Tuesday, February 3, 2015

DeviMahatmya Adhyay 16 श्रीदेवीमाहात्म्ये अध्याय सोळावा (१६)


DeviMahatmya Adhyay 16 
DeviMahatmya Adhyay 16 is in Marathi. It is a translation of DurgaSaptashi Adhyay 16 which is in Sanskrit. This Adhyay describes Moorthy Rahasya.
श्रीदेवीमाहात्म्ये अध्याय सोळावा (१६)
श्रीगणेशाय नमः ॥ 
श्रीमहाकाल्यादिदेवतात्रयाय नमः ॥ 
श्रीचंडिकायै नमः ॥
जय जय हो विश्र्वजननी । जय जय हो प्रणवरुपिणी जय जय हो दैत्यदलिनी । मूळप्रकृति महामाये ॥ १ ॥
जय जय दशमुखविराजिनी । जय जय अष्टादशभुजाधारिणी ।
जय जय अष्टभुजा कमललोचनी । त्रयरुपात्मिकदेवी ॥ २ ॥
तूं रुपें धरुनि अनेक । दुष्टांसी शासन करिसी देख ।
आणिक निजभक्तांसी रक्षक । होसी नारायणी तूं ॥ ३ ॥
असो पूर्वाध्यायाचे अंतीं । वैकृतिरहस्य वर्णिलें निश्र्चितीं ।
आणि पूजाहोमादिपद्धती । निरुपिली श्रोतियां ॥ ४ ॥
आतां हा कळसाध्याय जाण । येथूनि संपलें निरुपण ।
यांत मूर्तिरहस्य पूर्ण । भक्तजनां निवेदिलें ॥ ५ ॥
मार्कंडेय शिष्यांलागुन । करी देवीचरित्र कथन ।
सूत शौनकासी वर्णन । करिता जाहला तेंचि पै ॥ ६ ॥
मेधा म्हणे सुरथासी । आतां मूर्तिरहस्य परियेसीं ।
पूर्वी निरुपिले तुजसी । अष्टावतार देवीचे ॥ ७ ॥
महाकाली महालक्ष्मी जाण । तिसरी महासरस्वती पूर्ण ।
या तिहीं अवतारांचें ध्यान । आणिक चरित्रें वर्णिलीं ॥ ८ ॥
आतां शेष अवतार सम्यक । नंदा रक्तदंतिका शताक्षी देख ।
भीमादेवी भ्रामरी सुरेख । हेचि पांच जाणावे ॥ ९ ॥
या पांच अवतारांचें पूर्ण । एकादशाध्यायीं निरुपण ।
राया केलें तुजलागुन । आतां स्वरुपें श्रवण करीं ॥ १० ॥
जी कां नंदा भगवती । होईल नंदकन्या निश्र्चितीं ।
जिची यशोदोदरीं उत्पत्ती । नंदा म्हणती जियेसी ॥ ११ ॥
अठ्ठाविसावें युगी जाण । शुंभ निशुंभ दोघेजण । 
पुन्हा होतील उत्पन्न । त्यांचे हनन करील ती ॥ १२ ॥
जिची भक्ति पूजन स्तवन । करितां होऊनि सुप्रसन्न ।
जगत्रयातें वश करुन । क्षणमात्रें देतसे ॥ १३ ॥
सुवर्णासारिखी पीतकांती । उत्तम दिसे जियेची व्यक्ती ।
अत्यंत पिंवळीं वस्त्रे शोभती । कनकासारिखीं जियेचीं ॥ १४ ॥
कनकासारिखा जियेचा वर्ण । तैसीचि जियेचीं भूषणें पूर्ण ।
कमलांकुशपाशाब्जधारण । अलंकृत चतुर्भुजा ॥ १५ ॥ 
इंदिरा कमला लक्ष्मी देख । श्री हीं जियेचीं नामें सम्यक ।
पिंवळ्या कमळाची बैठक । सुवर्णासारिखी जियेची ॥ १६ ॥
असो या प्रकारेंकरुन । सांगितलें नंदेचे ध्यान । 
जियेचें करितां नामस्मरण । जगत्रय वश होय ॥ १७ ॥
आतां रक्तदंतिका जियेचें नाम । चंडिका बोलिजेली उत्तम ।
सांगतों तिचें रुप परम । पापनाशक असे तें ॥ १८ ॥
रक्तासारिखे वसन सुरेख । तैसीचि रक्तवर्णा सम्यक ।
तदुपरी रक्तभूषणें देख । रक्तांगी ती शोभतसे ॥ १९ ॥
रक्तासारिखीं आयुधें जाण । तैसेचि असती जियेचे नयन ।
जियेचे केश रक्तवर्ण । अतिभ्यासुर दिसताती ॥ २० ॥
रक्तासारिखीं नखें सम्यक । रक्तासारिखे दशन देख ।
जिच्या रक्तदाढा सकळिक । रक्तउपचार प्रिय जिला ॥ २१ ॥
पतिव्रता जैसी पतीतें । सेवीत असे अनुरक्तें ।
तैसी रक्तदंतिका भक्तसेवेतें । तत्पर राहे अनुदिनीं ॥ २२ ॥
पन्नास कोटी योजनें केवळ । पृथ्वीसारिखी जी विशाल ।
मेरुसारिखें स्तनयुगल । दीर्घ लंब स्थूल अति ॥ २३ ॥
ते रक्तदंतिकेचे स्तन । अत्यंत मनोहर जाण । 
कर्कश अति शोभायमान । सदानंदपयोनिधि ॥ २४ ॥
सर्वकामांते करिती दोहन । ऐसे जियेचे असती स्तन ।
भक्तांकारणें संपादन । करिती जाहली देवी ती ॥ २५ ॥
खङ्ग पात्र मुसल लांगल । ती चतुर्भुजीं धरी तत्काल ।
रक्त चामुंडा आख्या केवल । होती जाहली तियेची ॥ २६ ॥
देवी योगेश्र्वरी जाणें । हीं जियेचीं अभिधानें ।
सकळ जग व्यापिलें इणें । स्थावरजंगमात्मक पाहीं ॥ २७ ॥
दनुवंशी जे जन्मले । दानव ऐसे नाम पावले । 
तयां सर्वांते भक्षिलें । दंतें चाविलें क्षणार्धे ॥ २८ ॥
तेव्हां दाडिंबीच्या पुष्पापरी । दंत रक्त जाहले सत्वरी ।
तैं रक्तदंतिका हें चराचरीं । नाम होतें जाहले ॥ २९ ॥
या रक्तदंतिकेचें पूजन । भावें करी जो आपण ।
तो चराचरातें व्यापून । मान्य होय सर्वांसी ॥ ३० ॥
तैसेचि जो भावें निश्र्चित । इचें स्तवन करी सतत ।
त्याची देवी सेवा करीत । जैसी पतीतें पतिव्रता ॥ ३१ ॥
असो या प्रकारेंकरुन । वर्णिलें रक्तदंतिकेचे ध्यान ।
आतां शताक्षीस्वरुप वर्णन । करितो मी तुजलागीं ॥ ३२ ॥
शताक्षी तीचि शाकंभरी । तीचि दुर्गादेवी अवधारी ।
या तिहीं नामांची तदुपरी । व्याख्या ऐका अनुक्रमे ॥ ३३ ॥
शतवर्षे अनावृष्टि मागुती । जेव्हां जाहली पृथ्वीवरती ।
तेव्हां सर्व ऋषिंच्या स्तवनें निश्र्चितीं । अयोनिस्वरुप धरियेलें ॥ ३४ ॥
सवेंचि शतनेत्रेकरुन । पाहती जाहली मुनींलागून ।
शताक्षी हें अभिधान । होतें जाहलें ते काळी ॥ ३५ ॥   
तेव्हां स्वदेहाचे ठायी जाण । शाकादि अन्न करुनि उत्पन्न । 
तेणें केले सर्वलोकभरण । शाकंभरी म्हणती सदा ॥ ३६ ॥
दुर्गनामें महा असुर । ते काळीं मारिला दुर्धर ।
म्हणोनि दुर्गादेवी नाम सुंदर । होतें जाहलें तियेसी ॥ ३७ ॥
ती शाकंभरी आपण । नीलवर्णा असे जाण । 
नीलोत्पलासारिखे लोचन । उदर त्रिवळीविभूषित ॥ ३८ ॥
कर्कश सम उत्तुंग जाण । दीर्घ पुष्ट घन स्तन ।
गंभिर नाभि शोभायमान । कमलधारिणी कमलालया ॥ ३९ ॥
मुष्टि बाणेंकरुनि पूर्ण । कार्मुक धरी शोभायमान । 
पुष्प-पल्लव-मूलादि पूर्ण । फल- शाकसंचय धरी जी ॥ ४० ॥
शाकसंचयाचे लक्षण । इच्छिली कामना करी पूर्ण ।
अनंतरसयुक्त जाण । शाकसंचय जियेचा ॥ ४१ ॥
क्षुधा तृषा आणि मरण । जरारोगाचें करी हरण ।
ऐसा शाकसंचय पूर्ण । शाकंभरीचा जाणावा ॥ ४२ ॥
तीचि दुर्गा शताक्षी शाकंभरी । पार्वती कालिका उमा गौरी ।
सती चंडी परमेश्र्वरी । नामें अनंत जियेचीं ॥ ४३ ॥
जो शाकंभरीचे ध्यान स्तवन । जप नमन करी पूजन ।
शीघ्र अक्षय्यपानामृत अन्न । फल प्राप्त तयासी ॥ ४४ ॥
असो या प्रकारेंकरुन । शाकंभरीचें केलें वर्णन ।
आतां भीमादेवीचें ध्यान लक्षण । सांगतों मी तुजलागीं ॥ ४५ ॥
जेव्हां राक्षस मातले फार । त्यांहीं ब्राह्मण केले जर्जर । 
तेव्हां ऋषि मिळोनि समग्र । स्तविते जाहले अंबेसी ॥ ४६ ॥
मग हिमाचलीं सत्वर । रुप धरिलें भयंकर ।
भीमादेवी होऊनि संहार । केला तेव्हां असुरांचा ॥ ४७ ॥
तंव ऋषि मिळोनि उत्तम । ठेविती भीमादेवी हें नाम ।
त्रैलोक्यभरी कीर्ति परम । होती जाहली देवीची ॥ ४८ ॥
ती भीमादेवी नीलवर्ण । तैसीचि नीलवस्त्रें करी धारण ।
नीलरत्नांचीं भूषणे जाण । अंगीं शोभती देवीच्या ॥ ४९ ॥
भयंकर दाढा भ्यासुर वदन । विशाल नेत्र शोभायमान । 
दीर्घ पुष्ट उत्तुंग स्तन । विशाल नारी चतुर्भुजा ॥ ५० ॥ चंद्रहास डमरु शिर । पानपात्र करीं सुंदर ।
कालरात्रि ती एकवीर । कामदात्री असे सदा ॥ ५१ ॥
ती तेजोमंडलदुर्धर्षा । नाम भीमादेवी नरेशा । 
हृदयीं तियेची करितां आशा । पूर्ण होती मनोरथ ॥ ५२ ॥
असो या प्रकारेंकरुन । भीमादेवीचें वर्णिलें ध्यान ।
आतां भ्रामरीस्वरुप जाण । तुजलागीं सांगतो ॥ ५३ ॥
जेव्हां अरुणासुर भयंकर । तेणें पीडिले लोक समग्र ।
तेव्हां देव मिळोनि सत्वर । स्तविते जाहले देवीतें ॥ ५४ ॥
देवीने भ्रामरीस्वरुप धरुन । अरुणासुराचे केले हनन । 
मग सर्व देव ऋषि मिळोन । देवीकारणें प्रार्थिती ॥ ५५ ॥
तेव्हां भ्रामरी हें नामाभिधान । होतें जाहलें देवीलागून ।
असंख्यात भ्रमरगण । झंकार करिती स्वरुपीं ॥ ५६ ॥
त्या भ्रामरीचा चित्रवर्ण । चित्र वस्त्रांतें करी धारण ।
चित्र देवीची भूषणें जाण । चित्रभ्रमर हस्तकीं ॥ ५७ ॥
असंख्यात भ्रमरपंक्ती । जियेच्या अवयवीं रुंजी घालिती ।
महामारी ऐसें म्हणती । त्या देवीतें सकळ जन ॥ ५८ ॥
जो भ्रामरीचें करी स्तवन । जप ध्यान स्मरण पूजन ।
त्याचे सर्व मनोरथ पूर्ण । स्वयें करी जगदंबा ॥ ५९ ॥
या प्रकारें अवतारमूर्ती । तुज म्यां सांगितल्या नृपती ।
ज्या सर्व कामधेनु निश्र्चितीं । ज्यांते वर्णिती व्यासादिक ॥ ६० ॥
जगन्माता चंडिका जाण । तियेचे अवतार हे पूर्ण ।
अष्ट मुख्य तुजलागून । केले वर्णन नृपाळा ॥ ६१ ॥
श्री कमला सावित्री पार्वती । शची अनसूया सरस्वती ।
अदिती गायत्री सीता अरुंधती । अणिमादिसिद्धि सर्व त्या ॥ ६२ ॥
मातृका चामुंडा योगिनी । सोळा सहस्त्र कृष्णपत्नी ।
अष्टनायिका नवदुर्गा रुक्मिणी । अवतार सर्व देवीचे ॥ ६३ ॥
अंशमात्र कलामात्र जाण । तुज हे अवतार केले वर्णन ।
ऐसे अनंत अवतार पूर्ण । अंत न कळे ब्रह्मादिकां ॥ ६४ ॥
हें परम रहस्य जाण । तुजलागीं केले वर्णन । 
तूं हें कोणालागीं कथन । करुं नको सर्वथा ॥ ६५ ॥
हें दिव्यमूर्तीचें आख्यान । अभीष्टफलदायक जाण ।
तस्मात् सर्वप्रयत्नेंकरुन । देवी निरंतर जपावी ॥ ६६ ॥
सप्तजन्मार्जित घोर पातक । ब्रह्महत्यादितुल्य देख ।
याच्या पाठमात्रें सकळिक । नाश पावती क्षणार्धें ॥ ६७ ॥
सर्व पापांपासूनि मुक्त । पाठमात्रेंकरुनि होत ।
सकळ तयाचे मनोरथ । पूर्ण होती सर्वदा ॥ ६८ ॥
हें देवीचें तुज कथिलें ध्यान । महद्गुह्याहूनि गुह्य जाण ।
तरी रक्षीं प्रयत्नेंकरुन । सर्वकामफलप्रद हें ॥ ६९ ॥
असो या प्रकारेंकरुन । ग्रंथसमाप्ति जाहली जाण ।
या अध्यायीं केले वर्णन । मूर्तिरहस्य सर्वही ॥ ७० ॥
आतां कात्यायनीतंत्रीं जाण । जें कां वर्णिलें मंत्रविधान ।
तैसेचिं डामरतंत्रीं पूर्ण । मंत्रविधान वर्णिले ॥ ७१ ॥
मंत्रमहौषधिग्रंथ । तेथेंही वर्णिलें यथार्थ । 
तैसेचि आपण विधानोक्त । येथे वर्णूं यथाशक्ती ॥ ७२ ॥
संस्कृत सप्तशतीचे देख । सातशे मंत्रही सिद्धिदायक । तरी त्यांतूनि कारणिक । संक्षेपें सविधान सांगू पैं ॥ ७३ ॥
कथानुक्रमेंकरुन । ते मंत्र जेथें आले जाण ।
तेथें त्यांचे निरुपण । सविस्तर केले असे ॥ ७४ ॥
मंत्र (अध्याय १ ओवि १२६ )
" ज्ञानिनामपि चेतांसी महामाया प्रयच्छति "  
हेतु 
हा महामायेचा मोहिनीमंत्र । याचा जप पवित्र ।
अथवा प्रतिश्र्लोकीं पढतां सर्वत्र । जगत् वश्य होतसे ॥ ७५ ॥
मंत्र (अध्याय ३ ओवि ४१-४२ )
' एवमुक्ता समुत्पत्य ---- ' 
हेतु
स्वशत्रूसी व्हावें मरण । ऐसें मनीं वाटतां जाण ।
' सर्वाबाधाप्रशमनं ------' । हा मंत्र आधीं जपावा ॥ ७६ ॥
मग या मंत्राचा जप जाण । ऐसें मंत्रद्वय मिळोन । लक्ष जप करिता पूर्ण । शत्रुनाश होतसे ॥ ७७ ॥
मंत्र (अध्याय ४ ओवि २७-३१ ) 
हेतु
सर्व दुःखांसी व्हावा नाश । ऐसें वाटलिया मनास ।
धरुनि याचा निदिध्यास । अयुत जप करावा ॥ ७८ ॥
मंत्र (अध्याय ४ ओवि ४६-५० )
हेतु
ऐसा चार श्र्लोकात्मक हा मंत्र । एकशेंबारा अक्षरें सर्वत्र ।
याचा अयुत जप करितां पवित्र । सर्वकामसंकल्प सिद्ध होती ॥ ७९ ॥
मंत्र (अध्याय ५ ओवि २३-२४ )
' नमो देव्यै महादेव्यै ------'
हेतु 
याचा अयुत जप करितां । इष्ट फल पावे अवचितां ।
चारी पुरुषार्थ तत्त्वतां । तया नरवरा साधती ॥ ८० ॥
मंत्र (अध्याय ११ ओवि ३८-३९ ) 
' हिनस्ति दैत्यतेजांसि ----' 
हेतु 
पूर्वी सांगितल्यावरुन । याचें करुनियां विधान ।
मग हा मंत्र पठण करुन । दीप बलिदान करावें ॥ ८१ ॥
सवेंचि करावें घंटाबंधन । बालग्रहशांति होय पूर्ण ।
शत अथवा सहस्त्र जाण । मंत्रजप करावा ॥ ८२ ॥
ऐसे जेथें जेथें मंत्र आले । तेथें तेथें अर्थ केले ।
म्हणोनि येथें केवळ वर्णिलें । जपसंख्यादिकारण ॥ ८३ ॥
' देवि प्रपन्नार्तिहरे----' हा मंत्र । लक्ष अथवा अयुतमात्र । 
किंवा जपतां सहस्त्र । सर्व आपदा नासती ॥ ८४ ॥
अथवा प्रतिश्र्लोकीं जाण । या मंत्राचा पल्लव लावून । 
पाठ करितां सर्व विघ्न । सर्व आपदा नासती ॥ ८५ ॥ 
मंत्रांची व्हावी सिद्धि सत्वर । तरी सांगतों एक विचार २
सांगितला हा प्रकार । सर्व मंत्री योजावा ॥ ८६ ॥
प्रतिमंत्राचे ठायीं आपण । आद्यंतीं प्रणव योजून ।
मंत्रजप केलिया जाण । शीघ्र सिद्धि होतसे ॥ ८७ ॥
अथवा प्रतिमंत्रीं जाण । व्याहृतित्रय आद्यंतीं योजून ।
मंत्रजप केलिया आपण । शीघ्र सिद्धि होतसे ॥ ८८ ॥
अथवा प्रतिमंत्रीं पूर्ण । आद्यंती व्याहृतित्रय योजून ।
विलोम प्रतिश्र्लोकीं जाण । जप केलिया शीघ्र सिद्धि ॥ ८९ ॥
अथवा पृथक मंत्र योजून । लक्ष अथवा अयुतप्रमाण ।
सहस्त्र किंवा शत जाण । कार्यानुसार जपावा ॥ ९० ॥ 
आद्यंतीं वेदमंत्र ' त्रंबक ' । योजूनि जपतां प्रतिश्र्लोक ।
अपमृत्युनिवारण देख । येंणेंकरुनि होतसे ॥ ९१ ॥
दशांश होम दुग्धतर्पण । प्रतिमंत्रे करावें आपण ।
असो सर्व मंत्रांचें विधान । प्रथमाध्यायीं निरुपिलें ॥ ९२ ॥
' शरणागतदीनार्त-----' । हा मंत्र जपतां निश्र्चित । 
सर्व कार्यसिद्धि होत । संशय न धरी सर्वथा ॥ ९३ ॥
' करोतु सा नः ------' हा अर्धमंत्र । याचा जप करितां पवित्र ।
सर्वकामाची सिद्धि शीघ्र । येणें होय निर्धारें ॥ ९४ ॥
' एवं देव्या वरं लब्धा -----' हा मंत्र । याचा जप करितां पवित्र ।
स्वाभीष्ट वरप्राप्ति सर्वत्र । येणें होय निर्धारें ॥ ९५ ॥   ' सर्वाबाधाप्रशमनं ---' । या मंत्राच्या लक्षजपें जाण ।   मंत्रीं सांगितलें फळ पूर्ण । प्राप्त होय निर्धारे ॥ ९६ ॥
' इत्यं यदा यदा ---" हा मंत्र । याचा जप करितां पवित्र ।
महामारीची शांति सर्वत्र । येणेंकरुनि होतसे ॥ ९७ ॥
' ततो वव्रे नृपो राज्यं---" हा मंत्र । याचा जप करितां पवित्र ।
स्वराज्याचा लाभ सर्वत्र । येणेंकरुनि होतसे ॥ ९८ ॥
आपुली वृत्ति निर्धारीं । गेली असेल दुसर्‍याचे करीं ।
मागुती प्राप्ति होय सत्वरीं । येणें मंत्रेकरुनियां ॥ ९९ ॥
' यदंति उच्च दूरके --' हा वेदमंत्र । प्रतिश्र्लोकीं जपता पवित्र ।
दुःखनाश होय सर्वत्र । अथवा पृथक् जपतांहि ॥ १०० ॥
' दारिद्र्यदुःख --' हा अर्धमंत्र । याचा जप करितां पवित्र ।
दरिद्रादिनाश सर्वत्र । येणेंकरुनि होतसे ॥ १०१ ॥
' कांसोस्मिता --' हा वेदमंत्र । प्रतिश्र्लोकीं जपतां पवित्र ।
लक्ष्मीची प्राप्ति सत्वर । येणें करुनि होतसे ॥ १०२ ॥
' ज्ञानिनामपि---' हा मोहिनीमंत्र । आणि ' एवमुक्त्वा--' हा पवित्र ।
तैसाचि ' दुर्गे स्मृता --' यांचा सर्वत्र । प्रकार पूर्वीच वर्णिला ॥ १०३ ॥
' भगवत्या कृतं--' हा देख । दारिद्र्यनाशादि मनेप्सितपूरक । 
' देवि प्रपन्नार्ति ---' येणें दुःख । नाशे हेंही निवेदिलें ॥ १०४ ॥
' रोगानशेषान्---' हा मंत्र निश्र्चित । जपतां सर्वरोगनाश होत ।
' इत्युक्त्वा सा तदा देवी--' येंणें त्वरित । सर्व विद्या प्राप्त होती ॥ १०५ ॥
अनुग्रहाची इच्छा मनीं । तरी जप करावा पूर्वाण्हीं ।
शत्रुनिग्रइच्छा धरुनी । जप अपराण्हीं संपवावा ॥ १०६ ॥
स्वयें आपण जप करितां । उत्तमाहूनि उत्तम तत्त्वतां ।
ब्राह्मणादिद्वारा करितां ॥ मध्यम फळ होतसे ॥ १०७ ॥
याचे सांगितले धर्म । नियम टाकोनि करी कर्म । 
त्याचे फळ असे अधम । सिद्धि न पावे कदापि ॥ १०८ ॥
यजमानार्थ ब्राह्मण पवित्र । ' सत्याः संतु---' हा वेदमंत्र  ।
प्रतिमंत्री जपतां सर्वत्र । सिद्धि तरीच यजमाना ॥ १०९ ॥
जपकर्ता जो त्याकारणें । वस्त्रयुग्म पवित्रासनें ।
कमंडलु कलश जाणें । उपवीतेंही अर्पावीं ॥ ११० ॥
असो याप्रकारेंकरुन । सांगितलें मंत्रविधान ।
पाहिजे तो मंत्र जाण । सप्तशतींत पहावा ॥ १११ ॥
आतां नवमंत्रांचे स्तोत्र । सांगतों मी तुम्हां विचित्र ।
त्यांचे पठण करितां पवित्र । देवी प्रसन्न होतसे ॥ ११२ ॥
यांत जें जें मंत्र आले । त्यांचे अर्थ पूर्वीचि केले ।
व्यासेंचि हे निवडिले । अनुग्रहार्थ देवीच्या ॥ ११३ ॥
अथ स्तोत्रं 
या माया मधुकैटभप्रमथनी या माहिषोन्मूलिनी, ।
या धूम्रेक्षण चण्डमुंडमथनी या रक्तबीजाशनी । 
शक्तिः शुम्भनिशुम्भदैत्यदलिनी या सिद्धिलक्ष्मीः परा, ।
सा चण्डी नवकोटिमूर्तिसहिता मां पातु विश्र्वेश्र्वरी ॥ १ ॥
स्तुता सुरैः पूर्वमभीष्टसंश्रयास्तथा सुरेन्द्रेण दिनेषु सेविता ।
करोतु सा नः शुभहेतुरिश्र्वरी शुभानी भद्राण्यभिहंतु चापदः ॥ २ ॥
या सांप्रतं चोद्धतदैत्यतापितैरस्माभिरीशा च सुरैर्नमस्यते ।
करोतु सा नः शुभहेतुरिश्र्वरी शुभानी भद्राण्यभिहंतु चापदः ॥ ३ ॥
या च स्मृता तत्क्षणमेव हंति नः सर्वापदो भक्तिविनम्रमूर्तिभिः ।
करोतु सा नः शुभहेतुरिश्र्वरी शुभानी भद्राण्यभिहंतु चापदः ॥ ४ ॥ 
सर्वाबाधाप्रशमनं त्रैलोक्यस्याखिलेश्र्वरि ।
एवमेव त्वया कार्यमस्मद्वैरिविनाशनम् ॥ ५ ।
सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके ।
शरण्ये त्र्यंबके गौरि नारायणि नमोऽस्तु ते ॥ ६ ॥
सृष्टिस्थितिविनाशानां शक्तिभूते सनातनि ।
गुणाश्रये गुणमये नारायणि नमोऽस्तु ते ॥ ७ ॥
शरणागतदीनार्तपरित्राणपरायणे । 
सर्वत्यार्तिहरे देवि नारायणि नमोऽस्तु ते ॥ ८ ॥
सर्वस्वरुपे सर्वेशे सर्वशक्तिसमन्विते ।
भयेभ्यस्त्राहि नो देवि दुर्गे नमोऽस्तु ते ॥ ९ ॥
यांत ध्यानाचा एक मंत्र जाण । पांचव्या अध्यायांतील तीन ।
अकराव्यांतील पांच प्रमाण । नवमंत्र या स्तोत्रीं ॥ ११४ ॥ 
जगन्मातेची पूजा करुन । हें स्तोत्र अवश्य करावें पठण ।
हें सप्तशतीचें सार जाण । व्यासें निवडोन काढिलें ॥ ११५ ॥
असो सप्तशतीचा पाठ । जयासी न करवे स्पष्ट ।
तेणें हे म्हणावें उत्कृष्ट । फळ सर्व मंत्रांचें ॥ ११६ ॥
किंवा ही नवरत्नांची माळा । प्रेमें घालावी देवीच्या गळां ।
प्रसन्न होय देवी प्रेमळा । स्तोत्रपठनेंकरुनियां ॥ ११७ ॥
अथवा हे नवनाग सुढाळ । देवीचीं भूषणें केवळ ।
नातरी नव निधि सकळ । देवीचें ऐश्र्वर्य जाणावें ॥ ११८ ॥
किंवा हे नवनारायण । देवीचे करिताती स्तवन ।
अथवा हे नवनाथ जाण । देवीलागीं स्तविती सदा ॥ ११९ ॥   
नातरी ह्या नवदुर्गा साचार । देवीसी स्तविती निरंतर ।
किंवा ह्या नवशक्तींसी आधार । देवी असे सर्वथा ॥ १२० ॥
ऐसें हें नवमंत्रांचे स्तोत्र । पठन करितां प्राणिमात्र ।
देवीचा अनुग्रह स्वतंत्र । तयावरी होतसे ॥ १२१ ॥
तैसेंचि जाण श्रवण करितां । सर्व बाधा नासती तत्त्वतां ।
पुरुषार्थाची आशा धरितां । नित्य पठण करावें ॥ १२२ ॥
असो या ग्रंथपठनाचें फळ । महादेव सांगे सकळ ।
उमा ऐकतसे वेल्हाळ । मम चिंतामणी तो ॥ १२३ ॥
एक करितां आवर्तन । सर्व सिद्धि प्राप्त जाण ।
नित्य द्विरावृत्ती करुन । पुत्र प्राप्त होतसे ॥ १२४ ॥
पीडा-उपसर्गाची शांती । नित्य करावी त्रिरावृत्ती ।
पंचावर्तनेंकरुनि निश्र्चितीं । ग्रहशांती होतसे ॥ १२५ ॥ 
महाभय जाहलें उत्पन्न । तरी करावें सप्तावर्तन । 
नवावर्तनें करितां जाण । वाजपेयफल असे ॥ १२६ ॥
राजा वश व्हावा म्हणोन । आणि सर्व ऐश्र्वर्यालागुन ।
अकरा आवर्तनें करावी जाण । अकरावृत्या काम्यसिद्धि ।
बारा आवर्तनें करितां । वैरिनाश होय तत्त्वतां ॥ १२७ ॥
बारा आवर्तनें करितां । वैरिनाश होय तत्त्वतां ।
चतुर्दश आवर्तनें करितां । स्त्रीपुरुष वश होतसे ॥ १२८ ॥
पंचदशावर्तनेंकरुन । सौख्य श्री प्राप्त होय जाण ।
पुत्रपौत्र धान्यादि धन । सोळा आवर्तनेंकरुनियां ॥ १२९ ॥
सतरा आवर्तनें करुन । मुक्त होय राजापासून ।
शत्रूचें व्हावया उच्चाटन । अष्टादश करावीं ॥ १३० ॥
वीस आवर्तनें करुन । वनसंबंधी भयापासून ।
मुक्त होय न लागतां क्षण । यासी संशय असेना ॥ १३१ ॥
पंचवीस आवर्तनें करितां । बंधापासूनि होय मुक्तता ।
आतां शतावृत्यांचें तत्त्वतां । फळ ऐकें पार्वती ॥ १३२ ॥
महासंकट जाहलेम प्राप्त । किंवा चिकित्सा होतां निश्र्चित ।
क्षयरोग होता अद्भुत । शतावृत्ती कराव्या ॥ १३३ ॥
प्रजानाश कुलोच्छेद जाण । आयुष्यनाश असतां पूर्ण ।
शत्रुवृद्धि होतां प्रमाण । शतावृत्ती कराव्या ॥ १३४ ॥
व्याधिवृद्धि धननाश होत । तथा त्रिविध महोत्पात ।
अधिपातक होतां प्राप्त । शतावृत्ती कराव्या ॥ १३५ ॥
शतावृत्ती करितां पूर्ण । प्राप्त होय शुभलक्षण ।
सर्व मनोरथपूरक जाण । अष्टोत्तरशतावृत्ती ॥ १३६ ॥
सहस्त्रावर्तनें करितां । शताश्र्वमेधफल ये हाता ।
परंपरालक्ष्मी प्राप्त तत्त्वतां । मोक्षही होय निश्र्चयें ॥ १३७ ॥
असो या प्रकारेंकरुन । याचा महिमा वर्णिला पूर्ण ।
महाकालीचें चरित्र प्रमाण । एक अध्याय असे ते ॥ १३८ ॥
पुढें महालक्ष्मीचें चरित्र । तीन अध्याय वर्णिले पवित्र ।
नंतर महासरस्वतीचें गुण विचित्र । नवाध्याय वर्णिले ॥ १३९ ॥
त्यांत नवव्या अध्यायीं देख । सुरथ-वैश्य चरित्र सम्यक ।
अंती तीन अध्याय सुरेख । रहस्यांचे वर्णिले ॥ १४० ॥
एवं सोळा अध्याय केवळ । श्रीदेवीचरित्र सकळ ।
श्रवणपठनमात्रें कृपाळ । देवी प्रसन्न होतसे ॥ १४१ ॥
परी मुख्य पाहिजे भावार्थ । त्यावांचूनि सर्वही व्यर्थ । 
बारावे अध्यायीं हा अर्थ । देवीवाक्याचा पहावा ॥ १४२ ॥
भक्तीनें करावें श्रवण पठन । भक्तीनें करावें पूजन हवन ।
'जानताऽजानता' म्हणोन । देवी बोलती जाहली ॥ १४३ ॥
येथें ज्ञानाचें कारण नाहीं । भक्तिभावार्थ मुख्य पाहीं ।
भक्तीनें अर्पिता पत्र पुष्पही । देवी संतुष्ट होतसे ॥ १४४ ॥
अभक्तीनें राजोपचार । अर्पितां व्यर्थ होती साचार ।
या कारणास्तव भक्ति थोर । भगवत्कृपेकारणें ॥ १४५ ॥
पंधरावें अध्यायीं उत्तम । संस्कृत पाठाचे दुर्गम । 
व्यासांनीं जे वर्णिले नियम । त्यांचें भक्तिवंता कारण नसे ॥ १४६ ॥
यदर्थी शांतिशेखर ग्रंथ । बोलता जाहला यथार्थ ।
त्याचा येथें घेतला वाक्यार्थ । तो शोधूनि पहावा ॥ १४७ ॥
श्र्लोक 
न चात्र नियमः कश्र्चित् जापकानां च स्वत्य च ।
न चात्रावर्तने संख्या यथाबद्धः समाचरेत् ॥ १ ॥
यथेच्छं ऋत्विजं कुर्याद्होमद्रव्यं यथेप्सितम् ।
ब्राह्मणानां च निर्बंध न कुर्यद्वि कदाचन ॥ २ ॥
टीका 
या सप्तशतीचे ठायीं आपण । अथवा पाठ करणार ब्राह्मण ।
कोणताही नियम जाण । तयालागीं असेना ॥ १४८ ॥
या सप्तशतीचें आवर्तन । अमुकसंख्या करावें जाण ।
ऐसें पाठनियमाचें प्रमाण । प्राकृतीं नाहीं वर्णिलें ॥ १४९ ॥
मनास वाटे तितुके ब्राह्मण । यथेच्छ होमद्रव्यसंपादन ।
कोणताही निर्बंध जाण । ब्राह्मणासी करुं नये ॥ १५० ॥
प्रतिप्रकरणाचे अंती अध्याय । बध इति म्हणों नये पदत्रय । 
ऐसा पदत्रयांचा संशय । ब्राह्मणासीं न करावा ॥ १५१ ॥
धनवंत जो तेणें हवन । भक्तिमंतें करावें पठण । 
प्रेमभक्ति जी तिचें लक्षण । अष्टभाव जाणावें ॥ १५२ ॥
दुसरें भक्तीचें लक्षण । जगदंबा आणि आपण ।
हें चराचर विश्र्व जाण । एकरुपें पाहावें ॥ १५३ ॥
अणिमादि सिद्धि देवीच्या दासी । परी भक्ति नाहीं देवीपासीं ।
म्हणोनि जगदंबा भक्तांसी । अल्पार्पणें कृपाळू ॥ १५४ ॥
मताभिमानी ऐसें म्हणती । चंडिका मद्यमांसभक्षिती ।
दया नाहीं चंडिकेप्रती । दयाळू तो महाविष्णु ॥ १५५ ॥
परी रामकृष्णअवतारीं जाण । विष्णूनें केलें मद्यमांसभक्षण । 
हा देवांचा स्वभावधर्म जाण । दोष कदा न ठेवावा ॥ १५६ ॥
विष्णुहूनि फार दयाळ । जगदंबा असे केवळ । 
पित्याहूनि स्नेह प्रबळ । जननीचा तो प्रसिद्ध ॥ १५७ ॥
कोणी शाक्त ऐसें म्हणती । आमुची देवता मद्यभक्षिती ।
आम्हीही भक्षण करुं निश्र्चितीं । परी तो धर्म नव्हे त्यांचा ॥ १५८ ॥
शिवें विष भक्षिलें समग्र । अगस्तीनें गिळिला समुद्र । तैसाचि देवीनें प्रताप उग्र । करुनि असुर मारिले ॥ १५९ ॥
तैसें न घडे इतरांसी । करितां मृत्यु निश्र्चयेंसीं ।
मग मद्यमांसाची इच्छा कैसी । धरुनि जय पावेल ॥ १६० ॥
मद्यासी असे शाप दारुण । स्पर्श करी जो कां ब्राह्मण ।
पंचमहापातकें जाण । नरकप्राप्ती तयासी ॥ १६१ ॥
मद्यमांसांचा नैवेद्य अर्पण । देवीसी करी जो कां ब्राह्मण ।
अंत्यजाच्या घरचें पक्वान्न । देवी स्पर्श न करी तया ॥ १६२ ॥
कूष्मांडादिफलांचें बलिदान । ब्राह्मणें करावें देवीसी अर्पण ।
पायसादिनैवेद्य समर्पण । अथवा समयीं असेल तें ॥ १६३ ॥
वाक्याचा सांगतां विस्तार । ग्रंथ वाढेल अपार ।
त्या देवीकारणें नमस्कार । वारंवार असो माझा ॥ १६४ ॥
प्रथमाध्यायीं निश्र्चितीं । श्रीमहाकालीची उत्पत्ती ।
मधुकैटभदैत्यांप्रती । मारविती जाहली जगदंबा ॥ १६५ ॥
द्वितीयाध्यायीं केलें वर्णन । श्रीमहालक्ष्मीचें जनन ।
सेनापतीचें युद्ध दारुण । होतें जाहलें देवीसीं ॥ १६६ ॥
तृतीयाध्यायीं कथन जाहलें । महिषासुराचें हनन केलें ।
चतुर्थाध्यायीं निरुपिलें । शक्रादिदेवस्तुतीसी ॥ १६७ ॥
पांचवें अध्यायीं निरुपण । श्रीमहासरस्वतीचें आख्यान ।
पार्वतीदेहापासूनि जनन । दूतसंवादही वर्णिला ॥ १६८ ॥
सहावें अध्यायीं वर्णन । देवीनें मारिला धूम्रलोचन ।
सातवे अध्यायीं ते दारुण । चंड--मुंड वधियेले ॥ १६९ ॥
आठवे अध्यायीं निश्र्चितीं । रक्तबीजाची केली समाप्ती ।
नववे अध्यायीं निशुंभाप्रती । मारिती जाहली जबदंबा ॥ १७० ॥
दहावे अध्यायीं वर्णिलें । शुंभासुराचें हनन केलें ।
अकरावें अध्यायीं निरुपिलें । नारायणीस्तुतीतें ॥ १७१ ॥
बारावें अध्यायीं प्रसिद्ध । वर्णिला देवीचा संवाद ।
श्रवणपठनाचें फल अगाध । देवीनें स्वमुखें वर्णिलें ॥ १७२ ॥
तेरावे अध्यायीं केलें वर्णन । सुरथ--वैश्यांसी देवी प्रसन्न ।
अक्षयी राज्य नृपाल गुन । मुक्ति दिधली वैश्यासी ॥ १७३ ॥
चवदावे अध्यायीं निरुपण । प्राधानिकरहस्य केलें कथन ।
देवीनें ब्रह्मा--शिव--विष्णु निर्मून । उत्पन्नादिकर्मे निवेदिलीं ॥ १७४ ॥
पंधरावें अध्यायीं जाण । केला पूजाप्रकार वर्णन ।
सप्तप्रकारचीं अनुष्ठाने पूर्ण । तथा होमप्रकार वर्णिला ॥ १७५ ॥
शेवटीं सोळावें अध्यायीं । मूर्तिरहस्य वर्णिलें पाहीं । 
पंचावतारचरित्र सर्वही । ध्यानरुपादि वर्णिलें ॥ १७६ ॥
या प्रकारेंकरोनि जाण । सोळा अध्याय ग्रंथ पूर्ण । 
श्रीदेवीनें कृपा करुन । ब्राह्मणमुखें वदविला ॥ १७७ ॥
ग्रंथाचे सोळा अध्याय जाण । हेचि षोडशोपचार पूर्ण ।
केलें श्रीजगदंबापूजन । भावें अर्पिलें सर्वही ॥ १७८ ॥
किंवा हा षोडशाध्यायग्रंथ । हाचि सोळा कळांचा नक्षत्रनाथ ।
भक्तांचे त्रिविधताप-शमनार्थ । देवीनें पूर्ण निर्मिला ॥ १७९ ॥ 
अथवा सोळा अध्याय ग्रंथ जाण । हेंचि सोळा दळांचें कमल पूर्ण ।
श्रीजगदंबेसी केलें अर्पण । धरिलें करीं प्रीतीनें ॥ १८० ॥
नातरी हे षोडशोध्याय देखा । देवीच्याकंठीच्या सोळा मातृका ।
किंवा सोळा स्वर हे अंबिका । धारण करी निजकंठी ॥ १८१ ॥
असो या प्रकारेंकरुनि जाण । केलें ग्रंथाचें वर्णन ।
जेथें हा ग्रंथ जाहला निर्माण । तें स्थान सांगतों ॥ १८२ ॥
कृष्णावेणीसंगमापासून । दक्षिण दिशेसी कोश तीन ।
कृष्णेपासूनि पश्र्चिमेसी जाण । एक कोश परियेसीं ॥ १८३ ॥
वर्णे नाम असे नगरी । तेथें देवालयामाझारी ।
ब्राह्मण असे सहपरिवारीं । राम नाम तयाचें ॥ १८४ ॥
तो केवळ बुद्धिहीन । देवीमहिमा अगाध पूर्ण ।
परी त्यातें वदलें त्याचें वदन । देवीकृपेंकरुनियां ॥ १८५ ॥
तेथें श्रीजगदंबाभवानी । श्रीपांडुरंगाचे रुप धरुनि ।
बैसली जाऊनि सिंहासनीं । शिवरुपें पार्श्र्वभागीं ॥ १८६ ॥
मुकुटकुंडलें वनमाळा । घनश्याम दिसे सांवळा ।
कांसे पीतांबर सोनसळा । आपादमाळा शोभती ॥ १८७ ॥
शोभती सकल अलंकार । गंध वैजयंती मनोहर ।
कटीवरी ठेविले कर । उभयभागीं साजिरे ॥ १८८ ॥
नाना पुष्पभार शोभती । तुलसीमाला विराजती ।
वामभागीं रुक्मिणी सती । आदिमाया जगदंबा ॥ १८९ ॥
दक्षिणेसी राम लक्ष्मण । जवळी चतुर्भुज विष्णु पूर्ण ।
बाहेर मंडपीं गजानन । लक्ष्मी असे तयापासीं ॥ १९० ॥
दक्षिणोत्तर गरुड मारुती । पार्षदगण मुख्य असती ।
पश्र्चिमेसी मुरलीधर निश्र्चितीं । पुढें श्रीतुलसी विराजे ॥ १९१ ॥
तुलसीमाहात्म्यग्रंथ जाण । पूर्वी केला असे निर्माण ।
सांप्रतकाळीं नवरसपूर्ण । देवीमाहात्म्य वर्णिले ॥ १९२ ॥
असो त्या देवालयामाजी जाण । हा ग्रंथ जाहला निर्माण ।
अग्निसेवक राम ब्राह्मण । देवी वदली तन्मुखें ॥ १९३ ॥
या देवीमाहात्म्याची संख्या । सतराशें नऊ असे सकळिका । 
जगदंबेनें बुद्धि देऊनियां देखा । ग्रंथ संपूर्ण वदविला ॥ १९४ ॥
शके सतराशें एक्यायशीं । सिद्धार्थी नाम संवत्सरासी ।
आश्र्विन शुक्ल अष्टमीसी । ग्रंथ समाप्त जाहला ॥ १९५ ॥
आषाढ शुक्ल त्रयोदशीसी । आरंभ केला या ग्रंथासी ।
आश्र्विन शुक्ल अष्टमीसी । ग्रंथाचा शेवट जाहला ॥ १९६ ॥
सद्गुरु तो दत्तात्रेय जाण । संप्रदाय सर्वांसी विद्यमान ।
तयाकारणें माझे नमन । सर्वभावेंकरुनियां ॥ १९७ ॥
श्र्लोकश्र्लोकाचा सर्व अर्थ । येथें वर्णिला यथार्थ । 
चतुर्थाध्यायीं मात्र भावार्थ । वर्णन केला असे तो ॥ १९८ ॥
याचें श्रवणपठण करितां । सर्व बाधा निरसती तत्त्वतां ।
सर्व संकटापासूनि मुक्तता । होत असे निर्धारे ॥ १९९ ॥
जैसे श्रीव्यासांनी केलें वर्णन । तैसेंचि येथें कथिलें जाण ।
भावार्थें याचें करितां पठण । श्रवण करी देवी ती ॥ २०० ॥         
देवीनें जैसें बोलविलें । तैसेचि येथें वर्णन केलें ।
सज्जनीं पाहिजे परिसिलें । प्रेमभक्तिकरुनियां ॥ २०१ ॥
श्रीदेवीसी नमस्कार । रकद्विजाचा वारंवार ।
जिनें करुनि कृपा अपार । हा ग्रंथ वदविला ॥ २०२ ॥ 
॥ इति श्रीमार्कंडेयपुराणे सावर्णिके मन्वंतरें देवीभगवतीमाहात्म्ये मूर्तिरहस्यंवर्णनं तथा कारणिकस्तोत्रमंत्रादिकथनं नाम षोडशोऽध्यायः ॥
॥ श्रीकृष्णार्पणमस्तु ॥ श्रीजगदंबार्पणमस्तु ॥ 
यदक्षरपदभ्रष्टं मात्राहीनं च यद्भवेत् ।
तत्सर्वं क्षम्यतां देवि प्रसीद परमेश्र्वरी ।
श्रीमहाकालीमहालक्ष्मीमहासरस्वत्यः 
प्रसन्ना वरदा भवंतु ॥ श्रीरस्तु । ॥ शुभं भवतु ॥ इष्टकामनासिद्धिरस्तु ॥

DeviMahatmya Adhyay 16 
श्रीदेवीमाहात्म्ये अध्याय सोळावा (१६)


Custom Search

No comments: