Sunday, December 11, 2016

Dashak Pahila Samas Pachava SantaStavan समास पांचवा संतस्तवन


Dashak Pahila Samas Pachava SantaStavan 
Samas Pachava, SantaStavan is in Marathi. In the area of spirituality a gentleman who knows Brahma, Atma and lives life of a very satisfied person is known as Santa. He knows that he is not a body but he knows Atma which lives in the body. He knows his real purpose of life. People lives in his company also every opportunity to follow him and acquire Brahma Gyana. In this Samas Samarth Ramdas is praising the Santa.
समास पांचवा संतस्तवन
श्रीराम ॥
आतां वंदीन सज्जन । जे परमार्थाचें अधिष्ठान ।
जयांचेनि गुह्यज्ञान । प्रगटे जनीं ॥ १ ॥
अर्थ
१) आतां मी संतांना जे सज्जन असून परमार्थाचा आधार आहेत त्यांना नमस्कार करतो. त्यांच्यामुळे जे गुप्त असे आत्मस्वरुपाचे ज्ञान लोकांमधे प्रगट होते.
जे वस्तु परम दुल्लभ । जयेचा अलभ्य लाभ ।
तेंचि होये सुल्लभ । संतसंगेकरुनी ॥ २ ॥ 
२) संतांच्या संगतीमुळे जी परमात्मवस्तु दर्लभ आहे तीचा लाभ (लोकांना) सुलभ होतो.
वस्तु प्रगटचि असे । पाहातां कोणासीच न दिसे ।
नाना साधनीं सायासें । न पडे ठाईं ॥ ३ ॥
३) ती आत्मरुपाची वस्तु उघड आहे पण देहबुद्धीनें (मायेने) ती कोणालाच दिसत नाही. नाना प्रकारची साधने, प्रयास करुनही तीचा अनुभव येत नाही.
जेथे परीक्षवंत ठकले । नांतरी डोळस चि अंध जाले ।
पाहात असतांचि चुकले । निजवस्तूसी ॥ ४ ॥
४) आत्मवस्तु शोधुन काढण्यांत नाना वस्तु शोधुन काढु शकणारे परीक्षवंतसुद्धा फसतात. ते डोळे असुनही आंधळे होतात. ती वस्तु जवळच व पहात असुनही तीला पहायला चुकतात.
जें दीपाचेनि दिसेना । नाना प्रकाशें गवसेना ।
नेत्रांजनेंहि वसेना । दृष्टीपुढें ॥ ५ ॥
५) दिव्याच्या उजेडांत, निरनिराळ्या इतर अनेक प्रकाशांत ती सापडत नाही. डोळ्यांत तेल घालूनही ती दृष्टीला दिसत नाही.
सोळां कळी पूर्ण शशी । दाखऊं शकेना वस्तूसी ।
तीव्र आदित्य कळारासी । तोहि दाखविना ॥ ६ ॥
६) सोळा कळा असलेला पौर्णिमेचा चंद्र ती वस्तु दाखवु शकत नाही; सर्व कळांनीयुक्त असा तेजस्वी सूर्यसुद्धा ती वस्तु दाखवू शकत नाही.
जया सूर्याचेनि प्रकाशें । ऊर्णतंत तोहि दिसे ।
नाना सूक्ष्म पदार्थ भासे । अणुरेणादिक ॥ ७ ॥
७) कोळ्यांनी विणलेल्या जाळ्याचा बारीक धागा सूर्यप्रकाशांत दिसतो. अणु-रेणुसारखे अतिसूक्ष्म पदार्थ सूर्याच्या प्रकाशांत दिसतात. 
चिरलें वाळाग्र तेंहि प्रकासी । परी तो दाखविना वस्तूसी ।
ते जयाचेनि साधकांसी । प्राप्त होये ॥ ८ ॥
८) केससुद्धा चिरला तरीसुद्धा त्याचे टोक सूर्यप्रकाशांत दिसते. परंतु सूर्यप्रकाश ते दाखवू शकत नाही. ते (आत्मवस्तु) संताच्या सान्निध्यांत साधकाला दिसते.
जेथें आक्षेप आटले । जेथ प्रेत्न प्रस्तावले ।
जेथें तर्क मंदावले । तर्कितां निजवस्तूसी ॥ ९ ॥
९) त्या निजवस्तुपुढे सर्व शंका नाहीशा होतात, प्रयत्न व्यर्थ ठरतात व तर्कसुद्धा कमी पडतात.
वळे विवेकाची वेगडी । पडे शब्दाची बोबडी ।
जेथें मनाची तांतडी । कामा नये ॥ १० ॥     
 १०) विवेकाची लुळा पडतो, शब्दांची बोबडी वळते, आणि मनाची धडपड उपयोगी येत नाही.
जो बोलकेपणें विशेष । सहस्त्र मुखांचा जो शेष ।
तोहि सिणला निःशेष । वस्तु न संगवे ॥ ११ ॥
११) जो बोलण्यांत प्रवीण असा हजार तोंडांचा शेष नागसुद्धा त्या आत्मवस्तुचे वर्णन करतांना थकला. 
वेदे प्रकाशिलें सर्वहि । वेदविरहित कांही नाहीं ।
तो वेद कोणासहि । दाखऊं सकेना ॥ १२ ॥
१२) सगळे ज्ञान वेदांनी प्रकाशांत आणले. वेदांत नाही असे काहींच नाही. परंतु ते वेदही आत्मवस्तु दाखवू शकत नाहीत.
तेचि वस्तु संतसंगें । स्वानुभवें कळों लागे । 
त्याचा महिमा वचनीं सांगें । ऐसा कवणु ॥ १३ ॥
१३) संतसंगतीने मात्र साधकाला आत्मस्वरुपाचा स्वानुभव येऊं लागतो. त्याचा (संतांचा-संतसंगाचा) महिमा सांगु शकणारा असा कोणीच नाही.
विचित्र कळा ये मायेची । परी वोळखी न संगवे वस्तूची ।
मायातीता अनंताची । संत सोये सांगती ॥ १४ ॥
१४) मायेच्या वेगवेगळ्या शक्ती, कला त्या आत्मस्वरुपाची ओळख करुन देऊं शकत नाहीत. मायेच्या पलीकडे असलेल्या आत्मवस्तुचे ज्ञान संत सोप्या पद्धतीने साधकास करुन देतात.
वस्तूसी वर्णिलें नवचे । तेंचि स्वरुप संतांचें ।
या कारणें वचनाचें । कार्य नाहीं ॥ १५ ॥
१५) वाचेने वर्णन करता येत नाही असे ते आत्मस्वरुपच संत झालेले असतात. तेथे बोलण्याचा काही उपयोगच नाही.
संत आनंदाचे स्थळ । संत सुखचि केवळ ।
नाना संतोषाचें मूळ । ते हे संत ॥ १६ ॥
१६) संत म्हणजे आनंद, संत म्हणजे सुख आणि नाना प्रकारचा संतोष असे संत असतात.
संत विश्रांतीची विश्रांती । संत तृप्तीची निजतृप्ती ।
नांतरी भक्तीची फळश्रुती । ते हे संत ॥ १७ ॥    
 १७) संताजवळ कायम विश्रांती असते. तसेच त्यांच्याजवळ कायम तृप्ती असते. अंतरी असलेल्या भक्तीची फळश्रुती म्हणजे संत.   
संत धर्माचें धर्मक्षेत्र । संत स्वरुपाचें सत्पात्र ।
नातरी पुण्याची पवित्र । पुण्य भूमी ॥ १८ ॥
१८) संत म्हणजे धर्माचे धर्मक्षेत्र, संत म्हणजे आत्मस्वरुप ठेवलेले चांगले भांडे, संत म्हणजे पुण्य साठवलेली पुण्यभूमीच होय .
संत समाधीचें मंदिर । संत विवेकाचें भांडार ।
नातरी बोलिजे माहेर । सायोज्यमुक्तीचें ॥ १९ ॥
१९) संत म्हणजे समाधीरुपी देवाचे मंदिर, सुविचारांचा खजिना आणि सायोज्यमुक्तीचे माहेरच असते.
संत सत्याचा निश्र्चयी । संत सार्थकाचा जयो ।
संत प्राप्तीचा समयो । सिद्धरुप ॥ २० ॥
२०) संत म्हणजे दृढनिश्र्चयि सत्य, संत म्हणजे सफल जीवनाचा जय, संतांचा संग म्हणजे आत्मस्वरुप दर्शनाचा योग.
मोक्षश्रिया आळंकृत । ऐसे हे संत श्रीमंत ।
जीव दरिद्री असंख्यात । नृपती केले ॥ २१ ॥
२१) मोक्षलक्ष्मीने आळंकृत असे हे संत श्रीमंतच असतात. ते इतर अज्ञानी जीवांना
आत्मस्वरुपाचे दर्शनाने ज्ञानी म्हणजे राजे बनवितात. 
जे समर्थपणें उदार । जे कां अत्यंत दानशूर ।
तयांचेनि हा ज्ञानविचार । दिधला न वचे ॥ २२ ॥
२२) संत म्हणजे उदार सामर्थ्य, ते हे सामर्थ्य दुसर्‍यांना म्हणजेच अज्ञानी साधकांना दान करतात ते आत्मज्ञान देणार नाहीत हा विचार मनांत येतच नाही.
माहांराजे चक्रवती । जाले आहेत पुढें होती ।
परंतु कोणी सायोज्यमुक्ती । देणार नाहीं ॥ २३ ॥
२३) मोठेमोठे राजे पूर्वी झाले, अजुनही होतील पण सायोज्यमुक्ती कोठलाच राजा देऊं शकत नाही.
जें त्रैलोकीं नाहीं दान । तें करिती संतसज्जन ।
तयां संतांचें महिमान । काय म्हणौनि वर्णावें ॥ २४ ॥
२४) त्रैलोक्यांत शोधून सापडणार नाही असे दान ते संतसज्जन देऊं शकतात, त्यांचे वर्णन काय, कसे करावे?
जें त्रैलोक्याहून वेगळें । जें वेदश्रुतीसी नाकळे । 
तेंचि जयांचेनि वोळे । परब्रह्म अंतरीं ॥ २५ ॥
२५) जें परब्रह्म त्रैलोक्याहून वेगळे आहे, जे वेद व श्रुतींनाही कळत नाही, ते आत्मस्वरुप संतांच्या कृपेने साधकाच्या अंतरी प्रगट होते.    
ऐसी संतांची महिमां । बोलिजे तितुकी उणी उपमा ।
जयांचेनि मुख्य परमात्मा । प्रगट होये ॥ २६ ॥
२६) अशा संताचा मोठेपणा वर्णन करण्यास सर्व उपमा कमी पडतात. अशा संताच्यामुळे परमात्मा प्रगट होतो.
॥ इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे संतस्तवननाम समास पांचवा ॥ 
 Samas Pachava SantaStavan 
समास पांचवा संतस्तवन



Custom Search

No comments: