Friday, September 4, 2020

Dnyaneshwari Adhyay 3 Part 6 ज्ञानेश्र्वरी अध्याय तिसरा भाग ६

 

Dnyaneshwari Adhyay 3 Part 6 
Ovya 126 to 150 
ज्ञानेश्र्वरी अध्याय तिसरा भाग ६ 
ओव्या १२६ ते १५०
हें वांचूनि पार्था । राहाटों नये अन्यथा ।
ऐसी आद्य हे कथा । मुरारी सांगे ॥ १२६ ॥
१२६) अर्जुना, अशा रीतीनें वागण्याखेरीज दुसर्‍या तर्‍हेनें वागूं नये; अशी ही सृष्टीच्या आरंभीची कथा श्रीकृष्णांनीं सांगितली.
जे देहचि आपणपें मानिति । आणि विषयांतें भोग्य म्हणती ।
यापरतें न स्मरती । आणिक कांहीं ॥ १२७ ॥
१२७) आपण देहच आहोंत, असें मानून जे लोक विषय हे भोग्य वस्तु आहेत असें समजतात आणि ज्यास यापलीकडे दुसरी कांहींच कल्पना नसते;  
हें यज्ञोपकरण सकळ । नेणतसांते बरळ ।
अहंबुद्धी केवळ । भोगूं पाहती ॥ १२८ ॥
१२८) ते बहकलेले लोक आपल्याजवळ असलेली संपत्ति वगैरे सर्व कांहीं यज्ञाची सामग्री आहे असें न समजतां, त्या सर्व संपत्तिचा केवळ स्वतःसाठीं भोग घेण्यास प्रवृत्त होतात;   
इंद्रियरुचीसारखे । करविती पाक निके । 
ते पापिये पातकें । सेविती जाण ॥ १२९ ॥
१२९) इंद्रियांना आवडतील असे चटकदार पदर्थ ते तयार करतात; ते पापी लोक या पदार्थांच्या रुपानें वस्तुतः पापच सेवन करतात, असे समज.
जे संपत्तिजात आघवें । हें हवनद्रव्य मानावें ।
मग स्वधर्मयज्ञें अर्पावें । आदिपुरुषीं ॥ १३० ॥
१३०) वास्तविक पाहातां जेवढीं आपली संपत्ति आहे, ती सर्व यज्ञांत उपयोगी पडणारी सामग्री आहे, असें समजावें. मग ती स्वधर्मरुपी यज्ञानें परमेश्र्वराला अर्पण करावी.
हें सांडोनिया मूर्ख । आपणपेंयांलागीं देख ।
निपजविती पाक । नानाविध ॥ १३१ ॥
१३१) अशा रीतीनें वागावयाचें टाकून, पाहा, ते मूर्ख लोक आपल्या स्वतःकरितां नाना प्रकारचीं पक्वानें तयार करितात. 
जिहीं यज्ञु सिद्धी जाये । परेशा तोषु होये । 
तें हें सामान्य अन्न न होये । म्हणोनियां ॥ १३२ ॥
ज्या अन्नाच्या योगानें यज्ञ सिद्धीला जातो आणि परमेश्र्वर संतुष्ट होतो, तें हें अन्न कमी योग्यतेचें नाहीं. म्हणून
हें न म्हणावें साधारण । अन्न ब्रह्मरुप जाण ।
जे जीवनहेतु कारण । विश्र्वा यया ॥ १३३ ॥
१३३) तें अन्न सामान्य समजूं नये. अन्न हें ब्रह्मरुप आहे असें समज; कारण कीं अन्न हें सर्व जगाला जगण्याचें साधन आहे.   
अन्नास्तव भूतें । प्ररोह पावति समस्तें ।
मग वरिषु या अन्नाते । सर्वत्र प्रसवे ॥ १३४ ॥
१३४) हीं सर्वं भूतें अन्नामुळें वाढतात व या अन्नाला पाऊस चोहींकडे उत्पन्न होतो;  
तया पर्जन्या यज्ञीं जन्म । यज्ञातें प्रगटी कर्म ।
कर्मासि आदि ब्रह्म । वेदरुप ॥ १३५ ॥
१३५) तो पाऊस यज्ञापासून उत्पन्न होतो; तो यज्ञ कर्मापासून प्रकट होतो आणि वेदरुप ब्रह्म हें कर्माचें मूळ आहे. 
मग वेदांतें परापर । प्रसवतसे अक्षर ।
म्हणऊनि हें चराचर । ब्रह्मबद्ध ॥ १३६ ॥
१३६) दूर व जवळ असणारें जें ब्रह्म, तें वेदांना उत्पन्न करतें, म्हणून हे स्थावरजंगमात्मक विश्व ब्रह्मांत गोंवलेलें आहे. 
परी कर्माचिये मूर्ती । यज्ञीं अधिवासु श्रुती ।
ऐकें सुभद्रापती । अखंड गा ॥ १३७ ॥
१३७) अर्जुना, ऐका; परंतु मूर्तिमंत कर्मरुप यज्ञामध्यें वेदांचें निरंतर राहाणें आहे. 
ऐशी हे आदि परंपरा । संक्षेपें तुज धनुर्धरा ।
सांगितली या अध्वरा । लागौनियां ॥ १३८ ॥
१३८) अर्जुना, याप्रमाणें ही मुळांतली परंपरा तुला या यज्ञाकरितां थोडक्यांत सांगितली.
म्हणूनि समूळ हा उचितु । स्वधर्मरुप ऋतु ।
नानुष्ठी जो मत्तु । लोकीं इये ॥ १३९ ॥
१३९) म्हणून जो उन्मत्त पुरुष, या लोकांमध्यें उचित अशा स्वधर्मरुप यज्ञाचें पूर्णपणें आचरण करणार नाहीं,
तो पातकांची राशी । जाण भार भूमीसी ।
जो कुकर्में इंद्रियांसी । उपेगा गेला ॥ १४० ॥ 
१४०) जो वाईट आचरण करुन इंद्रियांचे केवळ लाड पुरवितो, तो पापांची राशी असून भूमीला केवळ भार आहे, असें समज.
तें जन्म कर्म सकळ । अर्जुनाअति निष्फळ ।
जैसें कां अभ्रपटळ । अकाळींचें ॥ १४१ ॥
१४१) जसें भलत्याच वेळेला आलेली ढगांची फळी निरुपगोगी असते, त्याप्रमाणें अर्जुना, त्याना जन्म व कर्म निष्फळ आहे; 
कां गळा स्तन अजेचे । तैसे जियालें देखें तयाचें ।
जया अनुष्ठान स्वधर्माचें । घडोचिना ॥ १४२ ॥
१४२) किंवा ज्याच्या हातून आपल्या धर्माचें आचरण होत नाहीं. त्यांचें जगणे शेळीच्या गळ्यास असलेल्या स्तनाप्रमाणें निरर्थक आहे, असें समज. 
म्हणोनी ऐकें पांडवा । हा स्वधर्मु कवणें न संडावा ।
सर्वभावें भजावा । हाचि एकु ॥ १४३ ॥  
१४३) म्हणून अर्जुना, ऐक. आपला हा धर्म कोणीहि सोडूं नये, कायावाचामनेंकरुन ह्या एकाचेंच आचरण करावें.
हां गा शरीर जरी जाहलें । तरी कर्तव्य वोघें आलें ।
मग उचित कां आपुलें । वोसंडावें ॥ १४४ ॥
१४४) अरे, शरीर जरी प्राप्त झालें आहे, तरी तें पूर्वकर्मानुसार मिळालेलें आहे. असें आहे, तर मग आपल्यास विहित असलेलें कर्म आपण कां टाकावें ?    
परिस पां सव्यासाची । मूर्ती लाहोनि देहाची ।
खंती करिती कर्माची । ते गांवढे गा ॥ १४५ ॥   
१४५) अर्जुना, ऐका. मनुष्यशरीर मिळालें असतां, जें कर्माचा कंटाळा करतात, ते अडाणी आहेत.   
देखें असतेनि देहधर्में । एथ तोचि एकु न लिंपे कर्में ।
जो अखंडित रमे । आपणपांचि ॥ १४६ ॥
१४६) पाहा, जो निरंतर आपल्या स्वरुपांत गढलेला असतो, तोच एक या जगांत देहधर्मानें युक्त असूनहि कर्मानें लिप्त होत नाही.   
जे तो आत्मबोधें तोषला । तरी कृतकार्यु देखें जाहला ।
म्हणोनि सहजें सांडवला । कर्मसंगु ॥ १४७ ॥
१४७) कारण कीं, पाहा, तो आत्मज्ञानानें संतुष्ट होऊन कृतकृत्य झालेला असतो; म्हणून त्याचा कर्माशीं संबंध सहज सुटलेला असतो. 
तृप्ति झालिया जैसीं । साधनें सरती आपैसीं । 
देखें आत्मतुष्टीं तैसीं । कर्में नाहीं ॥ १४८ ॥
१४८) पाहा, ज्याप्रमाणें पोट भरल्यावर स्वयंपाक करण्याचा खटाटोप सहजच संपतो, त्याप्रमाणें आत्मानंदाच्या तृप्तींत कर्माची खटपट ( सहजच ) संपते.   
जंववरी  अर्जुना । तो बोध भेटेना मना ।
तंवचि यया साधना । भजावें लागे ॥ १४९ ॥
१४९) अर्जुना, जोंपर्यंत अंतःकरणांत तें ज्ञान उत्पन्न होत नाहीं तोपर्यंतच या साधनांची खटपट करावी लागते. 
म्हणऊनि तूं नियतु । सकळ कामरहितु । 
होऊनियां उचितु । स्वधर्में रहातें ॥ १५० ॥
१५०) म्हणून तूं सर्व आसक्ति टाकून देऊन निरंतर उचित जो स्वधर्म त्याप्रमाणें वाग. 




Custom Search

No comments: