Thursday, January 18, 2018

Samas Choutha SarVivek Nirupan समास चौथा सारविवेक निरुपण


Dashak Aakarava Samas Choutha SarVivek Nirupan 
Samas Choutha SarVivek Nirupan, It is in Marathi. Swami Samarth Ramdas is telling us that this world is immerging from Maya which is not permeant only Brahma is permeant. Many people know it however due to attachment of Body and intelligence they feel that Maya is permeant. Hence knowledgeable people should think and accept the Sar which is permeant.
समास चौथा सारविवेक निरुपण
श्रीराम ।
ब्रह्म म्हणिजे निराकार । गगनासारिखा विचार ।
विकार नाहीं निर्विकार । तेंचि ब्रह्म ॥ १ ॥
१) मानवाच्या बुद्धीला कल्पना करण्यासाठीं आकाराचा आधार घ्यावा लागतो. म्हणून  ब्रह्मआकाशासारखें आहे असें म्हणावयाचे. पण ब्रह्मास तो आकार नाहीं तसेंच आकाशाला विकार आहे, तें बदलतें. म्हणून जें अत्यंत निर्विकार व निराकार आहे तेच ब्रह्म होय.  
ब्रह्म म्हणिजे निश्र्चळ । अंतरात्मा चंचळ ।
द्रष्टा साक्षी केवळ । बोलिजे तया ॥ २ ॥
२ ब्रह्म संपूर्ण शाश्वत आहे. त्या मानानें अंतरात्मा अशाश्वत असतो. तो सर्व जीवांच्या अंतर्यामी राहतो. त्यालाच द्रष्टा व सर्व साक्षी म्हणतात. 
तो अंतरात्मा म्हणिजे देव । त्याचा चंचळ स्वभाव ।
पाळिताहे सकळ जीव । अंतरीं वसोनी ॥ ३ ॥
३) अंतरात्मा म्हणजे देव होय. तो स्वभावानें अशाश्वत आहे. तो सर्व जीवांच्या अंतर्यामी राहून त्यांचे पालन करतो. 
त्यावेगळे जड पदार्थ । तेणेंवीण देह वेर्थ । 
तेणेंचि कळे परमार्थ । सकळ कांहीं ॥ ४ ॥
४) अंतरात्म्याशिवाय असणारे सर्व जड पदार्थ समजावे. देहांत अंतरात्मा नसेल तर तो देहसुद्धा व्यर्थच असून केवळ जड पदार्थच असतो. अंतरात्म्यामुळेंच परमार्थ कळतो व सर्व कांहीं जाणले जाते. 
कर्ममार्ग उपासनामार्ग । ज्ञानमार्ग सिद्धांतमार्ग ।
प्रवृत्तिमार्ग निवृत्तिमार्ग । देवचि चालवी ॥ ५ ॥
५) कर्ममार्ग, उपासनामार्ग, ज्ञानमार्ग, सिद्धांन्तमार्ग, प्रवृत्तिमार्ग, निवृत्तिमार्ग वगैरे सर्व मार्ग अंतरात्म्यानेंच चालतात. 
चंचळेविण निश्र्चळ कळेना । चंचळ तरी स्थिरावेना ।
ऐसें हे विचार नाना । बरे पाहा ॥ ६ ॥
६) अशाश्वताचा वाचून शाश्वत काय आहे तें समजू शकत नाही. मात्र  अशाश्वत कधीही शाश्वत होत नाही. निरनिराळ्या प्रकारांनी विचार करुन हें समजून घ्यावें. 
चंचळनिश्र्चळाची संधी । तेथें भांबावते बुद्धि ।
कर्ममार्गाचे जे विधी । ते मग ऐलिकडे ॥ ७ ॥
७) जेथें सर्व अशाश्वत संपते तेथें कांहीनाही अशी स्थिती म्हणजे शून्यावस्था येते. तेथे बुद्धीघोटाळ्यांत पडते. शून्यालाच ब्रह्म समजलें जाते. येथें देहाचा विसर असल्यानें कर्माला वाव नसतो. म्हणून कर्ममार्गाचा सर्व आचार खालच्या अवस्थेंपर्यंतच असतो. 
देव या सकळांचें मूळ । देवास मूळ ना डाळ ।
परब्रह्म तें निश्र्चळ । निर्विकारी ॥ ८ ॥
८) अंतरात्मा हा सर्व दृश्याचे व कर्माचे मूळ आहे. प्रकृतिमुळें अस्तित्वांत येणार्‍या अंतरात्म्याला मूळ वा शेंडा किंवा खरें अस्तित्व नाही. खरें अस्तित्व फक्त निर्विकारी व शाश्वत परब्रह्मालाच आहे. 
निर्विकारी आणि विकारी । येक म्हणेल तो भिकारी ।
विचाराची होते वारी । देखतदेखतां ॥ ९ ॥
९) निर्विकारी ब्रह्म व विकारी अंतरात्मा हे दोन्ही एकच आहेत असे समजणारा माणूस बुद्धीनें भिकारीच समजावा. विचारानें परब्रह्म समजता येत नाही. विचार हां हां म्हणता नाहींसा होतो.   
सकळ परमार्थास मूळ । पंचीकर्ण माहावाक्य केवळ ।
तेंचि करावें प्रांजळ । पुनःपुन्हां ॥ १० ॥
१०) हें विश्र्व ज्यानें विणलेले आहे त्या पंचभूतांचे विवरण व महावाक्यांचे मनन, निदिध्यासन हें सगळ्या परमार्थाचे मूळ आहे. हें विचारानें पुन्हपुन्हा समजून घ्यावें. 
पहिला देह स्थूळकाया । आठवा देह मूळमाया ।
अष्ट देह निर्शलियां । विकार कैंचा ॥ ११ ॥
११) पिंडब्रह्मांडाच्या आठ देहांपैकी पहिला देह म्हणजे आपली स्थूल काया. आपलें जड शरीर होय. तर आठवा देह म्हणजे मूळ माया होय. आठही देहांचे निरसन केल्यावर मग विकार किंवा बदल यत्किंचितही उरत नाही.  
याकारणें विकारी । साचाऐसी बाजीगरी ।
येक समजे येक खरी । मानिताहे ॥ १२ ॥
१२) याकारणाने जें जें विकार पावतें किंवा बदलते  तें तें खर्‍यासारखे भासलें तरी तें जादूनें निर्माण केलेल्या वस्तूप्रमाणें भ्रमरुप असते. जाणता मनुष्य त्याचे खोटेपण ओळखतो. मात्र अजाणता माणूस त्यास खरें मानतो.  
उत्पत्ति स्थिती संव्हार । यावेगळा निर्विकार ।
कळायासाठीं सारासार । विचार केला ॥ १३ ॥  
१३) विकारी वस्तूंना उत्पत्ति, स्थिती व संव्हार असतो. निर्विकार परब्रह्म वस्तु यांतून निराळी राहते. हे बरोबर कळण्यासाठीं सार काय व असार काय याचा सूक्ष्म विचार केला पाहिजे.     
सार असार दोनी येक । तेथें कैंचा उरला विवेक ।
परीक्षा नेणती रंक । पापी करंटे ॥ १४ ॥
१४) सार व असार दोन्ही एकच मानल्यास मग विवेकाला जागाच नाही. अशा विवेकशून्य, बुद्धीहीन, पापी व करंट्या माणसांना सारासाराची परीक्षा करता येत नाही.
जो येकचि विस्तारला । तो अंतरात्मा बोलिला ।
नाना विकारीं विकारला । निर्विकारी नव्हे ॥ १५ ॥
१५) एकच अंतरात्मा हा विश्र्वांत विश्वरुपानें विस्तार पावला आहे. अशा नाना प्रकारच्या बदलांनी व भेदांनीं विलसणारा  अंरात्मा निर्विकार ब्रह्म नव्हे.  
ऐसें प्रगटचि आहे । आपुल्या प्रत्ययें पाहे । 
काय राहे काय न राहे । हें कळेना ॥ १६ ॥
१६) या गोष्टी प्रगट व उघड आहेत. आपल्या अनुभवानें त्या पाहता येतात. तरीपण त्यामधें शाश्वत व टिकणारे काय आहे आणि अशाश्वत व नश्वर काय आहे हें आपल्याला कळत नाही. 
जें अखंड होत जातें । जें सर्वदा संव्हारतें ।
रोकडें प्रचितीस येतें । जनामधें ॥ १७ ॥
१७) जें सारखें होते व जाते म्हणजेच जे बदलते, जे नाहींसें होते म्हणजे नाश पावते त्या अशाश्वत व नश्वर दृश्याचा अनुभव आपल्या सभोवतीच्या जीवनामध्यें प्रत्यक्ष दिसतो.    
येक रडे येक चर्फडी । येकांची धरी नरडी ।
येकमेकां झोंबती बराडी । दुकळ्ळले जैसे ॥ १८ ॥
१८) एक रडते, एक चरहडते, तर एकदुसर्‍याची नरडी धरते, तर दुष्काळांतील भुकेल्या माणसांप्रमाणें कांहीं माणसे एकमेकांवर तुटुन पडतात.   
नाहीं न्याये नाहीं नीति । ऐसे हे लोक वर्तती ।
आणि अवघेंच सार म्हणती । विवेकहीन ॥ १९ ॥
१९) न्याय नीतिची चाड नाही. अशा प्रकारे हे लोक वर्ततात. आणि ही विवेकहीन माणसे त्यांच्या वागणूकीचे समर्थन करतात.  हे सर्व नश्वर आहे हे समजूनही त्याच्या प्राप्तीसाठी लोक झगडतात.  
धोंडे सांडून सोनें घ्यावें । माती सांडून अन्न खावें ।
आणि आवघेंचि सार म्हणावें । बाष्कळपणें ॥ २० ॥
२०) सामान्य माणसें दगड टाकून सोनें घेतो. माती टाकून अन्न घेतो. म्हणजे सारापासून असार काढून टाकण्याची विवेकशक्ति त्याच्याकडे असूनही सगळेंच चांगलें म्हणतो व स्वार्थासाठीं कसाही वागतो. हा मूर्खपणाच आहे.  
म्हणौनि हा विचार करावा । सत्यमार्ग तोचि धरावा ।
लाभ जाणोन घ्यावा । विवेकाचा ॥ २१ ॥
२१) म्हणून माणसानें नीट विचार करावा. सत्याचा मार्ग अनुसरावा. विवेकानें नीट वागून लाभ करुन घ्यावा. 
सारगार येकचि सरी । तेथें परीक्षेस कैंची उरी  ।
याकारणें चतुरीं । परीक्षा करावी ॥ २२ ॥
२२) सार म्हणजे संपत्ति किंवा मौल्यवान वस्तु आणि गार म्हणजे गारगोटी किंवा दगड या दोहोंची किंमत सारखीच मानली तर मग तेथें परीक्षा करण्याची जरुरीच नसते. म्हणून शहाण्या माणसानें किंमती काय व किंमतहीन काय याची नीट परीक्षा करावी.   
जेथें परीक्षेचा अभाव । तेथें दे घाव घे घाव ।
सगट सारिखा स्वभाव । लौंदपणाचा ॥ २३ ॥
२३) ज्या ठिकाणी अशी परीक्षा नसते तेथें दोन दिले काय किंवा दोन घेतलें काय सारखेच असते. मोठेपणा व लहानपणा बाजूस सारुन आडदाणपणें वागण्याचा हा स्वभावच आहे.  
घेव ये तेंचि घ्यावें । घेव न ये तें सोंडावें ।
उंच नीच वोळखावें । त्या नाव ज्ञान ॥ २४ ॥
२४) जें घेणें योग्य आहे तें घ्यावें. जें घेणें योग्य नाहीं तें घेऊं नये. चांगलें,  उत्तम कोणते व वाईट, हीन कोणते हें बरोबर ओळखणें याला ज्ञान म्हणतात. 
संसारसांतेस आले । येक लाभें अमर जाले ।
येक ते करंटे ठकले । मुदल गेलें ॥ २५ ॥
२५) नरदेहाचें भांडवल घेऊन माणूस या संसाररुपी बाजारांत येतो. कांही माणसें या भांडवलाचा चांगला उपयोग करुन घेऊन अमर होतात तर कांहीं मुळ मुद्दल म्हणजे देहच गमावून बसतात. 
जाणत्यानें ऐसे न करावें । सार तेंचि शोधून घ्यावें ।
असार तें जाणोन त्यागावें । वमक जैसें ॥ २६ ॥
२६) जाणत्या माणसानें असें करु नये. जें खरें व आपल्या कल्याणाचे ते शोधून तेंच घ्यावें. जें असार व अकल्याण करणारे आहे ते ओळखून वांती प्रमाणें टाकून द्यावें.
तें वमक करी प्राशन । तरी तें स्वानाचें लक्षण ।
तेथें सुचिस्मंत ब्राह्मण । काय करी ॥ २७ ॥
२७) ओकलेले खाणें हे कुत्र्याचे लक्षण आहे. तेथें पवित्र ब्राह्मणचा म्हणजे सज्जनाचा कांही उपाय चालत नाही. 
जेहिं जैसें संचित केलें । तयास तैसेंचि घडलें ।
जें अभ्यासीं पडोन जडलें । तें तों सुटेना ॥ २८ ॥
२८) ज्यानें पूर्वी कर्म केलेलें असतें तसे त्याचे परिणाम त्याला आतां भोगावें लागतात. परतपरत तेंच करत गेल्यानें माणसाला जी सवय लागते ती सुटणें कठीण जाते.  
येक दिव्यान्नें भक्षिती । येक विष्ठा सावडिती ।
आपल्या वडिलांचा घेती । साभिमान ॥ २९ ॥
२९) या न्यायानें कोणी उत्तम पक्वानें खातात तर कोणी विष्ठा चिवडीत बसतात. आणि हेच लोक आपल्या वडिलांचा अभिमान बाळगून त्याचे प्रदर्शन करतात.  
असो विवेकेविण । बोलणें तितुका सीण ।
कोणीयेकें श्रवण मनन । केलेंचि करावें ॥ ३० ॥
३०) असो. ज्याला विवेक नाहीं त्याला या गोष्टी सांगणे म्हणजे फुकट शीण आहे. पण माणसानें श्रवण व मनन परतपरत करावे. 
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे सारविवेकनिरुपणनाम समास चौथा ॥
Samas Choutha SarVivek  Nirupan 
 समास चौथा सारविवेक निरुपण


Custom Search

No comments: