Sunday, January 28, 2018

Samas Aathava Antaratma Vivaran समास आठवा अंतरात्मा विवरण


Dashak Aakarava Samas Aathava Antaratma Vivaran 
Samas Aathava Antaratma Vivaran, It is in Marathi. Swami Samarth Ramdas is telling us Atma in this Samas
समास आठवा अंतरात्मा विवरण
श्रीराम ॥
आधीं वंदूं सकळकर्ता । समस्त देवांचा जो भर्ता ।
त्याचे भजनीं प्रवर्ता । कोणीतरी ॥ १ ॥
१) सर्व घटनांचा कर्ता, तसेंच सर्व देवांचा मालक असा जो अंतरात्मा त्याचें ज्ञान करुन घेण्याचा कोणीतरी प्रयत्न करावा.
तेणेविण कार्य न चले । पडिलें पर्ण तेंहि न हाले ।
अवघें त्रैलोक्येचि चाले । जयाचेनी ॥ २ ॥  
२) त्याच्याशिवाय कांहींही कार्य होत नाही. त्याच्या सत्तेवाचून झाडाचे पडलेले पानही हालत नाहीं. त्याच्यापासून मिळणार्‍या शक्तीनेंच त्रैलोक्य चालते.  
तो अंतरात्मा सकळांचा । देवदानवमानवांचा ।
चत्वारखाणीचत्वारवाणीचा । प्रवर्तकु ॥ ३ ॥
३) देव, दानव, मानव, चार खाणी व चार वाणी या सर्वांचा प्रवर्तक एकटा तो अंतरात्मा आहे. 
तो येकलाचि सकळां घटीं । करी भिन्नभिन्ना राहाटी ।
सकळ सृष्टीची गोष्टी । किती म्हणौन सांगावी ॥ ४ ॥
४) सर्व प्राण्यांच्या देहामध्यें तोच वास करतो. आणि त्यांना निरनिराळ्या प्रकारे वागायला शक्ति व प्रेरणा देतो. सार्‍या विश्र्वाचे चालन करणार्‍या त्याचें संपूर्ण कर्तृत्व सांगता येणार नाही.  
ऐसा जो गुप्तेश्र्वर । त्यास म्हणावें ईश्र्वर ।
सकळ ऐश्र्वर्य थोर थोर । जयाचेनि भोगिती ॥ ५ ॥
५) असा जो गुप्त मालक आहे त्यालाच ईश्र्वर म्हणतात. त्याच्या सत्तेनेंच लोक मोठी ऐश्र्वर्य भोगतात.  
ऐसा जेणें वोळखिला । तो विश्र्वंभरचि जाला ।
समाधी सहजस्थितीला । कोण पुसे ॥ ६ ॥
६) अशा अंतरात्म्याचें ज्याला ज्ञान होतें तो स्वतः विश्र्वव्यापी विश्र्वंभर बनतो. मग समाधि व सहजस्थिति यांचें कांहीं महत्व उरत नाही. ईश्र्वराशी तदाकार होण्याची स्थिति इतर सर्व अवस्थांच्या मानानें फारच पलीकडची असते. 
अवघें त्रैलोक्य विवरावें । तेव्हां वर्म पडेल ठावें ।
आवचतें घबाड सिणावें । नलगेचि कांहीं ॥ ७ ॥
७) या सगळ्या दृश्य विश्र्वाचे विवरण करीत गेल्यानें अंतरात्म्याचें रहस्य आपोआप आकलन होते. एकाएकी प्रचंड लाभ हातीं येतो. त्यासाठीं निराळे श्रम करावें लागत नाहींत.
पाहातां ऐसा कोण आहे । जो अंतरात्मा विवरोन पाहे ।
अल्प स्वल्प कळोन राहे । समाधानें ॥ ८ ॥
८) बुद्धीनें विवरण करुन अंतरात्म्याचे ज्ञान करुन घेणें कोणासहि शक्य नाही. त्याचे ज्ञान होण्यासाठीं बुद्धीनें धडपडणार्‍यांना त्याचें येवढेंतेवढें ज्ञान होते. व त्यावरच तें समाधान मानतात. 
आरे हें पाहिलेंच पाहावें । विवरलेंचि मागुतें विवरावें ।
वाचिलेंचि वाचावें । पुन्हपुन्हा ॥ ९ ॥
९) अल्पस्वल्प ज्ञानानें अंतरात्म्याचें जें किंचित दर्शन झालें असेल तें वारंवार पुन्हपुन्हा घ्यावे. पुन्हपुन्हा त्याचे विवरण करावें. त्याच्याबद्दल वाचलेले पुन्हपुन्हा वाचावे.   
अंतरात्मा केवढा कैसा । पाहाणाराची कोण दशा ।
देखिल्या ऐकिल्या ऐसा । विवेक सांगे ॥ १० ॥
१०) हा अंतरात्मा केवढा आहे व कसा आहे, त्याला जो पाहातो त्याची दशा काय होते.,याबद्दल जो सांगतो तें अपूर्ण असते. कारण त्यानें जें पाहिले असते व ऐकलेले असतें तेवढेच तो सांगतो. 
उदंड ऐकिलें देखिलें । अंतरात्म्यास नवचे पुरविलें ।
प्राणी देहधारी बाउलें । काये जाणे ॥ ११ ॥
११) माणसानें कितीही ऐकलें आणि पाहिलें तरी अंतरात्म्याचे संपूर्ण वर्णन करण्यास तें पुरें पडत नाही. देहधारी माणूस अनंत व अपार अंतरात्म्यास संपूर्णपणें जाणणे शक्य नसते.  
पूर्णास अपूर्ण पुरेना । कां जें अखंड विवरेना ।
विवरतां विवरतां उरेना । देवावेगळा ॥ १२ ॥
१२) माणूस अपूर्ण तर अंतरात्मा पूर्ण आहे. पूर्णाला अपूर्ण आकलन करुं शकत नाहीं. याचें कारण असें कीं माणूस पूर्णाचे अखंड चिंतन करीत नाही. तसें जर केलें तर माणूस देवाहून वेगळेपणानें उरत नाहीं. 
विभक्तपणें नसावें । तरीच भक्त म्हणवावें ।
नाहींतरी वेर्थचि सिणावें । खटाटोपें ॥ १३ ॥
१३) देवाशी वेगळेपण नसावें. म्हणजेच मग भक्त म्हणून घेणें शोभतें. देवाशीं तादात्म्य साधलें नाहीं तर खटाटोप श्रम व्यर्थ वाया जातात.  
उगाच घर पाहोन गेला । घरधनी नाहीं वोळखिला ।
राज्यामधूनचि आला । परी राजा नेणे ॥ १४ ॥
१४) एक माणूस घर पाहून गेला पण त्यानें घराच्या मालकास पाहिलेंच नाहीं. ओळखलें नाही. दुसरा एक माणूस एका राज्यामधून आला, पण येथील राजा कोण याची चौकशी त्यानें केली नाहीं.  
देहसंगें विषये भोगिले । देहसंगे प्राणी मिरवलें ।
देहधर्त्यास चुकलें । नवल मोठें ॥ १५ ॥
१५) हें जसें घडतें त्याचप्रमाणें माणूस देहाच्या संगतीनें इंद्रियांचे सुख भोगतो, जन्मभर देहाच्या संगतीनें मिरवतो. पण जो अंतरात्मा देहास चालवतो त्याला माणूस जाणत नाहीं. हें एक मोठें नवलच आहे.   
ऐसे लोक अविवेकी । आणि म्हणती आम्ही विवेकी ।
बरें ज्याची जैसी टाकी । तैसें करावें ॥ १६ ॥
१६) अशा रीतीनें लोक विवेकहीन असून देखील स्वतःला मोठे विवेकी म्हणवतात. एकंदरींत ज्याला जशी जगण्याची सवय लागते तसें तो जगतो.  
मूर्ख अंतर राखों नेणे । म्हणौन असावें शाहाणे ।   
ते शाहाणेहि दैन्यवाणे । होऊन गेले ॥ १७ ॥
१७) ज्याला आपलें अंतरंग सांभालता येत नाहीं तो मूर्ख होय. म्हणून माणसानें शहाणपण शिकावें असें म्हणतात. म्हणून शहाण्यास पाहावे तर ते देखील अंतरंगाचें ज्ञान नसल्यानें दिनवाणें झालेलें असतात.  
अंतरीं ठेवणें चुकलें । दारोदारीं धुंडूं लागलें ।  
तैसें अज्ञानास जालें । देव न कळे ॥ १८ ॥
१८) समजा, एखाद्याच्या घरांतच संपत्ती ठेवलेली आहे. ती तो विसरला आणि मग संपत्तीसाठीं दारोदार हिंडूं लागला. त्याच प्रमाणें अज्ञानी माणसाची अवस्था होते. स्वतःच्या अंरंगात असलेला ईश्र्वर त्यास कळत नाहीं, तो त्यास बाहेर शोधायला जातो.   
या देवाचें ध्यान करी । ऐसा कोण सृष्टीवरी ।
वृत्ती येकदेंसी तर्तरी । पवाडेल कोठें ॥ १९ ॥
१९) अनंत अंतरात्म्याचे ध्यान करणारा या विश्र्वांत कोणीही नाही. माणसाची जाणण्याची वृत्ती एकदेशी आहे. तिची झेप दृश्यापर्यंत मर्यादित आहे. अशा स्थळकालांनीं मर्यादित असणार्‍या वृत्तीची चपळता अंतरात्म्याचें ध्यान करण्याइतकी पुरीं पडत नाहीं. 
ब्रह्मांडीं दाटले प्राणी । बहुरुपें बहुवाणी ।
भूगर्भीं आणि पाषाणीं । कितीयेक ॥ २० ॥
२०) या जगामध्यें जीवप्राणी नुसतें गर्दी करुन आहेत. त्यांची रुपें व भाषा नाना तर्‍हांची आहेत. पृथ्वीच्या पोटांत व पाषाणांत देखील असे कितीतरी प्राणी आहेत.  
इतुके ठाईं पुरवला । अनेकीं येकचि वर्तला ।
गुप्त आणि प्रगटला । कितीयेक ॥ २१ ॥
२१) या सर्वांमध्यें अंतरात्मा भरुन पुनः उरला आहे. अशा रीतीनें अनेकांमध्यें एकच एक अंतरात्मा नटला आहे. कांहीं ठिकाणीं तो गुप्त असतो तर कांहीं ठिकाणी तो प्रगटपणें दिसतो. 
चंचळें न होईजे निश्र्चळ । प्रचित जाणावी केवळ ।
चंचळ तें नव्हे निश्र्चळ । परब्रह्म तें ॥ २२ ॥
२२) आपण अशाश्र्वत मायेमध्यें जोपर्यंत आहोत तोपर्यंत शाश्र्वत ब्रह्मवस्तु हस्तगत होणार नाही. प्रत्यक्ष अनुभवानें आपण हें ओळखावें. जें अशाश्र्वत आहें तें शाश्र्वत परब्रह्म मुळींच नव्हें.     
तत्वें तत्व जेंव्हां उडे । तेव्हां देहबुद्धि झडे ।
निर्मळ निश्र्चळ चहुंकडे । निरंजन ॥ २३ ॥
२३) एका तत्वानें दुसर्‍या तत्वाचा जेव्हां निरास होत जातो तेव्हां देहबुद्धीचा क्षय होतो. मग चोहीकडे एक निर्मल, निश्र्चल व निरंजन ब्रह्म अनुभवास येते.  
आपण कोण कोठें कैंचा । ऐसा मार्ग विवेकाचा ।
प्राणी जो स्वयें काचा । त्यास हें  कळेना ॥ २४ ॥
२४) विवेकाचा जो मार्ग आहे त्यामध्यें " मी कोण, मी कोठून आलो व मी कसा आहे  " हे प्रश्र्ण सोडवावे लागतात. जो माणूस स्वतः विवेकानें कच्चा आहे. त्याला हें कळत नाहीं. 
भल्यानें विवेक धरावा । दुस्तर संसार तरावा ।
अचघा वंशचि उधरावा । हरिभक्ती करुनी ॥ २५ ॥
२५) म्हणून भल्या माणसानें विवेकाची कास धरावी. तरण्यास कठीण असा हा संसार विवेकाच्या बळावर तरुन जावा. भगवंताची भक्ती करुन आपल्या वंशाचा उद्धार करावा. 
इति श्रीदासबोधे गुरुशिश्यसंवादे अंतरात्माविवरण नाम समास आठवा ॥
Samas Aathava Antaratma Vivaran  
समास आठवा अंतरात्मा विवरण


Custom Search

No comments: