Tuesday, September 2, 2014

Sadashivachi Kavyachi Durvanchi Mala सदाशिवाची काव्याची दुर्वांची माला


Sadashivachi Kavyachi Durvanchi Mala 
This is a Kavyachi Durvanchi Mala for God Ganesh. This is a very beautiful poem in Marathi created by Sadashiv, a poet. It describes many virtues of God Ganesh. I thank the poet Sadashiv and uploading it for devotees of God Ganesh.


सदाशिवाची काव्याची दुर्वांची माला
मंगलमूर्ति स्मरतां चित्ती श्री गणरायाची ।
गातां गीति, जाते भीति सकलहि विघ्नांची ॥ १ ॥
गणपति साचा देव मुळाचा तो ॐकाराचा ।
सर्व जगाचा ब्रह्मांडाचा नायक सकलांचा ॥ २ ॥
ऋद्धिसिद्धिचा जीवबुद्धिचा प्रेरक हा साचा ।
सुरासुरांचा ब्रह्मांडाचा यक्षराक्षसांचा ॥ ३ ॥
हरीहरांचा तसा विधीचा भूत किन्नरांचा ।
तो मनुजांचा मुनीजनांचा तसाच सिद्धांचा ॥ ४ ॥
निधी गुणांचा विधी जगाचा उदधी ज्ञानाचा ।
पुष्ट तनुचा सुष्ट मनाचा तुष्ट हि भावाचा ॥ ५ ॥
सेव्य सुरांचा दिव्य मतीचा भव्य दर्शनाचा ।
तो ज्ञानाचा, विज्ञानाचा आत्मा वेदांचा ॥ ६ ॥
विचार करितां गेला आतां संशय विलयाला ।
मूळ देवता हीच तत्त्वता पटते हृदयाला ॥ ७ ॥
पुष्प तांबडे ज्यास आवडे दुर्वांकुर भारी ।
जो सुखकारी विघ्ननिवारी पाशांकुशधारी ॥ ८ ॥
देई शांती नेई भ्रांती दैत्या संहारी ।
रविसम कांती दशदिक्प्रांति पसरे महीवरी ॥ ९ ॥
काळापुढती नाही गणती विक्रम कोणाचा ।
चिरंजिवाचा दीर्घायूचा घातक सकलांचा ॥ १० ॥
सुरासुरांचा ब्रह्मांडाचा भक्षक सर्वांचा ।
सामर्थ्याचा महिमा साचा अगाध काळाचा ॥ ११ ॥
परंतु साचा तूं काळाचा महाकाळ झाला ।
जिंकुन त्याला अंकित केला किंकर सेवेला ॥ १२ ॥
बंड कशाचे त्या काळाचें दंडक तूं त्याला ।
केलें वाहन सत्य गजानन काळ मूषकाला ॥ १३ ॥
काळावरचें पूर्ण यशाचें तव बल हे साचे ।
वर्णायाचे बळ कोणाचें थकले शेषाचे ॥ १४ ॥
वदन सर्वथा काय कविकथा तव गुणापुढती ।
करितो देवा भावे सेवा साष्टांगें प्रणती ॥ १५ ॥
पंचतत्त्व तूं ब्रह्मरुप तूं तूंच भास्करेंदु ।
सर्व सृष्टि तूं नाहिं किंतु तूंच दिनबंधू ॥ १६ ॥
देवा आद्या चौदा विद्या त्या चौसष्ट कला ।
द्याव्या आतां गणपतिभक्ता तव गुण गायाला ॥ १७ ॥
त्या श्रेयाचा गणरायाचा सेवक पायाचा ।
आहे साचा तत्प्रेमाचा रामकृष्ण ज्याचा ॥ १८ ॥
विघ्नहारका विश्र्वपालका सकल सुखकारका ।      
सूत्रचालका भक्तरक्षका गणेश विनायका ॥ १९ ॥
या दासाचे पुरवायाचे हेतु हृदयाचे ।
प्रसन्न व्हावे दर्शन द्यावे देवा ज्ञानाचे ॥ २० ॥
सदाशिवांची गणरायाची शुद्ध प्रेमाची ।
ही काव्याची सद्भावाची माला दुर्वांची ॥ २१ ॥
Sadashivachi Kavyachi Durvanchi Mala 
सदाशिवाची काव्याची दुर्वांची मालाCustom Search
Post a Comment