Sunday, June 27, 2021

Shri Dnyaneshwari Adhyay 8 Part 7 श्रीज्ञानेश्र्वरी अध्याय ८ भाग ७

 

Shri Dnyaneshwari 
Adhyay 8 Part 7 
Ovya 160 to 190 
श्रीज्ञानेश्र्वरी 
अध्याय ८ भाग ७ 
ओव्या १६० ते १९०
मूळ श्लोक
अव्यक्ताद्व्यक्तक्तयः सर्वाः प्रभवन्त्यहरागमे ।
रात्र्यागमे प्रत्नीयन्ते तत्रैवाव्यक्तसञ्ज्ञके ॥ १८ ॥ 
१८) ब्रह्मदेवाच्या दिवसाला प्रारंभ झाला म्हणजे अव्यक्तापासून सर्व व्यक्त वस्तू उत्पन्न होतात. रात्रीचा प्रारंभ झाला म्हणजे त्याच अव्यक्तनामक वस्तूमध्यें त्या वस्तु लीन होतात. 
भूतग्रामः स एवायं भूत्वा भूत्वा प्रलीयते ।
रात्र्यागमेऽवशः पार्थ प्रभवत्यहरागमे ॥ १९ ॥
१९) हे अर्जुना, भूतांचा तोच हा समुदाय ( याप्रमाणें ) पुनः पुन्हां जन्मून, पराधीन होऊन, रात्र सुरुं झाली कीं लय पावतो, आणि दिवस सुरुं झाला कीं ( पुन्हां ) जन्मतो.   
तिये ब्रह्मभुवनीं दिवसें पाहे । ते वेळीं गणना केंही न समाये ।
ऐसें अव्यक्ताचें होये । व्यक्त विश्र्व ॥ १६० ॥
१६०) त्या ब्रह्मलोकांत जेव्हां दिवस उगवतो, तेव्हां ज्याची मोजदाद कोठेंहि करतां येत नाहीं, असें लीन असलेलें जग आकाराला येतें,   
पुढती दिहाची चौपाहारी फिटे । आणि हा आकारसमुद्र आटे ।
पाठीं तैसाचि मग पाहांटे । भरों लागे ॥ १६१ ॥
१६१) पुढें दिवसाचें चार प्रहर संपले, कीं हा आकाशसमुद्र आटतो व पुनः पहाटे तसाच आकाशसमुह भरावयास लागतो. 
शारदीयेचिये प्रवेशीं । अभ्रें जिरती आकाशीं ।
मग ग्रीष्मांती जैशीं । निगती पुढती ॥ १६२ ॥
१६२) शरद् ॠतूच्या आरंभी ज्याप्रमाणें ढग आकाशांत नाहींसें होतात व नंतर ग्रीष्म ॠतूच्या शेवटीं जसे ते पुनः उत्पन्न होतात;   
तैशी ब्रह्मदिनाचिये आदी । हे भूतसृष्टीची मांदी । 
मिळे जंव सहस्त्रावधी । निमित्त पुरे ॥ १६३ ॥
१६३) त्याप्रमाणें ब्रह्मदेवाच्या दिवसाच्या आरंभी हे भूतसृष्टीचे समुदाय, हजार चौकड्यांच्या काळाचें कारण संपेपर्यंत, उत्पन्न होत राहातात.  
पाठीं रात्रींचा अवसरु होये । आणि विश्र्व अव्यक्तीं लया जाये ।
तोही युगसहस्त्र मोटका पाहे । आणि तैसेंचि रचे ॥ १६४ ॥
१६४) मग रात्रीची वेळ होते आणि विश्र्व अव्यक्तांत लीन होतें. ती ही हजार चौकड्यांची रात्र अमंळ उजाडली कीं, पूर्वीप्रमाणें जगत् उत्पन्न होऊं लागतें,  
हें सांगावया काय उपपत्ती । जे जगाचा प्रळयो आणि संभूती ।
इये ब्रह्मभुवनींचिया होती । अहोरात्रामाजीं ॥ १६५ ॥
१६५) हें सांगावयास कारण काय, तर ब्रह्मलोकाच्या एका दिवसरात्रींमध्यें जगाची उत्पत्ति आणि संहार होतात.  
कैसें थोरिवेचें मान पाहें पां । तो सृष्टिबीजाचा साटोपा ।
परि पुनरावृत्तीचिया मापा । शीग जाहला ॥ १६६ ॥
१६६) ब्रह्मदेवाच्या मोठेपणाचें प्रमाण कसें आहे ! पाहा कीं, जो सृष्टिरुपी बीजाचें सांठवण आहे[ तरी पण तोहि पुनरावृत्तीच्या मापाला शीण ( टोंक ) झाला.  
एर्‍हवीं त्रैलोक्य हें धनुर्धरा । तिये गांवाींचा गा पसारा । 
तो हा दिनोदयीं एकसरां । मांडत असे ॥ १६७ ॥
१६७) हे अर्जुना, एर्‍हवीं तर, हा जो त्रैलोक्याचा विस्तार, तो त्या ब्रह्मदेवाच्या गांवचा दिवस उगवल्याबरोबर एकदम रचला जातो. 
पाठीं रात्रींचा समो पावे । आणि अपैसाचि सांठवे ।
म्हणिये जेथिंचें तेथ स्वभावें । साम्यासि ये ॥ १६८ ॥
१६८) मग रात्रीची वेळ प्राप्त झाली, कीं तो ( त्रैलोक्याचा पसारा ) आपोआप लीन होतो, ( व तो ) जेथून उत्पन्न झाला तेथें स्वभावतः साम्याला येतो, असे म्हणतात.  
जैसें वृक्षपण बीजासि आलें । कीं मेघ हें गगन जाहालें ।
तैसें अनेकत्व जेथ सामावले । तें साम्य म्हणिपे ॥ १६९ ॥
१६९) ज्याप्रमाणें झाड बीजरुपाला येतें अथवा ढग हे आकाशरुप होतात त्याप्रमाणें या अनेकत्वाचा जेथें समावेश होतो, त्यास ' साम्य ' म्हणतात. 
मूळ श्लोक
तरस्तस्मात्तु भावोऽन्योऽव्यक्तोऽव्यक्तात्सनातनः ।
यः स सर्वेषु भूतेषु नश्यत्सु न विनश्यति ॥ २० ॥
२०) पण वर सामगितलेल्या अव्यक्तापलीकडचें दुसरें जें सनातन अव्यक्त तत्त्व आहे, तें सर्व भूतें नाहींशीं झालीं तरीहि नाहींसे होत नाहीं.  
तेथ समविषम न दिसे कांहीं । म्हणोनि भूतें हे भाष नाहीं ।
जेविं दूधाचि जाहालिया दहीं । नामरुप जाय ॥ १७० ॥
१७०) तेथें ( त्या साम्यावस्थेंत ) सम ( एकासारखें एक ) विषम ( एकाहून एक भिन्न ) हें कांहीं दिसत नाहीं. म्हणून ( त्यासाम्यावस्थेस ) भूतें असें म्हणतां येत नाहीं. तें कसें तर, ज्याप्रमाणें दूध हे दहीं झाल्यावर त्याचें दूध हें नांव व पातळपणाचें स्वरुप हीं जातात.     
तेविं आकारलोपासरिसें । जगाचें जगपण भ्रंशे । 
परि जेथें जाहालें तें जैसें । तैसेंचि असे ॥ १७१ ॥
१७१) त्याप्रमाणें आकार नाहींसा झाल्याबरोबर जगाचा जगपणा नाश पावतो. पण जग जेथून झालें, तें अव्यक्त जसेंच्या तसेंच असतें.  
तैं तया नांव सहज अव्यक्त । आणि आकारावेळीं तेंचि व्यक्त ।
हें एकास्तव एक सूचित । एर्‍हवीं दोनी नाहीं ॥ १७२ ॥
१७२) त्या वेळीं त्यास ( साम्यावस्थेस ) सहज अव्यक्त असें म्हणतात. व्यक्त व अव्यक्त ही दोन्ही नांवें एकाच्यामुळे दुसरें, अशी सापेक्ष दिलेलीं आहेत. विचार करुन पाहिलें तर, स्वरुपदृष्ट्या हे दोन्ही भाव नाहींत, 
जैसें आटलिया रुपें । आटलेपण ते खोटी म्हणिपे ।
पुढती तो घनाकारु हारपे । जे वेळीं अळंकार होती ॥ १७३ ॥
१७३) ज्याप्रमाणें अलंकार आटविल्यावर आटलेल्या आकाराला लगड असें म्हणतात व पुढें ज्या वेळीं त्या लगडीचे निरनिराळे अलंकार होतात त्यावेळी त्या लगडीचा लगडपणा नाहींसा होतो.   
इयें दोन्ही जैसीं होणीं । एकीं साक्षीभूत सुवर्णीं ।
तैसी व्यक्ताव्यक्ताची कडसणी । वस्तूंचां ठायीं ॥ १७४ ॥
१७४) अलंकार व लगड ह्या दोन्हीचें होणें जसें एका आधारभूत सोन्यावर असतें, त्याप्रमाणें आकार ( जग ) आणि निराकार ( माया ) यांचा विचार चैतन्याच्या ठिकाणीं आहे ( म्हणजे आकार आणि निराकार या दोन्ही सापेक्ष कल्पनांस आधार चैतन्यच आहे. ) 
तें तरी व्यक्त ना अव्यक्त । नित्य ना नाशवंत ।
या दोहीं भावअतीत । अनादिसिद्ध ॥ १७५ ॥
१७५) तें चैतन्य तर साकारहि नाही आणि निराकारहि नाहीं; त्यास तिन्ही कालांत असणारें असेही म्हणता येत नाही. व क्षणभंगूर असेंहि म्हणता येत नाहीं.  तें त्या परस्पर सापेक्ष दोन्ही स्थितीच्या पलीकडे असून नित्य सिद्ध आहे.  
जें हें विश्र्वचि होऊनि असे । परी विश्र्वपण नासिलेनि न नासे ।
अक्षरें पुसिल्या न पुसे । अर्थु जैसा ॥ १७६ ॥
१७६) ज्याप्रमाणें पाटीवर लिहिलेलीं अक्षरें पुसून टाकलीं, तरी त्यापासून होणारा बोध नाहींसा होत नाहीं,
पाहें पां तरंग होत जात । परि तेथ उदक तें अखंड असत ।
तेवीं भूतभावीं नाशिवंत । अविनाश जें ॥ १७७ ॥
१७७) हें पाहा, पाण्यावर लाटा तर उत्पन्न होतात आणि नाहीशा होतात; परंतु त्या ठिकाणीं त्या लाटांस आधार असलेले पाणी सर्वकाळ असतें, त्याप्रमाणें या नाशिवंत प्राणिमात्रांत त्यास आधारभूत असलेलें जें चैतन्य, तें अविनाशच असतें,    
नातरी आटतियें अळंकारीं । नाटतें कनक असे जयापरी ।
तेवीं मरतिये जीवाकारीं । अमर जें आहे ॥ १७८ ॥
 १७८) अथवा आटणार्‍या अलंकारांत जसें न आटणारें सोनें असतें; त्याप्रमाणें मर्त्य जीवांच्या आकारांत जें अमर आहे;
मूळ श्लोक
अव्यक्तोऽक्षर इत्युक्तस्तमाहुः परमां गतिम् ।
यं प्राप्य न निवर्तन्ते तद्धाम परमं मम ॥ २१ ॥ 
पुरुषः स परः पार्थ भक्त्या लभ्यस्त्वनन्यया ।
यस्यान्तःस्थानि भूतानि येन सर्वमिदं ततम् ॥ २२ ॥
२१-२२) ज्यास अव्यक्त, ' अक्षर ' असें म्हणतात, त्यालाच परम ( अत्यंत श्रेष्ठ ) गति म्हणतात. ज्यप्रत गेल्यावर ( प्राणी ) परत येत नाहीत, तें माझें अत्यंत श्रेष्ठ असे स्वरुप आहे. हे पार्था, ज्याच्यामध्यें ही सर्व भूतें आहेत व ज्यानें हें सर्व ( विश्र्व ) व्यपिलेलें आहे, तो पर ( श्रेष्ठ ) पुरुष अनन्य ( एकनिष्ठ ) भक्तीनेंच प्राप्त होणारा आहे.    
जयातें अव्यक्त म्हणों ये कोडें । म्हणतां स्तुति हे ऐसे नावडे ।
जे मना बुद्धी न सांपडे । म्हणऊनियां ॥ १७९ ॥
१७९) ज्याला ( परब्रह्माला ) कौतुकानें अव्यक्त असें म्हटलें, तर त्याची ( ती ) स्तुति केली असें होत नाहीं; कारण तें मनबुद्धिला अगोचर आहे म्हणून; 
आणि आकारा आलिया जयाचें । निराकारण न वचे ।
आकारलोपें न विसंचे । नित्यता गा ॥ १८० ॥
आणि अर्जुना, आकाराला आल्यानें ज्याचें निराकारपण जात नाहीं, व आकाराच्या लोपानें ज्याची नित्यता बिघडत नाही,
म्हणोनि अक्षर जें म्हणिजे । तेवींचि म्हणतां बोधुही उपजे । 
जयापरौता पैसु न देखिजे । या नाम परमगती ॥ १८१ ॥
१८१) म्हणून ज्याला ' अक्षर ' असें म्हणतात, तसेंच ज्यास अक्षर असें म्हटलें असतां ज्याचा बोधहि उत्पन्न होतो व ज्याच्या पलीकडे कांहीं एक विस्तार दिसत नाहीं, म्हणून ज्यास परम गति असे म्हणतात.   
पैं आघवां  इहीं देहपुरीं । आहे निजेलियाचे परी ।
जे व्यापारु करवी ना करी । म्हणऊनियां ॥ १८२ ॥
१८२) परंतु संपूर्ण देहरुपी नगरामध्यें ( जो परमात्मा ) निजल्यासारखा ( उदासीन ) आहे; कारण कीं, तो कोणताहि व्यापार करीत नाहीं व करवीत नाहीं म्हणून 
एर्‍हवीं जे शारीरचेष्टा । त्यांमाजी एकही न ठके गा सुभटा ।
दाहीं इंद्रियांचिया वाटा । वाहताचि आहाती ॥ १८३ ॥
१८३) एर्‍हवीं शरीराचे जे व्यापार आहेत, त्यापैकीं अर्जुना, एकहि थांबत नाहीं; तर देहादि इंद्रियांचे व्यवहार सुरुच आहेत. 
उकलूं विषयांचा पेटा । होता मनाचां चोइटां । 
तो सुखदुःखाचा राजवांटा । भीतराहि पावे ॥ १८४ ॥ 
१८४) मनरुपी चव्हाट्यावर विषयरुप  बाजार उघडलेले असतात व त्यांपासून होणार्‍या सुखदुःखरुपी प्राप्तीतील राजाच्या हक्काचा मुख्य हिस्सा आंत जीवालाहि पावता होतो.  
परि रावो पहुडलिया सुखें । जैसा देशींचा व्यापारु न ठके ।
प्रजा आपुलालेनि अभिलाखें । करितचि असती ॥ १८५ ॥
१८५) परंतु, राजा सुखानें निजला असतां, ज्याप्रमाणें देशाचा व्यापार थांबत नाही; तर त्यांची प्रजा आपापल्या इच्छेप्रमाणे व्यापार करीतच असते,  
तैसें बुद्धीचें हन जाणणें । कां मनाचें घेणें देणें ।
इंद्रियांचें करणें । स्फूरण वायूचें ॥ १८६ ॥
१८६) त्याप्रमाणें बुद्धीची जाणण्याची क्रिया, अथवा मनाची संकल्प विकल्परुप घेण्यादेण्याची क्रिया, इंद्रियांचे व्यपार व प्राणवायूची हालचाल,
हे देहक्रिया आघवी । न करवितां होय बरवी ।
जैसा न चलवितोनि रवी । लोकु चाले ॥ १८७ ॥ 
१८७) ही सर्व देहक्रिया ( परमात्म्यानें स्वतः ) न करवितां चांगली होते. ज्याप्रमाणें सूर्य हा स्वतः लोकांस व्यापार करावयास न लावतां लोकांचे व्यापार चांगले चालतात, 
अर्जुना तयापरी । सुतला ऐसा आहे शरीरीं ।
म्हणोनि पुरुषु गा अवधारीं । म्हणिपे जयातें ॥ १८८ ॥
१८८) अर्जुना, याप्रमाणें ( आत्मा ) हा शरीरांत निजल्यासारखा असा आहे, म्हणून त्यास पुरुष असे म्हणतात, असें समज.  
आणि प्रकृतिपतिव्रते । पडिला एकपत्नीव्रतें ।
येणेंही कारणें जयातें । पुरुषु म्हणों ये ॥ १८९ ॥
१८९) आणि पुरुष असें म्हणण्याचें दुसरें कारण असें कीं, हा आत्मा पतिव्रता जी प्रकृति, तिच्याशी एकपत्नीव्रतानें असतो. या कारणास्तवदेखील ज्याला पुरुष असें म्हणतां येते. 
पैं वेदांचें बहुवसपण । देखेचिना जयाचें आंगण ।
हें गगनाचें पांघरुण । होय देखा ॥ १९० ॥
१९०) चारी वेदांचा विस्तार त्या परमात्म्याचे अंगणहि पाहूं शकत नाही. हें चैतन्य आकाशाचें ( हि ) पांघरुण आहे. 



Custom Search

No comments: