Friday, December 16, 2016

Samas Aathava Sabha Stavan समास आठवा सभास्तवन


Dashak Pahila Samas Aathava Sabha Stavan 
Samas Aathava Sabha Stavan is in Marathi. Samarth Ramdas is praising the Sabha. This is a sabha of God loving people who are reciting Bhajan, listening Purana and chanting praise or stotras of God. Samarth says that these people though Prapanchij they also have many qualities of Paramartha. Hence this Sabha is very worthy of praise.
समास आठवा सभास्तवन
श्रीराम ॥
आतां वंदू सकळ सभा । जये सभेसी मुक्ति सुल्लभा ।
जेथें स्वयें जगदीश उभा । तिष्टतु भरें ॥ १ ॥
अर्थ 
सभेचे महत्व समर्थ रामदास विशद करत आहेत.  
१) आतां मी सर्व सभांना नमस्कार करतो. जेथे (जन्म-मरणापासून) मुक्ति सुलभ होते. आणि जेथे स्वतः जगदिश तिष्ठत उभा असतो.
श्र्लोक । नाहं वसामि वैकुंठे योगिनां हृदये रवौ ।
मद्भक्ता यत्र गायन्ति तत्र तिष्ठामि नारद ॥ 
नाहीं वैकुंठीचा ठाईं । नाहीं योगियांचा हृदईं ।
माझे भक्त गाती ठांईं ठांईं । तेथें मीं तिष्ठतु नारदा ॥ २ ॥
२) नारदाला भगवंत सांगतात मी वैकुंठांत नाही, योग्यांच्या हृदयांतही मी नाही, तर मी माझे भक्त जिथे माझे गुणगान गातात त्या ठिकाणी मी असतो.          याकारणें सभा श्रेष्ठ । भक्त गाती तें वैकुंठ ।
नामघोषें धडधडाट । जयजयकारें गर्जती ॥ ३ ॥
३) यामुळें सभा श्रेष्ठ आहे जेथे भगवंताचे नामाचे गायन व नामघोषाचा जयजयकार करतात तोच वैकुंठ आहे.
प्रेमळ भक्तांचीं गायनें । भगवत्कथा हरिकीर्तनें ।
वेदव्याख्यान पुराणश्रवणें । जेथें निरंतर ॥ ४ ॥
४) जेथे प्रेमळ भक्त गायन करतात, भगवंताच्या कथा, किर्तनें चाललेली असतात, वेद-व्याख्यान, पुराणें यांचे श्रवण नेहमी होत असते,
परमेश्र्वराचे गुणानुवाद । नाना निरुपणाचे संवाद ।
अध्यात्मविद्या भेदाभेद । मथन जेंथें ॥ ५ ॥
५) परमेश्र्वराचे गुणगायन चालू असते, नानाप्रकारची निरुपणें, संवाद, अध्यात्मविद्येचे भेदाभेदांचे मंथन, चर्विचरण चाललेले असते,
नाना समाधानें तृप्ती । नाना आशंकानिवृत्ती । 
चित्तीं बैसे ध्यानमूर्ति । वाग्विळासें ॥ ६ ॥
६) नाना प्रकारच्या शंकाकुशंका यांचे निरसन होते व त्या फिटतात व समाधान होऊन चित्तामध्ये भगवंताची मूर्ति स्थिर होते.
भक्त प्रेमळ भाविक । सभ्य सखोल सात्विक ।
रम्य रसाळ गायक । निष्ठावंत ॥ ७ ॥
कर्मसीळ आचारसीळ । दानसीळ धर्मसीळ ।
सुचिस्मंत पुण्यसीळ । अंतरशुद्ध कृपाळु ॥ ८ ॥
योगी वीतरागी उदास । नेमक निग्रह तापस ।
विरक्त निस्पृह बहुवस । आरण्यवासी ॥ ९ ॥
दंडधारी जटाधारी । नाथपंथी मुद्राधारी ।
येक बाळ ब्रह्मचारी । योगेश्र्वर ॥ १० ॥
पुरश्र्चरणी आणी तपस्वी । तीर्थवासी आणी मनस्वी ।
महायोगी आणी जनस्वी । जनासारखे ॥ ११ ॥
सिद्ध साधु आणी साधक । मंत्रयंत्रशोधक । 
येकनिष्ठ उपासक । गुणग्राही ॥ १२ ॥
संत सज्जन विद्वजन । वेदज्ञ शास्त्रज्ञ माहाजन ।
प्रबुद्ध सर्वज्ञ समाधान । विमळकर्ते ॥ १३ ॥
योगी वित्पन्न ऋषेश्र्वर । धूर्त तार्किक कवेश्र्वर ।
मनोजयाचे मुनेश्र्वर । आणी दिग्वल्की ॥ १४ ॥
ब्रह्मज्ञानी आत्मज्ञानी ।तत्वज्ञानी पिंडज्ञानी ।
योगाभ्यासी योगज्ञानी । उदासीन ॥ १५ ॥
पंडित आणी पुराणिक । विद्वांस आणी वैदिक । 
भट आणी पाठक । येजुर्वेदी ॥ १६ ॥
माहाभले माहाश्रोत्री । याज्ञिक आणी आग्नहोत्री । 
वैद्य आणी पंचाक्षरी । परोपकारकर्ते ॥ १७ ॥
भूत भविष्य वर्तमान । जयांस त्रिकाळाचें ज्ञान ।
बहुश्रुत निराभिमान । निरापेक्षी ॥ १८ ॥
शांती क्ष्मा दयासीळ । पवित्र आणी सत्वसीळ ।
अंतरशुद्ध ज्ञानसीळ । ईश्र्वरी पुरुष ॥ १९ ॥
ऐसे जे कां सभानायेक । जेथें नित्यानित्यविवेक ।
त्यांचा महिमा अलोलिक । काय म्हणोनि वर्णावा ॥ २० ॥
७-२०) आतां या सभेंत कोणकोण असतात ते स्वामी समर्थ रामदास सांगत आहेत.
भक्त, प्रेमळ भाविक जन, सभ्य, ज्ञानाने सखोल, सात्विक, रम्य रसाळ गायक, निष्ठावंत, कर्मनिष्ठ, आचारनिष्ठ, दानशूर, धर्मनिष्ठ, पवित्र, पुण्यवान, शुद्ध अंतःकरणी, कृपाळू, योगी, विरक्त, उदास, नेमी, निग्रही, तापसी, विरक्त, निस्पृह, वनांत वास करणारे, दंडधारी, जटाधारी, नाथपंथी, मुद्रा धारण करणारे, बालब्रह्मचारी, मोठे योगी, पुरश्चरण करणारे, तपस्वी, तीर्थावर राहणारे, मन जिंकणारे, महायोगी, लोकांत राहुन अलिप्त असणारे, सिद्ध, साधु, साधक, मंत्रयंत्र देणारे, एकनिष्ठ उपासक, गुणग्राही, संत, सज्जन, विद्वान, वेदज्ञ, शास्त्रज्ञ, महाजन, प्रौढ पंडित, सर्वज्ञानी, समाधान करुन निर्मळ करणारे, योगी, विद्वान, ऋषीश्र्वर, धूर्त, तार्किक, महाकवि, मनावर विजय मिळविलेले मुनि, दिगंबर, ब्रह्मज्ञानी, आत्मज्ञानी, तत्वज्ञानी, पिंडज्ञानी, योगाभ्यासी, योगज्ञानी, उदासीन, पंडित, पुराणीक, विद्वान, वैदिक, भट, यजुर्वेदी पाठक, मोठे चांगले लोक, मोठे श्रोते, यज्ञ करणारे, अग्नीहोत्र व्रती, वैद्य, पंचाक्षरी, परोपकार करणारे, भूत, भविष्य व वर्तमानाचे त्रिकाळ ज्ञानी, बहुश्रुत, निराभिमानी, अपेक्षा रहित, शांत, दयाळू, क्षमाशील, पवित्र, सत्वशील, शुद्ध अंतःकरणाचे ज्ञानी, असे सर्व ते ईश्र्वरासारखे पुरुष, त्या सभेचे नायकच जेथे नेहमी नित्य कोणते व अनित्य कोणते याचाच विचार चालतो. त्या सभेचा मोठेपणा किती सांगावा. 
जेथें श्रवणाचा उपाये । आणी परमार्थसमुदाये ।
तेथें जनासी तरणोपाये । सहजचि होये ॥ २१ ॥
२१) अशा सभेमध्ये परमार्थी लोकच असल्याने परमार्थ श्रवणाचाच लाभ सामान्य जनांना विनासायास होतो.
उत्तम गुणाची मंडळी । सत्वधीर सत्वागळी ।
नित्य सुखाची नव्हाळी । जेथें वसे ॥ २२ ॥
२२) अत्यंत सत्वगुणी, धैर्यवान, उत्तम गुणाने युक्त मंडळी तेथे असल्याने तेथे नेहमी नित्य नविन सुखच लाभते.
विद्यापात्रें कळापात्रें । विशेष गुणांची सत्पात्रें ।
भगवंताचीं प्रीतिपात्रें । मिळालीं जेथें ॥ २३ ॥
२३) विद्यावान, कलावंत, विशेषगुणयुक्त, भगवंताची आवडती मंडळी येथे एकत्र येतात.
प्रवृत्ती आणी निवृत्ती । प्रपंची आणी परमार्थी ।
गृहस्ताश्रमी वानप्रहस्ती । संन्यासादिक ॥ २४ ॥
२४) तसेच प्रवृत्त आणि निवृत्त, प्रपंची व परमार्थी, गृहस्थाश्रमी व वानप्रस्थाश्रमी, संन्यासी,
वृद्ध तरुण आणी बाळ । पुरुष स्त्रियादिक सकळ ।
अखंड ध्याती तमाळनीळ । अंतर्यामी ॥ २५ ॥
२५) वयस्कर, तरुण आणि बाळ, पुरुष, स्त्रीयां असे सगळे तेथे बसून त्या अंतर्यामी असलेल्या भगवंताचे ध्यान करतात.
ऐसे परमेश्र्वराचे जन । त्यांसी माझें अभिवंदन ।
जयांचेनि समाधान । अकस्मात बाणे ॥ २६ ॥
२६) अशा परमेश्र्वराच्या भक्तांना कीं, ज्यांच्यामुळें तत्काळ समाधान मिळते, त्यांना माझा नमस्कार आहे.
ऐसिये सभेचा गजर । तेथे माझा नमस्कार ।
जेथें नित्य निरंतर । कीर्तन भगवंताचें ॥ २७ ॥
२७) अशा त्या सभेमध्ये निरंतर भगवंताचे भजन-किर्तन चालते, त्या सभेला माझा नमस्कार आहे.
जेथें भगवंताच्या मूर्ती । तेथें पाविजे उत्तम गती ।
ऐसा निश्र्चय बहुतां ग्रंथी । महंत बोलिले ॥ २८ ॥
२८) मोठ्या लोकांनी पुष्कळ ग्रंथामधे असे म्हटले आहे की, जेथे भगवंताचे नामसंकिर्तन चालते तेथे उत्तम गति मिळते.
कल्लौ कीर्तन वरिष्ठ । जेथे होय ते सभा श्रेष्ठ । 
कथाश्रवणें नाना नष्ट । संदेह मावळती ॥ २९ ॥
२९) कलियुगांत कीर्तन हेच वरिष्ठ आहे. त्या सभेंत कथा-संकिर्तन ऐकल्याने सर्व संदेह नष्ट होतात.

॥ इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे सभास्तवननाम समास आठवा ॥
Samas Aathava Sabha Stavan 
समास आठवा सभास्तवन


Custom Search
Post a Comment