Tuesday, June 2, 2020

ShriRamcharitmanas Part 18 श्रीरामचरितमानस भाग १८


ShriRamcharitmanas Part 18 श्रीरामचरितमानस भाग १८
श्रीरामचरितमानस---प्रथम सोपान---बालकाण्ड
दोहा—पुरुष प्रसिद्ध प्रकास निधि प्रगट परावर नाथ ।
रघुकुलमनि मम स्वामि सोइ कहि सिवँ नायउ माथ ॥ ११६ ॥
जे प्रसिद्ध पुराणपुरुष आहेत, जे प्रकाशाचे भांडार आहेत, सर्व रुपांमध्ये जे व्यक्त आहेत, जीव, माया आणि जगत यांचे स्वामी आहेत, तेच रघुकुलमणी श्रीरामचंद्र हे माझे स्वामी आहेत ‘ असे म्हणून शिवांनी त्यांना नमन केले. ॥ ११६ ॥
निज भ्रम नहिं समुझहिं अग्यानी । प्रभु पर मोह धरहिं जड प्रानी ॥
जथा गगन घन पटल निहारी । झॉंपेउ भानु कहहिं कुबिचारी ॥
‘ अज्ञानी माणसांना स्वतःचा भ्रम कळत नाही आणि मग ते मूर्ख, प्रभू श्रीरामचंद्रांच्यावर आपल्या भ्रमाचा आरोप करतात. ज्याप्रमाणे आकाशातील ढगांचे आच्छादन पाहून अज्ञानी लोक म्हणतात की, ढगांनी सूर्याला झाकून टाकले. ॥ १ ॥
चितव जो लोचन अंगुलि लाएँ । प्रगट जुगल ससि तेहि के भाएँ ॥
उमा राम बिषइक अस मोहा । नभ तम धूम धूरि जिमि सोहा ॥
जो माणूस डोळ्यांत बोट घालून पाहतो, त्याला दोन चंद्र दिसतात. हे पार्वती, श्रीरामचंद्रांच्या बाबतीत अशा प्रकारच्या मोहाची कल्पना करणे म्हणजे आकाशात अंधकार, धूर आणि धूळ पाहणे होय. ( आकाश हे निर्मळ व निर्लेप आहे, त्याला कोणी मलिन किंवा स्पर्श करु शकत नाही. त्याप्रमाणे भगवान श्रीरामचंद्र हे नित्य निर्मळ व निर्लेप आहेत. ) ॥ २ ॥
बिशय करन सुर जीव समेता । सकल एक तें एक सचेता ॥
सब कर परम प्रकासक जोई । राम अनादि अवधपति सोई ॥
विषय, इंद्रिये, इंद्रियांचे देव आणि जीवात्मा-----हे सर्व एकमेकांच्या साहाय्यामुळे चेतन असतात. ( अर्थात विषयांचे अस्तित्व इंद्रियांमुळे, इंद्रियांचे सामर्थ्य देवांमुळे आणि देवांचा प्रकाश चेतन जीवात्म्यामुळे असतो. ) या सर्वांचा जो प्रकाशक आहे तोच अनादी परमात्मा म्हणजे अयोध्या नरेश श्रीरामचंद्र होत. ॥ ३ ॥
जगत प्रकास्य प्रकासक रामू । मायाधीस ग्यान गुन धामू ॥
जासु सत्यता तें जड माया । भास सत्य इव मोह सहाया ॥
हे जग प्रकाश्य आहे आणि श्रीराम हे प्रकाशक आहेत. ते मायेचे स्वामी आणि ज्ञान आणि गुणांचे निधान आहेत. त्यांच्या सत्तेमुळे जड माया ही मोहाच्या मदतीने सत्य असल्यासारखी भासते. ॥ ४ ॥
दोहा—रजत सीप महुँ भास जिमि जथा भानु कर बारि ।
जदपि मृषा तिहुँ काल सोइ भ्रम न सकइ कोउ टारि ॥ ११७ ॥
ज्याप्रमाणें शिंपल्यावर चांदीची आणि सूर्याच्या किरणांवर पाण्याची प्रचीती येते, जरी ही प्रचीती तिन्ही काळांत खोटी असली, तरीही कुणीही हा भ्रम हटवू शकत नाही. ॥ ११७ ॥
एहि बिधि जग हरि आश्रित रहई । जदपि असत्य देत दुख अहई ॥
जौं सपनें सिर काटै कोई । बिनु जागें न दूरि दुख होई ॥
याचप्रमाणें हा संसार भगवंताच्या आश्रयावर अवलंबून असतो. तो जरी असत्य आहे, तरीही तो दुःख देतोच , ज्याप्रमाणे स्वप्नांत कुणी मुंडके कापून टाकले, तर त्याचे दुःख जागे झाल्याशिवाय काही दूर होत नाही. ॥ १ ॥
जासु कृपॉं अस भ्रम मिटि जाई । गिरिजा सोइ कृपाल रघुराई ॥
आदि अंत कोउ जासु न पावा । मति अनुमानि निगम अस गावा ॥
हे पार्वती, ज्यांच्या कृपेमुळे अशा प्रकारचा भ्रम नाहीसा होतो, ते कृपाळु श्रीरघुनाथ होय. त्यांचा आदी आणि अंत कुणालाही कळत नाही. वेदांनी आपल्या बुद्धीनुसार अनुमान करुन असे वर्णन केले आहे, ॥ २ ॥
बिनु पद चलइ सुनइ बिनु काना । कर बिनु करम करइ बिधि नाना ॥
आनन रहित सकल रस भोगी । बिनु बानी बकता बड जोगी ॥
ते ( ब्रह्म ) पायाविना चालते, कानाविना ऐकते, हाताविनाच अनेक प्रकारची कामे करते, मुखाविनाच सर्व रसांचा स्वाद घेते आणि वाणीविनाच ते उत्कृष्ट वक्ता आहे. ॥ ३ ॥
तन बिनु परम नयन बिनु देखा । ग्रहइ घ्रान बिनु बास असेषा ॥
असि सब भॉंति अलौकिक करनी । महिमा जासु जाइ नहिं बरनी ॥
ते शरीराविनाच स्पर्शानुभव करते, डोळ्यांविना पाहते आणि नाकाविनाच सर्व प्रकारचा गंध घेते. त्या ब्रह्माची सर्व करणी सर्व प्रकारे अशी अलौकिक आहे. त्याचा महिमा सांगता येत नाही. ॥ ४ ॥
दोहा—जेहि इमि गावहिं बेद बुध जाहि धरहिं मुनि ध्यान ।
सोइ दसरथ सुत भगत हित कोसलपति भगवान ॥ ११८ ॥
वेद आणि पंडित ज्यांचे अशाप्रकारे वर्णन करतात आणि मुनी ज्यांचे ध्यान करतात, तेच दशरथनंदन भक्त-हितकारी, अयोध्यापती भगवान श्रीरामचंद्र होत. ॥ ११८ ॥
कासीं मरत जंतु अवलोकी । जासु नाम बल करउँ बिसोकी ॥
सोइ प्रभु मोर चराचर स्वामी । रघुबर सब उर अंतरजामी ॥
( हे पार्वती, ) ज्यांच्या नामाच्या प्रतापामुळे मी काशीत मृत्यू पावणार्‍या प्राण्यास पाहून त्याला राममंत्र देऊन मुक्ती देतो. तेच माझे प्रभु रघुश्रेष्ठ श्रीरामचंद्र हे जड-चैतनाचे स्वामी आणि सर्वांतर्यामी आहेत. ॥ १ ॥
बिबसहुँ जासु नाम नर कहहीं । जनम अनेक रचित अघ दहहीं ॥
सादर सुमिरन जे नर करहीं । भव बारिधि गोपद इव तरहीं ॥
इच्छा नसतानाही ज्यांचे नाम घेतल्यामुळे जन्मांमध्ये केलेली पापें जळून जातात, त्यांचे जी माणसे आदराने स्मरण करतात, ते संसाररुपी ( दुस्तर ) समुद्रास गाईच्या खुरामुळे बनलेल्या खड्याप्रमाणे ( सहजपणे ) ओलांडून जातात. ॥ २ ॥
राम सो परमातमा भवानी । तहँ भ्रम अति अबिहित तव बानी ॥
अस संसय आनत उर माहीं । ग्यान बिराग सकल गुन जाहीं ॥
हे पार्वती, तो परममात्मा म्हणजेच श्रीरामचंद्र होत. त्यांच्या ठिकाणी भ्रमाचा आरोप करणारे बोलणे हे अत्यंत अयोग्य आहे. अशाप्रकारचा संदेह मनात आणल्यामुळे मनुष्याचे ज्ञान, वैराग्य इत्यादी सर्व सद्गुण नाहीसे होतात. ॥ ३ ॥
सुनि सिव के भ्रम भंजन बचन । मिटि गै सब कुतरक कै रचना ॥
भइ रघुपति पद प्रीति प्रतीती । दारुन असंभावना बीती ॥
भगवान शिवांचे हे भ्रम दूर करणारे बोल ऐकून पार्वतीचे सर्व कुतर्क नाहीसे झाले. श्रीरघुनाथांच्या चरणी तिला प्रेम व विश्र्वास वाटू लागला आणि त्यांच्याविषयीचा तिला फार मोठा गैरसमज दूर झाला. ॥ ४ ॥
दोहा—पुनि पुनि प्रभु पद कमल गहि जोरि पंकरुह पानि ।
बोलीं गिरिजा बचन बर मनहुँ प्रेम रस सानि ॥ ११९ ॥
पार्वती वारंवार शिवांच्या चरणकमलांना कवळून व कमलांसारखे कर जोडून प्रेमरसामध्ये ओथंबलेल्या सुंदर वाणीने बोलली. ॥ ११९ ॥
ससि कर सम सुनि गिरा तुम्हारी । मिटा मोह सरदातप भारी ॥
तुम्ह कृपाल सबु संसउ हरेऊ । राम स्वरुप जानि मोहि परेऊ ॥
‘ तुमची चंद्र-किरणांसमान शीतल वाणी ऐकून माझ्या अज्ञानरुपी शरदऋतूतील कडक उन्हाचा ताप नाहीसा झाला. हे कृपाळू, तुम्ही माझा संपूर्ण संदेह हरण केला. आता श्रीरामांचे वास्तविक स्वरुप मला समजून आले. ॥ १ ॥
नाथ कृपॉं अब गयउ बिषादा । सुखी भयउँ प्रभु चरन प्रसादा ॥
अब मोहि आपनि किंकरि जानी । जदपि सहज जड नारि अयानी ॥  
हे नाथ, तुमच्या कृपेने आता माझा विषाद निघून गेला आणि तुमच्या चरणांच्या कृपेने मी सुखी झाले. मी स्त्री असल्यामुळे स्वभावतः मूर्ख आणि अज्ञानी आहे. तरीही आता तुम्ही मला आपली दासी मानून, ॥ २ ॥
प्रथम जो मैं पूछा सोइ कहहू । जौं मो पर प्रसन्न प्रभु अहहू ॥
राम ब्रह्म चिनमय अबिनासी । सर्ब रहित सब उर पुर बासी ॥
हे प्रभो, जर तुम्ही माझ्यावर प्रसन्न असाल, तर जी गोष्ट मी तुम्हांला प्रथम विचारली होती, ती सांगा. ( हे सत्य आहे की, ) श्रीरामचंद्र ब्रह्म आहेत, चिन्मय ( ज्ञानस्वरुप ) आहेत, अविनाशी आहेत, सर्वांहून रहित सर्वांच्या हृदयरुपी नगरीमध्ये निवास करणारे आहेत. ॥ ३ ॥
नाथ धरेउ नरतनु केहि हेतू । मोहि समुझाइ कहहु बृषकेतू ॥
उमा बचन सुनि परम बिनीता । रामकथा पर प्रीति पुनीता ॥
मग हे नाथ, त्यांनी मनुष्य-शरीर कशासाठी धारण केले ? हे धर्म- ध्वज धारण करणार्‍या प्रभो, हे मला समजावून द्या. पार्वतीचे नम्र बोल ऐकून आणि श्रीरामांच्या कथेविषयी तिचे विशुद्ध प्रेम पाहून, ॥ ४ ॥
दोहा—हियँ हरषे कामारि तब संकर सहज सुजान ।
बहु बिधि उमहि प्रसंसि पुनि बोले कृपानिधान ॥ १२० ( क ) ॥
कामदेवाचे शत्रू, स्वभावतः ज्ञानी व कृपानिधान भगवान शिव मनात फार प्रसन्न झाले आणि अनेक प्रकारे पार्वतीची प्रशंसा करीत म्हणाले, ॥ १२० ( क ) ॥
नवाह्न पारायण , पहिला विश्राम
मासपारायण, चौथा विश्राम
सो—सुनु सुभ कथा भवानि रामचरितमानस बिमल ।
कहा भुसुंडि बखानि सुना बिहग नायक गरुड ॥ १२० ( ख ) ॥
‘ हे पार्वती, निर्मल ‘ रामचरितमानस’ ची मंगलमय कथा ऐक. ही काकभुशुंडींनी विस्तारपूर्वक पक्षीराज गरुडाला सांगितली होती. ॥ १२० ( ख ) ॥
सो संबाद उदार जेहि बिधि भा आगें कहब ।
सुनहु राम अवतार चरित परम सुंदर अनघ ॥ १२० ( ग ) ॥
तो श्रेष्ठ संवाद कशाप्रकारे झाला, ते मी पुढे सांगतो. आता तू श्रीरामचंद्रांच्या अवताराचे परम सुंदर व पापनाशक चरित्र ऐक. ॥ १२० ( ग ) ॥
हरि गुन नाम अपार कथा रुप अगनित अमित ।
मैं निज मति अनुसार कहउँ उमा सादर सुनहु ॥ १२० ( घ ) ॥
श्रीहरिंचे गुण, नाम, कथा व रुप- हे सर्व अपार, अगणित आणि अनंत आहेत. तरीही हे पार्वती, मी आपल्या बुद्धीनुसार सांगतो, ते आदराने ऐक. ॥ १२० ( घ ) ॥
सुनु गिरिजा हरिचरित सुहाए । बिपुल बिसद निगमागम गाए ।
हरि अवतार हेतु जेहि होई । इदमित्थं कहि जाइ न सोई ॥
हे पार्वती, ऐक. वेद-शास्त्रांनी श्रीहरींच्या सुंदर, विस्तृत आणि निर्मल चरित्रांचे वर्णन केलेले आहे. ज्या कारणामुळे श्रीहरींचा अवतार होतो, तो फक्त ‘ यासाठीच ‘ असे खात्रीने म्हणता येत नाही. ॥ १ ॥
राम अतर्क्य बुद्धि मन बानी । मत हमार अस सुनहि सयानी ॥
तदपि संत मुनि बेद पुराना । जस कछु कहहिं स्वमति अनुमाना ॥
हे बुद्धिमती ! ऐक. माझ्या मते बुद्धी, मन व वाणीने श्रीरामचंद्रांविषयी तर्क करता येत नाही. तथापि संत, मुनी, वेद आणि पुराणे-हे आपापल्या बुद्धीनुसार जसे काही सांगतात, ॥ २ ॥
तस मैं सुमुखि सुनावउँ तोही । समुझि परइ जस कारन मोही ॥
जब जब होइ धरम कै हानी । बाढहिं असुर अधम अभिमानी ॥
आणि जसे मला समजले आहे, हे सुमुखी, तेच अवताराचे कारण मी सांगतो. जेव्हा जेव्हा धर्माचा र्‍हास होतो आणि नीच अभिमानी राक्षस वाढतात, ॥ ३ ॥
करहिं अनीति जाइ नहिं बरनी । सीदहिं बिप्र धेनु सुर धरनी ॥
तब तब प्रभु धरि बिबिध सरीरा । हरहिं कृपानिधि सज्जन पीरा ॥

आणि ते, वर्णन करता येत नाही, असा अन्याय करतात. 

तसेच ब्राह्मण, गाई, देव आणि पृथ्वी यांना असह्य यातना 

होतात, तेव्हा तेव्हा ते कृपानिधान प्रभू दिव्य देह धारण 

करुन सज्जनांचे दुःख दूर करतात. ॥ ४ ॥


Custom Search

No comments: