Dashak Dusara Samas Sahava Tamogun Lakshan
Samas Sahava Tamogun Lakshan is in Marathi. Here in this Samas, Samarth is telling us the qualities of Tamogun. These qualities are always bad for them who want to follow a path of spirituality. Those who want to achieve Moksha, Mukti or at least progress in their adhyatimk life, they have to leave these bad qualities and develop good qualities in their nature.
समास सहावा तमोगुण लक्षण
श्रीराम ॥
मागां बोलिला रजोगुण । क्रियेसहित लक्षण ।
आतां ऐका तमोगुण । तोहि सांगिजेल ॥ १ ॥
अर्थ १) मागल्या समासी रजोगुण क्रियेंतुन कसा व्यक्त होतो, हे लक्षणासहित सांगितले. आता तमोगुण सांगतो, तो ऐका.
संसारीं दुःखसंमंध । प्राप्त होता उठे खेद ।
का अद्भुत आला क्रोध । तो तमोगुण ॥ २ ॥
२) संसारांत दुःख भोगणे आले की, जो खेद उत्पन्न होतो किवां फार राग येतो, तो तमोगुण.
शेरीरीं क्रोध भरतां । नोळखे माता पिता ।
बंधु बहिण कांता । ताडी तो तमोगुण ॥ ३ ॥
३) अगांत राग शिरला की, जो आई, वडिल यांना ओळखत नाही. भाऊ, बहिण, पत्नी यांना मारतो. तो तमोगुण होय.
दुसर्याचा प्राण घ्यावा । आपला आपण स्वयें द्यावा ।
विसरवी जीवाभावा । तो तमोगुण ॥ ४ ॥
४) रागाच्याभरांत दुसर्याचा प्राण घ्यावा किंवा आपला आत्मघात करुन घ्यावा असे वाटुन आपल्या जीवाचाही विचार विसरतो, तो तमोगुण होय.
भरलें क्रोधाचें काविरें । पिश्याच्यापरी वावरे ।
नाना उपायें नावरे । तो तमोगुण ॥ ५ ॥
५) रागाचे वारे अंगांत शिरल्याने पिशाच्यासारखा दिसतो, वागतो. कोठल्याही उपायाने आवरत नाही, तो तमोगुण होय.
आपला आपण शस्त्रपात । पराचा करी घात ।
ऐसा समय वर्तत । तो तमोगुण ॥ ६ ॥
६) आपलाच शस्त्राने घात करतो किंवा दुसर्याचा घात करतो. असा प्रसंग येतो, तो तमोगुण होय.
डोळां युध्यचि पाहावें । रण पडिलें तेथें जावें ।
ऐसे घेतलें जीवें । तो तमोगुण ॥ ७ ॥
७) डोळ्यांनी युद्ध पहावे. युद्ध चालू असेल तेथे जावे असे जेव्हां जीवाला वाटते, तो तमोगुण होय.
अखंड भ्रांती पडे । केला निश्र्चय बिघडे ।
अत्यंत निद्रा आवडे । तो तमोगुण ॥ ८ ॥
मन सारखे भ्रमिष्ट झालेले असते. निश्र्चय केलेला असला तरी तो टिकत नाही. सारखे झोपावेसे वाटते, तो तमोगुण होय.
क्षुधा जयाची व्राड । नेणे कडु अथवा गोड ।
अत्यंत जो कां मूढ । तो तमोगुण ॥ ९ ॥
ज्याची भूक फार व ज्याला कडू, गोडयाचा कांही फरक पडत नाही. जो अति मूर्ख असतो, तो तमोगुण होय.
प्रीतिपात्र गेलें मरणें । तयालागीं जीव देणें ।
स्वयें आत्महत्या करणें । तो तमोगुण ॥ १० ॥
आवडते माणूस मरण पावले, म्हणुन त्याच्यासाठी जीव द्यायलानिघतो. आत्महत्या करतो, तो तमोगुण होय.
किडा मुंगी आणी स्वापद । याचा करुं आवडे वध ।
अत्यंत जो कृपामंद । तो तमोगुण ॥ ११ ॥
११) किडा, मुंगी आणी जनावर यांना ठार मारणे आवडते. ज्याच्याजवळ कृपेचा अभाव असतो. ( जो निष्ठूर असतो.) तो तमोगुण होय.
स्त्रीहत्या बाळहत्या । द्रव्यालागीं ब्रह्महत्या ।
करुं आवडे गोहत्या । तो तमोगुण ॥ १२ ॥
१२) स्त्री, बाळके यांचा वध करणारा, पैशासाठी ब्राह्मणाची हत्या करणारा, गोहत्या करण्याची आवड असलेला. तो तमोगुण होय.
विसाळाचेनि नेटें । वीष घ्यावेसें वाटे ।
परवध मनीं उठे । तो तमोगुण ॥ १३ ॥
१३) विषासारखे निंद्य पदार्थ खाण्याचे व्यसन असलेल्या मनुष्याच्या सांगण्याने विष घ्यावेसे वाटते. दुसर्याचा वध करावा असे मनांत वाटते. तो तमोगुण होय.
अंतरी धरुनि कपट । पराचें करी तळपट ।
सदा मस्त सदा उद्धट । तो तमोगुण ॥ १४ ॥
१४) मनांत कपट ठेवून दुसर्याचे तळपट करणारा, नेहमी मस्तवाल व उद्धट असणारा, तो तमोगुण होय.
कळह व्हावा ऐसें वाटे । झोंबी घ्यावी ऐसें उठे ।
अंतरी द्वेष प्रगटे । तो तमोगुण ॥ १५ ॥
१५) भांडणे व्हावीत असे वाटणारा, मारामारी करावीशी वाटणारा, मनांत द्वेष उत्पन्न होणारा, तो तमोगुण होय.
युद्ध देखावें ऐकावें । स्वयें युद्धचि करावें ।
मारावें कीं मरावें । तो तमोगुण ॥ १६ ॥
१६) युद्ध बघावेसे, ऐकावे असे वाटणारा, स्वतः युद्ध करावेसे वाटणारा, कोणालातरी मारावे किंवा मरावे, असे वाटणारा तो तमोगुण होय.
मत्सरें भक्ति मोडावी । देवाळयें विघडावी ।
फळती झाडें तोडावीं । तो तमोगुण ॥ १७ ॥
१७) भक्ताची भक्ती मत्सराने तोडाविशी वाटणारा, देऊळे तोडावीत असे वाटणारा, फळे येत असलेली झाडे तोडाविशी वाटणारा तो तमोगुण होय.
सत्कर्में ते नावडती । नाना दोष ते आवडती ।
पापभय नाहीं चित्तीं । तो तमोगुण ॥ १८ ॥
१८) सत्कर्मे न आवडणारा, नाना प्रकारचे दोष आवडणारा, मनांत पापाची भीती नसलेला, तो तमोगुण होय.
ब्रह्मवृत्तीचा उछेद । जीवमात्रास देणें खेद ।
करुं आवडे अप्रमाद । तो तमोगुण ॥ १९ ॥
१९) ब्राह्मणांचा छळ करणारा, जीवमात्रांना दुःख देणारा, मुद्दाम मोठ्या चुका करणाची आवड असलेला, तो तमोगुण होय.
आग्नप्रळये शस्त्रप्रळये । भूतप्रळये वीषप्रळये ।
मत्सरें करी जीवक्षये । तो तमोगुण ॥ २० ॥
२०) जो आगी लावतो, शस्त्रांनी मारामरी करतो, पिशाच्चबाधा करवितो, तो तमोगुण होय.
परपीडेचा संतोष । निष्ठुरपणाचा हव्यास ।
संसाराचा नये त्रास । तो तमोगुण ॥ २१ ॥
२१) ज्याला दुसर्याला त्रास झाल्याने आनंद होतो, जो निष्ठुरपणेच वागतो, प्रपंचाला त्रासत नाही. तो तमोगुण होय.
भांडण लावून द्यावें । स्वयें कौतुक पाहावें ।
कुबुद्धि घेतली जीवें । तो तमोगुण ॥ २२ ॥
२२) जो भांडणे लावतो व स्वतः आनंदाने ती बघतो, अशा वाईट बुद्धिने वागतो. तो तमोगुण होय.
प्राप्त जालियां संपत्ती । जीवांस करी यातायाती ।
कळवळा नये चित्तीं । तो तमोगुण ॥ २३ ॥
२३) पैसा, संपत्ती मिळाल्यावरसु्द्धा जीवांना त्रास देतो, कोणाहीबद्दल मनांत दया, कळवळा नसतो, तो तमोगुण होय.
नावडे भक्ति नावडे भाव । नावडे तीर्थ नावडे देव ।
वेदशास्त्र नलगे सर्व । तो तमोगुण ॥ २४ ॥
२४) ज्याला भक्ति आवड नाही, चांगले भाव आवडत नाहीत, तीर्थे आवडत नाहीत, देवही आवडत नाही, वेदशास्त्र नकोच असते, तो तमोगुण होय.
स्नानसंध्या नेम नसे । स्वधर्मीं भ्रष्टला दिसे ।
अकर्तव्य करीतसे । तो तमोगुण ॥ २५ ॥
२५) स्नानसंध्या करत नाही, स्वधर्मी भ्रष्टाचाराने वागतो, करु नये तेच करतो. तो तमोगुण होय.
जेष्ठ बंधु बाप माये । त्यांची वचनें न साहे ।
सीघ्रकोपी निघोन जाये । तो तमोगुण ॥ २६ ॥
२६) मोठा भाऊ, वडिल, आई यांचे बोलणे, सांगणे आवडत नाही, सहन होत नाही. त्याच्या बोलण्याने चतकन् रागावून संताोपाने घरांतून निघून जातो, तो तमोगुण होय.
उगेंचि खावें उगेंचि असावें । स्तब्ध होऊन बैसावें ।
कांहींच स्मरेना स्वभावें । तो तमोगुण ॥ २७ ॥
२७) नुसतेच खाऊन-पिऊन बसावे, काहीही न करता एकाच ठिकाणी बसून रहावे, कशाचेही स्मरण ज्याला नसते, तो तमोगुण होय.
चेटकविद्येचा अभ्यास । शस्त्रविद्येचा हव्यास ।
मल्लविद्या व्हावी ज्यास । तो तमोगुण ॥ २८ ॥
२८) चेटुक विद्येचे अभ्यास करतो, शस्त्रविद्या, मल्लविद्या शिकावीशी वाटते, तो तमोगुण होय.
केले गळाचे नवस । राडिबेडीचे सायास ।
काष्ठयंत्र छेदी जिव्हेस । तो तमोगुण ॥ २९ ॥
२९) अंगावर मान, पाठ अशा ठिकाणी गळ अडकवण्याचा नवस, धगधगीत निखार्यावरुन चालणे, लाकडाच्या यंत्राने जीभ छेदून घेणे, तो तमोगुण होय.
मस्तकीं भदें जाळावें । पोतें आंग हुरपळावें ।
स्वयें शस्त्र टोंचून घ्यावें । तो तमोगुण ॥ ३० ॥
३०) डोक्यावर खापर ठेवून त्यांत निखारे ठेवणे, पेटलेल्या काकड्याने स्वतःच्या अंगाला भाजुन घेणे, किंवा स्वतःच्या शरीराला शस्त्राने टोचून घेणे, तो तमोगुण होय.
देवास सिर वाहावें । कां तें आंग समर्पावें ।
पडणीवरुन घालून घ्यावें । तो तमोगुण ॥ ३१ ॥
३१) आपले डोके देवास वाहाणे, किंवा अंग, अवयव देवास वाहाणे, किंवा कडेलोट करुन घ्यावासा वाटणे, तो तमोगुण होय.
निग्रह करुन धरणें । कां तें टांगून घेणें ।
देवद्वारीं जीव देणें । तो तमोगुण ॥ ३२ ॥
३२) धरणे धरुन देवद्वारी बसणे, किंवा देह टांगणे, देवाच्या द्वारी जीव देणे, तो तमोगुण होय.
निराहार उपोषण । पंचाग्नी धूम्रपान ।
आपणास घ्यावें पुरुन । तो तमोगुण ॥ ३३ ॥
३३) कांहीही न खाता उपवास करणे, आपल्या चहुकडे अग्नि पेटवून व वर सूर्य असे पंचाग्नि साधन करणे, स्वतःस उलटे टांगुन घेऊन खाली अग्नि पेटवून तो धूर घेणे म्हणजे धूम्रपान करणे, स्वतःला पुरुन घेणे, तमोगुण होय.
सकाम जें कां अनुष्ठान । कां तें वायोनिरोधन ।
अथवा राहावें पडोन । तो तमोगुण ॥ ३४ ॥
३४) मनांतील काहींतरी इच्छा पुरी करुन घेण्यासाठी अनुष्ठान करणे, किंवा वायू निरोधन करुन बसणे, किंवा नुसतेच पडून रहाणे, तो तमोगुण होय.
नखें केश वाढवावे । हस्तचि वर्ते करावे ।
अथवा वाग्सुंन्य व्हावें । तो तमोगुण ॥ ३५ ॥
३५) नखें, केस वाढवावे, हात वर करुन बसावे, किंवा न बोलताच बसावे, तो तमोगुण होय.
नाना निग्रहें पिडावें । देहदुःखें चर्फडावें ।
क्रोधें देवास फोडावें । तो तमोगुण ॥ ३६ ॥
३६) नानाप्रकारे देहास पीडावे, देहाला दुःख झाल्यावर चर्फडावे, संतापाने देवास फोडून टाकावे, तो तमोगुण होय.
देवाची जो निंदा करी । तो आशाबद्धि अघोरी ।
जो संतसंग न धरी । तो तमोगुण ॥ ३७ ॥
३७) देवाची निंदा जोकरतो, वासनाबद्ध महाभयंकर माणूस, जो संतसंग धरत नाही, तो तमोगुण होय.
ऐसा हा तमोगुण । सांगतां तो असाधारण ।
परी त्यागार्थ निरुपण । कांहीं येक ॥ ३८ ॥
३८) असा हा तमोगुण आहे. तो विलक्षण आहे. हा सोडून द्यावा म्हणुन थोडे निरुपण केले.
ऐसें वर्ते तो तमोगुण । परी हा पतनास कारण ।
मोक्षप्राप्तीचें लक्षण । नव्हे येणें ॥ ३९ ॥
३९) वर्तुणुकींत तमोगुण कसा दिसतो, आढळतो, ते सांगितले. हा तमोगुण माणसाच्या अधोगतीस कारण होतो. मोक्ष मिळवून देण्याची याची योग्यता नाही.
केल्या कर्माचे फळ । प्राप्त होईल सकळ ।
जन्म दुःखाचें मूळ । तुटेना कीं ॥ ४० ॥
४०) जी कर्मे माणुस करतो, त्याचे बरे-वाईट फळ मिळतेच. परंतु जन्माला येण्याचे दुःख मूळापासुन तुटत नाही. (रज व तम गुण त्या कामाचे नाहीत.)
व्हावया जन्माचें खंडण । पाहिजे तो सत्वगुण ।
तेंचि असे निरुपण । पुढिले समासीं ॥ ४१ ॥
४१) जन्म-मरणाचे खंडन कायमचे होण्यासाठीं सत्वगुण हवा. त्याचे निरुपण पुढील्या समासी केले आहे.
॥ इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे तमोगुणनाम समास सहावा ॥
Samas Sahava Tamogun Lakshan
समास सहावा तमोगुण लक्षण
Custom Search
No comments:
Post a Comment