Thursday, December 22, 2016

Samas Pahila Moorkha Lakshan समास पहिला मूर्खलक्षण


Dashak Dusara Samas Pahila Moorkha Lakshan 
Samas Pahila Moorkha Lakshan is in Marathi. In this Samas Samarth Ramdas is telling us what the bad qualities in a person identify him as a (Silly) person. It should be remembered that Dasbodh is written for a common man who deserves to make a progress on spiritual path from his attachments to detachments, so that he can attain Moksha, Mukti. The bad qualities or the silly qualities are told here for leaving them and to proceed on the path of spirituality.
समास पहिला मूर्खलक्षण
श्रीराम ॥
ॐ नमोजि गजानना । येकदंता त्रिनयना ।
कृपादृष्टी भक्तजना । अवलोकावें ॥ १ ॥
अर्थ   
१) एक दांत व तीन डोळे आहेत अश्या ॐकाररुप गजाननाला मी नमस्कार करतो आणि प्रार्थना करतो की, आपल्या या भक्ताकडे कृपादृष्टीने पाहावे.
तुज नमूं वेदमाते । श्रीशारदे ब्रह्मसुते ।
अंतरीं वसे कृपावंते । स्फूर्तिरुपें ॥ २ ॥
२) ब्रह्मदेवाची कन्या व वेदांची माता अश्या शारदेला नमन करुन तीने स्फूर्तिरुपाने माझ्या अंतरी विराजमान होण्याची माझ्यावर कृपा करावी.
वंदून सद्गुरुचरण । करुन रघुनाथस्मरण ।
त्यागार्थ मूर्खलक्षण बोलिजेल ॥ ३ ॥
३) आता माझ्या सद्गुरुंच्या चरणांना वंदन करुन माझे स्वामी रघुनातहांचेही स्मरण करतो व मूर्खांची लक्षणें सांगतो. त्यांचा (सूज्ञाने) त्याग करावा.
येक मूर्ख येक पढत मूर्ख । उभय लक्षणीं कौतुक ।
श्रोती सादर विवेक । केला पाहिंजे ॥ ४ ॥
४) मूर्खांचे दोन प्रकार आहेत. एक मूर्ख व दुसरा पढत मूर्ख त्यांची लक्षणें ऐकून श्रोत्यांना कौतुक वाटेल. त्यांचा (लक्षणांचा त्यागार्थ) विचार करावा.
पढतमूर्खाचें लक्षण । पुढिले समासीं निरुपण । 
सावध होऊनि विचक्षण । परिसोत पुढें ॥ ५ ॥    
५) पढत मूर्खाची लक्षणे पुढिल्या अध्यायी (दहाव्या समासांत) सांगितली आहेत. शहाण्या श्रोत्यांनी ती लक्ष देऊन ऐकावीत.
आतां प्रस्तुत विचार । लक्षणें सांगतां अपार ।
परी कांहीयेक तत्पर । होऊन ऐका ॥ ६ ॥
६) आता मूर्ख लक्षणें जी पुष्कळ आहेत त्यापैकी काहीं सांगतो. ती तत्परतेने ऐकावीत.
जे प्रपंचिक जन । जयांस नाहीं आत्मज्ञान ।
जे केवळ अज्ञान त्यांचीं लक्षणें ॥ ७ ॥
७) आत्मज्ञान नसलेले व म्हणून अज्ञानी आणि प्रपंचांतच अडकलेले त्यांची लक्षणें सांगतो.
जन्मला जयांचें उदरीं । तयांसी जो विरोध करी ।
सखी मानिली अंतुरी । तो येक मूर्ख ॥ ८ ॥  
८) आपल्या आई-वडिलांस न मानणारा, त्यांचे न ऐकणारा व केवळ पत्नी हीच सखी असे मानणारा तो एक मूर्ख आहे.
सांडून सर्वहि गोत । स्त्रीआधेन जीवित । 
सांगे अंतरींची मात । तो येक मूर्ख ॥ ९ ॥  
९) आपल्या नातेवाईकांना दूर ठेवून बायकोजवळच अंतरीचे बोलणारा असा बाईलबुद्ध्या तो एक मूर्ख आहे.
परस्त्रीसीं प्रेमा धरी । श्र्वशुरगृहीं वास करी ।
कुळेंविण कन्या वरी । तो येक मूर्ख ॥ १० ॥  
१०) परस्त्रीवर प्रेम करणारा, सासुरवाडीस राहणारा व एखाद्या मुलीशी कुलाशीलाचा विचार न करता लग्न करणारा असा तो एक मूर्ख असतो.
समर्थावरी अहंता । अंतरीं मानी समता ।
सामर्थेंविण करी सत्ता । तो येक मूर्ख ॥ ११ ॥  
११) ज्येष्ठ व श्रेष्ठ लोकांशी अहंकाराने ते व आपण बरोबरीचेच आहोत असे मानून अधिकार नसता सत्ता गाजवितो. तो एक मूर्ख असतो.
आपली आपण करी स्तुती । स्वदेशीं भोगी विपत्ति ।
सांगे वडिलांची कीर्ती । तो येक मूर्ख ॥ १२ ॥  
१२) आपली आपणच स्तुती करतो. स्वदेशी विपत्तींत असतो. वडिलांची कीर्ती ऐकवून खोटा मोठेपणाचा आव आणतो. तो एक मूर्ख असतो.
अकारण हास्य करी । विवेक सांगतां न धरी ।
जो बहुतांचा वैरी । तो येक मूर्ख ॥ १३ ॥  
१३) कारण नसतां हसतो. योग्य विचार, सल्ला ऐकत नाही. पुष्कळ लोकांशी वैर धरतो. तो एक मूर्ख असतो. 
आपुलीं धरुनियां दुरी । पराव्यासीं करी मीत्री ।
परन्यून बोले रात्रीं । तो येक मूर्ख ॥ १४ ॥  
१४) आपल्या (नातेवाईकांशी) दुरावा व परकीयांशी घरोबा व दुसर्‍याचे उणे बोलतो. असा तो एक मूर्ख असतो.
बहुत जागते जन । तयांमध्यें करी शयन ।
परस्थळीं बहु भोजन । करी तो येक मूर्ख ॥ १५ ॥ 
१५) पुष्कळजण जागत असतांना हा मध्येच पसरतो (झोपतो). दुसर्‍या ठिकाणी फार जेवतो. तो एक मूर्ख असतो.
मान अथवा अपमान । स्वयें करी परिछिन्न ।
सप्त वेसनी जयाचें मन । तो येक मूर्ख ॥ १६ ॥  
१६) मान किंवा अपमान आपला आपण उघड करतो. सात प्रकारच्या व्यसनाधीन मनाचा असतो. तो एक मूर्ख असतो. 
धरुन परावी आस । प्रेत्न सांडी सावकास ।
निसुगाईचा संतोष । मानी तो येक मूर्ख ॥ १७ ॥ 
१७) आळशी, कामांत प्रयत्न करण्याची दिरंगाई करतो. काही न करण्यात आनंद मानणारा असतो. तो एक मूर्ख असतो.
घरीं विवेक उमजे । आणी सभेमध्यें लाजे । 
शब्द बोलतां निर्बुजे । तो येक मूर्ख ॥ १८ ॥ 
१८) घरांमध्ये शहाणपणाने विचाराने बोलणारा (शहाण्यांच्या) सभेंत मात्र बुजणारा व तोंडून शब्द फुटत नाही असा असतो. तो एक मूर्ख असतो. 
आपणाहून जो श्रेष्ठ । तयासीं अत्यंत निकट ।
सिकवणेचा मानी वीट । तो येक मूर्ख ॥ १९ ॥ 
१९) आपल्यापेक्षा श्रेष्ठ असणाराशी जवळीक करतो. कोणी काहीं हिताचे सांगू लागला तर कंटाळा करतो. तो एक मूर्ख असतो.
नायेके त्यांसी सिकवी । वडिलांसीं जाणीव दावी ।
जो आरजास गोवी । तो येक मूर्ख ॥ २० ॥ 
२०) जे ऐकत नाहीत त्यांना शिकवायला जातो. मोठ्या माणसांपुढे शहाणपणा मिरवतो. चांगल्याला भानगडींत अडकवतो. तो एक मूर्ख असतो. 
येकायेकीं येकसरा । जाला विषंई निलाजिरा ।
मर्यादा सांडून सैरा । वर्ते तो येक मूर्ख ॥ २१ ॥ 
२१) विषयवासना भोगापायीं मर्यादा सोडून निलाजरा होतो आणि उद्दामपणे वागतो. तो एक मूर्ख असतो.
औषध ने घे असोन वेथा । पथ्य न करी सर्वथा ।
न मिळे आलिया पदार्था । तो येक मूर्ख ॥ २२ ॥ 
२२) व्याधी, व्यथेने पिडित असूनही औषध घेत नाही. पथ्य पाळीत नाही. वाट्यास जे आले ते स्वीकारत नाही. तो एक मूर्ख असतो. 
संगेंविण विदेश करी । वोळखीविण संग धरी ।
उडी घाली माहापुरीं । तो येक मूर्ख ॥ २३ ॥ 
२३) सोबत कोणाची नसता विदेशी जातो. ओळख-पाळख नसतां मैत्री करतो. महापुरांत उडी मारतो. तो एक मूर्ख असतो. 
आपणास जेथें मान । तेथें अखंड करी गमन ।
रक्षूं नेणे मानाभिमान । तो येक मूर्ख ॥ २४ ॥ 
२४) जेथे लोक मान देतात तेथे वारंवार जातो. स्वतःचा मान व योग्य गोष्टीचा अभिमान धरत नाही. तो एक मूर्ख असतो.
सेवक जाला लक्ष्मीवंत । तयाचा होय अंकित ।
सर्वकाळ जो दुश्र्चित्त । तो येक मूर्ख ॥ २५ ॥   
२५) आपला नोकर श्रीमंत झाला तर त्याचा गुलाम होतो. ज्याचे चित्त नेहमी अस्थिर असते. तो एक मूर्ख असतो.
विचार न करितां कारण । दंड करी अपराधेंविण ।
स्वल्पासाठीं जो कृपण । तो येक मूर्ख ॥ २६ ॥ 
२६) एखाद्याचा काहीं अपराध नसतांना सारासार विचार न करता त्यास शिक्षा करतो. थोड्या त्यागासाठी (खर्चासाठी) कंजूषपणा करतो. तो एक मूर्ख असतो.
देवलंड पितृलंड । शक्तिवीण करी तोड ।
ज्याचे मुखीं भंडउभंड । तो येक मूर्ख ॥ २७ ॥   
२७) देवाची वा वडिलधार्‍यांची तमा बाळगत नाही. बळहीन, शक्तिहीन, ज्ञानहीन असूनही तोंडाळपणा करतो. वाटेल तसे बरळत असतो. तो एक मूर्ख असतो.
घरीच्यावरी खाय दाढा । बाहेरी दीन बापुडा ।
ऐसा जो कां वेड मूढा । तो येक मूर्ख ॥ २८ ॥ 
२८) घरांतील माणसांवर दांत-ओठ काढतो, बाहेरच्याशीं मात्र बापुडवाणेपणाने वागतो. असा अज्ञानी व वेडा एक मूर्ख असतो.
नीच यातीसीं सांगात । परांगनेसीं येकांत ।
मार्गें जाय खात खात । तो येक मूर्ख ॥ २९ ॥  
२९) नीच, हलक्या लोकांशी संगत करतो. दुसर्‍याच्या बायकोशी रत होतो. रस्त्याने खातखात जातो. तो एक मूर्ख असतो.
स्वयें नेणे परोपकार । उपकाराचा अनोपकार ।
करी थोडें बोले फार । तो येक मूर्ख ॥ ३० ॥ 
३०) आपण कोणावरही उपकार करत नाही. दुसर्‍याने आपल्यावर केलेल्या उपकाराची फेड अपकाराने करतो. काम कमी करतो पण अफाट बोलतो. तो एक मूर्ख असतो.
तपीळ खादाड आळसी । कुश्र्चीळ कुटीळ मानसीं ।
धारीष्ट नाहीं जयापासीं । तो येक मूर्ख ॥ ३१ ॥  
३१) तापट, खादाड, आळशी, वाईट वर्तुणुकीचा, कपटी मनाचा आणि धैर्यहीन असा तो एक मूर्ख असतो.
विद्या वैभव ना धन । पुरुषार्थ सामर्थ्य ना मान ।
कोरडाच वाहे अभिमान । तो येक मूर्ख ॥ ३२ ॥ 
३२) विद्या, ज्ञान, धन, पैसा, पुरुषार्थ, सामर्थ्य नसूनही अभिमान बाळगतो, तो एक मूर्ख असतो.
लंडी लटिका लाबाड ।  कुकर्मी कुटीळ निचाड ।
निद्रा जयाची वाड । तो येक मूर्ख ॥ ३३ ॥ 
३३) खोटा, दुराचारी, लबाड, उद्धट, वाईट कामे करणारा, वाईट बुद्धीचा व बेशरम असून फार झोपा काढतो,  तो एक मूर्ख असतो. 
उंचीं जाऊन वस्त्र नेसे । चौबारां बाहेरी बैसे ।
सर्वकाळ नग्न दिसे । तो येक मूर्ख ॥ ३४ ॥ 
३४) जो उंच जागी जाऊन कपडे घालतो. उकीरड्यावर परसाकडे बसतो. बहुतेक नेहमी नग्न किंवा कमी कपडे घालतो. तो एक मूर्ख असतो.
दंत चक्षु आणी घ्राण । पाणी वसन आणी चरण ।
सर्वकाळ जयाचे मळिण । तो येक मूर्ख ॥ ३५ ॥ 
३५) ज्याचे दांत, डोळे, नाक, हात-पाय व कपडे नेहमी ज्याचे मळलेले असतात. तो एक मूर्ख असतो. 
वैधृति आणी वितिपात । नानाकुमुहूर्तें जात ।
अपशकुनें करी घात । तो येक मूर्ख ॥ ३६ ॥ 
३६) वैधृति, व्यतिपात अशा वाईट मुहूर्तांवर प्रवास करतो. अपशकून करुन दुसर्‍याचा घात करतो. तो एक मूर्ख असतो.
क्रोधें अपमानें कुबुद्धि । आपणास आपण वधी ।
जयास नाहीं दृढ बुद्धि । तो येक मूर्ख ॥ ३७ ॥ 
३७) फार राग, अपमान सहन न होऊन स्वतःचा आत्मघात करतो. ज्याला स्थिर बुद्धी नसते, तो एक मूर्ख असतो.
जिवलगांस परम खेदी । सुखाचा शब्द तोहि नेदी ।
नीच जनास वंदी । तो येक मूर्ख ॥ ३८ ॥ 
३८) जिवलग लोकांना अति दुःख देतो. त्यांना सुखाचा शब्दही देत नाही. नीचांशी मात्र दबून वागतो, तो एक मूर्ख असतो.
आपणास राखे परोपरी । शरणागतांस अव्हेरी ।
लक्ष्मीचा भर्वसा धरी । तो येक मूर्ख ॥ ३९ ॥ 
३९) आपल्या स्वतःच्या सुखांत व ते राखण्यांत तत्पर, प्रयत्नशील असतो. कोणी आश्रयास आल्यास त्याला अव्हेरतो-दूर लोटतो. तो एक मूर्ख असतो.
पुत्र कलत्र आणि दारा । इतुकाचि मानुनियां थारा । 
विसरोन गेला ईश्र्वरा । तो येक मूर्ख ॥ ४० ॥ 
४०) मुलगा, कुटुंब व बायको येवढ्यांनाच ओळखतो व देवासही विसरुन जातो, तो एक मूर्ख असतो. 
जैसें जैसें करावें । तैसें तैसें पावावें ।
हे जयास नेणवे । तो येक मूर्ख ॥ ४१ ॥ 
४१) " जसे करावे तसे मिळते ", हे ज्याला कळत नाही, तो एक मूर्ख असतो.
पुरुषाचेनि अष्टगुणें । स्त्रियांस ईश्र्वरी देणें ।
ऐशा केल्या बहुत जेणें । तो येक मूर्ख ॥ ४२ ॥ 
४२) स्रियांची विषयवासना पुरुषांपेक्षा आठपट असते, अशा अनेक स्त्रियांशी लग्न करतो. तो एक मूर्ख असतो. 
दुर्जनाचेनि बोलें । मर्यादा सांडून चाले ।
दिवसा झांकिले डोळे । तो येक मूर्ख ॥ ४३ ॥ 
४३) दुर्जनाने सांगितल्याप्रमाणे मर्यादा सोडून वागतो व दिवसा डोळे झाकून म्हणजे ज्ञान असूनही अज्ञानी माणसासारखा (दुर्जनांच्या सांगण्यावरुन) वागतो, तो एक मूर्ख असतो. 
देवद्रोही गुरुद्रोही । मातृद्रोही पितृद्रोही ।
ब्रह्मद्रोही स्वामीद्रोही । तो येक मूर्ख ॥ ४४ ॥
४४) देव, गुरु, माता, पिता, ब्राह्मण व स्वामी यांचेशी विश्र्वासघाताने वागणारा, एक मूर्ख असतो.
परपीडेचें मानी सुख । परसंतोषाचें मानी दुःख । 
गेले वस्तूचा करी शोक । तो येक मूर्ख ॥ ४५ ॥ 
४५) दुसर्‍यास त्रास होत असेल तर याला आनंद व दुसर्‍यास सुख होत असेल तर याला दुःख होते, हरवलेल्या गोष्टींचे दुःख करतो. तो एक मूर्ख असतो.
आदरेंविण बोलणें । न पुसतां साक्ष देणें ।
निंद्य वस्तु आंगिकारणें । तो येक मूर्ख ॥ ४६ ॥ 
४६) कोणाचाही आदर न ठेवता बोलतो. कोणीही विचारल्याशिवाय साक्ष देतो. वाईट गोष्टी जवळ बाळगतो. तो एक मूर्ख असतो. 
तुक तोडून बोले । मार्ग सांडून चाले ।
कुकर्मी मित्र केले । तो येक मूर्ख ॥ ४७ ॥
४७) जो अनुमानावीना बोलतो, सरळ मार्गाने चालत नाही, वाईट कामे करणारांशी मैत्री करतो. तो एक मूर्ख असतो.
पत्य राखों नेणे कदा । विनोद करी सर्वदा ।
हासतां खिजे पेटे द्वंदा । तो येक मूर्ख ॥ ४८ ॥
४८) स्वतःची पत न राखू शकणारा, नेहमी थट्टामसकरींत दंग, कोणी हसला तर हातघाईवर येऊन चिडतो, तो एक मूर्ख असतो.
होड घाली अवघड । काजेंविण करी बडबड । 
बोलोंचि नेणे मुखजड । तो येक मूर्ख ॥ ४९ ॥
४९) अवघड पैज मारतो. कारणाशिवाय बडबड करतो. हवे असेल तेव्हां मात्र बोलत नाही. तो एक मूर्ख असतो. 
वस्त्र शास्त्र दोनी नसे । उंचे स्थळीं जाऊन बैसे ।
जो गोत्रजांस विस्वासे । तो येक मूर्ख ॥ ५० ॥
५०) चांगले वस्त्र व उत्तम विद्या नसताही उच्चासनावर जाऊन बसतो. नातेवाईकांवर विश्र्वास ठेवतो. तो एक मूर्ख असतो.
तश्करासी वोळखी सांगे । देखिली वस्तु तेची मागे ।
आपलें आन्हीत  करी रागें । तो येक मूर्ख ॥ ५१ ॥ 
५१) चोराला आपली सर्व माहीती देतो. व दिसलेली वस्तू मागतो. रागामुळें स्वतःचे नुकसान करुन घेतो, तो एक मूर्ख असतो.
हीन जनासीं बराबरी । बोल बोले सरोत्तरीं ।
वामहस्तें प्राशन करी । तो येक मूर्ख ॥ ५२ ॥ 
५२) हलक्या लोकांशी बरोबरीने वागतो, त्यांच्याशी वादंग घालतो. डाव्या हाताने पाणी पितो, तो एक मूर्ख असतो.
समर्थासीं मत्सर धरी । अलभ्य वस्तूचा हेवा करी ।
घरीचा घरीं करी चोरी । तो येक मूर्ख ॥ ५३ ॥
५३) श्रेष्ठ माणसांचा मत्सर करतो, स्वतःला प्राप्त न होऊ शकणार्‍या वस्तूसाठी हेवा करतो. स्वतःच्या घरांत चोरी करतो, तो एक मूर्ख असतो. 
सांडूनियां जगदीशा । मनुष्याचा मानी भर्वसा । 
सार्थकेंविण वेची वयसा । तो येक मूर्ख ॥ ५४ ॥
५४) परमेश्र्वराला सोडून माणसाचा भरंवसा धरतो, कांहीही सार्थक न करता आयुष्य फुकट घालवितो, तो एक मूर्ख असतो.
संसारदुःखाचेनि गुणें । देवास गाळी देणें ।
मैत्राचें बोले उणें । तो येक मूर्ख ॥ ५५ ॥
५५) संसारसागरांत भोगत असलेल्या दुःखासाठी देवास शिव्या देतो. मित्रांचे दोष चारचौघांत उघड करतो, तो एक मूर्ख असतो.
अल्प अन्याय क्ष्मा न करी । सर्वकाळ धारकीं धरी ।
जो विश्र्वासघात करी । तो येक मूर्ख ॥ ५६ ॥
५६) थोड्याही चुकीसाठी माफ न करता शिक्षा करुन, चुकणारास धारेवर धरतो, स्वतःमात्र विश्र्वासघात करतो, तो एक मूर्ख असतो.
समर्थाचे मनींचे तुटे । जयाचेनि सभा विटे ।
क्षणा बरा क्षणा पालटे । तो येक मूर्ख ॥ ५७ ॥
५७) ज्ञानी श्रेष्ठ लोकांच्या मनांतून उतरतो,  सभेमध्ये नकोसा होतो, चंचळ मनाचा असतो, तो एक मूर्ख असतो. 
बहुतां दिवसांचे सेवक । त्यागून ठेवी आणिक ।
ज्याची सभा निर्नायेक । तो येक मूर्ख ॥ ५८ ॥
५८) जुने विश्र्वासु सेवक सोडून नवीन सेवक ठेवतो, ज्याच्या सभेला सावरणाराच (अध्यक्ष) कोणी नसतो, तो एक मूर्ख असतो.
अनीतीनें द्रव्य जोडी । धर्म नीती न्याय सोडी ।
संगतीचें मनुष्य तोडी । तो येक मूर्ख ॥ ५९ ॥ 
५९) भ्रष्ट मार्गाने पैसा मिळवतो, धर्म, नीति, न्यायाने वागत नाही, बरोबर राहणार्‍या लोकांना तोडतो, तो एक मूर्ख असतो.
घरीं असोन सुंदरी । जो सदांचा परद्वारी ।
बहुतांचें उचिष्ट अंगीकारीं । तो येक मूर्ख ॥ ६० ॥ 
६०) घरी सुंदर स्त्री असूनही जो बाहेरख्यालीपणा करतो, पुष्कळ लोकांचे उष्टे खातो, तो एक मूर्ख असतो.
आपुलें अर्थ दुसर्‍यापासीं । आणी दुसर्‍याचें अभिळासी ।
पर्वत करी हीनासी । तो येक मूर्ख ॥ ६१ ॥ 
६१) आपला पैसा दुसर्‍यापाशी ठेवून दुसर्‍याच्या पैशाची इच्छा धरणारा, हलक्या लोकांशी पैशाचे व्यवहार करतो, तो एक मूर्ख असतो.
अतिताचा अंत पाहे । कुश्रामामधें राहे ।
सर्वकाळ चिंता वाहे । तो येक मूर्ख ॥ ६२ ॥
६२) आलेल्या पाहुण्यास मदत करत नाही, वाईट वस्तीच्या गावांत राहतो, नेहमी चिंताग्रस्त असतो, तो एक मूर्ख असतो.
दोघे बोलत असती जेथें । तिसरा जाऊन बैसे तेथें ।
डोई खाजवी दोहीं हातें । तो येक मूर्ख ॥ ६३ ॥
६३) दोघेजण काहीं बोलत असता न बोलाविता तेथे जाऊन बसतो, दोन्ही हातांनी डोके खाजवितो, तो एक मूर्ख असतो.
उदकांमधें सांडी गुरळी । पायें पायें कांडोळी ।
सेवा करी हीन कुळीं । तो येक मूर्ख ॥ ६४ ॥ 
६४) जलाशयांत चूळ टाकतो, पायाने पाय खाजवितो, नीच लोकांकडे नोकरी करतो, तो एक मूर्ख असतो.
स्त्री बाळका सलगी देणें । पिशाच्या सन्निध बैसणें । 
मर्यादेविण पाळी  सुणें । तो येक मूर्ख ॥ ६५ ॥
६५) बायको व मुलाशी बरोबरीने वागतो, भुताच्या जवळ बसतो, शिस्तीशिवाय कुत्रें पाळतो, तो एक मूर्ख असतो.
परस्त्रीसी कळह करी । सुकी वस्तु निघातें मारी । 
मूर्खाची संगती धरी । तो येक मूर्ख ॥ ६६ ॥ 
६६) जो परस्त्रीशी भांडण करतो, मुक्या प्राण्यांना शस्त्राने मारतो, मूर्खांच्या संगतींत राहतो, तो एक मूर्ख असतो.
कळह पाहात उभा राहे । तोडविना कौतुक पाहे ।
खरें अस्तां खोटें साहे । तो येक मूर्ख ॥ ६७ ॥
६७) कोणाचे भांडण पहात उभा राहतो, ते न सोडविता गंमत बघत उभा राहतो, खरे असेल ते सोडून खोटें सहन करतो, तो एक मूर्ख असतो.
लक्ष्मी आलियावरी । जो मागील वोळखी न धरी । 
देवीं ब्राह्मणीं सत्ता करी । तो येक मूर्ख ॥ ६८ ॥
६८) पैसा, संपत्ती आल्यावर ओळख दाखवत नाही, देवब्राह्मणांवर सत्ता गाजवितो, तो एक मूर्ख असतो.
आपलें काज होये तंवरी । बहुसाल नम्रता धरी ।
पुढिलांचें कार्य न करी । तो येक मूर्ख ॥ ६९ ॥ 
६९) आपले काम असेल तोवर नम्रतेने वागतो, दुसर्‍यांचे (त्याचेकडे असलेले) काम मात्र करीत नाही. तो एक मूर्ख असतो.
अक्षरें गाळून वाची । कां तें घाली पदरिचीं ।
नीघा न करी पुस्तकाची । तो येक मूर्ख ॥ ७० ॥  
७०) वाचन करीत असतांना कांही भाग सोडून देतो किंवा स्वतःची वाक्यें मधे घालतो, पुस्तकांची निगा राखत नाही, तो एक मूर्ख असतो.
आपण वाचीना कधीं । कोणास वाचावया नेदी ।
बांधोन ठेवी बंदीं । तो येक मूर्ख ॥ ७१ ॥  
७१) आपण कधी वाचत नाही व दुसर्‍यासही वाचावयास देत नाही, पुस्तके नुसती बांधुन ठेवतो, तो एक मूर्ख असतो.
ऐसीं हें मूर्खलक्षणें । श्रवणें चातुर्य बाणे ।
चित्त देउनियां शहाणे । ऐकती सदा ॥ ७२ ॥
७२) अशी ही मूर्खलक्षणें आहेत. ती ऐकून माणसे हुशार होतात. शहाणे लोक ती लक्ष देऊन नेहमी ऐकतात. (व त्यांचा त्याग करतात.)
लक्षणें अपार असती । परी कांहीं येक येथामती । 
त्यागार्थ बोलिलें श्रोतीं । क्ष्मा केलें पाहिजे ॥ ७३ ॥
७३) अशी ही मूर्खलक्षणें पुष्कळ आहेत. त्यांतील कांही माझ्या बुद्धीस सुचली ती लोकांनी त्यागावी म्हणून येथे सांगितली. त्याबद्दल लोकांनी क्षमा करावी.
उत्तम लक्षणें घ्यावीं । मूर्खलक्षणें त्यागावीं ।
पुढिले समासीं आघवीं । निरोपिलीं ॥ ७४ ॥
७४) आपण उत्तम लक्षणे घ्यावी, (त्यांचा अंगीकार करावा) व मूर्ख लक्षणे त्यागावीत. पुढील समसांत उत्तम लक्षणें सांगितली आहेत.        

इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे मूर्खलक्षणनाम समास पहिला ॥
Samas Pahila Moorkha Lakshan
समास पहिला मूर्खलक्षण


Custom Search

No comments: