Saturday, February 2, 2019

Shri Renuka Mahatmya श्रीरेणुका महात्म्य


Shri Renuka Mahatmya 
Shri Renuka Mahatmya is in Marathi. The information of Renuka Mata Temple at Matapur, Mahur. What are the vidhi performed dsily, How Mata pooja is done, whese are the main Yatra days. What devotees offer Mata on Kulachar.
श्रीरेणुका महात्म्य 
श्रीरेणुकामातेचे ध्यान
ध्यायेन्नित्यमपूर्ववेषललितां कंदर्पलाववण्यदां  ।
देवीं देवगणैरुपास्यचरणां कारुण्यरत्नाकराम् ।
लीलाविग्रहिणीं विराजितभुजां सच्चंद्रहासादिभिर् ।
भक्तानंदविधायिनीं प्रमुदितां नित्योत्सवां रेणुकाम् ॥
अर्थ: त्या रेणुकेचे नित्य ध्यान करावे, जी मदनापेक्षाही सुंदर आहे. अपूर्व वेष धारण केल्यामुळे जी सुंदर दिसते. देवसुद्धा जिची उपासना करतात. जी करुणेचा सागर आहे. जी लीला करण्यासाठी  देह धारण करते, अनेक अलंकारांनी जिचे हात शोभून दिसतात, जी भक्तांना आनंद देणारी व प्रसन्नचित्त असते, जिला नित्य उत्सव प्रिय असतो.  
सह्याद्रि पर्वताच्या माथ्यावर वसलेलें श्रीक्षेत्र माहूर उर्फ मातापूर हे प्राचीन तीर्थक्षेत्र आहे. याचा उल्लेख भागवत पुराण, मार्कंडेय पुराण ,श्रीगुरुचरित्र व दत्तमहात्म्य यांत आलेला आहे. स्कंद पुराणांतील संह्याद्री खण्डांत रेणुका माहात्म्य आणि कालिका खण्डांत आमली ग्राम उर्फ माहूर माहात्म्य असे दोन भाग आहेत.  
माहूर या क्षेत्राजवळ डोंगरावर चार उंच टेकड्या आहेत. एका टेकडीवर अत्री मुनी व अनसुया यांचे आश्रम, दुसरीवर श्रीदत्तमहाराजाजांचा आश्रम तर तिसर्‍या टेकडीवर श्री जमदग्नी ऋषींचा आश्रम व परमपवित्र श्रीरेणुकामातेचे मंदिर आहे. याच ठिकाणी श्रीपरशुरामांचे मंदिर आहे. चौथ्या टेकडीवर श्री महाकालीचे मंदिर आहे व किल्ला पण आहे. त्याला माहूरगड म्हणतात.  
झंपटनाथ : या क्षेत्राचे झंपटनाथ हे शहर कोतवाल आहेत. झंपटनाथांचे दर्शन केल्याशिवाय या क्षेत्राची यात्रा सफल होत नाही असा समज आहे. 
श्रीरेणुकामाता मंदिरांतील विधि:  
देवीची नित्य पूजा, आरती, नैवेद्य हे विधि नित्य होत असतात. नवरात्रांत देवीचा मोठा उत्सव होतो. तेव्हां यात्रिक भक्त नवसाला बोललेले सोन्या-चांदिचे दागिने, जरीची वस्त्रे, लुगडी, खण इत्यादि देवीला अर्पण करतात. भक्तांना देवीची अभिषेक व पूजा करता येते.   
येथे देवीचा प्रसाद  म्हणून कुटलेला विडा देण्यााची प्रथा आहे.
यात्रा: चैत्र शुद्ध प्रतिपदा, चैत्री पौर्णिमा, आषाढी पौर्णिमा, आश्र्विन महिन्यांतील नवरात्र, कार्तिक पौर्णिमा, दत्तजयंती, पौष वद्य एकादशी, चंद्र-सूर्य ग्रहणें या पर्वकाळी येथे मोठी यात्रा भरते.  
माहुरच्या रेणुका मातेच्या दर्शनाने सर्व पातकांचा नाश होतो असा पुराणांत उल्लेख आहे.  
माहूर हे मूळ दत्तात्रेयांचे निवासस्थान. त्या ठिकाणी भगवान परशुराम पित्याच्या अन्त्यसंस्कारासाठी आले. त्यानंतर हे ठिकाण परशुरामांची माता रेणुका हिच्या नावानें प्रसिद्ध झाले. मातेचे स्थान म्हणून या स्थानाला मातापुर म्हटले आहे. ती परशुरामाची माता असली तरी जगद्जननीचा आविष्कार असल्यानें व तिचे वास्तव्य तेथे असल्यानें व्यापकअर्थाने सर्वांची माता म्हणून माहूरगडला मातापूर म्हटले आहे.
माहूर या क्षेत्राची नांवें प्रत्येक युगांत निराळी होती. कृतयुगांत यास आमली ग्राम तर त्रेता युगांत सिद्धपूर, द्वापारांत देवनगर आणि आता कलियुगांत यास मातापूर ऊर्फ माहूर असे म्हणतात.
महाराष्ट्रांत आदि अंबेची, शक्तिदेवीची उपासना व तीची साडेतीन पीठें प्रसिद्ध आहेत. त्यांत पहिले तुळजाभवानी, दुसरे योगेश्र्वरी अंबाबाई, तिसरे पीठ हे रेणुकामातेचे मातापूर व अर्धे पीठ महालक्ष्मीचे कोल्हापूर आहे. 
मराठवाडा, विदर्भ आणि आंध्र प्रदेश यांच्या सीमेवर असलेले हे माहुरगड तीर्थ बहुभाषिकांचे श्रद्धास्थान आहे. तेलगू, मराठी, हिंदीमिश्रित मराठी असे लोक फार आढळतात. तसेच कुलदैवत म्हणून कुलाचार करण्यासाठी कुटुंबांतील सर्व येत असतात. 
अदिलाबाद जिल्हांतील किनवट तालुक्यांत डोंगर भागांत हे क्षेत्र वसलेले आहे. ते समुद्रसपाटीपासून अडीच हजार फूट उंचीवर आहे. किनवट, सहस्रकुंड, अदिलाबाद, यवतमाळ, काफेश्र्वर, पुसद या स्थानांवरुन माहूरला जाता येते. 
माहुरगडला नुसता तांदळा आहे. एवढा भव्य चेहरा पाहून संपूर्ण शरीराचा अंदाज तर आपल्याला सहन होणेही अशक्य वाटेल. 
या तांदळ्याबद्दल एक कथा प्रचलित आहे. मातापित्यांचे अग्निसंस्कार झाल्यावर परशुरामांना मातेचा वियोग असह्य झाला. तेव्हां प्रत्यक्ष दत्तात्रेय प्रगट होऊन त्याला म्हणाले उत्तरक्रिया पूर्ण होऊ दे, तुला मातेचे दर्शन होईल असे आश्वासन देतात. परंतु शोकविव्हळ परशुरामांना धीर धरवत नाही. विधि पूर्ण होण्या अगोदरच ते आर्तस्वराने मातेला हाका मारतात. त्यामुळें पूर्ण दर्शनाऐवजी अल्पसे दर्शन परशुरामांना होते. फक्त चेहर्‍याचे स्वरुपांत रेणुका मातेने त्यांना दर्शन दिले. म्हणून मातापूरला केवळ चेहर्‍याचा तांदळा आहे.
निस्सिम भक्त विष्णुदासांना दिलेले दर्शन मात्र प्रशांत आहे. त्यांत माता नऊवारी लुगडे नेसलेली आहे. मागे केशभार मोकळा सोडला आहे. गळ्यांत सरी, ठुशी, पुतळ्यांची माळ यासारखे भरगच्च दागिने आहेत. नाकांत नथ व डोक्यावर किरीट आहे. अशा नितांत सुंदर लक्ष्मीच्या स्वरुपांत ते दर्शन होते.
रेणुकामातेच्या मुखवट्याचीच पूजा कां करतात ? याबद्दल कांही कथा प्रचलित आहेत. 
तामीळनाडू मधिल एक कथा: जमदग्नीचे आश्रमाजवळील तलावांत चित्ररथ गंधर्व जलक्रिडा करीत होता. रेणुका नित्याप्रमाणे तेथे पाणी भरुन नेण्यासाठी आली. तीला जलक्रिडा या एक नविन अनुभव तिच्या आश्रमवासी जीवनांत असल्यानें तो पाहण्यांत ती क्षणैक रंगली परंतु असे करणें ऋषिपत्नीधर्माविरुद्ध असा समज करुन कोपी जमदग्नी ऋषींनी तिचा वध करण्याची परशुरामाला आज्ञा दिली. त्यामुळे रेणुका जवळील अन्त्यजांच्या वस्तींत लपली. परशुरामांनी तिला शोधून पित्याची आज्ञा पुरी केली. पुढें परशुरामानें आपली माता रेणुका हिला जिवंत करावे असा वर जमदग्नीऋषीं कडून मिळवून मातेला पुनःजिवित केले. तसे करतांना मातेचे शिर व दलित स्रीचे धड असा प्रकार झाला. त्यामुळे दलितसमाजांत रेणुका हे दैवत तेव्हांपासून आले. तेही यामुळेच केवळ मुखवट्याचीच पूजा करतता. 
कर्नाटकांत रेणुकामातेला यल्लमा म्हणतात. यल्ल म्हणजे सर्व, अम्मा म्हणजे माता. तेथेही अम्माचार म्हणून रेणुकेच्या मुखवट्याचीच पूजा होते. हिमालयांत रेणुकाशील जवळ जामुग्रामला परशुराम मंदिर आहे. तेथेही मूर्तिनसून केवळ मुखवटेच आहेत.  
कृते च रेणुका कृत्या, त्रेताया जानकी सती ।
द्वापारे द्रौपदी कृत्या, कृत्या म्लेच्छगृहे कलौ ॥                रेणुकेच्या समाधानासाठी परशुरामांनी क्षत्रिय संहार केला. जानकीसाठी रामानी रावणाशी युद्ध केले व राक्षसांचा संहार केला. तर द्रौपदीसाठी पांडवांनी कौरवांचा संहार केला. म्हणून प्रत्येक युगांतील त्या कृत्याच होत. त्यांच्या निमित्याने अन्यायाचे परिमार्जन होऊन समाजांत समतोल राखला गेला. हेच कृत्येचे कार्य होय.
रेणुकेच्या चरित्र कथा 
१) इक्ष्वाकु वंशांत रेणु नावाचा एक राजा होऊन गेला. त्याला संतान नव्हते म्हणून कन्याकामेष्टी यज्ञ त्याने केला. यज्ञाच्यावेळी यज्ञकुंडांतून ज्योतिर्मय बालिका प्रगट झाली. रेणु राजाची कन्या म्हणून तिला रेणुका म्हणू लागले.
२) महाभारतांत रेणुका जन्म पद्मापासून झाला असे म्हटले आहे. तिचा कामली असाही उल्लेख आढळतो.
३) अदिती (देवाची माता) घोर तपस्या करुन दोन वर मिळवले. स्वतःला अयोनिसंभव देह प्राप्त व्हावा. म्हणजे कोणत्याही मर्त्य देहातून जन्म न होता तो दैवी जन्म असावा. आणि त्या जन्मांत त्रिभुवनेश्र्वर हरीने जन्म घ्यावा हा दुसरा वर मागुन घेतला. अदितीच्या त्या वराप्रमाणे झालेला जन्म म्हणजे रेणुका होय. व तिच्या पोटी विष्णुचाअवतार असलेला परशुराम यांचा जन्म होय.    
४) कर्नाटकांत अशी श्रद्धा आहे की रेणुकेचा जन्म वारुळांत झाला व ती अदृश्यही वारुळांतच झाली म्हणून तिकडे रेणुकामातेला भूमिदेवता म्हणून मानण्याची प्रथा आहे. 
रेणुकेच्या विवाहाबद्दल निरनिराळ्या कथा आहेत पण तिने ऋषिकुलांतील शिव अवतार मानलेल्या महाक्रोधी जमदग्नीऋषीशी विवाह केला. विवाहप्रसंगी इंद्रानें रेणुकेला कामधेनु, कल्पतरु, चिंतामणी व परीस यांची भेट दिली. पुढे मात्र याच वस्तुंच्या अभिलाषेनें हैहय वशांतील महाप्रतापी सम्राट सहस्रार्जुन कार्तवीर्य याचेव जमदग्नींचे युद्ध होऊन कार्तवीर्यायर्जुन जमदग्नींकडून व जमदग्नी कार्तवीर्याच्या मुलांकडून मारले गेले. रेणुकामातेने पुत्राची म्हणजे परशुरामाची आठवण करतांच ते तेथें आले व त्यांनी पित्याच अन्त्यसंस्कार केला. रेणुकामाताही सती गेली. मग क्रियाकर्म चालू असतांनाच मातेच्या वियोगाच्या अतीव दुःखाने परशुरामाने मातेला हाक मारली त्यामुळे केवळ मुखापर्यंतच रेणुकामाता प्रगट झाल्या. मातापूरला रेणूका मंदिराजवळ थोड्या पायर्‍या उतरुन गेल्यावर परशुरामांचे मंदिर आहे. 
पितरांचे और्ध्वदेहिक करण्यासाठी परशुरामांनी बाण मारुन तीर्थ निर्माण केले. त्याला सर्वतीर्थ म्हणतात. ज्या ठिकाणी रेणुकामातेचा निवास आहे, त्याला मावळा किंवा मेऊवाळा म्हणतात. ते गंगेइतके पवित्र मातृतीर्थ आहे. जवळच मूलगिरी म्हणून ओळखले जाणारे मातेचे महानिर्वाण स्थान आहे. तिथेच कमलतीर्थ व अमृतकुंड ही आहेत. मातेच्या मंदिराशेजारी जमदग्नींचे स्मृतीचिन्ह आहे.  
रेणुका मातेचे निस्सीम भक्त 
रेणुका मातेचे निस्सीम भक्त म्हणजे विष्णुदास. मातेच्या दर्शनासाठी अगदी आर्ततेने ते म्हणतात.
अंबे तुझ्या भेटीसाठी, धीर धरवेना पोटीं, 
तुझ्या पाहता रुपाला, जीव माझा वारा प्याला,          उभा राहिलो अंगणी, तुझी झाली जोगणी,
अंबे सोडले घरदार, झालो जीवावर उदार,
प्रावर्णाच्या केल्या चिंध्या, सोडली मी स्नानसंध्या,
यज्ञ यागादि तर्पण, पायीं तुझ्या समर्पण, 
विष्णुदास हेचि म्हणे, पाय पाहू दे चिमणे  ॥  
विष्णुदासांनी घरदार सोडले, जवळ जवळ १८ वर्षांनी त्यांच्या पत्नीला त्यांचा शोध लागला. माधुकरीमागून निर्वाह करावा. अनुष्ठान करावे. असा त्यांचा नित्य कार्यक्रम असायचा. त्या तळमळीनें अंशतः दत्तात्रेयांच्या दर्शनाने पूर्ण झाली होती.पण मातेच्या दर्शनासाठी कावराबावरा झालेला त्यांचा जीव येवढ्याने समाधानी झाला नाही.  
त्यांनी स्नानसंध्या सोडून दिली, उपासनेंत त्यांचे मन रमेना, यज्ञयागादि अनुष्ठाने त्यांनी देवीच्या चरणाजवळ समर्पण केली. आणि हे सर्व शारदांबेच्या दर्शनासाठी. त्यांना आता धीर धरवत नव्हता. जे थोडे दर्शन झाले होते त्याने विष्णुदास वेडेपिसे होऊन गेले होते. म्हणून ते पुन्हा प्रार्थना करतात " माते मला तुझे चरण दर्शन होऊ दे. " 

मिलींद माधवांनी केलेले रेणुका स्तोत्र, आरती प्रसिद्ध आहे. या रेणुकामातेचा कृपाशिर्वाद सर्वांना लाभो अशी प्रार्थना तिचे चरणीं करुन नतमस्तक होऊं या. 
१) श्रीरेणुका स्तोत्र 

२) अष्टक रेणुकेचे (मराठी)

३) रेणुका कवच 

४) रेणुका स्तोत्र वायुपुराण

५) श्रीरेणुका सहस्रनाम



Shri Renuka Mahatmya 
श्रीरेणुका महात्म्य 

  

2 comments:

Rjoshi said...

Sir my d.o.b is 20 dec 1984 time midnight of 20th dec 12.30 a.m. i doing job in IT field since last 8 years i didn't get promoted even working so hard... so please let me know when shell i get promotion. Also i am always in stress and tens..please guide me in right way.

Unknown said...

Can you provide me with Sri Saraswati Stotra by Sri Milind Madhav
I used to read it during my childhood.Now it is not available anywhere.
Even in Google.