Tuesday, September 1, 2020

ShriRamcharitmans Part 41 श्रीरामचरितमानस भाग ४१

 

ShriRamcharitmans Part 41  
Doha 210 to 212 
श्रीरामचरितमानस भाग ४१ 
दोहा २१० ते २१२ 
रामचरितमानस---प्रथम सोपान---बालकाण्ड
 दोहा--गौतम नारि श्राप बस उपल देह धरि धीर ।
चरन कमल रज चाहति कृपा करहु रघुबीर ॥ २१० ॥
' गौतम मुनींची पत्नी अहल्या ही शापामुळे पाषाणाच्या रुपात राहून मोठ्या धैर्याने तुमच्या पदधूलीची कामना करीत आहे. हे रघुबीर, हिच्यावर कृपा करा.' ॥ २१० ॥
छं०--परसत पद पावन सोक नसावन प्रगट भई तपपुंज सही ।
देखत रघुनायक जन सुखदायक सनमुख होइ कर जोरि रही ॥
अति प्रेम अधीरा पुलक सरीरा मुख नहिं आवइ बचन कही ।
अतिसय बड़भागी चरनन्हि लागी जुगल नयन जलधार बही ॥
श्रीरामांच्या पवित्र व शोकहारक चरणांचा स्पर्श होताच खरोखरच ती तपोमूर्ती अहल्या प्रकट झाली. भक्तांना सुख देणार्‍या श्रीरामांना पाहताच ती उठून हात जोडून उभी राहिली. अत्यंत प्रभुप्रेमामुळे ती अधीर झाली होती. तिचे शरीर पुलकित झाले. मुखातून शब्द फुटत नव्हता. अत्यंत भाग्यशालिनी अहल्येने प्रभूंच्या चरणांना कवटाळले. तिच्या दोन्ही नेत्रांतून ( प्रेम व आनंदाच्या अश्रूंच्या ) जल-धारा वाहू लागल्या. ॥ १ ॥
धीरजु मन कीन्हा प्रभु कहुँ चीन्हा रघुपति कृपॉं भगति पाई ।
अति निर्मल बानी अस्तुति ठानी ग्यानगम्य जय रघुराई ॥
मैं नारि अपावन प्रभु जग पावन रावन रिपु जन सुखदाई ।
राजीव बिलोचन भव भय मोचन पाहि पाहि सरनहिं आई ॥
नंतर तिने धीर धरुन प्रभूंना ओळखले आणि श्रीरघुनाथांच्या कृपेने भक्ती प्राप्त केली. मग ती अत्यंत निर्मळ वाणीने त्यांची स्तुती करु लागली, ' हे ज्ञानाने जाणण्याजोगे असणार्‍या श्रीरघुनाथा, तुमचा विजय असो. मी स्वभावतःच अपवित्र स्त्री आहे. आणि हे प्रभो, तुम्ही जगाला पवित्र करणारे भक्तांना सुख देणारे आणि रावणाचे शत्रू आहात. हे कमलनयन, हे जन्म-मृत्यूच्या भयापासून मुक्त करणारे, मी तुम्हांला शरण आलेली आहे. माझे रक्षण करा. रक्षण करा. ॥ २ ॥                                   
मुनि श्राप जो दीन्हा अति भल कीन्हा परम अनुग्रह मैं माना ।
देखेउँ भरि लोचन हरि भवमोचन इहइ लाभ संकर जाना ॥
बिनती प्रभु मोरी मैं मति भोरी नाथ न मागउँ बर आना ।
पद कमल परागा रस अनुरागा मम मन मधुप करै पाना ॥
( गौतम ) मुनींनी मला शाप दिला, ते चांगलेच झाले. मी त्यामुळे संसारातून मुक्त करणार्‍या श्रीहरींना ( तुम्हांला ) डोळे भरुन पाहू शकले, हा मी त्यांचा उपकारच मानते. या तुमच्या दर्शनास भगवान शंकर हे सर्वांत मोठा लाभ मानतात. हे प्रभो, मी भोळ्या बुद्धीची आहे. माझी एक विनंती आहे. हे नाथ, मी दुसरा कोणताही वर मागत नाही, माझा मनरुपी भ्रमर आपल्या चरणकमलरजाच्या प्रेमरुपी रसाचे सदा पान करीत राहो, एवढीच माझी इच्छा आहे. ॥ ३ ॥
जेहिं पद सुरसरिता परम पुनीता प्रगट भई सिव सीस धरी ।
सोई पद पंकज जेहि पूजत अज मम सिर धरेउ कृपाल हरी ॥
एहि भॉंति सिधारी गौतम नारी बार बार हरि चरन परी ।
जो अति मन भावा सो बरु पावा गै पतिलोक अनंद भरी ॥ ४ ॥
ज्या चरणांतून परमपवित्र देवनदी गंगा प्रकट झाली, जिला शिवशंकरांनी आपल्या शिरावर धारण केले आणि ज्या चरणकमलांची पूजा ब्रह्मदेव करतात, तेच चरण हे कृपाळू श्रीहरी, तुम्ही माझ्या शिरावर ठेवले. ' अशाप्रकारे ती स्तुती करीत वारंवार भगवंतांच्या चरणांवर लोटांगण घालीत होती. मनाला जो फार आवडत होता, तो वर मिळाल्याने गौतमपत्नी अहल्या आनंदाने पतिलोकी निघून गेली. ॥ ४ ॥        
दोहा--अस प्रभु दीनबंधु हरि कारन रहित दयाल ।
तुलसिदास सठ तेहि भजु छाड़ि कपट जंजाल ॥ २११ ॥
प्रभू श्रीराम हे असे दीनबंधू आणि अकारण दया करणारे आहेत. तुलसीदास म्हणतात, हे लबाड मना, तू कपट सोडून त्यांचेच भजन कर. ॥ २११ ॥
मासपारायण, सारवा विश्राम
चले राम लछिमन मुनि संगा । गए जहाँ जग पावनि गंगा ॥
गाधिसूनु सब कथा सुनाई । जेहि प्रकार सुरसरि महि आई ॥
श्रीराम व लक्ष्मण ( विश्र्वामित्र ) मुनींच्या सोबत निघाले. ते जगाला पवित्र करणार्‍या गंगेजवळ गेले. महाराज गाधीचे पुत्र विश्र्वामित्र यांनी देवनदी गंगा पृथ्वीवर कशी आली, यांची संपूर्ण कथा सांगितली ॥ १ ॥
तब प्रभु रिषिन्ह समेत नहाए । बिबिध दान महिदेवन्हि पाए ॥
हरषि चले मुनि बृंद सहाया । बेगि बिदेह नगर निअराया ॥
प्रभू श्रीरामांनी ऋषींच्यासह ( गंगेमध्ये ) स्नान केले. ब्राह्मणांना तर्‍हेतर्‍हेची दाने मिळाली. नंतर मुनिवृंदांसह ते आनंदाने निघाले आणि लवकरच जनकपुरजवळ पोहोचले. ॥ २ ॥
पुर रम्यता राम जब देखी । हरषे अनुज समेत बिसेषी ॥
बापीं कूप सरित सर नाना । सलिल सुधासम मनि सोपाना ॥
जनकपुरीची शोभा जेव्हा पाहिली, तेव्हा श्रीराम-लक्ष्मण आनंदित झाले. तेथे अनेक आड, विहिरी, नद्या व तलाव होते. त्यांमध्ये अमृतासमान मधुर जल भरले होते आणि त्यांना रत्नांच्या पायर्‍या होत्या. ॥ ३ ॥
गुंजत मंजु मत्त रस भृंगा । कूजत कल बहुबरन बिहंगा ॥
बरन बरन बिकसे बनजाता । त्रिबिध समीर सदा सुखदाता ॥
मकरंदाच्या रसाने धुंद होऊन भ्रमर मधुर गुंजारव करीत होते. रंगी-बेरंगी ( पुष्कळ ) पक्षी मधुर किलबिल करीत होते. नाना रंगांची कमळे उमललेली होती. नेहमी सर्व ऋतूंमध्ये सुख देणारा शीतल, मंद, सुगंधित वारा वाहात होता. ॥ ४ ॥
 दोहा--सुमन बाटिका बाग बन बिपुल बिहंग निवास ।
फूलत फलत सुपल्लवत सोहम पुर चहुँ पास ॥ २१२ ॥
पुष्पवाटिका, बागा आणि वने, यांमध्ये पुष्कळ पक्ष्यांचा निवास होता. फुलणार्‍या-फळणार्‍या आणि सुंदर पानांनी भरलेल्या बागा नगराच्या चोहीकडे शोभत होत्या. ॥ २१२ ॥           
बनइ न बरनत नगर निकाई । जहॉं जाइ मन तहँइँ लोभाई ॥
चारु बजारु बिचित्र अँबारी । मनिमय बिधि जनु स्वकर सँवारी ॥
नगराच्या सौंदर्याचे वर्णन करणे कठीण. जिकडे मन जाई, तिकडे ते रमून जाई. सुंदर बाजार, रत्नजडित गच्च्या, जणू ब्रह्मदेवांनी स्वतःच्या हातांनी बनविल्या होत्या. ॥ १ ॥
धनिक बनिक बर धनद समाना । बैठे सकल बस्तु लै नाना ॥
चौहट सुंदर गलीं सुहाई । संतत रहहिं सुगंध सिंचाई ॥
कुबेरासारखे श्रेष्ठ धनवान व्यापारी सर्व प्रकारच्या अनेक वस्तू घेऊन ( दुकानांतून ) बसलेले असत. सुंदर चौक आणि सुशोभित गल्ल्लया नित्य सुगंधाचे सडे घातलेल्या होत्या. ॥ २ ॥
मंगलमय मंदिर सब केरें । चित्रित जनु रतिनाथ चितेरें ॥
पुर नर नारि सुभग सुचि संता । धरमसील ग्यानी गुनवंता ॥
सर्वांची घरे मंगलमय असून त्यांच्यावर चित्रे रंगविलेली होती. जणू ती कामदेवरुपी चित्रकाराने चितारली होती. नगरातील सर्व स्त्री-पुरुष सुंदर, पवित्र, सरळ स्वभावाचे, धर्मात्मे, ज्ञानी व गुणवान होते. ॥ ३ ॥            
अति अनूप जहँ जनक निवासू । बिथकहिं बिबुध बिलोकि बिलासू ॥
होत चकित चित कोट बिलोकी । सकल भुवन सोभा जनु रोकी ॥
तेथे जनक राजांचे अत्यंत अनुपमेय सुंदर निवासस्थान असून तेथील ऐश्वर्य पाहून देवसुद्धा थक्क होत. राजमहालाची तटबंदी पाहून चित्त चकित होत होते. ( असे वाटे ) जणू त्या तटाने सर्व लोकांची शोभा आपल्यात सामावून टाकली होती. ॥ ४ ॥



Custom Search

No comments: