गुरुमुनि । 
सांगेन तुज विस्तारुनि । एकचित्तें परियेसा ॥ १५ ॥ 
करवीरक्षेत्र नगरांत । ब्राह्मण एक वेदरत । 
शास्रपुराण विख्यात । सांगे सकळ विद्वजनां ॥ १६ ॥ 
अग्रवेदी असे आपण । जाणे तर्क व्याकरण । 
आन्हिकप्रमाण आचरण । कर्ममार्गी रत होता ॥ १७ ॥ 
त्यासी जाहला एक सुत । मूर्ख असे उपजत । 
दैववशें मातापिता मृत । असमाधान होऊनियां ॥ १८ ॥ 
वर्धतां मातापित्याघरीं बाळ । वर्षे सात जाहलीं केवळ । 
व्रतबंध करिती निश्र्वळ । तया द्विजकुमरकासी ॥ १९ ॥ 
न ये स्नानसंध्या त्यासी । गायत्रीमंत्र परियेसी । 
वेद कैंचा मूर्खासी । पशूसमान जहाला असे ॥ २० ॥ 
जेथे सांगती अध्ययन । जाऊनि आपण शिकूं म्हणे । 
तावन्मात्र शिकतांचि क्षण । सवेंचि विस्मृति होय त्यासी ॥ २१ ॥ 
त्या ग्रामींचे विद्वजन । निदा करिती सकळै जन । 
विप्रकुळीं जन्मून । ऐसा मूर्ख उपजलासी ॥ २२ ॥ 
तुझा पिता ज्ञानवंत । वेदशास्रादि अभिज्ञात । 
त्याचे पोटीं कैसा केत । उपजलासी दगडापरी ॥ २३ ॥ 
जळो जळो तुझें जिणें । पित्याच्या नामा आणिलें उणे । 
पोटीं बांधूनि पाषाण । तळें विहिरी कां न करिसी ॥ २४ ॥ जन्मोनियां संसारीं । वृथा जाहलासी सूकरापरी । 

तुज गति यमपुरीं । अनाचारें वर्तसी ॥ २५ ॥ 
ज्यासी विद्या असे ऐका । तोचि मनुष्यांमध्यें अधिका । 
जेवीं द्रव्य असे निक्षेपिका । तैसी विद्या परियेसा ॥ २६ ॥ 
ज्याचे हृदयीं असे विद्या । त्यासी अखिल भोग सदा । 
यशस्वी होय सुखसंपदा । समस्तांमध्यें पूज्य तोचि ॥ २७ ॥ 
श्रेष्ठ असे वयें थोर । विद्याहीन अपूज्य नर । 
अश्रेष्ठ असे एखादा नर । विद्या असतां पूज्यमान ॥ २८ ॥ 
ज्यासी नाही सहोदर । त्यासी विद्या बंधु-भ्रातर । 
सकळिकां वंद्य होय नर । विद्या असे ऐशा गुणें ॥ २९ ॥ 
एखादे समयीं विदेशासी । जाय नर विद्याभ्यासी । 
समस्त पूजा करिती त्यासी । विदेश होय स्वदेश ॥ ३० ॥ 
ज्यासी विद्या असे बहुत । तोचि होय ज्ञानवंत । 
त्याचे देही देवत्व । पूजा घेई सकळांपाशी ॥ ३१ ॥ 

एखाद्या राज्याधिपतीसी । समस्त वंदिती परियेसीं । 
ऐसा राजा आपण हर्षी । विद्यावंतासी पूजा करी ॥ ३२ ॥ 
ज्याचे पदरीं नाहीं धन । त्याचे विद्याच धन जाण । 
विद्या शिकावी याचिकारण । नेणता होय पशुसमान ॥ ३३ ॥ 
ऐकोनि ब्राह्मणांचे वचन । ब्रह्मचारी करी नमन । 
स्वामींनी निरोपिलें ज्ञान । विद्याभ्यास करावया ॥ ३४ ॥ 
जन्मांतरी पूर्वी आपण । केले नाहीं विद्यादान । 
न ये विद्या याचि कारण । त्यासी काय करणें म्हणतसे ॥ ३५ ॥ 
ऐसा आपण दोषी । उद्धरावें कृपेसीं । 
जरी असेल उपाय यासी । निरोपावें दातारा ॥ ३६ ॥ 
परिहासकें ते ब्राह्मण । सांगताति हांसोन । 
होईल पुढें तुज जनन । तधीं येईल तुज विद्या ॥ ३७ ॥ 

तुज कैंचा विद्याभ्यासु । नर नव्हेसि तूं साच पशु । 
भिक्षा मागूनि उदर पोस । अरे मूर्खा कुळनाशका ॥ ३८ ॥ 
ऐसें नानापरी नीचोत्तरेसी । बोलती द्विज लोक त्यासी । 
वैराग्य धमओरुनि मानसीं । निघाला बाळ अरण्यासी ॥ ३९ ॥ 
मनीं झाला खेदें खिन्न । म्हणे त्यजीन आपुला प्राण । 
समस्त करिती दूषण । काय उपयोग जीवूनिया ॥ ४० ॥ 
जळो जळो आपुले जिणें । पशु झालों विद्याहीन । 
आतां वांचोनि काय कारण । म्हणोनि निघाला वैराग्यें ॥ ४१ ॥ 
भिल्लवडीग्रामासी । आला ब्रह्मचारी परियेसीं । 
अन्नोदक नेघे उपवासी । पातला निशीं दैववशें ॥ ४२ ॥ 
जेथे असे जगन्माता । भुवनेश्र्वरी विख्याता । 
तेथें पातला त्वरिता । करी दर्शन तये वेळी ॥ ४३ ॥ 
न करी स्नान संध्या देखा । अपार करीतसे दुःखा । 
देवद्वारासन्मुखा । धरणें घेतले तया वेळी ॥ ४४ ॥ 
येणेपरी दिवस तीनी । निर्वाण मन करुनि । 
अन्नोदक त्यजूनि । बैसला तो द्विजकुमर ॥ ४५ ॥ 
नव्हें कांहीं स्वप्न त्यालागोनि । म्हणोनि कोपे बहु मनी । 
म्हणे अंबा भवानी । कां उपेक्षिसी आम्हांसी ॥ ४६ ॥ 
आक्रोशोनि तये वेळीं । शस्रें घेऊनियां प्रबळी । 
आपुली जिव्हा तात्काळी । छेदूनि वाहे देवीचरणीं ॥ ४७ ॥ 
जिव्हा वाहोनि अंबेसी । मागुती म्हणे परियेसीं । 
जरी तूं मज उपेक्षिसी । वाहीन शिर तुझे चरणी ॥ ४८ ॥ 
ऐसे निर्वाण मानसी । क्रमिता झाला तो निशी । 
स्वप्न जाहलें तयासी । ऐका समस्त श्रोते जन ॥ ४९ ॥ 
"ऐक बाळा ब्रह्मचारी । नको आक्रोशूं आम्हांवरी । 
असे कृष्णापश्र्चिमतीरीं । त्वरित जाय तयाजवळी ॥ ५० ॥ 
औदुंबरवृक्षातळी । असे तापसी महाबळी । 
अवतार पुरुष चंद्रमौळी । तुझी वांछा पुरवील ॥ ५१ ॥ 
ऐसे स्वप्न तयासी । जाहले अभिनव परियेसीं । 
जागृत होतांचि हर्षी । निघाला विप्र त्वरित ॥ ५२ ॥ 
निघाला विप्र त्वरित । पोहत गेला प्रवाहांत । 
पैलतटा जाऊनि त्वरित । देखता जाहला श्रीगुरुसी ॥ ५३ ॥ 
चरणांवरी ठेवूनि माथा । करी स्तोत्र अत्यंता । 
श्रीगुरुमूर्ति संतोषतां । आश्र्वासिती तया वेळीं ॥ ५४ ॥ 
संतोषोनि श्रीगुरुमूर्ति । माथां हात ठेविती । 
ज्ञान जाहलें त्वरिती । जिव्हा आली तात्काळ ॥ ५५ ॥ 
वेद शास्र-पुराण । तर्क भाषा व्याकरण । 
समस्त त्यांचे अंतःकरण । पूर्ण जाहलें तात्काळीं ॥ ५६ ॥ 
जैसा मानससरोवरास । वायस जातां परियेस । 
जैसा होय राजहंस । तैसे झाले विप्रकुमरा ॥ ५७ ॥ 
चिंतामणि-संपर्केसी । सुवर्ण होय लोह कैसी । 
मृत्तिका पडतां जांबूनदीसी । सुवर्ण होय जेवीं देखा ॥ ५८ ॥ 
तैसे तया ब्राह्मणासी । गुरुचरण होतां स्पर्शी । 
आली अखिल विद्या त्यासी । वेदशास्रादि तर्क भाषा ॥ ५९ ॥ 
सिद्ध म्हणे नामधारका । श्रीगुरुमहिमा ऐसी ऐका । 
जे जे स्थानीं वास देखा । स्थानमहिमा ऐसी असे ॥ ६० ॥ 
म्हणोनि सरस्वती-गंगाधर । सांगे गुरुचरित्रविस्तार । 
 ऐकतां होय मनोहर । सकळाभीष्ट साधती ॥ ६१ ॥ 
॥ इति श्रीगुरुचरित्रामृते परमकथाकल्पतरौ श्रीनृसिंहसरस्वत्युपाख्याने 
सिद्ध-नामधारकसंवादे भिल्लवडीमहिमावर्णनं-मंदमतिब्राह्मणवरप्रदानं 
नाम सप्तदशोऽध्यायः ॥ श्रीगुरुदत्तात्रेयार्पणमस्तु ॥ श्रीगुरुदेवदत्त ॥
Gurucharitra Adhyay 17 
गुरुचरित्र अध्याय १७


Custom Search

No comments: