Friday, September 4, 2020

Dnyaneshwari Adhyay 3 Part 7 ज्ञानेश्र्वरी अध्याय तिसरा भाग ७

 

Dnyaneshwari Adhyay 3 Part 7 
Ovya 151 t0 175 
ज्ञानेश्र्वरी अध्याय तिसरा भाग ७ 
ओव्या १५१ ते १७५
जे स्वकर्में निष्कामता । अनुसरले पार्था । 
कैवल्य पर तत्त्वतां । पातले जगीं ॥ १५१ ॥
१५१) अर्जुना, जे निष्काम बुद्धीनें स्वधर्माचें आचरण करतात, ते या जगामध्यें तत्त्वतः श्रेष्ठ अशा मोक्षाला पोंचतात. 
देख पां जनकादिक । कर्मजात अशेख । 
न सांडितां मोक्षसुख । पावते जाहले ॥ १५२ ॥
१५२) पाहा, कर्ममात्राचा मुळींच त्याग न करतां जनकादिकांना मोक्षाचें सुख मिळालें. 
याकारणें पार्था । होआवी कर्मीं आस्था ।
हे आणिकाहि एका अर्था । उपकारेल ॥ १५३ ॥
१५३) अर्जुना, यास्तव कर्माच्या ठिकाणीं आस्था असणें जरुर आहे. ही आस्था आणखीहि एका कामाला उपयोगी पडेल. 
जे आचरतां आपणपेयां । देखी लागेल लोका यया ।
तरी चुकेल हा अपाया । प्रसंगेंचि ॥ १५४ ॥
१५४) कारण आपण आचरण केलें असतां या लोकांना तो कित्ता होईल; आणि अर्थात् सहजच त्याची कर्मलोपानें होणारी हानि टळेल.
देखें प्राप्तार्थ जाहले । जे निष्कामता पावले ।
तयाही कर्तव्य असे उरलें । लोकांलागीं ॥ १५५ ॥
१५५) पाहा, मिळवावयाचें तें ज्यांनीं मिळविलें व म्हणून निरिच्छ झाले, त्यांनादेखील, लोकांना वळण लावण्याकरितां, कर्म करणें प्राप्त आहे.    
मार्गी अंधासरिसा । पुढें देखणाही चाले जैसा ।
अज्ञाना प्रकतावा धर्मु तैसा । आचरोनि ॥ १५६ ॥
१५६) रस्त्यानें आंधळ्याच्या बरोबर पुढें चालणारा डोळस मनुष्य आंधळ्यास सांभाळून घेऊन त्याच्या बरोबर चालतो, त्याप्रमाणें अज्ञानी पुरुषाला ज्ञानी पुरुषानें आपण आचरण करुन धर्म स्पष्ट करुन दाखवावा.
हां गा ऐसें जरी न कीजे । तरी अज्ञानां काय वोजे ।
तिहीं कवणेपरी जाणिजें । मार्गातें या ॥ १५७ ॥
१५७) अरे, असें जर ( ज्ञानी पुरुषानें ) न केलें तर, अज्ञानी लोकांना काय कळणार आहे ? त्यांना आपल्याला योग्य असलेला मार्ग कोणत्या प्रकारें समजेल ? 
एथ वडील जें जें करिती । तया नाम धर्मु ठेविती ।
तेंचि येर अनुष्ठिती । सामान्य सकळ ॥ १५८ ॥
१५८) या जगांत थोर लोक जें कर्म आचरतात, त्यालाच सामान्य लोक धर्म असें म्हणतात; आणि इतर सर्वसामान्य लोक त्याचेंच आचरण करतात.   
हें ऐसें असे स्वभावें । म्हणोनि कर्म न संडावें ।
विशेषें आचरावें । लागें संतीं ॥ १५९ ॥
१५९) अशी स्थिति असल्यामुळें ( ज्ञानी पुरुषानें ) कर्म सोडणें बरोबर नाही ( इतकेच काय, परंतु ) संतांनीं तर याचें आचरण विशेष काळजीनें केलें पाहिजे.  
आतां आणिकाचिया गोठी । तुज सांगों काई किरीटी ।
देखें मीचि इये राहाटी । वर्तत असें ॥ १६० ॥
१६०) अर्जुना, आतां दुसर्‍याच्या गोष्टी तुला कशाला सांगूं ? हें पाहा, मीसुद्धां याच मार्गानें वागतों.  
काय सांकडें कांहीं मातें । कीं कवणें एकें आर्तें ।
आचरें मी धर्मातें । म्हणसी जरी ॥ १६१ ॥ 
१६१) मला कांहीं कमी आहे म्हणून किंवा कांहीं एक इच्छा धरुन मी धर्माचें आचरण करतों, असें म्हणशील,
तरी पुरतेपणालागीं । आणिकु दुसरा नाहीं जगीं ।
ऐसी सामुग्री माझां अंगीं । जाणसी तूं ॥ १६२ ॥
१६२) तर पूर्णतेच्या दृष्टीनें पाहिलें असतां, माझ्या तोडीला या जगांत दुसरा कोणीहि नाहीं; अशा तर्‍हेचें सामर्थ्य माझ्या अंगांत आहे, हें तुला माहीत आहे.    
मृत गुरुपुत्र आणिला । तो तुवां पवाडा देखिला ।
तोही मी उगला । कर्मीं वर्तें ॥ १६३ ॥
१६३) मीं आपल्या गुरुचा मेलेला मुलगा परत आणला तो माझा पराक्रम तूं पाहिला आहेस, असा मीदेखील निमूटपणें कर्म करतों.
परी स्वधर्मीं वर्ते कैसा । साकांक्षु कां होय जैसा ।
तयाचि एका उद्देशा-। लागोनियां ॥ १६४ ॥
१६४) परंतु ती कर्मे मी कशीं करतों म्हणून विचारशील तर सकाम पुरुष केवळ फळाच्या उद्देशानें ज्या दक्षतेनें कर्मे करतो, तितक्याच दक्षतेनें मीहि पण कर्माचरण करतों; पण तें केवळ त्याच एका हेतूनें कीं- 
जे भूतजात सकळ । असे आम्हांचि आधीन केवळ ।
तरी न व्हावें बरळ । म्हनोनियां ॥ १६५ ॥  
१६५) सर्व प्राणीसमूह आमच्या तंत्रानें चालणारा आहे, तेव्हां तो भलतीकडे जाऊं नये म्हणून; 
आम्ही पूर्णकाम होउनी । जरी आत्मस्थिती राहुनी । 
तरी प्रजा हे कैसेनि । निस्तरेल ॥ १६६ ॥
१६६) आम्ही निरिच्छ होऊन जर आपल्या स्वरुपस्थितींतच राहिलों, तर ही प्रजा भवसागरांतून कशी पार पडेल ? 
इहीं आमुची वास पाहावी । मग वर्तती परी जाणावी ।
ते लौकिक स्थिति आघवी । नासिली होईल ॥ १६७ ॥
१६७) यांनीं आमच्या मार्गाकडे पाहावें आणि मग वागण्याची रीत समजून घ्यावी; असा प्रकार असल्यामुळें ( आम्ही कर्म टाकून बसलों तर ) ती लोकांची राहाणी सर्वच बिघडेल.   
म्हणोनि समर्थु जो एथें । आथिला सर्वज्ञते ।
तेणें सविशेषें कर्मातें । त्यजावें ना ॥ १६८ ॥
१६८) म्हणून या लोकांत जो समर्थ असेल आणि सर्वज्ञतेनें युक्त असेल, त्यानें तर विशेषेंकरुन कर्माचा त्याग करुं नये.
देखें फळाचिया आशा । आचरे कामुकु जैसा ।
कर्मीं भरु होआवा तैसा । निराशाही ॥ १६९ ॥
१६९) पाहा. फलाच्या आशेनें फलासक्त पुरुष जितक्या उत्सुकतेनें कर्माचें आचरण करतो, तितक्याच उत्सुकतेनें फलाशा नसलेल्या लोकांनीहि कर्में केलीं पाहिजेत. 
जे पुढतपुढती पार्था । हे सकळ लोकसंस्था । 
रक्षणीय सर्वथा । म्हणऊनियां ॥ १७० ॥
१७०) कारण, अर्जुना, लोकांची ही वागणुकीची रीत सर्व प्रकारें नेहमीं जतन करुन ठेवणें योग्य आहे, म्हणून-
मार्गाधारें वर्तावें । विश्र्व हें मोहरें लावावें ।
अलौकिक नोहावें । लोकांप्रति ॥ १७१ ॥
१७१) शास्त्रानें सांगितल्याप्रमाणें वागून जगास सरळ मार्गाला लावावें, आणि आपण लोकांमध्यें लोकबाह्य वागूं नये.
जें सायासें स्तन्य सेवी । तें पक्वान्नें केवीं जेवी ।
म्हणोनि बाळका जैशीं नेदावीं । धनुर्धरा ॥ १७२ ॥
१७२) जें ( तान्हें बालक ) मोठ्या कष्टानें आईच्या अंगावरचें दूध पितें, तें पक्वानें कसें खाईल ? म्हणून अर्जुना, तीं पक्वान्नें ज्याप्रमाणें तान्ह्या मुलांना देऊं नयेत;  
तैशीं कर्मीं जया अयोग्यता । तयाप्रति नैष्कर्म्यता ।
न प्रगटावी खेळतां । आदिकरुनी ॥ १७३ ॥
१७३) त्याप्रमाणें ज्यांच्या अंगीं कर्मे चांगल्या तर्‍हेनें करण्याची योग्यता नाहीं, त्यांना थट्टेनेंदेखील नैष्कर्म्यतेचा उपदेश करुं नये.  
तेथें सत्क्रियाचि लावावी । तेचि एकी प्रशंसावी ।
नैष्कर्मींही दावावी । आचरोनी ॥ १७४ ॥
१७४) त्यांस योग्य कर्माची वागणूक लावून देणें हें योग्य आहे. त्यांच्याजवळ त्या सत्कर्माचरणाची स्तुति करावी आणि निष्काम पुरुषांनीहि सत्कर्माचेंच आचरण करुन दाखवावें. 
तया लोकसंग्रहालागीं । वर्ततां कर्मसंगी ।
तो कर्मबंधु आंगीं । वाजेलना ॥ १७५ ॥
१७५) लोककल्याणासाठीं जरी त्यांनीं कर्माचें आचरण केलें तरी कर्माचें बंधन त्यांस प्राप्त होणार नाहीं.



Custom Search

No comments: