Sunday, December 18, 2016

Samas Navava Parmarth Stavan समास नववा परमार्थस्तवन


Dashak Pahila Samas Navava Parmarth Stavan 
Samas Navava Parmarth Stavan is in Marathi. This Samas is on Spirituality. How a person can become Paramarthi (Spiritual). Why it is necessary to be spiritual. What is the ultimate goal of every person on this earth? Everything is explained here by Samarth Ramdas.
समास नववा परमार्थस्तवन
श्रीराम ॥
आतां स्वऊं हा परमार्थ । जो साधकांचा निजस्वार्थ ।
नांतरी समर्थामध्यें समर्थ । योग हा॥ १ ॥
अर्थ 
स्वामी समर्थ रामदास म्हणतात,
१) मी आता परमार्थाचे मोठेपण सांगतो. साधकांचे खरे ध्येय व मानवी जीवनांतील उच्चतम ध्येय असा हा परमार्थ आहे.
आहे तरी परम सुगम । परी जनासी जाला दुर्गम ।
कां जयाचें चुकले वर्म । सत्समागमाकडे ॥ २ ॥
२) लोकांना परमार्थ हा सोपा सत् समागमाने असुनही नेमके तेच लोक करत नसल्याने कठीण झाला आहे.
नाना साधनाचे उधार । हा रोकडा ब्रह्मसाक्षात्कार ।
वेदशास्त्रीं जे सार । तें अनुभवास ये ॥ ३ ॥
३) नाना प्रकारची साधने आहेत पण हा ब्रह्मसाक्षात्कार करुन देणारा, जे वेदांचे सार आहे ते लगेचच अनुभवुन देणारा रोकडा व्यवहार म्हणजे परमार्थ आहे.
आहे तरी चहूंकडे । परी अणुमात्र दृष्टी न पडे ।
उदास परी येकीकडे । पाहातां दिसेना ॥ ४ ॥
४) हा परमार्थ, हे ब्रह्मज्ञान सर्वत्र भरलेले आहे पण ते पाहायला गेल्यावर साध्या दृष्टीला दिसत नाही. सर्वस्वाचा त्याग केला तरी हा अणुएवढाही दिसत नाही.
आकाशमार्गी गुप्तपंथ । जाणती योगिये समर्थ ।
इतरांस हा गुह्यार्थ । सहसा न कळे ॥ ५ ॥
५) हृदयस्थ आकाशमार्गाने स्वस्वरुपाला पोहोचविणारा गुप्त मार्ग फक्त योग्यांनाच माहित आहे. इतरांना हा गुह्यार्थ माहित नाही.
साराचेंहि निजसार । अखंड अक्षै अपार । 
नेऊं न सकती तश्कर । कांही केल्या ॥ ६ ॥
६) सर्व ज्ञानाचे सार असा हा अखंड, अक्षय आणि अपार परमार्थ चोरालाही चोरुन नेता येत नाही.
तयास नाहीं राजभये । अथवा नाहीं अग्निभये ।
अथवा स्वापदभये । बोलोंच नये ॥ ७ ॥
७) त्याला राजभय, अग्निभय किंवा श्वापदें यांपासून भय नाही. त्याबद्दल काहीं बोलूच नये.
परब्रह्म तें हालवेना । अथवा ठावहि चुकेना ।
काळांतरीं चळेना । जेथीचा तेथें ॥ ८ ॥
८) परब्रह्म कोणीहीं हालवूं शकत नाही. ते एका स्थानावरुन ढळत नाही. कितीही काळ लोटला तरी ते चळत नाही.
ऐसें तें निज ठेवणें । कदापि पालटों नेणें ।
अथवा नव्हे आदिक उणें । बहुतां काळें ॥ ९ ॥
९) अशी ही आपली स्वतःची ठेव आहे. तीच्यांत कधी बदल होत नाही. किंवा ती कमी जास्त होत नाही.
अथवा तें घसवटेना । अथवा अदृश्य होयेना ।
नातरी पाहातां दिसेना । गुरुअंजनेविण ॥ १० ॥
१०) परब्रह्म कधी झिजत नाही. किंवा अदृश्य होत नाही. परंतु गुरुनें अंजन (कृपा केल्याशिवाय) घातल्याशिवाय ते दिसत नाही. 
मागा योगिये समर्थ । त्यांचाहि निजस्वार्थ । 
यासी बोलिजे परमार्थ । परमगुह्य म्हणौनि ॥ ११ ॥    
११) पूर्वी जे मोठे मोठे योगी होऊन गेले त्यांचासुद्धा निजस्वार्थ परमार्थच होता. तो गुह्यमार्गाने साध्य होतो म्हणून त्याला परमार्थ म्हणतात.    
जेंहीं शोधून पाहिला । त्यासी अर्थ सांपडला ।
येरां असोनि अलभ्य जाला । जन्मोजन्मीं ॥ १२ ॥
१२) ज्यांनी त्याचा शोध घेतला त्यांना तो सापडला. इतरांना तो जवळ असूनही जन्मोजन्मी सापडत नाही.
अपूर्वता या परमार्थाची । वार्ता नाहीं जन्ममृत्याची ।
आणी पदवी सायोज्यतेची । सन्निधचि लाभे ॥ १३ ॥
१३) परमार्थाची अपूर्वता म्हणजे याच्याजवळ जन्म-मृत्यु नाही व सायुज्यमुक्ती मात्र याजवळ आहे.
माया विविकें मावळे । सारासार विचार कळे ।
परब्रह्म तेंहि निवळे । अंतर्यामीं ॥ १४ ॥
१४) विवेक-विचाराने माया लोपते. सारासाराचे ज्ञान होते. अंतर्यामींचे परब्रह्म निवळून उमजु लागते.
ब्रह्म भासलें उदंड । ब्रह्मीं बुडालें ब्रह्मांड ।
पंचभूतांचें थोतांड । तुछ्य वाटे ॥ १५ ॥
१५) ब्रह्म फार मोठे भासमान होऊं लागते व सगळीकडे तेच दिसूं लागते. पंचभूतांचा (मायेचा) पसार खोटा समजल्याने तुछ्य वाटूं लागतो.
प्रपंच वाटे लटिका । माया वाटे लापणिका ।
शुद्ध आत्मा विवेका । अंतरीं आला ॥ १६ ॥
१६) प्रपंच खोटा म्हणुन समजते व मायाही कल्पनामय म्हणून ज्ञान होते. विवेकाच्या साहाय्याने शुद्ध आत्मस्वरुपाचे अंतरी ज्ञान होऊं लागते.
ब्रह्मस्थित बाणतां अंतरीं । संदेह गेला ब्रह्मांडाबाहेरी ।
दृश्याची जुनी जर्जरी । कुहिट जाली ॥ १७ ॥
१७) अंतरी ब्रह्मज्ञान झाल्याने सर्व संशय मावळतात. दृश्य विश्र्व जुने, जीर्ण झालेले, फाटलेले वाटू लागते.
ऐसा हा परमार्थ । जो करी त्याचा निजस्वार्थ । 
आतां या समर्थास समर्थ । किती म्हणौनि म्हणावें ॥ १८ ॥
१८) हा परमार्थ असा आहे, जो करील त्याचा तो निजस्वार्थ आहे. आता यास श्रेष्ठ, थोर, शक्तिमान वगैरे कायकाय म्हणुन मोठे वर्णावे.
या परमार्थाकरितां । ब्रह्मादिकांसि विश्रामता ।
योगी पावती तन्मयता । परब्रह्मीं ॥ १९ ॥
१९) या परमार्थामुळेमच ब्रह्मादिकांना समाधान मिळते. योगीजनांना परब्रह्मीच तल्लीनता लाभते.
परमार्थ सकळांस विसांवा । सिद्ध साधु माहानुभावां ।
सेखीं सात्विक जड जीवां । सत्संगेंकरुनी ॥ २० ॥
२०) सिद्ध, साधु, माहात्मे यांना परमार्थ समाधान देतो. सात्वीक जड जीवांना हा सत्संगाने समाधान देतो.  
परमार्थ जन्माचें सार्थक । परमार्थ संसारीं तारक ।
परमार्थ दाखवी परलोक । धार्मिकासी ॥ २१ ॥
२१) परमार्थ मानवास जन्माचे सार्थक करणारा, त्याला संसारांतुन तारुन नेणारा, व धार्मिकास परलोकींचे सुख देणारा आहे.
परमार्थ तापसांसी थार । परमार्थ साधकांसी आधार ।
परमार्थ दाखवी पार । भवसागराचा ॥ २२ ॥
२२) परमार्थ तापसींना आश्रय देतो. साधकांना परमार्थ आधार देतो.  भवसागररुपी संसार कसा पार करावा ह्याचे ज्ञान परमार्थ देतो.
परमार्थी तो राज्यधारी । परमार्थ नाहीं तो भिकारी ।
या परमार्थाची सरी । कोणांस द्यावी ॥ २३ ॥
२३) ज्याला परमार्थ साधला तो राजाच झाला. ज्याला साधला नाही तो भिकारीच राहीला. या परमार्थाची तुलना कशाचीच करता येत नाही.
अनंत जन्मीचें पुण्य जोडे । तरीच परमार्थ घडे ।
मुख्य परमात्मा आतुडे । अनुभवासी ॥ २४ ॥
२४) पुष्कळ जन्मांचे पुण्य फळफळले म्हणजे परमार्थ घडतो. त्यामुळे साक्षात अनुभव येतो.
जेणें परमार्थ वोळखिला । तेणें जन्म सार्थक केला ।
येर तो पापी जन्मला । कुलक्षयाकारणें ॥ २५ ॥
२५) ज्याने परमार्थ जाणला त्याचा जन्म सार्थक झाला. याउलट इतर पापीजन केवळ कुलक्षयासाठींच जन्मतात.
असो भगवत्प्राप्तीविण । करी संसाराचा सीण ।
त्या मूर्खाचें मुखावलोकन । करुंच नये ॥ २६ ॥
२६) भगवंताची प्राप्ती करुन न घेता जो संसारांत शीणतो, त्या मूर्खाचे तोंडही बघु नये.
भल्यानें परमार्थीं भरावें । शरीर सार्थक करावें ।
पूर्वजांस उद्धरावें । हरिभक्ती करुनी ॥ २७ ॥
२७) म्हणून भल्या माणसाने परमार्थाच्या मार्गाने जावे व आपल्या शरीराचे सार्थक करावे आणि हरिभक्ती करुन आपल्या पूर्वजांस उद्धरावे.

॥ इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे परमार्थस्तवननाम समास नववा ॥ 
Samas Navava Parmarth Stavan 
 समास नववा परमार्थस्तवन


Custom Search

No comments: