Monday, December 26, 2016

Samas Tisara Kuvidya Lakshan समास तिसरा कुविद्या लक्षण


Dashak Dusara Samas Tisara Kuvidya Lakshan 
Samas Tisara Kuvidya Lakshan is in Marathi. In this Samas Samarth Ramdas is telling us the Kuvidya Lakshan. These Kuvidya Lakshans are to be removed from our Nature if we are having in it. It is not possible for a person to follow a spiritual path if he is having them.
समास तिसरा कुविद्या लक्षण
श्रीराम ॥
ऐका कुविद्येचीं लक्षणें । अति हीने कुलक्षणें ।
त्यागार्थ बोलिलीं ते श्रवणें । त्याग घडे ॥ १ ॥
अर्थ 
१) आतां कुविद्येची लक्षणें ऐका. ती अति हीन आहेत. मनुष्याने त्यांचा त्याग करावा. ती ऐकली म्हणजे त्यांचा त्याग घडतो.
ऐका कुविद्येचा प्राणी । जन्मा येऊन केली हानी । 
सांगिजेल येहीं लक्षणीं । वोळखावा ॥ २ ॥
२) कुविद्येचा माणुस कसा असतो ते सांगतो. जन्माला येऊन तो स्वतःचे नुकसान करुन घेतो. येथे सांगितलेल्या लक्षणांवरुन तो ओळखू येईल. 
कुविद्येचा प्राणी असे । तो कठिण निरुपणें त्रासे ।
अवगुणाची समृद्धि असे । म्हणौनियां ॥ ३ ॥
३) कुविद्येचा माणुस अति अवगुणी असतो. ते जावेत म्हणून कोणी त्यास कांहीं सांगू लागला तर त्यामुळे कुविद्येचा माणुस त्रासतो.   
श्र्लोक ॥
दंभो दर्पोऽभिमानश्च क्रोधः पारुष्यमेव च ।
अज्ञानं चाभिजातस्य पार्थ संपदमासुरीम् ॥
काम क्रोध मद मत्सर । लोभ दंभ तिरस्कार ।
गर्व ताठा अहंकार । द्वेष विषाद विकल्पी ॥ ४ ॥
आशा ममता तृष्णा कल्पना । चिंता अहंता कामना भावना ।
असूया अविद्या ईषणा वासना । अतृप्ती लोलंगता ॥ ५ ॥
इछ्या वांछ्या चिकिछ्या निंदा । आनित्य ग्रामणी मस्ती सदा ।
जाणीव अवज्ञा विपत्ती आपदा । दुर्वृत्ती दुर्वासना ॥ ६ ॥    
स्पर्धा खटपट आणी चटपट । तर्‍हे झटपट आणी वटवट ।
सदा खटखट आणी लटपट । परम वेथा कुविद्या ॥ ७ ॥
४-७) कामी, क्रोधी, मदाने, मत्सराने भरलेला, लोभी, दंभी, तिरस्कार करणारा, गर्विष्ठ, ताठा, अहंकारी, द्वेषी, विषादी, विकल्पी, आशा, ममता, तृष्णा, कल्पनांत रमणारा, चिंताग्रस्त, अहंता, कामना, भावना, असूया, अविद्या, ईषणा, वासना, अतृप्ती, लोलंगता, इच्छा, वासना, चिकित्सा, निंदा, अनीति, गुंडगिरी, सदा मस्तवाल, अवज्ञा, विपत्ति, आपदा, दुर्वृत्ती, दुर्वासना, स्पर्धा, खटपट, तर्‍हेवाईकपणा, अस्वस्थता, घाईंत काम उकणारा, अस्वस्थ, वटवट्या, तक्रारखोर, या लक्षणांनी कुविद्या प्रगट होते.  
कुरुप आणि कुलक्षण । अशक्त आणी दुर्जन । 
दरिद्री आणि कृपण । आतिशयेंसीं ॥ ८ ॥
८) कुविद्येचा मनुष्य कुरुप, हीन लक्षणी, अशक्त, दुर्जन, दरिद्री आणि अतिशय कंजुष असतो. 
आळसी आणि खादाड । दुर्बळ आणी लाताड ।
तुटक आणी लाबाड । आतिशयेंसीं ॥ ९ ॥
९) तो अत्यंत आळशी, खादाड, दुर्बळ, लाथा मारणारा, अति लबाड व दुसर्‍यास तोडून बोणारा असतो. 
मूर्ख आणी तपीळ । वेडें आणी वाचाळ ।
लटिकें आणी तोंडाळ । आतिशयेंसीं ॥ १० ॥
१०) तो मूर्ख, तापट, वेडपट, वाचाळ, खोटारडा व फार तोंडाळ असतो.
नेणे आणी नायके । न ये आणी न सीके ।
न करी आणी न देखे । अभ्यासदृष्टी ॥ ११ ॥
११) कुविद्या ज्याच्या आंगी त्याला स्वतःला काही कळत नसूनही दुसर्‍याने सांगितलेलेही तो ऐकत नाही. काही येत नाही व दुसर्‍याकडून काही शिकतही नाही. स्वतः करत नाही व अभ्यासूपणे बघतही नाही.
अज्ञान आणी अविश्र्वासी । छळवादी आणी दोषी । 
अभक्त आणी भक्तांसी । देखों सकेना ॥ १२ ॥
१२) तो अज्ञानी व अविश्र्वासु असतो. छळवादी व ज्यांतत्यांत दोष काढणारा असतो. स्वतः भक्ती न करणारा व भक्ती करणाराचा द्वेष करणारा असतो.
पापी आणी निंदक । कष्टी आणी घातक । 
दुःखी आणी हिंसक । आतिशयेंसीं ॥ १३ ॥
१३) तो पापी असून सतत कोणाची तरी निंदा करत असतो. क्लेश भोगत असून  दुसर्‍यांचा घात करणारा, दुःखी व अति निर्दयी असतो. 
हीन आणी कृत्रिमी । रोगी आणी कुकर्मी ।
आचंगुल आणी अधर्मी । वासना रमे ॥ १४ ॥
१४) तो हीन व ढोंगी, रोगी व वाईट कामे करणारा, कृपण व अधार्मिक वासनेचा असतो.
हीन देह आणी ताठा । अप्रमाण आणी फांटा ।
बाष्कळ आणी करंटा । विवेक सांगे ॥ १५ ॥
१५) हीन देहाचा व अभिमानी, वाह्यात, फाटे फोडणारा, वायफळ बडबड करणारा, दुर्दैवी व लोकांना उपदेश करणारा असतो.
लंडी आणी उन्मत्त । निकामी आणी डुल्लत ।
भ्याड आणी बोलत । पराक्रमु ॥ १६ ॥
१६) तो भित्रा व उद्धट; बिनकामाचा व पोकळ बडेजाव मिरविणारा, भित्रा व आपल्या पराक्रमाच्या (खोट्या) गोष्टी सांगणारा असतो. 
कनिष्ठ आणी गर्विष्ठ । नुपरतें आणी नष्ट ।
द्वेषी आणी भ्रष्ट । आतिशयेंसीं ॥ १७ ॥
१७) तो कमी योग्यतेचा व गर्विष्ट; व्यसनी व विषयासक्त, लोकांचा द्वेष करणारा व अतिशय भ्रष्ट असतो.
अभिमानी आणी निसंगळ । वोडगस्त आणी खळ ।
दंभिक आणी अनर्गळ । आतिशयेंसीं ॥ १८ ॥
१८) अभिमानी व योग्य बंधन झुगारणारा, ओढग्रस्त परिस्थितीचा व दुष्ट, ढोंगी व अति उच्छृंखल असतो.
वोखटें आणी विकारी । खोटें आणी अनोपकारी ।
अवलक्षण आणी धिःकारी । प्राणीमात्रासी ॥ १९ ॥
१९) वाईट व विकाराधीन, खोटारडा व अनोपकारी, अवलक्षणी व दुसर्‍यांचा तिरस्कार करणारा असतो.
अल्पमती आणी वादक । दीनरुप आणी भेदक ।
सूक्ष्म आणी त्रासक । कुशब्देंकरुनि ॥ २० ॥
२०) कमी बुद्धीचा असुनही वाद घालणारा, भिकार्‍यासारखा असुनही दुसर्‍या टोचून बोलणारा, बारीकसारीक गोष्टींत दुसर्‍यास वाईट शब्दांनी बोलणारा असतो.
कठिणवचनी कर्कशवचनी । कापट्यवचनी संदेहवचनी ।
दुःखवचनी तीव्रवचनी । क्रूर निष्ठुर दुरात्मा ॥ २१ ॥
२१) कर्कश्य आवाजांत कठिण शब्दांनी दुसर्‍यास बोलणारा, कपटाने व संशयाने बोलणारा, दुःखदायक व बोचर्‍या शब्दांनी बोलणारा, क्रुर व निष्ठुर असा कुलक्षणी असतो.
न्यूनवचनी पैशून्यवचनी । अशुभवचनी आनित्यवचनी ।
द्वेषवचनी अनृत्यवचनी । बाष्कळवचनी धिःकारु ॥ २२ ॥
२२) कमतरता शोधून त्याबद्दल बोलणारा, (किंवा दुसर्‍याची चूक शोधुन त्यास बोलणारा); घातकाने बोलणारा, अशुभ बोलणारा, वायफळ बोलणारा, द्वेषाने बोलणारा, खोटे बोलणारा, सतत धिःकाराने बोलणारा असा असतो.   
कपटी कुटिळ गाट्याळ । कुर्टें कुचर नट्याळ ।   
कोपी कुधन टवाळ । आतिशयेंसीं ॥ २३ ॥  
२३) तो कपटी, वाईट बुद्धीचा, आतल्या गाठीचा, क्षुद्र बुद्धिचा, कामचुकार, नाठाळ, रागीट, पापी मार्गाने द्रव्य मिळविणारा आणि अतिशय टवाळखोर असतो.
तपीळ तामस अविचार । पापी अनर्थी अपस्मार ।
भूत समंधी संचार । आंगीं वसे ॥ २४ ॥
२४) तो कुलक्षणी तापट, तामसी, अविचारी, पापी, अनर्थ करणारा, अपस्मारी व अंगांत भूत, समंध यांचा संचार असलेला असा असतो.
आत्महत्यारा स्त्रीहत्यारा । गोहत्यारा ब्रह्महत्यारा ।
मातृहत्यारा पितृहत्यारा । माहापापी पतित ॥ २५ ॥
२५) तो आत्मघातकी, स्त्रीघातकी, गायीला मारणारा, ब्राह्मणास मारणारा, आई-वडिलांचा घात करणारा, असा महापापी, पतित असतो.
उणें कुपात्र कुतर्की । मित्रद्रोही विस्वासघातकी ।
कृतघ्न तल्पकी नारकी । अतित्याई जल्पक ॥ २६ ॥
२६) तो सर्व बाबतींत कनिष्ठ, अयोग्य, वाईट तर्क करणारा, मित्रा द्रोह करणारा, विश्वासघातकी, कोणी केलेले उपकार न जाणणारा, परस्त्रीशी रत होणारा, नरकांत जाण्यास योग्य असलेला, आततयी व बडबड्या असा असतो.
किंत भांडण झगडा कळ्हो । अधर्म अनराहाटी शोक संग्रहो ।
चाहाड वेसनी विग्रहो । निग्रहकर्ता ॥ २७ ॥
२७) तो संशयी, भांडखोर, झगडा करणारा, कलह घालणारा, अधर्मी, सदोदीत शोक करणारा, राहाटीप्रमाणे न राहणारा, चहाडखोर, व्यसनी, भेदाभेद करणारा व मोठा हट्टी असतो. 
द्वाड आपेसी वोंगळ । चाळक चुंबक लच्याळ । 
स्वार्थी अभिळासी वोडाळ । आद्दत्त झोड आदखणा ॥ २८ ॥
२८) तो खोडकर, अपयशी, घाणेरडा, चाळवणारा, कवडीचुंबक, लोचट, स्वार्थी, हावरा, स्वैर वर्तनी, अपरोपकारी (घट्ट मुठीचा), शिरजोर, दुसर्‍याचे चांगले झालेले बघु न शकणारा असा असतो.
शठ शुंभ कातरु । लंड तर्मुंड सिंतरु ।
बंड पाषांड तश्करु । अपहारकर्ता ॥ २९ ॥
२९) कुलक्षणी लबाड, मठ्ठ, प्रसंगी काचकुच करणारा, बेपर्वाईने वागणारा, लुडबुड करणारा, लफंगा, उद्धट, गाजावाजा करणारा, चोर व दुसर्‍याच्या वस्तु पळविणारा असतो.
धीट सैराट मोकाट । चाट चावट वाजट ।
थोट उद्धट लंपट । बटवाल कुबुद्धी ॥ ३० ॥
३०) तो कुलक्षणी धीट, स्वैराचारी, मोकाट, चटोर, चावट, गाजावाजा करणारा, थोतांड रचणारा, उद्धट, लंपट, भ्रष्ट व वाईट बुद्धीचा असतो.
मारेकरी वरपेकरी  । दरवडेकरी खाणोरी । 
मैंद भोंदु परद्वारी । भुररेकरी चेटकी ॥ ३१ ॥
३१) तो मारेकरी, लुटारु, दरवडेखोर, घरांना खणून धन शोधणारा, भोंदू, परद्वारी वास करणारा, भुल पाडणारा व चेटुक करणारा असतो.
निशंक निलाजिरा कळभंट । टौणपा लौंद धट उद्धट ।
ठस ठोंबस खट नट । जगभांड विकारी ॥ ३२ ॥
३२) तो कुलक्षणी निःशंक, निलाजरा, कळलाव्या, निरुद्योगी, पुष्ट, धटिंगण, उद्धट, उर्मट, चिवट, खट्याळ, नाटकी, सर्वांशी भांडणारा व विकाराधिन असतो.
अधीर आळिका अनाचारी । अंध पंगु खोंकलेकरी ।
थोंटा बधिर दमेकरी । तर्‍ही ताठा न संडी ॥ ३३ ॥
३३) तो कुलक्षणी उतावळा, कोणावरही उगाच आळ घेणारा, अनाचारी, आंधळा, पांगळा, खोंकणारा, थोटा, बहिरा, दमेकरी, असा असूनही आपला ताठा न सोडणारा असतो.
विद्याहीन वैभवहीन । कुळहीन लक्ष्मीहीन ।
शक्तिहीन सामर्थ्यहीन । अदृष्टहीन भिकारी ॥ ३४ ॥
बळहीन कळाहीन । मुद्राहीन दीक्षाहीन ।
लक्षणहीन लावण्यहीन । आंघीन विपारा ॥ ३५ ॥
युक्तिहीन बुद्धिहीन । आचारहीन विचारहीन ।
क्रियाहीन सत्वहीन । विवेकहीन संशई ॥ ३६ ॥
भक्तिहीन भावहीन । ज्ञानहीन वैराग्यहीन ।
शांतिहीन क्ष्माहीन । सर्वहीन क्षुल्लकु ॥ ३७ ॥
३४-३७) बळहीन, कळाहीन, मुद्राहीन, दीक्षाहीन, लक्षणहीन, लावण्यहीन, अंगहीन, विद्रुप, युक्तिहीन, बुद्धिहीन, आचारहीन, विचारहीन, क्रियाहीन, सत्वहीन, विवेकहीन, संशयी, भक्तिहीन, भावहीन, ज्ञानहीन, वैराग्यहीन, शांतिहीन, क्षमाहीन, सर्वहीन व क्षुल्लक असतो.       
समयो नेणे प्रसंग नेणे । प्रेत्न नेणे अभ्यास नेणे ।
आर्जव नेणे मैत्री नेणे । कांहींच नेणे अभागी ॥ ३८ ॥
३८) त्याला काळ, वेळ, प्रसंग कळत नाही. प्रयत्न कळत नाही, अभ्यास कळत नाही, आर्जव कळत नाही, मैत्री कशी टिकवावी कळत नाही. थोडक्यांत त्याला काहींच कळत नाही. असा तो अभागी कुलक्षणी असतो. 
असो ऐसे नाना विकार । कुलक्षणाचें कोठार ।
ऐसा कुविद्येचा नर । श्रोतीं वोळखावा ॥ ३९ ॥
३९) असे अनेक नानाप्रकारचे दोष अंगी असतात, नाना कुलक्षणांचे तो कोठारच असतो. कुविद्येच्या माणसाला अशा प्रकारे लोकांनी ओळखावे.
ऐसीं कुविद्येचीं लक्षणें । ऐकोनि त्यागचि करणें ।
अभिमानें तर्‍हें भरणें । हें विहित नव्हे ॥ ४० ॥
४०) अशी ही कुविद्येची लक्षणे ऐकून लोकांनी त्यांचा त्याग करावा. अभिमानाने ही लक्षणे न सोडण्याचा हट्ट धरणे योग्य नाही. 

॥ इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे कुविद्यालक्षणनाम समास तिसरा ॥
Samas Tisara Kuvidya Lakshan 
समास तिसरा कुविद्या लक्षण


Custom Search
Post a Comment