Saturday, December 9, 2017

Adhyay Pahila SankhaSarartha Yoga अध्याय पहिला सांख्यसारार्थयोग


Adhyay Pahila SankhyaSarartha Yoga 
Ganesh Geeta Adhyay Pahila SankhaSarartha Yoga is in Sanskrit. It is told by God Gajanan to King Varenya. Amrut is there in this Yoga as told by God Ganesh.
अध्याय पहिला सांख्यसारार्थयोग 
श्रीगणेशाय नमः ॥ 
ब्रह्मा उवाच
एवमेव पुरा पृष्टा शौनकेन महात्मना ।
स सूतः कथयामास गीतां व्यासमुखाच्छ्रुताम् ॥ १ ॥
अर्थ 
१) ब्रह्नदेव म्हणाले, व्यासा, असाच प्रश्र्न पूर्वी शौनकमुनींनी सूताला केला होता. त्यावेळी सूतानें श्रीव्यासमुखांतुन ऐकलेली गीता सांगितली.
सूत उवाच
अष्टादशपुराणोक्तममृतं प्राशितं त्वया । 
ततोऽतिरसवत्यातुमिच्छाम्यमृतमुत्तमम् ॥ २ ॥
(व्यासांच्या तोंडून गीता ऐकली ते असे झाले, ) 
सूत म्हणाला
२) हे व्यासमुने आपण मला अठरा पुराणे सांगुन अमृतपान करविले आहे. आता त्याहूनही ज्याच्यात विशेष रस आहे असें (ज्ञानरुपी) अमृत पिण्याची मला इच्छा झाली आहे.  
येनामृतमयो भूत्वाऽऽप्नुयां ब्रह्मामृतं यतः ।
योगामृतं महाभाग तन्मे करुणया वद ॥ ३ ॥
३) ज्याचे योगानें मी अमृतरुप होऊन (शाश्र्वत) अशा ब्रह्माला पावेन तें योगामृत मला कृपा करुन सांगा. 
व्यास उवाच
अथ गीतां प्रवक्ष्यामि योगमार्गप्रकाशिनीम् ।
नियुक्ता पृच्छते सूत राज्ञे गजमुखेन या ॥ ४ ॥
व्यास म्हणाले
४) सूता, तुला आतां योगमार्गप्रकाशक अशी गीता सांगतो, जी वरेण्य राजानें प्रश्र्न केल्यामुळें श्रीगजाननांनी त्याला सांगितली होती.
वरेण्य उवाच 
विघ्नेश्र्वर महाबाहो सर्वविद्याविशारद ।
सर्वशास्त्रार्थतत्त्वज्ञ योगं मे वक्तुमर्हसि ॥ ५ ॥
वरेण्य म्हणाला
५) हे महाबाहो, विघ्नेश्र्वरा ! तूं सर्व विद्यांमध्ये विशारद व सर्व शास्त्रार्थांचे तत्त्व जाणणारा आहेस, त्यामुळें मला योग सांगण्यास तूंच योग्य आहेस.
श्रीगजानन उवाच
सम्यग्व्यवसिता राजन्मतिस्तेऽनुग्रहान्मम ।
श्रृणु गीतां प्रवक्ष्यामि योगामृतमयीं नृप ॥ ६ ॥
श्रीगजानन म्हणाले, 
६) राजा माझ्या अनुग्रहाने तुझी बुद्धि सन्मार्गाला लागली असल्यानें ज्यांत योगरुपी अमृत भरलेले आहे अशी गीता तुला सांगतो. ऐक.
न योगं योगमित्याहुर्योगो योगो न च श्रियः ।
न योगो विषयैर्योगो न च मात्रादिभिस्तथा ॥ ७ ॥
७) योग शब्दाचा अर्थ न मिळालेले मिळणे असा आहे. पण तो खरा योग नव्हे. संपत्ति मिळणें म्हणजे धनयोग हाही योग नव्हे. शब्दादि विषयांचा लाभ हाही योग नसून भोगक्षम इंद्रियांची प्राप्ति हाही खरा योग नाहीं. 
योगो यः पितृमात्रादेर्न स योगो नराधिप ।
यो योगो बन्धुपुत्रादेर्यश्र्चाष्टभूतिभिः सह ॥ ८ ॥
८) चांगले आईबाप मिळणे हाही खरा योग नव्हे. हे राजा, बन्धुसुत इत्यादिकांची प्राप्ती तशीच अष्टमहासिद्धि मिळणे हाही खरा योग नव्हे.
न स योगः स्त्रिया योगो जगदद्भुतरुपया ।
राज्ययोगश्र्च नो योगो न योगो गजवाजिभिः ॥ ९ ॥
९) अलौकिक अशी रुपवती स्त्री मिळणे हा योग नव्हे. राज्यलाभ होणे हाही योग नव्हे. हत्ती, घोडे मिळणे हाही योग नव्हे. 
योगो नेद्रपदस्यापि योगो योगार्थिनः प्रियः ।
योगो यः सत्यलोकस्य न स योगो मतो मम ॥ १० ॥
१०) इंद्राचे पद जरी मिळाले तरी ते खर्‍या योगाची इच्छा करणार्‍यांना प्रिय असत नाही. साक्षात् सत्यलोक मिळणें हाही तें योग म्हणून मला मान्य नाही. 
शैवस्य योगो नो योगो वैष्णवस्य पदस्य यः ।
न योगो भूप सूर्यत्वं चन्द्रत्वं न कुबेरता ॥ ११ ॥
११) शैवपद, विष्णुपद प्राप्त होणें हा खरा योग नसून सूर्य, चंद्र, कुबेर होतां आलें तरी तो खरा योग नव्हे.
नानिलत्वं नानलत्वं नामरत्वं न कालता । 
न वारुण्यं न नैर्ऋत्यं न योगः सार्वभौमता ॥ १२ ॥
१२) पंचभूतांच्या देवतांची रुपें मिळणें अगर साक्षात् कालरुपता किंवा योगांतील सार्वभौमता नावाची सिद्धि मिळणे हा खरा योग नव्हे. 
योगं नानाविधं भूप युञ्जन्ति ज्ञानिनस्ततम् ।
भवन्ति वितृषा लोके जिताहारा विरेतसः ॥ १३ ॥
१३) योग हा नाना प्रकारचा असून त्याचा विस्तारही मोठा आहे. ज्ञानी लोक याचें अनुष्ठान करुन तृष्णेंतून मुक्त होतात. आहारावर जय मिळवतात व ऊर्ध्वरेतेही होतात.   
पावयन्त्यखिलॉंल्लोकान्वशीकृतजगत्त्रयाः ।
करुणापूर्णहृदया बोधयन्ति च कांश्र्चन ॥ १४ ॥
१४) ते ज्ञानी सर्व लोकांना पवित्र करतात. त्रिविध जग त्यांना वश असते. त्यांचे हृदय दयेनें भरलेले असते. ते कित्येकांना बोध करुन सन्मार्गाला लावतात.
जीवन्मुक्ता हृदे मग्नाः परमानन्दरुपिणि ।
निमील्याक्षीणि पश्यन्तः परं ब्रह्म हृदि स्थितम् ॥ १५ ॥
१५) ते जीवन्मुक्त पुरुष परमानंदरुप डोहांत निमग्न असतात. ते डोळे मिटून हृदयस्थित परब्रह्माला पाहात असतात. 
ध्यायन्तः परमं ब्रह्म चित्ते योगवशीकृतम् ।
भूतानि स्वात्मना तुल्यं सर्वाणि गणयन्ति ते ॥ १६ ॥
१६) योगसाधनाने सुलभ झाल्यामुळे ते परब्रह्माचे हृदयांत ध्यान करतात व सर्वत्र भूतमात्राला आपल्यासारखेंच पाहतात. 
येन केनचिदाच्छिन्ना ये न केनचिदाहताः ।
ये न केनचिदाक्रुष्टा ये न केनचिदाश्रिताः ॥ १७ ॥
१७) चोरादिकांकडून जे कधीही जखमी होत नाहीत तसेंच कोणाकडूनही ताडित होत नाहीत. ज्यांच्या बरोबर कोणीं भांडत नाहीत. त्यांच्या आश्रयाला कोणी येत नाहीत.  
येन केनचिदाच्छिन्ना येन केनचिदाहृताः ।
येन केनचिदाकृष्टा येन केनचिदाश्रिताः ॥ १८ ॥
१८) कसलेंहि वस्त्र त्यांनादेहाच्छादनास चालते. त्याचप्रमाणें यदृच्छेनें जे मिळेल तें त्यांना आहार म्हणून चालते. कोणीही त्यांना ओढून नेऊ शकतो. कोणीही त्यांच्या आश्रयास जाऊं शकतो.
करुणापूर्णहृदया भ्रमन्ति धरणीतले ।
अनुग्रहाय लोकानां जितक्रोधा जितेन्द्रियाः ॥ १९ ॥
१९) ज्यांच्या हृदयांत दयेचा पूर्ण वास असतो व ज्यांनी आपला क्रोध स्वाधीन ठेवला आहे, व इंद्रियें ज्यांच्या पूर्ण ताब्यांत आहेत, असे पुरुष या भूतलावर लोकोपकारार्थ फिरत असतात.     
देहमात्रभृतो भूप समलोष्टाश्मकाश्र्चनाः ।
एतादृशा महाभाग्याः स्युश्र्चक्षुर्गोचराः प्रिय ॥ २० ॥
२०) ज्यांच्याजवळ देहावाचून कांहींच असत नाही. ढेकूळ, रत्नें किंवा सोनें ज्यांना सारखींच वाटतात, हे राजा असे महाभाग ज्या योगाने दृष्टीस पडतील, 
तमिदानीमहं वक्ष्ये श्रृणु योगमनुत्तमम् ।
श्रुत्वा यं मुच्यते जन्तुः पापेभ्यो भवसागरात् ॥ २१ ॥
२१) तो उत्तम योग आता मी तुला सांगणार आहे. तो ऐक. जो ऐकला असतां मनुष्य पापांपासून मुक्त होऊन भवसागर तरुन जातो. 
शिवे विष्णौ च शक्तौ च सूर्ये मयि नराधिप ।
याऽभेदबुद्धिर्योगः स सम्यग्योगो मतो मम ॥ २२ ॥
२२) शिव, विष्णु, शक्ति, सूर्य व मी गणपती यांच्या ठिकाणीं अभेदबुद्धि ठेवणें म्हणजे सर्वांचे ऐक्य पाहणें हा उत्तम योग म्हणून मला मान्य आहे. 
अहमेव जगद्यस्मात्सृजामि पालयामि च ।
कृत्वा नानाविधं वेषं संहरामि स्वलीलया ॥ २३ ॥
२३) नाना प्रकारचे वेष धरुन मीच स्वलीलेनें जगाची उत्पत्ती, स्थिती व लय करीत असतो म्हणून 
अहमेव महाविष्णुरहमेव सदाशिवः ।
अहमेव महाशक्तिरहमेवार्यमा प्रिय ॥ २४ ॥
२४) हे प्रिय भूप, महाविष्णु, सदाशिव, महाशक्ति व सूर्यही मीच आहे. (पंचायतनांतील या देवता आहेत.
अहमेको नृणां नाथो जातः पञ्चविधः पुरा ।
अज्ञानान्मां न जानन्ति जगत्कारणकारणम् ॥ २५ ॥
२५) सर्व जीवांचा स्वामी मी एकच. तो पूर्वीं पांच प्रकारचा झालो. जगताला उत्पन्न करणारी मायाही ज्यानें निर्माण केलीं त्या मला अज्ञानाने, कोणी जाणत नाही.
मत्तोऽग्निरापो धरणी मत्त आकाशमारुतौ ।
ब्रह्मा विष्णुश्र्च रुद्रश्र्च लोकपाला दिशो दश ॥ २६ ॥
२६) माझ्यापासून पृथ्वी, आप, तेज, वायु, आकाश ही पंचमहाभूतें , ब्रह्मा, विष्णु, महेश्र्वर, अष्ट लोकपाल व दहा दिशा ही झालेली आहेत.  
वसवो मनवो गावो मुनयः पशवोऽपि च ।
सरितः सागरा यक्षा वृक्षाः पक्षिगणा अपि ॥ २७ ॥
२७) अष्ट वसु, चौदा मनु, गाई, सात ऋषी, पशू, नद्या, समुद्र, यक्ष, वृक्ष, पक्षिगण हेही (माझ्यापासून झाले आहेत. )  
तथैकविंशतिः स्वर्गा नागाः सप्त वनानि च ।
मनुष्याः पर्वताः साध्याः सिद्धा रक्षोगणास्तथा ॥ २८ ॥
२८) एकविस स्वर्ग, नवनाग, सात वनें, मनुष्य, पर्वत, साध्य, सिद्ध व राक्षस हेही (माझ्यापासून झाले आहेत. )   
अहं साक्षी जगच्चक्षुरलिप्तः सर्वकर्मभिः ।
अविकारोऽप्रमेयोऽहमव्यक्तो विश्र्वगोऽव्ययः ॥ २९ ॥
२९) मी सर्वांचा साक्षी, जगच्चक्षु, सर्व कर्मांपासून अलिप्त, कोणताही विकार नसलेला, कोणत्याही प्रमाणाला विषय न होणारा, अव्यक्त, अव्यय, विश्र्वव्यापक आहे. 
अहमेव परं ब्रह्माव्ययानन्दात्मकं नृप ।
मोहयत्यखिलान्माया श्रेष्ठान्मम नरानमून् ॥ ३० ॥
३०) अव्यक्त व आनंदात्मक परब्रह्म मीच आहे. माझी माया मोठ्यामोठ्यांना मोहांत पाडते. वजन्मादि सहा विकारांत त्यांना दृढ जखडून टाकते. 
सर्वदा षड्विकारेषु तानियं योजयेद्भृशम् ।
हित्वाऽजापटलं जन्तुरनेकैर्जन्मभिः शनैः ॥ ३१ ॥
विरज्य विन्दति ब्रह्म विषयेषु सुबोधतः ।
३१) अनेक जन्म (साधनें करीत असतां ) मायेचें पटल विरल होतें. विषयांबद्दल वैराग्य व सद्बोध झाला म्हणजे तो ब्रह्माला पावतो. म्हणजे ब्रह्मरुप होतो. 
अच्छेद्यं शस्त्रसंघातैरदाह्यमनलेन च ॥ ३२ ॥
अक्लेद्यं भूप भुवनैरशोप्यं मारुतेन च ।
अवध्यं वध्यमानेऽपि शरीरेऽस्मिन्नराधिप ॥ ३३ ॥
३२-३३) शस्त्रांनी ज्याला तोडता येत नाही, जें अग्नीनें जळत नाहीं, पाण्यानें कुजत नाहीं, वायु त्याला शुष्क करुं शकत नाही, शरीराचा वध केल तरी त्यांतील आत्मतत्व अवध्य आहे. 
यामिमां पुष्पितां वाचं प्रशंसन्ति श्रुतीरिताम् ।
त्रयीवादरता मूढास्ततोऽन्यन्मन्वतेऽपि न ॥ ३४ ॥
३४) पुष्पित वेलीप्रमाणें आपातरम्य अशा ' अक्षयं सुकृतं भवति ' वगैरे वेदवाक्यांची हे मूढ लोक स्तुति करतात. ते याशिवाय दुसरें श्रेयः साधन मानायलाही तयार असत नाहीत. 
कुर्वन्ति सततं कर्म जन्ममृत्युफलप्रदम् ।
स्वर्गैश्र्वर्यरता ध्वस्तचेतना भोगबुद्धयः ॥ ३५ ॥
३५) ते सदा जन्ममरणरुप फलाला देणारीं कर्मेंच करीत असतात. स्वर्गांतील ऐश्र्वर्य त्यांना प्रिय असते. तेथील भोग भोगावे असे त्यांच्या बुद्धीला वाटते. याच कामांत त्यांची बुद्धी नष्ट झालेली असते. 
संपादयन्ति ते भूप स्वात्मना निजबन्धनम् ।
संसारचक्रं युञ्जन्ति जडाः कर्मपरा नराः ॥ ३६ ॥
३६) ते कर्मपर नर आपणहून आपलें बंधन तयार करतात व जन्ममरणरुप संसारचक्रांत आपणहून जखडून जातात.
यस्य यद्विहितं कर्म तत्कर्तव्यं मदर्पणम् ।
ततोऽस्य कर्मबीजानामुच्छिन्नाः स्युर्महांकुराः ॥ ३७ ॥
३७) विधीने ज्याच्याकरतां जें सांगितलें असेल ते कर्म करुन मला अर्पण करावें, म्हणजे कर्मरुप बीजांचे पापपुन्यरुप मोठे अंकुर नष्ट होतात.  
चित्तशुद्धिश्र्च महती विज्ञानसाधिका भवेत् ।
विज्ञानेन हि विज्ञातं परं ब्रह्म मुनीश्र्वरैः ॥ ३८ ॥
३८) ( कर्म मला अर्पण केल्यानें ) चित्त अतिशय शुद्ध होते. त्यामुळें विज्ञानाची प्राप्ती होते. ज्या विज्ञानाने पूर्वींच्या मुनीश्र्वरांनी परब्रह्म जाणले. 
तस्मात्कर्माणि कुर्वीत बुद्धियुक्तो नराधिप ।
न त्वकर्मा भवेत्कोऽपि स्वधर्मत्यागवांस्तथा ॥ ३९ ॥
३९) म्हणून बुद्धिमान पुरुषानें कर्में करीत असावें. स्वधर्माचा त्याग केल्यानें कोणीही अकर्मा होऊं शकत नाहीं.
जहाति यदि कर्माणि ततः सिद्धिं न विन्दति ।
आदौ ज्ञाने नाधिकारः कर्मण्येव स युज्यते ॥ ४० ॥
४०) उगीच कर्म सोडून बसेल तर कर्मानें मिळणारी (चित्तशुद्धीरुपी ) सिद्धि त्याला मिळणार नाही. प्रथम ज्ञानाचा अधिकार असत नाही. तर तो कर्माचा असतो.
कर्मणा शुद्धहृदयोऽभेदबुद्धिमुपैष्यति ।
स च योगः समाख्यातोऽमृतत्वाय हि कल्पते ॥ ४१ ॥
४१) कर्मानें बुद्धि शुद्ध होते. त्यामुळें भेदबुद्धि नष्ट होते. यालाच योग असे म्हणतात. हा योग मोक्षप्राप्ति करुन देण्यास समर्थ होतो.
योगमन्यं प्रवक्ष्यामि श्रृणु भूप तमुत्तमम् ।
पशौ पुत्रे तथा मित्रे शत्रौ बन्धौ सुहृज्जने ॥ ४२ ॥
४२) आतां तुला आणखी एक उत्तम असा योग सांगतो तो ऐक. पशु, पुत्र, मित्र, बांधव, शत्रु, सुहृत् जन या सर्वांस ( समदृष्टीनें पहा ) 
बहिर्दृष्ट्या च समया हृत्स्थयाऽऽलोकयेत्पुमान् ।
सुखे दुःखे तथाऽमर्षे हर्षे भीतौ समो भवेत् ॥ ४३ ॥
४३) हृदयांत समदृष्टी ठेवावी व बाहेरही त्याच दृष्टीनें पहावें. सुखदुःख, क्रोध, हर्ष व भय यांत समता ढळूं देऊं नये.   
रोगाप्तौ चैव भोगाप्तौ जये वाऽविजयेऽपि च ।
श्रियोऽयोगे च योगे च लाभालाभे मृतावपि ॥ ४४ ॥
४४) रोग, भोग, जय, पराजय, सधनता, निर्धनता, लाभ, हानी व मृत्यु आला तरी समदृष्टी ठेवावी.
समो मां वस्तुजातेषु पश्यन्नन्तर्बहिःस्थितम् ।
सूर्ये सोमे जले वह्नौ शिवे शक्तौ तथाऽनिले ॥ ४५ ॥
४५) तसेंच वस्तुमात्रांत आंतबाहेर मीच व्यापून राहिलों आहें असें पाहावें.  तसेंच रवि, चंद्र, अग्नि, जल, शिव, शक्ति व वायु यांतही.
द्विजे ह्रदे महानद्यां तीर्थे क्षेत्रेऽघनाशिनि ।
विष्णौ च सर्वदेवेषु तथा यक्षोरगेषु  च ॥ ४६ ॥
४६) तसेंच ब्राह्मण, जलाशय, महानदी, तीर्थ, पापनाशक क्षेत्र, श्रीविष्णु, सर्व देव, तसेंच यक्ष, सर्प (या सर्वांतही ) 
गन्धर्वेषु मनुष्येषु तथा तिर्यग्भवेषु च ।
सततं मां हि यः पश्येत्सोऽयं योगविदुच्यते ॥ ४७ ॥
४७) गंधर्व, मनुष्य, व तिर्यग्योनींतील जीव या सर्वांत सतत जो मला पाहतो, त्याल योगज्ञ असें म्हणतात. 
संपराहृत्य स्वार्थेभ्य इन्द्रियाणि विवेकतः ।
सर्वत्र समताबुद्धिः स योगो भूप मे मतः ॥ ४८ ॥
४८) विवेकानें सर्व इंद्रियांना आपापल्या विषयांपासून परावृत्त करुन सर्वत्र समताबुद्धि असणें हा मला मान्य असा योग आहे. 
आत्मानात्मविवेकेन या बुद्धिर्दैवयोगतः ।
स्वधर्मासक्तचितस्य तद्योगो योग उच्यते ॥ ४९ ॥
४९) दैवयोगानें स्वधर्माचे ठिकाणी चित्त आसक्त होऊन नंतर आत्मानात्मविवेकानें जी बुद्धि होते त्यास योग असें म्हणतात. 
धर्माधर्मौ जहातीह तथा युक्त उभावपि ।
अतो योगाय युञ्जीत योगो वैधेषु कौशलम् ॥ ५० ॥
५०) आत्मानात्मविवेकापासून उत्पन्न होणारी बुद्धि ज्याला लाभली असेल असा पुरुष धर्माधर्माचा त्याग करतो. म्हणजे पापपुण्यांतून मुक्त होतो. असें योगाचें महत्व असल्यानें या योगाचा आश्रय अवश्य करावा. विधियुक्त कर्मांतील हें खरें कौशल्य आहे. 
धर्माधर्मफले त्यक्त्वा मनीषी विजितेन्द्रियः ।
जन्मबन्धविनिर्मुक्तः स्थानं संयात्यनामयम् ॥ ५१ ॥    
५१)  योगामुळे इंद्रियांचा व मनाचा जय उत्तम साधला म्हणजे पापपुण्यरुप फलांपासून मुक्त होऊन जन्ममरणरुप बंधापासून सुटतो व अनामय अशा स्थानास म्हणजे मोक्षास जातो.           
यदा ह्यज्ञानकालुष्यं जन्तोर्बुद्धिः क्रमिष्यति ।
तदाऽसौ याति वैराग्यं वेदवाक्यादिषु क्रमात् ॥ ५२ ॥
५२) जेव्हां मनुष्याच्या बुद्धीचें अज्ञानरुप कालुष्य नष्ट होतें, तेव्हां त्याला वेदाच्या मोहक वचनाबद्दल व अन्यत्रही वैराग्य प्राप्त होते. 
त्रयीविप्रतिपन्नस्य स्थाणुत्वं यास्यते यदा ।
परात्मन्यचला बुद्धिस्तदासौ योगमाप्नुयात् ॥ ५३ ॥ 
५३) वेदवचनांनी घोटाळ्यांत पडलेल्या पुरुषाला विचारानें जेव्हां स्थिरता येते म्हणजे परमात्म्यांत त्याची बुद्धि स्थिर होते, तेव्हां त्याला खरा योग मिळतो.
मानसानखिलान्कामान्यदा धीमांस्त्यजेत्प्रिय ।
स्वात्मनि स्वेन सन्तुष्टः स्थिरबुद्धिस्तदोच्यते ॥ ५४ ॥
५४) बुद्धिमान मनोगत अखिल काम सोडून देतो व स्वात्मलाभानेंच संतुष्ट असतो. त्याला स्थिरबुद्धि असे म्हणतात.
वितृष्णः सर्वसौख्येषु नोद्विग्नो दुःखसंगमे ।
गतसाध्वसरुड्रागः स्थिरबुद्धिस्तदोच्यते ॥ ५५ ॥
५५) सर्व सुखांबद्दल ज्याला अभिलाषा असत नाही व दुःखें कोसळलीं जरी जो खिन्न होत नाही; त्याला स्थिरबुद्धि असे म्हणतात. 
यथाऽयं कमठोऽङ्गानि संकोचयति सर्वतः ।
विषयेभ्यस्तथा खानि संकर्षेद्योगतत्परः ॥ ५६ ॥
५६) कासव जसा आपल्या अवयवांना सर्व बाजूंनी आखडून घेतो, त्याचप्रमाणे योगतत्पर पुरुषाने आपल्या इंद्रियांना आवरुन घ्यावें, म्हणजे विषयांकडे जाऊं देऊं नये.
व्यावर्तन्तेऽस्य विषयास्त्यक्ताहारस्य वर्ष्मिणः ।
विना रागं च रागोऽपि दृष्ट्वा ब्रह्म विनश्यति ॥ ५७ ॥
५७) आहार सोडला असतां जीवाचे विषय सुटूं शकतात. पण त्यावरील प्रेम सुटत नाही. पण तें ब्रह्मज्ञानाने सुटते.
विपश्र्चिद्यतते भूप स्थितिमास्थाय योगिनः ।
मन्थयित्वेन्द्रियाण्यस्य हरन्ति चलतो मनः ॥ ५८ ॥
५८) जाणता मनुष्य योग्याप्रमाणें वागून म्हणजे ध्यानधारणादि साधनें करुन योगसिद्धीचा यत्न करीत असतो. पण त्याची इंद्रियें त्याच्या मनाला व्याकुळ करुन योगापासून त्याला परावृत्त करतात.   
युक्तास्तानि वशे कृत्वा सर्वदा मत्परो भवेत् । 
संयतानीन्द्रियाणीह यस्यासौ कृतधीर्मतः ॥ ५९ ॥
५९) इंद्रियांना योगसाधनेनें वश करुन जो मत्पर असतो, अशा इंद्रियें स्वाधीन ठेवणार्‍यास कृतधी म्हणजे स्थितप्रज्ञ म्हणतात.  
चिन्तयानस्य विषयान्संगस्तेषूपजायते ।
कामः संजायते तस्मात्ततः क्रोधोऽभिवर्धते ॥ ६० ॥
६०) विषयांचें चिंतन करणार्‍यांस विषयाबद्दल आसक्ति उत्पन्न होते. त्या आसक्तीमुळें काम उत्पन्न होतो व त्या कामाच्या ( विघाता) मुळें क्रोधवृद्धि पावतो.  
क्रोधादज्ञानसंभूतिर्विभ्रमस्तु ततः स्मृतेः ।
भ्रंशात्स्मृतेर्मतेर्ध्वंसस्तध्द्वंसात्सोऽपि नश्यति ॥ ६१ ॥
६१) क्रोधानें अज्ञान उत्पन्न होतें, अज्ञानानें स्मृतीला भ्रम पडतो; स्मृतीभ्रंशानें मतीहि नष्ट होतें व मतीच्या नाशानें त्याचा स्वतःचाही नाश होतो.  
विना द्वेषं च रागं च गोचरान्यस्तु खैश्र्चरेत् ।
स्वाधीनहृदयो वश्यैः सन्तोषं स समृच्छति ॥ ६२ ॥
६२) जो मन व इंद्रियांना स्वाधीन ठेवून रागद्वेषरहित होऊन विषयाचें सेवन करतो; त्यालाच खरा संतोष मिळतो. 
त्रिविधस्यापि दुःखस्य सन्तोषे विलयो भवेत् ।
प्रज्ञया संस्थितश्र्चायं प्रसन्नहृदयो भवेत् ॥ ६३ ॥
६३) संतोष मिळाला म्हणजे त्रिविध दुःखाचाही नाश होतो. प्रज्ञा स्थिर होते व हृदय प्रसन्न होते. 
विना प्रसादं न मतिर्विना मत्या न भावना ।
विना तां न शमो भूप विना तेन कुतः सुखम् ॥ ६४ ॥  
६४) मन प्रसन्न नसेल तर सद्बुद्धिही उत्पन्न होत नाही. सद्बुद्धीवांचून सद्भावना नाहीं, ती भावना नसेल तर शम नाही. तो शम नसेल तर सुख तरी कसें मिळेल?   
इन्द्रियाश्र्वान्विचरतो विषयाननुवर्तते ।
यन्मनस्तन्मतिं हन्यादप्सु नावं मरुद्यथा ॥ ६५ ॥
६५) विषयांच्या मागून धावणारे हे इंद्रियरुपी अश्र्व आहेत. यांच्यामागून मन धावूं लागलें असतां जसा पाण्यांत झंझावात नौकेचा नाश करतो त्याप्रमाणें मन मतीचा नाश करते. 
या रात्रिः सर्वभूतानां तस्यां निद्राति नैव सः ।
न स्वपन्तीह ते यत्र सा रात्रिस्तस्य भूमिप ॥ ६६ ॥
६६) सर्व भूतांची जी रात्र असते तेथे हा जागा असतो व जेथें सर्व भूतें जागीं असतात तेथें याची रात्र असते.     
सरितां पतिमायान्ति वनानि सर्वतो यथा ।
आयान्ति यं तथा कामा न स शान्तिं क्वचिल्लभेत् ॥ ६७ ॥
६७) जगांतील उदकें जशी सागरास येऊन मिळतात, ( पण तो गंभीरच राहतो ) तसे सर्वही काम याचेकडे येतात ; पण याची शांती ढळत नाही. 
अतस्तानीह संरुध्य सर्वतः खानि मानवः ।
स्वस्वार्थेभ्यः प्रधावन्ति बुद्धिरस्य स्थिरा तदा ॥ ६८ ॥
६८) आपापल्या विशयांकडे धांव घेणार्‍या या इंद्रियांचा जेव्हां मनुष्य पूर्ण निरोध करतो तेव्हां त्याची बुद्धि स्थिर होते.  
ममताहंकृती त्यक्त्वा सर्वान्कामांश्र्च यस्त्यजेत् ।
नित्यं ज्ञानरतो भूत्वा ज्ञानान्मुक्तिं प्रयात्यसौ  ॥ ६९ ॥
६९) अहंता व ममता यांचा त्याग करुन जो सर्व कामांचाही त्याग करतो व सतत ज्ञानांत गढून गेलेला असतो अशा पुरुषाला त्या ज्ञानापासून मोक्षाची प्राप्ति होते. 
एतां ब्रह्मधियं भूप यो विजानाति दैवतः ।
तुरीयावस्थां प्राप्यापि शीलं मुक्तिं प्रयास्यति ॥ ७० ॥
७०) या ब्रह्मबुद्धीचें दैवानें ज्याला ज्ञान होतें त्याला वृद्धवस्थेंतही उत्तम शील व मुक्ति मिळते.   
ॐ तत्सदिति श्रीमद्गणेशगीतासूपनिषदर्थगर्भासु योगामृतशाखे श्रीमद्गणेशपुराणे उत्तरखंडे बालचरिते श्रीगजाननवरेण्यसंवादे सांख्यसारार्थयोगो नाम प्रथमोऽध्यायः ॥
Adhyay Pahila SankhaSarartha Yoga 
अध्याय पहिला सांख्यसारार्थयोग 


Custom Search

No comments: