Friday, December 30, 2016

Samas Pachava Rajogun Lakshan समास पाचवा रजोगुण लक्षण


Dashak Dusara Samas Pachava Rajogun Lakshan 
Samas Pachava Rajogun Lakshan is in Marathi. Samarth Ramdas is telling us qualities of Rajogun. We all are having these qualities more or less in our nature and behaviour. We give importance to our body, name and live in the world of haves, wants and desires. These are because we have Rajogun in our nature. The Rajogun dominates our life and we rarely think beyond our material life.
समास पाचवा रजोगुण लक्षण
श्रीराम ॥
मुळीं देह त्रिगुणाचा । सत्वरजतमाचा ।
त्यामध्यें सत्वाचा । उत्तमगुण ॥ १ ॥
अर्थ 
१) आपला देह मुळांत सत्व, रज व तम या तीन गुणांचा बनला आहे,  त्यांत सत्व गुण हा उत्तम आहे.
सत्वगुणें भगवद्भक्ती । रजोगुणें पुनरावृत्ती ।
तमोगुणें अधोगती । पावती प्राणी ॥ २ ॥    
श्र्लोक 
ऊर्ध्वं गच्छन्ति सत्त्वस्था मध्ये तिष्ठन्ति राजसः ।
जघन्यगुणवृत्तिस्था अधो गच्छन्ति तामसाः ॥
श्र्लोकाचा अर्थ
सत्वप्रधान माणसे वरच्या गतीस जातात. रजोगुणप्रधान माणसे मध्येंच राहतात. तर 
तमोगुण प्रधान माणसे खाली-अधोगतीस जातात.  
२) सत्वगुणाने भगवंताची भक्ती होते. रजोगुण अंगी जास्त असेल तर पुनरपी जननं पुनरपी मरणं आणि तमोगुण अधिक असेल तर मनुष्यमात्रांची अधोगतीच होते.  
त्यांतहि शुद्ध आणी सबळ । तेहि बोलिजेति सकळ ।
शुद्ध तेंचि जें निर्मळ । सबळ बाधक जाणावें ॥ ३ ॥
३) गुणांमध्ये शुद्ध व शबल असा भेद आहे. तो सगळा सांगणारच आहे. जे जे निर्मळ ते ते शुद्ध असते. जे जे मिश्रित असते ते ते शबल म्हणतात. 
शुद्धसबळाचें लक्षण । सावध परिसा विचक्षण ।
शुद्ध तो परमार्थी जाण । सबळ तो सांसारिक ॥ ४ ॥
४) शुद्ध व शबल यांची लक्षणे विचारवंतानी सावधपणें ऐकावित. शुद्ध हा परमार्थी तर शबळ हा संसारिक असतो. 
तया संसारिकांची स्थिती । देहीं त्रिगुण वर्तती ।  
येक येतां दोनी जाती । निघोनियां ॥ ५ ॥
५) प्रापंचिक मनुष्याजवळ तीनही गुण असले तरी एक गुण प्रबळ झाला म्हणजे बाकी दोन मागे पडतात.
रज तम आणि सत्व । येणेंचि चाले जीवित्व ।
रजोगुणाचें कर्तुत्व । दाखऊं आतां ॥ ६ ॥    
६) माणसाचे जीवन सत्व, रज व तम या तीन गुणांवरच चालते. आता आपण रजोगुणाचे काम मानवी जीवनांत कसें चालते, ते बघू.  
रजोगुण येतां शरीरीं । वर्तणुक कैसी करी । 
सावध होऊनी चतुरीं । परिसावें ॥ ७ ॥
७) माणसाच्या शरीरांत रजोगुण प्रबल झाला की तो कसा वागतो, त्याची वर्तणुक कशी होते ? ते आता शहाण्यांनी लक्षपूर्वक ऐकावे.
माझें  घर माझा संसार । देव कैंचा आणिला थोर ।
ऐसा करी जो निर्धार । तो रजोगुण ॥ ८ ॥
८) हे घर माझे, हा संसार माझा मग येथे देव कोठून आला. असा ज्याचा विचार असतो, त्या ठिकाणी त्याच्याजवळ रजोगुण प्रबळ झालेला असतो.  
माता पिता आणि कांता । पुत्र सुना आणि दुहिता । 
इतुकियांची वाहे चिंता । तो रजोगुण ॥ ९ ॥
९) आपल्या कुटुंबांतील लोकांचीच म्हणजे आई, वडिल, पत्नी, मुल-मुली व सुना यांचीच जो काळजी घेतो तो रजोगुणी समजावा. 
बरें खावें बरें जेवावें । बरें ल्यावें बरें नेसावें ।
दुसर्‍याचें अभिळाषावें । तो रजोगुण ॥ १० ॥
१०) आपण (व आपल्या कुटुंबांतील लोकांनी) चांगले खावे, चांगले प्यावे, चांगले अंगावर घ्यावे, चांगले नेसावे आणि दुसर्‍याच्या वस्तू आपल्याला कशा मिळतील असा विचार करावा तो रजोगुणी समजावा.     कैंचा धर्म कैंचे दान । कैंचा जप कैंचे ध्यान ।
विचारीना पापपुण्य । तो रजोगुण ॥ ११ ॥
११) धर्म कसला व दान कसले ; जप व ध्यान कसले तसेच ज्याच्याजवळ पाप-पुण्याचाही विचार नाही, तो रजोगुणी ओळखावा.
नेणे तीर्थ नेणे व्रत । नेणे अतीत अभ्यागत ।
अनाचारीं मनोगत । तो रजोगुण ॥ १२ ॥ 
१२) तीर्थ यात्रा करणे नाही, व्रत करणे नाही. अतिथि किंवा अभ्यागताबद्दल आदर नाही. मनाची ओढ अनाचाराकडे, असा तो रजोगुण समजावा.  
धनधान्याचें संचित । मन होये द्रव्यासक्त ।
अत्यंत कृपण जीवित्व । तो रजोगुण ॥ १३ ॥ 
१३) धन-धान्याची सांठवणूक करणे, मन अत्यंत द्रव्यासक्त आणि अत्यंत कंजुषीचे वर्तन असा तो रजोगुणी ओळखावा.
मी तरुण मी सुंदर । मी बलाढ्य मी चतुर ।
मी सकळांमध्यें थोर । म्हणे तो रजोगुण ॥ १४ ॥ 
१४) मी तरुण, मी सुंदर, मी बलिष्ठ, मी चतुर, मी सगळ्यामध्ये थोर असे जो म्हणतो तो रजोगुणी म्हणुन ओळखावा.
माझा देश माझा गांव । माझा वाडा माझा ठाव ।
ऐसी मनीं धरी हांव । तो रजोगुण ॥ १५ ॥ 
१५) माझा देश, माझा गांव, माझा वाडा, माझे राहण्याचे ठिकाण ऐवढ्याचाच अभिमान याशिवाय बाकी कशालाच ओळखत नाही. तो रजोगुणी म्हणुन ओळखावा. 
दुसर्‍याचें सर्व जावें । माझेंचि बरें असावें । 
ऐसें आठवे स्वभावें । तो रजोगुण ॥ १६ ॥ 
दुसर्‍याचे सर्व जावे माझे मात्र चांगलेच असावे. असा विचार जो करतो, तो रजोगुणी म्हणुन ओळखावा.  
कपट आणि मत्सर । उठे देहीं तिरस्कार ।
अथवा कामाचा विकार । तो रजोगुण ॥ १७ ॥ 
१७) मनांत कपट, मत्सरी विचार देहामध्यें कामुकता आणि दुसर्‍याचा तिरस्कार किंवा त्याच्याबद्दल तुच्छतेची भावना ज्याचे अंगी तो रजोगुणी म्हणुन ओळखावा.    
बाळकावरी ममता । प्रीतीनें आवडे कांता ।
लोभ वाटे समस्तां । तो रजोगुण ॥ १८ ॥ 
१८) ज्याला मुलांबद्दल ममता असते, बायकोबद्दल प्रेम असते, सर्वांवर (कुटुंबियांवर) ज्याचा लोभ असतो. तो रजोगुणी म्हणुन ओळखावा.  
जिवलगांची खंती । जेणे काळें वाटे चित्तीं ।
तेणें काळें सीघ्रगती । रजोगुण आला ॥ १९ ॥
१९) आपल्या नातेवाईकांबद्दल काळजी वाटते व दुःख होते. तेव्हां रजोगुण त्याच्या ठिकाणी प्रबळ झालेला असतो, तो रजोगुणी म्हणुन ओळखावा.     
संसाराचे बहुत कष्ट । कैसा होईल सेवट ।
मनास आठवे संकट । तो रजोगुण ॥ २० ॥ 
२०) संसार करण्यांत, सांभाळण्यांत बरेच कष्ट आहेत. तो शेवटपर्यंत कसा निभावून नेऊ या विचारांनी मनांत चिंतारुपी संकट ओढवते. तो रजोगुणी म्हणुन ओळखावा.  
कां मागें जें जें भोगिलें । तें तें मनीं आठवलें ।
दुःख अत्यंत वाटलें । तो रजोगुण ॥ २१ ॥ 
२१) आपल्या मागील काळांत जे चांगले सुखाचे भोग भोगले ते आठवून आता ते नाहीत म्हणून दुःख होऊ लागले की तो रजोगुणी म्हणुन ओळखावा. 
वैभव देखोन दृष्टी । आवडी उपजली पोटीं ।
आशागुणें हिंपुटी । करी तो रजोगुण ॥ २२ ॥
२२) वैभव बघितले आणि ते दुसर्‍याचे असले तरी आवडले आणि ते आपले व्हावे अशी इच्छा निर्माण झाली व ते मिळत नाही म्हणुन दुःखी होतो, तो रजोगुणी होय. 
जें जें दृष्टी पडिलें । तें तें मनें मागितलें ।
लभ्य नस्तां दुःख जालें । तो रजोगुण ॥ २३ ॥
२३) जें दिसले तें तें आपले व्हावे असे मनांत वाटले. परंतु ते लभ्य होणार नाही, म्हणून दुःखी होतो तो रजोगुणी ओळखावा.  
विनोदार्थी भरे मन । श्रृंघारिक करी गायेन ।
राग रंग तान मान । तो रजोगुण ॥ २४ ॥
२४) जो विनोदीवृत्तीने भरलेला असतो व ती व्यक्त करतो. जो शृगांरिक गाणी गातो. राग, रंग, ताना आणि हावभाव यांनी गायनां रंगून जातो. तो रजोगुणी समजावा.
टवाळी ढवाळी निंदा । सांगणें घडे वेवादा ।
हास्य विनोद करी सर्वदा । तो रजोगुण ॥ २५ ॥
२५) जो सदा दुसर्‍याची टवाळी, निंदा, चेष्टा करतो. बोलण्याने वादंग व वादविवाद निर्माण करतो. नेहमी हास्यविनोदांत मग्न असतो. तो रजोगुणी असतो.   
आळस उठे प्रबळ । कर्मणुकेचा नाना खेळ ।
कां उपभोगाचे गोंधळ । तो रजोगुण ॥ २६ ॥
२६) जो अतिशय आळशी असतो. नाना करमणुकीच्या खेळांत दंग असतो. व्यसनाधीनतेने गोंधळ घालतो. तो रजोगुणी समजावा. 
कळावंत बहुरुपी । नटावलोकी साक्षपी ।
नाना खेळी दान अर्पी । तो रजोगुण ॥ २७ ॥
२७) जो कलावंत असतो. निरनिराळी सोंगे वठवितो. नाटके करणे व पाहाणे याचा शौकीन असतो. नाना प्रकारच्या जुगारांत पैसा घालवितो. तो रजोगुणी समजावा.
उन्मत्त द्रव्यावरी अति प्रीती । ग्रामज्य आठवे चित्तीं ।
आवडे नीचाची संगती । तो रजोगुण ॥ २८ ॥
२८) जोअमली पदार्थांचा व्यसनी असतो. गांवगुंडगीरीचे सारखे चिंतन आणि ज्याला नीच माणसांची संगत आवडते. तो रजोगुणी ओळखावा. 
तश्करविद्या जीवीं उठे । परन्यून बोलावें वाटे ।
नित्य नेमास मन विटे । तो रजोगुण ॥ २९ ॥
२९) चौरविद्या शिकावी असे वाटते. दुसर्‍याचे दोष, कमीपण उघड करावेसे वाटते. नित्य नेमाने कांही चांगले करण्याचा कंटाळा येतो. तो रजोगुणी म्हणुन समजावा.   
देवकारणीं लाजाळु । उदरालागीं कष्टाळु । 
प्रपंची जो स्नेहाळु । तो रजोगुण ॥ ३० ॥
३०) देवादिकाचे काम करण्याचा कंटाळा असतो. परंतु पोटपूजेसाठी कष्ट करतो. संसारांत, प्रपंचात सदा गुंतलेला असतो, तो रजोगुणी जाणावा.
गोडग्रासी आळकेपण । अत्यादरें पिंडपोषण ।
रजोगुणें उपोषण । केलें न वचे ॥ ३१ ॥
३१) गोड खाण्याची अतिआवड असते. शरिराचे पोषण मोठ्या प्रेमाने करतो. रजोगुणी असल्याने कोठचेही उपवास करु शकत नाही. असा तो रजोगुणी ओळखावा.   
श्रृंगारिक तें आवडे । भक्ति वैराग्य नावडे ।
कळालाघवी पवाडे । तो रजोगुण ॥ ३२ ॥
३२) स्वाभाविकपणें शृंगारिक विषयांची आवड/ओढा असतो. भक्ति, वैराग्य हे आवडत नाही. कलेचे/कलावंतांचे मोठ्या आवडीने कौतुक करतो, तो रजोगुणी असतो.
नेणोनियां परमात्मा । सकळ पदार्थीं प्रेमा ।
बळात्कारें घाली जन्मा । तो रजोगुण ॥ ३३ ॥
३३) परमात्मा जाणत नाही. त्यावर प्रेम नसते. सर्व दृष्य वस्तुंवर मात्र प्रेम असते. परत जन्म नको वाटत असले तरी त्याच्याच बळजबरीने तो घ्यावा लागतो. तो रजोगुण ओळखावा.     
असो ऐसा रजोगुण । लोभें दावी जन्ममरण ।
प्रपंची तो सबळ जाण । दारुण दुःख भोगवी ॥ ३४ ॥
३४) तर रजोगुण हा असा आहे. मन आसक्तींत ठेवतो. परिणामी जन्ममरण भोगावयास लावतो. प्रपंचतांत बलवान असल्याने फार दुःख भोगावयास लावतो. 
आतां रजोगुण हा सुटेना । सांसारिक हें तुटेना ।
प्रपंची गुंतली वासना । यास उपाय कोण ॥ ३५ ॥
आतां हा रजोगुण कांही सुटत नाही. प्रपंचांतुन सुटका नाही. संसारसुखाचा मोह, वासना सुटत नाही. मग याला उपाय काय (जेणें करुन भगवंताच्या भक्तींत मन गुंतेल.)   
उपाये येक भगवद्भक्ती । जरी ठाकेना विरक्ती ।
तरी येथानुशक्ती । भजन करावें ॥ ३६ ॥
३६) याला उपाय भगवत्भक्ती करणे. प्रपंचांतुन विरक्ती साधत नसेल तरीही आपल्या शक्तीनुसार भजन करावे.
काया वाचा आणि मनें । पत्रें पुष्पें फळें जीवनें ।
ईश्र्वरीं अर्पूनियां मनें । सार्थक करावें ॥ ३७ ॥
३७) काया, वाचा आणि मनाने ; पान, फुल, पाणी, फळें ही भगवंताला अर्पण करुन त्याची अर्चना, पूजा करावी. व सार्थक करावे. 
येथानुशक्ती दानपुण्य । परी भगवंतीं अनन्य ।
सुखदुःखें परी चिंतन । देवाचेंचि करावें ॥ ३८ ॥
३८) आपल्या शक्तीनुसार दान, धर्म, पुण्य करुन ते गाठीस जोडावे. भगवंताशी अनन्य बुद्धिने राहून सांसारिक सुख-दुःखांत त्याचेच चिंतन करावे.   
आदिअंती येक देव । मध्येंचि लाविली माव ।
म्हणोनियां पूर्ण भाव । भगवंती असावा ॥ ३९ ॥
३९) या विश्र्वाच्या आधी व नंतर तो एकच भगवंत आहे. मध्येच माया भुरळ पाडते. म्हणून भगवंतावर पू्र्ण भाव ठेवावा. 
ऐसा सबळ रजोगुण । संक्षेपें केलें कथन ।
आतां शुद्ध तो तूं जाण । परमार्थिक ॥ ४० ॥
४०) असा हा सबळ असलेला रजोगुण संक्षेपाने सांगितला. आता शुद्ध पारमार्थिक नेणारा तो रजोगुण जाणून घे. 
त्याचे वोळखीचें चिन्ह । सत्वगुणीं असे जाण ।
तो रजोगुण परिपूर्ण । भजनमूळ ॥ ४१ ॥
४१) त्या शुद्ध रजोगुणाला ओळखण्याची खुण म्हणजे ती सत्वगुणांत सापडते. तोच संपूर्ण भगद्भक्तीचे मूळ आहे. 
ऐसा रजोगुण बोलिला । श्रोतीं मनें अनुमानिला ।
आतां पुढें परिसिला । पाहिजे तमोगुण ॥ ४२ ॥
४२) असा हा रजोगुण सांगितला. तो श्रोत्यांनी जाणून घेतला. आतां पुढे तमोगुण सांगितला पाहीजे.  

॥ इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे रजोगुणलक्षणनाम समास पांचवा ॥
Samas Pachava Rajogun Lakshan
समास पाचवा रजोगुण लक्षण



Custom Search

No comments: