Tuesday, January 3, 2017

Samas Satava Satvagun Lakshan समास सातवा सत्वगुण लक्षण


Dashak Dusara Samas Satava Satvagun Lakshan 
Samas Satava Satvagun Lakshan is in Marathi. Samarth Ramdas is telling us Satvagun Lakshan in this samas. Satvaguna means the best qualities in a person. These qualities are required for the spiritual development of the person. The inborn qualities are such that the person is always good to others. He is harmful, ever ready to help others, unselfish, nor greedy, not after fame or name, or money. He always found soft spoken never use harsh words while talking with others. He is found kind, donor, ready to do any good work irrespective of his position, richness, knowledge, fame, and name. There are many more qualities described by Samarth Ramdas, in this samas.
समास सातवा सत्वगुण लक्षण 
श्रीराम ॥
मागां बोलिला तमोगुण । जो दुःखदायक दारुण ।
आतां ऐका सत्वगुण । परम दुल्लभ ॥ १ ॥
अर्थ 
१) मागिल समासी तमोगुण सांगितला. जो दारुण दुःखदायक आहे. आता अत्यंत दुर्लभ असलेला सत्वगुण ऐका. 
जो भजनाचा आधार । जो योगियांची थार ।
जो निरसी संसार । दुःखमूळ जो ॥ २ ॥
२) भजनाचा आधार हा सत्वगुणच, योग्यांना योगसिद्धि मिळते ती या सत्वगुणानेच आणि संसारांतील दुःखाचे मूळ दूर करणारा हा सत्वगुणच होय.  
जेणें होये उत्तम गती । मार्ग फुटे भगवंती ।
जेणें पाविजे मुक्ती । सायोज्यता ते ॥ ३ ॥
३) सत्वगुणाने उत्तम गति मिळते, भगवंताची भक्ति साधते व मुक्ति मिळुन सायोज्यता लाभते. 
जो भक्तांचा कोंवसा । जो भवार्णवींचा भर्वसा ।
मोक्षलक्ष्मीची दशा । तो सत्वगुण ॥ ४ ॥
४) भक्तजनांचा आधार, भवसागर तरुन नेणारा आणि मोक्षलक्ष्मीचे वैभव मिळवून देणारा तो सत्वगुण आहे. 
जो परमार्थाचें मंडण । जो महंतांचें भूषण ।
रजतमाचें निर्शन । जयाचेनी ॥ ५ ॥
५) तो परमार्थाची शोभा आहे. मोठ्या लोकांचे, महंतांचे भूषण आहे. रजोगुण व तमोगुण यांचे उच्चाटन या सत्वगुणाने होते.  
जो परम सुखकारी । जो आनंदाची लहरी ।
देऊनियां निवारी । जन्ममृत्य ॥ ६ ॥
६) हा सत्वगुण सुखकर व आनंददायक आहे कारण जन्म-मृत्युचे निवारण करतो. म्हणजे सत्वगुणी साधकास जन्म-मृत्युच्या दुःखांतुन मुक्त करतो.    
जो अज्ञानाचा सेवट । जो पुण्याचें मूळ पीठ ।
जयाचेनि सांपडे वाट । परलोकाची ॥ ७ ॥
७) अज्ञान नाहीसे करणारा, पुण्याचा गाभा, पुण्य देणारा, ज्याच्यामुळे परलोकाची (मोक्षाची) वाट सापडते, असा हा सत्वगुण आहे. 
ऐसा हा सत्वगुण । देहीं उमटतां आपण ।
तये क्रियेचें लक्षण । ऐसें असे ॥ ८ ॥
८) असा हा सत्वगुण अंगांत असता (प्रगट होता), त्याच्यामुळे मनुष्याच्या क्रिया कशा होतात व त्याची लक्षणे ही अशी असतात. (खालील ओव्यांमध्ये दिल्याप्रमाणे) 
ईश्र्वरीं प्रेमा अधिक । प्रपंच संपादणें लोकिक ।
सदा सन्निध विवेक । तो सत्वगुण ॥ ९ ॥     
९) ईश्र्वरावर इतरांपेक्षा अधिक प्रेम, प्रपंच व्यवस्थित सांभाळणे, नेहमी विवेकाने वागणे हे सत्वगुण विशेष होय.
संसारदुःख विसरवी । भक्तिमार्ग विमळ दावी । 
भजनक्रिया उपजवी । तो सत्वगुण ॥ १० ॥
१०) संसारदुःख विसरवितो, निर्मळ भक्तिमार्ग दर्शवितो, भगवंताची भजनद्वारे भक्ति करणे; तो सत्वगुण होय.   
परमार्थाची आवडी । उठे भावार्थाची गोडी ।
परोपकारीं तांतडी । तो सत्वगुण ॥ ११ ॥
११) परमार्थाची आवड उत्पन्न होणे, आत्मज्ञानाची गोडी निर्माण होणे, परोपकार करण्याची तत्परता; तो सत्वगुण होय. 
स्नानसंध्या पुण्यसीळ । अभ्यांतरींचा निर्मळ ।
शरीर वस्त्रें सोज्जळ । तो सत्वगुण ॥ १२ ॥
१२) स्नान-संध्या व पुण्याची कामे करणे, निर्मळ अंतःकरण, शरीर व वस्त्रे स्वच्छ हे सत्वगुण दर्शवितो.
येजन आणि याजन । आधेन आणि अध्यापन । 
स्वयें करी दानपुण्य । तो सत्वगुण ॥ १३ ॥  
१३) यज्ञ करणे व यज्ञ करवून घेणे, अभ्यास स्वतः करणे व दुसर्‍यास शिकवणे, स्वतः दान देणे, हा सत्वगुण होय.    
निरुपणाची आवडी । जया हरिकथेची गोडी ।
क्रिया पालटे रोकडी । तो सत्वगुण ॥ १४ ॥
१४) प्रवचन, परमार्थ, आत्मज्ञान ऐकण्याची आवड, भगवंताच्या लिला ऐकण्यात गोडी, हे सर्व करुन चांगले ऐकल्याप्रमाणे आपल्या वर्तनांत बदल करणे, हा सत्वगुण होय.  
अश्र्वदानें गजदानें । गोदानें भूमिदानें ।
नाना रत्नांचीं दानें । करी तो सत्वगुण ॥ १५ ॥
१५) जो घोडे, हत्ती, गायी, जमीन व नाना रत्नांची दाने करतो, तो सत्वगुण होय. (ही दाने काळानुसार मौल्यवान गोष्टींची व आपापल्या योग्यतेनुसार)  
धनदान वस्त्रदान । अन्नदान उदकदान ।
करी ब्राह्मणसंतर्पण । तो सत्वगुण ॥ १६ ॥ 
१६) धन-दौलतीचे दान, अन्नदान, पेयदान, ब्राह्मण भोजन जो करतो; तो सत्वगुण होय.
कार्तिकस्नानें माघस्नानें । व्रते उद्यापनें दानें ।
निःकाम तीर्थे उपोषणें । तो सत्वगुण ॥ १७ ॥   
१७) जो कार्तिक-माघ महिन्यांतील पुण्यक्षेत्री स्नानें करतो, व्रते करतो व त्यांची उद्यापने करतो, अपेक्षा न ठेवता तीर्थयात्रा व उपवास करतो; तो सत्वगुण होय.   सहस्त्र भोजनें लक्ष भोजनें । विविध प्रकारींचीं दानें ।
निःकाम करी सत्वगुणें । कामना रजोगुण ॥ १८ ॥
१८) सहस्त्र, लक्ष भोजने घालतो, नाना प्रकारची दानें देतो, सत्वगुणी कामना न ठेवता करतो पण यांत कामना ठेवून करणारा तो रजोगुण होय.
तीर्थी अर्पी जो अग्रारें । बांधे वापी सरोवरें ।
बांधे देवाळयें सिखरे । तो सत्वगुण ॥ १९ ॥
१९) तीर्थक्षेत्री गरीबांना इनाम जमीनी देतो, विहीरी व तळी बांधतो. देवाळयांची शिखरे बांधतो; तो सत्वगुण होय.
देवाद्वारीं पडशाळा । पाईरीया दीपमाळा ।
वृंदावनें पार पिंपळा । बांधे तो सत्वगुण ॥ २० ॥
२०) देवालयांच्या जवळ भक्तांसाठी धर्मशाळा बांधतो, पायर्‍या, दीपमाळा, वृंदावने, पिंपळाचे पार लावतो; तो सत्वगुण होय. 
लावी वनें उपवनें । पुष्पवाटिका जीवनें ।
निववी तापस्यांचीं मनें । तो सत्वगुण ॥ २१ ॥  
२१) बाग-बगीच्या देवालया शेजारी किंवा तीर्थक्षेत्रीं बनवितो, पाणपोयांची सोय करतो, तपस्वी लोकांच्या मनांत व जीवनांत शांतता टिकावी म्हणुन प्रयत्न करतो; तो सत्वगुण होय.  
संध्यामठ आणी भुयेरीं । पाईरीया नदीतीरीं ।
भांडारगृहें देवद्वारीं । बांधे तो सत्वगुण ॥ २२ ॥  
२२) जो संध्येसाठी मठ व भुयारे, नदीतीरी घाट व पायर्‍या व देवालयांच्या जवळ धान्यासाठी, अन्नासाठी कोठारे बांधतो; तो सत्वगुण होय.  
नाना देवांचीं जें स्थाने । तेथे नंदादीप घालणें ।
वाहे आळंकार भूषणें । तो सत्वगुण ॥ २३ ॥     
२३) निरनिराळ्या देवांची जी देवळे तेथे नंदादीप लावतो, तेथे अलंकार, दागिने वाहतो, तो सत्वगुण होय. 
जेंगट मृदांग टाळ । दमामे नगारे काहळ ।
नाना वाद्यांचे कल्लोळ । सुस्वरादिक ॥ २४ ॥
२४) झेंगट, मृदंग, टाळ, मोठे नगारे व लहान नगारे, ढोल, डफ आदि वाद्ये सुस्वरे वाजवितो किंवा वाजवून घेतो तो सत्वगुण होय. 
नाना सामग्री सुंदर । देवाळई घाली नर ।
हरिभजनीं जो तत्पर । तो सत्वगुण ॥ २५ ॥  
२५) निरनिराळ्या प्रकारची सुंदर सामुग्री देवळास अर्पण करतो, हरिभजनासाठी जो सदैव तयार असतो; तो सत्वगुण होय.
छेत्रें आणी सुखासनें । दिंड्या पताका निशाणें ।
वाहे चामरें सूर्यापानें । तो सत्वगुण ॥ २६ ॥   
२६) छत्रें, पालख्या, दिंड्या, पताका, निशाणे, चवर्‍या आदी देवाला वाहतो, तो सत्वगुण होय.
वृंदावनें तुळसीवनें । रंगमाळा समार्जनें ।
ऐसी प्रीति घेतली मनें । तो सत्वगुण ॥ २७ ॥  
२७) वृंदावनें, तुळसीवनें, रांगोळ्या, देवालयाची आवारे साफ करण्याची साधने, देवाला प्रेमाने देतो; तो सत्वगुण होय.
सुंदरें नाना उपकर्णें । मंडप चांदवे आसनें ।
देवाळईं समर्पणें । हा सत्वगुण ॥ २८ ॥  
२८) देवालयांत नाना सुंदर उपकरणे, भांडी, चांदवे, मंडप,आसने, अर्पण करतो; तो सत्वगुण होय. 
देवाकारणें खाद्य । नाना प्रकारीं नैवेद्य ।
अपूर्व फळें अर्पी सद्य । तो सत्वगुण ॥ २९ ॥  
२९) देवासाठीं निरनिराळे खाद्य पदार्थ देतो, उत्तमोत्तम नैवेद्य, फळे, देवाला अर्पण करतो; तो सत्वगुण होय.
ऐसी भक्तीची आवडी । नीच दास्यत्वाची गोडी ।
स्वयें देवद्वार झाडी । तो सत्वगुण ॥ ३० ॥  
३०) अशा भक्तिची आवड, देवाचे हलक्यांतील हलके काम करणे, देऊळ झाडणे, आवार झाडणे; तो सत्वगुण होय.
तिथी पर्व मोहोत्साव । तेथें ज्याचा अंतर्भाव ।
काया वाचा मनें सर्व । अर्पी तो सत्वगुण ॥ ३१ ॥   
३१) भगवंताच्या क्षेत्री पुण्यतिथि, पर्वणी, मोठ मोठे उत्सव यांमध्ये सेवा करण्यासाठी तनमनधनाने अशा संधिची वाट पाहात असतो. सर्व लहान मोठ्या कामांत सहभागी होतो. तो सत्वगुण होय. 
हरिकथेसी तत्पर । गंधें माळा आणी घुशर ।
घेऊन उभीं निरंतर । तो सत्वगुण ॥ ३२ ॥ 
३२) हरिकथा ऐकण्यासाठी जो नेहमी तयार असतो, देवाच्या द्वारी गंध, माळा व बुक्का घेऊन नेहमी उभा असतो; तो सत्वगुण होय. 
नर अथवा नारी । येथानशक्ति सामग्री ।
घेऊन उभीं देवद्वारीं । तो सत्वगुण ॥ ३३ ॥  
३३) स्त्री किंवा पुरुष देवळांत पूजेची सर्व तयारी आपापल्या शक्यतेनुसार घेऊन उभा असतो; तो सत्वगुण होय.
महत्कृत्य सांडून मागें । देवास ये लागवेगें ।
भक्ति निकट आतंरंगें । तो सत्वगुण ॥ ३४ ॥   
३४) देवाची भक्ति अमतरंगी भिनल्यामुळे आपले मोठे काम बाजूस ठेऊन जो त्वरेने देवाच्या कामासाठी येतो; तो सत्वगुण होय.  
थोरपण सांडून दुरी । नीच कृत्य आंगीकारी ।
तिष्ठत उभी देवाद्वारीं । तो सत्वगुण ॥ ३५ ॥   
३५) स्वतःचे मोठेपण, श्रीमंती, मान बाजूला ठेवून देवाच्या द्वारीचे कनिष्ठ काम करतो व त्यासाठी देवाच्या द्वारी उभा असतो; तो सत्वगुण होय.
देवालागीं उपोषण । वर्जी तांबोल भोजन ।
नित्य नेम जप ध्यान । करी तो सत्वगुण ॥ ३६ ॥  
३६) जो देवासाठी उपवास करतो, विडा,तंबाखु, भोजन आदी सोडतो, नित्य नेमाने जप, ध्यान करतो; तो सत्वगुण होय.
शब्द कठीण न बोले । अतिनेमेसी चाले ।
योगी जेणें तोषविले । तो सत्वगुण ॥ ३७ ॥  
३७) जो कठीण, कठोर शब्द बोलत नाही, नेहमी नेमाने, नियमाने वागतो, योगीजनांची सेवा करुन त्यांना खूष करतो; तो सत्वगुण होय. 
सांडूनियां अभिमान । निःकाम करी कीर्तन ।
श्र्वेद रोमांच स्फुराण ।  तो सत्वगुण ॥ ३८ ॥
३८) जो मोठेपणाचा, नावाचा, श्रीमंतीचा, ज्ञानाचा अभिमान सोडतो, भगवंताचे किर्तन धनाची अगर कसलीही अपेक्षा न ठेवता करतो, किर्तन करतांना भगवंतावरील प्रेमाने अष्टसात्विक भाव व्यक्त करतो; तो सत्वगुण होय. 
अंतरीं देवाचें ध्यान । तेणें निडारले नयन ।
पडे देहाचें विस्मरण ।  तो सत्वगुण ॥ ३९ ॥ 
३९) जो अंतरी देवाचे ध्यान करत असतो त्यामुळे देवावरील प्रेमाने अश्रुधारा वाहु लागुन स्वतःच्या देहाचेही विस्मरण होते; तो सत्वगुण होय.
हरिकथेची अति प्रीति । सर्वथा नये विकृती ।
आदिक प्रेमा आदिअंती । तो सत्वगुण ॥ ४० ॥ 
४०) ज्याला भगवंताच्या कथांची, चरित्राची, गोष्टींची फार आवड असते, त्यांचा कधिही वीट, कंटाळा येत नाही, ईश्र्वराचे प्रेम आदि अंती वाढतच असते; तो सत्वगुण होय. 
मुखीं नाम हातीं टाळी । नाचत बोले ब्रीदावळी ।
घेऊन लावी पायधुळी । तो सत्वगुण ॥ ४१ ॥ 
४१) ज्याच्या तोंडी नेहमी भगवंताचेच नांव असते, जो नाचतनाचत भगवमताचीच ब्रीदावळी गात असतो, भक्तजनांची पायधुळ कपाळी लावतो; तो सत्वगुण होय. 
देहाभिमान गळे । विषईं वैराग्य प्रबळे ।
मिथ्या माया ऐसें कळे । तो सत्वगुण ॥ ४२ ॥  
४२) ज्याचा देह व इतर सर्व गोष्टींवरचा अभिमान गळून पडतो, देह उपभोगाच्या सर्व विषयांचा वीट येतो, त्यांचा कंटाळा येतो, मायेच्या मिथ्यापणाचे ज्ञान होते ; तो सत्वगुण होय.
कांहीं करावा उपाये । संसारीं गुंतोन काये ।
उकलवी ऐसें हृदये । तो सत्वगुण ॥ ४३ ॥ 
४३) संसारांत गुंतुन राहण्याचा कंटाळा येऊन त्यांतुन सुटण्याचा काहीं उपाय करावा असे वाटते व मनापासून तसा मार्ग शोधावा असे ज्ञान होते; तो सत्वगुण होय.
संसारासी त्रासे मन । कांहीं करावें भजन ।
ऐसें मनीं उठे ज्ञान । तो सत्वगुण ॥ ४४ ॥  
४४) मन संसारांतील कटकटींनी त्रस्त होते, काहीं भजन, चिंतन, मनन करावे असे ज्ञान होऊ लागते; तो सत्वगुण होय. 
असतां आपुलेआश्रमीं । अत्यादरें नित्यनेमी ।
सदा प्रीती लागे रामीं । तो सत्वगुण ॥ ४५ ॥ 
चतुर्थाश्रमापैकी कोठल्याही आश्रमी असला, म्हणजे ब्रह्मचारी किंवा गृहस्थाश्रमी असला तरी ही आपल्या नित्य नेमांचे पालन करतो, नेहमी भगवंताच्या प्रेमांत मग्न असतो; तो सत्वगुण होय. 
सकळांचा आला वीट । परमार्थी जो निकट ।
आघातीं उपजे धारिष्ट । तो सत्वगुण ॥ ४६ ॥ 
४६) संसाररुपी मायेच्या पसार्‍याचा ज्याला वीट येतो, भगवंताच्याजवळ, परमार्थाच्याजवळ, अध्यात्म्याजवळ जो असतो, प्रसंगी जो धैर्याने वागतो; तो सत्वगुण होय. 
सर्वकाळ उदासीन । नाना भोगीं विटे मन ।
आठवे भगवद्भजग । तो सत्वगुण ॥ ४७ ॥ 
४७) जो संसारिक गोष्टी विषयी अनासक्त, उदासीन असतो, जो सर्वप्रकारच्या देहभोगांपासून मन विटल्यामुळे मुक्त असतो, ज्याला आता भगवद् भजन अधिक आवडते व आठवते; तो सत्वगुण होय.
पदार्थीं न बैसे चित्त । मनीं आठवे भगवंत ।
ऐसा दृढ भावार्थ । तो सत्वगुण ॥ ४८ ॥ 
४८) कोणत्याही दृश्य वस्तुचा लोभ नसतो, मनांत सतत भगवंताविषयीं प्रेम,आवड व भाव असतो, तो सत्वगुण होय.
लोक बोलती विकारी । तरी आदिक प्रेमा धरी ।
निश्र्चय बाणे अंतरी । तो सत्वगुण ॥ ४९ ॥  
४९) लोक म्हणतात हा वेडा झाला आहे, तरीही भगवंतावरील प्रेम वाढतच जाते, परमार्थाचा व भगवंतावरील प्रेमाचा पूर्ण निश्र्चय झालेला असतो; तो सत्वगुण होय. 
अंतरीं स्फुर्ती स्फुरे । सस्वरुपीं तर्क भरे ।
नष्ट संदेह निवारे । तो सत्वगुण ॥ ५० ॥ 
५०) परमार्थविषयक ज्ञान झाल्याने नाना प्रकारच्या स्फूर्ति, संवेदना, प्रतिभा जागृत होतात, स्वस्वरुपाचे ज्ञान होऊ लागते, सर्व प्रकारचे संशय, संदेह नाहीसे होतात; तो सत्वगुण होय.
शरीर लावावें कारणीं । साक्षेप उठे अंतःकर्णीं ।
सत्वगुणाची करणी । ऐसी असे ॥ ५१ ॥
५१) शरीर भगवंताच्या कार्यांत पर्यायाने उत्तम उपयोगी लावावे असे अंतःकरणापासून वाटू लागते, अशीही सत्वगुणाची करणी असते.  
शांति क्ष्मा आणि दया । निश्र्चय उपजे जया ।
सत्वगुण जाणावा तया । अंतरीं आला ॥ ५२ ॥
५२) ज्याच्या वागण्यांत दया, क्षमा आणि शांती जाणवू लागते, भक्तीचा निश्र्चय दिसुन येतो, त्याच्या अंतरी सत्वगुण उदय झाला असे समजावे. 
आले अतीत अभ्यागत । जाऊं नेदी जो भुकिस्त । 
येथानशक्ती दान देत । तो सत्वगुण ॥ ५३ ॥ 
५३) अथिती, अभ्यागत आले असता त्यांना भुकलेले जाऊ देत नाही म्हणजेच त्यांचेआदरातिथ्य करुन जेऊखाऊ घालून व त्यांना दान दक्षिणा देऊन बोळवितो; तो सत्वगुण होय.
तडितापडी दैन्यवाणें । आलें आश्रमाचेनि गुणें । 
तयालागीं स्थळ देणें । तो सत्वगुण ॥ ५४ ॥ 
५४) संन्यासी, तीर्थकरी, दुःखी, दीन लोक आश्रयासाठी आले तर त्यांना विन्मुख न पाठवता आसरा देतो; तो सत्वगुण होय.
आश्रमीं अन्नाची आपदा । परी विमुख नव्हे कदा ।
शक्तिनसार दे सर्वदा । तो सत्वगुण ॥ ५५ ॥  
५५) स्वतःकडे अन्नाची कमतरता असुनही अभ्यागताला, अतिथिला विमुख न होता खाऊ घालतो, आपल्याशक्तिनुसार नेहमी देत राहतो; तो सत्वगुण होय. 
जेणें जिंकिली रसना । तृप्त जयाची वासना ।
जयास नाहीं कामना । तो सत्वगुण ॥ ५६ ॥ 
५६) ज्याने खाण्यापिण्याची आवड जिंकली म्हणजे जीभेवर जय मिळविला, वासनेवर ती तृप्त करुन जय मिळविला म्हणजे वासना उदासिन होऊन वासनाहीन झाला, कोठच्याही प्रकारच्या इच्छा ठेवल्या नाहीत; तो सत्वगुण होय. 
होणार तैसे होत जात । प्रपंची जाला आघात ।
डळमळिना ज्याचें चित्त । तो सत्वगुण ॥ ५७ ॥ 
५७) प्रपंची कोठचेही संकट आले किंवा आघात झाला तरी जसे व्हवायाचे तसे होणारच अशी वृत्ती ठेवून जो शांत राहतो, ज्याचे मन डळमळत नाही; तो सत्वगुण होय. 
येका भगवंताकारणें । सर्व सुख सोडिलें जेणें ।
केलें देहाचें सांडणें । तो सत्वगुण ॥ ५८ ॥  
५८) भगवंतावरील प्रेमाने सर्व प्रकारचे प्रापंचिक सुख सोडून दिले, स्वदेहाचेही सुख सोडले; तो सत्वगुण होय. 
विषईं धावें वासना । परी तो कदा डळमळिना ।
ज्याचें धारिष्ट चळेना । तो सत्वगुण ॥ ५९ ॥ 
५९) वासना अधुनमधुन विषयांची ओढ घेत असली तरी तो चळत नाही, आपला परमार्थ मार्ग सोडत नाही, आपले धैर्य, धारिष्ट टिकवून ठेवतो; तो सत्वगुण होय.
देह अपदेने पीडला । क्षुधे तृषेनें वोसावला ।
तरी निश्र्चयो राहिला । तो सत्वगुण ॥ ६० ॥ 
६०) स्वतःला व देहाला आपदा, संकटें भोगावी लागली, तहान, भूक यांनी व्याकुळ व्हावे लागले तरी जो आपल्या निश्र्चयाला खंबीरपणे धरुन राहतो; तो सत्वगुण होय.
श्रवण आणी मनन । निजध्यासें समाधान । 
शुद्धजालें आत्मज्ञान । तो सत्वगुण ॥ ६१ ॥   
६१) श्रवण, मनन, चिंतन करुन जो समाधानी होतो, व शुद्ध आत्मज्ञान मिळवतो; तो सत्वगुण होय. 
जयास अहंकार नसे । नैराशता विलसे ।
जयापासीं कृपा वसे । तो सत्वगुण ॥ ६२ ॥ 
६२) ज्याच्यापाशी अहंकार नाही, नैराश्य नाही, आणि नेहमी जो लोकांवर कृपाच करतो; तो सत्वगुण होय.  
सकळांसीं नम्र बोले । मर्यादा धरुन चाले ।
सर्व जन तोषविलें । तो सत्वगुण ॥ ६३ ॥  
६३) सर्वजणांशी नम्रतेने बोलणे व वागणे, स्वताःची मर्यादा ओळखून जो वागतो, अश्या वर्तणुकीने सर्व लोकांना आनंदी करतो; तो सत्वगुण होय.
सकळ जनासी आर्जव । नाहीं विरोधास ठाव ।
परोपकारीं वेची जीव । तो सत्वगुण ॥ ६४ ॥ 
६४) सर्व लोकांसी आर्जवी बोलणे व वागणे, कोणाला विरोध न करता दुसर्‍याच्या मताचा आदर करणे, परोपकाराचे व्रत जीव ओतून करत राहणे; तो सत्वगुण होय. 
आपकार्याहून जीवीं । परकार्यसिद्धी करावी । 
मरोन कीर्ती उरवावी । तो सत्वगुण ॥ ६५ ॥ 
६५) आपल्या स्वतःच्या कामापेक्षां दुसर्‍याचे काम आधी करावे, मेल्यानंतरही लोकांनी नांव काढावे; तो सत्वगुण होय.
पराव्याचे दोषगुण । दृष्टीस देखे आपण ।
समुद्रा ऐसी सांठवण । तो सत्वगुण ॥ ६६ ॥ 
६६) दुसर्‍याचे दोष बघुनही ते समुद्रासारखे जवळच साठवुन ठेवतो, इतरांजवळ किंवा त्याच्याजवळही ते बोलत किंवा उघड करत नाही. तो सत्वगुण होय. 
नीच उत्तर साहाणें । प्रत्योत्तर न देणें ।
आला क्रोध सावरणें । तो सत्वगुण ॥ ६७ ॥   
६७) कोणी अपमान केला, दुरुत्तरे दिली तरी ती सहन करतो, त्याला उलट उत्तर देत नाही, आलेला राग आवरुन धरतो; तो सत्वगुण होय.
अन्यायेंवीण गांजिती । नानापरी पीडा करिती ।
तितुकेंहि साठवी चित्तीं । तो सत्वगुण ॥ ६८ ॥  
६८) आपण दुसर्‍यांस त्रास दिला नसतांनासुद्धा दुसरे आपल्यास त्रास देत असतील तरी ते मनांत साठवून ठेवतो, थोडक्यांत त्यांच्याशी जशास तसे न्यायाने वागत नाही; तो सत्वगुण होय.
शरीरें घीस साहाणें । दुर्जनासीं मिळोन जाणें ।
निंदकास उपकार करणें । हा सत्वगुण ॥ ६९ ॥ 
६९) जो दुसर्‍यांच्या सुखासाठी आपले शरीर झिजवितो, दुर्जनांशीही आपलेपणाने वागतो, निंदकानी निंदा केली तरी त्यांच्यावरही उपकारच करतो; तो सत्वगुण होय.
मन भलतीकडे धावें । तें विवेकें आवरावें ।
इंद्रियें दमन करावें । तो सत्वगुण ॥ ७० ॥ 
७०) विवेकाने, विचाराने ओढाळ मनाचे इकडे-तिकडे धावणे जो आवरतो, जो इंद्रियांचे दमन करतो, म्हणजेच इंद्रिय वासना आवरतो; तो सत्वगुण होय.  
सत्क्रिया आचरावी । असत्क्रिया त्यागावी ।
वाट भक्तीची धरावी । तो सत्वगुण ॥ ७१ ॥ 
७१) चांगली लोकहिताची कामे करावीत. वाईट कर्मांचा त्याग करावा, ती करु नयेत. भक्तिमार्गाचे आचरण करावे. तो सत्वगुण होय.
जया आवडे प्रातःस्नान । आवडे पुराणश्रवण ।
नाना मंत्रीं देवतार्चन । करी तो सत्वगुण ॥ ७२ ॥ 
७२) जो सकाळी लवकर उठून नित्य कर्मे करतो, ज्याला पुराणे, भक्तीविषयक प्रवचने ऐकायला आवडतात, जो निरनिराळ्या देवतांची पूजा, अर्चना करतो; तो सत्वगुण होय. 
पर्वकाळीं अतिसादर । वसंतपूजेस तत्पर ।
जयंत्याची प्रीती थोर । तो सत्वगुण ॥ ७३ ॥  
७३) ज्याला पर्वकाळाची आवड असते व त्यावेळी सेवेस हजर असतो, वसंतपूजेची विशेष आवड असते, देवदेवतांच्या जयंत्यांची फार प्रीती असून त्याप्रसंगी सेवेस तत्पर असतो; तो सत्वगुण होय.
विदेसिं मेलें मरणें । तयास संस्कार देणें ।
अथवा सादर होणें । तो सत्वगुण ॥ ७४ ॥ 
७४) कोणी बेवारस परदेशी मरण पावला तर त्याला संस्कार देतो किंवा त्याप्रसंगी हजर राहतो; तो सत्वगुण होय.
कोणी येकास मारी । तयास जाऊन वारी ।
जीव बंधनमुक्त करी । तो सत्वगुण ॥ ७५ ॥ 
७५) कोणी एखादा दुसर्‍यास मारतअसेल तर मधे हस्तक्षेप करुन त्यास सोडवितो, अडकून पडलेल्या लोकांना सोडवितो; तो सत्वगुण होय.
लिंगें लाखोलीं अभिशेष । नामस्मरणीं विस्वास ।
देवदर्शनीं अवकाश । तो सत्वगुण ॥ ७६ ॥ 
७६) शिवलिंगाला लाख बेलाची पाने वाहून अभिषेक करणे, भगवंताच्या नामस्मरणी विश्र्वास ठेवणे म्हणजेच भगवंताचे नामस्मरण करणे व त्यामुळे  चांगलेच होईल असा विश्र्वास मनांत ठेवणे, देवदर्शन नियमित घेण्यासाठी वेळ ठेवणे; तो सत्वगुण होय.
संत देखोनि धावें । परम सुख हेलावे ।
नमस्कारी सर्वभावें । तो सत्वगुण ॥ ७७ ॥ 
७७) संत, साधु, सज्जन मंडळींचा आदरसत्कार उत्साहाने, धावून धावून करणे, व त्याने आनंदित होणे, त्यांना मनापासून नमस्कार करणे; तो सत्वगुण होय. 
संतकृपा होय जयास । तेणें उद्धरिला वंश ।
तो ईश्र्वराचा अंश । सत्वगुणें ॥ ७८ ॥
७८) ज्यावर संतकृपा झाली, त्याने आपला वंशाचाच उद्धार केला, तो प्रत्यक्ष ईश्र्वराचाच अंश होय; तो सत्वगुण होय.
सन्मार्ग दाखवी जना । जो लावी हरिभजना ।
ज्ञान सिकवी अज्ञाना । तो सत्वगुण ॥ ७९ ॥  
७९) जो लोकांना चांगला, हिताचा मार्ग दाखवितो, जो त्यांना भगवंताच्या भजनास, नामस्मरणांत लावतो, अज्ञानी लोकांना नश्र्वर जीवनांतून दिव्य जीवनांत कसे जावे ह्याचे ज्ञान देतो; तो सत्वगुण होय. 
आवडे पुण्यसंस्कार । प्रदक्षणा नमस्कार ।
जया राहे पाठांतर । तो सत्वगुण ॥ ८० ॥  
८०) ज्याला पुण्यसंस्काराची आवड असते, देवाला प्रदक्षिणा व नमस्कार करण्याची आवड असते, ज्याचे (अध्यात्मविषयक) ज्ञान, पाठांतर चांगले असते; तो सत्वगुण होय.
भक्तीचा हव्यास भारी । ग्रंथसामग्री जो करी ।
धातुमूर्ति नानापरी । पूजी तो सत्वगुण ॥ ८१ ॥  
८१) ज्याला देव भक्तीची फार आवड असते, जो निरनिराळे ग्रंथ जवळ बाळगतो व त्यांचा अभ्यास करतो, देवाच्या वेगवेगळ्या धातुंच्या मूर्तिंची पूजा करणे ज्याला आवडते; तो सत्वगुण होय.
झळफळित उपकर्णें । माळा गवाळी आसनें ।
पवित्रें सोज्वळें वसनें । तो सत्वगुण ॥ ८२ ॥   
८२) देवाची पूजेची भांडी झळाळणारी, चकचकीत, कोरी असतात, निरनिराळ्या माळा, आसनें, गोमुखी, पवित्र, स्वच्छा वस्त्रे असतात; तो सत्वगुण होय.  
परपीडेचें वाहे दुःख । परसंतोषाचें सुख ।
वैराग्य देखोन हरिख । मानी तो सत्वगुण ॥ ८३ ॥  
८३) ज्याला दुसर्‍याच्या दुःखाने वाईट वाटते व दुसर्‍याच्या सुखाने आनंद होतो, वैराग्य दिसल्यावर आनंद वाटतो; तो सत्वगुण होय.
परभूषणें भूषण । परदूषणें दूषण ।
परदुःखें सिणे जाण । तो सत्वगुण ॥ ८४ ॥
८४) दुसर्‍याचे भूषण ते आपले, दुसर्‍याचे दूषण ते आपले वाटते, दुसर्‍याचे दुःख ऐकून, बघून जो दुःखी होतो; तो सत्वगुण होय.  
आतां असों हें बहुत । देवीं धर्मीं ज्याचें चित्त ।
भजे कामनारहित । तो सत्वगुण ॥ ८५ ॥  
८५) आता हे सत्गुण वर्णन बरेच झाले. देवा धर्माकडे ज्याचे चित्त लागलेले असते, देवाची भक्ति निरहेतुकपणे करतो, तो सत्वगुण होय.
ऐसा हा सत्वगण सात्त्विक । संसारसागरीं तारक । 
येणें उपजे विवेक । ज्ञानमार्गाचा ॥ ८६ ॥
८६) असा हा सत्वगुण अत्यंत सात्विक असून संसारांतुन, दुःखांतुन तारुन नेणारा आहे. त्यामुळे चांगले विचार सुचतात व उत्तम ज्ञान प्राप्ती होते. 
सत्वगुणे भगवद्भक्ती । सत्वगुणें ज्ञानप्राप्ती ।
सत्वगुणें सायोज्यमुक्ती । पाविजेते ॥ ८७ ॥
८७) सत्वगुणामुळे भगवंताची भक्ति होते, ज्ञान मिळते आणि सायोज्यमुक्तीही मिळते. 
ऐसी सत्वगुणाची स्थिती । स्वल्प बोलिलें येथामती ।
सावध होऊन श्रोतीं । पुढें अवधान द्यावें ॥ ८८ ॥
८८) अशीही सत्वगुणाची महती माझ्या बुद्धिला सुचल्याप्रमाणे थोडक्यांत सांगितली. श्रोत्यांनी सावधपणे पुढेले समासीही लक्ष,अवधान द्यावे. 

॥ इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे सत्वगुणनाम समास सातवा ॥
Samas Satava Satvagun Lakshan
समास सातवा सत्वगुण लक्षण 

Custom Search
Post a Comment