Monday, December 12, 2016

Samas Sahava ShroteJan Stavan समास सहावा श्रोतेजनस्तवन


Dashak Pahila Samas Sahava ShroteJan Stavan
Samas Sahava ShroteJan Stavan is in Marathi. Samarth Ramdas is now making praise of the people who are there to hear Dasbodh. He is respecting everybody and describing what qualities they are having. It is the greatness of Samarth Ramdas that he is bowing the listeners, readers of Dasbodh. Dasbodh is written for the general category of people who don’t have knowledge of Brahma. Slowly but surely Samarth Ramdas by holding hand of such people, leading them to the path of Brahma-gyana.
समास सहावा श्रोतेजनस्तवन
श्रीराम ॥
आतां वंदूं श्रोते जन । भक्त ज्ञानी संत सज्जन ।
विरक्त योगी गुणसंपन्न । सत्यवादी ॥ १  ॥
अर्थ 
१) आतां मी भक्त, ज्ञानी, संत, सज्जन, विरक्त, योगी, गुणसंपन्न आणि सत्यवादी या सर्व श्रोत्यांना नमस्कार करतो.
येक सत्वाचे सागर । येक बुद्धीचे आगर ।
येक श्रोते वैरागर । नाना शब्दरत्नाचे ॥ २ ॥
२) एकजण सत्वगुणाचा सागर आहे, तर दुसरा एक अत्यंत बुद्धिमान आहे, तर तिसरा शब्दप्रभु म्हणजे त्याच्याजवळ शब्दरुपी जणु खाणच आहे.
जे नाना अर्थांवृताचे भोक्ते । जे प्रसंगीं वक्तयाचे वक्ते ।
नाना संशयातें छेदिते । निश्र्चै पुरुष ॥ ३ ॥ 
३) त्यांतील कांही वक्त्याच्या बोलण्यांत लक्ष देऊन अर्थ समजुन घेणारे, कोणी उत्तम वक्तृत्व गाजविणारे, तर कोणी निश्र्चित मताने संशयाचा छेद करणारे,
ज्यांची धारणा अपार । जे ईश्र्वराचे अवतार ।
नातरी प्रत्यक्ष सुरवर । बैसले जैसे ॥ ४ ॥
४) कोणी अपार ज्ञानी व बु्द्धिमान असे जणु सभेंत आलेले प्रत्यक्ष देवच, 
किं हे ऋषेश्र्वरांची मंडळी । शांतस्वरुप सत्वागळी ।
जयांचेनि सभामंडळीं । परमशोभा ॥ ५ ॥
५) अशा श्रोत्यांमुळे शांती व सत्वगुणयुक्त ऋषिच सभेची शोभा वाढवित आहेत असे.
हृदईं वेदगर्भ विलसे । मुखीं सरस्वती विळासे ।
साहित्य बोलतां जैसे । भासती देवगुरु ॥ ६ ॥
६) त्यांच्या अंतःकरणांत वेदांचा समग्र अर्थ भरलेला आहे. त्यांच्याजवळ सरस्वतीचा वास आहे व ते साहित्याचा प्रकार वर्णु लागले कीं, देवगुरु बृहस्पतीच वाटतात.
जे पवित्रपणें वैश्र्वानर । जे स्फूर्तिकिरणाचे दिनकर । 
ज्ञातेपणें दृष्टीसमोर । ब्रह्मांड नये ॥ ७ ॥
७) ते पवित्रपणांत अग्निसारखे, सूर्याच्या किरणांसारखी स्फूर्ति पसरविणारे, आपल्या अमर्याद ज्ञानाने दृश्य सृष्टीला किंमत न देणारे.
जे अखंड सावधान । जयांस त्रिकाळाचें ज्ञान ।
सर्वकाळ निराभिमान । आत्मज्ञानी ॥ ८ ॥ 
८) ते नेहमीेसावधच असतात. त्यांना त्रिकाळाचे ज्ञान असते. ते आत्मज्ञानाने संपन्न व अभिमानरहित असतात.
ज्यांचे दृष्टीखालून गेलें । ऐसें कांहींच नाहीं उरलें ।
पदार्थमात्रासी लक्षिलें मनें जयांच्या ॥ ९ ॥
९) आत्मज्ञानी असल्याने त्यांच्या दृष्टींतून कांहींच सुटत नाही. सर्व दृश्य वस्तु त्यांच्या मनाने पाहीलेल्याच असतात.
जें जें कांहीं आठवावें । तें तें तयांस पूर्वींच ठावें ।
तेथें काये अनुवादावें । ज्ञातेपणेंकरुनी ॥ १० ॥
१०) आपल्याला जे जे आठवते ते ते त्यांना आधींच माहीत असते. आपल्याला माहीतआहे व त्यांना माहीत नाही असे काहींच नसल्याने त्यांना कांहीं सांगताच येत नाही.
परंतु हे गुणग्राहिक । म्हणौन बोलतों निःशंक ।
भाग्यपुरुष काये येक । सेवीत नाहीं ॥ ११ ॥
११) परंतु असे असले तरी ते भाग्यवंत लोक गुणग्राहक असलेने व ते अव्हेर करणारे नसल्याने मी निःशंकपणे (दासबोध) सांगत आहे.
सदा सेविती दिव्यान्नें । पालटाकारणें आवेट अन्नें ।
तैसींच माझीं वचनें । पराकृतें ॥ १२ ॥
१२) नेहमी संस्कृत वेदवचने ऐकणारे म्हणजेच दिव्य अन्ने सेवन करणारे केवळ रुचिपालट म्हणुन प्राकृतांतील माझा दासबोध ऐकत आहेत.
आपुले शक्तिनुसार । भावें पुजावा परमेश्र्वर ।
परंतु पुजूं नये हा विचार । कोठेंचि नाहीं ॥ १३ ॥
१३) आपापल्या शक्तिनुसार भगवंताची पूजा करावी परंतु पूजाकरुच नये असे कोठेंच नाही.
तैसा मी येक वाग्दुर्बळ । श्रोते परमेश्र्वरचि केवळ ।
यांची पूजा वाचाबरळ । करुं पाहे ॥ १४ ॥
१४) मी तसाच एक वाचा कमी म्हणुन दुर्बळ असलेला आहे. श्रोते हे परमेश्र्वर आहेत. मी माझ्या ओबडदोबड शब्दांनी त्या परमेश्र्वराची मी पूजा करत आहे. म्हणजे त्यांना दासबोध सांगत आहे. 
वित्पत्ती नाहीं कळा नाहीं । चातुर्य नाहीं प्रबंद नाहीं ।
भक्ति ज्ञान वैराग्य नाहीं । गौल्यता नाहीं वचनाची ॥ १५ ॥
१५) माझ्याजवळ विद्वत्ता नाही, चातुर्य नाही, कला नाही व्यस्थित लिहीलेला प्रबंध नाही, भक्ति, ज्ञान, वैराग्य, शब्दवैभव नाही तरीही 
ऐसा माझा वाग्विळास । म्हणौन बोलतों सावकाश ।
भावाचा भोक्ता जगदीश । म्हणौनियां ॥ १६ ॥
१६) माझा वाग्विलास असा असूनही मी सावकाश बोलतो आहे कारण भगवंतरुपी  आपण श्रोते भावाचे भोक्ते व रसग्रहण करणारे आहात.
तुम्ही श्रोते जगदीशमूर्ति । तेथें माझी वित्पत्ती किती । 
बुद्धिहीण अल्पमती । सलगी करितों ॥ १७ ॥
१७) तुम्ही सर्व श्रोते परमात्मा असे जगदीश आहात. त्यामुळे अल्पमती व मंदबुद्धि मी माझ्या कमी विचार शक्तीने आपल्याशी सलगी करत आहे.
समर्थाचा पुत्र मूर्ख जगीं । परी सामर्थ्य असे त्याचा आंगी ।
तुम्हां संतांचा सलगी । म्हणौनि करितों ॥ १८ ॥ 
१८) मोठ्या माणसाचा मूर्ख मुलगासुद्धां सामर्थ्यवान असतो तसाच मी तुम्हां संतांचा असल्याने धारिष्ट्य करत आहे.    
व्याघ्र सिंह भयानक । देखोनि भयाचकित लोक ।
परी त्यांची पिलीं निःशंक । तयांपुढें खेळती ॥ १९ ॥
१९) अति भयानक वाघ, सिंह असले तरी त्यांची पिल्ले निःशंक होऊन त्यांच्याजवळच खेळतात. 
तैसा मी संतांचा अंकित । तुम्हां संतांपासीं बोलत ।
तरी माझी चिंता तुमचें चित्त । वाहेलच कीं ॥ २० ॥
२०) त्याचप्रमाणे मी तुमचाच असल्याने निःशंक मनाने दासबोध सांगत आहे. माझी तुम्हीच काळजी घ्यालच.
आपलेंचि बोले वाउगें । त्याची संपादणी करणें लागे ।
परंतु कांहीं सांगणें नलगे । न्यून तें पूर्ण करावें ॥ २१ ॥
२१) आपले माणूस कांहीं चुकिचे बोलले तरी आपण त्याला सांभाळून घेतो तसे माझे दासबोध निरुपणांत कांही चुकीचे असले तरी ते तुम्ही सांभाळून घ्यालच.
हें तों प्रीतीचें लक्षण । स्वभावेंचि करी मन ।
तैसे तुम्ही संतसज्जन । मायेबाप विश्र्वाचे ॥ २२ ॥
२२) तुम्ही संतसज्जन सर्व जगाचे मायबाप आहात. त्यामुळे स्वाभाविकच प्रेमाने तुम्ही मला सांभाळून घ्याल. 
माझा आशय जाणोनि जीवें । आतां उचीत तें करावें ।
पुढें कथेसि अवधान द्यावें । म्हणे दासानुदास ॥ २३ ॥
२३) माझा सांगण्याचा आशय ओळखून आपणास योग्य असे उचित आपण करावे व मी सांगत असलेला दासबोध लक्षपूर्वक ऐकावा. अशी हा दासानुदास रामदास आपल्याला विनंती करत आहे.
॥ इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे श्रोतेस्तवननाम समास सहावा ॥     
Samas Sahava ShroteJan Stavan
समास सहावा श्रोतेजनस्तवन



Custom Search

No comments: