Saturday, January 7, 2017

Samas Navava Virakta Lakshan समास नववा विरक्त लक्षण


Dashak Dusara Samas Navava Virakta Lakshan
 Samas Navava Virakta Lakshan is in Marathi. Samarth Ramdas is telling us the qualities of Virakta. Virakta means a person who is having spiritual mind and wants to be on spiritual path for attaining Moksha. He is a satisfied person in material life; he has nothing to gain in material life. He is beyond all desires and only goal in his life is to have Moksha. He knows that the birth of a person on this earth is to become the God and not to live a life like animals which is to eat, drink and enjoy. There is something beyond that. He is on the search of it. However to accomplish the goal he requires to develop certain qualities in his nature. Samarth is telling us these qualities in this Ninth Samas.
समास नववा विरक्त लक्षण
श्रीराम ॥
ऐका विरक्तांचीं लक्षणें । विरक्तें असावें कोण्या गुणें ।
जेणें आंगीं सामर्थ्यें बाणे । योगियाचें ॥ १ ॥
अर्थ
१) आता विरक्तांची लक्षणें ऐका. विरक्ताजवळ कोणते गुण असावेत, ज्यामुळे योग्याचे सामर्थ्य त्याच्या अंगी येते.  
जेणें सदकीर्ति वाढे । जेणें सार्थकता घडे ।
जेणें करितां महिमा चढे । विरक्तांसी ॥ २ ॥
२) ज्या गुणांमुळे सद्कीर्ति वाढते व जन्माची सार्थकता होते आनि विरक्ताचा मोठेपणा वाढतो. 
जेणें परमार्थ फावे । जेणें आनंद हेलावे । 
जेणें विरक्ती दुणावे । विवेकेंसहित ॥ ३ ॥
३) ज्यामुळे परमार्थ साधतो, आनंद वाढतो आणि विरक्तीही विवेकाने अधिक होते. 
जेणें सुख उचंबळे । जेणें सद्विद्या वोळे ।
जेणें भाग्यश्री प्रबळे । मोक्षेंसहित ॥ ४ ॥
४) विरक्ताच्या गुणांनी सुख उचंळून येते. सद्विद्या वश होते. मोक्षाबरोबरच भाग्य फळफळून येते.
मनोरथ पूर्ण होती । सकळ कामना पुरती ।
मुखीं राहे सरस्वती । मधुर बोलावया ॥ ५ ॥
५) सर्व मनोरथ पूर्ण होतात. सर्व इच्छांची पूर्ति होते. वाणी मधुर होते कारण जीभेवर, मुखांत सरस्वतीचा वास होतो. 
हे लक्षणें श्रवण कीजे । आणि सदृढ जीवीं धरिजे ।
तरी मग विख्यात होईजे । भूमंडळीं ॥ ६ ॥
६) ही विरक्त पुरुषाची लक्षणें ऐका व मनांत घट्ट धरुन ठेवा म्हणजे मग या भूमंडळावर प्रसिद्धि, मोठेपणा मिळतो.   
विरक्तें विवेकें असावें । विरक्तें अध्यात्म वाढवावें ।
विरक्तें धारिष्ट धरावें । दमनविषंई ॥ ७ ॥
७) विरक्ताने नेहमी विवेक जागृत ठेवावा. जनांमध्ये अध्यात्म, परमार्थ वाढवावा. इंद्रियांची वासना ताब्यांत ठेवण्यासाठी मोठ्या धैर्याने वागावे.
विरक्तें राखावें साधन । विरक्तें लावावे भजन ।
विरक्तें विशेष ब्रह्मज्ञान । प्रगटावावें ॥ ८ ॥
८) विरक्ताने आपले साधन व्यवस्थित व नियमीत करावे. लोकांना व भाविकांना भगवंताच्या भजनाविषयीं गोडी निर्माण करावी. विरक्ताने जनांना ब्रह्मज्ञानाबद्दल अधिक माहिती आपल्या अनुभवाने व निरुपणाने द्यावी.    
विरक्तें भक्ती वाढवावी । विरक्तें शांती दाखवावी ।
विरक्तें येत्नें करावी । विरक्ती आपुली ॥ ९ ॥
९) भगवंताची भाविकांमध्ये भक्ती वाढवावी. शांतीचे दर्शन लोकांना आपल्या अढळ शांतीने दाखवावे. हे सर्व करतांना प्रयत्नपूर्वक स्वतःची विरक्ती सांभाळावी.  विरक्तें सदक्रिया प्रतिष्ठावी । विरक्तें निवृत्ति विस्तारावी ।
विरक्तें नैराशता धरावी । सदृढ जिवेंसी ॥ १० ॥
१०) विरक्ताने सद्क्रिया, सद्कर्मे यांचे महत्व वाढवावे. विरक्ताने विरक्ती, संसारिक नैमित्तीक कार्यांतून लोकांमध्ये  निवृत्ती वाढवावी. विरक्ताने कर्मफलाविषयीं उदासिनता, नैराशता आपल्या मनांत घट्ट धरुन ठेवावी.  
विरक्तें धर्मस्थापना करावी । विरक्तें नीति आवलंबावी ।
विरक्तें क्ष्मा सांभाळावी । अत्यादरेंसी ॥ ११ ॥
११) विरक्ताने धर्माचे रक्षण करावे, त्याचे पुनरुज्जीवन करावे. त्याने नीतिमान व अत्यंत क्षमाशील असावे.
विरक्तें परमार्थ उजळावा । विरक्तें विचार शोधावा ।
विरक्तें सन्निध ठेवावा । सन्मार्ग सत्वगुण ॥ १२ ॥
१२) विरक्ताने परमार्थाचा मार्ग लोकांना स्वच्छ दाखवावा. सतत चिंतनशीलता जोपासावी. त्याने सत्वगुणी राहून नेहमी सन्मार्गाने चालावे. 
विरक्तें भाविकें सांभाळावीं । विरक्तें प्रेमळें निववावीं ।
विरक्तें साबडीं नुपेक्षावीं । शरणागतें ॥ १३ ॥
१३) विरक्ताने श्रद्धावान भाविकांचा सांभाळ करावा. भगवंतावर मनापासून प्रेम करणार्‍या भक्तांचा संशय, मनस्ताप दूर करावा. भोळ्याभाबड्या लोकांना दूर लोटू नये.
विरक्तें असावें परम दक्ष । विरक्तें असावें अंतरसाक्ष ।
विरक्तें वोढावा कैपक्ष । परमार्थाचा ॥ १४ ॥
१४) विरक्ताने नेहमी अति दक्ष असावे. त्याने दुसर्‍यांचे अंतरंग ओळखून वर्तन करावे, त्याने नेहमी परमार्थाचीच बाजू घ्यावी.  
विरक्तें अभ्यास करावा । विरक्तें साक्षेप धरावा ।
विरक्तें वगत्रुत्वें उभारावा । मोडला परमार्थ ॥ १५ ॥
१५) विरक्ताने नेहमी अध्यात्माचा अभ्यास करावा. त्याने नेहमी कांहीतरी करत राहावे, ऐकत राहावे. आपल्या निरुपणाने, प्रवचनांनी परमार्थ जनांमध्ये वाढवावा. लोकांचे शंका, संशय निरसुन परमार्थ परत मार्गी लावावा.  
विरक्तें विमळ ज्ञान बोलावें । विरक्तें वैराग्य स्तवीत जावें ।
विरक्तें निश्र्चयाचें करावें । समाधान ॥ १६ ॥
१६) विरक्ताने शुद्ध आत्मज्ञानाचा प्रसार करावा. नेहमी वैराग्य वृत्तीनेच राहावे व त्याचा लोकांनाही निश्र्चयात्मक उपदेश त्यांचे शंका समाधानकरुन करावा. 
पर्वें करावीं अचाटें । चालवावीं भक्तांची थाटे ।
नाना वैभवें कचाटें । उपासनामार्ग ॥ १७ ॥
१७) मोठ्या प्रमाणावर पर्व, जयन्त्या वगैरे उत्सव करावे. भजने, निरुपणे, किर्तने, प्रवचने वगैरे करुन भक्तीमार्गाचा प्रसार करावा. त्यानिमित्य भक्तांना एकत्र आणावे. 
हरिकीर्तनें करावीं । निरुपणें माजवावी ।
भक्तिमार्गें लाजवावीं । निंदक दुर्जनें ॥ १८ ॥
१८) भगवंताची कीर्तनें, भजनें करावी, करवावी. निरुपणे करावी. पुष्कळ भक्त एकत्र आणून भक्तीमार्गाचा दणका उडवून द्यावा. यायोगे दुर्जन निंदक यांना भक्तीमार्गाच्या या वैभवाने दिपवून टाकावे. 
बहुतांस करावे परोपकार । भलेपणाचा जीर्णोद्धार ।
पुण्यमार्गाचा विस्तार । बळेंचि करावा ॥ १९ ॥
१९) रंजले, गांजले, भक्त या सर्वांवर त्याचे भले होईल असे कांही उपकार करावा. सज्जनपणाने वागणार्‍यांचा सत्कार, गौरव करावा. पुण्य मार्गांत जास्तीत जास्त लोक येतील असे जोरदार प्रयत्न करावे.     
स्नान संध्या जप ध्यान । तीर्थयात्रा भगवद्भजन । 
नित्यनेम पवित्रपण । अंतरशुद्ध असावें ॥ २० ॥
२०) आपण स्वतः नित्य नेमाने स्नानसंध्या, जप, ध्यान, तीर्थयात्रा करणे असा नित्य नेम नेहमी काळजीपूर्वक करुन पवित्रपण जपून अंतरंग शुद्ध ठेवावे.
दृढ निश्र्चयो धरावा । संसार सुखाचा करावा ।
विश्र्वजन उद्धरावा । संसर्गमात्रें ॥ २१ ॥
२१) दृढ निश्र्चयाने वागून संसार सुखाचा करावा. लोकांना आपल्या संसर्गाने, संगतींत ठेवून भक्तीमार्गांत त्यांना आणुन त्यांचा उद्धार करावा. 
विरक्तें असावें धीर । विरक्तें असावें उदार ।
विरक्तें असावें तत्पर । निरुपणाविषंई ॥ २२ ॥
२२) विरक्ताने नेहमी धीराने, धैर्याने सावध असावे. त्याने उदार असावे. तत्परतेने निरुपणे करुन भक्तीभाव लोकांत वाढवावा. 
विरक्तें सावध असावें । विरक्तें शुद्धमार्गे जावें ।
विरक्तें झिजोन उरवावें । सदकीर्तिसी ॥ २३ ॥
२३) त्याने सावध असावे. नेहमी शुद्ध मार्गाचाच अवलंब करावा. प्रसंगी आपले धन खर्च करुन, मन भक्तीमार्गाला वाहून, देह झिजवून सद्कीर्तीस आपल्यानंतरही टिकवावे.     
विरक्तें विरक्त धुंडावें । विरक्तें साधु वोळखावें ।
विरक्तें मित्र करावें । संत योगी सज्जन ॥ २४ ॥
२४) विरक्ताने इतर विरक्तांचा शोध घ्यावा. साधु, सज्जन यांना ओळखून त्यांचा आदर करावा. त्याने संत, योगी व सज्जन अश्या योग्य लोकांशी मित्रत्व करावे.  
विरक्तें करावीं पुरश्र्चरणें । विरक्तें फिरावीं तीर्थाटणें ।
विरक्तें करावीं नाना स्थानें । परम रमणीय ॥ २५ ॥
२५) विरक्ताने पुरश्र्चरणे करावीत. तीर्थयात्रा कराव्यात. निरनिराळी रमणीय व पवित्र स्थाने करावीत.
विरक्तें उपाधी करावी । आणी उदास वृत्ति न संडावी ।
दुराशा जडों नेदावी । कोणयेकविषंई ॥ २६ ॥
२६) विरक्ताने निरनिराळ्या कामाद्वारे लोकांना मदत करावी, परोपकार करावा, पण त्यांतही आपली विरक्त वृत्ती कायम ठेवावी. कशाबद्दलही दुराशा जडवून घेउ नये.  
विरक्तें असावें अंतरनिष्ठ । विरक्तें नसावें क्रियाभ्रष्ट ।
विरक्तें न व्हावें कनिष्ठ । पराधेनपणें ॥ २७ ॥
२७) विरक्ताने अंतरमुख वृत्तीने असावे. त्याने वाईट काम करुन क्रियाभ्रष्ट होऊ नये, आचरण शुद्ध ठेवावे. दुसर्‍यांच्या आधिन होऊन कनिष्ठपण स्वीकारु नये.     विरक्तें समय जाणावा । विरक्तें प्रसंग वोळखावा ।
विरक्त चतुर असावा । सर्व प्रकारें ॥ २८ ॥   
२८) विरक्ताने वेळप्रसंग ओळखून वागावे. सर्वप्रकारे चातुर्य विरक्ताजवळ असावे.  
विरक्तें येकदेसी नसावें । विरक्तें सर्व अभ्यासावें ।
विरक्तें अवघें जाणावें । ज्याचें त्यापरी ॥ २९ ॥  
२९) विरक्तानें फक्त एकाच गोष्टीचे ज्ञान घेऊन थांबू नये, त्याला पुष्कळ गोष्टींचे ज्ञान असावे. सर्व ज्ञानाच्या शाखांचा त्याने अभ्यास करावा. जे जसे असेल तसे तसे ते समजून घ्यावे.
हरिकथा निरुपण । सगुणभजन ब्रह्मज्ञान ।
पिंडज्ञान तत्वज्ञान । सर्व जाणावें ॥ ३० ॥
३०) भगवंताच्या कथा ,निरुपण, भगवंताच्या सगुणरुपाचे भजन व उपासना, आत्मज्ञान, परमात्मस्वरुप ज्ञान, शरीराचे ज्ञान, तत्वज्ञान ह्या सर्वाचे ज्ञान त्याला असावे.  
कर्ममार्ग उपासनामार्ग । ज्ञानमार्ग सिद्धांतमार्ग ।
प्रवृत्तिमार्ग निवृत्तिमार्ग । सकळ जाणावें ॥ ३१ ॥
३१) परमार्थाची साधने म्हणजे कर्ममार्ग, कोणत्या उपासना केल्यावर, कोणचे ज्ञान मिळवणे परमार्थासाठी योग्य, सिद्धांतमार्ग, प्रवृत्तीमार्ग, निवृत्ती कशाची व कशापासून परमार्थासाठी आवशक या सर्व मार्गांची माहिती व ज्ञान विरक्ताला असावे.  
प्रेमळ स्थिती उदास स्थिती । योगस्थिती ध्यानस्थिती ।
विदेह स्थिती सहज स्थिती । सकळ जाणावें ॥ ३२ ॥
३२) भगवंताचे प्रेम वाढू लागल्यावर होणारी अवस्था, इच्छा, वासनांचे पूर्ण निरसन होऊन येणारी उदासीन अवस्था, योग समाधी साधल्यावर, ध्यान साधल्यावर, विदेही अवस्थेचे ज्ञान झाल्यावर, सहज स्थिती हे अभ्यासाद्वारे विरक्ताने जाणावे.    
ध्वनी लक्ष मुद्रा आसनें । मंत्र यंत्र विधी विधानें ।
नाना मतांचें देखणें । पाहोन सांडावें ॥ ३३ ॥
३३) निरनिराळ्या प्रकारचे नाद, मुद्रा, आसनें, मंत्र, यंत्र यांचे विधी व विधानें, निरनिराळी मतें व दर्शने, या सर्वाचे ज्ञान घेऊन मग ते सोडून द्यावे. कारण परमार्थास ते उपयोगी नाही.  
विरक्तें असावें जगमित्र । विरक्तें असावें स्वतंत्र ।
विरक्तें असावें विचित्र । बहुगुणी ॥ ३४ ॥  
३४) विरक्ताने जगमित्र असावे. त्याने स्वतंत्र असावे. त्याने विचित्र अशा बहुविध गुणांनी युक्त असावे.
विरक्तें असावें विरक्त । विरक्तें असावें हरिभक्त ।
विरक्तें असावें नित्यमुक्त । अलिप्तपणें ॥ ३५ ॥
३५) विरक्ताने कमालीचे विरक्त असावे. कोठल्याही आशा, अपेक्षा, इच्छा, नाती, भावना अशा गोष्टींना आपल्याजवळ थारा देऊ नये.  
विरक्तें शास्त्रें धांडोळावी । विरक्तें मतें विभांडावी ।
विरक्तें मुमुक्षें लावावीं । शुद्धमार्गें ॥ ३६ ॥
३६) विरक्ताने शास्त्रांचे शुद्ध व सखोल ज्ञान मिळवावे. निरनिराळी परमार्थाला मारक मते खोडून काढावीत. भगवंतच्या प्रेमाची व प्राप्तीची इच्छा असणार्‍यांना शुद्धमार्गास लावावे.  
विरक्तें शुद्धमार्ग सांगावा । विरक्तें संशय छेदावा ।
विरक्तें आपला म्हणावा । विश्र्वजन ॥ ३७ ॥
३७) विरक्ताने परमार्थाचा शुद्धमार्ग सांगावा. निरुपणाद्वारे संशय, शंकांचे निरसन करावे. सर्व विश्र्वजनांस आपले म्हणावे. 
विरक्तें निंदक वंदावें । विरक्तें साधक बोधावे ।
विरक्तें बद्ध चेववावे । मुमुक्षुनिरुपणें ॥ ३८ ॥
३८) विरक्ताने निंदकांना (वाद न घालता) वंदन करावे. साधकांना शुद्ध ज्ञानाद्वारे भक्तीमार्गाचे ज्ञान द्यावे. संसारांत अजुनही आसक्त असलेल्यांना प्रवचनाद्वारे भगवंताच्या भक्तीविषयी, परमार्थाविषयीं जागरुक करावे.   
विरक्तें उत्तम गुण घ्यावे । विरक्तें अवगुण त्यागावे ।
नाना अपाय भंगावे । विवेकबळें ॥ ३९ ॥     
३९) विरक्ताने उत्तम गुण अंगी वाढवावे. अवगुणांचा त्याग करावा. परमार्थाच्या आड येणार्‍या सर्व संकटे, अडचणी यावर विवेकाने मात करावी. 
ऐसीं हें उत्तम लक्षणें । ऐकावीं येकाग्र मनें ।
याचा अव्हेर न करणें । विरक्त पुरुषें ॥ ४० ॥
४०) अशीही चांगली लक्षणे, मन एकाग्र करुन ऐकावीत. यांच्याकडे विरक्ताने दुर्लक्ष करु नये. 
इतुकें बोलिलें स्वभावें । त्यांत मानेल तितुकें घ्यावें ।
श्रोतीं उदास न करावें । बहु बोलिलें म्हणौनी ॥ ४१ ॥
४१) माझ्या स्वभावास अनुसरुन मी हे विरक्ताचे गुण सांगितले. त्यांतील मानवतील तेवढे स्वीकारावे. श्रोत्यांनी मी फार बोललो म्हणून उदास करु नये व होऊ पण नये.
परंतु लक्षणें ने घेतां । अवलक्षणें बाष्कळता ।
तेणें त्यास पढतमूर्खता । येवों पाहे ॥ ४२ ॥
४२) परंतु ही चांगली लक्षणे अंगी बाणविली नाहीत व अवगुण अंगीकारले तर पढतमूर्खपणा येऊ लागतो. 
त्या पढतमूर्खाचें लक्षण । पुढिले समासीं निरुपण ।
बोलिलें असे सावधान । होऊन ऐका ॥ ४३ ॥
४३) पढतमूर्खाचे (अव)गुणवर्णन पुढले समासी (त्यागास्तव) सावधपणें ऐका.  

इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे विरक्तलक्षणनाम समास नववा ॥
Samas Navava Virakta Lakshan
समास नववा विरक्त लक्षण


Custom Search
Post a Comment