Sunday, May 2, 2021

Shri Dnyaneshwari Adhyay 8 Part 1 श्रीज्ञानेश्र्वरी अध्याय ८ भाग १

 

Shri Dnyaneshwari 
Adhyay 8 Part 1 
Ovya 1 to 29 
श्रीज्ञानेश्र्वरी अध्याय ८ भाग १ 
ओव्या १ ते २९

मूळ श्लोक

अर्जुन उवाच :

किं तद् ब्रह्म किमध्यात्मं किं कर्म पुरुषोत्तम ।

अधिभूतं च किं प्रोक्तमधिदैवं किमुच्यते ॥ १ ॥

१) अर्जुन म्हणाला, हे पुरुषोत्तमा, ते ब्रह्म म्हणजे काय ? अध्यात्म म्हणजे काय ? कर्म म्हणजे काय ? अधिभूत कशाला म्हणतात ? अधिदैव कशाला म्हणतात ?    

मग अर्जुनें म्हणितलें । हां हो जी अवधरिलें ।

जें म्यां पुसिलें । तें निरुपिजो ॥ १ ॥

१) मग अर्जुन म्हणाला, अहो महाराज, ऐकलें कां ? जें मी विचारलें तें सांगावें.

सांगा कवण तें ब्रह्म । कायसया नाम कर्म ।

अथवा अध्यात्म । काय म्हणिपे ॥ २ ॥

२) सांगा, तें ब्रह्म कोणतें ? कर्म कशाचे नांव आहे ? आणि अध्यात्म म्हणतात तें काय ?

अधिभूत तें कैसें । एथ अधिदैव तें कवण असे ।

हें उघड मी परियेसें । तैसें बोला ॥ ३ ॥

३) अधिभूत म्हणतात तें कसें आहे ? यांत अधिदैव तें कोण आहे, हें मला स्पष्ट समजेल असें सांगा.

मूळ श्लोक

अधियज्ञः कथं कोऽत्र देहेऽस्मिन् मधुसूदन ।

प्रयाणकाले च कथं ज्ञेयोऽसि नियतात्मभिः ॥ २ ॥

२) हे मधुसूदना, या देहांत अधियज्ञ कोणता व कसा ? अंतःकरण निग्रह केलेले ( योगी ) प्रयाणकाळीं तुला कसा जाणतात ?

देवाअधियज्ञ तो काई । कवण पां इये देहीं ।

हें अनुमानसि कांहीं । दिठी न भरे ॥ ४ ॥

४) देवा, अधियज्ञ तो काय आहे व देहांत तो कोण आहे, हें अनुभवानें पाहूं म्हटलें तर कांहींच समजुतीस येत नाहीं. 

आणि नियता अंतःकरणीं । तूं जाणिजसी देहप्रयाणीं ।

तें कैसेनि हें शार्ङ्गपाणी । परिसवा मातें ॥ ५ ॥

५) आणि हे श्रीकृष्णा ज्या पुरुषांनीं आपलें अंतःकरण स्वाधीन करुन घेतले आहे, त्या पुरुषांकडून त्यांच्या प्रयाणकाली तूं जाणला जातोस तो कसा, हे मला ऐकवा.  

देखा धवळारीं चिंतामणीचां । जरी पहुडला होय दैवाचा ।

तरी वोसणतांही बोलु तयाचा । परी सोपु न वचे ॥ ६ ॥

६) ( ज्ञानेश्र्वरमहाराज म्हणतात ) पाहा, एखादा भाग्यवान पुरुष जर चिंतामणीच्या घरांत निजला असेल, तर त्याचे बरण्यांतीलहि शब्द पण ते व्यर्थ जाणार नाहींत.   

तैसें अर्जुनाचिया बोलासवें । आलें तेंचि म्हणितलें देवें ।

परियेसें गा बरवें । जें पुसिलें तुवां ॥ ७ ॥

७) त्याप्रमाणें अर्जुनाच्या विचारण्याबरोबरच श्रीकृष्णाच्या मनांत जें आलें तें श्रीकृष्ण सांगूं लागले. अरे, जें तूं विचारलेस तें चांगलें ऐक/  

किरीटी कामधेनूचा पाडा । परी कल्पतरुचा आहे मांदोडा ।

म्हणोनि मनोरथासिद्धीचिया चाडा । तो नवल नोहे ॥ ८ ॥

८) अर्जुन हा कामधेनूचा बछडा असून शिवाय तो कल्पतरुच्या मांडवाखाली ( बसला ) आहे; म्हणून त्यानें आपले मनोरथ सिद्धीस जावेत अशी इच्छा केली तर त्यांत आश्र्चर्य नाहीं.

कृष्ण कोपोनि ज्यासी मारी । तो पावे ब्रह्मसाक्षात्कारीं ।

मा कृपेनें उपदेशु करी । तो कैशापरी न पवेल ॥ ९ ॥

९) श्रीकृष्ण रागावून ज्याचा वध करतो, त्यास ब्रह्माचा साक्षात्कार होतो; मग ज्याला कृपेने उपदेश करील तो ब्रह्मसाक्षात्काराला कसा पावणार नाहीं ?

जैं कृष्णाचेया होईजे आपण । कृष्ण होय आपुलें अंतःकरण ।

तैं संकल्पाचें आंगण । वोळगती सिद्धी ॥ १० ॥

१०) जेव्हां आपण कृष्णाचे ( अनन्य ) भक्त व्हावें, ( तेव्हां ) आपलें ( भक्ताचें ) अंतःकरण कृष्ण होतें; व मग त्यावेळीं आपल्या संकल्पाच्या अंगणांत अष्टमहासिद्धि राबतात. 

परि ऐसें जें प्रेम । तें अर्जुनींचि आथि निस्सीम ।

म्हणऊनि तयाचे काम । सदा सफल ॥ ११ ॥

११) परंतु असें जें प्रेम, तें अर्जुनाच्याच ठिकाणी अमर्याद आहे; म्हणून त्याच्या इच्छा सदा सफल आहेत.   

या कारणें अनंतें । तें मनोगत तयाचें पुसतें ।

होईल जाणूनि आइतें । वोगरुनि ठेविलें ॥ १२ ॥

१२) यासाठीं श्रीकृष्णांनी अर्जुन आपल्याला ही गोष्ट विचारील, अशी त्याच्या मनांतील गोष्ट ओळखून, अगोदरच त्या गोष्टीरुपी पक्वानाचें ताट वाढून ठेवलें.   

जें अपत्य थानींहूनि निगे । तयाची भूक ते मायेसीच लागे ।

एर्‍हवीं तें शब्दें काय सांगे । मग स्तन्य दे येरी ॥ १३ ॥

१३) कारण कीं, स्तनपान केल्यानंतर दूर झालेल्या मुलाची भूक आईला लागते; एर्‍हवीं तें शब्दानें ‘ मला भूक लागली. दूध पाज ‘ असें सांगतें काय ? आणि मग ती पाजते.  

म्हणोनि कृपाळुवा गुरुचिया ठायीं । हें नवल नोहे कांहीं ।

परि तें असो आइका काई । जें देवो बोलता झाला ॥ १४ ॥

१४) म्हणून कृपाळू गुरुच्या बाबतींत हें कांहींच आश्र्चर्य नाहीं; परंतु तें असो. देव जें कांहीं बोलले तें ऐका.

मूळ श्लोक

श्रीभगवानुवाच :

अक्षरं ब्रह परमं स्वभावोऽध्यात्ममुच्यते ।

भूतभावोद्भवकरो विसर्गः कर्मसंज्ञितः ॥ ३ ॥

३) श्रीकृष्ण म्हणाले, जें परम अविनाशीआहें तें ब्रह्म. ब्रह्माची ( आकाराच्या उत्पत्तिनाशाबरोबर उत्पन्न व नष्ट न होणें ही ) जी सहजस्वरुपस्थिति तिला अध्यात्म असे म्हणतात. ( अक्षर ब्रह्मापासून ) भूतमात्रादि ( चराचर ) पदार्थंची उत्पत्ति करणारा जो सृष्टिव्यापार, त्याचें नांव कर्म.  

मग म्हणितलें सर्वेश्र्वरें । जें आकारीं इये खोंकरे ।

केंदलें असत न खिरे । कवणे काळीं ॥ १५ ॥

१५) मग सर्वेश्र्वर श्रीकृष्ण म्हणाले, जें या सर्व फुटक्या ( नाशिवंत ) आकाशमात्रांत गच्च भरलें असतांहि कोणत्याही वेळीं गळत नाहीं;   

एर्‍हवीं सपूरपण तयाचें पहावें । तरि शून्यचि नव्हे स्वभावें ।

परि गगनाचेनि पालवें । गाळूनि घेतलें ॥ १६ ॥

१६) एर्‍हवीं त्याचा सूक्ष्मपणा पाहूं गेलें तर तें शून्यच वाटेल; पण तें स्वभावानें शून्य नव्हे. ( कारण तें मूळचें सत् आहे, ) शिवाय तें इतकें सूक्ष्म आहे कीं, सूक्ष्मांत सूक्ष्म जें आकाश, त्याच्या पदरांतून तें गाळून घेतलें आहे.   

जें ऐसेंही परि विरुळें । इये विज्ञानाचिये खोळे ।

हालवलेंही न गळे । तें परब्रह्म ॥ १७ ॥

१७) जें इतकेंहि सूक्ष्म असून झिरझिरीत असलेल्या या प्रपंचरुप वस्त्राच्या गाळणींतून हालवलें तरी गळत नाहीं, ते परब्रह्म होय.

आणि आकाराचेनि आलेपणें । जन्मधर्मातें नेणे ।

आकारलोपीं निमणें । नाहीं कहीं ॥ १८ ॥

१८) आणि आकाराला आलेल्या पदार्थांच्या उत्पत्तीबरोबर जें जन्मरुपी विकाराला जाणत नाहीं व आकारवान् पदार्थ नाहीसें झालें तरी जें केव्हांहि नाश पावत नाही; 

ऐशिया आपुलियाची सहजस्थिती । जया ब्रह्माची नित्यता असती ।

तया नाम सुभ्रदापती । अध्यात्म गा ॥ १९ ॥

१९) अर्जुना, याप्रमाणें आपल्या स्थितीनें असणार्‍या ब्रह्माचें जें अखंडत्व त्या अखंडत्वास अध्यात्म हें नांव आहे.

मग गगनीं जेविं निर्मळे । नेणों कैंचीं एके वेळे ।

उठती घनपटळें । नानावर्णे ॥ २० ॥

२०) मग ज्याप्रमाणें निर्मळ आकाशांत एकदम निरनिराळ्या रंगांच्या मेघांच्या फळ्या कशा येतात हें कळत नाहीं;

तैसें अमूर्ती तिये विशुद्ध । महदादि भूतभेदें ।

ब्रह्मांडाचे बांधे । होंचि लागती ॥ २१ ॥

२१) त्याप्रमाणे त्या विशेष शुद्ध व निराकार अशा ब्रह्माच्या ठिकाणी महत् तत्त्व वगैरे भूतभेदानें ब्रह्मांडाचे आकार उत्पन्न व्हावयासच लागतात.

पैं निर्विकल्पाचिये बरडी । कीं आदिसंकल्पाची फुटे विरुढी ।

आणि ते सवेंचि मोडोनि य ढोंढी । ब्रह्मगोळकांची ॥ २२ ॥

२२) निर्विकल्प परब्रह्मरुपी माळ जमिनीवर मूळ संकल्प ( एकोऽहं बहु स्याम् ) रुपी अंकुर फुटतो; आणि त्याबरोबर ब्रह्मगोळकांचे आकार दाट येतात. 

तया एकैकाचे भीतरी पाहिजे । तव वीजाचाचि भरिला देखिजे ।

माजीं होतियां जातियां नेणिजे । लेख जीवां ॥ २३ ॥

२३) त्या एकेक ब्रह्मांडामध्यें पाहावें, तों तें ब्रह्मांड बीजांनीच ( मूळ समकल्पांनीच ) भरलेलें दिसतें; व एकेका ब्रह्मांडामध्यें होणार्‍याजाणार्‍या जीवांची ( तर ) गणती नाहीं,   

मग तया गोळकांचे अंशांश । प्रसवती आदिसंकल्प असमसहास ।

हें असो ऐसी बहुवस । सृष्टि वाढे ॥ २४ ॥

२४) मग त्या गोळकांमधील अंशरुपी एकेक जीव, असंख्य आदिसंकल्प करावयास लागले. हें असो. याप्रमाणें सृष्टि फार वाढावयास लागली.  

परि दूजेनविण एकला । परब्रह्मचि संचला ।

अनेकत्वाचा आला । पूर जैसा ॥ २५ ॥   

२५) पण दुसर्‍याशिवाय एक परब्रह्मच सर्वत्र भरलेलें आहे आणि त्याच्या ठिकाणीं अनेकत्चाचा असा पूर आला आहे.

तैसें समविषमत्व नेणों कैचें । वायांचि चराचर रचे ।

पाहतां प्रसवतिया योनींचे । लक्ष दिसती ॥ २६ ॥

२६) याप्रमाणें त्या ब्रह्माच्या ठिकाणीं समविषमत्व कोठून आलें, हें कळत नाहीं, तेथें उगीचच स्थावरजंगम पदार्थ उत्पन्न होतात. ते पाहिले असतां प्रसवणार्‍या योनींचें लक्षावधि प्रकार दिसतात.  

येरी जीवाभावाचिये पालविये । कांहीं मर्यादाच करुं नये ।

पाहिजे कवण हें आघवें विये । तंव मूळ तें शून्य ॥ २७ ॥

२७) इतर जीवाभावाच्या पालवीची काहीं गणनाच करतां येत नाहीं. हें कोण प्रसवतें ? म्हणून पाहूं गेलें तर, त्याचें मूळ तें शून्य आहे. 

म्हणूनि कर्ता मूदल न दिसे । आणि शेखीं कारणही कांहीं नसे ।

माजीं कार्यचि आपैसें । वाढों लागे ॥ २८ ॥

२८) म्हणून याचा मूळांत कर्ता कोणी दिसत नसून, शेवटीं याचें कारणहि कांहीं नाहीं; व मध्यें कार्यच मात्र आपोआप वाढावयास लागलें आहे. 

ऐसा करितेनवीण गोचरु । अव्यक्तीं हा आकारु ।

निपजे जो व्यापारु । तया नाम कर्म ॥ २९ ॥

२९) याप्रमाणें कर्त्याशिवाय अव्यक्ताच्या ठिकाणीं, (

 ज्याच्या योगें ) हा भासमान होणारा आकार उत्पन्न होतो,

 असा जो व्यपार, त्याला ‘ कर्म ‘ हें नांव आहे.



Custom Search

No comments: