Dasbodha Dashak Dusara Samas Dusara Uttam Lakshan
Samas Dusara Uttam Lakshan is in Marathi. In this Samas Samarth Ramdas is telling us what the good qualities a person should have to identify him as a good person. These qualities help him to proceed on the path of spirituality. If anybody wishes to be a spiritual person then he should here this samas carefully and tries to acquire the missing qualities in him.
समास दुसरा उत्तम लक्षण
श्रीराम ॥
श्रोतां व्हावें सावधान । आतां सांगतों उत्तम गुण ।
जेणें करितां बाणे खुण । सर्वज्ञपणाची ॥ १ ॥
अर्थ १) श्रोत्यांनी लक्षपूर्वक ऐकावे. मी आता उत्तम गुण सांगतो आहे. जे अंगी बाणवल्याने प्रपंच व परमार्थ ह्या दोन्हीचे ज्ञान प्राप्त होईल.
वाट पुसिल्याविण जाऊं नये । फळ वोळखिल्याविण खाऊं नये ।
पडिली वस्तु घेऊं नये । येकायेकीं ॥ २ ॥
२) वाट (माहित असल्याशिवाय) विचारल्याशिवाय प्रवासास जाऊं नये. फळ ओळखिल्याशिवाय खाऊं नये. वस्तु पडलेली दिसली तर एकदम उचलून घेऊं नये.
अति वाद करुं नये । पोटीं कपट धरुं नये ।
शोधिल्याविण करुं नये । कुळहीन कांता ॥ ३ ॥
३) फार वादावादी करुं नये. कपटीपणाने वागू नये. (बाहेरुन गोड परंतु पोटांत कपट असे वागूं नये.) कुलशीलाची नीट माहिती करुन घेतल्यावाचून मुलीशी लग्न करुं नये.
विचारेंविण बोलों नये । विवंचनेविण चालों नये ।
मर्यादेविण हालों नये । कांहीं येक ॥ ४ ॥
४) सारासार विचार केल्याशिवाय बोलू (न मागता सल्लासुद्धा) नये. कार्य सुरु करतांना सर्वांगीण बाजूंचा विचार केल्याशिवाय कार्य सुरु करु नये. नीतिअनीतिचा विचार केल्याशिवाय हालचाल करुं नये.
प्रीतीविण रुसों नये । चोरास वोळखी पुसों नये ।
रात्रीं पंथ क्रमूं नये । येकायेकीं ॥ ५ ॥
५) प्रेम नसेल तेथे रुसणे नको. चोराला माहिती देऊं नये. अचानक रात्री प्रवास करु नये.
जनीं आर्जव तोडूं नये । पापद्रव्य जोडूं नये ।
पुण्यमार्ग सोडूं नये । कदाकाळीं ॥ ६ ॥
६) लोकांशी सरळपणाने वागणे सोडूं नये. पापमार्गाने पैसा जोडूं नये. कधीही नीतिने वागणें सोडूं नये.
निंदा द्वेष करुं नये । असत्संग धरुं नये ।
द्रव्यदारा हरुं नये । बळात्कारें ॥ ७ ॥
७) कोणाचीही निंदा, द्वेष करुं नये. अयोग्य, वाईट लोकांशी संगत, मैत्री करु नये. दुसर्याची बायको किंवा पैसा बळात्कारानें लुबाडूं नये.
वक्तयास खोदूं नये । ऐक्यतेसी फोडूं नये ।
विद्याअभ्यास सोडूं नये कांहीं केल्यां ॥ ८ ॥
८) वक्त्याला प्रश्र्ण विचारुन हैराण करुं नये. एकीने राहणार्या लोकांत फूट पाडू नये. कांही झाले तरी विद्या-अभ्यास सोडू नये. (ज्ञान मिळवणे सोडूं नये).
तोंडाळासीं भांडों नये । वाचाळासीं तंडों नये ।
संतसंग खंडूं नये । अंतर्यामीं ॥ ९ ॥
९) तोंडाळ लोकांशी भांडण करु नये. वाचाळ माणसाशी वादंग करुं नये. अंतर्यामी (मनांवर) झालेले चांगले संस्कार सोडूं नये.
अति क्रोध करुं नये । जिवलगांस खेदूं नये ।
मनीं वीट मानूं नये । सिकवणेचा ॥ १० ॥
१०) फार रागावू नये. जिवलग नातेवाईक, मित्र यांना दुखवूं नये. चांगले शिकून घेण्याचा कंटाळा करुं नये.
क्षणक्षणा रुसों नये । लटिका पुरुषार्थ बोलों नये ।
क्षणक्षणा रुसों नये । लटिका पुरुषार्थ बोलों नये ।
केल्याविण सांगों नये । आपला पराक्रमु ॥ ११ ॥
११) सारखे सारखे रुसूं नये. खोटेपणा करुन न केलेली गोष्ट सांगू नये. काहीहीं न करता (आपला पराक्रम) आपण केले असे सांगू नये.
बोलिला बोल विसरों नये । प्रसंगीं सामर्थ्य चुकों न.ये ।
केल्याविण निखंदूं नये । पुढिलांसी कदा ॥ १२ ॥
१२) आपण दिलेला शब्द विसरुं नये. योग्य प्रसंगी आपल्या शक्तिचा वापर करण्यास चुकू नये. कार्य करुन दाखविल्याशिवाय दुसर्याला कधीही बोल लावूं नये.
आळसें सुख मानूं नये । चाहाडी मनास आणूं नये ।
शोधिल्याविण करुं नये । कार्य कांहीं ॥ १३ ॥
१३) आळसांत पडून राहण्यांत सुख मानू नये. कोणाची चुगली-चहाडी करु नये. कोणतेही कार्य सर्वांगीण विचार केल्याशिवाय करुं नये.
सुखा आंग देऊं नये । प्रेत्न पुरुषें सांडूं नये ।
कष्ट करितां त्रासो नये । निरंतर ॥ १४ ॥
१४) देहाला अति सुखाची सवय लावूं नये. निरंतर प्रयत्न करण्याचे सोडूं नये. कधीही (आणि कितीही) कष्ट करावे लागले तरी त्रासून जाऊ नये.
सभेमध्यें लाजों नये । बाष्कळपणें बोलों नये ।
पैज होड घालूं नये । कांहीं केल्यां ॥ १५ ॥
१५) सभेमधे लाजूं नये. (धिटाईने वागावे.) परंतु वायफळ बडबड करु नये. कधीही (कसलीही) पैज लावूं नये.
बहुत चिंता करुं नये । निसुगपणें राहों नये ।
परस्त्रीतें पाहों नये । पापबुद्धी ॥ १६ ॥
१६) फार चिंता करुं नये. आळशीपणांत दिवस घालवू नये. वाईट दृष्टीने दुसर्याच्या बायकोकडे पाहूं नये.
कोणाचा उपकार घेऊं नये । घेतला तरी राखों नये ।
परपीडा करुं नये । विस्वासघात ॥ १७ ॥
१७) कोणाच्या उपकाराचे ओझें बाळगूं नये. कोणी उपकार केल्यास तो फेडल्याशिवाय राहूं नये. दुसर्याचा विश्र्वासघात करुन त्याला पीडा देऊं नये.
शोच्येंविण असों नये । मळिण वस्त्र नेसों नये ।
जाणारास पुसों नये । कोठे जातोस म्हणौनी ॥ १८ ॥
१८) स्वच्छतेशिवाय राहूं नये. मलीन वस्त्र नेसूं नये. कोणी बाहेर जावयास निघाल्यावर त्याला कोठे जातोस म्हणून विचारु नये.
व्यापकपण सांडूं नये । पराधेन होऊं नये ।
आपलें वोझें घालूं नये । कोणीयेकासी ॥ १९ ॥
१९) आपला उदारपणा सोडू नये. कोणाच्या आधीन होऊं नये. परावलंबी किंवा दुसर्यावर आपले ओझें घालून राहू नये.
पत्रेंविण पर्वत करुं नये । हीनाचें रुण घेऊं नये ।
गोहीविण जाऊं नये । राजद्वारा ॥ २० ॥
२०) कागदपत्र केल्याशिवाय देण्या-घेण्याचे व्यवहार करु नये. हीन माणसाकडून कर्ज घेऊं नये. साक्षी-पुराव्याशिवाय कोर्टाची पायरी चढूं नये.
लटिकी जाजू घेऊं नये । सभेस लटिके करुं नये ।
आदर नस्तां बोलों नये । स्वभाविक ॥ २१ ॥
२१) खोटी हुज्जत घालूं नये. सर्व सभेला खोटे ठरवूं नये. ज्या ठिकाणी आपल्याला आदर-मान नाही तेथे बोलूं नये.
आदखणेपण करुं नये । अन्यायेंविण गांजूं नये ।
अवनीतीनें वर्तों नये । आंगबळें ॥ २२ ॥
२२) महत्वाच्या गोष्टींकडे दुर्लक्ष करु नये. अन्यायाखेरीज कोणाला दुखवूं नये. अंगी फार शक्ती आहे म्हणुन दांडगेपणे वागूं नये.
बहुत अन्न खाऊं नये । बहुत निद्रा करुं नये ।
बहुत दिवस राहों नये । पिसुणाचेथें ॥ २३ ॥
२३) फार जेवण करुं नये. फार झोप काढूं नये. वाईट माणसाकडे फार दिवस राहूं नये.
आपल्याची गोही देऊं नये । आपली कीर्ती वर्णूं नये ।
आपलें आपण हासों नये । गोष्टी सांगोनी ॥ २४ ॥
२४) आपला म्हणून त्याच्या बाजूने साक्ष देऊं नये. आपल्या मोठेपणाचे आपणच प्रदर्शन करुं नये. गोष्टी सांगत आपले आपण हसूं नये.
धूम्रपान घेऊं नये । उन्मत्त द्रव्य सेऊं नये ।
बहुचकासीं करुं नये । मैत्री कदा ॥ २५ ॥
२५) धूम्रपान करुं नये. मादक पेय पिवूं नये. बोंबड्या माणसाशी मैत्री कधीच करुं नये.
कामेंविण राहों नये । नीच उत्तर साहों नये ।
आसुदें अन्न सेऊं नये । वडिलांचेंहि ॥ २६ ॥
२६) काम, उद्योग याशिवाय राहूं नये. कोणी अपमानास्पद (नीच) बोलला तर सहन करु नये. वडिलांचेही आयते अन्न खाऊं नये.
तोंडीं सीवी असों नये । दुसर्यास देखोन हांसों नये ।
उणें अंगीं संचारों नये । कुळवंताचे ॥ २७ ॥
२७) तोडांत शिवी (घाणेरडी भाषा) असूं नये. दुसर्यास हासूं नये. कुळवान, शीलवान माणसाचे अंगी हीनपणा लावूं नये.
देखिली वस्तु चोरुं नये । बहुत कृपण होऊं नये ।
जिवलगांसीं करुं नये । कळह कदा ॥ २८ ॥
२८) पाहिलेली वस्तु (आवडली म्हणून) चोरु नये. फार कंजूषपणा करुं नये. आपल्या माणसांशी भांडण करुं नये.
येकाचा घात करुं नये । लटिकी गोही देऊं नये ।
अप्रमाण वर्तों नये । कदाकाळीं ॥ २९ ॥
२९) कोणाचाही घात करुन त्याचे वाईट करुं नये. खोटी साक्ष देऊं नये. कधीही आपली वर्तणुक शास्त्राच्या विरुद्ध असूं नये.
चाहाडी चोरी धरुं नये । परद्वार करुं नये ।
मागें उणें बोलों नये । कोणीयेकाचें ॥ ३० ॥
३०) कोणाची चहाडी, चोरी करुं नये. परस्त्रीशीं गैर (अनीतीने) वागू नये. कोणाच्याही मागे त्याच्याबद्दल वाईट बोलूं नये.
समईं यावा चुकों नये । सत्वगुण सांडूं नये ।
वैरियास दंडूं नये । शरण आलियां ॥ ३१ ॥
३१) दुसर्यास मदतीची संधी सोडू नये. सत्वगुणाने वागणे कदापी सोडू नये. शरण आलेल्यास (चुकीची कबुली देणारास) शिक्षा करुं नये.
अल्पधनें माजों नये । हरिभक्तीस लाजों नये ।
मर्यादेविण चालों नये । पवित्र जनीं ॥ ३२ ॥
३२) कमी-अधिक पैसा मिळाला तरी त्याचे माजाने वागू नये. भगवंताची भक्ती करतांना लाजू नये. संत-महंत असलेल्या पवित्र ठिकाणी अमर्यादेने वर्तन करुं नये.
मूर्खासीं समंध पडों नये । अंधारीं हात घालूं नये ।
दुश्र्चितपणें विसरों नये । वस्तु आपुली ॥ ३३ ॥
३३) मूर्खांशी संबंध ठेवू नये. अंधार असलेल्या ठिकाणी हात घालूं नये. आपली वस्तु विसरण्याचा निष्काळजीपणा करुं नये.
स्नानसंध्या सांडूं नये । कुळाचार खंडूं नये ।
अनाचार मांडूं नये । चुकुरपणें ॥ ३४ ॥
३४) स्नान-संध्याआदि आपले आन्हिक सोडूं नये. कुलाचार सोडू नये. चुकारपणाने अनाचाराने वागूं नये.
हरिकथा सांडूं नये । निरुपण तोडूं नये ।
परमार्थास मोडूं नये । प्रपंचबळें ॥ ३५ ॥
३५) हरिकथा, भजन, किर्तन आदि सोडूं नये. प्रवचन निरुपण आदि सोडूं नये. प्रपंचाच्यामागे लागून परमार्थाची वाट सोडू नये.
देवाचा नवस बुडऊं नये । आपला धर्म उडऊं नये ।
भलतें भरीं भरों नये । विचारेंविण ॥ ३६ ॥
३६) देवाचा नवस फेडण्यास चुकू नये. आपला धर्म विरोधी वागून सोडू नये. विचाराने न वागता भलते काम अंगावर घेऊ नये.
निष्ठुरपण धरुं नये । जीवहत्या करुं नये ।
पाउस देखोन जाऊं नये । अथवा अवकाळीं ॥ ३७ ॥
३७) निष्ठूरपणे वागू नये. जीवाची हिंसा करु नये. पाऊस असेल तर किंवा योग्य काळ नसेल तर प्रवासास जाऊं नये.
सभा देखोन गळों नये । समईं उत्तर टळों नये ।
धिःकारिता चळों नये । धारिष्ट आपुलें ॥ ३८ ॥
३८) सभेमध्ये घाबरु नये. वेळप्रसंगी योग्य उत्तर देण्यास चुकू नये. कोणी धिःकारिले तरी आपले धैर्य गमावूं नये.
गुरुविरहित असों नये । नीच यातीचा गुरु करुं नये ।
जिणें शाश्र्वत मानूं नये । वैभवेंसीं ॥ ३९ ॥
३९) गुरुशिवाय राहू नये. हलक्या जातीचा गुरु करु नये. वैभवाचे जीणे कायमचे समजू नये.
सत्यमार्ग सांडूं नये । असत्य पंथे जाऊं नये ।
कदा अभिमान घेऊं नये । असत्याचा ॥ ४० ॥
४०) सत्याचा मार्ग सोडू नये. असत्याचे मार्गे जाऊ नये. खोट्या वागणुकीचा अभिमान बाळगू नये.
अपकीर्ति ते सांडावी । सदकीर्ति वाढवावी ।
विवेकें दृढ धरावी । वाट सत्याची ॥ ४१ ॥
४१) अपकीर्तिच्या मार्गे जाऊ नये. सद्कीर्तिच्या मार्गे जावे. योग्य विचाराने सत्याचा मार्ग धरुन ठेवावा. (सत्कर्मे करुन सद्कीर्ति मिळवून देणारी सत्याची वाट घट्ट धरुन मार्ग चालावा.)
नेघतां हे उत्तम गुण । तें मनुष्य अवलक्षण ।
ऐक तयांचे लक्षण । पुढिले समासीं ॥ ४२ ॥
४२) जो कोणी हे उत्तमगुण अंगीकारत नाही, तो अवलक्षणीच होय. त्याची लक्षणे पुढील समासी ऐका.
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे उत्तमलक्षणनाम समास दुसरा ॥
Samas Dusara Uttam Lakshan
समास दुसरा उत्तम लक्षण
Custom Search
No comments:
Post a Comment