Tuesday, December 6, 2016

Samas Tisara Sharada Stavan समास तिसरा शारदास्तवन


Dashak Pahila 
Samas Tisara Sharada Stavan 
Sharada Stavan is in Marathi. This is from Dasbodha, Dashak Pahila, Samas Tisara. Sharada is the Goddess of speech,talk,words, creator of rhythm, mother of Vedas, and daughter of God Brahma. She creates the words and tells us the meaning. She found everywhere and in every creation. Any writing, wording, talking and any creation is impossible without the blessings of Goddess Sharda. Samarath Ramdas bows to her praises and asks her to bless him.
समास तिसरा शारदास्तवन
 श्रीराम ॥
आतां वंदीन वेदमाता । श्रीशारदा ब्रह्मसुता ।
शब्दमूळ वाग्देवता । माहं माया ॥ १ ॥
अर्थ
१) शारदेचें मूळ स्वरुप: शारदा वेदांची माता, मुलगी ब्रह्मदेवांची, तीच्यापासून नाद उत्पन्न होतात, आणि महामाया अशी शारदा तीला मी नमस्कार करतो.
जे उठती शब्दांकुर । वदे वैखरी अपार ।
जे शब्दाचें अभ्यांतर । उकलून दावी ॥ २ ॥
२) तिच्यामुळें सूक्ष्मरुपांत शब्द निर्माण होतात. वैखरीनें अपार शब्द बोलले जातात. आणि तीच शब्दांचें अंतरंग म्हणजे अर्थ स्पष्ट करुन दाखविते. 
जे योगियांची समाधी । जे धारिष्टांची कृतबुद्धी ।
जे विद्या अविद्या उपाधी । तोडून टाकी ॥ ३ ॥
३) योग्यांच्या समाधीमधे व शूर पुरुषांच्या निर्भयतेंत ती आढळते. विद्या व अविद्या या दोन्ही उपाधी ती नाहीशा करते. 
जे माहापुरुषाची भार्या । अति सलग्न अवस्था तुर्या ।
जयेकरितां महत्कार्या । प्रवर्तले साधु ॥ ४ ॥
४) आदिपुरुष ईश्र्वराची ती भार्या आहे. ईश्र्वराशी अत्यंत नीकट असतां भक्तांच्या अनुभवास येणारी तुर्यावस्था ती हीच होय. तिच्याच जोरावर साधु पुरुष महान कार्य करण्यास प्रवृत्त होतात.
जे महंतांची शांती । जे ईश्र्वराची निज शक्ती । 
ते ज्ञानियांची विरक्ती । नैराशशोभा ॥ ५ ॥
५) थोर पुरुषांच्या शांतीमधे आणि ज्ञानी पुरुषांच्या विरक्तीमधे हीच शारदा प्रगट होते.
जे अनंत ब्रह्मांडे घडी । लीळाविनोदेचि मोडी ।
आपण आदिपुरुषीं दडी । मारुन राहे ॥ ६ ॥
६) शारदा अनंत विश्र्वे निर्माण करते व गंमतीने खेळत त्यांना मोडून टाकते. पण स्वतः मात्र ईश्र्वराच्या स्वरुपांत लीन राहून लपून बसते.
जे प्रत्यक्ष पाहातां आडळे । विचार घेतां तरी नाडळे ।
जयेचा पार न कळे । ब्रह्मादिकांसी ॥ ७ ॥
७) इंद्रियांनी पाहूं लागलो तर ती प्रत्यक्ष दिसते पण विचाराने शोध घेता आढळत नाही. म्हणून ब्रह्मादिकांना तीचा अंत लागत नाही. तिचें खरे स्वरुप आकलन होत नाही.
जे सर्व नाटकअंतर्कळा । जाणीव स्फूर्ति निर्मळा ।
जयेचेनि स्वानंदसोहळा । ज्ञानशक्ती ॥ ८ ॥
८) विश्र्वरुपीं नाटकांतील दृश्य घटकांना त्यांच्या अंतर्यामी राहून शारदा आपल्या शक्तीनें नाचविते. जाणिवेमधे निर्माण होणारी अत्यंत निर्मळ स्फूर्ति तीच आहे. ज्ञानामधे वास करणारे सामर्थ्य तिचेंच रुप असून तिच्या कृपेनेंच परमानंदाचा विलास भोगता येतो.
जे लावण्यस्वरुपाची शोभा । जे परब्रह्मसूर्याची प्रभा ।
जे शब्दीं वदोनि उभा । संसार नासी ॥ ९ ॥  
९) विश्वांतील सौंदर्याची ती सुंदर स्वामिनी शोभते, परब्रह्मरुप सूर्याशीं त्याच्या तेजाप्रमाणे ती अगदी एकरुप असते. दृश्य विश्र्वाचा हा पसारा शब्दांच्या साहाय्यानें ती नाहींसा करते.
जे मोक्षश्रिया माहांमंगळा । जे सत्रावी जीवनकळा ।
जे सत्वलीळा सुसीतळा । लावण्यखाणी ॥ १० ॥
१०) शारदा म्हणजे मोक्षाचे वैभव व मंगलांत मंगल अशी अमृतरुपी सतरावी जीवनकलाच होय. लावण्यखाणी शारदा जीवाला शांति देणारी सत्त्वगुणाची लीला आहे. 
जे अवेक्त पुरुषाची वेक्ती । विस्तारें वाढली इच्छाशक्ती ।
जे कळीकाळाची नियंती । सद्गुरुकृपा ॥ ११ ॥
११) अव्यक्त ईश्र्वराला ती व्यक्त बनविते. त्याच्या संकल्पाचा विस्तार करणारी इच्छाशक्ति तीच आहे. काळावर स्वामित्व गाजविणारी सद्गुरुकृपा ती हीच आहे.
जे परमार्थमार्गींचा विचार । निवडून दावी सारासार ।
भवसिंधूचा पैलपार । पाववी शब्दबळें ॥ १२ ॥
१२) परमार्थाचें साधन करणार्‍या साधकाला आत्मानात्म विवेकानें शारदा आत्मस्वरुपाची बरोबर कल्पना देते. शब्दांच्या श्रवण मननाने ती साधकाला दृश्य संसाराच्या पलीकडे घेऊन जाते.
ऐसी बहुवेषें नटली । माया शारदा येकली ।
सिद्धचि अंतरीं संचली । चतुर्विधा प्रकारें ॥ १३ ॥
१३) अशा रीतीने पुष्कळ रुपांनी नटणारी ही शारदा एकच माया आहे. ती स्वयंभू व पूर्ण आणि एकरुप असली तरी माणसाच्या अंतर्यामी चार प्रकारें सांचलेली आढळते. 
तींहीं वाचा अंतरीं आलें । तें वैखरिया प्रगट केलें ।
म्हणौन कर्तुत्व जितुकें जालें । तें शारदागुणें ॥ १४ ॥
१४) माणसाच्या अंतःकरणांत परा, पश्यंती व मध्यमा या तीन वाणींमध्ये जे स्फुरते तें प्रत्यक्ष शब्दांत प्रगट होते. शब्दांने सर्व व्यवहार चालतो. म्हणून जगांतील सगळें कर्तृत्व शारदेच्या शक्तीने चालते. 
जे ब्रह्मादिकांची जननी । हरीहर जयेपासुनी । 
सृष्टिरचना लोक तिनी । विस्तार जयेचा ॥ १५ ॥
१५) शारदा ब्रम्हादिकांची आई आहे. विष्णु, शिव तीच्या पोटी जन्मतात. तीन लोक असलेली ही अफाट विश्वरचना हा एक शारदेचाच विस्तार आहे. 
जे परमार्थाचे मूळ । नांतरी सद्विद्याचि केवळ ।
निवांत निर्मळ निश्र्चळ । स्वरुपस्थिती ॥ १६ ॥
१६) शारदा परमार्थाचे मूळ आहे. तसेच ती केवळ आत्मविद्या आहे. शारदा म्हणजे ईश्र्वराची निवांत, निर्मळ व निश्चळ अवस्था होय.
जे योगियांचे ध्यानीं । जे साधकांचे चिंतनीं ।
जे सिद्धांचे अंतःकर्णी । समाधिरुपें ॥ १७ ॥
१७) योगी लोकांना ध्यान लावण्यास मदत करणारी, साधकांना आत्मचिंतनाची कला देणारी आणि सिद्धांच्या अंतःकरणांत समाधिरुपाने स्थिर होणारी हीच आहे.
जे निर्गुणाची वोळखण । जे अनुभवाची खूण ।
जे व्यापकपणें संपूर्णं । सर्वाघटीं ॥ १८ ॥
१८) शारदेचे स्वरुप आकलन झाले कीं निर्गुणाची ओळख होते. मग स्वस्वरुपाचा अनुभव आला अशी खूण पटते. सर्व दृश्य आकारांत ती संपूर्ण भरुन राहिलेली आहे असा अनुभव येतो.
शास्त्रें पुराणें वेदश्रुति । अखंड जयेचे स्तवन करिती ।
नाना रुपीं जयेसी स्तविती । प्राणिमात्र ॥ १९ ॥
१९) शास्त्रें, पुराणें, वेद, श्रुति इत्यादि ग्रंथ सारखें शारदेचेंच स्तवन करतात. सगळी माणसेंसुद्धा नाना रुपांनी तीचीच स्तुति करतात. 
जे वेदशास्त्रांची महिमा । जे निरोपमाची उपमा ।
जयेकरितां परमात्मा । ऐसें बोलिजे ॥ २० ॥
२०) शारदेमुळें वेदशास्त्रांना मोठेपणा आहे. खरतर परमात्मस्वरुप कल्पेच्या पल्याड आहे. शब्द तेथें पोंचूंच शकत नाही. त्याला मानवी कल्पनेच्या कक्षेंत आणून " परमात्मा " असे नांव देणारी, उपमेच्या पल्याड असणार्‍याला उपमेच्या कक्षेंत आणणारी ही शारदा आहे. 
नाना विद्या कळा सिद्धी । नाना निश्र्चयाची बुद्धी ।
जे सूक्ष्म वस्तूची शुद्धी । ज्ञेप्तीमात्र ॥ २१ ॥
२१) परमात्मस्वरुपाला " मी आहे " अशी केवळ ज्ञानमय शिद्ध जाणीव होणे हे शारदेचेच स्वरुप समजावे. मुळांत ती ज्ञानमयच असल्याने सर्व प्रकारच्या विद्या, कला, सिद्धि आणि निश्चित बुद्धिरुप ज्ञान हा शारदेचाच विलास असतो.
जे हरिभक्तांची निजभक्ती । अंतर्निष्ठांची अंतरस्थिती ।
जे जीवन्मुक्तांची मुक्ती । सायोज्यता ते ॥ २२ ॥
२२) याप्रमाणे हरिभक्तांची भक्ति, अंतर्मुख होऊन आत्मनिष्ठ राहणार्‍या ज्ञानी पुरुषांची आत्मस्थिति, आणि जीवनमुक्तांची सायुज्यमुक्ति ही शारदाच आहे.
जे अनंत माया वैष्णवी । न कळे नाटक लाघवी ।
जे थोराथोरासी गोवी । जाणपणें ॥ २३ ॥
२३) शारदा म्हणजे जिचा अंत लागत नाही अशी भगवंताची माया. तिनें मोठ्या कुशलतेने रचलेले विश्वरुप नाटक कोणालाच आकलन होत नाही. स्वतःला ज्ञानी समजणार्‍या मोठमोठ्या ज्ञानी पुरुषांना ती त्यांच्याच ज्ञानाच्या अभिमानांत गुंतवते.
जें जें दृष्टीनें देखिलें । जें जें शब्दे वोळखिलें ।
जें जें मनास भासलें । तितुकें रुप जयेचें ॥ २४ ॥
२४) डोळ्यांनी जे दिसते, शब्दांनी जे जाणता येते आणि मनाला जे कल्पिता येते तें सगळें हिचेंच रुप समजावे. 
स्तवन भजन भक्ति भाव । मायेवांचून नाहीं ठाव ।
या वचनाचा अभिप्राव । अनुभवी जाणती ॥ २५ ॥
२५) भगवंताचे स्तवन, भजन किंवा भक्ति शारदेच्या म्हणजेच मायेच्या मदतीशिवाय करता येत नाही. माझ्या या वचनाचा खरा अर्थ स्वानुभवी पुरुषांनाच कळेल.
म्हणौनि थोराहूनि थोर । जे ईश्र्वराचा ईश्र्वर ।
तयेसी माझा नमस्कार । तदांशेंचि आतां ॥ २६ ॥
२६) म्हणून शेवटीं थोराहूनी थोर, व ईश्र्वराचाही ईश्र्वर अशा शारदेला तीच्याच अंशाने मी नमस्कार करतो. 
॥ इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे शारदास्तवननाम समास तिसरा ॥
         Samas Tisara Sharada Stavan
समास तिसरा शारदास्तवन


Custom Search

No comments: