Tuesday, December 20, 2016

Samas Dahava NardehStavan Nirupan समास दहावा नरदेहस्तवननिरुपण,


Dashak Pahila Samas Dahava NardehStavan Nirupan 
Samas Dahava NardehStavan Nirupan is in Marathi. In this Samas, Samarth is telling us the importance. Why Nardeh is very important. Nardeh is obtaining after many births, so we have to use it wisely. Nardeh makes a person to attain Moksha or Mukti possible. In any other animal it is not possible. There are many examples of those who had attained Moksha. Further he also explained us that the body, one has obtained is not only of him, there are many others who can claim that the body belongs to them.
समास दहावा नरदेहस्तवननिरुपण
श्रीराम ॥
धन्य धन्य हा नरदेहो । येथील अपूर्वता पाहो ।
जो जो कीजे परमार्थलाहो । तो तो पावे सिद्धीतें ॥ १ ॥ 
अर्थ
१) हा नरदेह फार धन्य आहे. याची अपूर्वता अशी आहे की, परमार्थ साधावा म्हणून जो जो प्रयत्न करावा तो यशस्वी होतो.
या नरदेहाचेनि लागवेगें । येक लागले भक्तिसंगे ।
येकीं परम वीतरागें । गिरिकंदरें सेविलीं ॥ २ ॥
२) या नरदेहाच्या प्राप्तीमुळे कांहींजण भक्तिमार्गास लागले तर कांहींजण वैराग्य धारण करुन डोंगर-दर्‍यांत जाऊन राहीले. (हे सर्व परमार्थ लाभावा म्हणून)
येक फिरती तीर्थाटणें । करिती पुरश्र्चरणें ।
येक अखंड नामस्मरणें । निष्ठावंत राहिले ॥ ३ ॥
३) कांहींजण तीर्थयात्रा करतात तर कांहींजण पुरश्र्चरणें करतात तर कांहींजण मोठ्या निष्ठेने नामस्मरण करतात.
येक तपें करुं लागले । येक योगाभ्यासी माहाभले ।
येक अभ्यासयोगें जाले । वेदशास्त्रीं वित्पन्न ॥ ४ ॥
४) कांहीजण तपें करु लागलें, तर कांहीं महाजन योगाभ्यासी झाले. कोणी अभ्यासानें वेदशास्त्रसंपन्न असे मोठे विद्वान झाले.
येकीं हटनिग्रह केला । देह अत्यंत पीडिला ।
येकीं देव ठांई पाडिला । भावार्थबळें ॥ ५ ॥
५) काहीं जणांनी हटयोगाचा मार्ग धरुन देहास फार कष्टविले. काहींनी देव आहे असा श्रद्धाभाव वाढवून देवास आपला केला.
येक माहानुभाव विख्यात । येक भक्त जाले ख्यात ।
येक सिद्ध अकस्मात । गगन वोळगती ॥ ६ ॥
६) कोणी मोठे महात्मा म्हणुन तर कोणी मोठे भक्त म्हणुन विख्यात झाले. कोणी सिद्धि मिळवून गगनाला गवसणी घालण्याची सिद्धि मिळवून मोठे झाले.
येक तेजीं तेजचि जाले । येक जळीं मिळोन गेले ।
येक ते दिसतचि अदृश्य जाले । वायोस्वरुपी ॥ ७ ॥
७) कोणी तेजरुपी होऊन तेजांत, तर कोणी पाण्यांत आपरुप होऊन मिसळून गेले.  तर कोणी वायुरुप होऊन अदृश्य झाले.
येक येकचि बहुधा होती । येक देखतचि निघोन जाती ।
येक बैसले असतांचि भ्रमति । नाना स्थानीं समुद्रीं ॥ ८ ॥
८) कोणी अनेक रुपें घेऊ लागले, तर कोणी बघता बघता अदृश्य होऊ लागले. कोणी एका जागी बसले असूनही अनेक ठिकाणी हिंडून येतात. अगदी समुद्रांतही फिरुन येतात.
येक भयानकावरी बैसती । येक अचेतनें चालविती ।
येक प्रेतें उठविती । तपाबळेंकरुनी ॥ ९ ॥
९) कोणी हिंस्र श्वापदांवर सत्ता गाजवून बसतात. तर कोणी अचेतन वस्तु चालवितात. तर कोणी तपोबळाने मेलेल्या माणसांना जिवंत करतात.
येक तेजें मंद करिती । येक जळें आटविती ।
येक वायो निरोधिती । विश्र्वजनाचा ॥ १० ॥
१०) कोणी तेज स्वबळावर मंद (निःप्रभ) करतात. तर कोणी जलाशयांना आटवून टाकतात. काहींजण विश्र्वजनांचा प्राण म्हणजे वायु रोखून धरतात.
ऐसे हटनिग्रही कृतबुद्धी । जयांस वोळल्या नाना सिद्धि ।
ऐसे सिद्ध लक्षावधी । होऊन गेले ॥ ११ ॥
११) कोणी निग्रहाने बुद्धिपूर्वक नाना सिद्धि अवगत करुन घेतात. असे लक्षावधि सिद्ध होऊन गेले.
येक मनोसिद्ध येक वाचासिद्ध । येक अल्पसिद्ध येक सर्वसिद्ध ।
ऐसे नाना प्रकारीचे सिद्ध । विख्यात जाले ॥ १२ ॥
१२) त्यांच्या मनांत येईल ते घडविणारे मनोसिद्ध, जसे बोलतील तसे घडवणारे वाचासिद्ध, काहीं थोड्या सिद्धि जाणणारे तर सर्व सिद्धि जाणणारे कांहीजण मोठे विख्यात झाले.
येक नवविधाभक्तिराजपंथे । गेले परलोकींच्या निजस्वार्थें ।
येक योगी गुप्तपंथें । ब्रह्मभुवना पावले ॥ १३ ॥
१३) कोणी नवविधाभक्तिच्या राजपंथाने जाऊन स्वस्वरुपाचा निजस्वार्थाने अनुभव घेऊन कृतार्थ झाले. तर कांहीं गुप्तमार्गाने ब्रह्मलोकीं गेले.
येक वैकुंठास गेले । येक सत्यलोकीं राहिले ।
येक कैळासीं बैसले । शिवरुप होऊनी ॥ १४ ॥
१४) कांहींजण ब्रह्मज्ञान मिळवून वैकुंठास गेले  तर कांहीं सत्यलोकीं गेले. कांहींजण सिवरुप होऊन कैलासांत जाऊन बसले.
येक इंद्रलोकीं इंद्र जाले । येक पितृलोकीं मिळाले ।
येक ते उडगणीं बैसले । येक ते क्षीरसागरीं ॥ १५ ॥
१५) कांहींजण इंद्रलोकांत इंद्र होऊन, तर कांहींजण पितृलोकांत जाऊन बसले. तर कांहींजण नक्षत्रलोकीं तर कांहींजण क्षीरसागरी गेले.
सलोकता समीपता । स्वरुपता सायोज्यता । 
या चार मुक्ती तत्वता । इच्छा सेऊन राहिले ॥ १६ ॥
१६) ज्या चार मुक्ती म्हटल्या जातात, सलोकता, समीपता, स्वरुपता आणि सायोज्यता यापैकी ज्याला जी योग्य वाटली तीच्या मार्गे कांहींजण गेले.
ऐसे सिद्ध साधु संत । स्वहिता प्रवर्तले अनंत ।
ऐसा हा नरदेह विख्यात । काय म्हणौनि वर्णावा ॥ १७ ॥
१७) याप्रमाणे असंख्य साधु, सिद्ध, संत स्वस्वरुप जाणण्याच्या मार्गे या प्रसिद्ध नरदेहाच्यामुळेंच गेले. तेव्हा या नरदेहाचा महिमा काय वर्णावा ?
या नरदेहाचेनि आधारें । नाना साधनांचेनि द्वारें ।
मुख्य सारासारविचारें । बहुत सुटले ॥ १८ ॥
१८) या नरदेहामुळेंच अनेक साधनांच्यामार्गे स्वहित साधता येते. परंतु मुख्य सारासार विचारानेंच बहुतेकजण मुक्त झाले.
या नरदेहाचेनि संमंधें । बहुत पावले उत्तम पदें ।
अहंता सांडून स्वानंदें । सुखी जाले ॥ १९ ॥
१९) या नरदेहामुळेंच अहंकाराचा त्याग करुन पुष्कळजण आत्मानंदाची प्राप्ती करुन घेऊन उत्तम पदे मिळवते झाले.
नरदेहीं येऊन सकळ । उधरागती पावले केवळ ।
येथें संशयाचे मूळ । खंडोन गेलें ॥ २० ॥
२०) या नरदेही येऊनच सकळ उत्तम गती लाभले. तेव्हां हा नरदेह श्रेष्ठ आहे याबद्दल आता कोणास संशय राहणार नाही.
पशुदेहीं नाहीं गती । ऐसे सर्वत्र बोलती ।
म्हणौन नरदेहींच प्राप्ती । परलोकाची ॥ २१ ॥
२१) पशुदेहांमधे उत्तम गती मिळत नाही, असे सर्वत्र बोलले जाते. म्हणूनच परलोकाची प्राप्ती नरदेहामुळेंच होते हे नक्की.
संत महंत ऋषी मुनी । सिद्ध साधु समाधानी । 
भक्त मुक्त ब्रह्मज्ञानी । विरक्त योगी तपस्वी ॥ २२ ॥
तत्त्वज्ञानी योगाभ्यासी । ब्रह्मच्यारी दिगंबर संन्यासी । 
शडदर्शनी तापसी । नरदेहींच जाले ॥ २३ ॥
२२-२३) या नरदेही कोणकोण झाले ते पाहा. संत, महंत, ऋषी, मुनी, सिद्ध, साधु, समाधानी, भक्त, मुक्त, ब्रह्मज्ञानी, विरक्त, योगी, तपस्वी, तत्वज्ञानी, योगाभ्यासी, ब्रह्मचारी, दिगंबर, संन्यासी, शड्दर्शनी, तापसी आदी. 
म्हणौनि नरदेह श्रेष्ठ । नाना देहांमधें वरिष्ठ ।
जयाचेनि चुके आरिष्ट । येमयातनेचें ॥ २४ ॥
२४) म्हणून नरदेह सर्व देहांमधे श्रेष्ठ, ज्याच्यामुळे यम यातनेचे दुःख टळू शकते.
नरदेह हा स्वाधेन । सहसा नव्हे पराधेन ।
परंतु हा परोपकारीं झिजऊन । कीर्तिरुपें उरवावा ॥ २५ ॥
२५) नरदेह हा स्वतंत्र आहे. तो पराधीन सहसा होत नाही. परंतु या नरदेहाद्वारे परोपकार करुन कीर्तिरुपाने तो मागे ठेवावा.  
अश्र्व वृषभ गाई म्हैसी । नाना पशु स्त्रिया दासी ।
कृपाळूपणें सोडितां त्यांसी । कोणी तरी धरील ॥ २६ ॥
तैसा नव्हे नरदेहो । इछा जाव अथवा राहो । 
परी यास कोणी पाहो । बंधन करुं सकेना ॥ २७ ॥
२६-२७) घोडे, बैल, गाऊ, म्हशी, अनेक पशु, स्त्रिया, दासी जर दया म्हणुन मोकळे सोडले तर त्यांना कोणीतरी धरेल. परंतु नरदेहाचे मात्र असे नाही, बाहेर किंवा आंत आपल्या इच्छेने राहीला तरी त्याला कोणी पकडू शकत नाही.
नरदेह पांगुळ असता । तरी तो कार्यास न येतां ।
अथवा थोंटा जरी असता । तरी परोपकारस नये ॥ २८ ॥
२८) नरदेह पांगळा असेल तर तो कार्यास येत नाही किंवा थोटा असेल तर परोपकाराच्या कामी येत नाही.
नरदेह अंध असिला । तरी तो निपटचि वायां गेला ।
अथवा बधिर जरी असिला । तरी निरुपण नाहीं ॥ २९ ॥
२९) तो आंधळा असेल तर पूर्णपणे वायाच गेला. बहिरा असेल तर निरुपण, प्रवचन श्रवण करता येत नाही.
नरदेह असिला मुका । तरी घेतां नये आशंका । 
अशक्त रोगी नासका । तरी तो निःकारण ॥ ३० ॥
३०) नरदेह असेल तर त्याला शंका बोलून दाखविता येत नाहीत.  अशक्त, रोगी किंवा नासका असेल तर तो कांहींच कामाचा नाही. 
नरदेह असिला मूर्ख । अथवा फेंपर्‍या समंधाचें दुःख ।
तरी तो जाणावा निरार्थक । निश्र्चयेंसीं ॥ ३१ ॥       
३१) तो मूर्ख असेल, त्याला फेफर्‍यांचे  दुःख असेल किंवा समंधाने पछाडला असेल  तर (परमार्थाच्या) कामी निरुपयोगीच होतो.
इतुकें हे नस्तां वेंग । नरदेह आणी सकळ सांग ।
तेणें धरावा परमार्थमार्ग । लागवेगें ॥ ३२ ॥
३२) ही वर वर्णिलेली व्यंगे नसतील आणि तो नरदेह चांगला धष्ट असेल तर त्यानें वेळ न दवडता लगेचच परमार्थाचा मार्ग धरावा.        
सांग नरदेह जोडलें । आणी परमार्थबुद्धि विसर्लें ।
तें मूर्ख कैसें भ्रमलें । मायाजाळीं ॥ ३३ ॥  
३३) चांगला नरदेह मिळुनही मूर्ख परमार्थाचा मार्ग विसरले आणि मायेच्या जाळ्यांत कसे गुरफटले. 
मृत्तिका खाणोन घर केलें । ते माझें ऐसें दृढ कल्पिलें ।
परी तें बहुतांचें हें कळलें । नाहींच तयासी ॥ ३४ ॥
३४) कोणी एकअसाच मूर्ख घर बांधतो आणि भ्रमांत राहतो की हें माझे घर आहे. परंतु त्याला माहीत नसते की हे घर पुष्कळांचे असते.
मुष्यक म्हणती घर आमुचें । पाली म्हणती घर आमुचें ।
मक्षिका म्हणती घर आमुचें । निश्र्चयेंसीं ॥ ३५ ॥
कांतण्या म्हणती घर आमुचें । मुंगळे म्हणती घर आमुचें ।
मुंग्या म्हणती घर आमुचें । निश्र्चयेंसीं ॥ ३६ ॥
विंचू म्हणती आमुचें घर । सर्प म्हणती आमुचें घर ।
झुरळें म्हणती आमुचें घर । निश्र्चयेंसीं ॥ ३७ ॥
भ्रमर म्हणती आमुचें घर । भिंगोर्‍या म्हणती आमुचें घर ।
आळिका म्हणती आमुचें घर । काष्ठामधें ॥ ३८ ॥
मार्जरें म्हणती आमुचें घर । स्वानें म्हणती आमुचें घर ।
मुंगसें म्हणती आमुचें घर । निश्र्चयेंसीं ॥ ३९ ॥
पुंगळ म्हणती आमुचें घर । वाळव्या म्हणती आमुचें घर ।
पिसुवा म्हणती आमुचें घर । निश्र्चयेंसीं ॥ ४० ॥
ढेंकुण म्हणती आमुचें घर । चांचण्या म्हणती आमुचें घर । 
घुंगर्डी म्हणती आमुचें घर । निश्र्चयेंसी ॥ ४१ ॥
पिसोळेम्हणती आमुचें घर । गांधेले म्हणती आमुचें घर । 
सोट म्हणती आमुचें घर । आणी गोंबी ॥ ४२ ॥ 
बहुत किड्यांचा जोजार । किती सांगावा विस्तार ।
समस्त म्हणती आमुचें घर । निश्र्चयेंसी ॥ ४३ ॥  
३५-४३) किती कोण कोण म्हणतात की हे घर माझे आहे तें आता बघा. उंदिर म्हणतात माझे घर, पाली म्हणतात माझे घर, माश्या म्हणतात आमचे घर, याप्रमाणे कांतण्या, मुंगळें, मुंग्या, विंचू, सर्प, झुरळें, भुंगे, भिंगोर्‍या, आळ्या, मांजरे, कुत्री, मुंगुसे, पुंगळ, वाळव्या, पिसवा, ढेंकुण, चांचण्या, घुंगर्डी, पिसोळे, गांधेले, सोट, गोंवी, असें सर्व किडें किती म्हणुन सांगावे, हे सर्व म्हणतात माझे घर.
पशु म्हणती आमुचें घर । दासी म्हणती आमुचें घर । 
घरींची म्हणती आमुचें घर । निश्र्चयेंसी ॥ ४४ ॥  
पाहुणे म्हणती आमुचें घर । मित्र म्हणती आमुचें घर ।
ग्रामस्त म्हणती आमुचें घर । निश्र्चयेंसीं ॥ ४५ ॥
तश्कर म्हणती आमुचें घर । राजकी म्हणती आमुचें घर ।
आग्न म्हणे आमुचें घर । भस्म करुं ॥ ४६ ॥
४४-४६) पशु, दासी, घरांतील सर्व, पाहुणें, मित्र, ग्रामस्त, चोर, राजसेवक, अग्नि आपलेंच म्हणुन भस्म करुं म्हणतो.
समस्त म्हणती घर माझें । हे मूर्खहि म्हणे माझें माझें ।
सेवट जड जालें वोझें । टाकिला देश ॥ ४७ ॥
४७) सर्व म्हणतात माझेंच घर. शेवटी हे घराचे ओझें जड होऊन गांव सोडून निघुन जातो. 
अवघीं घरें भंगलीं । गावांची पांढरी पडिली ।
मग ते गृहीं राहिलीं । आरण्यस्वापदें ॥ ४८ ॥
४८) अशा प्रकारे गावांतील सर्व घरे कांही काळाने पडतात. गांव ओस पडतो. आणि श्वापदे तेथे राहु लागतात.
किडा मुंगी वाळवी मूषक । त्यांचेच घर हें निश्र्चयात्मक ।
हें प्राणी बापुडें मूर्ख । निघोन गेलें ॥ ४९ ॥
४९) खरे म्हणजे किडा, मुंगी, वाळवी, उंदिर यांचेच ते घर असते. माझे माझे म्हणणारा मूर्ख मात्र निघुन जातो.
ऐसी गृहांची स्थिती । मिथ्या आली आत्मप्रचिती ।
जन्म दों दिसांची वस्ती । कोठें तरी करावी ॥ ५० ॥
५०) अशी घराची प्रचिती येऊन माझे म्हणणे खोटे हे समजुन येते. या दोन दिवसांच्या जन्माची वस्ती कोठेंतरी करावी. 
देह म्हणावें आपुलें । तरी हें बहुतां कारणें निर्मिलें ।
प्राणीयांच्या माथां घर केले । वा मस्तकीं भक्षिती ॥ ५१ ॥
रोमेमुळीं किडे भक्षिती । खांडुक जाल्यां किडे पडती ।
पोटामध्यें जंत होती । प्रत्यक्ष प्राणियांच्या ॥ ५२ ॥
कीड लागे दांतासी । कीड लागे डोळ्यांसीं ।
कीड लागे कर्णासी । आणी गोमाशा भरती ॥ ५३ ॥    ५१-५३) देह माझा म्हणावा तर तेही खोटेच कारण घरासारखाच तो देहसुद्धा अनेकांसाठींच निर्मिला असतो. जसे कीं डोक्यांत उवा होतात. केसांच्या मुळाशी राहतात व मांस खातात. गळवे होऊन त्यांत किडे पडतात. पोटांत जंत होतात. दांताला, डोळ्यांना, कानाला किड लागते. गोमाशा मग त्रास देतात.      
गोंचिड अशुद्ध सेविती । चामवा मांसांत घुसती ।
पिसोळे चाऊन पळती । अकस्मात ॥ ५४ ॥
५४) रक्त पिपासु गोचिड रक्त पितात. चामवा मांसांत शिरतात. पिसोळे येऊन चावतात.
भोंगे गांधेलें चाविती । गोंवी जळवा अशुद्ध घेती ।
विंचू सर्प दंश करिती । कानटें फुर्सीं ॥ ५५ ॥
५५) भुंगे, गांधिलमाशा चावतात. गोमा व जलवा रक्त पितात. विंचु, साप, फुरशीं, घोणस दंश करतात.
जन्मून देह पाळिले । तें अकस्मात व्याघ्रें नेलें ।
कां तें लांडगींच भक्षिलें । बळात्कारें ॥ ५६ ॥
मूषकें मांजरे दंश करिती । स्वानें अश्र्वें लोले तोडिती ।
रीसें मर्कटें मारिती । कासावीस करुनी ॥ ५७ ॥    
उष्टरें डसोन उचलिती । हस्थी चिर्डून टाकिती ।
वृषभ टोचून मारिती । अकस्मात ॥ ५८ ॥
तश्कर तडतडां तोडिती । भूतें झडपोन मारिती ।
असो या देहाची स्थिती । ऐसी असे ॥ ५९ ॥
ऐेसें शरीर बहुतांचें । मूर्ख म्हणे आमुचें ।
परंतु खाजें जिवाचें । तापत्रैं बोलिले ॥ ६० ॥
५६-६०) जन्मापासून सांभाळलेला देह अचानक वाघ घेऊन जातो. किंवा लांडगा खाऊन टाकतो.  उंदिर, मांजरे दंश करतात, कुत्री, घोडे लचके तोडतात. अस्वले, माकडे बोचकारुन कासावीस करतात. उंट चावतात. हत्ती देह चिरडून टाकतात. बैल शिंगांनी टोचून मारतात. चोर देहाचे तुकडे करतात. भूतें अंगांत शिरुन मारतात. अशी या देहाची अवस्था आहे. असा हा देह पुष्कळांचा आहे. पण मूर्ख म्हणतो माझा आहे. परंतु हा देह इतर जीवांचे खाद्य आहे. तापत्रय वर्णनांत ते पुढे येईल.
देह परमार्थीं लाविलें । तरीच याचें सार्थक जालें ।
नाहीं तरी हें वेर्थचि गेलें । नाना आघातें मृत्युपंथें ॥ ६१ ॥
असो जे प्रापंचिक मूर्ख । ते काये जाणती परमार्थसुख ।
त्या मूर्खाचें लक्षण कांहीं येक । पुढें बोलिलें असे ॥ ६२ ॥
६१-६२) देह परमार्थी लावला तरच त्याचे सार्थक होते अन्यथा नाना आघातांनी तो मृत्युमुखीं पडतो. असो प्रापंचिक सुखांत गुंतलेल्या मूर्खांना परमार्थांतील सुख उमजत नाही. अशा मूर्खांची कांहीं लक्षणें पुढें सागितली आहेत.         

॥ इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे नरदेहस्तवननिरुपणनाम समास दहावा ॥
Samas Dahava NardehStavan Nirupan 
समास दहावा नरदेहस्तवननिरुपण


Custom Search

No comments: